ऑस्ट्रिया : मध्य यूरोपातील प्रजासत्ताक राष्ट्र. ४६° २२’ उ. ते ४९° १’ उ. व ९° २२’ पू. ते १७° १०’ पू. दक्षिणोत्तर अंतर पूर्वेकडे सु. २९५ किमी., पश्चिमेकडे फक्त ६४ किमी. पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त अंतर सु. ५८० किमी. क्षेत्रफळ सु. ८३,८४९ चौ. किमी. लोकसंख्या ७४,४३,८०९ (१९७१). राजधानी व्हिएन्ना. देशाच्या सरहद्दीची लांबी सु. २,६२७ किमी. असून उत्तरेस पश्चिम जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया, पूर्वेस चेकोस्लोव्हाकिया व हंगेरी, दक्षिणेस यूगोस्लाव्हिया व इटली आणि पश्चिमेस लिख्टेनश्टाइन व स्वित्झर्लंड हे देश आहेत. या देशाला सागरी सरहद्द नाही.

भूवर्णन: यूरोपात स्वित्झर्लंडच्या खालोखाल डोंगराळ देश म्हणून ऑस्ट्रियाची गणना होते. या देशाचा पश्चिम व दक्षिण भाग बव्हंशी आल्प्स पर्वताच्या पूर्वेकडील श्रेणींनी व्यापलेला आहे. या भागाची सर्वसाधारण उंची ९०० मी. पेक्षा अधिक असून पूर्वेकडे व ईशान्येकडे ती कमी होत जाऊन तो भाग टेकड्यांचा बनलेला आहे. व्हिएन्नाजवळचा सखल प्रदेश सु. ९६ किमी. लांब व ३२ किमी. रुंद आहे. आग्नेय भागात बरेच ऊन पाण्याचे व खनिजयुक्त झरे आहेत. ग्रोस ग्लॉकनेर हे होए टाऊअर्न डोंगराचे शिखर (३,७९८ मी.) सर्वांत जास्त उंच आहे, तर पूर्व सरहद्दीजवळ नॉइझीडलर हे सरोवर फक्त ११५ मी. उंचीवर आहे. ब्रेनर, झेमेरिंग, आर्लबर्ग, श्प्लुगेन इ. अनेक खिंडींमुळे वाहतूक सुलभ झाली आहे.

डॅन्यूब नदीकाठचा चिंचोळा भाग व पूर्व सरहद्दीजवळचा हंगेरिअन मैदानाकडील सखल प्रदेश, डॅन्यूबच्या उत्तरेकडील बोहीमियाच्या पठाराचा प्रदेश व दक्षिणेकडील पूर्व आल्प्स पर्वतीय भाग, असे ऑस्ट्रियाचे स्वाभाविक विभाग पडतात.

डॅन्यूब ही मध्य यूरोपातील प्रसिद्ध पूर्ववाहिनी नदी जर्मनीमध्ये उगम पावून जर्मनी, ऑस्ट्रिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, यूगोस्लाव्हिया व रुमानिया या देशांतून वाहात जाऊन काळ्या समुद्रास मिळते. ही नदी ऑस्ट्रियात ३४७ किमी. वाहते. ती वायव्य भागातून प्रवेश करते व उत्तर भागातून जाऊन व्हिएन्नामार्गे पूर्वेस चेकोस्लोव्हाकियात शिरते. तिला पर्वतीय भागातून इन, एन्स, झाल्त्साक, मूर्त्स, लेख, राबॉ, मूर, द्रावा इ. उपनद्या येऊन मिळतात. पश्चिम सरहद्दीवर थोड्या अंतरापुरती र्हा,ईन नदी वाहते. हिमानी क्रियेमुळे बनलेली सु. २०० सरोवरे या देशात आहेत. त्यांत पूर्व सरहद्दीवरील नॉइझीडलर हे सर्वांत मोठे आहे.

अर्वाचीन युगामधील घडणीमुळे व हिमानी क्रियांमुळे या देशात विविध प्रकारचे खडक व खनिजे भूपृष्ठानजीक आढळतात. डॅन्यूब नदीच्या बाजूस चुनखडीचे खडक तसेच ईशान्येस बोहीमियाचे पठाराच्या पायथ्यानजीक खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळतात. आल्प्स पर्वत व हंगेरीच्या मैदानाची सरहद्द येथे दगडी कोळसा मिळतो. मॅग्नेसाइट, ग्रॅफाइट यांचे उत्पादन सर्वांत अधिक होत असून शिसे, जस्त, तांबे आणि मीठ यांचे उत्पादन त्या खालोखाल आहे. यूरोपात रुमानियाच्या खालोखाल या देशाचे खनिज तेलाचे उत्पादन आहे आणि औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने खनिज संपत्तीचा व शक्तिसाधनांचा पुरवठा भरपूर आहे. त्यात जलविद्युत् पुरवठ्याचा भाग मोठा असून त्यात वाढ होण्यास अद्याप वाव आहे.

हवामान : ऑस्ट्रिया अटलांटिक महासागरापासून ८०० किमी. पेक्षा अधिक दूर असल्यामुळे व दक्षिणेकडे पर्वतमय प्रदेश असल्यामुळे त्याचे हवामान खंडांतर्गत स्वरूपाचे आहे. उन्हाळा व हिवाळा यांच्या तपमानांत बराच फरक आढळतो. जानेवारीचे सरासरी तपमान – १३° से. पर्यंत व जुलैचे १८° से. पर्यंत असते. याशिवाय भूरचना व उंची यांचा परिणाम स्थानिक हवामानावर झालेला दिसतो. पश्चिमेकडून येणाऱ्याआवर्तांचाही परिणाम जाणवतो. वृष्टीचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते व हिवाळ्यात कमी आणि हिमस्वरूपात असते. वृष्टीमध्ये प्रदेशाच्या उंचीप्रमाणे झालेली वाढ स्पष्ट दिसते. पश्चिमेकडील पर्वतीय भागांत वृष्टी भरपूर, तर पूर्वेकडे ती सरासरी ५० ते ७५ सेंमी. पर्यंत होते. ६०० मी. उंचीवरील प्रदेश जानेवारीत व फेब्रुवारीत हिमाच्छादित असतात. भूमध्य सामुद्रिक हवामानाची छटा इटलीकडील सरहद्दीच्या बाजूस थोडीशी आढळते. तसेच तिकडून येणारे फॉनसारखे वारे दऱ्याखोऱ्यांतील तपमान उबदार करण्यास मदत करतात. द्राक्षाच्या बागायतीस त्यांची चांगलीच मदत होते. पुष्कळ ठिकाणी तपमानाची विपरीतता म्हणजे दरीच्या तळाशी थंड हवा व उतारावर उबदार हवा दिसून येते.

वनस्पती : देशाच्या एकूण क्षेत्राच्या ३७% क्षेत्र अरण्यांनी व्यापलेले असून त्यापैकी ८४% भाग सूचिपर्णी वृक्षांचा, विशेषतः स्प्रूसचा आहे. त्याखालोखाल बीचचे रुंदपर्णी वृक्ष आहेत. पर्वतांच्या पायथ्यापासून वरपर्यंत वेगवेगळे वृक्ष आढळतात. पायथ्यापासून १,२०० मी. पर्यंत बीच, बर्च आणि ओक यांसारखे रुंदपर्णी पानझडी वृक्ष, तर त्यापेक्षा जास्त उंचीवर फर आणि स्प्रूस यांसारखे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. एकंदरीने मिश्र अरण्यांच्या या प्रदेशात सूचिपर्णी वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. उंचीप्रमाणे पानझडी वृक्षांकडून सूचिपर्णीकडे व नंतर लहान झुडपांपासून अगदी खुरट्या गवतापर्यंत वनस्पति प्रकार आढळतात. अगदी उंचावर टंड्रासारखी वनस्पती आहे. ऑस्ट्रियामध्येही ठराविक उंचीवर असणाऱ्याकुरणांचा मेंढपाळीच्या स्थलांतरित व्यवसायास फार उपयोग होतो. पर्वताच्या दक्षिणाभिमुखी बाजूवर सूर्यप्रकाश अधिक मिळत असल्यामुळे उत्तराभिमुखी बाजूपेक्षा तेथे वनस्पतीचे आच्छादन जास्त असते. व्हिएन्नाच्या आसपासचा भाग स्टेप प्रकारचा आहे. उत्तम प्रकारचे नरम लाकूड पुरविणाऱ्यादेशांत कॅनडा, स्वीडन व फिनलंड यानंतर ऑस्ट्रियाचा क्रमांक लागतो.

प्राणी : आल्प्स पर्वतीय भागांत अस्वल, शामॉय हरिण व रानबकरे यांसारखे प्राणी आहेत. आयबेक्स व मॉर्माट दुर्मिळ होत आहेत. डॅन्यूब नदीच्या व सरोवरांच्या काठी कॉर्‌मोरंट, हेरॉन, करकोचे, बगळे, बदके, टार्मिगन हे पक्षी आढळतात परंतु सोनेरी गरुड नामशेष झाला आहे. शिकारीवर कडक निर्बंध असले, तरी एकूण प्राण्यांची संख्या कमी झालेली आहे. सरोवरांतूनदेखील मासे मोठ्या प्रमाणावर मिळत नाहीत. गुरे व मेंढ्या हे पाळीव प्राणी मात्र भरपूर आहेत.

इतिहास : यूरोपच्या चौरस्त्यावरील या देशाचे व डॅन्यूब खोऱ्याच्या तोंडाशी व्हिएन्नाचे स्थान आणि प्रदेश डोंगराळ असला तरी अनेक खिंडींतून शेजारच्या देशांशी होणारे सुलभ दळणवळण, यांमुळे प्राचीन काळापासून या देशाला यूरोपात महत्त्वाचे स्थान आहे. इसवी सनाच्या सुरुवातीस रोमनांनी हा देश जिंकला, तेव्हा तेथे केल्ट व सुएबी लोकांची वस्ती होती. पाचव्या शतकानंतर हूण, ऑस्ट्रोगॉथ, लोंबार्ड व बव्हेरियन यांनी येथील रोमन प्रांत उद्ध्वस्त केले. सातव्या शतकाच्या सुरुवातीस स्लाव्ह लोकांनी हल्लीचा स्टिरिया, लोअर ऑस्ट्रिया व कॅरिंथिया हे भाग व्यापले. ७८८ मध्ये शार्लमेनने हा देश जिंकला. त्याने पूर्वेकडील प्रदेशाचा बंदोबस्त केला व वसाहतीस उत्तेजन दिले. ख्रिस्ती धर्मप्रसारास जोर चढला. शार्लमेननंतर पूर्वभाग मोरेव्हियन व नंतर मग्यार लोकांकडे गेला. पहिला ऑटो याने तो ९५५ मध्ये जिंकून बव्हेरियाला जोडला. ९७६ मध्ये तो लीओपोल्ड ऑफ बॅबेनबर्गकडे आला. हा पहिल्या ऑस्ट्रियन घराण्याचा संस्थापक होय. पुढे पहिला फ्रीड्रिख याने या प्रदेशाला ‘डची’ चा दर्जा दिला. ११९२ मध्ये स्टिरियाही बॅबेनबर्गकडे आला. अकराव्या व बाराव्या शतकांत ऑस्ट्रियात सरंजामशाही सर्वांत प्रबल झाली व त्याच काळात डॅन्यूब नदीचे व्यापारी महत्त्व वाढून तिच्या काठी अनेक शहरे उदयास आली. बॅबेनबर्गनंतर बोहीमियाच्या राजाने लोअर व अपर ऑस्ट्रिया, स्टिरिया, कॅरिंथिया व कार्निओला हे भाग घेतले. तेव्हा जर्मन राज्यप्रमुखांनी १२७२ मध्ये हॅप्सबर्गच्या रुडॉल्फला राजा निवडले. रुडॉल्फने वरील सर्व प्रदेश परत जिंकून घेतले. येथपासून हॅप्सबर्ग घराण्याचा प्रभाव यूरोपवर प्रस्थापित झाला. पुढे पवित्र रोमन साम्राज्याचे राज्यकर्तेही याच घराण्यातून निवडले जाऊ लागले. तथापि राजकीय अस्थिरता नेहमीच असे. सोळाव्या शतकातील व्यापारी क्रांतीमुळे जुने व्यापारी मार्ग आणि टायरोल, कॅरिंथिया येथील सोन्याचांदीच्या खाणी यांचे महत्त्व कमी झाले. कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथीयांचे वर्चस्वाचे प्रयत्न वाढले. टायरोलमध्ये प्रॉटेस्टंटांच्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याने थोडे अंग धरले, परंतु तो लढा चिरडण्यात आला. दुसरा फर्डिनँड याच्या कारकीर्दीत प्रॉटेस्टंटविरोधी धोरणामुळे ‘तीस वर्षांच्या युद्धा’ ला एक कारण मिळाले. राज्यसत्ता व कॅथलिक धर्मसत्ता एक होऊन राज्यसत्ता नष्ट होईपर्यंत ती युती टिकली. बोहीमिया व मोरेव्हिया हे ऑस्ट्रियाचेच भाग बनले आणि वेस्टफेलियाच्या तहानंतर पवित्र रोमन साम्राज्य नाममात्र राहून हॅप्सबर्ग साम्राज्य प्रबळ झाले. स्पेनचा सहावा चार्ल्‌सयाने आपली मुलगी माराया टेरीसा हिच्यासाठी हॅप्सबर्गचा प्रदेश मिळविला. तिचा नवरा पहिला फ्रान्सिस हा १७४५ मध्ये बादशहा झाला. परंतु खरी सत्ता मारायाच्या हाती होती. प्रशियाचा दुसरा फ्रीड्रिख याच्याशी तिचा दीर्घकाळ लढा झाला. जर्मन भूमीच्या स्वामित्वासाठी ऑस्ट्रियन वारसा युद्ध व सप्तवार्षिक युद्ध ही लढली गेली. मारायाने पूर्वेकडील साम्राज्य वाढविले. सरदारांचे महत्त्व कमी करुन त्यांना नोकरशाहीत गुंतविले आणि केंद्रसत्ता बळकट केली. तिच्यानंतर तिच्या मुलाने तिचेच धोरण पुढे चालविले. इतस्ततः विखुरलेल्या आपल्या प्रदेशांचे केंद्रीकरण व जर्मनीकरण करण्यास सार्वत्रिक विरोध झाला. त्याच्यानंतर ऑस्ट्रियातील उच्च वर्गाचे लोक सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या वरचढ होऊ लागले. अठराव्या शतकात ऑस्ट्रियात संगीत व वास्तुकला यांची चांगली प्रगती झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस आधुनिक ऑस्ट्रियन साहित्याचा उदय झाला.

ऑस्ट्रियाचे व फ्रान्सचे सूत कधीच जमले नाही. १७९२ मध्ये ऑस्ट्रिया फ्रान्सबरोबरच्या युद्धात ओढला गेला. लढाया व तह यांत ऑस्ट्रियाची पुष्कळ हानी झाली. १८१२ मध्ये ऑस्ट्रियाला नेपोलियनच्या बाजूने रशियाविरुद्ध युद्धात पडावे लागले परंतु १८१३ मध्ये तो विरुद्ध बाजूस मिळाला. १८१४ च्या व्हिएन्ना कॉंग्रेसमध्ये ऑस्ट्रियालानेदर्लंड्स व बाडेन हे प्रदेश मिळाले नाहीत परंतु लाँबर्डी, व्हिनीशिया, इस्त्रिया व डाल्मेशिया मिळाले. १८४८ पर्यंत यूरोपच्या साम्राज्यवादी राजकारणावर ऑस्ट्रियन पंतप्रधान मेटरनिख याचा मोठा प्रभाव होता. तथापि मध्यम व खालचे वर्ग यांचे प्रश्न गंभीर होऊ लागले होते. राष्ट्रवादी वृत्ती वाढत होती व ऑस्ट्रियातील जर्मन, स्लाव्ह, हंगेरियन व इटालियन या विविध लोकांतील वितुष्ट वाढत होते. १८४८ मध्ये क्रांतिकारकांनी मेटरनिखला पदच्युत केले, फर्डिनँडने राज्यत्याग केला व फ्रान्सिस जोझेफ बादशहा झाला. ऑस्ट्रियाचे वर्चस्व वाढल्यासारखे वाटले तरी पण साम्राज्य खिळखिळे झाले होते. व्यापारी सवलती मिळून आर्थिक लाभ वाढला तरी वांशिक लढे वाढतच होते. १८५९ च्या इटलीच्या युद्धात लाँबर्डी गमवावा लागला आणि ऑस्ट्रियन साम्राज्याचे लष्करी व राजनैतिक दुबळेपण उघड झाले. ही संधी साधून प्रशियाच्या प्रिन्स बिस्मार्कने कुरापत काढून ऑस्ट्रियाचा पराभव करुन त्याला जर्मन संघराज्यातून हाकलून लावले. व्हिनीशिया इटलीला द्यावा लागला व १८६७ मध्ये ऑस्ट्रो-हंगेरियन जोड राजेशाही प्रस्थापित झाली. तथापि विविध प्रकारच्या बहुसंख्य लोकांवर असलेली जर्मन-मग्यार या अल्पसंख्याकांची सत्ता ही नवीन राष्ट्रवादी वातावरणात कालबाह्य ठरू लागली. लोकांच्या असंतोषाच्या जोडीला १९१४ मध्ये ऑस्ट्रियन वारसाचा वध होऊन पहिले महायुद्ध पेटले. १९१८ मध्ये पहिल्या चार्ल्‌सने राज्यत्याग केला राजेशाही संपुष्टात आली आणि १२ नोव्हेंबरला सोशॅलिस्ट व पॅनजर्मन पक्षांनी शांततामय सत्तांतर घडवून आणले. जर्मन ऑस्ट्रिया हे बृहद् जर्मनीचा एक भाग म्हणून स्वतंत्र लोकशाही राष्ट्र घोषित करण्यात आले.

ऑस्ट्रियाच्या सध्याच्या सरहद्दी १९१९ च्या सेंट जर्मेन तहाने निश्चित करण्यात आल्या. या आणि व्हर्सायच्या तहाने जर्मनीशी कोणत्याही प्रकारची आर्थिक किंवा राजनैतिक एकी करण्यास ऑस्ट्रियाला बंदी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रिया हा सु. ६० लक्ष लोकांचा एक लहानसा देश बनला आणि एका मोठ्या राज्याचे आर्थिक व औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झालेल्या व्हिएन्नात त्यापैकी सु. तिसरा हिस्सा लोकसंख्या केंद्रित झाली. आर्थिक दृष्ट्या जवळजवळ स्वावलंबी असलेल्या जोडराजेशाहीची फुटाफूट आणि करवाढ यांमुळे ऑस्ट्रियाला कच्चा माल, अन्न आणि बाजारपेठ यांचा तुटवडा भासू लागला. उपासमार आणि इन्फ्ल्यूएंझा यांनी विशेषतः व्हिएन्नात पुष्कळ बळी घेतले. त्यातच चलन फुगवट्याचे संकट आले. त्यातून १९२४ मध्ये राष्ट्रसंघाच्या मदतीमुळे सुटका झाली. तथापि बेकारी, आर्थिक आणीबाणी व राजकीय अस्वस्थता वाढतच होती. ‘लाल’ व्हिएन्नाचे कार्ल सीट्झचे मवाळ समाजवादी सरकार व १९२१ च्या निवडणुका जिंकलेले क्लॅरिकॅलिस्ट यांच्यातील तेढ वाढू लागली. कार्ल रेनरच्या मंत्रिमंडळाच्या पाठोपाठ शोबर, सीपेल वगैरेंच्या नेतृत्वाखालील ख्रिश्चन सोशॅलिस्ट व पॅनजर्मन यांची सं‌युक्त स‌रकारे आली. १९२७ मध्ये व्हिएन्नात बंडाळी माजली. खाजगी सैन्ये स‌रकारला जुमानीनाशी झाली नॅशनल स‌ोशॅलिझमने पॅनजर्मन पक्ष पचवून टाकला. १९३२ मध्ये डॉल्फ्सचॅन्सेलर झाला. तो जर्मनीशी एकीकरण व नॅशनल सोशॅलिझम यांच्या विरोधी होता. तो फॅसिझमकडे झुकत चालला व इटलीवर अवलंबून राहू लागला. त्याने केलेल्या मुस्कटदाबीमुळे १९३४ मध्ये बंड झाले, पण ते दडपले गेले. मग अधिकेंद्रित राज्य सुरु झाले व सोशल डेमोक्रॅट्स आणि नॅशनल सोशॅलिस्ट हे दोन्ही पक्ष अवैध ठरविण्यात आले. १९३४ मध्येच नॅशनल सोशॅलिस्टांनी डॉल्फ्सचा वध केला परंतु ते सरकार जिंकू शकले नाहीत. नंतर सत्तेवर आलेल्या शूस्निगने सोशॅलिस्टांशी मऊ धोरण ठेवले, परंतु ते फारसे यशस्वी ठरले नाही. जर्मनीचा ऑस्ट्रियावरील दबाव वाढू लागला. नॅशनल सोशॅलिस्ट पक्ष पुन्हा वैध ठरला. १९३८ मध्ये त्याला मंत्रिमंडळात जागाही मिळाल्या. जर्मनीशी एकीकरण टाळण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून शूस्निगने सार्वमत घेतले परंतु जर्मनीने निर्वाणीचा खलिता दिल्यामुळे ऑस्ट्रिया नमला. मार्च १९३८ मध्ये जर्मन सैन्याने तो व्यापला. प्रथम सेसिनकार्टचे सरकार होते, परंतु १९४० मध्ये ऑस्ट्रिया संपूर्णपणे जर्मनीत सामील करण्यात आला. १९४५ मध्ये रशियन व अमेरिकन सैन्यांनी ऑस्ट्रिया जिंकला. कार्ल रेनरच्या नेतृत्वाखाली प्रांतिक सरकार स्थापिले गेले. देशाचे पाच लष्करी विभाग पाडून ते दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांनी व्यापले. अर्थव्यवस्था पार कोलमडली. पूर्व व पश्चिम यूरोपमधील व्यापार थंडावला होता. १९४६मध्ये दोस्तराष्ट्रांनी ऑस्ट्रियास मान्यता दिली. रशियाला द्यावयाच्या भरपाईबाबत मतभेद झाल्यामुळे दीर्घकाळापर्यंत शांततातह होऊ शकला नाही. १५मे१९५५ला ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, रशिया व ऑस्ट्रिया यांच्यात औपचारिक तह होऊन ऑस्ट्रियाचे सार्वभौमत्व मान्य झाले. तथापि या तहान्वये ऑस्ट्रियाला मोठी आक्रमक शस्त्रे बाळगण्यास‌ बंदी घातली गेली व रशियाला युद्धभरपाई दाखल ३२ कोटी डॉलर द्यावे असे ठरले. ऑस्ट्रियाने कायमची तटस्थता पुकारली. १९५५ मध्ये ऑस्ट्रियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला. परदेशी मदतीने ऑस्ट्रियाची अर्थव्यवस्था सावरली व विकास पावू लागली. प्रगत सामाजिक सुधारणा कायदे झाले. ऑस्ट्रियाने यूरोपातील ‘यूरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन’ सारख्या आंतरराष्ट्रीय शासकीय यंत्रणात भाग घेतला. १९६१ मध्ये ऑस्ट्रियाने यूरोपीय सामाईक बाजारपेठेशी निकटचे संबंध जोडण्याचे जाहीर केले. राजकीय दृष्ट्या सनातनी जनता पक्ष व समाजवादी पक्ष यांचे समबल राखले गेले व एकामागोमाग एक संयुक्त मंत्रिमंडळे आली. तथापि १९७१ च्या निवडणुकीमध्ये मात्र ऑस्ट्रियाच्या इतिहासात पहिल्यांदाच समाजवादी पक्षास स्पष्ट बहुमत मिळून तो अधिकारावर आला.

राजकीय स्थिती : ऑस्ट्रिया देशाचे लोकशाही प्रजासत्ताक राज्य १९ डिसेंबर १९४५ रोजी अस्तित्वात आले आणि त्याला १९२०–२९ मध्ये मान्य करण्यात आलेले लोकशाही पद्धतीचे संविधान लागू करण्यात आले. या संविधानाप्रमाणे ऑस्ट्रिया हे त्यातील बर्गेनलँड, कॅरिंथिया, लोअर ऑस्ट्रिया, सॉल्झबर्ग, स्टिरिया, टायरोल, अपर ऑस्ट्रिया, व्हिएन्ना व व्होरार्लबर्ग या ९ प्रांतांचे मिळून लोकशाही संघराज्य झाले. दर सहा वर्षांच्या मुदतीकरिता लोकनियुक्त अध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख म्हणून राहतो. अध्यक्ष हा सामान्यतः चार वर्षांच्या मुदतीपुरती चॅन्सेलरची (पंतप्रधानाची) नियुक्ती करतो व चॅन्सेलर आपल्या इच्छेनुसार मंत्रिमंडळ निवडतो, खाते वाटप करतो व राष्ट्रीय धोरण ठरवितो. अर्थात हे मंत्रिमंडळ पार्लमेंटच्या विश्वासास पात्र असले पाहिजे. पार्लमेंटच्या संघराज्यसभा (फेडरल कौन्सिल) व राष्ट्रीय सभा (नॅशनल कौन्सिल) अशा अनुक्रमे वरिष्ठ व कनिष्ठ सभा असतात. १९७१ मध्ये वरिष्ठ सभेचे ५४ सभासद प्रांतीय विधिमंडळाकडून आणि कनिष्ठ सभेचे १८३ सभासद ९मतदार संघांतून चार वर्षांसाठी निवडले गेले. एकवीस वर्षांवरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार असून सव्वीस वर्षांवरील कोणीही नागरिक पार्लमेंटच्या उमेदवारीस पात्र ठरतो. राष्ट्रीय सभेस कायदेकानू करण्याचे अधिकार आहेत वरिष्ठ सभेच्या हाती अल्पकारणापुरता मर्यादित नकाराधिकार आहे. खातेवाटप, कायदेकानू व त्यांची अंमलबजावणी यांच्या अधिकारांचे वाटप मध्यवर्ती व प्रांतीय सरकारांमध्ये केलेले आहे. प्रत्येक प्रांतासाठी एक लोकनियुक्त विधिमंडळ असून त्यातून निवडलेला राज्यप्रमुख हा प्रांताचा राज्यकारभार राज्यचिटणीसाच्या मदतीने चालवितो. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांचे (कॉम्यून) कारभार त्या त्या पातळीवर लोकनियुक्त पद्धतीने चालतात. असे एकूण ३,००० कॉम्यून आहेत. याशिवाय १४ मोठ्या शहरांना कायद्याने विशेष अधिकार दिले आहेत. व्हिएन्ना या राजधानीच्या मोठ्या शहरास नगरपालिका आहे. शिवाय हे शहर ऑस्ट्रियाचा एक प्रांत म्हणूनही गणले जाते.

न्यायदान ही केंद्रीय कक्षेतील बाब आहे. न्यायाधिशाच्या नेमणुकाही केंद्र सरकार करते. व्हिएन्ना येथे सर्वोच्च न्यायालय असून त्याला दिवाणी व फौजदारी कोर्टाचे अपिलाचे अंतिम अधिकार आहेत. दिवाणी व फौजदारी अधिकार असलेली एकूण चार प्रांतीय न्यायालये व १८जिल्हा न्यायालये आहेत. त्यांशिवाय दिवाणी अधिकार असलेली २२९ स्थानिक न्यायालये आहेत. १९३४ मध्ये बंद झालेली ज्यूरीची पद्धत १९५१ पासून पुन्हा अंमलात आली आहे. या देशात देहान्ताची शिक्षा नाही.

या देशात सक्तीच्या लष्करी नोकरीचा कायदा १८ व ५१ वर्षे वयांच्या दरम्यानच्या पुरुषांना लागू आहे. देशात सुं. ४४,००० सैनिकांचे एक सैन्यदल आहे. त्यात दोन चिलखती पलटणी आहेत. तीन पायदळी पलटणी पूर्व विभागात आहेत. उरलेल्या चार डोंगरी विभागात सज्ज असतात. व्हिएन्ना, ग्रात्स व सॉल्झबर्ग ही लष्कराची प्रमुख केंद्रे आहेत. हवाईदल ४,३५० सैनिकांचे आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी मूळ १७५२ मध्ये स्थापलेले केंद्र १९५८ पासून पुन्हा सुरू केले आहे.

आर्थिक स्थिती : देशाचा विस्तार लहान आणि त्यातूनही बराच भाग उंचसखल असल्यामुळे हा देश संपूर्णतया शेतीवर अवलंबून राहणे शक्य नाही. शेजारी यूरोपातील जर्मनी, स्वित्झर्लंड, चेकोस्लोव्हाकिया यांसारखे पुढारलेले देश लागून असल्यामुळे जास्तीत जास्त जमीन शेतीखाली आणण्याचा प्रयत्न व त्यातून अधिकात अधिक उत्पन्न काढण्याचे प्रयत्न झालेले आहेत. याचा परिणाम म्हणजे बव्हंशी गरजेपुरते ८७% अन्नधान्याचे उत्पादन ऑस्ट्रिया करु शकतो.

पर्वतीय प्रदेशात शेतीशिवाय उरलेली बरीच जमीन चराऊ कुरणांखाली व अरण्याखाली आहे. त्यापैकी कुरणांचा उपयोग दुग्धपदार्थांसाठी व मांसासाठी गुरांची जोपासना करण्याकरिता होऊन शेतीला एक जोडधंदा मिळालेला आहे. जंगलाची वाढ, लाकूडतोड व तत्संबंधी उद्योग हे मात्र अगदी भिन्न प्रकारचे व्यवसाय आहेत. उत्तम अरण्यांमुळे व जगातील वाढत्या मागणीमुळे या व्यवसायांवरही देश बराच अवलंबून आहे. ऑस्ट्रियन अर्थकारणाचा तिसरा आधार म्हणजे त्या देशाचे झालेले औद्योगिकीकरण. खनिजांत लोखंड, बॉक्साइट, चुनखडी व खनिज मीठ ही आवश्यकतेपुरती उपलब्ध आहेत. पोलाद व्यवसायासाठी दगडी कोळसा जर्मनी, पोलंड, रशिया आदी देशांतून आणावा लागतो. शक्तिसाधनांच्या बाबतीत जलशक्तीचे या देशाला वरदान आहेच आणि त्याशिवाय खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचे साठेही पुरेसे आहेत. कसबी कामगारांची उणीव या देशास नाही. डॅन्यूब नदीचा सर्व ॠतूंत उपयोगी पडणारा व स्वस्त जलमार्ग हा देशाच्या प्रगतीस उपयुक्त आहे. एकंदरीने शेती, वनसंपत्ती, हौशी प्रवासी व औद्योगिक उत्पादन यांवर या देशाची भिस्त आहे. यूरोपातील स्वित्झर्लंड या देशाचा ऑस्ट्रिया हा शेजारी, पण एक परकीय आक्रमणापासून पूर्णपणे मुक्त म्हणून सुदैवी, तर दुसरा दर युद्धाच्या खाईत खेचला गेलेला दुर्दैवी! याचा परिणाम ऑस्ट्रियाच्या आर्थिक स्थैर्यावर वारंवार होत आलेला दिसून येतो.

पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रियाच्या साम्राज्याची वाताहत होऊन देशाची अन्नान्नदशा झाली, बेकारी वाढली, चलन फुगवटा झाला आणि सर्व अर्थकारण ढासळण्याच्या मार्गावर होते. बाहेरील राष्ट्रांनी केलेल्या मदतीवर ऑस्ट्रिया उभा राहिला. दुसऱ्यामहायुद्धानंतरही याची पुनरावृत्ती झाली. परंतु बाहेरुन मिळालेल्या ४ अब्ज डॉलरांच्या मदतीचा या राष्ट्राने पुरेपूर उपयोग करुन आपली आर्थक स्थिती चांगली सावरली आहे. आता देशातील चलनी नोटांच्या बदली १०० टक्क्यांहून जास्त तारण असणाऱ्या देशांपैकी हा एक देश आहे.

कृषि : या देशातील शेतीला येथील भूस्वरूपामुळे मर्यादा पडली आहे. डॅन्यूब नदीच्या आसपासचा मैदानी पट्टा सखल असून शेतीस अधिक उपयोगी आहे. याशिवाय लहान लहान खोऱ्यांतून शेती केली जाते. १९७० साली एकूण १६,८१,००० हेक्टर प्रदेशाच्या सु. २१ टक्के जमीन शेतीखाली होती. हवामान शेतीस अनुकूल आहे. परंतु हिमयुगात झालेली प्रदेशाची झीज, चढउतार तसेच वर्षातील काही काल टिकणारे हिमाच्छादन यांमुळे जमीन कसदार राहत नाही. याला हिमोढांचे व नद्यांच्या गाळाचे प्रदेश अपवाद आहेत. अशा जमिनींतून अधिक पिके घेण्यासाठी बाह्य खतांचा व निवडक बियाणांचा उपयोग येथील शेतकऱ्यांनी आत्मसात केला आहे. त्यामुळे नवीन शेतजमीन लागवडीखाली आणण्यापेक्षा सधन शेती करणे शेतकरी अधिक पसंत करतो.

सपाट प्रदेशात ट्रॅक्टरांचा वापर करण्यात येतो अन्यत्र बऱ्याच ठिकाणी घोड्यांचा वापर केलेला आढळतो. शेतीवरील विजेचा वापर सर्रास असून पुढील थोड्याच वर्षांत सर्व शेतांवर विजेचा वापर अपेक्षित आहे. निम्म्या शेतांचे क्षेत्र सरासरीने १·२ हेक्टर ते ५ हेक्टरपर्यंत आहे तर उरलेल्यांचे ५ पासून १०० हेक्टरपर्यंत आहे. १०० हेक्टरहून अधिक जमीन असलेली शेते ३,७०० आहेत.

शेतावर काम करणारांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. युद्धपूर्व कालात अंदाजे ९ लक्ष लोक शेतीवर काम करीत होते त्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे. इतके असूनही शेती उत्पादन वाढत आहे. देशास लागणाऱ्या अन्नधान्याच्या ७५ टक्के भाग हा देश पहिल्या महायुद्धानंतर निर्माण करीत असे. हे उत्पादन दुसऱ्या महायुद्धापूर्वी ८१% वर व त्यानंतर ८७% वर आलेले आहे.

प्रमुख पिके गहू, राय, ओट, बार्ली, सातू, बटाटे, बीट ही होत. सु. ४० हजार हेक्टरमध्ये द्राक्षाचे मळे आहेत. त्यापासून मुख्यत्वे मद्य तयार केले जाते. राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा वाटा १७ टक्के आहे.

देशातील डोंगरउतरणीवरील कुरणांवर दुधासाठी व मांसासाठी परंपरागत पशुपालनाचा व्यवसाय चालू आहे. एकूण जमिनीपैकी २६·४ टक्के जमीन अशा कुरणांखाली असून दूध, लोणी, चीज व मांस यांचा दर्जा वरचा आहे. उत्कृष्ट दर्जाच्या गुरांची जोपासना करण्यात ऑस्ट्रियन शेतकरी जगप्रसिद्ध आहेत. १९७० साली देशात गुरे २४,६८,००० डुकरे ३४,४५,००० बकऱ्या ६२,००० मेंढ्या १,१३,००० घोडे ४७,००० व कोंबड्या १,२१,४०,००० होत्या. ऑस्ट्रियात मासेमारीचा व्यवसाय अगदी अल्प प्रमाणात चालतो.

दुसऱ्या महायुद्धात फार मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे उत्पादनात १/३ ने घट झाली परंतु युद्धोत्तर कालात लाकडाचे उत्पादन पुन्हा एक कोटी ते सव्वाकोटी घनमीटरच्या जवळपास आले आहे. यातील तिसरा हिस्सा मुख्यत्वेकरून जर्मनी व इटली या देशांकडे पाठविला जातो. कापीव लाकूड पाठविण्यापेक्षा त्यातून खोकी, पेट्या, पूर्वरचित घरे, खेळणी, टर्पेंटाईन इ. वस्तू करण्याकडे कल वाढता आहे. तोडीव लाकडाचा एक चतुर्थांश भाग जळणासाठी वापरला जातो.

उद्योग : ऑस्ट्रियात खनिज पदार्थांच्या उत्पादनाला महत्त्व आहे, कारण त्याचे साठे भरपूर आहेत. डॅन्यूबच्या खालच्या टप्प्यात दगडी कोळसा व वरच्या टप्प्यात स्टिरियात हलका लिग्नाइट कोळसा काढतात स्टिरिया व कॅरिंथियामध्ये लोखंड काढतात. यांशिवाय शिसे, जस्त, तांबे इ. खनिजेही मिळतात व उत्तम दर्जाचे ग्रॅफाइट काढले जाते. खनिज तेल व नैसर्गिक वायू ईशान्य भागात मिळतात. या सर्व खाणव्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झालेले आहे. औद्योगिक उत्पादन दुसऱ्या युद्धाचे सुरुवातीपासून वाढत जाऊन आता जवळजवळ दुप्पट झाले आहे आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या ते निम्म्याने आहे. युद्धोत्तर कालात राष्ट्रीयीकरण झालेला लोखंड व पोलाद उद्योग हा या देशाचा मुख्य व्यवसाय आहे. त्यासाठी कोळसा जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया यांतून आणावा लागतो. १९७० मधील पोलादाचे उत्पादन ४०·८ लक्ष टन, लोखंडाचे २९·६ लक्ष टन व पोलादी पत्र्याचे उत्पादन २८·६ लक्ष टन होते. याच आधारावर मोटारी, ट्रक, ट्रॅक्टर, मोटार-सायकली व सायकली यांचे उत्पादन अवलंबून आहे. कापड उद्योगधंदा हा दुसऱ्या प्रतीचा उद्योगधंदा असून कारखाने व हस्तकौशल्याच्या व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांपैकी सर्वांत जास्त मजुरांचा समावेश यात झालेला आहे. रासायनिक उद्योगधंदे वाढत असून त्यांमध्ये रासायनिक खते व प्लॅस्टिक यांना महत्त्व आहे. याखालोखाल कागद व विद्युत्उपकरणांचे व्यवसाय आहेत. यांव्यतिरिक्त कसबी कारागिरीमुळे जवाहिरी, सुंदर काचसामान, उत्कृष्ट भांडी, उत्तम फर्निचर, कोरीव काम व अन्य सुबक वस्तूंच्या निर्मितीबाबत हा देश यूरोपात प्रसिद्ध आहे. व्हिएन्ना हे त्याचे केंद्र होय. तथापि सध्या या वस्तूंचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

प्रत्येक प्रांताचे प्रमुख शहर हे त्या त्या प्रांताच्या अंतर्गत व्यापाराचे केंद्रआहेच पण त्याशिवाय अंतर्गत वआंतरराष्ट्रीय व्यापारउदिमाचा फार मोठा वाटा व्हिएन्ना या औद्योगिक केंद्राने व राजधानीच्या शहराने उचललेला आहे. येथून सर्व शेजारच्या राष्ट्रांकडे दळणवळणाचे मार्ग गेलेले आहेत. दुसऱ्यामहायुद्धानंतर व्यापाराच्या वस्तूंत बराच बदल झालेला आहे. अद्यापही अन्नधान्याच्या बाबतीत हा देश अगदी स्वयंपूर्ण झालेला नाही. त्याची ही गरज जर्मनीकडून व अमेरिकेकडून येणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे. उद्योगधंद्यात भरपूर वाढ झाल्याने निर्यातीत चांगली वाढ होत चालली आहे. एकूण निर्यातीत २५ टक्के कच्चा माल, २५ टक्के अर्धसंस्कारित, ४५ टक्के पक्का माल व ३ टक्के अन्नधान्ये असे प्रमाण पडते. पहिल्या दोहोंत लोखंड, पोलाद, कागदाचा रांधा, सूत, इमारती लाकूड यांचा व पक्क्या मालांत यंत्रे, वीजयंत्रे, मोटार, सायकली, ट्रॅक्टर यांचा समावेश होतो. आयातीमध्ये यंत्रसामग्री, खनिजे, कोळसा, तेल, रसायने व अन्नधान्ये प्रमुख आहेत आणि त्यांत इंधने ८ टक्के व अन्नधान्ये १० टक्के असे प्रमाण पडते. निर्यात व्यापाराच्या किंमतीनुसार पश्चिम जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, अमेरिका, रशिया व ब्रिटन आणि आयात व्यापारात पश्चिम जर्मनी, इटली, अमेरिका, ब्रिटन, स्वित्झर्लंड, फ्रान्स नेदर्लंड्स असा क्रम लागतो. आयात निर्यातीत तफावत खूप आहे. १९७० ची एकूण आयात ९२२६·६ कोटी ऑस्ट्रियन शिलिंग इतकी होती, तर निर्यात ७४२७·२ कोटी ऑस्ट्रियन शिलिंग होती. व्यापारातील तूट प्रामुख्याने वेगाने वाढणाऱ्या हौशी प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून भरून काढली जाते.

क्रोन हे नाणे १९२४ पूर्वी कायदेशीर होते पण १९१८ नंतरच्या चलन फुगवट्यात ते गडगडले. त्यानंतर म्हणजे १९२४ पासून शिलिंग हे या देशाचे चलन असून त्याचे शंभर ग्रोशेन असतात. ६ डिसेंबर ७१ चा हुंडणावळीचा दर १ पौंड = ५९·७० शिलिंग व अमे. १ डॉ. = २३·८५ शि. होता. ऑस्ट्रियाच्या राष्ट्रीय बँकेची एक महामंडळ म्हणून १९२३ मध्ये स्थापना झाली. चलनी नोटा काढणे, परराष्ट्रातील पैशाच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणे, चलनाची स्थिरता राखणे ही महत्त्वाची कामे या बँकेकडे आहेत. कायद्याने या बँकेचे ५० टक्के भांडवल सरकारचे असते. याशिवाय राष्ट्रीयीकरण झालेल्या तीन पतपेढ्या, पोस्ट बचत बँका व ४१ इतर बँका या देशात आहेत.

देशातील २५ टक्केपर्यंतच्या व्यवसायांचे राष्ट्रीयीकरण झाले असून डाक, तार, दूरध्वनी, नभोवाणी, दूरचित्रवाणी या गोष्टी सर्वस्वी सरकारी मालकीच्या आहेत. अर्थकारणाच्या दृष्टीने या देशाची परदेशी व्यापारावर फारच मोठी भिस्त आहे. पश्चिमेकडील देशांशी व्यापार महत्त्वाचा असला, तरी कराराप्रमाणे तटस्थता राखण्याची अवघड जबाबदारी हा देश काटेकोरपणाने पाळत आला आहे.

दळणवळण : या देशाला सागरकिनारा नाही. पण यूरोपात मध्यवर्ती असल्याने सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या साधनांची येथे झपाट्याने वाढ झालेली आहे. डोंगराळ प्रदेश असूनही या देशात लोहमार्गांचे व रस्त्यांचेचांगले जाळे आहे. पर्वतीय प्रदेशातील रस्ते वगळता सर्व रस्ते अद्ययावत व बारमाही उपयोगाचे आहेत. १९७० मध्ये ५,९०८ किमी. लोहमार्गांपैकी २,४१४ किमी. मार्गांचे विद्युतीकरण झालेले होते. प्रवाशांच्या सोयीसाठी डोंगरी व पोलादी दोरांवरून जाणारी रेल्वे, खुर्च्या व बर्फावरून ओढण्याच्या गाड्या यांची मुद्दाम व्यवस्था केलेली आहे. एकूण सर्व रस्ते ९५,००० किमी. असून प्रमुख हमरस्ते ९,२६० किमी. लांबीचे आहेत. त्यांची व्यवस्था केंद्र सरकारकडे आहे १,७८० किमी. खास मोटार वाहतुकीचे– ऑटोबाहून– आहेत. २३,०९७ किमी. लांबीचे रस्ते प्रांतांच्या अखत्यारीत आहेत. डॅन्यूब नदीतूनच काय ती आंतरराष्ट्रीय स्वरूपाची ३२० किमी. जलवाहतूक चालते १९७० साली ही वाहतूक ६५·५ लक्ष टनापर्यंत होती.

आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या दृष्टीने व्हिएन्नाजवळील विमानतळ महत्त्वाचा असून त्याशिवाय ग्रात्स, इन्सब्रुक, क्लॅगनफर्ट, लिंट्स व सॉल्झबर्ग या पाच ठिकाणी चांगले विमानतळ आहेत. देशाच्या दुर्गम भूपृष्ठरचनेमुळे अंतर्गत विमानवाहतूक अगदी मर्यादित राहिली आहे. परदेशांशी होणारी बहुतेक व्यापारी वाहतूक इटलीतील ट्रीएस्ट बंदरातून व उरलेली जर्मनीतील हँबर्ग व ब्रेमेन या बंदरांतून होते.

दूरध्वनींची संख्या १९७० अखेर १३,३४,००० होती. नभोवाणी व दूरचित्रवाणी यांचा कारभार डिसेंबर १९५७ पासून एका स्वायत्त मंडळाकडे देण्यात आला आहे तरी त्यावर अप्रत्यक्ष सरकारी नियंत्रण आहेच. या मंडळातर्फे २४३ रेडिओ प्रक्षेपकांमार्फत कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. त्यात जाहिरातींचाही समावेश असतो. रेडिओंची संख्या १९७० मध्ये २०,२६,१५७ होती. दूरचित्रवाणीची सुरुवात १९५५ पासून झाली त्याची २६ प्रक्षेपणकेंद्रे आहेत व परवानाधारकांची संख्या १९७० अखेर १४,२५,६२२ होती.

लोक व समाजजीवन : ऑस्ट्रियातील लोकांत प्रामुख्याने चार वंशांचे मिश्रण आढळते. आग्नेयीकडील उंच, गहिऱ्यारंगाच्या लोकांचा दिनारिक वंश, पश्चिमेकडील बुटक्या व काटक लोकांचा अल्पाईन वंश, उत्तरेकडील उंच, सडपातळ व उजळ लोकांचा नॉर्डिक वंश व ईशान्येकडील मध्यम उंचीच्या लोकांचा बाल्टिक वंश. मग्यार, स्लाव्ह, चेक, स्लोव्हाक, इटालियन, रुमानियन इ. लोक थोड्याफार प्रमाणात सरहद्दीजवळ आढळतात.

धर्माच्या बाबतीत हा देश एकसंध आहे. ख्रिस्ती धर्म प्रमुख असून सु. ९० टक्के लोक रोमन कॅथलिक पंथाचे व ६ टक्के लोक प्रॉटेस्टंट पंथाचे आहेत. उरलेल्यांपैकी काही ग्रीक चर्च संप्रदायाचे व थोडे ज्यू धर्माचे आहेत. नाझी अंमलात ज्यूंची संख्या फार घटली. देशात पूर्ण धर्मस्वातंत्र्य आहे.

जनतेचे राहणीमान इतर पश्चिम यूरोपीय देशांप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. कामगार वर्गांसाठी नगरपालिकांतर्फे आदर्श पद्धतीची घरे बांधण्यात येतात. १९५०–६० या काळात अशी ७०,००० घरे बांधण्यात आली. डोंगराळ भागात घरे बांधण्याच्या कामी लाकूड व दगड या दोन्हींचा उपयोग केला जातो. या देशाची भूपृष्ठरचना मोठी शहरे वाढण्यास अनुकूल नाही, त्यामुळे नदीकाठी, रुंद खोऱ्यांतून व ज्या ठिकाणी दळणवळणाचे मार्ग एकत्र येतात अशा ठिकाणीच अधिक वस्ती आढळून येते. व्हिएन्ना एवढेच त्याला अपवाद आहे.

शहरांतून पाणीपुरवठ्याच्या व दूधपुरवठ्याच्या सोयी उत्कृष्ट आहेत. देशात १९६९ मध्ये ३०५ रुग्णालये व शुश्रूषागृहे असून त्यांत ७६,४९४ रुग्णाइतांची सोय होती. एकूण डॉक्टरांची संख्या १४,८५८ असून परिचारिका व सुईणी २१,०६३ होत्या.

साथीच्या रोगांचे प्रमाण फार कमी आहे. कामगारांसाठी व पांढरपेशा नोकरवर्गासाठी कल्याणयोजना आहेत त्यांतून आजारीपण, अपघात, वृद्धत्व, बेकारी इ. प्रसंगी मदत देण्याची सोय आहे. याशिवाय बाळंतपणाचे वेळी मदत, शाळकरी मुलांचे जेवण, युद्धपीडितांना विविध प्रकारचे साहाय्य या जबाबदाऱ्यासरकारने घेतलेल्या आहेत.

भाषा व साहित्य : ऑस्ट्रियातील ९९ टक्के लोक जर्मन भाषा बोलतात पण या जर्मन भाषेतबोलीभाषांचे वैचित्र्य दिसून येते. पूर्व व आग्नेयीकडील सरहद्दीजवळील लोक मग्यार व स्लोव्हानिक भाषा बोलतात. ऑस्ट्रियन वाङ्‌मय हे जर्मनभाषी लोकसमूहांशी बरेच निगडितअसूनही त्याने आपला वेगळा ठसा राखलेला आहे. याला कारण ऑस्ट्रियाचे यूरोपातील मध्यवर्ती स्थान, हॅप्सबर्ग घराण्याचा प्रदीर्घ अंमल व विस्तृत साम्राज्य ही होत. रोमन कॅथलिक पंथाचा प्रभाव वाङ्‌मयावर अधिक असून त्याला अनुसरून स्पॅनिश व इटालियन वाङ्‌मयांचाही त्यावर परिणाम झालेला दिसून येतो. सोळाव्या शतकानंतर व्हिएन्ना येथील यथार्थवादाचा पगडा वाङ्‌मयावर बसू लागला. व्हिएन्नातील साहित्यात सौंदर्यभावना व विनोद यांचा आविष्कार झालेला असून संगीताचे, निसर्गाचे व भव्यतेचे वेड त्यामध्ये आढळून येते. मध्ययुगातील वाङ्‌मयात धार्मिक काव्ये व महाकाव्ये तसेच वीरकथांचा भाग मोठा होता व त्यांना राजाश्रयही होता. १३६५ मध्ये व्हिएन्ना विद्यापीठाच्या सुरुवातीपासून वाङ्‌मयाला मानवतावादी स्वरुप येऊ लागले. आधुनिक वाङ्‌मय एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी बरेच वास्तववादी होते त्यानंतर हळूहळू त्यात कलात्मकता येऊ लागून दुसऱ्यामहायुद्धानंतर ते बरेचसे भावदर्शी झाले आहे. वाङ्‌मयात काव्य, कादंबरी व नाट्य या तिन्ही प्रकारांची वाढ झालेली आहे. पाश्चात्य संगीतरचनेत या देशाने अग्रमान मिळविलेला आहे. त्यामध्ये जोझेफ हेडन, मोझार्ट, शूबर्ट, बीथोव्हन व ब्रॅहॅम्स यांचा मोठा वाटा आहे. सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने मनोविज्ञानाच्या अभ्यासाचा पाया व्हिएन्ना येथे घातला.

या देशात १९७१ मध्ये ३६ दैनिके होती. त्यांतील ६ एकट्या व्हिएन्नात प्रसिद्ध होत. दैनिकांचा एकूण खप २३ लक्ष आहे आणि त्यांत कुरीअरएक्सप्रेस  या दोन स्वतंत्र वृत्तपत्रांचा खप फार मोठा आहे.

ऑस्ट्रियात सु. ३,००० ग्रंथालये आहेत. त्यांत सर्वश्रेष्ठ ग्रंथालय म्हणून व्हिएन्नातील राष्ट्रीय ग्रंथालयाचा उल्लेख करावा लागेल. यातील एकूण ग्रंथसंख्या १७ लक्षांहून अधिक असून त्याचे मुद्रित, हस्तलिखित, संगीत, नकाशे, पपायरस प्रकारच्या कागदावरील लेख, चित्रकला आणि नाट्य असे सात विभाग आहेत. ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासकाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे केंद्र गणले जाते.

शिक्षण : ६ ते १५ वर्षांपर्यंत सर्वांसाठी सक्तीच्या मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण ९८ टक्क्यांवर आहे. प्राथमिक शाळांतून शिक्षक-विद्यार्थी प्रमाण १:२२ आणि धंदेशाळांत १:२३ असे पडते. ऑस्ट्रियात १९७०-७१मध्ये ५,७७८ प्राथमिक व खास शाळा होत्या. त्यांत ४४,५१२ शिक्षक व ९,६३,५७९ विद्यार्थी होते २८८ सामान्य माध्यमिक शाळांत ९,४८४ शिक्षक व १,४१,२६०विद्यार्थी होते ९५८ व्यावसायिक व तांत्रिक शाळांत २,१४,०२३ विद्यार्थी व १०,६८९ शिक्षक होते. शिक्षक-प्रशिक्षण संस्था ५० असून त्यांत १,१८४ शिक्षक व १०,४०६ विद्यार्थी होते. उच्च शिक्षणाच्या १७ संस्थातून ७,८६० शिक्षक व ५७,८६९ विद्यार्थी होते. १९६८-६९ मध्ये स्त्रियांच्या व्यावसायिक १४ शाळांत ८४८ शिक्षक व २,३९४ विद्यार्थिनी होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या ४प्रशिक्षण विद्यालयांत १४३ विद्यार्थी होते. ७६ व्यावसायिक शाळांत ६८३ शिक्षक व १६,१६२ विद्यार्थी होते. उच्च शिक्षणासाठी व्हिएन्ना, ग्रात्स, इन्सब्रुक व सॉल्झबर्ग ही चार विद्यापीठे दीर्घ कालापासून ज्ञानदान करीत आहेत. यांशिवाय दोन तांत्रिक विद्यापीठे, पशुवैद्यकीय, शेती व व्यापारविषयक शिक्षण देणाऱ्याउच्च संस्थाआहेत. संगीत व कला यांच्या शिक्षण देणाऱ्याचार संस्था व्हिएन्ना व सॉल्झबर्ग येथे आहेत. ल्यूबैन येथे खाणकाम विद्यालय आहे. देशाच्या संगीत व कला यांच्या श्रेष्ठ परंपरेचे श्रेय व्हिएन्ना व सॉल्झबर्गयेथील अकादमींना आहे.

देशात संग्राहलयाच्या रूपाने ऐतिहासिक व कलापूर्ण वस्तूंची मोठ्या प्रमाणावर जपणूक केलेली आढळते. स्थानिक संस्थांची १५, नगरपालिकांची २४, प्रांतिक सरकारची ३२, केंद्र सरकारची १५ अशी एकूण ८६ संग्रहालये आहेत. त्यांतून सतराव्या शतकातील चित्रकला ईजिप्शियन व पौर्वात्य कलावस्तूंचे नमुने, शिल्पकला व प्राचीन काळात उपयोगात असलेल्या वाद्यांचे नमुने पाहण्यास मिळतात. याशिवाय मध्ययुगीन किल्ले, गढ्या, सरदारांचे वाडे, मठ यांचे व तत्ससंबधित वस्तूंचे काळजीपूर्वक जतन करुन ठेवले आहे.

कला-क्रीडा : या देशाने पाश्चिमात्य संगीताचा खूप मोठा वाटा उचललेला आहे. अठराव्या शतकापासून पुढील दोन शतके व्हिएन्ना हे यूरोपचे संगीताचे केंद्र म्हणून गणले जात होते. या चिमुकल्या देशात ५,२०० संगीत मंडळे आहेत. सॉल्झबर्ग व व्हिएन्ना ही दोन संगीतकेंद्रे आहेत. प्रतिवर्षी उन्हाळ्यात सॉल्झबर्ग येथे मोठे संगीत संमेलन भरत असते त्यामुळे या ॠतूत कलावंतांची, वाद्यवादकांची व रसिकांची खूप मोठी आवक या देशात होते. सॉल्झबर्गमध्ये तर रस्त्यांच्या कोपर्‍यांवर देखील वृंदवादन ऐकावयास मिळते. ऑस्ट्रियाची रंगभूमीही प्रगत आहे.

पर्यटन : बर्फावर घसरण्याचे खेळ प्रवाशांचे आकर्षण आहे. स्कीइंग व फुटबॉल हे ऑस्ट्रियनांचे आवडते खेळ आहेत. ऑलिंपिकच्या हिवाळी खेळांमध्ये ऑस्ट्रिया नेहमी चमकतो. उन्हाळ्यात निसर्गशोभा, मैदानी खेळ, गिर्यारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील प्रवाशांचे आवडीचे विषय होतात. याप्रमाणे बाराही महिने प्रवाशांची रीघ या देशाकडे लागलेली असते. ऑस्ट्रियात येणाऱ्याहौशी प्रवाशांची संख्या यूरोपातील फ्रान्स व इटली या देशांखालोखाल आहे. प्रवाशांसाठी सर्व आधुनिक सोई उपलब्ध आहेत. तीन महिन्यांपेक्षा कमी काल राहणाऱ्याप्रवाशांना साध्या पासपोर्टवर देशभर हिंडता-फिरता येते. देशातील ४,००० गावांपैकी १,७३० गावे ही हौशी प्रवासाकेंद्रेच आहेत. १९७० मध्ये २१,६८४ हॉटेलांतून व खाणावळींतून ५,३१,४७५ खाटा उपलब्ध होत्या ८८,६६,९७७ परदेशी प्रवासी आले त्यांपैकी ६,७८,६०२ अमेरिका व ६,१०,६७१ ग्रेट ब्रिटन येथून आलेले होते. १९७० मध्ये पर्यटनापासून २५९६·९ कोटी शिलिंग उत्पन्न मिळाले.

पश्चिमेकडील फोरॉर्लबेर्ख व टायरोल येथील पर्वतीय सौंदर्य आकर्षक आहे. तर पूर्वेकडील कॅरिंथिया व सॉल्झबर्ग या प्रांतांत विस्तृत खोरी, सरोवरे व दूर दिसणारे पर्वत मन वेधून घेतात. आग्नेयीकडील स्टिरिया प्रांत विविध वृक्षांनी भरलेला आहे. डॅन्यूब नदीच्या पश्चिम तीरावर इतिहासप्रसिद्ध व्हिएन्ना शहर असून त्यातील वर्तुळाकार रस्त्यांच्या बाजूंनी इमारतींची गर्दी झालेली आहे. अधूनमधून शहराची जुनी तटबंदी डोकावते पण संत स्टीव्हेनचे धर्ममंदिर हे कोठूनही दिसेल इतके भव्य व आकर्षक आहे. याच्या मनोऱ्याची उंची १३६मी. आहे. ग्रात्स, लिंट्स, सॉल्झबर्ग आणि इन्सब्रुक ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. (चित्रपत्र ३१).

संदर्भ : 1. Hoffman, G.W.A Geography of Europe, London, 1961.

2. Pounds, N. J. G. Europe and the Mediterranean, New York, 1953.

आठल्ये, द. बा.

ऑस्ट्रिया 

ऑस्ट्रियाच्या दुर्गम प्रदेशातील महामार्ग
सॉल्झबर्ग–ऑस्ट्रियातील निसर्गरम्य शहर
व्हिएन्ना स्टेट ऑपेरा