दिशा : (भौगोलिक). भूपृष्‍ठावरील कोणत्याही एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात दुसऱ्या एखाद्या ठिकाणाचे स्थान ठरविण्यासाठी उपयोगी पडणारी संकल्पना. सामान्यतः सूर्य जिकडे उगवतो ती पूर्व, तो मावळतो ती पश्चिम, पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले असतो उजवीकडील ती दक्षिण व डावीकडची ती उत्तर अशा चार प्रमुख दिशा मानतात. यांच्या दरम्यान आग्नेय, नैर्ऋत्य, वायव्य, ईशान्य किंवा अनुक्रमे दपू, दप, उप आणि उपू अशा उपदिशा मानतात. यांच्याही दरम्यान आणखी आठ आणि आणखी सोळा उपदिशा मानून सर्वेक्षणात, नौकानयनात वगैरे बत्तीस दिशा मानतात. पूर्व, आग्नेय इ. अष्टदिशांच्या जोडीला त्या ठिकाणचे खस्वस्तिक दाखविणारी ऊर्ध्व आणि त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूची ती अधः मिळून आपल्याकडे दशदिशा मानलेल्या आहेत.

सूर्य उगवतो ती पूर्व हे विधान ढोबळमानाचे होय कारण उत्तरायण व दक्षिणायन यांमुळे क्षितिजावरील सूर्योदयाचे स्थान सु. ४७° बदलते. २१ मार्च किंवा २३ सप्टेंबर या दिवशी माध्यान्हीचा सूर्य विषुववृत्तावर बरोबर खस्वस्तिकी येतो म्हणून या तारखांस सूर्योदयाची क्षितिजावरील जागा बरोबर पूर्व दिशा दाखविते. परंतु या तारखांसाठी न थांबताही कोणत्याही ठिकाणी वर्षातील कोणत्याही दिवशी सूर्योदयाचे स्थान बरोबर पूर्व बिंदूच्या किती उत्तरेस वा दक्षिणेस आहे यावरून गणितानेही पूर्वबिंदू ठरविता येतो.

उत्तर दिशा काढण्याची एक पद्धत : (१) सकाळची सावली, (२) दुपारची सावली. उ=उत्तर दिशा

यापेक्षा चुंबकसूचीच्या साहाय्याने प्रथम उत्तर व त्यावरून इतर दिशा ठरविणे जास्त सोपे आहे. परंतु चुंबकसूची पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव दाखविते चुंबकीय ध्रुवांचे स्थान बदलत असते म्हणून या पद्धतीने पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील दिशा म्हणजेच भौगोलिक उत्तर दिशा ठरविता येत नाही. भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक (एस्ओआय्) नकाशात भौगोलिक व चुंबकीय उत्तर दिशांमधील नकाशा तयार केलेल्या वेळेचा फरक व त्यात बदल होण्याचा वेग दिलेला असतो. त्यावरून भौगोलिक उत्तर दिशा चुंबकसूचीच्या साहाय्यानेही ठरविता येते.

दुसऱ्या एका सोप्या पद्धतीनेही एखाद्या ठिकाणी भौगोलिक उत्तर दिशा ठरविता येते. माध्यान्हसूर्य खस्वस्तिकी येत नसेल अशा दिवशी उघड्या जागेवर क्षितिजासमांतर पातळीशी काटकोन करणारा खांब उभा करावा. माध्यान्हपूर्वी त्याच्या सावलीचे टोक जेथे येईल तेथे खूण करावी. ही खूण व खांबांचा तळमध्य एवढ्या त्रिज्येने खांबाभोवती एक वर्तुळ काढावे. माध्यान्हानंतर खांबाच्या सावलीचे टोक पुन्हा या वर्तुळाला टेकले की तेथे खूण करावी. मग खांबाच्या तळमध्याला वर्तुळावरील दोन्ही खुणा जोडणाऱ्या रेषांमधील कोन दुभागावा. हा दुभाजक त्या ठिकाणची दक्षिणोत्तर दिशा दाखवितो.

पृथ्वीचा आस जवळजवळ ध्रुवताऱ्याकडे रोखलेला असल्यामुळे उत्तर गोलार्धात रात्रीच्या वेळी ध्रुवताऱ्यावरूनही उत्तर दिशा ठरविता येते.

उत्तर दिशा ०° मानून तिच्यापासून सव्य दिशेने इष्ट ठिकाण ज्या दिशेस असेल तेथपर्यंतचा कोन मोजूनही त्या ठिकाणाची दिशा सांगता येते. याप्रमाणे पूर्व दिशा म्हणजे ९०°, पश्चिम २७०°, आग्नेय म्हणजे १३५° इ. होत हे लक्षात येईल. वर उल्लेखिलेल्या बत्तीस दिशांपेक्षा अशी अंशात्मक दिशा सांगणे अधिक बिनचूक होय.

पहा : दिक्‌सूचक.

डिसूझा, आ. रे. कुमठेकर, ज. ब.