योकोसूका : जपानमधील एक अत्याधुनिक बंदर व जपान-अमेरिका यांच्या संयुक्त नाविक तळाचे ठाणे. ते टोकिओ उपसागराच्या मुखाशी नैऋत्येस होन्शू बेटावर कानागावा विभागामध्ये योकोहोमाच्या दक्षिणेस २० किमी.वर वसले आहे. लोकसंख्या ४,२७,१७९ (१९८३ अंदाज). बंदराच्या पूर्व भागात योकोसूका व नागौर ही उपबंदरे असून तेथे पाणी खोल आहे. त्याचा लाभ मोठ्या बोटींना मिळतो. प्राचीन काळापासून एक नैसर्गिक बंदर म्हणून योकोसूका जलवाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे परंतु त्याचा खरा विकास मेजी पुनःस्थापनेच्या वेळी झाला. तत्पूर्वी टोकुगावा योशिनोबू या शेवटच्या शोगुनने तेथे १८६६ मध्ये जहाजबांधणी उद्योगास प्रारंभ केला होता. १८८४ मध्ये मेजी राजवटीत (१८६७-१९१२) येथे जहाजदुरुस्ती विभाग सुरू होऊन लष्करी नाविक तळाची बांधणी झाली व अनेक गोद्या बांधण्यात आल्या. पहिल्या महायुद्धापूर्वीच युद्धनौका, शस्त्रागार आणि नौकांची बांधणी व दुरुस्ती यांचे ते देशातील महत्त्वाचे केंद्र बनले. हळूहळू त्याला शहराचे रूप प्राप्त झाले. पुढे आसपासची खेडी व लहान शहरे त्याला जोडून टोकिओ–योकोहामा या महानगरीय विभागाचा योकोसूका हा निवासी जिल्हा करण्यात आला.

जहाजबांधणी कारखाना नाविक तळाच्या आग्नेयीस सु. पाच किमी.वर यूरागा या ठिकाणी आहे. नागौर हे व्यापारी बंदर असल्यामुळे येथे मच्छीमारीचाही मोठा व्यवसाय चालतो. अंटार्क्टिक महासागरात, विशेषतः व्हेल माशांच्या शिकारीसाठी, येथून बोटी जातात. बंदराच्या परिसरात पशुपालन व शेती हे उद्योगही काही प्रमाणात चालतात. भात, गहू, रताळी ही पिके येथे घेतली जातात.

योकोसूकामध्ये कुरिहामा, त्सुकायामा पार्क आणि केप कॅनन ही ऐतिहासिक स्मारकांसाठी प्रसिद्ध स्थळे आहेत. जपानमध्ये आलेला पहिला इंग्रज प्रवासी विल्यम ऍडम्स व त्याची जपानी पत्नी यांची स्मारके त्सुकायामा पार्कमध्ये असून ती प्रेक्षणीय आहेत. केप कॅनन येथे जपानचे पहिले आधुनिक दीपगृह आहे.

देशपांडे, सु. र.