कील कालवा : उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडणारा पश्चिम जर्मनीच्या श्लेस्विग-होलस्टाइन प्रांतातील कालवा. लांबी ९८·७ किमी., रुंदी ९५·९ मी. व खोली ११ मी.

उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कील कालवा

सुएझपेक्षा लहान व पनामापेक्षा मोठा आहे. जर्मनीच्या लष्करी महत्त्वाकांक्षेतून हा १८८७–९५ मध्ये बांधला गेला. तत्पूर्वी स्कागनची वादळे आणि डॅनिश टोलनाकी चुकविण्याकरिता या प्रदेशात चौदाव्या शतकापासूनच छोटे कालवे बांधण्यात आले होते. डेन्मार्कच्या तिसऱ्या ख्रिश्चनने (१५३३–५९ )प्रथम सागरी जहाजांना उपयुक्त कालवा काढण्याची योजना केली.  ती १७८४ साली फलद्रूप झाली.  हा जुना कालवा कील आखातातून हॉल्टनाऊ या कील शहराच्या उपनगराजवळून निघून आयडर नदीस मिळाला होता. परंतु जहाजांचा आकार वाढल्याने पुढे तो निरुपयोगी झाला. १८९५ चा कालवा रेंटसबुर्खपर्यंत जुन्या कालव्याच्या मार्गानेच जातो.  तेथून मात्र तो दक्षिणेकडे ब्रुन्सब्यूटेलकोखजवळ एका नदीमुखाकडे वळला आहे. या कालव्यास कैसर विल्यम कालवा अथवा नॉथ सी-बाल्टिक  कालवा असेही म्हटले जाते. १९०७–१४ मध्ये मोठ्या लढाऊ जहाजांकरिता याची रुंदी व खोली वाढवावी लागली. हा मुख्यतः नौदलाकरिता बांधला, पण याचा फायदा मुल्की वाहतुकीस मिळाला आहे. मधली नाझी राजवटीची काही वर्षे वगळल्यास व्हर्सायच्या तहापासून हा सर्व राष्ट्रांच्या जहाजांस खुला आहे. यांच्या दोन्ही टोकास दारे असून कालव्यावर सात पूल आहेत. १९७२ साली यामधून ६९,०७३ जहाजांनी ये-जा केली.

शहाणे, मो. शा.