बूडापेस्ट : नदीकाठावरील संसदभवन व त्याचा परिसर.

बूडापेस्ट : पूर्व यूरोपमधील हंगेरी देशाची राजधानी. लोकसंख्या २०,६०,००० (१९८० अंदाज). हे डॅन्यूबनदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले असून नदी-बंदर म्हणून त्याचप्रमाणे मोक्याच्या स्थानामुळे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. गरम पाण्याचे झरे, आल्हाददायक हवामान यांमुळे पर्यटकांची येथे नेहमी वर्दळ असते.

या शहराच्या परिसरातील मूळ वस्ती नवाश्मयुगातील असावी. रोमनांच्या लोअर पॅनोनीआच्या ‘ॲक्विंकम’ या राजधानीजवळ ‘ओबूडा’ व ‘पेस्ट’ही दोन नगरे होती. मंगोल टोळयांनी ती १२४१ साली उद्‌ध्वस्त केली. तेराव्या शतकात चौथा बेलॉ (कार, १२३५-७०) याने जवळच्या कॅसल हिलवर संरक्षणाच्या दृष्टीने सोयीस्कर असा ‘बूडा किल्ला’ बांधला. त्याच्या आसमंतात बूडा नगर वसले गेले १३६१ मध्ये ते हंगेरीची राजधानी बनले. मथाइअस कॉर्व्हायनसच्या कारकीर्दीत (१४५८-९०) ते उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचले. त्याच सुमारास ओबूडाचे राजकीय महत्व कमीकमी होऊ लागले. पुढे १५४१ मध्ये पेस्ट व बूडा ही दोन्ही शहरे तुर्कांनी काबीज केली. तुर्की अंमलात शहरांची प्रगती खुंटली.१८८६ मध्ये हॅप्सबर्ग घराण्यातील पाचव्या चार्ल्सने बूडापेस्ट जिंकले. अठराव्या शतकात हस्तोद्योग, शेती, व्यापार इत्यादींची वाढ होऊन ओबूडा, बूडा व पेस्ट या शहरांची प्रगती झाली. जलवाहतुकीच्या व लोहमार्गाच्या सुविधांमुळे पेस्ट शहरी उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झाले व १८४८ मध्ये ते हंगेरीची राजधानी बनले. उत्तरोत्तर बूडा, ओबूडा व पेस्ट शहरांचा विकास होतच राहिला. परंतु याच काळात डॅन्यूबच्या महापुरामुळे त्यांची फार मोठी हानी झाली. परिणामतः नदीकाठावरील बूडा व पेस्ट या शहरांना २.७ मी. उंचीच्या संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. १८७२ मध्ये तीनही शहरांचे ‘बूडापेस्ट’ या नावाने एकत्रीकरण करण्यात येऊन ऑस्ट्रो-हंगेरियन राज्याच्या दोन राजधान्यांपैकी एक येथे करण्यात आली.

ऑस्ट्रो-हंगेरियन राज्याचे १९१८ मध्ये विभाजन झाले व काउंट मायकेल कारोल्यी याच्या आधिपत्याखाली हंगेरीची बूडापेस्ट येथे राजधानी करण्यात आली. त्याच्यानंतर बेलॉ कुन याच्या कारकीर्दीत (मार्च-जुलै १९१९) शहराचा ऱ्हास झाला. ॲडमिरल होर्तीने मात्र शहराची सुव्यवस्था व प्रगती यांसाठी विशेष प्रयत्न केले (नोव्हेंबर १९१९-फेब्रुवारी १९४५). दुसऱ्या महायुद्धात बाँब वर्षावामुळे शहराचा ७० टक्के भाग उद्‌ध्वस्त झाला. हंगेरीच्या स्वातंत्र्यानंतर (जानेवारी १९४६) शहराच्या विकासासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले.१९५६ च्या देशातील उठावात शहराची पुन्हा हानी झाली. नंतरच्या काळात शहराची पुनर्रचना करण्यात आली. प्रशासकीय सोयीसाठी शहराचे बावीस विभागात विभाजन केलेले असून त्यांचा कारभार महानगर परिषद व विभागीय समित्या यांमार्फत पाहिला जातो.

डॅन्यूब नदीच्या उजव्या तीरावर गेल्लेर्ट व कॅसल हिल या टेकड्यांवर बूडा, तर त्याच्या उत्तरेस ओबूडा वसलेले आहे. नदीच्या डाव्या तीरावर मैदानी भागात पेस्ट वसलेले आहे. पेस्ट व बूडा यांना जोडणारे आठ पूल आहेत. हंगेरीच्या अर्थव्यवस्थेत बूडापेस्टला अत्यंत महत्व असून औद्योगिक क्षेत्रात काम करणारे बहुसंख्य औद्योगिक कामगार याच शहरात आढळतात. येथील यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिकी, निर्वात अभियांत्रिकी, सुती कापड, विद्युत्‌ सामग्री, रसायने, लोखंड-पोलाद, कातडी वस्तू, अन्नप्रक्रिया इ. उद्योग विकसित झालेले आहेत.

देशाचे प्रमुख सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणूनही बूडापेस्ट प्रसिद्ध आहे. ‘लोरांट अट्‌व्हश’ (१६३५) हे विद्यापीठ, ‘हंगेरियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस’ तसेच ‘अकॅडेमी ऑफ फाइन आर्टस’ यांचे शैक्षणिक व ललित कला क्षेत्रांतील कार्य अनन्यसाधारण आहे. येथील विविध प्रकारच्या नऊ संग्रहालयांपैकी राष्ट्रीय संग्रहालय (१८०२) विशेष उल्लेखनीय आहे. पर्यटकांना आकृष्ट करणाऱ्या गोष्टींत मारीया टेरीसाने बांधलेला बरोक शैलीतील राजवाडा (१८ वे शतक), मथाइअस (१३ वे शतक) व बरोक शैलीतील सेंट ॲना (१८ वे शतक) ही चर्च, कलावीथी, ‘म्यूझीयम ऑफ फाइन आर्टस‘, गॉथिक शैलीतील संसदभवन, स्टेट ऑपेरा हाऊस, सेंट स्टीफन्स कॅथीड्रल, मार्गारेट बेटावरील उद्यान, फिशरमेन्स बॅस्टिऑन, ‘राष्ट्रीय सेचेन्यी ग्रंथालय’ इ. उल्लेखनीय आहेत.

लिमये, दि.ह. गाडे, ना.स.