हुगळी : (भागीरथी-हुगळी) . पश्चिम बंगाल राज्यातील गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशातून वाहणाऱ्या दक्षिणवाहिनी फाट्यास भागीरथी-हुगळी म्हणतात. लांबी ५२० किमी. मुर्शिदाबाद जिल्ह्यात जंगीपूरच्या उत्तरेस ८ किमी.वर धुलिआनजवळ, गंगेपासून हा फाटा अलग होतो. बरद्वानव नदिया या जिल्ह्यांच्या सीमेवरून दक्षिणेस वाहत गेल्यावर याफाट्यास नवद्वीपजवळ पूर्वेकडून जलांगी नदी येऊन मिळते येथपर्यंतचा गंगेचा हा फाटा भागीरथी म्हणून व तेथून पुढील बंगालच्या उपसागरास मिळेपर्यंतचा गंगा नदीचा प्रवाह फाटा हुगळी म्हणून ओळखला जातो.याची लांबी २६० किमी. आहे. 

 

पूर्वी हुगळी नदीकिनारी ओेगला नावाचे गवत वाढत होते. त्यावरून त्याच्या नजीकच्या नदीप्रवाहास ओगोलीया असे म्हणत. त्याचे नंतर ओगली व इंग्रज अमदानीत हुगळी असे नाव झाले. हुगळी नदीकिनारी इतिहासप्रसिद्ध प्लासीची लढाई झाली होती. काही शतकांपूर्वी हुगळीही मुख्य शाखा होती. हिला भागीरथी, जलांगी व मठभंगा या शाखामिळत होत्या. या नदीसमूहाला नदिया असे म्हणत. त्यानंतर भागीरथी मुख्य शाखा झाली. 

 

भागीरथी-हुगळी या गंगा नदीच्या फाट्याचे (१) वरचा भाग, (२) मध्य भाग व (३) खालचा भाग असे तीन भाग केले जातात. 

 

(१) वरचा भाग : गंगेवरील निर्गम बिंदूपासून नवद्वीप गावाजवळील (नदिया जिल्हा) जलांगी नदीसंगमापर्यंतच्या भागाचा यामध्ये समावेश होतो व हा भाग प्रामुख्याने भागीरथी म्हणून ओळखला जातो. 

 

(२) मध्य भाग : जलांगी नदी संगमापासून हुगळी पॉइंटजवळील रूपनारायण नदीसंगमापर्यंतच्या भागाचा यामध्ये समावेश होतो. याभागात हुगळी नदी बरद्वान-नदिया, हुगळी-नदिया, हुगळी-उत्तर चोवीस परगणा, हावडा-उत्तर चोवीस परगणा, हावडा-दक्षिण चोवीस परगणाया जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत रूपनारायण नदीसंगमापर्यंत येते. 

 

या भागात बरद्वान-नदिया या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहताना थोडे अंतर नदिया जिल्ह्यात नदिया गावापर्यंत वाहते. या जिल्ह्यातील समुद्रगड गावाजवळ ती या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर येते. या मध्य भागातहुगळीस खारी, बाघेरवाल, फाल्टासमोर दामोदर व हुगळी पॉइंटसमोर नुरपूरजवळ रूपनारायण या उपनद्या मिळतात. दामोदर व रूपनारायणया नद्यांमुळे हुगळी डायमंड हार्बरपर्यंत पूर्वेकडे विस्तारली आहे. येथे धोकादायक असे फिरते वालुकादंड निर्माण झाले आहेत. 

 

(३) खालचा भाग : हुगळी पॉइंटपासून बंगालच्या उपसागरास मिळेपर्यंतचा प्रवाहाचा भाग यामध्ये समाविष्ट आहे. या भागात हुगळीस कलाई ही उपनदी मिळते. या भागात ही मेदिनापूर-दक्षिण चोवीस परगणा यांच्या सीमेवरून कलकत्ता जिल्ह्यातून वाहते. या भागात हुगळी डायमंड हार्बरनंतर दक्षिणेकडे वळून (बंगालच्या उपसागरास) मिळते. येथे हिच्या मुखास बुढा मंत्रेश्वर म्हणतात. सागरास मिळण्यापूर्वी हिच्या दोन शाखा होतात. मुख्य शाखेला हळदी व दुसऱ्या शाखेस मरीगंगा म्हणतात. हिच्या मुखाजवळ सागर बेट आहे. 

 

भागीरथी-हुगळी हा गंगेचा मुख्य फाटा होता परंतु सतराव्या शतकापासून यामध्ये गाळाचे संचयन होऊन गंगेचे बहुतांश पाणीबांगला देशातील गंगेच्या फाट्यास म्हणजे पद्मा नदीस मिळते. त्यामुळेवर्षभरातील आठ महिने भागीरथी-हुगळी फाट्यास पाणीप्रमाण कमी असे. याप्रमाणे प्रवाहातील पाणी व गाळाचे संचयन यांमुळे कलकत्ता बंदरातील जलवाहतुकीत अडथळा येत होता. यासाठी भारत सरकारने गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील भागीरथी-पद्मा अशा विभाजनपूर्व भागात फराक्का येथे धरण बांधले आहे. या धरणातून भागीरथी-हुगळी नदीत पाणी सोडण्यात येते. त्यामुळे कलकत्ता बंदरातील जलवाहतुकीतील अडथळा दूर झाला आहे. पूर्वीपासून हुगळी नदीस व्यापाराच्या व जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वआहे. हुगळी नदीवर पोर्तुगीज-हुगळी, चाच-चिनसुरा आणि सेरामपूर, फ्रेंच-चंद्रनगर, ऑस्टेंड कंपनी-बंकीपूर, ही व्यापारी ठाणी होती. हुगळीची सामुद्रधुनी रुंद होती. समुद्राचा प्रभाव नदीत १४० किमी.पर्यंत पोहोचत असे. त्यामुळे हुगळी नदीवर अनेक बंदरे होती परंतु पात्रातील बदल, गाळ साचणे यांमुळे त्यातील काही निरुपयोगी झाली. 

 

हुगळीच्या किनारी कोलकाता हे पश्चिम बंगालचे राजधानीचे शहर व प्रसिद्ध बंदर आहे. हुगळी नदीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले असून पश्चिम बंगालमधील दाट लोकवस्तीचा हा भाग आहे. हुगळी नदीवर कोलकाता येथे अनेक पूल बांधण्यात आले असून त्यांपैकी हावडा ब्रिज प्रसिद्ध आहे. हुगळी नदीकाठी नईहाटी, बरकपूर, बेर्‍हमपूर, पनीहाटी, बारानगर, नुरपूर, अगरपारा, बाटानगर, बिर्लापूर, फाल्टा, हावडा, हुगळी-चिनसुरा इ. शहरे वसली आहेत. 

चौधरी, शंकर रामदास गाडे, ना. स.