यूकॉन : कॅनडा आणि अ. सं. सं. च्या अलास्का राज्यातून, सामान्यतः वायव्यवाहिनी व उत्तर अमेरिकेतील प्रमुख नद्यांत समाविष्ट असणारी नदी. लांबी ३,२२० किमी., जलवाहनक्षेत्र ८,५५,००० चौ. किमी. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया व यूकॉन प्रांतांच्या सरहद्दीवरील तागिश सरोवरात ही उगम पावते. १९४५ पर्यंत यूकॉन नदीची, यूकॉन प्रांतात ल्यूइस नदी म्हणून नकाशात नोंद होती परंतु १९५२ मध्ये कॅनडियन सरकारने तागिश सरोवरापर्यंतच्या नदीचा प्रवाह हा यूकॉन नदी या नावाने ओळखला जाईल असे स्पष्ट केले.

ही नदी आपल्या प्रवाहमार्गात विविध भूप्रदेशांवरून मार्गक्रमण करते. उगमानंतरच्या वरच्या टप्प्यात डोंगर, कडे, सरोवरे, सुळके यांतून मार्गक्रमण करीत अरुंद अशा घळईतून वाहते. त्यामुळे ठिकठिकाणी धबधब्यांचीही निर्मिती झाली आहे. मात्र लबर्झ सरोवराच्या उत्तरेस ही स्थूलमानाने सपाट अशा प्रदेशातून रुंद पात्रातून वाहते. वरच्या टप्प्यात अरुंद अशा घळईतून वाहत असली, तरी अलास्कामध्ये, नद्यांच्या संगमामुळे पाण्यामध्ये वाढ झाल्याने नदीच्या पात्राची रूंदी वाढत जाते. या ठिकाणी हिचा प्रवाह नागमोडी वळणे घेतो व कित्येक ठिकाणी बदलत्या बाजूच्या टेकड्या, लहानलहान बेटे यांची निर्मिती होऊन पात्राची रुंदी कित्येक ठिकाणी सु. १६ ते ४८ किमी. आढळते. तननॉ नदीच्या संगमानंतर ही नदी उत्तराभिमुखी होऊन बेरिंगच्या समुद्रास मिळते.

तेझ्‌लिन, पेली, स्ट्यूअर्ट, क्लांडाइक, पॉर्क्युपाइन, कायकक, ताकिनी, बिग सॅमन, तननॉ या हिच्या प्रमुख उपनद्या होत.

जलवाहतुकीस १८६६ पासून प्रारंभ झाला व क्लांडाइक परिसरातील सोन्याच्या शोधामुळे एक प्रमुख दळणवळणमार्ग म्हणून महत्त्व आले. परंतु उत्तरोत्तर दळणवळणातील रेल्वे, रस्ते, हवाईवाहतूक यांच्या सुविधांमुळे व आसमंतातील सोन्याच्या खाणींचे महत्त्व कमी झाल्याने जलवाहतूक कमी आहे. मात्र वर्षातून तीन महिने व्हाइटहॉर्सपर्यंत जलवाहतूक चालते. हिच्या प्रवाहमार्गाचा व जलाशयाचा विचार करता विद्युत्‌निर्मितीच्या दृष्टीने नदीस महत्त्व असून रॅम्पर्ट येथे धरण बांधण्याची योजना आहे.

यूकॉन नदीखोरे हे कमी लोकवस्ती व किमान सोयीसुविधा असलेले उ. अमेरिकेतील एक नदीखोरे आहे. रशियनांनी १८३६ – ३७ व १८४३ मध्ये हिच्या मुखाकडील भागाचे समन्वेषण केले. १८४३ मध्ये हडसन बे कंपनीच्या कँबेल याने नदीच्या वरच्या टप्प्यातील भागाचे समन्वेषण केले व १८४८ मध्ये फोर्ट सेलकर्क येथे लोकर वाहतूक केंद्र उभारले. क्लांडाइक परिसरातील सोन्याच्या शोधामुळे १८९७ – ९८ मध्ये या खोऱ्यास महत्त्व होते. त्यावेळीच काही सुविधा झाल्या आहेत. येथे सामन मासे मोठ्या प्रमाणात असून मासेमारी हा येथील लोकांचा एक प्रमुख व्यवसाय आहे. नदीकाठी व्हाइटहॉर्स, डॉसन, फोर्ट सेलकर्क इ. शहरे वसली आहेत.

गाडे, ना. स.