ग्रेट बेअर सरोवर : संपूर्णतः कॅनडाच्या हद्दीत असलेले सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. क्षेत्रफळ ३१,९१५ चौ. किमी. हे कॅनडाच्या नॉर्थवेस्ट टेरिटरी भागात, मॅकेंझी विभागात, मॅकेंझीच्या खोऱ्यात ६४° ४७’ उ. ते ६७° २३’ उ. व ११७° प. ते १२५° ६’ प. यांदरम्यान असून त्याची लांबी ३८o किमी. व रुंदी ४o ते १७६ किमी. आहे. याचा आकार अगदी अनियमित असून याचे फाटे दूरवर गेलेले आहेत. हे समुद्रसपाटीपासून ११९ मी. उंचीवर असून ३९६ मी.पेक्षा अधिक खोल आहे. यात भरपूर मासे सापडतात परंतु हे वर्षातून फक्त ४ महिने जलवाहतुकीस उपयोगी पडते. बाकीचे आठ महिने ते गोठलेले असते. यात पुष्कळ बेटे असून यातून निघणारी ग्रेट बेअर नदी सु. १६o किमी. वाहत जाऊन मॅकेंझीला मिळते. याच्या उत्तर व पूर्व किनाऱ्यांपेक्षा दक्षिण व पश्चिम किनाऱ्यावर अधिक झाडी आहे. याच्या पूर्व किनाऱ्यावरील पोर्ट रेडियमच्या आसपास रेडियम व युरेनियमच्या खाणी आहेत त्यांचा शोध १९२९ मध्ये लागला. हे सरोवर १८oo मध्ये माहीत झाले व १८२५ मध्ये सर जॉन फ्रँकलिन याने त्याचे समन्वेषण केले.

लिमये. दि. ह.