बुलढाणा शहर : महाराष्ट्र राज्यातील याच नावाच्या जिल्हयाचे मुख्य ठिकाण व विदर्भातील एक प्रमुख थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या ३५,९१३ (१९८१) हे बुलढाणा तालुक्यात, मध्यरेल्वेवरील मलकापूर स्थानकाच्या दक्षिणेस ४५ किमी. अंतरावर वसले आहे. अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये सस. पासून ६६८ मी. उंचीवर वसलेले हे शहर वनश्रीने नटलेले आहे. येथील हवामान आरोग्यवर्धक आहे. पूर्वी हे ठिकाण ‘भिल्ल ठाणा’ (भिल्लाचे केंद्र) म्हणून ओळखले जाई. त्याचाच अपभ्रंश होऊन ‘बुलढाणा’ हे नांव रूढ झाले. याच्याजवळूनच पैनगंगा नदी वाहते. वायव्येस असलेल्या सत्रावड (संगम) तलावाचे पाणी १८९२ पासून शहराला पुरविले जात होते. यांशिवाय येथे ‘सरकारी बगिचा’,‘चिंच’, ‘धोबी‘’ असे तीन तलाव असून उन्हाळ्यात मात्र ते कोरडे पडतात. सध्या पैनगंगा नदीच्या शीर्षभागातील बंधारा, सागवन येथील पूरक विहीर व नगरापासून दिड किमी. वरील शेरी विहीर यांचे पाणी नगराला पुरविले जाते. शिवाय पैनगंगेवरील येळगांव धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. १८९३ पासून येथे नगरपालिका आहे. सरकारी कचेऱ्या, नागरी रुग्णालय, क्षयरोग्यांसाठी आरोग्य भुवन, स्त्रियांसाठी सरकारी रुग्णालय गुरांचा दवाखाना, तुरुंग, शासकिय विश्रामधाम, ग्रंथालय, धर्मशाळा इ. सार्वजनिक संस्था आणि सरकारी बहूद्देशीय विद्यालय व इतर खासगी विद्यालये, ग्रामसेवक प्रशिक्षण विद्यालय, कृषिविद्यालय, सरकारी शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय इ. शैक्षणिक संस्था शहरात आहेत.

चौधरी, वसंत