पंजाब राज्य : भारताच्या उत्तर भागातील एक राज्य. विस्तार २९° ३२’ उ. ते ३२° ३४’ उ. अक्षांश आणि ७३° ५५’ पू.ते ७७° पृ. रोखांश यांदरम्यान. क्षेत्रफळ ५०,३७६ चौ. किमी., लोकसंख्या १,५५,००,००० (मध्य १९७८ अंदाज). याच्या पश्चिमेस पाकिस्तान, उत्तरेस पाकिस्तान, जम्मू व काश्मीर राज्य, ईशान्येस व पूर्वेस हिमाचल प्रदेश, आग्नेयीस व दक्षिणेस हरयाणा, नैर्ऋत्येस राजस्थान ही राज्ये येतात. एकेकाळी सिंधू आणि सतलज यांदरम्यानचा झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या पाच नद्यांच्या खोर्यांनी व्यापलेला डोंगररांगापासून हिमालयपायथ्याच्या शिवालिक श्रेणीपर्यंत विस्तारलेला, असा मूळचा पंजाब होता. ब्रिटिश राजवटीत त्याचे वायव्य सरहद्द प्रांत व दिल्ली, फाळणीत पश्चिम पंजाब, नंतर भाषावार विभागणीत हिमाचल प्रदेश व अखेर १९६६ साली हरयाणा असे तुकडे तुटत जाऊन, शेवटी पश्चिमेस रावी-सतलज नद्या, दक्षिणेस फिरोझपूर भतिंडा व पतियाळा हे जिल्हे आणि पूर्वेस हिमालयाचा पायथा या त्रिकोणात शेष पंजाबचा तुटपुंजा भाग राहिला. पंजाब व हरयाणा राज्यांची चंडीगढ राजधानी आहे.
भूवर्णन : पंजाब राज्याच्या ईशान्य सीमेवरील गुरदासपूर, रूपार व होशियारपूर जिल्ह्यांच्या पूर्व सीमांवर शिवालिक डोंगरांच्या रांगा आहेत. पश्चिम सीमेवर उत्तरेस रावी आणि नैर्ऋत्येस सतलज असून ही पाकिस्तानबरोबरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भूरूपदृष्ट्या पंजाबचे दोन भाग पडतात. पहिला भाग ईशान्य ग्हणजे सीमेवरील उच्च प्रदेश. या भागात उंची ३६५ मी. पासून ६१० मी. पर्यंत वाढत जाते व रूपारच्या पूर्वेस हरयाणामध्ये ही उंची १,५०० मी. पर्यंत वाढते. याच्या दुसऱ्या भागात उच्च प्रदेशाच्या नैर्ऋत्येस व पश्चिमेस दुआबांनी बनलेले मैदान असून त्याची उंची २१० ते ३६५ मी. पर्यंत आहे. उत्तरेस सतलज व रावी यांमधील बडी दोआब (दुआब) चा थोडा भाग या मैदानात येतो, त्याची उंची २०० ते ३०० मी. पर्यंत आहे तर त्याच्या आग्नेयीस ‘बीस्त’ रा बिआस आणि सतलज यांमधील संपूर्ण त्रिकोणी दुआब आहे. हा दुआब बडी दुआबपेक्षा थोडासा उंच आहे. पंजाबमध्येही अन्य प्रदेशांप्रमाणे नवीन व जुन्या गाळाचे प्रदेश आहेत. नद्यांकाठच्या प्रदेशांस ‘बेत’ म्हणतात व ते सिल्टयुक्त असून जास्त सुपीक असतात. सतलजच्या बेतची रुंदी १० ते २० किमी. आहे. काही वेळा क्षार साचून हे भाग नापीक बनतात. उच्च भागातील दुआबाच्या मध्यभागी जुन्या गाळाचे वाळयुक्त प्रदेश आहेत. त्यांस ‘बार’ म्हणतात. पंजाबच्या मृदा मुख्यतः जलोढीय स्वरूपाच्या आहेत. त्यांपैकी सखल नदीकाठच्या मृदांस ‘खादर’, तर उंच प्रदेशातील मृदांस ‘बांगर’ म्हणतात. वाळवंटाच्या आग्नेय भागात पॅडॉक प्रकारच्या क्षारयुक्त भुऱ्या पिंगट मातीचे आवरण काही प्रदेशात आहे. काही भागांत गाळाच्या थरांची जाडी ४,५०० मी. पेक्षाही जास्त आढळते. खनिज संपत्तीच्या दृष्टीने पंजाब हे महत्त्वाचे राज्य नाही. तेल संशोधनाचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.
झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या पाच नद्यांचा प्रदेश तो पंजाब, हे नाव आज समर्पक राहिलेले नाही. सध्या रावी केवळ सीमेवरून, बिआस केवळ ११२ किमी. व सतलज सु. ७७५ किमी. या राज्यातून वाहतात. बिआस गुरदासपूरजवळ हिमाचल प्रदेशातून प्रवेशते व दक्षिणेस वाहते. बिआस व सतलज यांचा संगम माखूरजवळ होतो. सतलज हीच पंजाबची खरी महत्त्वाची नदी होय. ती हिमाचल प्रदेशातून भाक्राजवळ पंजाबमध्ये प्रवेशते व रूपारपर्यंत दक्षिणेस वाहते, तेथे अचानक १० अंशांनी वळून पश्चिमेस वाहते. बिआसच्या संगमानंतर फिरोझपूरच्या उत्तरेस ती पंजाब-पाकिस्तानच्या सीमेवरून फाझिलूकापर्यंत व पुढे पाकिस्तानमधून वाहते. सतलजवर जलंदर जिल्ह्यात पूर्व सीमेवर भाक्रा व नानगल येथे होन घरणे बांधलेली आहेत. भाक्रा धरणामुळे १७२ चौ. किमी. क्षेत्रफळाचा विस्तीर्ण ‘गुरू गोविंदसागर’ जलाशय निर्माण झाला आहे व तो मुख्यतः हिमाचल प्रदेशात पसरला आहे.
हवामान : राज्याचे हवामान खंडीय स्वरूपाचे असून अमृतसरचे वार्षिक सरासरी तपमान २३.१° से. आहे. उन्हाळ्यात ३४.५° से. व हिवाळ्यात ११.८° से. असते. उन्हाळ्यात दुपारी तपमान ४१° से. पर्यंत वाढते. ऑक्टोबरपासून तपमान कमी होत असून फेब्रुवारी पर्यंत २०°से. पेक्षा कमी असते. जानेवारीमध्ये ११.८° ते १४.२° से. च्या दरम्यान आढळते. संपूर्ण राज्यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तपमान जवळजवळ सारखेच असते. पंजाबमध्ये आग्नेय मान्सून अथवा बंगालवरून येणाऱ्या मान्सून शाखेमुळे जुलै-सप्टेंबर या काळात पाऊस पडतो, तर जानेवारी-फेब्रुवारी या काळात पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तापासूनही अल्पवृष्टी होते. ईशान्येकडील उच्छ प्रदेशात वार्षिक सरासरी पाऊस ७५ सेंमी. पर्यंत पडतो व तो नैर्ऋत्येस ३० सेंमी. पर्यंत कमी होतो. वार्षिक जलवायूचा विचार करता नोव्हेंबर ते मार्च थंड व उत्साही हवा, एप्रिल ते जून कडक उन्हाळा, जुलै से सप्टेंबर पावसाळा असे हवामान आढळते. ऑक्टोबर महिन्यात हवामान बदलते असते.
वनस्पती य प्राणी : पंजाब हे अल्प जंगल असणारे राज्य असून केवळ ४.२% (२,११,१२८ हे.) भूमी जंगलव्याप्त आहे. रुक्ष हवामान व दीर्घकालीन मानववस्ती यांमुळे जंगले कमी आढळतात. एकेकाळी उत्तरेकडील सर्व भागांत रावीपर्यंत दाट जंगल असावे. आजही गुरदासपूर, होशियारपूर व रूपार या जिल्ह्यांतच राज्यातील ६०% पेक्षा जास्त वनस्पती आहे. ४० सेंमी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात कोरडे पानगळी व उष्ण जलवायू काटेरी जंगल आढळते. गुरदासपूरमध्ये उपोष्ण कटिबंधीय जंगल आहे. किकर व बाभूळ ही झाडे सर्वत्र आहेत. दक्षिणेकडील प्रदेशात जाल, जुंद व कोपर ही झाडे आहेत. एकूण वनसंपत्ती नगण्यच आहे. वन्य प्राणी विशेष उल्लेखनीय नाहीत. रानमांजर व क्कचित अस्वले आढळतात. तरस, कोल्हा, लांडगा हे प्राणी तुरळक आहेत. नीलगाय, चिंकारा, हरिण, रानडुक्कर, ससा, सायाळ इ. प्राणीही आढळतात. मोर, तितर, रानकोंबडे (पारधपक्षी) व इतर पशुपक्षी आढळतात. नद्या कालवे आणि जलाशय मिळून ८,७०० हेक्टरमध्ये मासेमारी करता येते. हेक्टरी सरासरी ६६० किग्रॅ. माशांचे उत्पादन होते. मासेमारी विकासाची राज्यव्यापी योजना सुरू केलेली आहे.
ओक, शा. नि. डिसूझा, आ. रे.
इतिहास : सिंधू संस्कृती ही जगातील संस्कृतींमधील एक प्राचीन संस्कृती असून तिचे संवर्धन सिंध व पंजाबमध्ये झाले असावे, याबद्दल बहुतेक तज्ञांत एकमत आढळते. इ. स. पू. २,५०० ते २,००० या काळात तेथे संघटित ग्रामीण समाजाची वस्ती होती. दक्षिण पंजाबमध्ये हडप्पा येथील उत्खननात विटांच्या घरांत सापडलेल्या वस्तूंवरून सिधू संस्कृतीचे लोक सुधारलेले होते असे दिसते. आर्यांच्या आगमनापूर्वी पंजाबमध्ये अनार्य लोकांची वस्ती होती. आर्यांनी त्यांचा काही वेळा पराभव करून, तर काही वेळा त्यांना आपल्यांत सामावून घेऊन तेथे वैदिक संस्कृतीचा प्रसार केला. ऋग्वेदकाळात पंजाब सप्तसिंधू [ सिंधू, वितस्ता (झेलम), असिक्नी (चिनाब), परुष्णी (रावी), विपाशा (बिआस-व्यास), शुतुद्री (सतलज) आणि सरस्वती ] म्हणून ओळखला जात असे. पंजाबमधील कुरुक्षेत्र ही कौरव-पांडवांची युद्धभूमी. इ. स. पू. ५२१ ते इ. स. पू. ४८५ या काळात डरायसच्या नेतृत्वाखाली इराण्यांनी पंजाबचा पश्चिम भाग पादाक्रांत केला. पुढे कित्येक वर्षे त्यांचे अधिकारी-वंशज पेशावर, तक्षशिला, रावळपिंडी येथे राज्य करीत होते. त्यांच्या काळात प्रथमज हैदव सैनिक भारताबाहेर यूरोपात लढण्यासाठी गेले. इ. स. पू. ३२६ मध्ये अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली ग्रींकांनी पंजाबवर स्वारी केली. या वेळी प्रथमच आंभी व शशिगुप्त यांनी भारतद्रोह करून अलेक्झांडरला पौरवांविरुद्ध आपण होऊन साह्य केले. त्याच्या मृत्युनंतर काही वर्षांनी मौर्यानी ग्रीकांकडून सत्ता आपल्या हाती घेतली पण ग्रीकांचा प्रभाव अनेक वर्षे तेथे टिकलेला आढळतो. अशोकाच्या वेळी इ. स. पू. २७३-२३२ या काळात मौर्यांच्या राज्यात पंजाब समाविष्ट होता. त्याने तेथे बौद्ध धर्माचा प्रसार केला. इ. स. पहिल्या शतकापासून ते पाचव्या शतकापर्यंत शक, हूण इत्यादीनी खाऱ्या करून तेथे सत्ता प्रस्थापित केली होती. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात ठाणेश्वरच्या प्रभाकरवर्धनाने हूणांना पंजाबमधून हुसकले. त्याचा मुलगा हर्षवर्धन हा पंजाबचा कर्तृत्ववान राजा होय. हर्षाच्या मृत्यूनंतर (६४७) वर्धन राज्याची छकले झाली. सातव्या शतकाच्या मध्यास चिनी प्रवासी ह्युएनत्संगहा उत्तर हिंदुस्थानात आला होता. त्याला तक्षशिला, सिंधुपुर याच्या भोवतालचा प्रदेश काश्मीरच्या प्रभुत्वाखाली आणि सिंधूपासून विआसपर्यंतचा मध्य पंजाब टक्क राज्यात मोडत असलेला आढळून आला. ह्युएनत्संग पंजाबच्या भूमीला सुखभूमी म्हणे. आठव्या शतकाच्या सुरुवातीस ठाणेश्वराचे राज्य नाहीसे झाले. आग्नेय पंजाबमध्ये कनौजच्या तोमर घरण्याची सत्ता तेथे प्रस्थापित झाली होती. त्यानंतर अजमीरच्या चाहमानांनी तोमर राजांना ११५२ च्या सुमारास तेथून हुसकले.
इराकचा सुभेदार हज्जाज याने मुहम्मद बिन कासिमच्या नेतृत्वाखाली अरबांचे सैन्य सिंधच्या दाहिरवर ७१२ मध्ये रवाना केले. त्याने सिंध व मुलतान जिंकले आणि तेथे अरबंची सत्ता प्रस्थापित झाली पण सिंधू व झेलममधील प्रदेश ओहिंदच्या ब्राह्मण घराण्याच्या सत्तेखाली होता. ८०४ च्या सुमारास जलंदरचे राज्य अस्तित्वात होते. ९७९ मध्ये लाहोरचा राजा जयपाल हा गझनीचा अमीर सबक्तगीन यावर चालून गेला पण तह करून त्याला परत यावे लागले. ९८८ मध्ये सबक्तकीन याने जयपालाचा पराभव केला. १००१ मध्ये मुहम्मद गझनीने स्वारी करून पेशावर येथे जयपालाचा पराभव केला. १००९ मध्ये जयपालाचा मुलगा आनंदपाल याने उज्जयिनी, ग्वाल्हेर व इतर हिंदू राजांचा संघ निर्माण करून गझनीच्या मुहम्मदाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. १०२१ पर्यंत पंजाबचा बराचसा भाग मुहम्मदाने जिंकून घेतला होता. ११७५ ते ११९१ या काळात मुहम्मद घोरीने स्वाऱ्या करून पेशावर व सरहिंद हस्तगत केले. यानंतर कुत्बुद्दीन ऐबक हा लाहोर येथे स्वतंत्र राजा म्हणून राज्य करू लागला. १२४६ ते १२८५ पर्यंत बल्बन आणि ककुबाद या सुलतानांनी पंजाबवर झालेल्या मंगोलांच्या स्वार्यांचा प्रतिकार केला. १२९६ पासून १३०५ पर्यंत मंगोलांनी पुन्हा पंजाब पादाक्रांत केला. १३५१ मध्ये तिसरा फीरूझ शाह तुघलक गादीवर आल्यापासून आधुनिक पंजाबच्या इतिहासाला सुरुवात झाली.
तैमूरलंगाने पंजाबवर १३९८ मध्ये स्वारी करून पंजाबमधील अनेक गावे उद्घ्वस्त केली. तो परत गेल्यानंतर सय्यद घराण्याचा संस्थापक खिज्रखान याच्या ताब्यात पंजाब होता. १४४१ साली पंजाबमध्ये लोदी अफगणांची सत्ता स्थापन झाली. या सुलतानांच्या सत्तेखाली पंजाबला शांतता लाभली. दिल्लीचा इब्राहीम लोदी आणि त्याचा पंजाबचा सुभेदार यांत निर्माण झालेल्या वितुष्टाचा फायदा घेऊन बाबरने १५१६ ते १५२५ यांदरम्यान पंजाबवर पाच वेळा स्वाऱ्या केल्या. १५२६ मध्ये पानिपत येथे बाबरने इब्राहीमचा पराभव केला. हेच पानिपतचे पहिले युद्ध. यात त्याने तेथील मंदिरे उद्ध्वस्त केली व मूर्ती फोडल्या.
पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी लोदी व बाबर यांत संघर्ष चालू असताना गुरू नानक याने तेथे शीख धर्माची स्थापना केली. सत्य व प्रेम यांचा संदेश त्याने दिला. त्याने हिंदूत रूठ असलेल्या समजुती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या बाबतीत आग्रह नसावा आणि कोणीही मनोभावाने केलेली सेवा ईश्वराला सारखीच आवडते, हा त्याच्या शिकवणीचा गाभा होता. मूर्तिपूजेचा त्याने निषेध केला. त्याने हिंदू व मुसलमान धर्मातील ग्राह्य भाग आपल्या शीख धर्मात एकत्र केला. गुरू नानकानंतर शिखांमध्ये नऊ गुरू होऊन गेले. गुरू अंगद याने शीख धर्माला समाजात स्थान प्राप्त करून दिले. याने गुरुमुखी लिपी तयार केली. गुरू अमरदास याने शिखांपुढे विशिष्ट ध्येय ठेवले. गुरू रामदास याने संप्रदायाचे वजन, प्रतिष्ठा व सामर्थ्य वाढविले. रामदासाने १५७७ मध्ये अमृतसर येथे सुवर्णमंदिर बांधले. गुरू अर्जुनाने नानक व आपल्यामागील इतर धर्मगुरू यांची सर्व वचने संगृहीत करून शीख धर्माचा ग्रंथसाहिब हा स्वतंत्र ग्रंथ तयार केला.
शेरशहाने हुमायूनचा पराभव करून पंजाबवर सत्ता प्रस्थापित केली. अकबराच्या कारकीर्दीत पंजाब मोगलांच्या ताब्यात होता.अकबराने गुरू अर्जुनाची कामगिरी पाहिल्यानंतर त्याला त्याच्याविषयी आदर वाटू लागला. त्याने ग्रंथसाहिब या ग्रंथाला सोन्याच्या ५१ मोहरा बक्षीस दिल्या. त्याने अर्जुनाची समक्ष भेटही घेतली होती. त्याचे संबंध मित्रत्वाचे होते. अकबराच्या मृत्यूनंतर मोगल बादशाह व शीख यांच्या संबंधांत फरक पडला.
जहांगीर वा शीख यांचे संबंध कधीच मित्रत्वाचे नव्हते. गुरू अर्जुनाला मिळालेली प्रतिष्ठा त्याला जाचत असे. जहांगीरचा मुलगा खुसरौ हा बापाविरुद्ध बंड करून गुरू अर्जुनाला मिळाला होता. हे निमित्त साधून जहांगीराने अर्जुनाला दंड केला आणि पुढे त्याला कैद करून त्याचे हाल केले. अखेर त्यांतच तो मरण पावला. गुरू अर्जुनाच्या मृत्यूने पंजाबच्या इतिहासाला एक वेगळी कलाटणी मिळाली.
जहांगीरच्या मृत्यूनंतर शीख-मोगल संबंध जास्तच चिघळले. औरंगजेबाच्या कडव्या धोरणाने आणि जबरदस्तीने बाटविण्याच्या उद्योगामुळे शीख नाराज झाले. औरंगजेब दक्षिणेत मराठ्यांशी लढण्यात गुंतलेला आहे, हे पाहून पंजाबमध्ये शिखांनी उठाव केला. गुरू हरगोविंदाने मोगलांशी सुरुवातीला जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अपरिहार्य झाले तेव्हा त्याने मोगलांशी लढाई केली. गुरू हरगोविंदाने राजकीय सत्ता प्रस्थापित करून तिला अनुरूप असे गुरुपदाचे स्वरूप दिले. खडे सैन्य निर्माण करून शिखांना शस्त्रधारी बनविले आणि राज्याची व्यवस्था संघटित केली. औरंगजेबाने नववा गुरू तेगबहादुर याचा छळ केला आणि शेवटी त्याला ठार मारले. हिंदू धर्मासाठी तेगबहादुराने मरण पतकरल्याने मोगल सत्तेविरुद्ध लोकमत प्रबळ झाले. खालसा पंथामुळे धर्मश्रद्धेला राष्ट्रीयतेचे स्वरूप प्राप्त झाले. खालसाची स्थापना झाल्यानंतर गुरू गोबिंदसिंगाने राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. गुरू गोविंदाने बंदा बैरागी यास आपल्यामागे सैन्याचे प्रमुख नेमले. त्याने मोगलांना पंजाबमधून जवळजवळ हुसकले. यमुना ते सतलजपर्यंतचा पंजाबचा भाग आपल्या ताब्यात प्रायः आणून तेथील प्रशासनव्यवस्थेकडे लक्ष दिले. बहादुरशहाने १७१०-१२ या काळात बंदा गुरूबरोबर लढाई देऊन त्याचा पराभव केला. त्याला कैद करून व हाल करून ठार मारले. बंदाच्या मृत्यूनंतर फरुखसियरने सर्व सिखांना निःशेष करण्यासाठी जबरदस्त हुकूम काढले. भीतिदायक वातावरणामुळे सिखांच्यात दोन गट पडले : गुरू गोविंदसिंग यांच्या मताप्रमाणे वागणारा तो खालसा आणि बंदाच्या मताप्रमाणे चालणारा बंदाई खालसा. फरखसियर मृत्यू पावताच (१७१९) एकूण परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. १७२१ मध्ये गुरू गोविंदसिंगाच्या पत्नीने दोन्ही पंथांतील लोकांत समझोता घडवून आणला. शिखांची एकी होताच त्यांची सत्ता पुन्हा फोफावली.
नादिरशाहाने १७३८ मध्ये भारतावर स्वारी केल्यामुळे पंजाबमधील राज्यकारभार काहीसा विस्कळित झाला. यातूनच १७४८ मध्ये शिखांनी खालसा दलाचे संघटन केले. १७६८ पर्यंत एकंदर बारा संघटना अस्तित्वात आल्या, त्यांना ‘मिसाल’ म्हणत. १७६८ ते १७९८ पर्यंत पंजाबमध्ये बारा मिसालांची सत्ता होती. या काळातच रणजितसिंगासारखी पराक्रमी व्यक्ती उदयाला आल्यामुळे पंजाबमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. १७९९ मध्ये त्याने आपल्या हातात सत्ता घेतल्यानंतर पेशावर ते सतलजपर्यंत राज्य वाढविले. १८०९ मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहामुळे रणजितसिंगाला सतलजच्या दक्षिणेकडच्या भागावरील हक्क सोडावा लागला. त्याच्या मृत्यूनंतर शीख राज्यात गोंधळ व बजबजपुरी माजली. त्याच्या मुलांत गादीसाठी तंटे सुरू झाले. यामुळे सैन्यातून प्रत्येक तुकडीमागे पंचायत निर्माण झाली. रणजितसिंगाचा सगळ्यांत धाकटा मुलगा दलीपसिंग गादीवर बसला. तो लहान असल्यामुळे त्याची आई राणी जिंदन ही कारभार पाहत असे. या परिस्थितीत खरी सत्ता सैनिकांच्या ताब्यात होती. इंग्रजांना शिखांच्या वाढत्या सत्तेला आळा घालावयाचा होता. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत झालेला अमृतसरचा तह शिखांनी मोडला, या सबबीवर इंग्रजांनी १८४५ मध्ये शिखांविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजांनी लाहोरचा कबजा घेताच शिखांच्यात तह झाला. त्यामुळे दलीपसिंगास पंजाबमधील बराचसा प्रदेश इंग्राजांना द्यावा लागला. मुलतानचा दिवाण मुळराज याने दलीपसिंगाची सत्ता स्थापण्यासाठी १८४८ मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. पंजाबभर बंडाचा उठाव झाला. या निमित्ताने लॉर्ड डलहौसीने शिखांविरुद्ध युद्ध पुकारले. त्या लढाईत शिखांचा पराभव झाला. मुळराजाला कैद करून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. शीख राज्य खालसा झाल्याची इंग्रजांनी घोषणा केली (१८४९).
सर जॉन लॉरेन्सला पंजाबचा मुख्य आयुक्त नेमले (१८५२). लॉरेन्स बंधूंनी पंजाबमध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. १८५७ च्या उठावात कपुरथळाच्या राजाने इंग्रजांना मदत केली. दिल्ली घेण्याच्या कामी शिखांनी इंग्रजांना मदत केली परंतु जलंदर व लुधियाना येथील रहिवाशांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलले. इंग्रजांनी दिल्ली काबीज केल्यानंतर दिल्लीच्या भोवतालचा प्रदेश पंजाबात सामील झाला. १९०१ मध्ये पंजाबमधून वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला. १९११ मध्ये दिल्लीचा स्वतंत्र प्रांत निर्माण झाला.
दिल्लीच्या गुरूद्वाराबाहेरील भिंत पाडल्याचे निमित्त पुढे करून शिखांनी इंग्रजांविरुद्ध १९१३ मध्ये आंदोलन सुरू केले. १९१९ च्या जालीयनवाला प्रकरणानंतर इंग्रज-शीख संबंध अधिक बिघडले. शिखांच्या गुरुद्वारासंबंधी काही नियम घालून दिलेले नव्हते. त्यांच्या कारभारत हिंदू व महंत शीख असत. त्यांत काही कारणांवरून वाद निर्माण झाला. १९२० मध्ये शिखांच्या गुरुद्वारांच्या व्यवस्थेसाठी एक मंडळ नेमण्यात आले. यांतील जहाल मतवाद्यांनी अकाली दल स्थापन केले. महंतांकडून गुरुद्वारा ताब्यात घेण्यासाठी अकाली दल स्थापन केले. महंताकडून गुरुद्वारा ताब्यात घेण्यासाठी अकाली दलाने गुरुद्वारात प्रवेश केला. शेवटी १९२५ मध्ये मॅल्कम हॅले याच्या मधस्थीने गुरुद्वारा प्रबंधक समितीसंबंधी कायदा करण्यात आला. त्यानुसार शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडे गुरुद्वारांची व्यवस्था सोपविण्यात आली.
अकाली दलाचे पुढारी मास्टर तारासिंग यांनी दुसऱ्या महायुद्धात शिखांची सैन्यभरती करण्यात बरीच मदत केली. लढाईनंतरच्या काळात शिघांची सैन्यभरती करण्यात बरीच मदत केली. लढाईनंतरच्या काळात शिखांचे हक्क संरक्षित व्हावेत, म्हणूनही मागणी पुढे आली. १९४६ साली पंजाबमधील सर मलिक खिज्र ह्यात खानाचे मंत्रिमंडळ गडगडल्यानंतर तेथे कत्तलीचे सत्र सुरू झाले. मास्टर तारासिंगांनी पाकिस्तान होऊ देणार नाही, म्हणून घोषणा केल्यामुळे वातावरण अधिकच पेटले. पंजाबमध्ये हिंदूंच्या व शिखांच्या घरांची जाळपोळ झाली. सुवर्णमंदिरावरील हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मंडळीनी व इतर हिंदूंनी परतविला. यानंतर शीख राज्याची मागणी शिखांनी केली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी फाळणीनंतर लक्षावधी हिंदू, शीख, मुसलमान यांची कत्तल झाली. नंतर पंजाबमधील शीख राज्यांचे एक पेप्सू राज्य झाले. शिखांनी शीख सुभ्यांची मागणी केली परंतु पंजाबाची फाळणी कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, ही पंजाब सरकारची आणी राज्यपालांची भूमिका मध्यवर्ती सरकारने स्वीकारली.
गोखले, कमल
राज्यव्यवस्था : या प्रांताची स्वायत्त प्रांत म्हणून प्रथम १९३७ मध्ये स्थापना झाली. स्वतंत्र भारताच्या घोषणेनंतर १९४७ मध्ये त्याचे विभाजन होऊन पूर्व पंजाब आणि पश्चिम पंजाब असे दोन स्वतंत्र भाग वा प्रांत निर्माण करण्यात आले. यांपैकी पूर्व पंजाब भारतात समाविष्ट झाला, तर पश्चिम पंजाब पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आला व रॅडक्लिफ पुरस्कारानुसार या दोन्ही प्रांतांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. मात्र भारतीय संविधान कार्यवाहीत आल्यानंतर पूर्व हा शब्द वगळण्यात येऊन पंजाब हे नाव ठेवण्यात आले. त्यास घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाला. पुढे १९५६ मध्ये पेप्सू (पतियाळा) आणि ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन) या नावाने प्रसिद्ध असणारा प्रदेश पंजाब राज्यात समाविष्ट करण्यात आला परंतु १ नोव्हेंबर १९६६ रोजी पंजाब राज्यपुनर्रचना कायद्यानुसार या राज्याचे भाषिक तत्त्वावर तीन स्वतंत्र विभाग करण्यत आले आणि पंजाब, हरयाणा व हिमाचल प्रदेश ही तीन स्वतंत्र घटक राज्ये निर्माण झाली. पंजाबी भाषा बोलणारे व प्रचारात असणारे गुरदासपूर (डलहौसी सोडून), अमृतसर, कपुरथळा, जलंदर, फिरोझपूर, भतिंडा, पतियाळा, लुधियाना हे जिल्हे व होशियारपूर, संग्रूर आणि अंबाला या जिल्ह्यांचा काही भाग तसेच खरार तहसिलाचा काही भाग या राज्यात समाविष्ट करण्यात आला. त्यातून आधुनिक पंजाब राज्य अस्तित्वात आले. राजधानी मात्र चंडीगढ येथे ठेवण्यात आली. साहजिकच हे भारतीय संघराज्यातील एक घटक राज्य असल्यामुळे राष्ट्रपतींनी नेमलेल्या राज्यपालांच्या संमतीनुसार विधिमंडळाला जबाबदार असलेले मंत्रिमंडळ येथील राज्यकारभार पाहते. पंजाब राज्यात द्विसदनी राज्यपद्धती होती पण १९७० मध्ये विधानपरिषद बरखास्त करण्यात येऊन एकसदनी पद्धत अस्तित्वात आली आणि या समेत पूर्वी असणाऱ्या १०४ सभासदांत तेरा सभासदांची वाढ करण्यात आली. आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता-अकाली दल यांचे संयुक्त मंत्रिमंडळ २३ जून १९७७ रोजी अधिकारावर आले आणि अकाली दलाचे नेते श्री. प्रकाशसिंग बादल पंजाबचे मुख्यमंत्री झाले. १९७७ पर्यंत झालेल्या बहुतेक सार्वत्रिक निवडणुकांत एखादा अपवाद वगळता काँग्रेस पक्षांचेच मंत्रिमंडळ सत्तेवर होते. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीतल पक्षोपपक्षांचे बल पुढीलप्रमाणे होते : अकाली दल-५८, काँग्रेस-१७, जनता-२४, कम्युनिस्ट (मार्क्सवदी)-८, क्म्युनिस्ट-७, अपक्ष-२=एकूण ११६. एका मदतारसंघात निवडणूक व्हावयाची होती. या निवडणुकीत अकाली दल, जनता व मार्क्सवादी कम्युनिस्ट या तीन पक्षांचा निवडणूक समझोता झाला होता आणि काँग्रेस व कम्युनिस्ट यांची युती होती.
प्रशासनाच्या सोयीसाठी १९६६ पूर्वी राज्याचे अंबाला, जलंदर व पतियाळा असे तीन शासकीय विभाग पाडले होते पण नंतर त्याचे दोन विभाग करण्यात आले असून १२ जिल्ह्यांत प्रशासनव्यवस्था विभागली गेली आहे. स्थानिक प्रशासन व्यवस्थेसाठी १०४ नगरपालिका व ११६ समूहविकास गट असून ९,३३१ ग्रामपंचायती आहेत. पंजाब राज्याने त्रिसूत्री पद्धतीची पंचायती व पंचायत समित्या ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाचे कार्य करीत आहेत.
देशपांडे, सु. र.
आर्थिक स्थिती : पंजाब हे देशातील एक प्रगतिशील राज्य आहे. १९६०-६१ व १९७३-७४ या काळात राज्याचे उत्पन्न ५.२% इतक्याच वेगाने वाढले. १९६०-६१ च्या किंमतींना अनुसरून १९७३-७४ साली राज्याचे दरडोई उत्पन्न ३४० रु. वरून ४८५ रु. वर गेले आहे. ह्या विकासात मुख्यतः शेतीचा हिस्सा मोठा असून शेती उत्पन्नाचा निर्देशांक १९६०-६१ च्या (१००) तुलनेने १९७४-७५ साली २६६ झाला होता. प्रत्यक्ष उत्पन्नाचे आकडेही असेच भरघोस आहेत. १९६०-६१ साली गव्हाचे उत्पन्न १७ लाख टन होते, ते १९७४-७५ मध्ये ५३ लाख टन झाले तर तांदळाचे उत्पन्न २.२ लाख टनांवरून ११.८ लाख टनांवर गेले. गव्हाची शेती २२.३ लाख है. व भाताची शेती ५.७ लाख है. क्षेत्रामध्ये होत आसे. शिवाय ५.२ लाख हे. मधून १ लाख टन मका व १.३ लाख हे. मधून १ लाख टन बाजरी यांचे उत्पादन १९७४-७५ साली झाले होते. १९६०-६१ साली राज्यातील एकूण धान्यउत्पादन ३१.६२ लाख टन होते, ते १९७४-७५ मध्ये ७९.४ लाख टन झाले. १९७३-७४ पेक्षा १९७४-७५ मध्ये शेतीचे क्षेत्रपाळ मात्र ४१.१ लाख हे. वरून ४०.८ लाख हे. इतके कमी झाले. दर हेक्टरी उत्पादन देशापेक्षा जास्त असून गव्हाचे हेक्टरी उत्पादन २.२६९ किंग्रॅ. व तांदळाचे २,१२३ किग्रॅ. आहे. खते, बियाणे व सुधारित शेतीपद्धती यांचा अवलंब पंजाबइतका अन्य कोणत्याही राज्यात आढळत नाही. वरील पिकांशिवाय ऊस, तेलबीया, तंबाखू व कापूस ही प्रमुख नगदी पिके आहेत.
राज्याच्या एकूण जमिनीपैकी ७६% जमीन शेतीखाली होती व तीपैकी ८०% जमिनीस, जलसिंचन उपलब्ध होते. १९५० मध्येच राज्यातील ५०% जमिनीस जलसिंचन उपलब्ध करण्यात आले होते. राज्यातील प्रमुख जलसिंचन योजनांमध्ये भाक्रा-नानगल प्रकल्पात भाक्रा व नानगल येथे दोन धरणे आहेत. मुख्य धरण भाक्रा येथे २२६ मी. उंच व ८१३ मी. लांब आहे. नानगल येथे पाणी साठविण्याचा बंधारा असून तो १९४८-६८ पर्यंत पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पापासून २३८ किमी. लांब कालवे काढले असून, १४.६ लाख हे. जमिनीस पाणीपुरवठा होतो. पैकी ५.५ लाख हे. पंजाब, ६.८ लाख हे. हरयाणा व २.३ लाख हे. राजस्थान येथील जमिनीस पाणीपुरवठा होतो. बिआस प्रकल्पात दोन धरणे असून पहिले धरण बिआसवर पंदो येथे ६० मी. उंच आणि २५४ मी. लांब बांधण्यात येणार असून त्यापासून ५.३ लाख हेक्टरांना पाणी मिळेल. दुसरे धरण पोंग येथे ११५ मी. उंच व १,९४० मी. लांबीचे बांधले जाणार असून त्यापासून ६.५ लाख हेक्टरांना पाणी मिळेल. हे प्रकल्प पाचव्या योजनेत पूर्ण होतील. यांशिवाय बिआसवर पूर्वीचे कालवे काढलेले आहेतच. हरिके येथे सतलजवर बंधारा बांधून १९५८ मध्ये हरिके जलसंचय पूर्ण करण्यात आला असून त्यापासून १३,८०० हेक्टरांस जलसिंचन उपलब्ध झाले आहे.
राज्यात पशुपालनव्यवसाय अत्यंत महत्त्वाचा असून १९७२ मध्ये ३३.८ लक्ष गाई, ३७.८ लक्ष म्हशी, ३.८ लक्ष मेंढ्या, ७.९ लक्ष शेळ्या व २९ लक्ष कोंबड्या होत्या. राज्यात अलीगढ, अमृतसर, भतिंडा, लुधियाना आणि मुरादाबाद येथे दुग्धप्रकल्प चालू होते व त्यांतून रोज सरासरी १ लाख लिटरपेक्षा जास्त दूध प्रत्यक्ष गोळा होत असे.
राज्याच्या उत्पन्नात ५३.९१% भाग शेती आणि पशुपालन यांचा असून १९७३-७४ साली शेतीपासून ३४८.७ कोटी रु. व पशुपालनापासून ७५ कोटी रु. उत्पन्न मिळाले. पंजाबमध्ये बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारकच असून ५८.५% शेतकर्यांकडे केवळ १५% शेतजमीन, तर ५% शेतकर्यांकडे २६.९% शेतजमीन आहे.
शक्तिसाधने : दगडी कोळसा अजिबात नसला, तरी विपुल जलविद्युत् असल्याने राज्यातील शक्तीचा वापर देशात महाराष्ट्राखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा (दरडोई १६५.२३ किवॉ. ता.) आहे. संपूर्ण विद्युतीकरण करणार हे भारतातील पहिले राज्य आहे. २६ जानेवारी १९७६ रोजी राज्यातील १२,१२६ खेड्यांस, १०८ शहरांस व २०४ हरिजन वाड्यांस तसेच १,५०,००० नलिकाकूपांस वीज पुरवलेली होती. एकूण वीजग्राहकांची संख्या ११,७६,४२० होती. प्रमुख वीज शक्तिकेंद्रांत भाक्रा येथे डाव्या बाजूस २५० मेवॉ., गंगावाल ७७ मेवॉ., कोटला ५८ मेवॉ. तर भाक्रा येथे उजव्या तीरावर ६०० मेवॉ. वीजउत्पादन होते. या प्रकल्पांतील एकूण उत्पादन ९८५ मेवॉ. आहे. शिवाय शानाम येथे १०० मेवॉ. व अपर बडी दुआब येथे ४५ मेवॉ. पणवीज व भतिंडा येथे २२० मेवॉ. औष्णिक वीजउत्पादन होते. १९७२-७३ मध्ये राज्यातील एकूण वीजउत्पादन ७५७ मेवॉ. होते (वरील प्रकल्पांपैकी काही वीजउत्पादन हिमाचल प्रदेश व हरयाणा या राज्यांस गेल्याने येथील प्रत्यक्ष उत्पादनाचा आकडा कमी आहे).
उद्योग : पंजाब मुख्यतः लघुउद्योगांचे राज्य आहे. १९७६ साली राज्यातील लघुउद्योगांची संख्या ४०,५५६ होती व राज्याच्या एकूण उत्पन्नापैकी ८·३३% उत्पन्न या लहान उद्योगांमुळे मिळाले तर केवळ ५·०८% उत्पन्न मोठ्या उद्योगांमुळे मिळाले होते. संबंध देशाच्या तुलनेने हे आकडे विपरीत असून देशात ६% उत्पन्न लघुउद्योग व १०% उत्पन्न मोठे उद्योग पुरवतात पण राज्यातील तांत्रिकांचे उद्योगांतील प्रमाण मात्र १९६१ ते १९७१ या काळात १५·३% वरून ११·३% इतके कमी झाले आहे. राज्यात १९७१ साली कारखान्यांची संख्या ४, ९३३ होती. त्यांपैकी ६७ मोठे व ६५ मध्यम आकाराचे कारखाने होते व कारखान्यांत १,२७,४५१ कामगार होते. राज्यात उद्योगांचा विकास वेगाने व्हावा म्हणून नवी २९ केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. पंजाब राज्य उद्योग विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून ते उद्योगांस मदत करते. सांप्रत सायकली, छोटी यंत्रे, खेळांचे सामान, लोकरी कपडे या परंपरागत वस्तूंबरोबरच विद्युत्घट, ट्रॅक्टर, दूरचित्रवाणी संच, कातडी वस्तू, सिमेंटच्या पूर्वरचित वस्तू, सिमेंट नळ, कृषिअवजारे व त्यांचे सुटे भाग, विरंजके व साबण, स्कूटर आणि अत्युच्च कंप्रता ग्राहक निर्माण होतात. १९७६ साली ३०० कोटी रु. भांडवल गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांस परवानगी देण्यात आली. वरील नवीन उद्योगांशिवाय लोकरी कापड उद्योग म्हत्त्वाचा असून देशातील ९०% लोकरी कापडाचे उत्पादन या राज्यात होते. रेशीम व कृत्रिम रेशीम, खत, साखर व सिमेंट हे उद्योग महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक क्षेत्रात, एफ् सीआय् चा खतकारखाना नानगल येथे असून काही औषधी कारखानेही आहेत. १९७२-७३ मध्ये प्रमुख औद्योगिक उत्पादनांत सुती कापड १९·२४ कोटी मी., सायकली ३·१ कोटी, शिवणयंत्रे ४६२ लक्ष, लोकरी कापड १९·७ कोटी रुपयांचे, लोकरी तयार कपडे २८·५ कोटी रुपयांचे, कृषिउपकरणे इ. २१·२९ कोटी रु., यंत्रमाग उत्पादन ४४·९ कोटी रुपयांचे होते. राज्यात १९७३ मध्ये एकूण नोंदविलेल्या कामगार संघटना ६१७ असून त्यांपैकी ४१२ माहिती देणाऱ्या संघटनांची सभासदसंख्या २,०३,६८६ होती. औद्योगिक कामगारांचे वार्षिक उत्पन्न सरासरी २,६११रु. होते.
राज्यातील प्रमुख औद्योगिक प्रदेशांपैकी एक बडी दुआबात अमृतसर शहराच्या परिसरात व दुसरा बीस्त दुआबातील जलंदर, लुधियाना, नवाशहर, होशियारपूर या भागांत आहे. जलंदर हे क्रीडासाहित्याचे मोठे केंद्र आहे. क्रीडासाहित्य बनविण्याचे येथे १२५ लघुउद्योग असून त्यांत २,८०० वर कामगार आहेत. होशियारपूरला टर्पेंटाइन, रॉझिन, व्हार्निश यांचे उद्योग आहेत. लुधियाना हे लोकरी कपड्यांचे देशातील प्रमुख केंद्र असून शहरात १,६०० पेक्षा जास्त लघुउद्योग केंद्रे आहेत.
वाहतूक व संदेशवहन : राज्याची भूरचना वाहतुकीस सोईची असल्याने १९७२-७३ साली दर १०० चौ. किमी.स ४३ किमी. लांबीचे रस्ते व ४३ किमी. लोहमार्ग होते. देशाच्या अन्य भागांच्या तुलनेने हे प्रमाण खूपच चांगले असून सीमावर्ती राज्य असल्याने वाहतूक व संदेशवहन अधिकच विकसित झाले आहे. १९७५ मध्ये राज्यात ९७५ किमी. लांब राष्ट्रीय महामार्ग आणि १८,२०८ किमी. डांबरी राज्य मार्ग होते. शिवाय ३,२१० कच्चे मार्ग व ३८८ किमी. शहरांतर्गत मार्ग होते. सहारनपूर, अंबाला यांवरून येणारा ग्रँड ट्रंक रोड लुधियाना, जलंदर यांवरून अमृतसरला व तेथून पाकिस्तानमध्ये लाहोरला जातो. जलंदरवरून त्याची एक प्रमुख शाखा उत्तरेस दिल्लीला जाते व जींदमार्गे येणारा रस्ता भतिंडा व फिरोझपूरला जातो.हा मार्ग पुढे पाकिस्तानमध्ये कसूरला जाऊन लाहोरला जाणाऱ्या प्रमुख मार्गास मिळतो. १९७३ साली राज्यात ४३,७५० वाहने होती, त्यांत २७८० सार्वजनिक वाहने ९,०५० खाजगी मोटारगाड्या १६,२९५ मोटारसायकली १,४३५ जीपगाड्या अशी प्रमुख वाहने होती. जलंदर येथे आकाशवाणी केंद्र असून चंडीगढ येथे विविध भारतीचे आकाशवाणी केंद्र आहे व अमृतसर येथे २९ सप्टेंबर १९७२ रोजी दूरदर्शन केंद्र स्थापण्यात आले आहे. राज्यात ट्रिब्यून या इंग्रजी वृत्तापत्राचा खप सर्वांत जास्त आहे (१,२२,०९०–१९७२-७३) त्याखालोखाल पंजाब केसरी या हिंदी दैनिकाचा व हिंद समाचार या उर्दू दैनिकाचा खप आहे. पंजाबी दैनिकांत अजित सर्वात महत्त्वाचे आहे, पण त्याचा खप हिंदी दैनिकांच्या तुलनेने निम्माच (२५,०००) आहे. राज्यात एकूण ३६ दैनिके, १६२ साप्ताहिके व २५७ अन्य कालिक प्रकाशने होती. एकूण कालिक प्रकाशनांची संख्या १९७३ मध्ये ४५६ होती.
लोक व समाजजीवन : राज्याची १९७१ साली एकूण लोकसंख्या १,३५,५१,०६० व दर चौ. किमी.स सरासरी घनता २६९ होती. त्याच वेळी देशाची सरासरी घनता दर चौ. किमी.स १७८ होती. पंजाब हे बरेच दाट वस्तीचे राज्य आहे. १९७१ साली राज्यात ८१,५९,१७२ शीख ५०,३७,२३५ हिंदू १,१४,४४७ मुस्लिम व १,६२,२०२ खिस्ती लोक होते. पंजाब राज्य देशातील एक विपरीत स्त्री-पुरुष प्रमाण असणारे राज्य असून १९७१ साली हे प्रमाण दर १,००० पुरुषांमागे ८६५ इतकेच होते. राज्याचे साक्षरता प्रमाण ३३·६७% होते. पुरुषांपैकी ४०·३८% व स्त्रियांपैकी २५·९०% साक्षर होते. १९७४-७५ साली राज्यातील ९,१२० प्राथमिक शाळांत १८·१९ लाख १,२१३ माध्यमिक शाळांत ५·२४ लाख व १,४९५ उच्च माध्यमिक शाळांत २·११ लाख विद्यार्थी शिकत होते. राज्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखांची एकूण १५२ महाविद्यालये होती. शिवाय ३८ व्यावसायिक व तांत्रिक, १७ शिक्षक प्रशिक्षण व ४ अन्य महाविद्यालये होती त्यांत १,०९,५४९ विद्यार्थी होते. राज्यात गुरू नानक विद्यापीठ–अमृतसर, पंजाब विद्यापीठ–चंडीगढ, पंजाब कृषि विद्यापीठ–लुधियाना व पंजाबी विद्यापीठ –पतियाळा अशी विद्यापीठे आहेत. १९७४-७५ साली राज्यात १३३ रुग्णालये, १२७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४४८ दवाखाने, ३९० आयुर्वेदिक व युनानी दवाखाने, ६,३४५ डॉक्टर व ११,१३६ खाटा होत्या. चंडीगढ येथील पदव्युत्तर वैद्यकीय संशोधन संस्था ही देशातील एक विख्यात संशोधन संस्था आहे.
संस्कृती व कला : पंजाबच्या लोकसंख्येत शीख धर्मीयांची संख्या ६५% आहे. शिखांचे पवित्र ‘सुवर्णमंदिर’ (दरबार-मंदिर) अमृतसर येथे आहे. हे नगर चौथे गुरू रामदास यांनी वसविले. ग्रंथसाहिब हा त्यांचा प्रमुख धर्मग्रंथ असून त्यात पाचवा गुरू अर्जुनदेव याने पूर्व गुरूंची तत्त्वे संकलित केली आहेत. हिंदू धर्माला मूळ वैदिक धर्माच्या आधारावार शुद्ध स्वरूप व नवजीवन देणारा आर्यसमाज पंथही, १८७४ मध्ये स्वामी दयानंद सरस्वतींनी पंजाबातच स्थापन केला. त्या पंथाने शिक्षणप्रसार व लोकप्रबोधन तर केलेच, पण आपल्या उदाहरणाने सनातन्यांना सनातन धर्मसभा, शिखांना सिंहसभा व मुस्लिमांना अंजुमन संस्था काढण्यास प्रवृत्त करून, एक प्रकारे सार्वत्रिक धर्मजागृती घडवून आणली. खिस्ती व इस्लाम धर्मांचे आक्रमण थोपविण्याची बहुमोल कामगिरी पंजाबातील आर्यसमाजाने केली आहे. हिंदूंप्रमाणे शिखांतही कडव्या अकालींपासून समन्वयी आहलूवालियांपर्यंत कित्येक पंथ आहेत. तथापि ग्रंथसाहिब आणि गुरुपरंपरा सर्व पंथांना मान्य आहेत. पंजाबी हिंदू शिव, देवी व विष्णू या देवतांना मानतात. हिंदु-शिखांच्या सामाजिक रूढी सामान्यतः सारख्याच आहेत. गर्भ, जन्म, उपनयन, विवाह व अंत्यक्रिया हे संस्कार उभय समाजांत वेगवेगळ्या स्वरूपांत प्रचलित आहेत. धार्मिक प्रसंगी हिंदू देवस्थानांना व शीख गुरुद्वारांच्या दर्शनास जातात. पुरुषांची वेशभूषा शहरात जरी आधुनिक असली, तरी शीख पुरुष ‘केश-कंगवा-कंगन-कछ-कृपण’ ही पंथ-चिन्हे ‘पंचककार’ ग्रामीण भागांप्रमाणे नागरी जीवनातही धारण करतात. ग्रामीण भागांत पुरुष लुंगी किंवा चुरूत पैजामा, कुडता आणि डोक्याला पटका बांधतात. शीख लडीदार पगडी घालतात. स्त्रिया सलवार-खमीज व डोक्यावर चुनडी ओढतात. घेरदार घागरा, चोळी व ओढणी हाही त्यांचा एक आवडीचा पोशाख आहे. डोके, नाक, कान, गळा, दंड, मनगटे, बोटे व पाय यांचे एकूण जवळजवळ पन्नास अलंकारांचे प्रकार पंजाबी स्त्रियांच्या अंगावर दिसतात. पायांचे दागिने चांदीचे व बाकीचे सोन्याचे व जडावाचे असतात. पंजाबी लोकांच्या परंपरागत समजुती व श्रद्धा सूर्य, चंद्र, भूमी, विहिरी, हिमालय, ग्रहणे, छाया, पडछाया अशा बाबतींत इतर भारतीयांपेक्षा बऱ्याच वेगळ्या आहेत. सतत परकीय आक्रमणांच्या तोंडाशीच पडल्यामुळे पंजाबी लोकांचा स्वभाव लढाऊ, बेडर, मेहनती, काटक व भोगवादी बनला आहे. भरपूर कष्ट करावे, भरपूर खावे, कपडालत्ता व राहणी चांगली ठेवावी, येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावे व भविष्याची व्यर्थ चिंता करीत बसू नये, अशी त्यांची वृत्ती असते. समृद्ध कृषिउत्पादन व उद्योग-विकास करून पंजाबी जनतेने आपले जीवनमान अन्य भारतीयांपेक्षा उंचावले आहे. त्यांच्या आहारात गव्हाचा आटा, चणे व इतर डाळी, भाज्या, दूधदुभते, फळफळावळ व प्रसंगी मांस-मासे हे पदार्थ असतात. घरे खेड्यांत मातीची व गवती छपरांची, तर शहरांत विटांची व कमीजास्त पावसानुसार धाब्याची किंवा कौलारू असतात. राज्यातील बहुसंख्य लोकांची भाषा पंजाबी ही इंडो – आर्यन भाषासमूहातील एक भाषा आहे. मझी, दोआबी, मलवी आणि पत्यावली या पंजाबीच्या बोली प्रचलित आहेत. पंजाबीशिवाय पश्चिमी हिंदी व पहाडी भाषाही काही भागांत बोलल्या जातात. पंजाबीची गुरुमुखी ही लिपी शीख गुरूंनी निश्चित केली आहे [ ⇨ गुरुमुखी लिपि]. तिच्याखेरीज देवनागरी व फार्सी लिप्यांतही पंजाबी पुस्तके छापली जातात. या भाषेचा पहिला कवी फरीद शकरगंज हा बाराव्या शतकात जन्मलेला एक सूफी पंथी होता. गुरू नानकाने हिंदीमिश्रित पंजाबीत भक्तिमार्गी रचना करून गुरुसाहित्याची परंपरा सुरू केली. सूफी व हिंदू भक्तकवींनीही पंजाबीत काव्ये लिहिली. नंतर आलेल्या प्रेमाख्यान काळात हीर-रांझा, मिर्झा-साहिबाँ, सस्सी-पुन्नू, सोहनी-महीवाल अशा प्रणयी युगुलांवर अनेक रचना झाल्या. सतराव्या शतकाच्या मध्यकाळात गद्याचा विकास सुरू झाला. शिखांचे राज्य आल्यावर वीरगाथा व देशभक्तिपर लेखनाला बहर आला. आधुनिक काळात शिखांना पृथगात्मतेची तीव्र जाणीव होऊन सिंहसभा, अकाली दल अशा संस्थांच्या प्रचाराप्रीत्यर्थ विपुल साहित्य निर्माण झाले. शिक्षणप्रसार वाढल्यानंतर ललित वाङ्मयनिर्मितीही होऊ लागली. कविता, कथा, कादंबऱ्या, चरित्रे अशा प्रकारचे पुष्कळ लेखन होऊ लागले. आधुनिक काळात कवी मोहनसिंग व कवयित्री अमृता प्रीतम, लोकसाहित्य संकलक देविंदर सत्यार्थी, गुरमुखसिंग ‘मुसाफीर’, गुरबक्षसिंग, नानकसिंग, कर्तारसिंग दुग्गल व इतर अनेक लेखक-लेखिका पंजाबी साहित्य समृद्ध करीत आहेत. पंजाबी नाट्यलेखन त्यामानाने तुटपुंजे आहे. त्यात बलवंत गार्गी हे उल्लेखनीय होत. चित्रकलेचा विकास उच्च दर्जाचा असून पुढे प्रसिद्ध पावलेली ‘कांग्रा चित्रशैली’ पंजावीच आहे. संगीतामध्ये स्वामी हरिदास, बडे गुलामअलीखाँ, अमानत अलीखाँ, कुंदनलाल सैगल, महंमद रफी हे शास्त्रीय व सुगम संगीत गायक विख्यात आहेत. सिनेसृष्टीमध्ये पृथ्वीराज कपूर व राज, शशी इ. कपूरबंधू व अन्य वरेच सिनेकलावंत पंजाबीच आहेत. ललित कलांपैकी नृत्य व गायन पंजाबी लोकजीवनात मिनलेले आहे. भारतीय संगीत कलेवरचा पंजाबी संस्कार सुस्पष्ट आहे. पुरुषांचे ‘भांगडा’ व स्त्रियांचे ‘गिद्धा’ ही समूहनृत्ये प्रसिद्ध आहेत. लोकरंजनासाठी वीणासदृश रबाव वाद्याच्या साथीवर नाचणारे रबाबी व युद्धासारखा आवेशपूर्ण सांघिक नाचाचा खेळ करणारे ‘खट्टक’ हे धंदेवाईक नर्तक ग्रामीण भागांत लोकरंजन करीत फिरतात. रामलीला, रासलीला, स्वांग, नकल, नौटंकी अशी परंपरागत लोकनाट्येही जनतेच्या करमणुकीची साधने आहेत. कलाकुसरींपैकी चांदी-सोन्याचे व जडावाचे अलंकार बनविणारे पंजाबी सोनी विख्यात आहेत. घरातील लाकडी सजावटसामान व विलायती खेळांची उपकरणे तयार करण्यात पंजाबी सुतार व कारागीर आघाडीवर आहेत. क्रीडा क्षेत्रातील पंजाबची कामगिरी उल्लेखनीय आहे. हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल व मैदानी खेळ यांत पंजाबी खेळाडू नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करतात. ‘लीडर्स क्लब’ जलंदर व ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ हे प्रसिद्ध संघ आहेत. मिल्खासिंग हा धावपटू, ध्यानचंद हा हॉकीपटू, प्रवीणकुमार, जोगिंदरसिंग हे मैदानी खेळाडू विख्यात आहेत. पतियाळा येथे राष्ट्रीय क्रीडाशिक्षणसंस्थाही आहे. हॉकी व मैदानी कसरती खेळ यांत पंजाबी लोक भारतात अग्रेसर आहेत.
प्रेक्षणीय स्थळे : सुवर्णमंदिराचे स्थान अमृतसर, अत्याधुनिक स्थापत्याची राजधानी व गुलाबपुष्पांची नगरी चंडीगढ आणि सतलजवरील प्रचंड धरणांचे भाक्रा-नानगल तसेच भतिंडा, जलंदर, सरहिंद, कर्तारपूर ही प्रेक्षणीय शहरे आहेत. डेरा बाबा नानक शहर गुरू नानकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वसवले आहे. अचलेश्वर ह्या गावात शिवपार्वतीचे प्रचंड मंदिर असून तेथे उ. भारतातील एकमेव कार्तिकेयाची मूर्ती आहे. (चित्रपत्रे १,११).
ओक, शा. नि. डिसूझा, आ. रे.
संदर्भ :1. Ahluwalia, M. L. Singh, Kirpal, The Punjab’s Pioneer Freedom Fighters, Bombay, 1963.
2. Kohli, S. R. Sunset of the Sikh Empire, New Delhi. 1967.
3. Singh, Khushwant, A History of the Sikhs, Vol. I & II, London, 1963.
४. गाडगीळ, न. वि. शिखांचा इतिहास, पुणे, १९६३.
“