कडप्पा : आंध्र प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे व तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ६६,१९५ (१९७१). हे दक्षिण रेल्वेवर, मद्रासच्या वायव्येस २५७ किमी. आहे. कडप्पा म्हणजे तेलुगू भाषेत दरवाजा. या शब्दावरून तिरुपतीस येण्याचे उत्तरेकडील महाद्वार या अर्थी हे नाव पडले असावे. गावात बरीच मुसलमान वस्ती आहे. गोवळकोंड्याच्या सुभेदाराने येथील किल्ला सोळाव्या शतकात बांधला होता. अठराव्या शतकात पठाण नबाबाच्या ताब्यातील ही जहागीर निजाम-मराठे-हैदर यांच्या झगड्यात सापडली होती. अखेर १८०० मध्ये निजामाने हा जिल्हा इंग्रजांना दिला. पेन्नार नदीच्य दक्षिणेस काही किमी. अंतरावर तिन्ही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या आणि पाटाच्या पाण्यांनी भिजलेली शेते भोवती असलेल्या, या ठिकाणची हवा अतिउष्ण आहे. पश्चिमेकडील तालुक्यातील शेंगदाणा व कापूस आणि मोसमात पेन्नार नदीकाठची टरबुजे, मोसंबी इत्यादींचा व्यापार येथे चालतो. जिल्ह्यात बॅराइट ॲसबेस्टॉस मिळत असल्याने शहरात याचे कारखाने आहेत. याशिवाय येथे कापूस गिरणी, लाकूड कापण्याची गिरणी व अनेक अभियांत्रिकी कर्मशाळा आहेत.

ओक, शा. नि.