कोलंबिया -२ : दक्षिण अमेरिकेच्या वायव्य भागातील लोकसत्ताक देश. मुख्य भूमी १२°३०’ उ. ते ४°१३’ द. व ६६°५०’ प. ते ७९°१’ प. कॅरिबियन समुद्रातील सान आंद्रेस आणि प्रॉव्हिडेन्सिया, पॅसिफिकमधील माल्पेलो ही बेटे मिळून क्षेत्रफळ ११,३८,९१४ चौ.किमी. लोकसंख्या २,११,६०,००० (१९७०). सुप्रसिद्ध दर्यावर्दी कोलंबस याच्यावरून या देशाला कोलंबिया हे नाव पडले. याच्या वायव्येस पनामा व कॅरिबियन समुद्र, ईशान्येस व्हेनेझुएला, आग्नेयीस ब्राझील, नैर्ॠत्येस पेरू व एक्वादोर आणि पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. पनामा हद्दीपासून दक्षिणेस सु. १,३०० किमी. पॅसिफिकवर व सु. १,६०० किमी. कॅरिबियन समुद्रावर किनारा आहे. राजधानी बोगोटा येथे आहे.

भूवर्णन : अँडीज पर्वताला या दक्षिणोत्तर जाणाऱ्या तीन शाखा फुटतात. यांची उंची सु. ५,५०० मी. आहे व त्यात वलीभवन झालेल्या स्तरित खडकांखाली स्फटिकमय खडक आहेत. मधली रांग अधिक उंच असून तिच्यात वीला ५,७५० मी. सारखी हिमाच्छादित ज्वालामुखीजन्य शिखरे आहेत. पूर्वेकडील शाखेचे पुन्हा दोन फाटे होऊन ते व्हेनेझुएलामध्ये जातात. उत्तरेकडे एक स्वतंत्र, ग्रॅनाइट खडकांचा, त्रिकोणी डोंगराळ भाग सिएरा नेव्हाडा दे सांता मार्ता नावाचा आहे. त्यातील काही शिखरे ५,८०० मी. पेक्षाजास्त उंचीची आहेत. अगदी पश्चिमेकडे अँडीजचा भाग नसलेली एक कमी उंचीची डोंगरांची रांग उत्तरेकडे पनामापर्यंत गेलेली आहे. उत्तर व नैर्ॠत्ये किनाऱ्यांवर  मैदानी प्रदेश आहेत. पर्वतमय प्रदेशात खचदऱ्या व पर्वतांतर्गत पठारे आहेत. अँडीजच्या पूर्वेकडील भाग काही डोंगराळ, काही पठारी व काही मैदानी स्वरूपाचा आहे. उंचसखलपणाच्या दृष्टीने अत्यंत विषम व अत्यंत वैचित्र्यपूर्ण असा हा देश आहे.

डोंगरांच्या रांगारांगांमधून उत्तरेकडे वाहणाऱ्या आत्रातो, कौका व मॅग्डालीना या प्रमुख नद्या आहेत. त्या कॅरिबियन समुद्राला मिळतात. कौका १,०२५ किमी. व मॅग्डालीना १,५५४ किमी. लांब असून त्या बऱ्याच उपनद्यांचे पाणी घेऊन उत्तरेकडील मैदानी प्रदेशात एकमेकींस मिळतात. सांगह्वान व पातीआ या पश्चिमेकडे वाहत जाऊन पॅसिफिक महासागराला मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. पूर्वेकडे वाहणाऱ्या काही नद्या पुढे ओरिनोको नदीला व काही नद्या पुढे ॲमेझॉन नदीला मिळतात. कोलंबियाच्या अगदी दक्षिण सरहद्दीवरून ॲमेझॉन नदी जाते. पेरू-कोलंबिया सीमेवरील पूतूमायो–ॲमेझॉनला मिळते.

तपमानात उंचीमुळेच काय तो फरक पडतो. पावसाच्या कमीजास्त प्रमाणानुसार ऋतू बदलतात. समुद्रसपाटी ते १,१०० मी. पर्यंत तपमान ३७°-३८° से. पासून २९° से. ते २४° से. पर्यंत उतरते. त्यापुढे २,००० मी. पर्यंत ते १८° से. पर्यंत खाली येते व ३,००० मी. उंचीवर ते १३° से. होते. त्याहीपेक्षा अधिक उंचीवर ते ०° से.च्याही खाली जाते. उत्तुंग पर्वतशिखरे सदैव हिमाच्छादित असतात. बोगोटा ही राजधानी २,६४० मी. उंचीवर असून तेथे सरासरी तपमान १४° से. असते. पश्चिम किनाऱ्यावर व पर्वतमय भागात पाऊस खूप पडतो. बोगोटा येथे एप्रिल ते जून ऑक्टोबर ते डिसेंबर जास्त पाऊस पडतो. उत्तरेकडील प्रदेशात मे ते ऑक्टोबर पाऊस पडतो. देशातून विषुववृत्त जात असल्यामुळे पाऊस वर्षभर असतो. पूर्वेकडील भागात हवामान अधिक उष्ण व अधिक आर्द्र असते. उंचसखलपणाप्रमाणे हवामानाच्या बाबतीतही हा देश वैचित्र्यपूर्ण आहे.

येथील वनस्पतींचे सात हजारांहून अधिक प्रकार माहीत झालेले आहेत. पश्चिम किनाऱ्याच्या भागात व आग्नेयीकडील ॲमेझॉनच्या खोऱ्याकडे उतरत जाणाऱ्या भागात विषुववृत्तीय जंगले आहेत. उत्तरेकडील मैदानी प्रदेश व पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडील प्रदेश येथे विरळ अरण्ये व गवताळ भाग आहेत. पूर्वेकडील व्हेनेझुएला व ब्राझीलमध्ये गेलेल्या सॅव्हाना प्रकारच्या गवताळ भागास ‘लानोज’ म्हणतात. पर्वतमय प्रदेशाच्या दऱ्याखोऱ्यांत दाट जंगल असते, तर पर्वतांच्या उंच भागात हिमरेषेच्या खालच्या प्रदेशात डोंगरी गवताचा पॅरामो नावाचा प्रदेश आहे. आंबे, केळी, संत्री, मोसंबी व काकडीच्या वर्गातील फळे होतात. ॲव्होकॅडो हे फळ विशेष प्रसिद्ध आहे. अगदी उंच भाग सोडून सर्वत्र अनेक प्रकारचे ताडवृक्ष दिसतात औषधी वनस्पती व कपोक वृक्ष– शेवरीसारखा कापूस देणारे झाड– आढळतात.

प्यूमा, जॉगर, तापीर, पेक्कारी, कापीबारा हे विशिष्ट विषुववृत्तीय प्राणी, विविध प्रकारची माकडे, अस्वले, हरणे, छोट्या गुणगुणणाऱ्या पक्ष्यांपासून ते उंच पर्वतांच्या प्रदेशातील मोठ्या काँडॉरपर्यंत शेकडो प्रकारचे पक्षी, कासवे, सरडे, सर्प, मासे, सुसरी, अनेक प्रकारचे कीटक असे प्राण्यांचेही हजारो प्रकार या देशात आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : सु. ७,००० वर्षांपूर्वी येथे टोळ्या करून राहणाऱ्या लोकांची वस्ती होती. पंधराव्या शतकात चिब्चा संस्कृतीच्या शेती व व्यापार करणाऱ्या लोकांची वस्ती पर्वतमय प्रदेशात होती. १५३८ मध्ये हिमेनेस दकेसादा याने येथे स्पॅनिश सत्ता स्थापन केली. स्पेनला येथून सोने, पाचू व तंबाखू मिळे. येथील लोकांत राजकारण व व्यापार यांत असलेली बंदी व डोईजड कर आकारणी यांमुळे असंतोष वाढला. शेवटी २० जुलै १८१० रोजी स्पॅनिश सत्तेविरुद्ध कोलंबियाच्या लोकांनी स्वातंत्र्याची घोषण केली. स्पॅनिश सत्तेने लष्करी बळाने स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु बॉइआकाच्या लढाईनंतर ७ ऑगस्ट १८१९ रोजी स्वातंत्र्य प्रस्थापित झाले. तेव्हापासून काँझर्व्हेटिव्ह व लिबरल हे दोन पक्ष आहेत. काँझर्व्हेटिव्‍ह पक्षाचे धोरण, प्रबळ केंद्रीय सत्ता व कॅथलिक चर्चचे वर्चस्व यांस पाठींबा देणारे, तर लिबरल पक्षाला प्रांतिक स्वायत्तता आणि धर्म व राजकारण यांची फारकत हवी असे. कोलंबियाचामुक्तिवीर बोलिव्हार याचे ध्येय म्हणजे ग्रेटर कोलंबिया नावाचे कोलंबिया, व्हेनेझुएला, एक्कादोरव पनामा यांचे संयुक्त राज्य परंतु ते टिकले नाही. १८२९नंतर कोलंबियाचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले परंतु सुरुवातीला बरीच अस्थिरता होती. १८३२ ते १८३६ पर्यंत अध्यक्ष असलेला पाउला सांतांदेर (१७९२–१८४०) याने राजकीय व आर्थिक घडी बसविली. तरीही पुढील काळात मधूनमधून हुकूमशाही व अंतर्गत यादवी चालूच राहिली. १८८६ मध्ये प्रजासत्ताकाची घटना मंजूर होऊन काँझर्व्हेटिव्ह पक्ष अधिकारावर आला. १९०३ मध्ये पनामामधील काही भूभाग संयुक्त संस्थानांस देण्यात कोलंबियाने मान्यता दिली नाही. तेव्हा संयुक्त संस्थानांच्या पाठिंब्याने तेथील लोकांनी उठाव केला. तो यशस्वी होऊन तो भूभाग कोलंबियाने गमावला. दोन्ही पक्ष आलटून  पालटून अधिकारावर येत. परदेशी भांडवल व कॉफीचा यशस्वी व्यापार यांमुळेसुद्धा सामान्य माणसाचे जीवनमान सुधारले नाही. १९३० च्या मंदीचा फायदा मिळून लिबरल पक्षाच्या हाती सत्ता आली. परंतु आपसांतील फुटीमुळे १९४६ मध्ये त्यांनी ती गमावली. १९४८ मध्ये लिबरल पुढारी जॉर्ज एलीकार गैतान यांचा खून झाला आणि त्यानंतरच्या दहा वर्षांत यादवी, हुकूमशाही, लष्करी कायदा यांच्या धुमश्चक्रीत सु. एक लाख लोक मारले गेले. जनरल गुस्ताव रोजास पिनिल्ला याच्याकडून लष्करी सत्ता लॉरिआनो गोमेस याजकडे गेली. त्याच्या हुकूमशाही कारकिर्दीत चुकीची भांडवल गुंतवणूक, कर्जे, लाचलुचपत यांमुळे देश कर्जबाजारी झाला. तेव्हा मे १९५७ मध्ये काँझर्व्हेटिव्ह आणि लिबरल या दोन्ही पक्षांनी एकमताने लष्करी गटाच्या साहाय्याने सत्ता संपादन केली व मे १९५८ मध्ये आल्बेर्तो लेरास कामार्गो हा लिबरल पुढारी अध्यक्ष झाला. लष्करी कायदा समाप्त होऊन दोन्ही पक्षांत समझोता होऊन सोळा वर्षांचा करार झाला. त्याचप्रमाणे १९७४ पर्यंत काँग्रेस, मंत्रिमंडळ व इतर सत्तास्थाने यांत दोन्ही पक्षांचे  सारखे प्रतिनिधी असावेत व अध्यक्षपद आलटून पालटून दोन्ही पक्षांकडे असावे असे ठरले आहे. १९६२ मध्ये काँझर्व्हेटिव्ह पक्षाचा डॉ. गिलेर्मो लिआँ व्हॅलेन्शिया, १९६६ मध्ये डॉ. कार्लोस लेरास रेस्ट्रेपो–लिबरल, १९७० मध्ये डॉ. मिसेल पास्त्राना बोरेरो –काँझर्व्हेटिव्ह हे अध्यक्ष झाले.


कोलंबिया संयुक्त राष्ट्रांचा सभासद असून कोरियन युद्ध व सुएझ कालवा प्रश्न यांत भाग घेतलेला तो एकमेव लॅटिन अमेरिकन देश आहे. कोरियन युद्धाच्या वेळी १,००० कोलंबियन सैनिकांचे एक पथक सतत कामावर होते. यूरोपीयांचे स्थलांतर, कॉफी संघटना, शेती उद्योग संघटना, कापूस सल्लागार मंडळ, लोकर अभ्यास मंडळ इ. अनेक आंतरशासकीय बाबतींत कोलंबियाने भाग घेतलेला आहे. १९४६ मध्ये कोलंबिया, एक्कादोर, व्हेनेझुएला यांनी जहाजवाहतुकीसाठी संयुक्तपणे ‘ग्रँड कोलंबियन मर्चंट फ्लीट’ ही जलवाहतूक संघटना स्थापन केली. पुढे व्हेनेझुएला त्यातून बाहेर पडला. परंतु संघटनेचे काम चालूच राहिले. संयुक्त संस्थानांत निर्यात होणाऱ्या कॉफीचा ३६ टक्के भाग या व्यवस्थेखालीच वाहून नेला जातो.

चार वर्षांसाठी निवडलेल्या २०४ सभासदांचे लोकप्रतिनिधिगृह, १०६ सभासदांची सीनेट अशी दोन विधिमंडळे असलेली काँग्रेस आणि चार वर्षांसाठी निवडलेला अध्यक्ष असतो. १९६८ च्या संविधान दुरुस्तीप्रमाणे १९७४ पासून ९० सभासदांची सीनेट आणि १६२ सभासदांचे प्रतिनिधिगृह राहील. यापुढे कायदा पास होण्यास दोनतृतीयांश ऐवजी नुसते बहुमत चालेल. तसेच अधिकारांच्या जागांचे दोन्ही पक्षांतील समान वाटप हळूहळू कमी होईल. दर दोन वर्षांनी काँग्रेस पर्यायी अध्यक्ष निवडते. तो अध्यक्षाच्या अनुपस्थितीत काम पाहतो. कार्यकारी सत्ता, अध्यक्ष, मंत्रिमंडळ व खातेप्रमुख यांच्याकडे असते. कारभारविषयक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी सल्लागारी स्वरूपाचे कौन्सिल ऑफ स्टेट व काँग्रेसने निवडलेला कंट्रोलर जनरल असतो. २१ वर्षांवरील लोकांस मताधिकार असतो. १९५४ मध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.

कोलंबियाची २० डिपार्टमेंट्स, ३ इंटेंडेन्सीज आणि ५ कॉमिसरीज आहेत. इंटेंडेन्सी व कॉमिसरी हे अविकसित भाग असतात. त्यांचा प्रमुख अध्यक्षाने नेमलेला असतो. तो सर्व कारभार पाहतो. एखाद्या भागास डिपार्टमेंटचा दर्जा मिळण्यासाठी २,५०,००० लोकसंख्या, ५,००,००० डॉलर उत्पन्न आणि काँग्रेसची मान्यता लागते. प्रत्येक डिपार्टमेंटची ४०,००० लोकसंख्येला एक याप्रमाणे निवडलेल्या लोकप्रतिनिधींची असेंब्ली असते. तिच्यावर निवडलेला गव्हर्नर असतो. त्याच्यावर आर्थिक व कारभारविषयक जबाबदारी असते. डिपार्टमेंट म्युनिसिपल विभाग करू शकते व त्यांच्या कारभाराच्या कायदेशीरपणावर लक्ष ठेवते. प्रत्येक म्युनिसिपालिटीचे लोकनियुक्त प्रतिनिधिमंडळ असते. म्युनिसिपालिटीचा मेयर गव्हर्नरचा प्रतिनिधी असतो.

प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक उच्च न्यायालय आहे. न्याय विभागात अनेक खालची कोर्टे असून दिवाणी, फौजदारी, सर्वसाधारण कारभार व श्रमिकांचे प्रश्न, असे न्यायालयांचे चार भाग असतात. त्याशिवाय खास श्रमिकांची कोर्टे आहेत. फौजदारी कामात ज्यूरीची पद्धत आहे. मृत्युदंड नाही. जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे वीस वर्षे कारावास. बोगोटा येथे वीस न्यायाधीशांचे सर्वोच्चन्यायालय आहे. अपिले, घटनेचा अर्थ, चौकशीमंडळे इ. कामे ते पाहते. विवाहित स्त्रियांना मालमत्तेचे पूर्ण अधिकार असून लग्नानंतरच्या जिंदगीत हिस्सा असतो.

भूदल, नौदल, हवाईदल व राष्ट्रीय पोलीस यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी असते. प्रत्येक पुरुष नागरिकास १८ ते ३० वयांच्या दरम्यान एक वर्ष सक्तीची लष्करी नोकरी करावी लागते. त्यानंतर ४५ वर्षे वयापर्यंत प्रत्येक पुरुष नागरिक राखीव दलात असतो. ५०,००० खडे सैन्य ३० लाखांचे राखीव दल ३५,००० पोलीस ६० लहान-मोठ्या बोटी, ७०० अधिकारी व ८,००० नौसैनिक यांचे छोटेसे आरमार १७५ विमानांचे व ६,००० हवाई सैनिकांचे हवाईदल आहे.

आर्थिक स्थिती : अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे. १९६९ मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा ३० टक्के भाग शेती उत्पन्नाचा, १९टक्के औद्योगिक उत्पन्नाचा, १६ टक्के व्यापार, ६ टक्के वाहतूक व इतर २९टक्के होता. भारी उद्योगधंदे थोडे आहेत. भारी परदेशी कर्जे आणि परकी चलननिधीचा ऱ्हास हे मुख्य आर्थिक प्रश्न आहेत. प्रेसिडेंट लेरासच्या कारकिर्दीत सुरू झालेले काटकसरीचे धोरण यशस्वी होत आहे. खासगी क्षेत्रास व नव्या उद्योगांस प्रोत्साहन दिले जाते. मीठ, पाचू, दारू या  सरकारी मक्तेदाऱ्या आहेत. कॉफी उत्पन्नावर कमी अवलंबून राहता यावे आणि इतर शेती व औद्योगिक उत्पन्न वाढावे, असे धोरण आहे. आयात ५० टक्के कमी करून व काटकसरीचे धोरण आखून परकीय कर्जातून मुक्त होण्याचे धोरण आहे.

सु. २·५ दशलक्ष हे. जमीन शेतीखाली आहे. सखल भागातील जमीन गाळाची आणि काही ठिकाणी दलदलीची आहे. २,५०० ते ३,५०० मी. उंचीवरील जमीन त्या मानाने कमी सुपीक, पांढुरक्या रंगाची आहे. पाऊस व जंगलतोड यांमुळे जमिनीची धूप फार झालेली आहे. १,००० ते २,००० मी. उंचीवरील तांबूस पिवळी जमीन बरीच सुपीक आहे. सखल भागात तांदूळ, ऊस, केळी, कापूस आणि कोको ही मुख्य पिके आहेत. पॅनेला ही गूळ किंवा खांडसरीसारखी कच्ची साखर देशातच खपते. उंच प्रदेशात कापूस, तंबाखू, घेवडे व त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात कॉफी व मका होतो. त्यापेक्षा उंच भागात गहू, बटाटे व बार्ली ही पिके होतात. काही ठिकाणी अगदी प्राथमिक प्रकारची शेती होते. काही मोठ्या शेतांवर आता यंत्रे वापरात येऊ लागली आहेत. १९६१ मध्ये १५,००० ट्रॅक्टर वापरात होते. शेती सुधारणा नियोजन कार्यक्रमाप्रमाणे १९६२ ते १९६६पर्यंत १६ लक्ष हे. जमिनीवर ५०,००० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. कॉफीचे उत्पादन १९६७ मध्ये ४ लक्ष टनांहून अधिक होते पैकी ३·६५ लक्ष्‍ा टन निर्यात झाली. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलच्या खालोखाल जगात कोलंबियाचा दुसरा क्रमांक आहे. तसेच १९६७ मध्ये ३२·५ कोटींहून अधिक केळी निर्यात झाली.

प्रदेश डोंगराळ असल्यामुळे सिंचाईची व्यवस्था तोकडी आहे. अलीकडे काही नदीप्रकल्प सुरू होत आहेत. देशातील २३·६ टक्के जमीन चराऊ कुरणांखाली आहे. उंचावरील नद्यांची खोरी पशुसंवर्धनासाठी व डोंगर-उतार शेतीसाठी वापरले जातात. १९७० मध्ये १·२४ कोटी गुरे, २५ लक्ष डुकरे व १९६८ मध्ये ११लक्ष घोडे, खेचरे व गाढवे ८·३५७ लक्ष मेंढ्या, ३,१४ कोटी कोंबड्याव बदके होती. गुरांची पैदास हा महत्त्वाचा धंदा आहे. ट्रकमधून गुरांची वाहतूक महाग पडते आणि पायी, डोंगरदऱ्या ओलांडून त्यांना नेण्यात नुकसान होते. म्हणून पैदास केंद्राजवळच कत्तलखाने व मांससंवेष्टनाचे कारखाने होत आहेत. १९६५ मध्ये ११·२ लक्ष चौ. मी. कातडी निर्यातझाली. शहरांजवळ दुग्धव्यवसाय वाढत आहे.

कोळसा व पेट्रोलियम यांचा साठा असला, तरी शक्तिसाधनांची चणचणच आहे. मुख्य शक्ती जलविद्युत् शक्ती हीच आहे. १९७० मध्ये १९ लक्ष किवॉ. वीज उत्पन्न झाली. औष्णिक वीज-उत्पादनही होते. संयुक्त संस्थानांतील टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीच्या धर्तीवर येथे कौका व्हॅली ऑथॉरिटी १९५४ मध्ये स्थापन झाली आहे.

सोने, चांदी, तांबे, शिसे, पारा, मँगॅनीज, पाचू, कोळसा, लोखंड, गंधक व प्लॅटिनम ही खनिजे येथे सापडतात. प्लॅटिनमचा जगातील सर्वांत मोठा साठा या देशात आहे. सीपाकीरा खाणीत व कॅरिबियन समुद्रकाठावरील मिठागारातमीठ मिळते. १९४० मध्ये निघालेल्या पोलादाच्या कारखान्यात १९६३ मध्ये १,२३,००० टन पोलाद तयार झाले. पेट्रोलियम हेसुद्धा येथील महत्त्वाचे खनिज आहे. १९६९ मध्ये १९१ लिटरचे एक अशी ८·४ कोटी पिपे पेट्रोलियम उत्पादन झाले. त्यांपैकी २५ टक्के देशात मुख्यतःबारांग्काव्हेरमेहा येथे शुद्ध झाले. तेल कंपन्या अमेरिकन व ब्रिटिश आहेत. त्यांच्याकडून स्वामित्वशुल्क व कररूपाने देशास पैसा मिळतो. पूतूमायो तेलक्षेत्रातील उत्पादन वाढत आहे.१० मे १९६९ रोजी ओरितो-तूमाको तेलनळ सुरू झाला. तो अँडीज ओलांडून जातो. नैसर्गिक वायूही मिळतो. सांतांदेरमध्ये युरेनियम सापडले आहे.


देशाचा ६० टक्के प्रदेश जंगलांनी भरलेला आहे. परंतु त्यांचा पुरेसा उपयोग होत नाही. शेती, गुरे, कोळसा यांसाठी बरीच जंगले तोडली गेली. लाकूड कापण्याच्या सु. १०० लहानलहान गिरण्या आहेत. सध्या देशांतर्गत उपयोगापुरतेच रबर मिळते. प्लायवुड व कागद यांना उपयुक्त लाकूड पुष्कळ आहे.

समुद्रांत व नद्यांत भरपूर मासे मिळतात. सरोवरांत व धरणांमागील जलसंचयात ट्राउट मासे मिळतात. कॅरिबियन समुद्रात ट्यूना व इतर मासे मिळतात. १९७० मध्ये सु. ५० लक्ष डॉलर किंमतीचे मासे व इतर सागरी अन्नपदार्थ निर्यात झाले.

उद्योगधंदे : १९३० नंतर उद्योगधंद्यांची वाढ होऊ लागली. १९४० नंतर बेटानिया येथील सोडा ॲशचा कारखाना, कोळशाच्या खाणींचे यांत्रिकीकरण व खतांचे उत्पादन सुरू झाले. पास डेल रिओ येथे पोलादाचा नवीन कारखाना सुरू झाला आहे. भारी उद्योगधंद्यांस त्यामुळे चालना मिळाली आहे. मेडलीन, काली आणि बोगोटा ही प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत.

ग्रामीण उद्योगधंदे मुख्यतः अन्न व वस्त्र यांबाबतचेच आहेत. परंतु आधुनिक स्वरूपाचे उद्योगधंदे वाढविण्याचे धोरण आहे. १९५० मध्ये अन्नपदार्थांची प्रक्रिया, तंबाखू, कापड, पादत्राणे, सिमेंट, इतर इमारती सामान, अधातुखनिजे, पेये व काही रासायनिक पदार्थ या धंद्यांबाबत देश बहुतांशी स्वावलंबी झाला.

१९६९ मध्ये एकूण कामगारांपैकी ५०% शेतीवर, १६% कारखान्यांत व खाणींत आणि ४% व्यापारात, ३·५% सार्वजनिक सेवेत, २६·५% नोकरी व इतर व्यवसायांत होते. १९५५मध्ये ४,०८,५६८कामगार संघटनांचे सभासद होते. सार्वजनकि सेवा खात्यांव्यतिरिक्त इतरांस संपाचा अधिकार आहे. कामाचे तास रोजचे ८ व आठवड्याचे ४८ असतात शेती, गुरांची पैदास, अरण्ये यांबाबत मात्र ते अनुक्रमे ९ व ५४ असतात. जादा कामाचा भत्ता, वार्षिक सुट्टी, आजारीपण यांची तरतूद आहे. सामाजिक सुरक्षिततेसाठी मालक ५०% आणि कामगार व शासन प्रत्येकी २५% भार उचलतात. आठ लक्ष पेसोंपेक्षा अधिक भांडवलाच्या उद्योगधंद्यांतील कामगारांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा आणि २०वर्षांच्या नोकरीनंतर ५५व्या वर्षी निवृत्त होणाऱ्यास निवृत्तवेतन या गोष्टी आवश्यक आहेत.

बारांगकिया, मेडलीन, काली व बोगोटा ही अंतर्गत व्यापाराची केंद्रे आहेत. परकी व्यापाऱ्यांना काही बाबी सोडून सारख्याच सवलती आहेत. शहरांतून साखळी पद्धतीची मोठी दुकाने व सुपरमार्केट्‌स वाढत असले, तरी स्थानिक शेतकऱ्यांचा बाजार हाच अद्याप महत्त्वाचा आहे. परदेशी व्यापारात १९६३  मध्ये कॉफी, पेट्रोल, केळी, जळणतेल, साखर, तंबाखू, प्लॅटिनम या महत्त्वाच्या निर्यात वस्तू होत्या तर यंत्रे, वाहने, ट्रॅक्टर, धातू, कापड, रबर, रासायनिक पदार्थ व गहू हे महत्त्वाचे आयात पदार्थ होते. तेथील कॉफी, ब्राझील कॉफीपेक्षा महाग विकली जाते. आयात–निर्यात व्यापार मुख्यतःसंयुक्त संस्थानांबरोबर होतो. जर्मनी, ब्रिटन, नेदर्लंड्स, कॅनडा, फ्रान्स, बेल्जियम, लक्सेंबर्ग वगैरे देशांशीही व्यापार होतो. १९६७ मध्ये आयात, अमेरिका ४५%, प.जर्मनी १०%, ब्रिटन ७% झाली व निर्यात, अमेरिका ४४%, प.जर्मनी १३%, नेदर्लंड्स ७% झाली.

१९५४ पर्यंत ठीक असलेल्या व्यवहारशेषात पुढील दोन वर्षे तूट झाली. ती कर्जे, सोने,परकीय चलनसाठा यांनी भरून काढली. १९५८ पासून स्वावलंबनाचे आणि काटकसरीचे धोरण जारी झाले. चैनीच्या वस्तूंच्या आयातीस बंदी, काही आयातीस खास परवाने व काही खुली आयात असे धोरण आहे. तथापि कॉफीच्या किंमतीवरच आर्थिक स्थैर्य अवलंबून असते.

राज्याची मुख्य बँक १९२३ साली स्थापन झाली असून इतर व्यापारी बँका व गहाण व्यवहार बँका आहेत. व्यापारी बँकाना १५% भांडवल मुख्य बँकेच्या भागांमध्ये गुंतवावे लागते. पेसोची /ने घसरलेली किंमत या मुख्य बँकेने १९५८मध्ये सावरली. पेसो हे येथील मुख्य नाणे आहे. पेसोचा /१०० भाग म्हणजे सेंटाव्हो. आंतरराष्ट्रीय नाणे निधीने १पेसो = अमेरिकेचे ५१·२८२ सेंट, असा विनिमयदर ठरविला आहे. १९७० साली खुला दर १अमेरिकन डॉलर = १७·४० पेसो व १ पौंड स्टर्लिंग = ४१·५० पेसो होता.

येथील ५६ विमा कंपन्यांपैकी २९ कोलंबियन आहेत. परकी कंपन्यांबाबत भेदभाव नाही तथापि कोलंबियन कंपन्यांचे काम वाढते आहे. मोठ्या उद्योगधंद्यांना कामगारविमा सक्तीचा आहे.

देशाच्या उंचसखल रचनेमुळे वाहतुकीचा प्रश्न अवघड होऊन बसला आहे. वाहतुकीच्या सोयी वाढतील तसतशी देशाची प्रगती होईल. ७२० मी. लांबीचा जगातील सर्वांत लांब दोरमार्ग (रोप वे) या देशात आहे. १९६९ मध्ये रेल्वे ३,४८३ किमी., १९६७ मध्ये मोठे रस्ते ४५,००० किमी. व मोटारी २,५६,८२३ होत्या. नद्यांतून होणारी वाहतूक महत्त्वाची आहे. मॅग्डालीना नदी मुखापासून १,४५० किमी. पर्यंत जलमार्ग म्हणून उपयोगी आहे. विमानवाहतूक विशेष महत्त्वाची आहे. उंचावरील प्रदेशाचे सखल प्रदेशाशी सुलभ दळणवळण विमानांनीच होते. व्यापारी विमानवाहतूक पश्चिम गोलार्धात सुरू करणारा कोलंबिया हा पहिला देश होय. बारांगकिया येथे मोठा व सुसज्ज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तेथून अवघ्या दीड तासात बोगोटा या राजधानीला जाता येते. कॅरिबियन समुद्रावर सांता मार्ता, बारांगकियाव कार्ताजीना आणि पॅसिफिकवर ब्वेनाव्हेंतुरा ही प्रमुख बंदरे आहेत. टपाल, तार व दूरध्वनी खेड्यापर्यंत पोहोचले आहेत. १९६८ साली ७,३४,७५५ दूरध्वनियंत्रे होती. १९६८ मध्ये २२३ प्रक्षेपणकेंद्रांपैकी १०० खासगी होती २२ लक्ष रेडिओ आणि ४,००,००० दूरचित्रवाणी यंत्रे होती. दूरचित्रवाणी सरकारीआहे.

लोक व समाजजीवन : लोकसंख्येपैकी सु. ६८ टक्के लोक मेस्तिझो (मिश्र वंशाचे), २० टक्के गोरे, ५ टक्के निग्रो व ७ टक्के इंडियो आहेत. ४० टक्के लोक उष्ण भागात, ३६ टक्के समशीतोष्ण भागात व २४ टक्के थंड भागात राहतात. देशात धर्मस्वातंत्र्य आहे. ९६ टक्के लोक कॅथलिक आहेत. उंच भागात राहणारे व सखल भागात राहणारे यांच्यात एक प्रकारची तेढ आहे. ती दळणवळण जसजसे वाढत आहेत तसतशी कमी होत आहे. शेतीसाठी जमीन मिळत असूनही, येथे बाहेरून थोडेच लोक येतात व येथील थाेडेच लोक देशांतर करून बाहेर जातात.

सार्वजनिक आरोग्य खालच्या दर्जाचे आहे. हिवताप, पीतज्वर, मुदतीचे ताप, आतड्याचे विकार मोठ्याप्रमाणावर आहेत. अपुरे पोषण हे मुख्य कारण आहे. गॉइटर, स्कर्व्ही, पंडुरोग, पेलाग्रा, श्वसनेंद्रियांचे रोग, गुप्तरोग, हुकवर्म इ. रोगांचा प्रसार आढळतो. रॉकफेलर फौंडेशनच्या मदतीने बराच उपयोग झाला आहे. मोठ्याशहरांखेरीज साफसफाई, घाण व मैला यांचा निकाल, पाणीपुरवठा यांच्या सोयी समाधानकारक नाहीत. वैद्यकीय सोयी अपुऱ्या आहेत. रुग्णालये सुसज्ज नाहीत. १,००० लोकांमागे ३खाटा आहेत. १९६८ मध्ये ६४१ रुग्णालये व वैद्यकीय केंद्र असून ३९,५५८ खाटा होत्या. आरोग्य खात्यातर्फे आरोग्यसंवर्धनाची मोहीम आखण्यात आली आहे. आरोग्य व प्रसूतिविमा, अपघात व दुबळेपण विमा, निवृत्तिवेतन इ. योजना आहेत. मजुरांसाठी मालकांनी नुकसानभरपाई, अव्यावसायिक अपघाताचा विमा, वार्धक्यवेतन इ. सोयी करावयाच्या असतात.


भाषा-साहित्य इत्यादी : मुख्य भाषा  स्पॅनिश आहे. दक्षिण अमेरिकेत येथील स्पॅनिश भाषा सर्वात शुद्ध समजली जाते. जॉर्ज आयझाक्स (१८३७–९५) व होसे रिवेरा (१८८०–१९२९) हे येथील प्रसिद्ध कादंबरीकार, तर कारो (१८१७–५३), आर्बोलेदा (१८१४–९२), होसेसिल्व्हा (१८६५–९६), व्हॅलेन्शिया (१८७३–१९४५) हे प्रसिद्ध कवी होत. विविध विषयांच्या अकादमी येथे असून संगीत, नृत्य, कला इ. क्षेत्रांत आज देशात अनेक लोक पुढे आलेले आहेत. १५६ सार्वजनिक व ३७ खासगी ग्रंथालये आहेत. बोगोटा येथील राष्ट्रीय ग्रंथालयात अडीच लाखांहून अधिक ग्रंथ आहेत. ३८ विद्यापीठांच्या ग्रंथालयात ४,०७,००० ग्रंथ आहेत. राष्ट्रीय संग्रहालयात इतिहास व कलाविषयक संग्रह आहे. दगडांवरील कोरीव काम, सोने, कापड, चिनी मातीची भांडी इत्यादींच्या कलावस्तूंची संग्रहालये आहेत. वृत्तपत्रांना शांततेच्या काळात स्वातंत्र्य आहे. वृत्तनियंत्रण क्वचित होते. वृत्तपत्रव्यसवसाय मोठा असून लोकमताचा आविष्कार करण्याचे ते महत्त्वाचे साधन आहे. प्रत्येक शहरी निदान एक दैनिक निघते. एल्‌तिएंपो हे उदारमतवादी धोरणाचे व एल्‌सिगलो हे पुराणमतवादी धोरणाचे वजनदार मुखपत्र आहे. दर हजार लोकांमागे ४० वृत्तपत्रे वाचली जातात. १९७० साली येथे ३९ दैनिके व ३२७ नियतकालिके होती.

देशात शिक्षण मोफत आहे, परंतु सक्तीचे नाही. शिक्षणाच्या सोयी मर्यादित आहेत. निरक्षरतेचे प्रमाण ३७ टक्के आहे. १९६६ अखेर २६,१७२ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतून ८९,०९६ शिक्षक व २७,६८,७७६ विद्यार्थी होते. १,१४६ किंडरगार्टन शाळांत २,३९० शिक्षक व ४९,७०४ विद्यार्थी १९४ रात्रीच्या शाळांत १,४७६ शिक्षक व १२,९२६ विद्यार्थी ३५६ शिक्षक-प्रशिक्षण  शाळांत ४७८ शिक्षक व ६६,०१० विद्यार्थी ११९ औद्योगिक शाळांत १,१८७ शिक्षक व २१,३९७ विद्यार्थी २६ कलाविद्यालयांत २८४ शिक्षक व ४,६०३विद्यार्थी ६२ शेतकी शाळांत ४१२ शिक्षक व ४,७७२ विद्यार्थी होते. बोगोटा येथील राष्ट्रीय विद्यापीठ १५७२ मध्ये स्थापन झाले. याशिवाय येथे २९ विद्यापीठे आहेत. त्यांत १९६८ मध्ये ८,९१८ शिक्षक व ६२,८४४ विद्यार्थी होते. शासनातर्फे प्राथमिक शाळा चालविल्या जातात आणि माध्यमिक शाळा व विद्यापीठे यांस मदत दिली जाते. कॅथलिक चर्चतर्फे प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये चालविली जातात. सार्वजनिक शिक्षण रोमन कॅथलिक चर्चच्या सिद्धांतांशी सुसंगत असले पाहिजे, अशी घटनेत तरतूद आहे. तथापि प्रॉटेस्टंट पंथाच्या व खासगी शाळांत शिक्षणस्वातंत्र्य आहे. युनेस्कोच्या  मदतीने शिक्षणाची सार्वत्रिक पुनर्घटना होत आहे.

कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन केंद्रांची वाढ झपाट्याने होत आहे. पासपोर्ट व व्हिसा सर्वांस आवश्यक असतात. संयुक्त संस्थानांतील प्रवाशांस विशेष सवलती आहेत. बोगोटा हे राजधानी व सांस्कृतिक केंद्र मेडलीन कॉफी, खाणी व औद्योगिक केंद्र काली साखर व औद्योगिक केंद्र बारांगकिया मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ व उत्तम बंदर कार्ताजीना तेलनळांचे शेवटचे ठिकाण, औद्योगिक केंद्र बूकारामांगा तंबाखू व कॉफी केंद्र कुकुटा कॉफी व औद्योगिक केंद्र आणि ब्वेनाव्हेंतुरा हे पॅसिफिकवरील मुख्य बंदर आहे. कोलंबियाच्या वसाहती नाहीत. नऊ इंटेंडेन्सीज व कॉमिसरीजपैकी सात विषुववृत्तीय अरण्यांच्या भागात व गवताळ प्रदेशात आहेत. दाट अरण्ये, खूप पाऊस, उष्ण हवा यांमुळे येथील लोकवस्ती विरळ व मागासलेली आहे. रस्ते नाहीत. होड्यांतून वाहतूक चालते. काही भाग अद्याप अज्ञात आहेत. आता विमाने या भागात जातात. डोंगराजवळच्या मैदानात गुरे चरतात. ग्वाहीरा हे कॅरिबियनमधील द्वीपकल्प उष्ण व रूक्ष आहे. सान आंद्रेस व प्रॉव्हिडेन्सिया या द्वीपसमूहांवर निग्रोंची वस्ती आहे. कोलंबियाचा सर्वात दाट वस्तीचा हा भाग आहे. येथे स्पॅनिश व इंग्रजी या भाषा चालतात. केळी, नारळ, ॲव्होकॅडो, कोको, संत्री ही उत्पन्ने आहेत. आठवड्याच्या विमानवाहतुकीने मुख्य भूमीशी संबंध राखला जातो. पॅसिफिकमधील माल्पेलो बेटही कोलंबियाचे आहे. 

संदर्भ : 1. Carlson, Fred A. Geography of Latin America, Englewood Cliffs, (N.J.), 1969.

    2. James, Preston, E. Latin America, New York, 1959.

    3. Robinson, H. Latin America, London 1965.

कुमठेकर, ज.ब.

कोलंबिया