सुप्रसिद्ध चर्च ऑफ अवर लेडी व नवीन नगरभवन, म्यूनिक.

म्यूनिक : पश्चिम जर्मनीमधील प्रगत औद्योगिक शहर, बव्हेरिया प्रांताची राजधानी व देशातील एक मोठे सांस्कृतिक केंद्र. ते बव्हेरियन पठारावर बर्लिनच्या नैर्ऋत्येस सु. ४९९ किमी. अंतरावर, ईझार नदीकाठी वसले आहे. लोकसंख्या १२,७७,००० (१९८३). म्यूनकन (संतांची भूमी) या जर्मन शब्दावरून म्यूनिक हे नाव रूढ झाले. येथून सु. १६० किमी. दक्षिणेस आल्प्स पर्वतश्रेणीतील इतिहासप्रसिद्ध ⇨ ब्रेनर खिंड आहे.

म्यूनिक येथील इतिहासकालीन वसाहत आठव्या शतकातील असावी. शहराची स्थापना सॅक्सनी–बव्हेरियाचा ड्यूक ‘हेन्री द लायन’ याने ११५८ मध्ये केली. पुढे ११८१ मध्ये त्याला फ्रीड्रिख बार्बारोसा याने पदच्युत केले. बव्हेरियाच्या व्हिटेल्सबाख या सरदार घराण्याचे १२५५ पासून येथे निवासस्थान होते. पुढे १५०६ पासून ते त्याची राजधानी झाले. बाराव्या शतकात शहराभोवती तटबंदी आणि खंदक होते. तत्कालीन भव्य दरवाज्यांचे अवशेष अजूनही आढळतात. चौथा लूई (कार. १२८७–१३४७), पहिला माक्सिमीलिआन (कार. १५६३–१६३१) या राजांनी येथील व्यापारी पेठ वाढविली, नदीवर पूल बांधले व शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. ⇨ तीस वर्षांचे युद्धकाळात (१६१८–४८) स्वीडनच्या दुसऱ्या गुस्टाव्ह राजाचा येथे अल्पकाळ (१६३२) अंमल होता. १८०६ मध्ये हे शहर बव्हेरिया राज्याची राजधानी झाली. एकोणिसाव्या शतकात, विशेषतः पहिला लूई (१८२५–४२), दुसरा माक्सिमीलिआन (१८४८–६४) आणि दुसरा लूई (१८७४–८६) यांच्या कारकीर्दीत, जर्मन कलासंस्कृतींचे हे एक आघाडीचे केंद्र होते. पहिल्या लूईने प्रबोधनकालीन इटालियन शैलीच्या वास्तुकलेला उत्तेजन दिले, शहरात रुंद रस्ते, चौक, कारंजी इ. बांधून त्याचे सौंदर्य वाढविले. पहिल्या महायुद्धानंतर अल्पकाळ ते रशियाच्या ताब्यात होते. नाझी पक्षाची स्थापना याच शहरात झाली. ८ नोव्हेंबर १९२३ रोजी हिटलरने याच ठिकाणी बव्हेरियन शासनाविरुद्ध उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नाझी पक्षाची मुख्य कचेरी याच शहरात होती. नाझी पक्षाचा व शासनाचा निर्भिड टीकाकार मायकेल कार्डीनाल फाऊलहाबर हा म्यूनिकचाच आर्चबिशप. जर्मनी, इटली, ग्रेट ब्रिटन व फ्रान्स या देशांत ⇨ म्यूनिक करार झाला (१९३८). यामुळे जर्मनीला सूडेटन हा चेकोस्लोव्हाकियाचा औद्योगिक प्रदेश मिळाला आणि दुसऱ्या महायुद्धास तोंड फुटले. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी या शहरावर बाँब हल्ले केल्यामुळे शहराचे अतोनात नुकसान झाले. अमेरिकन विभागाच्या अखत्यारीतील म्यूनिक हे युद्धसमाप्तीनंतरचे सर्वांत मोठे शहर होते.

म्यूनिक हे मध्ययूगापासून हस्तकला वस्तूंसाठी प्रसिद्ध असून, येथील कलात्मक चित्रकाचा यूरोपभर वाखाणल्या जातात. यांशिवाय येथे चर्चच्या घंटांचे उत्पादन आणि निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. शिलामुद्रण आणि उत्कीर्णन यांकरिताही म्यूनिकची ख्याती असून छपाईच्या सामग्रीचे येथे उत्पादन होते. याशिवाय चिनी मातीची भांडी, विविध प्रकारचे चष्मे, स्वयंचलित यंत्रसामग्री व उपकरणे यांचे उत्पादन प्रसिद्ध असून, ‘म्यूनिक बीर’ ची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. शहरात यंत्रसामग्री, रसायने, औषधे, अन्नप्रक्रिया, कापड, विद्युत्‌ उपकरणे, मोटारगाड्या व विमाने (यांची जुळणी) इ. उद्योगधंदे विकसित झाले आहेत. राजमार्गांनी आणि हवाईमार्गांनी ते देशांतर्गत शहरांसी व परदेशांशी जोडले आहे. हे एक मोठे पर्यटन स्थळ असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे केंद्रही आहे.

दुसऱ्या महायुद्धात या शहराची मोठी हानी झाली, तथापि युद्धोत्तर काळात, जुन्या ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन व आधुनिक वास्तूंची उभारणीही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. जुन्या ऐतिहासिक वास्तूंपैकी चर्च ऑफ अवर लेडी हे कॅथीड्रल (१४६८–८८), प्रबोधकालीन शैलीचे सेंट मायकेल चर्च (१५८३–९७), थेआटिनरकिर्शड (सतरावे-अठरावे शतक) हे बरोक शैलीतील चर्च, न्यूम्फनबुर्क किल्ला (१६६४–१७२८), चिनी मातीच्या वस्तूंचा कारखाना (१७४७) आणि शहरानजिकच रोकोको शैलीत बांधलेला आमालेईंबुर्कचा मृगया विभाग (१७३४–३९) इ. उल्लेखनीय आहेत. त्याचप्रमाणे नवे नगरभवन (१८६७–१९०८), प्रोप्युलेअन हे नव अभिजाततावादी शैलीतील भव्य द्वार (१८४६–६२) आणि विशाल इंग्लिश उद्यान (१७८९–१८३२) ही स्थानेही प्रेक्षणीय आहेत. उत्तम संग्रहालये हे म्यूनिकचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांपैकी पिनाकोथेक संग्रहालयात (१८२६–३६) श्रेष्ठ कलाकारांची उत्तम चित्रे संगृहीत केली आहेत. त्याखेरिज बव्हेरियन राष्ट्रीय संग्रहालय (१८९४–९९), शाक गालेरी, ग्ल्युप्टोथेक (१८१६–३०) आणि डॉइश ही संग्रहालये प्रसिद्ध आहेत. यांपैकी शेवटच्या संग्रहालयात वैज्ञानिक, तांत्रिक, औद्योगिक साहित्यांचा संग्रह आहे. येथील लूटव्हिख विद्यापीठ जुने व प्रसिद्ध आहे (स्था. १४७२) यांशिवाय शहरात तंत्रशिक्षणाचे विद्यापीठ, अनेक रंगमंदिरे व प्रसिद्ध प्रकाशनसंस्था आहेत. येथील राष्ट्रीय ग्रंथालयात १० लाखांहून अधिक ग्रंथ व ५०,००० पेक्षा जास्त हस्तलिखिते आहेत.

म्यूनिकमध्ये १९७२ साली झालेल्या. ऑलिंपिक सामन्यांना पॅलेस्टिनी गनिमांनी केलेल्या इस्त्राएली चमूतील ११ क्रिडापटूंच्या हत्येमुळे गालबोट लागले.

देशपांडे, सु. र.