आल्प्स : दक्षिण मध्य यूरोपातील पर्वतसंहती. सु. ४४ उ. ते ४८ उ. व ६ पू. ते १८ पू. या पर्वतसंहतीने एकूण सु. २,०७,२०० चौ.किमी. क्षेत्र व्यापले असून सर्वात उंच शिखर माँ ब्लाँ (माँट ब्लांक) ४,८१० मी. उंच आहे. केल्टिक ‘आल्ब’ किंवा ‘आल्म’ या उंच किंवा धवल या अर्थाच्या शब्दावरून आल्प हा शब्द आला असावा. त्या प्रदेशातील लोक मात्र आल्प म्हणजे उंच पर्वतीय प्रदेशातील कुरणे असे समजतात. आल्प्सचे भौगोलिक स्थान व यूरोप खंडातील मानवी जीवनावर आल्प्सचा झालेला परिणाम यांमुळे आल्प्सला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे.

उलट्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आल्प्सच्या रांगा फ्रान्स व इटली यांच्या दरम्यान भूमध्य समुद्रापासून सुरू होतात. त्या प्रथम उत्तरेकडे, मग ईशान्येकडे, नंतर पूर्वेकडे व शेवटी आग्नेयीकडे वळून यूगोस्लाव्हियाच्या एड्रिअटिक किनाऱ्यापर्यंत जातात. याचा सर्वात उत्तरेकडील भाग बव्हेरियात आहे. एका बाजूला इटलीचे पो नदीचे खोरे व दुसऱ्या बाजूला फ्रान्स, जर्मनी तसेच डॅन्यूब नदीचे खोरे यांच्यामध्ये आल्प्स पर्वत उभा आहे. स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया यांचा बराच भाग आल्प्समुळेच डोंगराळ झालेला आहे.

यूरोपातील कॉकेशसच्या खालोखाल सर्वात उंच पर्वतश्रेणी म्हणून आल्प्सची गणना होते. तथापि अनेक खिंडीमुळे हा कॉकेशसइतका एकाकी वा हिमालयाइतका दुर्लंघ्य नाही. उंचीचा परिणाम म्हणजे २,४०० ते २,९०० मी. उंचीच्या वरील पर्वतउतार व पर्वतशिखरे सदैव बर्फाच्छादित असतात. जवळजवळ १,२०० हिमनद्या या पर्वतश्रेणीतून वाहतात. अनेक शृंगे, प्रशिखा, हिमगव्हरे, ‘यू’ आकाराच्या व लोंबत्या दऱ्या इ. हिमानी क्रियेमुळे तयार झालेल्या भूविशेषांमुळे आल्प्स पर्वतप्रदेशाला हिमालयाप्रमाणे भव्योदात्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

आल्प्स पर्वत

आल्प्सचा उंच प्रदेश सु. १२५ ते १३८ किमी. रुंदीचा पट्टा असून त्यात फिन्स्टर आर्‌हाॅर्न, माँटे रोझा व माँट ब्लांक इ. उंच शिखरे आहेत. जेथे पर्वताची रुंदी २०० ते २५० किमी. पर्यंत आहे, तेथे ४,००० मी. पेक्षा उंच शिखरे आढळत नाहीत. पूर्वेकडील आल्प्स फक्त कारावांकेन जवळच २,४०० मी. पेक्षा जास्त उंच आढळतो.

आल्प्स पर्वताच्या समांतर रांगा वलीकरणाने व प्रणोदविभंगाने बनल्या असून त्यामुळेच त्यांच्यामध्ये मोठमोठ्या दऱ्या निर्माण झाल्या आहेत. विदारण व क्षरण यांमुळे बराच अंतर्भाग उघडा पडल्यामुळे ही घड्यांची रचना जास्त स्पष्ट होते. सर्वसामान्यपणे प्रमुख दऱ्यांची दिशा नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे आहे. सामान्यत: आल्प्स पर्वताचे तीन भाग पाडले जातात : (१) पश्चिम आल्प्स (२) मध्य आल्प्स व (३) पूर्व आल्प्स.

(१) पश्चिम आल्प्स : समुद्रानजीकचा कमी उंचीचा मॅरिटाइम आल्प्स (कॉले दे तेंदेपासून कॉले दे आर्जेंतेअरापर्यंत) लिग्यूरियन आल्प्स-मॅरिटाइम आल्प्सचा इटलीच्या वायव्य किनाऱ्यावरील विस्तार कॉतिअन आल्प्स-कॉले दे आर्जेंतेअरापासून माँ सनी खिंडीपर्यंत त्याच्या पश्चिमेचा डोफीने आल्प्स कॉतिअनपासून दूरांस दरीने विभागलेला ग्रेयन आल्प्स आणि सव्हॉय आल्प्स असे याचे विभाग आहेत. पश्चिम आल्प्समध्ये पूंता आर्जेंतेअरा (३,२९६ मी.), साक्कारेल्लो (२,२०२ मी.), मौंट व्हीझो (३,८४२ मी.), माँट ब्लांक (४,८१० मी.), मॅटरहॉर्न (४,५०५ मी.), वाइसहॉर्न (४,५११ मी.), डांब्लांश (४,३६४ मी.) इ. उत्तुंग शिखरे आहेत. माँट ब्लांक हे सर्वोच्च शिखर फ्रान्समधील सव्हॉय आल्प्समध्ये आहे.

(२) मध्य आल्प्स : फ्रान्स व इटली यांच्या सीमेवरील पेनाइन आल्प्स, त्याच्या उत्तरेस पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने बर्नीज आल्प्स, लिपाँटाइन आल्प्स, रीशन आल्प्स व इतर अनेक रांगा मध्य आल्प्स विभागात येतात. त्यात आल्बुला, सिल्व्रेता, रॅटिकॉन इत्यादींचा समावेश आहे. पेनाइनमध्ये माँटे रोझा (४,६३८ मी.) व इतर भागांत युंगफ्राऊ (४,१६१ मी.), मोंटे लेओने (३,५६१ मी.), पित्स बर्नीना (४,०५२ मी.), फिन्स्टर आर् हॉर्न (४,२७५ मी.) इ. शिखरे आहेत.


(३) पूर्व आल्प्स : यात ऑस्ट्रियातील मूर आणि द्रावा यांच्या दऱ्यादरम्यानचा नॉरिक आल्प्स, पश्चिम ऑस्ट्रियाच्या कॅरिंथिया व टायरॉल यांच्या दरम्यानचा होए टाउअर्न, दक्षिण ऑस्ट्रिया व ईशान्य इटली यांमधील कार्निक आल्प्स, ईशान्य इटलीतील आदीजे व प्याव्हे यांच्या दऱ्यांदरम्यानचा डोलोमाइट्स, वायव्य यूगोस्लाव्हियातील ज्यूल्यन आल्प्स, दक्षिण ऑस्ट्रिया व वायव्य यूगोस्लाव्हिया यांमधील कारावांकेन यांची गणना होते. यूगोस्लाव्हियाच्या पश्चिम किनाऱ्यास समांतर गेलेला दिनारिक आल्प्स हाही पूर्व आल्प्समध्येच येतो. त्याचाच फाटा पुढे उत्तर अल्बेनियात गेला आहे. यात आयझेनहूट (२,४३९ मी.), ग्रोस ग्लॉकनर (३,७९८ मी.), मार्मोलाडा (३,३३२ मी.), ट्रीग्लाव्ह (२,८६३ मी.), होखश्टूल (२,२३५ मी.), व्होल्यनाट्स (२,३७७ मी.) ही प्रमुख शिखरे आहेत.

 

ऱ्होन, ऱ्होईन, पो आणि डॅन्यूबच्या इन, एन्स, मूर, द्रावा इ. उपनद्या आल्प्स पर्वतात उगम पावतात. या पर्वताच्या रांगारांगामधून शामॉनी, इंटरलाकेन, एंगॅडिन, लाउटरब्रूनेन, ग्रिंडेलव्हॉल्त, त्सेर्मात इ. निसर्गसुदंर, रमणीय दऱ्या आहेत. तसेच मधून मधून आढळणाऱ्या जिनीव्हा, तून, माद्जोरे, कॉमो, गार्दा, ईझेओ, ल्यूसर्न, ब्रीएंत्स, झुरिक इ. सरोवरांनी निसर्गसौंदर्यात मोठीच भर घातली आहे.

स्वित्झर्लंडमधील आल्प्स हा सर्वात रमणीय व प्रेक्षणीय भाग समजला जातो. या प्रदेशात जवळजवळ १,३८३ चौ.किमी. प्रदेश सदैव बर्फाच्छादित असतो. येथील भूरचनाही फार वेगळी आहे. भूस्तरांच्या एकमेंकावर घड्या पडल्या असून काही वेळा त्यांतील काही घड्या उफराट्या झालेल्या आढळतात. या विचित्र भूरचनेमुळेच माँटे रोझा हे शिखर उंच गेले आहे. पश्चिम डोलोमाइट्स आणि आस्ट्रियातील आल्प्स पर्वत प्रदेश रुंद व कमी उंचीचा असून स्तरभ्रंश आणि ज्वालामुखी कार्यामुळे भूरचनेच्या दृष्टीने गुंतागुंतीचा झाला आहे. अतिपूर्वेकडे मात्र घनदाट अरण्य व अतिशय उंचसखल भूरचना आढळते.

भूरचना : आल्प्स पर्वत आल्पीय-हिमालयीन समूहातील एक पर्वतप्रणाली मानला जातो. आल्प्सचा बहुतेक भाग स्तरित खडकांचा बनलेला आहे. अगदी पुरातन असे पर्मियन, कारबॉनिफेरस, डेव्होनियन, सिल्युरियन आणि क्वचित कँब्रियन काळातील स्तर आढळतात. काळाकभिन्न स्फटिकी दगडही आढळतो. आल्प्स पर्वत हा अति-अंतर्वक्र कमानीवर स्थिर आहे. तेथे पूर्वी समुद्रप्रदेश होता. या समुद्राच्या तळाशी मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षे गाळ साचला. उत्तर आणि दक्षिण भूखंडाच्या परस्परविरुद्ध दिशेने झालेल्या हालचालींमुळे या समुद्रगाळास उलट्या सुलट्या घड्या पडल्या व त्यांतूनच या महत्त्वाच्या पर्वतश्रेणीचा जन्म झाला असावा, असे भूशास्त्रज्ञांचे मत आहे. ही गिरीजनक हालचाल मध्यजीव काळात सुरू होऊन नूतन जीवाच्या प्लेइस्टोसीन कालखंडात बरीचशी पुरी झाली असावी व उंच शिखरांच्या विभागातील स्फटिकी खडक उघडे पडले असावेत. याच्या बाजूच्या कमी उंचीच्या रांगा प्रामुख्याने चुनखडकाच्या बनलेल्या आहेत.

मीठ हे आल्प्समधील नैसर्गिक खनिजांतील महत्वाचे खनिज मानले जाते. तसेच शिसे व तांबे या धातूंच्या उपलब्धतेमुळे काही अतिप्राचीन वसाहती या प्रदेशात होत्या. लोखंड, कोळसा आणि लिग्नाइट काही भागात आढळतात.

उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भूप्रदेशांच्या दरम्यान आल्प्स पर्वत हवामान, संस्कृती इ. दृष्टींनी अडसरासारखा उभा असला, तरी त्यातील अनेक सखल खिंडीतून प्राचीन काळापासून हा पर्वत ओलांडून प्रवासी, धर्मोपदेशक, व्यापारी व सैन्ये आलेली आहेत. काही खिंडींतून चांगले रस्ते बांधले गेले आणि अलीकडे तर खिंडींच्या खालून लांबलांब बोगदे खणून त्यांतून रस्ते व लोहमार्ग नेलेले आहेत. आल्प्स ओलांडून जाणारे विमानमार्गही या खिंडींच्या अनुरोधाने जातात. नैर्ऋत्य ऑस्ट्रियातील १,७९६ मी. उंचीवरील आर्लबर्ग खिंडीखालून गेलेल्या १० किमी. बोगद्यातील लोहमार्गाचे १९२३ मध्ये विद्युतीकरण झाले. ऑस्ट्रिया व इटली यांमधील १,३७० मी. उंचीवरील ब्रेनर या प्राचीन काळापासून वापरात असलेल्या खिंडीतून गेलेल्या लोहमार्गावर २२ बोगदे व ६० मोठे पूल आहेत. ग्रेट सेंट बर्नार्ड (२,४७२ मी.) व लिटल सेंट बर्नार्ड (२,१८८ मी.) या प्रसिद्ध खिंडींतून इटलीचे अनुक्रमे स्वित्झर्लंडशी व फ्रान्सशी दळणवळण चालते. ग्रेट सेंट बर्नार्डमधूनच नेपोलियन ससैन्य इटलीत उतरला होता माँ सनी या २,०८२ मी. उंचीवरील खिंडीतूनही फ्रान्स व इटली यांचा संबंध येतो. हॅनिबालने ही खिंड वापरली असावी असा अंदाज आहे. येथून सु. २५ किमी. वर माँ सनी बोगदा आहे. आल्प्समधून आरपार काढलेल्या मोठ्या बोगद्यांपैकी हा पहिला बोगदा १८७१ मध्ये खुला झाला. स्वित्झर्लंडमधील सेंट गॉटर्ड खिंड २,११४ मी. उंचीवर असून, १,१५५ मी. उंचीवरील १५ किमी. लांबीचा सेंट गॉटर्ड बोगदा झाल्यापासून तेथील गाडीरस्ता फारसा वापरात नाही. इटली व स्वित्झर्लंड यांमधील सिंप्लॉन खिंड २,००८ मी, उंचीवर असून ती पेनाइन आल्प्स व लिपाँटाइन आल्प्स यांच्या सीमेवर आहे. सिंप्लॉन बोगदा ७०५ मी. उंचीवर असून तो जगातील सर्वात लांब बोगदा (२० किमी.) आहे. स्वित्झर्लंड व इटली यांस जोडणारी आणखी एक खिंड श्प्लुगेन ही २,११७ मी. उंचीवर आहे. याशिवाय तेंदा, माद्दालेना, माँ झनेव्र, मालॉया, स्टेल्व्यो, लचबेर्ख, ग्रिम्झेल, फुर्का, काचबर्ग, झेमेरिंग इ. अनेक खिंडी आहेत.

हवामान, वनस्पती व प्राणी : आल्प्स प्रदेशाचे हवामान पर्वतीय प्रकारचे आहे. उंचीप्रमाणे तपमान व पर्जन्यमान यांत फरक पडत जातो. दक्षिणाभिमुख उतार व उत्तराभिमुख उतार यांच्या हवामानातही फरक पडतो. दक्षिणउतार अधिक उबदार असतात. काही दऱ्यांतून तपमानाची विपरीतता दिसून येते. पायथ्यापासून वर वर जावे, तसतसे वनस्पतिप्रकारही बदलत जातात. १,५०० मी. पर्यंतच शेती शक्य होते. त्यातही गहू, बार्ली, अंबाडी, मका, राय यांच्या उंचीच्या मर्यादा वेगवेगळ्या आहेत. उतारावरील द्राक्षांच्या बागा व इतर फळझाडे ही सामान्यत: या उंचीपर्यंत दिसतात. यापेक्षा अधिक उंचीवर बटाटे होतात व बीचसारखी रुंदपर्णी झाडे आहेत. सलग अरण्य सु. १,५०० ते १,८५० मी. उंचीपर्यंत आढळते. सु. २,८०० मी. उंचीपलीकडे कायम बर्फ असते. १,८५० ते २,८०० मी. उंचीच्या दरम्यान पाइन, फर, स्प्रूस इ. वृक्ष व आल्प्समधील सुप्रसिद्ध कुरणे आढळतात. जो जो उंच जावे, तो तो झाडे खुरटी होत जातात. तरुरेषा व हिमरेषा यांच्या दरम्यान विशिष्ट आल्पीय प्रकारच्या वनस्पती आढळतात. पर्वतीय प्रदेशातील लोक दरवर्षी उन्हाळ्यात गुरे, मेंढ्या इत्यादींचे कळप घेऊन उंचावरील कुरणात वसतीस जातात. याला ‘ट्रान्स ह्यूमान्स’ म्हणतात. या प्रदेशात प्राणी थोडेच आहेत. त्यात शॅमॉय व मारमॉट हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उंच प्रदेशात गुरे व शेळ्यामेंढ्या पाळणे तसेच दुधापासून लोणी, चीझ वगैरे बनविणे हे प्रमुख व्यवसाय आहेत. कमी उंचीच्या भागात व दऱ्याखोऱ्यांत शेती व फळबागा हे व्यवसाय आहेत.


अठराव्या शतकापूर्वी आल्प्ससंबंधीची माहिती फारच त्रोटक व क्वचितच नमूद करून ठेवलेली आढळते. विशिष्ट प्रकारच्या भूरचनेमुळे ऐतिहासिक काळात या पर्वतीय प्रदेशातील खिंडीचा सैनिकी हालचालींच्या संदर्भात क्वचित उल्लेख किंवा महत्त्व दाखविलेले आढळते. १७१३ चा उत्रेक्तचा तह, १८६० मधील फ्रान्सचा विजय, १८१५ मधील स्विस संघाचा विजय, १८६१ मधील इटलीचा लिव्हिग्नो दरी प्रदेशातील विजय वगैरे ऐतिहासिक घटना या प्रदेशातील राष्ट्रहक्कप्रस्थापनेचे उद्देश स्पष्ट करतात. मागील शतकात गिर्यारोहणाचे दृष्टीने आल्प्सला फार महत्त्व प्राप्त झाले. १८६५ मध्ये एडवर्ड व्हिंपर याने मॅटरहॉर्न सर केले. एकोणिसाव्या शतकात अनेक आल्पीय संघटना देशोदेशी निर्माण झाल्या व पद्धतशीरपणे आणि नियमितपणे या पर्वतराजीच्या संशोधनास व गिर्यारोहणास सुरुवात झाली. मार्गदर्शकांना विशेष शिक्षण देणे, माहितीपूर्ण पुस्तिका आणि मासिके नियमित प्रसिद्ध करणे अशी कार्ये या संघटनांनी अंगिकारली आहेत. विसाव्या शतकात आल्प्सचे रूप आगळेच बनले आहे. अनेक आगगाड्यांची सतत ये-जा, आलीशान विश्रांतिगृहे, रमणीय प्रवासस्थाने आणि जलविद्युत केंद्रे यांनी पूर्वीचा आल्प्स संपूर्ण बदलून गेला आहे. आजूबाजूच्या प्रदेशातील व परप्रदेशातीलही अनेक खेळाडू व प्रवासी यांचे आल्प्स हे हिवाळ्यातील निवासस्थानच झाले आहे. प्रत्येक संबंधित देशातील सरकारांनी व लोकांनी, लोकांच्या बदलत्या मनोप्रवृत्तींना अनुकूल असे नवीन खेळ व अनेक सुखसोयी पुरवून बराच फायदा साधला आहे.

 

अलीकडेच स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स या देशांनी मुद्दाम या प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांचा नाश व संहार थांबविण्याची दक्षता घेतली आहे. तसेच गिर्यारोहकांना या पर्वतराजीच्या आकर्षणापासून परावृत्त केले जात आहे व जगाच्या कानाकोपऱ्यांतील इतर पर्वतराजींकडे जाण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात येत आहे.

दळणवळणाची सुकरता आणि आल्प्समधील प्रवाहांवर तयार होणारी जलविद्युत् यांमुळे येथील लोकांचे जीवन झपाट्याने बदलत आहे. अलीकडे या भागांत नवीन लागवडीच्या पद्धतींना सुरुवात झाली आहे. निकृष्ट जातीच्या मेंढ्यांच्या जागी उत्कृष्ट जातीच्या पुष्ट मेंढ्या आणि बहुदुधी गायींचे पालनपोषण सुरू केले आहे. उंच पर्वतउतारांवरील गवताचा उपयोग विविधोपयोगी जनावरांना चरण्यासाठी होतो. सिमेंट आणि चुना तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे उद्योग येथे चालतात. तसेच चामडे आणि कापड व्यवसाय विपुल विद्युत्‌ शक्तीवर चाललेले दिसतात. या पर्वतीय प्रदेशांत अनेक विद्युत् व धातुनिर्मिती केंद्रे स्थापन झालेली आहेत.

आकर्षक निसर्गदेखावे, उत्तुंग शिखरे व विविध खेळांस योग्य असे पर्वतउतार यांमुळे बरेचसे लोक पर्यटन व्यवसायावर चरितार्थ चालवितात. स्वित्झर्लंडमधील आल्प्स प्रदेशाला दरवर्षी सु. १५,००,००० देशांतर्गत प्रवासी आणि ३०,००,००० परदेशी प्रवासी भेट देतात. ऑस्ट्रियातील आल्प्स प्रदेशाला एकूण ४०,००,००० देशांतर्गत प्रवासी व ४९,००,००० परदेशी प्रवासी भेट देतात.

सर्वात जास्त उंचीवरील परंतु बाराही महिने वस्ती असणारे आल्प्समधील ज्युफेई खेडेगाव ग्रीसन्स विभागात २,६५० मी. उंचीवर आहे. विविधतेने, वैचित्र्याने आणि भव्योदात्त निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेली ही पर्वतश्रेणी साहित्यिकांना स्फूर्तिदायी ठरलेली आहे त्याचप्रमाणे शास्त्रज्ञ, गिर्यारोहक व व्यावसायिक यांनी ती आता आवाहनही करीत आहे. (चित्रपत्र ६२).

संदर्भ :     1. Huxley, Anthony, Standard Encyclopaedia of the World’s Mountains, London. 1964.

             2. Deffontaines, Pierre, Ed. Larousse Encyclopedia of World Geography, London, 1964.

खातु, कृ. का.

हिमनदीने वेढलेले आल्प्समधील प्रसिद्ध 'मॅटरहॉर्न' शिखर  कांडरश्टेग : आल्प्सच्या कुशीतील हिवाळी खेळांचे एक स्थळ