दूआला : कॅमेरूनमधील महत्त्वाचे बंदर. ते वूरी नदीमुखाशी देशाच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर वसले आहे. लोकवस्ती ४,८५,७९७ (१९७५). सतराव्या शतकाच्या अखेरीस दूआला जमातीचे लोक या भागात आले. १८८४ मध्ये दूआलांचा राजा आणि जर्मन व्यापारी यांच्यात तह होऊन जर्मन कॅमेरून हा संरक्षित विभाग स्थापन झाला. त्याची राजधानी दूआला हीच होती. सुरुवातीला ते राष्ट्रीय व कामगारांच्या चळवळीचे केंद्र होते. देशातील सर्वांत दाट लोकवस्तीचे हे शहर असून लहान–मोठ्या सडकांनी येथून देशाच्या सर्व भागांत जाता येते. हे वूरी नदीवरील १,८०० मी. लांबीच्या पुलामुळे देशातील पश्चिमेकडील भागांशी, विशेषतः बोनाबेरी बंदराशी जोडलेले आहे. येथे दारू, कापड, बांधकाम साहित्य, प्लॅस्टिक, काच, कागद, सायकली तसेच अन्नप्रक्रिया इ. उद्योगधंदे भरभराटीस आले आहेत. देशाचा ९० टक्के सागरी व्यापार या खोल पाण्याच्या बंदरातून चालतो. मच्छीमारीच्या व बोटी दुरुस्त करण्याच्या सोयीही येथे आहेत. १९७० साली सुरू केलेला ट्रान्स–कॅमेरून लोहमार्ग हा मध्य आफ्रिकेतील देशांच्या निर्यात व्यापारास चालना देणारा व या बंदराचे महत्त्व वाढविणारा आहे. येथे विमानतळ असून वाणिज्य, कृषी व औद्योगिक स्वरूपाच्या शिक्षणसंस्था, कापड उद्योगाचे संशोधन केंद्र, मुलींचे महाविद्यालय इ. संस्थाही आहेत. रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट मिशनरी संस्थांचे येथील कार्य उल्लेखनीय आहे.
जाधव, रा. ग.