ग्रेट ब्रिटन : यूरोपातील वायव्येकडील, जागतिक महत्त्वाचा द्वीपरूप देश. क्षेत्रफळ २,२९,८८७ चौ. किमी. एकूण लोकसंख्या ५,३८,२१,३६४ (१९७१). यामध्ये युनायटेड किंग्डमपैकी उत्तर आयर्लंड व प्रत्यक्ष ब्रिटिश राजाच्या अंकित असलेली परंतु आकडेवार माहितीपुरती युनायटेड किंग्डममध्ये धरली जाणारी आइल ऑफ मॅन व चॅनेल आयलंड्स सोडून इंग्लंड, वेल्स व स्कॉटलंड यांचा समावेश होतो. इंग्लंडचे क्षेत्रफळ १,३o,३६o चौ.किमी. व लोकसंख्या ४,५८, ७o,o६२ (१९७१) वेल्सचे अनुक्रमे २o,७६१ चौ. किमी. व २७,२३,५९६ व स्कॉटलंडचे ७८,७६७ चौ.किमी. व ५२,२७,७०६ आहे. शेटलंड, ऑर्कनी, औटर व इनर हेब्रिडीझ आणि किनाऱ्याजवळची इतर लहानमोठी बेटे यांचा समावेश ग्रेट ब्रिटनमध्येच होतो. ग्रेट ब्रिटनच्या दक्षिणेस इंग्लिश खाडी, पश्चिमेस सेंट जार्जची खाडी, आयरिश समुद्र, नॉर्थ चॅनल व अटलांटिक महासागर, उत्तरेस अटलांटिक महासागर व पूर्वेस उत्तर समुद्र आहे. हा देश दक्षिणेस सिली बेटे ४९° ५५’ उ. व उत्तरेस शेटलंड बेटे ६o° २५’ उ. आणि पश्चिमेस हेब्रिडीझमधील बॅरा हेड ७° ३८’ प. व उत्तर समुद्रावरील लोस्टॉफ्ट १° ४६’ पू. यांदरम्यान असून मुख्य भूमीवर याची दक्षिणोत्तर लांबी सु. ९६o किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ५१२ किमी. आहे. स्कॉटलंडच्या मुख्य भूमीवरील अगदी उत्तरेचे टोक डनेट हेड ५८° ४१’ उ. तर इंग्लंडच्या भूमीवरील अगदी दक्षिणेचे टोक लिझार्ड पॉइंट ४९° ५८’ उ. आहे. शून्य अंश रेखावृत इंग्लंडमधील ग्रिनिच येथील जुन्या वेधशाळेवरून जाते. लंडन ही या देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : ग्रेट ब्रिटन हे एक मोठे बेट असून त्याच्या किनाऱ्याजवळ शेकडो लहानमोठी बेटे व द्वीपसमूह आहेत. हा देश प्राचीन काळी यूरोपच्या मुख्य भूमीशी जोडलेला होता परंतु दोहोंमधला प्रदेश खचून सागरमग्न झाल्यामुळे तो अलग झाला. किनारा खूपच दंतुर असून त्यावर अनेक लहानमोठी आखाते व उपसागर तयार झाले आहेत. समुद्राचे चिंचोळे फाटे देशात बरेच आतपर्यंत गेल्यामुळे देशाचा कोणताही भाग समुद्रापासून १२५ किमी.पेक्षा जास्त दूर नाही. स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक फ्योर्ड तयार झालेले आहेत. नद्यांच्या मुखांजवळ विस्तृत व खोल खाड्या बनल्या असून तेथे उपयुक्त बंदरे उदयास आली आहेत. देशात सर्व प्रकारचे खडक आढळून येतात.

इंग्लंडच्या नैर्ऋत्य, पश्चिम व उत्तर भागांत डोंगर असून पूर्व व आग्नेय भाग छोट्या टेकड्या, ऊर्मिल ‘डाउन्स’ व सखल प्रदेश यांचा आहे. पूर्व किनाऱ्यावर काही ठिकाणी जोरदार वारे व मोठी भरती यांमुळे समुद्राचे पाणी आतवर येऊन प्रदेश जलमय होऊ नये, म्हणून संरक्षक भिंती बांधाव्या लागल्या आहेत. उत्तरेकडे टाईन नदीच्या पूर्व-पश्चिम खोऱ्याच्या उत्तरेस, स्कॉटलंडच्या सीमेवर चेव्ह्य डोंगररांग असून तिचे चेव्ह्यट शिखर ८१६ मी. उंच आहे. स्कॉटलंड सीमेपासून मध्य इंग्लंडच्या डर्बीशरपर्यंत पेनाइन श्रेणी दक्षिणोत्तर गेलेली आहे. तिच्या पश्चिमेकडील टेकड्यांचा प्रदेश व अगदी पश्चिमेचा– इंग्लंडमधील स्कॉफेल पाइक हे ९७८ मी.चे सर्वोच्च शिखर असलेला– डोंगराळ प्रदेश यांच्या दरम्यान इंग्लंडच्या वायव्य भागामधील अत्यंत निसर्गरमणीय, पर्वतवेष्टित, स्फूर्तिदायक सर:प्रदेश आहे. पेनाइनच्या दक्षिणेस मध्य इंग्लंडचा मिडलँड हा ऊर्मिल टेकड्यांचा व सखल, सुपीक खोऱ्यांचा मैदानी प्रदेश आहे. नैर्ऋत्य भागात कॉर्नवॉलचे डोंगर आहेत. ३३६ किमी. लांबीची पश्चिमवाहिनी सेव्हर्न व ३३४ किमी. लांबीची आग्नेयवाहिनी टेम्स यांशिवाय हंबर, टाईन, टीझ, ट्‌वीड, आयर, ट्रेंट, वेलंड, ऊझ या पूर्वेकडील ॲव्हन आणि एक्स या दक्षिणवाहिनी व मर्सी ही पश्चिमवाहिनी या इंग्लंडमधील इतर प्रमुख नद्या होत. वेल्स हा डोंगराळ प्रदेश असून त्याच्या दक्षिण व पश्चिम किनाऱ्यावर अरुंद सखल किनारपट्ट्या आहेत. उत्तर किनाऱ्यावरही छोटेछोटे सखल मैदानी प्रदेश असून त्यांत डी नदीचे खोरे आहे. वाय, अस्क, टाउई, टाइव्ही या वेल्समधील इतर नद्या होत. वेल्सचा डोंगराळ भाग बराचसा उजाड असून मौंट स्नोडन हे त्यातील १,o८५ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर होय. वेल्समध्ये शेतजमीन फारशी नाही. स्कॉटलंडचा दक्षिण भाग डोंगराळ असून त्यात रुंद, गोलाकार टेकड्या आहेत. यातून उत्तरेकडे रम्य नद्या वाहतात. स्कॉटलंडचा मध्यवर्ती सखल भाग सु. १५o मी. उंचीचा असून तो क्लाईड, फोर्थ व टे या नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे. याच भागात स्कॉटलंडची ग्लासगो व एडिंबरो ही प्रसिद्ध शहरे आहेत. याच्या उत्तरेस हायलँड हा ग्रॅम्पियन पर्वतप्रदेश असून त्यात ग्रेट ब्रिटनचे सर्वांत उंच बेन नेव्हिस हे १,२२१ मी. उंचीचे शिखर आहे. स्कॉटलंडमध्ये समुद्राचे अरुंद फाटे आतपर्यंत येऊन आणि ‘यू’ दऱ्यांचे खोल भाग पाण्याने भरून जाऊन सुप्रसिद्ध नयनरम्य ‘लॉक’ सरोवरे बनली आहेत. अशा काही दऱ्या– ग्लेन– जोडल्या जाऊन आरपार मार्ग तयार झाले आहेत. ग्रॅम्पियनच्या उत्तरेची नैर्ऋत्य-ईशान्य गेलेली ग्रेट ग्लेन ही यांपैकीच होय. स्कॉटलंडच्या वायव्य भागातही हायलँड हा उंच डोंगराळ भाग आहे. डी, डॉन, स्पे या स्कॉटलंडमधील इतर नद्या होत्त. हेब्रिडीझ बेटे डोंगराळ असून मल बेटावरील बेन मोर शिखर ९५५ मी.उंच आहे.

खनिजे : ग्रेट ब्रिटनचे सर्वांत महत्त्वाचे खनिज म्हणजे कोळसा. त्यामुळेच ब्रिटनमध्ये इतर कोणत्याही देशाच्या आधी सु. २oo वर्षे औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. गेल्या ३oo वर्षांत कोळशाचा साठा संपत आला असला, तरी १९४७ मध्ये कोळसाखाणींचे राष्ट्रीयीकरण व यांत्रिकीकरण करून कोळसा उत्पादन चालू ठेवले आहे. उत्तर समुद्रात ब्रिटनच्या हद्दीत नैसर्गिक वायू व तेल आणि कोळसाही सापडल्याने शक्तिसाधनांबाबत देशाला आधार मिळाला आहे. लोखंड, चिनी व इतर उपयुक्त माती, खडू, चुनखडी, वाळू यांशिवाय ब्रिटनमध्ये कथील, शिसे, जस्त व टंगस्टन यांच्याही खाणी थोड्याफार आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जलविद्युत् उत्पादनाकडेही अधिक लक्ष दिले जात आहे.

हवामान : ग्रेट ब्रिटनच्याच अक्षांशांतील इतर प्रदेशांच्या मानाने ग्रेट ब्रिटनचे हवामान बरेच सौम्य, कमी थंड आहे याचे कारण या देशाजवळून वाहत जाणारा उत्तर अटलांटिक प्रवाह हा गल्फ स्ट्रीमचा फाटा होय. नैर्ऋत्येकडून येणारे वारेही उबदार असतात. ग्रेट ब्रिटनमधील हिवाळ्याचे सरासरी तपमान उत्तरेकडून दक्षिणेकडे ४° से. ते ६° से. असते, तर उन्हाळ्यातील ११·७° से. ते १७·२° से. असते. वार्षिक सरासरी तपमान अगदी दक्षिणेस ११° से. पासून अगदी उत्तरेस ६° से.पर्यंत असते. उन्हाळ्यात २४° से.च्या वर व हिवाळ्यात -५° से.च्या खाली तपमान क्वचितच जाते. ग्रेट ब्रिटनमधील पर्जन्यमानाचे वैशिष्ट्य असे, की वर्षाच्या प्रत्येक महिन्यात थोडा तरी पाऊस पडतोच. काही भागांत फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यांत सर्वांत जास्त पाऊस पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान १oo सेंमी. पेक्षा जास्त असते. इंग्लंडमध्ये ते ८६ सेंमी. असते, तर पश्चिमेकडील व उत्तरेकडील उंच प्रदेशांत ते ३८o सेंमी.पर्यंत जाते. पूर्व व आग्नेय भागांतील सरासरी पर्जन्यमान ६७ सेंमी. असते. चुनखडीच्या प्रदेशात जिरणारे पाणी सोडले, तर वितळणाऱ्या बर्फाचे आणि पावसाचे बहुतेक पाणी वाहून जाते त्यामुळे बहुतेक सर्व प्रदेशाला वाहत्या पाण्याचा भरपूर पुरवठा होतो. तथापि आता वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे व जलविद्युत्‌शक्ती उत्पादन यांमुळे पाण्याचा मुक्त वापर पूर्वीप्रमाणे करणे सुलभ राहिलेले नाही. अटलांटिकवरून येणारी सौम्य आवर्ते या बेटांवरून जात असल्यामुळे हवामानात वारंवार बदल होत राहतो. यामुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रदेशात ज्याप्रमाणे लोकांच्या बोलण्यात नेहमी पावसापाण्याची चौकशी असते, त्याप्रमाणे ग्रेट ब्रिटनमध्ये संभाषणात सहज येणारा विषय हवा हा असतो. कधीकधी यूरोपच्या मुख्य भूमीवरून येथे प्रत्यावर्ते येतात आणि हवा अधिक स्थिर व आल्हादकारक बनते. हिवाळ्यात दिनमान फारच कमी आणि वारंवार पडणारे धुके यांमुळे वातावरण बराच काळ धूसर व कुंद राहते. यामुळे ग्रेट ब्रिटनमध्ये सूर्यप्रकाश हिवाळ्यात अर्धा तास ते दोन तास आणि उन्हाळ्यातही जेमतेम साडेपाच ते आठ तास मिळतो. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला की येथील लोक आनंदाने प्रफुल्लित होतात.

वनस्पती : ग्रेट ब्रिटनची भूमी नैसर्गिक वृक्षांच्या वाढीला फार अनुकूल आहे. येथील सौम्य हवामान व विविध मृदा यांमुळे येथील वनस्पतीही विविध आहेत. पूर्वी सखल प्रदेश ओक वृक्षाच्या अरण्यांनी व्यापलेले असावेत. फक्त पाणथळ दलदलींच्या प्रदेशातच छोटी झुडपे असावीत. तसेच उंच, डोंगराळ प्रदेशात व वालुकायुक्त भागात पाइनची अरण्ये होती. काही भाग ओसाड किंवा पाणथळींचे होते. लागवडीकरिता, विशेषतः सखल भागात, अरण्ये तोडली गेली. तेथे शेतीच्या जोडीला लोकांनी गुरांसाठी व मेंढ्यांसाठी उत्तम कुरणेही वाढविली. जगातील गुरांच्या व मेंढ्यांच्या काही उत्तम जातींची पैदास या कुरणी प्रदेशात होते. आता देशाचा सु. ७% भागच वनाच्छादित आहे. स्कॉटलंडच्या पूर्व व उत्तर भागांत काहीशी दाट अरण्ये आहेत. तेथे आता मुख्यतः पाइन व बर्च ही झाडे आढळतात, तर सखल प्रदेशातील प्रमुख वृक्ष म्हणजे ओक, एल्म, बीच व ॲश हे होत. वेल्सचा बहुतेक प्रदेश गवताळ आहे. काही भागात नेचे तर काही भागात छोटी झुडपे, काही ठिकाणी काटेरी झुडपे, तर काही ठिकाणी विविध प्रकारची नैसर्गिक गवते आढळतात. ब्लूबेल, बटरकप, डॅफोडिल, डेझी, लव्हेंडरस्केबियस, रेड पॉपी, डॉग रोझ इ. फुलझाडे ठिकठिकाणी आढळतात. गुलाब, ट्यूलिप, लिली इ. फुलांच्या बागा मुद्दाम केलेल्या दिसतात.

प्राणी : पूर्वी येथे यूरोपमधील इतर भागांप्रमाणे लांडगा, अस्वल, रानडुक्कर, रेनडियर, रानटी गुरे, बीव्हर यांसारखे प्राणी विपुल होते परंतु अरण्यांप्रमाणे तेही आता नष्ट किंवा दुर्मीळ झाले आहेत. हरणाच्या काही जाती संरक्षित आहेत. ससा, खोकड, बॅजर, वीझल, हेजहॉग, स्टोट इ. प्राणी वन्य आहेत. काही नद्यांतून ऑटर आढळतो, तर कधीकधी किनाऱ्याजवळ सीलही येतात. बहुतेक ब्रिटिश पक्षी स्थलांतरी आहेत. त्यांच्या २oo जाती आहेत. गोल्डन ईगल, रेड ग्राउस, मॅगपाय इ. स्थानिक होत. त्यांच्या सु. २३o जाती आहेत. स्टारलिंग, ब्लॅकबर्ड, थ्रश हे गाणारे व रॉबिन, चिमणी, ब्लू टिट, टेन, गोल्ड क्रेस्ट हे सर्वत्र आढळतात. सर्व नद्यांतून व सरोवरांतून सॅमन, ट्राउट, पर्च, पाइक, रोच, डेस, ग्रेलिंग हे मासे सापडतात. कारखान्यांतून नद्यांत सोडल्या जाण्याऱ्या टाकाऊ पदार्थांचा त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. समुद्रांत, विशेषतः उत्तर समुद्रात व डॉगर बँक भागात मात्र भरपूर मासे मिळतात. त्यामुळे पूर्व किनाऱ्यावर हल्, ग्रिम्झ्बी, फ्लीटवुड, ग्रेट यार्मथ, लोस्टॉफ्ट यांसारखी मासेमारी केंद्रे निर्माण झाली आहेत. इंग्लंडच्या किनाऱ्याजवळ मुख्यतः हेरिंग मासा मिळतो तर दूरवरच्या क्षेत्रांतून कॉड, प्लेस, सोल, हॅडॉक, हेक, हॅलिबट इ. मासे पकडून आणतात. चिखली भागात कार्प, पाइक इ. मिळतात. ब्रिटनमध्ये सरपटणारे व उभयचर प्राणी थोडेच आहेत. कीटकांच्या २१,००० हून अधिक जाती आहेत.

कुमठेकर, ज. ब.

इतिहास :प्राचीन काळ : अश्मयुग काळातील ग्रेट ब्रिटनविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्या वेळी सध्याची ब्रिटिश बेटे यूरोपला जोडलेली होती व उत्तर समुद्राच्या जागी एक मोठे पठार असून ऱ्हाईन नदीने तो भाग फार सुपीक झाला होता, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. टेम्स, हंबर वगैरे सध्याच्या नद्या या ऱ्हाईनच्याच उपनद्या होत्या. हवा कधी अती उष्ण तर कधी अती थंड अशी अनिश्चित असे. मानवी वस्ती फारच तुरळक होती, मात्र केसाळ हत्ती, सिंह, वाघ वगैरे हिंस्र पशूंचीच जास्त वस्ती होती. रानटी अवस्थेतील मानव दगडांचीच उपकरणे वापरी. त्यांना धातू माहीत नव्हता. अलीकडे झालेल्या उत्खननांत काही सामान्यतः मध्याश्मयुगीन समजले जाणारे अवशेष सापडले आहेत. त्यांतील अश्मवर्तुळ व स्टोन हेंज यांचा काळ इ.स.पू. १९०० ते १४०० असून स्टोन हेंज हे प्राचीनांचे मंदिर असावे, असे त्याच्या बांधणीतील काही भागांवरून वाटते. तथापि त्यांतील बरेच अवशेष नवाश्मयुगातील असावेत, असा तज्ञांचा कयास आहे. नवाश्मयुगात ब्रिटनच्या हवामानात काहीसा बदल झाला. उत्तर ध्रुवाकडून हिमनद्या ब्रिटनच्या बाजूने वाहत येऊन समुद्र बनला व ब्रिटन देश युरोपपासून विलग झाला. हा फरक नक्की केव्हा झाला ते ज्ञात नाही. यानंतर हळूहळू तेथे इतर युरोपीय लोकांची वस्ती होऊ लागली. पुढे ताम्रपाषाणयुगात इ.स.पू. दुसऱ्या-पहिल्या सहस्रकांत ब्रिटनवर परकीयांनी स्वाऱ्या केल्या. पहिल्या टोळीतील लोकांस गेल व दुसऱ्या टोळीतील लोकांस ब्रिटन अशी नावे पडली. या दोन्ही जमातींस मिळून केल्ट असेही संबोधिले जाई. तत्पूर्वी यूरोपातून आलेले आयबेरियन व इतर सर्व लोक दगडाचीच हत्यारे वापरीत. मातीची भांडी बनविण्याची कृती त्यांना पुढे हळूहळू माहीत झाली. मृत माणसास पुरण्याची चाल त्या वेळी रूढ होती. जमिनीची मशागत करून धान्य पिकविणे, विणणे, घर बांधणे वगैरे गोष्टी त्यांस माहीत असाव्यात. आयबेरियन लोकांचा पराभव करून केल्ट लोकांनी यांस आपले दास्यत्व पतकरण्यास लाविले पण पुढे आयबेरियन व केल्ट यांच्यात रोटीबेटी व्यवहार सुरू झाला असावा. केल्ट लोकांना शेतीची आवड होती. ते धान्य पिकवून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत. त्यांना धातूचा उपयोग माहीत होता. तांबे व कथील यांच्या मिश्रणपासून ते ब्राँझ नावाची धातू तयार करीत. या धातूची निरनिराळ्या आकारांची तीक्ष्ण हत्यारे ते बनवीत. यामुळे दगडी हत्यारांचा उपयोग कमी झाला होता. हे लोक जंगल तोडून एखाद्या सोयीस्कर जागी झोपड्या बांधून वस्ती करीत व संरक्षणासाठी डोंगरी किल्ले बांधीत. इ. स. पू. ५०० च्या सुमारास या सुधारलेल्या केल्ट लोकांनाही ब्रिटन म्हणू लागले. त्यांनी गेल लोकांचा पराभव करून त्यांना ब्रिटनच्या उत्तरेस हुसकून लावले. त्यांपैकी काही आयर्लंडमध्ये गेले, त्यांना पिक्ट म्हणत. जे स्कॉटलंडमध्ये गेले, त्यांना स्कॉट म्हणू लागले.

ब्रिटन लोकांना लोखंडाचा उपयोग माहीत होता. त्यामुळे ब्राँझपेक्षा ते लोखंडाचाच जास्त उपयोग करीत. हत्यारे, भांडी वगैरे लोखंडाचीच बनविलेली असत. म्हणून त्या काळाला लोहयुग असे म्हणतात. ब्रिटन लोकांना शेतीची कला अवगत होती. गावे वसवून ते राहत. रस्ते तयार करण्याचा प्रघात त्यांनी पाडला. दररोजच्या व्यवहारात ते तांब्याच्या व सोन्याच्या नाण्यांचा उपयोग करीत. त्यांनी घोड्यांच्या गाड्यांचा सर्रास वापर सुरू केला. ते गाय, बैल, कुत्रे, घोडे वगैरे प्राणी पाळीत. फिनिशियन लोकांशी ते व्यापारही करीत. त्यांमधील काही तत्त्वज्ञांना ड्रुइड म्हणत. ते जादूटोणाही करीत. ते ओकच्या झाडाला पवित्र मानीत. त्याचप्रमाणे त्या झाडावर वाढविलेल्या मिसलटो नावाच्या वेलीसही ते पवित्र मानीत. ते ओक वृक्षाच्या छायेत बसून सर्व धार्मिक विधी व पूजा-अर्चा करीत. त्यांमध्ये सूर्योपासना व मूर्तिपूजाही रूढ होती. त्यांच्या धर्माला ड्रुइडपंथ व धर्मोपदेशकला ड्रुइड ही नावे मिळाली. हा ड्रुइड सर्वगामी होता. तो धार्मिक विधी चालविणारा तसेच शिक्षकही असे. तो न्यायनिवाडा करणारा न्यायाधीश असे. लोकांमध्ये अनेक अंधश्रद्धा, रूढी व भोळ्या धर्मकल्पना प्रचलित होत्या. केल्ट व ब्रिटन लोक नेहमी आपापसांत भांडत. तो परकीय शत्रूस एकमेकांविरुद्ध मदत करीत. हे वर्तन साहाजिकच रोमन लोकांच्या स्वाऱ्यांस उपकारक ठरले आणि रोमनांनी ब्रिटनमध्ये प्रवेश केला.

रोमन अंमलाचा काळ : इ. स. पू. ५५ च्या सुमारास रोमन लोकांचा प्रसिद्ध योद्धा ज्यूलियस सीझर याने गॉल (सध्याचा फ्रान्स) वर स्वारी केली. त्या वेळी ब्रिटन लोकांनी त्या देशातील आपल्या धर्मबांधवांना मदत केली. यामुळे चिडून जाऊन सीझरने ब्रिटनवर दहा हजार रोमन सैनिकांसह स्वारी करून इंग्लंडच्या आग्नेय भागात प्रवेश केला. प्रथमतः ब्रिटन लोकांनी मोठ्या धैर्याने त्याला किनाऱ्यावरच प्रतिकार केला, परंतु पुढे मात्र तो हळूहळू कमी होऊन सीझरने डील बंदरावर ठाण मांडले. काही दिवस तळ देऊन व ब्रिटन लोकांकडून खंडणी वसूल करून तो गॉलला परतला आणि इ.स.पू. ५४ मध्ये त्याने वीस हजार सैन्य, दोन हजार घोडेस्वार व आठशे जहाजे यांच्या साहाय्याने ब्रिटनवर पुन्हा स्वारी केली. या वेळी किनाऱ्यावर कोणताही विरोध न होता सीझर ब्रिटनमध्ये उतरला. पुढे कॅसिव्हिलॉनस या ब्रिटनांच्या राजाच्या नेतृत्वाखाली सर्व ब्रिटन एकत्रित झाले आणि या शूर लोकांनी त्यास प्रतिकार केला परंतु शिस्तबद्ध व सराईत रोमन सैन्यापुढे त्यांना शरणागती पतकरावी लागली. सीझरने खंडणी वसूल केली. त्यानंतर जवळजवळ १०० वर्षे इंग्लंडवर पुन्हा रोमनांनी स्वारी केली नाही. मात्र इ.स. ४३ साली क्लॉडियस रोममध्ये राज्य करीत असता, त्याने ब्रिटन जिंकण्याकरिता ४० हजार सैन्य प्लॉटियस नावाच्या सेनापतीबरोबर धाडले. त्या वेळी ब्रिटनमध्ये कॅक्टेकस नावाचा राजा राज्य करीत होता. त्याने निकराचा लढा दिला पण त्याचा पराभव झाला. त्यास कैद करून रोमला पाठविले. या विजयामुळे ब्रिटनचा दक्षिणेकडील बहुतेक भाग रोमन साम्राज्यात समाविष्ट झाला. पुढे सु. साडेतीनशे वर्षे हा भाग रोमन साम्राज्यातच होता. नंतर हळूहळू रोमन लोकांनी इतर भाग काबीज केला. ब्रिटन लोकांनी पारतंत्र्याविरुद्ध वारंवार प्रतिकार करूनही त्यांस कधीच यश प्राप्त झाले नाही. ब्रिटनचा राज्यकारभार पाहण्याकरिता रोमन सम्राट गव्हर्नर नेमीत. सैन्याच्या जोरावर ते कारभार करीत. ऑग्रिकोला (७८–८५) हा गव्हर्नर असता त्याने ब्रिटनमध्ये अनेक सुधारणा केल्या. त्याने रोमन कायदा अंमलात आणून उत्तर ब्रिटन, स्कॉटलंड व वेल्स हे भाग आपल्या अंमलाखाली आणले आणि त्या भागांत चांगली शहरे वसविली, रस्ते तयार केले, शेतीत सुधारणा घडवून आणल्या व शिक्षणाची सोय केली. यांमुळे त्यांना लॅटिन भाषेचे ज्ञान होऊ लागले. यानंतर आलेल्या रोमन गव्हर्नरांची कारकीर्द साधारणतः शांततेची झाली. दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस स्कॉटलंडमध्ये राहणारे लोक ब्रिटनवर एकसारखे हल्ले करू लागले. ते थांबविण्यासाठी हॅड्रियन सम्राटाने ब्रिटनला भेट दिली आणि एक मोठी १२१ किमी. लांब, ५ मी. उंच व २ मी. रुंद भिंत बांधली. ब्रिटनमधील रोमन साम्राज्याची ही उत्तर सरहद्द मानली गेली. तिचे अवशेष अद्यापि पहावयास सापडतात. या भिंतीमुळे ब्रिटनची उत्तर सीमा निर्धास्त झाली. सेव्हरस या गव्हर्नरने तिसऱ्हा शतकात तिचा काही पडलेला भाग दुरुस्त केला, पण या वेळी रोमन साम्राज्याचीच शकले होऊ लागली त्याचे निरनिराळे प्रदेश स्वतंत्र होऊ लागले. याच वेळी ट्यूटन लोकांनी रोमन साम्राज्यावर हल्ले करून ते खिळखिळे केले. त्यांच्यातील सॅक्सन-ट्यूटन लोकांनी ब्रिटनवर हल्ले करण्यास प्रारंभ केला. पण त्या वेळी रोमन बादशहाकडून ब्रिटनच्या गव्हर्नरला मदत मिळेनाशी झाली. सॅक्सन लोकांशी लढण्याचे सामर्थ्य ब्रिटनमधील रोमन सैन्यात नव्हते व खुद्द ब्रिटनमध्ये रोमन लोकांच्या शत्रूंनी त्यांस सतावून सोडले. याच सुमारास ट्यूटन लोकांनी इटलीत घुसून रोम शहर काबीज केले तेव्हा राजधानीच्या संरक्षणाकरिता ब्रिटममधील सर्व रोमन सैनिक तिकडे गेले (४१o). रोमन लोकांनी ब्रिटन सोडल्यावर तेथे बंडाळी माजली व ब्रिटन लोक असहाय्य झाले. या स्थितीचा सॅक्सन लोकांनी पुरेपूर फायदा घेतला.

रोमन लोकांच्या सु. साडेतीनशे वर्षांच्या अंमलात ब्रिटनमध्ये अनेक सुधारणा होऊन शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित झाली. ब्रिटन लोकांस त्यांनी शिक्षण देऊन सुधारले. खिस्ती धर्माची स्थापनाही याच काळात ब्रिटनमध्ये झाली आणि लंडन, यॉर्क वगैरे ठिकाणी अनेक चर्च उभे राहिले. ब्रिटन लोकांनी रोमन लोकांची भाषा, त्यांच्या चालीरीती व त्यांची संस्कृती आत्मसात केली.

अँग्लो-सँक्सन काळ : ख्रिस्ती धर्माचा इंग्लंडात प्रवेश झाला. येथील लोकांची स्थिती सुधारण्याचे रोमन लोकांचे कार्य खिस्ती चर्चने पुढे चालविले. या सर्व लोकांना अँग्लो-सॅक्सन लोक म्हणत. इंग्लंडमध्ये आलेल्या लोकांमध्ये आंग्ल लोकांचा अधिक भरणा होता, त्यामुळे त्या प्रदेशाला आंग्ल लोकांचा देश उर्फ इंग्लंड म्हणण्यात येऊ लागले. अँग्लो-सॅक्सन लोकांशी ब्रिटन लोकांचे सु. दीडदोनशे वर्षे झगडे चालू होते. या काळात वेल्सच्या आर्थर राजाने त्यांच्या स्वैर विस्तारास काहीसा विरोध केला. पण तोही अखेर निष्फळ ठरून अँग्लो-सॅक्सन लोक व ब्रिटन लोक यांत हळूहळू रोटीबेटी व्यवहार सुरू झाले. अँग्लो-सॅक्सनांनी आपली छोटी संस्थाने स्थापली. ते ब्रिटन नामक मंडळाच्या साहाय्याने राज्यकारभार पाहत. मध्य यूरोपातील जर्मन टोळ्यांनी रोमनांची जागा घेतली. स्कॉट व पिक्ट लोकांनी इंग्लंडवर हल्ले करण्यास प्रारंभ केला, तेव्हा केंटच्या राजाने या हल्ल्याला तोंड देण्यासाठी ट्यूटन लोकांची मदत मागितली. ट्यूटन लोक हे लढाऊ बाण्याचे होते. त्यांनी प्रथम केंटच्या राजाचा पराभव करून लवकरच इंग्लंडच्या बऱ्याच भागावर आपले स्वामित्व प्रस्थापित केले. त्यांना प्रदेशनामानुसार सॅक्सन, अँग्लो वगैरे नावे मिळाली. सहाव्या शतकाच्या अखेरीस सेंट ऑगस्टीन आपल्या अनेक सहकाऱ्यांसहित इंग्लंडातील केंट परगण्यात आला व इंग्लंडमधील लोकांस खिस्ती धर्माची दीक्षा देण्याचे कार्य त्याने झपाट्याने सुरू केले.

या सुमारास इंग्लंडमध्ये अनेक छोटी राज्ये अस्तित्वात होती. त्यांची एकमेकांबरोबर सतत युद्धे होत. अखेरीस नवव्या शतकाच्या सुरुवातीस वेसेक्सचा राजा एजबेर्क्ट (८०२–३९) याने इतर सर्व राजांस आपले सार्वभौमत्व मान्य करावयास लावले. ह्या वेळी शार्लमेनने पश्चिम यूरोपात रोमन साम्राज्याचे पुनरुत्थान केले होते. हा योगायोग लक्षात ठेवण्यासारखा आहे. एका राज्याखाली इंग्लंडास स्थैर्य लाभण्याच्या सुमारासच व्हायकिंग अथवा डेन या उत्तरेकडील टोळ्यांनी इंग्लंडवर हल्ले करण्यास सुरुवात केली. डेन लोकांशी लढताना आल्फ्रेड (८४९–९०१) या एजबेर्क्टच्या नातवाने फार मोठा पराक्रम गाजवून इंग्लंडवरील आपले स्वामित्व अबाधित राखले. ख्रिस्ती धर्माचे संरक्षण केले, धर्ममठांची स्थापना केली व डेन लोकांनाही खिस्ती धर्माची दीक्षा दिली. आपले आरमार वाढवून त्याने इंग्लंडचे लष्करी सामर्थ्य वाढविले व लष्करी शिक्षणाची व्यवस्था केली. यांशिवाय प्रमुख शहरांना तटबंदी केली. तो स्वतः विद्वान होता. त्याने लॅटिन व ग्रीक ग्रंथांची भाषांतरे करून प्रसिद्ध केली विद्वानांना आश्रय दिला. पूर्वीचा इतिहास कळावा व इतिहासाचे लेखन व्हावे, म्हणून ‘अँग्लो-सॅक्सन’ इतिवृत्त सुरू कले. या त्याच्या कारकिर्दीमुळे त्यास थोर (ग्रेट) ही सार्थ उपाधी मिळाली. आल्फ्रेडनंतर त्याचा मुलगा एडवर्ड (९०१–२४) गादीवर आला. त्याने सर्व डेन लोकांचे राज्य जिंकून त्यांचे राज्यही हस्तगत केले. वेल्स, नार्थंब्रिया वगैरेंनी त्याचे मांडलिकत्व मान्य केले. त्यानंतर ॲथलस्टॅन (९२४–४०) गादीवर आला. त्यानंतर त्याचा सावत्र भाऊ एडमंड (९४०–४६) राज्य करू लागला. मध्यंतरी एकदोन वारस गादीवर आले व त्यानंतर ⇨एडगर (९५९–७५) गादीवर आला.

नॉर्मंडीची ड्यूक, विल्यम (१०६६–८७) याने १०६६ च्या हेस्टिंग्जच्या लढाईत इंग्लंडच्या राजाचा पराभव करून आपले स्वामित्व इंग्लंडवर प्रस्थापित केले. विल्यमचा कारभार पूर्णपणे सरंजामशाही स्वरूपाचा होता. इंग्लंडच्या सर्व भूमीचा मालक असल्याचे त्याने जाहीर केले व ती सर्व भूमी आपल्या सरदारांना नोकरी करण्याच्या विशिष्ट अटीवर वाटून दिली. नॉर्मन लोकांनी येथील चर्चची सुधारणा करून त्यावर राजाची सत्ता प्रस्थापित केली. यानंतर काही वर्षे दुसरा विल्यम (१०८७–११००) याने राज्य केले.

नॉर्मन राजा पहिला हेन्‍री (११००–३५) याच्या मुलीचा मुलगा दुसरा हेन्री (११५४–८९) यांच्यापासून प्लँटॅजेनेट घराण्यास सुरुवात होते. इंग्लंडच्या थोर राजांमध्ये याची गणना करण्यात येते. पश्चिम फ्रान्सचा फार मोठा भाग मातेकडून वारसा हक्काने त्यास मिळाला होता. त्यामुळे तत्कालीन यूरोपीय राजांमध्ये तो महाबलिष्ठ समजला जात असे. इंग्लंडच्या न्यायपद्धतीत त्याने ज्यूरी नेमण्याची प्रथा सुरू करून फार मोठी सुधारणा घडवून आणली. जरी ही पद्धत नॉर्मन लोकांत अस्तित्वात होती, तर हेन्‍रीने तिचा अशा स्वरूपात वापर केला की, त्यास ज्यूरी पद्धतीचा जनक समजतात.

याच घराण्यातील राजा जॉन (११९९–१२१६) हा जुलमी आणि विश्वासघातकी निघाला. पण मोठी सनद (मॅग्ना कार्टा) याजकडून मिळाली. यामुळे त्याचे नाव इतिहासात अमर झाले. जॉननंतर तिसऱ्या हेन्‍रीच्या (१२१६–७२) जुलमी कारभारामुळे सरदारांनी बंड केले आणि राजास कैद करून सत्ता आपल्या हातात घेतली. त्याचा पुढारी सायमन डी माँटफोर्ड याने १२६५ मध्ये पार्लमेंटच्या बैठकीस सरदारांबरोबर प्रत्येक शहरातून दोन नागरिक बोलाविले. यामुळे माँटफोर्ड यास हाउस ऑफ कॉमन्सचा पिता म्हणतात. लवकरच राजपुत्र एडवर्डने माँटफोर्डचा वध करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. ⇨पहिला एडवर्ड (१२७२–१३०७) याने माँटफोर्डचे कार्य पुढे चालवून हाउस ऑफ कॉमन्सची संघटना पूर्ण केली. १२९५ मध्ये त्याने बोलाविलेल्या पार्लमेंटास नमुनेदार पार्लमेंट (मॉडेल पार्लमेंट) असे म्हणण्यात येते. एडवर्डने केलेले कायदे अत्यंत हितावह असे होते. त्यामुळे चांगले कायदे करणारा राजा, अशी त्याची कीर्ती इतिहासात आहे.

तेराव्या आणि चौदाव्या शतकांत इंग्लंडच्या परिस्थितीत फार मोठा बदल घडून आला. व्यापारात वाढ झाल्यामुळे संपन्न नागरिकांचा नवा वर्ग अस्तित्वात आला. जुन्या शिलेदार वर्गाचे या वर्गाशी संघटन वाढून पुढे कॉमन्स या नावाने ओळखला जाणारा वर्ग तयार झाला. चौदाव्या शतकात ब्लॅक डेथ नावाच्या भयंकर रोगाने इंग्लंडची जवळजवळ अर्धी लोकसंख्या नष्ट केली. या साथीत बरेच शेतमजूर मरण पावल्यामुळे मजुरीचे दर कडाडले आणि त्यामुळे मजूरवर्गास सुस्थिती प्राप्त झाली. याच काळात अनेक व्यापारी व औद्योगिक संघटना उदयास आल्या. आपआपल्या धंद्यातील समान हितसंबंधांचे संरक्षण करणे, हे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते. सबंध यूरोपभर चालू असलेल्या विद्येच्या पुनरुज्जीवनाचा इंग्लंडवरसुद्धा परिणाम झाला. इंग्रजी भाषेत ग्रंथरचना होऊ लागली तसेच न्यायसभेत आणि संसदेतही इंग्रजी भाषा वापरण्यात येऊ लागली. तेराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा उदय झाला. लवकरच पार्लमेंटने बरेचसे हक्क राजाकडून मिळविले. कायदे करणे, कर बसविणे, राज्यकारभाराच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे इ. बाबींतील पार्लमेंटचे हक्क मान्य करण्यात आले. वरिष्ठ सभा (हाउस ऑफ लॉर्ड्‌स) व कनिष्ठ सभा (हाउस ऑफ कॉमन्स) ही पार्लमेंटची दोन स्वतंत्र गृहे असत. त्यांतल्या त्यात कनिष्ठ सभेचे वर्चस्व राजकारणात मान्य करण्यात आले. एखाद्या कायद्याच्या मसुद्याप्रमाणे कोणतेही विधेयक पार्लमेंटमध्ये मांडीत. त्यात अमुक बाबतीत अमुक व्यक्ती दोषी आहे, असे दाखवून त्यास देहान्ताची सजासुद्धा फर्मावीत विधेयक संमत झाल्यास, त्या व्यक्तीस स्वतःच्या बचावासाठी काहीही करण्याची सवलत न देता ती सजा अंमलात येई.

चौदाव्या शतकात सिंहासनाकरिता यॉर्क आणि लँकेस्टर घराण्यात संघर्ष चालू होता. एका घराण्याने लाल तर दुसऱ्याने पांढरा गुलाब खूण म्हणून वापरला होता म्हणून या युद्धास गुलाबांचे युद्ध (वॉर ऑफ रोझेस) असे म्हणत. अनेक वर्षे चाललेल्या या युद्धामुळे राज्ययंत्रणा खिळखिळी होऊन समाजाची धारणाच नष्ट होण्याच्या मार्गाला लागली. गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आणि त्यांचा बंदोबस्त करण्याच्या बाबतीत सरकारी सत्ता कमकुवत पडू लागली. लहानमोठ्या सरदारांत सत्तास्पर्धा सुरू झाल्यामुळे राजसत्तेचे स्थैर्य नाहीसे झाले. दोन्ही पक्षांनी पाशवी वृत्तीचा कळस करून संधी मिळताच आपापल्या विरोधकांस कंठस्नान घातले. यॉर्क घराण्यातील तिसरा रिचर्ड (१४८३–८५) याने आपल्या दोन लहान पुतण्यांचा खून करून गादी बळकाविली. तेव्हा विरोधक खवळले व लँकेस्टर घराण्याचा आप्त हेन्‍री ट्यूडर, ड्यूक ऑफ रिचमंड याने बंड पुकारून बॉस्वर्थच्या रणभूमीवर रिचर्डचा पराभव करून त्यास ठार मारले. अशा रीतीने ट्यूडर घराण्याची स्थापना इंग्लंडच्या गादीवर झाली.

ट्यूडर काळ : बॉस्वर्थच्या लढाईमध्ये हेन्‍रीला विजय मिळाल्यामुळे तो इंग्लंडचा राजा झाला. गुलाबांच्या युद्धामध्ये अनेक वर्षे गेल्यामुळे समाजाची घडी विस्कटली होती. अर्थात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, हे राजाचे पहिले कर्तव्य होते. हेन्‍रीच्या सुदैवाने राज्यात नेहमी बंडे करणारे बलिष्ठ सरदार निष्प्रभ झाले होते. गुलाबांच्या युद्धात त्यांनी परस्परविरोधी बाजू घेतल्यामुळे बरेचजण रणांगणावर कामास आले होते. ह्यांत असलेल्यांपैकी हेन्‍रीच्या विरोधी बाजूस लढलेल्यांची वतने खालसा करून हेन्‍रीने त्यांना निर्माल्यवत करून टाकले.

हेन्‍रीचे आपल्या आईकडून लँकेस्टर घराण्याशी नाते होते. यॉर्क घराण्यातील चौथ्या एडवर्डची मुलगी व वारस एलिझाबेथ हिच्याशी त्याने लग्न केले. त्यामुळे त्याला दोन्ही घराण्यांचा पाठिंबा मिळाला. वरील दोन्ही कारणांमुळे शांतता प्रस्थापित करण्यात त्यास यश मिळाले.

सरदार घराण्यांची सत्ता खिळखिळी झाल्यामुळे हेन्‍रीच्या पार्लमेंटमध्ये राजास फारसा विरोध राहिलाच नाही. यामुळे ट्यूडर काळामध्ये राजा व त्याचे सल्लागार मंडळ (कौन्सिल) यांच्या हातामध्ये सत्तेचे केंद्रीकरण झाले. शक्य तो पार्लमेंटचे अधिवेशन न भरविता राज्यकारभार चालविण्याचे धोरण ट्यूडर राजांनी आखले. अनेक वर्षांच्या अशांततेला सर्व समाज विटला असल्यामुळे कर्तबगार राजाच्या हातात सत्ता सुपूर्द करण्यात काही वावगे आहे, असे लोकांनाही वाटले नाही. ट्यूडर राजांनीही पार्लमेंटच्या कायदेशीर हक्कांचा अधिक्षेप कधीही केला नाही. इतकेच नव्हे तर वरवर का होईना, पार्लमेंटच्या संमतीनेच राज्यकारभार चालविला. कर बसविण्याची सत्ता पार्लमेंटच्या हातात असल्यामुळे नवीन कर न बसविता राज्य चालविण्याच्या अनेक युक्त्या हेन्‍रीने अंमलात आणल्या. गुलाबांच्या युद्धात भाग घेतलेल्या विरोधी सरदारांच्या जमिनी खालसा केल्यामुळे राजाच्या खाजगी संपत्तीत बरीच भर पडली होती. त्याशिवाय नजराणे, सक्तीची कर्जे वगैरे रूपांनीही त्याने पुष्कळ पैसा गोळा केला व राज्यकारभार सुलभतेने चालविला.

हेन्‍रीनंतर त्याचा पुत्र आठवा हेन्‍री (१५०९–४७) गादीवर आला. त्याने बापाच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभारास सुरुवात केली. त्याचा मुख्य प्रधान कार्डिनल वुल्झी ह्याच्या कर्तबगारीमुळे राज्याची घडी सुव्यवस्थित बसली होती. ह्या सुमारास धार्मिक सुधारणांचे वारे यूरोपात जोराने वहात होते. हेन्‍रीने प्रॉटेस्टंट पंथाविरुद्ध पोपची बाजू घेतल्यामुळे पोपने त्याला डिफेन्डर ऑफ द फेथ हा किताब दिला. पण पुढे लवकरच आपली राणी कॅथरिन हिच्याबरोबर घटस्फोट घेण्यास पोपची संमती न मिळाल्यामुळे हेन्‍रीने पोपची बाजू सोडून प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केला. लवकरच त्याने आपल्या सर्व राज्यांत प्रॉटेस्टंट पंथाचा फैलाव केला.

त्याच्यानंतर त्याचा पुत्र सहावा एडवर्ड (१५४७–५३) हा अल्पकाळच गादीवर होता. भावानंतर हेन्‍रीची वडील मुलगी मेरी (१५५३–५८) ही राणी झाली. तिचे लग्न स्पेनचा राजा फिलिप ह्याच्या बरोबर झाले. स्पेनचे घराणे कट्टर कॅथलिक म्हणून ओळखले जात होते. मेरीने कॅथलिक पंथाचा इंग्लंडमध्ये पुन्हा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. प्रॉटेस्टंट पंथानुयायांचा तिने अतोनात छळ केला. त्या छळाचा परिणाम नेमका विरुद्ध होऊन लोकांची सहानुभूती प्रॉटेस्टंट पंथाकडे वळली.

मेरीची बहीण ⇨एलिझाबेथ (१५५८–१६०३) हिच्या कारकिर्दीमध्ये इंग्लंडचा उत्कर्ष अनेक प्रकारे झाला. इंग्लंडमधील दर्यावर्दी लोकांनी इंग्रजी व्यापार फार मोठ्या प्रमाणावर वाढविला. सर फ्रान्सिस ड्रेकने स्पॅनिश सत्तेशी लढा देऊन अमेरिकेमध्ये ब्रिटिश सत्ता दृढ पायावर उभी केली. १५८८मध्ये स्पॅनिश अर्माडा या नावाने ओळखल्या जाण्याऱ्या स्पेनच्या प्रचंड आरमाराचा पराभव करून इंग्लंडने समुद्रावर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. एलिझाबेथने धार्मिक बाबतीत आपल्या बहिणीचे कार्य रद्द करून प्रॉटेस्टंट पंथ इंग्लंडचा राजधर्म केला.

एलिझाबेथचा काळ इंग्लंडच्या इतिहासातील सुवर्णयुग समजले जाते. या वेळी समुद्रावरील स्वामित्वामुळे परदेशाशी व्यापार मोठ्या प्रमाणावर चालून इंग्लंड वैभवसंपन्न देश बनला. शेक्सपिअर, बेकन, मार्लो, चॅपमन, ड्रेटन, सिडनी, रॅले इ. लेखकांनी इंग्लंडच्या साहित्यसंपत्तीत फार मोलाची भर घातली.

स्ट्यूअर्ट काळ : मेरीचा (स्कॉटलंडची राणी) मुलगा आणि स्कॉटलंडचा राजा सहावा जेम्स हा एलिझाबेथनंतर इंग्लंडच्या गादीवर पहिला जेम्स (१६०३–२५) म्हणून बसला. त्याच्या बालपणापासून राजाचे दैवी अधिकार ह्या तत्त्वाचा पगडा त्याच्या मनावर बसला होता. राजाच्या अधिकारांस मर्यादा नाहीत कारण राजा हा ईश्वराचा पृथ्वीवरील प्रतिनिधी आहे, असे सर्व स्ट्यूअर्ट राजांचे मत होते. ह्यास अनुसरून जेम्सने पार्लमेंटवरसुद्धा अधिकार गाजविण्याचा हक्क राजास आहे, असा पवित्रा घेतला. पार्लमेंटच्या संमतीशिवाय त्याने कर गोळा करावयास सुरुवात केली. साहजिकच पार्लमेंट आणि राजा यांमध्ये संघर्ष सुरू झाला. पार्लमेंटशिवाय काही काळ त्याने कारभार चालविला. पण तीस वर्षांचे युद्ध युरोपात सुरू झाल्यामुळे त्यास पार्लमेंटचे अधिवेशन बोलावणे भाग पडले. माजी प्रमुख न्यायमूर्ती सर एडवर्ड कुक याने पार्लमेंटच्या वतीने आपली गाऱ्हाणी मिटविण्याकरिता राजाकडे दाद मागितली. राजाच्या बदसल्लागाराविरुद्ध पार्लमेंटने महाभियोग सुरू करून सर फ्रान्सिस बेकन (सुप्रसिद्ध इंग्रजी निबंधकार) यास दंड व शिक्षा केली. राजास राग येऊन त्याने पार्लमेंट बरखास्त केले आणि कुक व इतर दोन पुढाऱ्यांस कैदेत टाकले. तथापि लढाईमुळे त्यास परत पार्लमेंट बोलावणे भाग पडले. ह्या पार्लमेंटने राजास महाभियोग अंमलात आणून शिक्षा दिली.

जेम्सच्या मृत्यूनंतर (१६२५) त्याचा मुलगा पहिला चार्ल्‌स (१६२५–४९) गादीवर आला. चार्ल्‌स स्वभावाने अत्यंत हेकेखोर व विश्वासघातकी होता. बकिंगहॅमचा ड्यूक हा त्याचा प्रमुख सल्लागार होता. धार्मिक बाबतीत आर्चबिशप विल्यम लॉड याचा सल्ला तो घेई. चार्ल्‌सने फ्रान्सच्या राजाला त्याच्या प्रॉटेस्टंट प्रजाजनांविरुद्ध लढण्यास मदत केली. पण तीमध्ये त्यास अपयश आले. त्याने पार्लमेंटची अनुमती न घेता प्रजेकडून दर टनामागे व पौंडामागे काही कर वसूल करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने जबरदस्तीने कर्ज गोळा करण्याचा उद्योग आरंभिला. आपल्या विरोधकांस त्याने तुरुंगात टाकले. तरीसुद्धा पुरेसा पैसा न गोळा झाल्याने मार्च १६२८ मध्ये आपले तिसरे पार्लमेंट त्याने बोलविले. ह्या पार्लमेंटने राजास हक्कांचा अर्ज (पिटिशन ऑफ राइट्स) सादर केला. इंग्लंडच्या संविधानात्मक इतिहासात मोठ्या सनदेच्या (मॅग्ना कार्टा) खालोखाल ह्याला महत्त्व आहे. हा अर्ज राजाने मान्य केल्यावरसुद्धा राजाच्या बदसल्लागारास शिक्षा करण्याची आपली मागणी पार्लमेंटने चालूच ठेवली. तेव्हा राजाने पार्लमेंट बरखास्त केले. टॉमस वेंटवर्थसारखा पार्लमेंटचा पुढारी राजास मिळाला.

धार्मिक बाबतीत चार्ल्‌सचे धोरण कॅथलिकांना जवळ करण्याचे होते. साहजिकच पार्लमेंटचा व जनतेचा त्यास मोठा विरोध होता. त्यामुळे १६२९ ते १६४० च्या दरम्यान अकरा वर्षे चार्ल्‌सने पार्लमेंटशिवायच राज्यकारभार चालविला. ह्या मुदतीत लॉड व स्ट्रॅफर्ड (पूर्वीचा वेंटवर्थ) हे राजाचे प्रमुख सल्लागार होते. या काळात स्कॉटलंडबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे पैशाची टंचाई भासू लागल्यामुळे राजास नवीन पार्लमेंट बोलावणे भाग पडले. पण त्याच्याशी न पटल्यामुळे त्याने ते बरखास्त केले. या पार्लमेंटला शॉर्ट पार्लमेंट म्हणतात. लवकरच त्याने परत पार्लमेंटची बैठक बोलाविली. तीस लाँग पार्लमेंट असे नाव आहे. ह्या पार्लमेंटने स्ट्रॅफर्ड व लॉर्ड ह्या दोघांसही देहान्ताची शिक्षा दिली. पार्लमेंटचे राजाशी न जमल्यामुळे दोन्ही पक्षांनी शस्त्रबलाने वाद मिटविण्याचे ठरविले.

यादवी युद्धामध्ये चार्ल्‌सचा पराभव झाला. ⇨ऑलिव्हर क्रॉमवेलच्या नेतृत्वाखाली सर्व सत्ता विजयी सेनेच्या ताब्यात गेली. सैन्याने चार्ल्‌सला पदच्युत करून देहान्ताची शिक्षा दिली (१६४९) व ती अंमलात आणली.

ह्यापुढील अकरा-बारा वर्षांच्या काळात इंग्लंडमध्ये प्रजासत्ताक राज्यपद्धती अस्तित्वात होती पण वस्तुतः सर्व सत्ता क्रॉमवेलच्याच हातात केंद्रीभूत झाली होती, त्याने स्वतःस लॉर्ड प्रोटेक्टर हा किताब घेऊन राज्यकारभार चालविला. क्रॉमवेलचा राज्यकारभार कार्यक्षम होता. त्याने वृतपत्रांवरील बंदी उठविली. त्याचे कायदे सौम्य होते. इंग्लंडबरोबर स्कॉटलंड आणि आयर्लंड यांची त्याने एकी घडवून आणली.

क्रॉमवेलच्या काळात प्यूरिटन लोकांच्या हातात सत्ता होती. क्रॉमवेलनंतर (१६५८) त्याचा पुत्र रिचर्ड क्रॉमवेल सु. ८ महिने सत्ताधीश होता. पण बापाचे कर्तृत्व त्याच्या अंगी नव्हते. लोकमताच्या दबावामुळे त्याने राजीनामा दिला. लवकरच लाँग पार्लमेंटचे अधिवेशन बोलाविण्यात आले व त्याने दुसऱ्या चार्ल्‌सला गादीवर बसण्यास बोलाविले.

दुसऱ्या चार्ल्‌सने (१६६०–८५) गादीवर आल्याबरोबर समेटाचे धोरण पतकरले. धार्मिक बाबतीत मात्र त्याचा कॅथलिक पंथाकडे ओढा असल्यामुळे त्याने इंग्लिश चर्चच्या वतीने प्यूरिटन पंथावर बरेच निर्बंध घातले. याच निर्बंधांना कंटाळून प्यूरिटन लोक इंग्लंड सोडून गेले आणि अमेरिकेत स्थायिक झाले. कारकिर्दीच्या अखेरीस स्वतःच्या हातात सत्ता घेण्याचे त्याने प्रयत्न केले. त्याचे प्रधानमंडळ त्यातील पाच व्यक्तींच्या नावांच्या आद्याक्षरांवरून ओळखले जात असे. त्यांचीही वृत्ती कॅथलिक पंथाकडेच झुकली होती. फ्रान्सबरोबर त्यांनी एक गुप्त करार केला होता. डिक्लरेशन ऑफ इंडलजन्स या नावाचा हुकूम काढून त्यांनी कॅथलिकांवरील निर्बंध सैल करण्याचा प्रयत्न केला. पण पार्लमेंटच्या विरोधामुळे त्यात अपयश आले. इतकेच नव्हे तर टेस्ट ॲक्ट या नावाचा कायदा त्यांस संमत करावा लागला. या कायद्याप्रमाणे सर्व अधिकारी व्यक्तींना इंग्लिश चर्चच्या नियमानुसार शपथ घ्यावी लागे. अशी शपथ घेण्यास तयार नसलेल्या व्यक्तींना अधिकार सोडावे लागले. त्यांतील प्रमुख म्हणजे राजाचा भाऊ जेम्स, ड्यूक ऑफ यॉर्क हा होय.

१६८५ मध्ये चार्ल्‌स निधन पावून दुसरा जेम्स (१६८५–८८) गादीवर आला. तो कॅथलिक पंथीय होता. त्याने टेस्ट ॲक्ट मागे घेण्याचा प्रयत्न केला पण तो फसल्यावर डिक्लेरेशन ऑफ इंडलजन्स काढून कॅथलिकांवरील निर्बंध सैल केले. पण लोक मात्र यामुळे राजावर संतप्त झाले. हे पाहून जेम्सने राज्याची मुद्रा टेम्स नदीत फेकून देऊन तो फ्रान्सला पळून गेला. ह्याच सुमारास त्याला एक पुत्र झाला होता. जेम्सच्या मागून हा पुत्र गादीवर आला तर इंग्लंडात कॅथलिकांचे राज्य येईल, या भीतीने पार्लमेंटने जेम्सची मुलगी मेरी व तिचा पती ऑरेंजचा (हॉलंड) प्रिन्स विल्यम यास इंग्लंडमध्ये राज्य करण्याकरिता बोलाविले. याचे मुख्य कारण म्हणजे ऑरेंज घराणे हे कट्टर प्रॉटेस्टंट होते.

विल्यम आणि मेरी हे संयुक्तपणे गादीवर बसले. ह्या राज्यक्रांतीला रक्तशून्य किंवा वैभवशाली राज्यक्रांती असे म्हणतात. विल्यम गादीवर आल्यावर सुप्रसिद्ध हक्कांचा मसुदा (बिल ऑफ राइट्स) मान्य करण्यात आला. या मसुद्याप्रमाणे इंग्लंडमध्ये मर्यादित राजेशाही (लिमिटेड मॉनर्की) अस्तित्वात आली. १६९४ मध्ये मेरी वारल्यानंतर विल्यम एकटाच राजा म्हणून राज्य करू लागला. विल्यमने परराष्ट्रीय राजकारणामध्ये फ्रान्सच्या चौदाव्या लुईच्या अमर्याद आकांक्षांना विरोध करण्याचे ठरविले. दुसऱ्या जेम्सच्या मरणानंतर (१७०१) फ्रान्सने त्याच्या मुलास तिसरा जेम्स म्हणून मान्यता दिली. साहजिकच फ्रान्सच्या विरुद्ध युद्धाची तयारी करणे विल्यमला सोपे गेले. ही तयारी सुरू असताना १७०२ मध्ये विल्यम मरण पावला व मेरीची धाकटी बहीण ॲन (१७०२–१४) गादीवर आली. तिच्या कारकीर्दीत मार्लबरोचा अर्ल जॉन चर्चिल याने राज्यकारभार व्यवस्थित चालविला.

विल्यम गादीवर आल्यावर १७०१ मध्ये एक वारसाचा कायदा संमत करण्यात आला होता. त्याप्रमाणे त्याच्या मागून विल्यम आणि मेरीची मुले, तीही नसल्यास मेरीची बहीण ॲन आणि तीही नसल्यास पहिल्या जेम्सची मुले अशी वारसपरंपरा ठरविण्यात आली होती. विल्यम, मेरी व ॲन यांना मुले नसल्यामुळे १७०१ च्या वारसा कायद्यान्वये ॲननंतर पहिल्या जेम्सची मुलगी एलिझाबेथ हिच्या वंशजांकडे गादी जावी असे ठरविण्यात आले.

हॅनोव्हर काळ : जेम्सची मुलगी एलिझाबेथ हिची मुलगी सोफिया ही जर्मनीतील हॅनोव्हर घराण्यात दिली होती. तिचा मुलगा जॉर्ज हा पहिला जॉर्ज (१७१४–२७) या नावाने गादीवर बसला. जॉर्ज हा वयस्कर होता आणि त्यास इंग्रजी भाषा येत नव्हती. व्हिग पक्षाने जॉर्जला गादीवर आणण्याची खटपट केली होती. साहजिकच त्याने आपले सर्व प्रधान व्हिग पक्षातून निवडले. इंग्रजी येत नसल्यामुळे प्रधान-मंडळाच्या बैठकीसही तो हजर रहात नसे. सर्वांत ज्येष्ठ प्रधान राज्यप्रमुख म्हणून कारभार पाही. यामुळेच इंग्लंडमध्ये पंतप्रधान आणि प्रधान-मंडळपद्धती अस्तित्वात आली.

१७१५ मध्ये दुसऱ्या जेम्सच्या मुलाने बंड करून गादी बळकावण्याचा प्रयत्न केला, पण ते फसला. पहिल्या जॉर्जच्या कारकीर्दीत इंग्लंडचा परदेशाशी व्यापार फार मोठ्या प्रमाणावर वाढला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा दुसरा जॉर्ज (१७२७–६०) गादीवर आला. स्पेनबरोबरील वसाहतविषयक स्पर्धेमध्ये याच्या कारकिर्दीची अनेक वर्षे गेली. ऑस्ट्रियन वारसाच्या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रियाची बाजू घेतली. प्रशियाच्या फ्रीड्रिखने ऑस्ट्रियाच्या सायलेशिया प्रांतावर हल्ला करून या युद्धास सुरुवात केली होती. त्याच्यापासून जॉर्जच्या मालकीच्या जर्मनीतील हॅनोव्हर संस्थानाचा बचाव करण्याकरिता इंग्लंडला युद्धात भाग घ्यावा लागला. फ्रान्स आणि स्पेनने प्रशियास मदत केली. १७४३ मध्ये डेटिंजन (बव्हेरिया) येथील युद्धात इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याने स्वतः सैन्याचे नेतृत्व करून फ्रेंच सेनेचा पाडाव केला. इंग्लंडच्या राजाने स्वतः रणांगणावर सैन्याचे नेतृत्व करण्याचा हा शेवटचा प्रसंग होय. १७४८ च्या एक्स ला शपेलच्या तहाने हे युद्ध समाप्त झाले. हे युद्ध चालू असतानाच १७४५ मध्ये दुसऱ्या जेम्सचा नातू चार्ल्‌स याने स्कॉटलंडमध्ये येऊन गादी मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा पराभव होऊन त्यास फ्रान्समध्ये पळून जावे लागले.

ऑस्ट्रियन वारसायुद्ध संपले, तरी युरोपमध्ये प्रशिया आणि ऑस्ट्रिया या राष्ट्रांमध्ये जर्मनीतील वर्चस्वासंबंधी स्पर्धा सुरूच होती. प्रशियाचा फ्रीड्रिख द ग्रेट हा फार बलाढ्य राजा होता. त्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे आपल्या राज्यास धोका येईल, या भीतीने रशिया आणि फ्रान्स यांनी ऑस्ट्रियाशी मैत्री केली. फ्रान्स व इंग्लंडमध्ये हिंदुस्थान आणि अमेरिका येथील व्यापार आणि वसाहती यांबाबतीत स्पर्धा चालू होती त्यामुळे इंग्लंड आणि प्रशिया यांची युती जमून आली. १७५६ मध्ये युद्धास तोंड लागले. या युद्धास सप्तवार्षिक युद्ध असे म्हणतात. युद्धाच्या पहिल्या वर्षी इंग्लंडची सर्व ठिकाणी पीछेहाट झाली. तेव्हा युद्ध घडामोडी हाताळण्याकरिता थोरला पिट यास युद्धमंत्री नेमण्यात आले. पिटने प्रशियास भरपूर पैशाची मदत करून त्यास फ्रान्सविरुद्ध लढण्यास उत्तेजन दिले. हिंदुस्थानमध्ये प्लासीच्या लढाईत (१७५७) जय मिळवून क्लाइव्हने बंगाल प्रांतात इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित केले. कॅनडातील क्वेबेकचा अमेद्य किल्ला वुल्फने जिंकून (१७५९) सबंध कॅनडा प्रांत इंग्रज अंमलाखाली आणला. त्याच्या मागोमाग १७६० मध्ये हिंदुस्थानात वाँदिवॉशच्या लढाईत कर्नल कूकने फ्रेंचांचा पराभव करून भारतातील फ्रेंच सत्तेला कायमचा पायबंद घातला. अशा रीतीने फ्रेंचांचे भारतातील साम्राज्य नष्ट झाले.

सप्तवार्षिक युद्ध सुरू असतानाच दुसऱ्या जॉर्जचा नातू ⇨तिसरा जॉर्ज (१७६०–१८२०) गादीवर आला. पहिल्या दोन जॉर्जांच्या कारकिर्दीत सत्ता बरीचशी प्रधान-मंडळाच्या हातात असे. कारण पहिले दोन्ही जॉर्ज जर्मनीत जन्मले होते. त्यांची मातृभाषा ही जर्मन होती. मात्र तिसरा जॉर्ज हा इंग्लंडात जन्मला आणि इंग्रजी हीच त्याची मातृभाषा होती. त्यामुळे लोकांनाही तो आपलाच आहे असे वाटे. गादीवर आल्याबरोबर आपल्या हातात सत्ता घेण्याचा त्याने प्रयत्न केला. पहिल्या दोन जॉर्ज राजांच्या कारकिर्दीत सत्ता व्हिग पक्षाच्या हातात होती. तिसरा जॉर्ज गादीवर येण्याच्या वेळी न्यू कॅसलचा ड्यूक आणि थोरला पिट ह्यांचे न पटल्यामुळे पिटने राजीनामा दिला. जॉर्जने आपल्या विश्वासातील प्रधान नेमले. पण पार्लमेंटमध्ये व्हिग पक्षाचे बहुमत असल्यामुळे दहा वर्षे जॉर्जला व्हिग पक्षामधून मंत्री नेमावे लागले. १७७० मध्ये मात्र टोरी पक्षास बऱ्याच जागा मिळाल्यामुळे राजाने आपल्या आज्ञेप्रमाणे वागणारा टोरी पक्षाचा प्रमुख लॉर्ड नॉर्थ यास मुख्य प्रधान केले. यानंतर बारा वर्षे राजाच्या इच्छेप्रमाणे कारभार चालला. जॉर्जला शेतकीची आवड होती आणि तो स्वतःला शेतकरी म्हणवून घेत असे. त्यामुळे ह्या बारा वर्षांस शेतकरी जॉर्ज अंमल असे म्हणतात.

ह्या सुमारास अमेरिकन वसाहतींवर कर बसविण्याचा हक्क पार्लमेंटला नाही, असा मुद्दा अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींनी उत्पन्न केला. ह्याचे कारण १७६५ मध्ये संमत झालेल्या स्टँप ॲक्टप्रमाणे अमेरिकेतील सर्व दस्तऐवजांना स्टँप लावणे जरूर आहे, असे ब्रिटिश पार्लमेंटने ठरविले होते. त्याविरुद्ध अमेरिकन वसाहतींनी चळवळ केल्यावर इंग्लंडने स्टँप ॲक्ट रद्द केला पण चहा, काच, कागद ह्यांवर कर बसविला. पार्लमेंटमध्ये आमचे प्रतिनिधी नाहीत, म्हणून आमच्यावर कर बसविण्यास पार्लमेंटला अधिकार नाही (नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन) अशी भूमिका वसाहतींनी घेतली होती. १७७३ मध्ये बॉस्टन बंदरात आलेल्या चहाच्या जहाजावरील चहाच्या पेट्या अमेरिकन लोकांनी समुद्रात फेकून दिल्या. इंग्लंडने बॉस्टन बंदर बंद केले आणि दंग्यास आळा घालण्याकरिता सैन्य पाठविले. आता वितुष्टास जोराने सुरुवात झाली. तेरा अमेरिकन वसाहतींनी फिलाडेल्फिया येथे आपली एक परिषद भरविली व इंग्लंडचा कर बसविण्याचा अधिकार अमान्य केला. १७७५ मध्ये वसाहती आणि मातृभूमी ह्यांत युद्ध सुरू झाले. ४ जुलै १७७६ या दिवशी अमेरिकन लोकांनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन यास आपला सेनापती म्हणून निवडले.

सप्तवार्षिक युद्धातील आपल्या पराभवाचे उट्टे काढण्याची फ्रान्स व स्पेन यांना इच्छा होतीच. इंग्लंडचे अमेरिकेतील वसाहतींशी युद्ध चालू आहे, हे पाहून फ्रान्स आणि स्पेन यांनी वसाहतींस साह्य केले. सॅराटोगा आणि यॉर्कटाउन येथील जबरदस्त पराभवानंतर इंग्लंडने माघार घेतली. १७८३ च्या व्हर्सायच्या तहाप्रमाणे इंग्लंडने वसाहतींचे स्वातंत्र्य मान्य केले. फ्रान्स आणि स्पेन यांना काही ठिकाणे इंग्लंडने परत केली.

अमेरिकेच्या युद्धामध्ये पराभव पतकरावा लागल्यामुळे नॉर्थचे मंत्रिमंडळ गडगडले आणि त्याबरोबर जॉर्जची सत्ताही संपुष्टात आली. थोरल्या पिटचा मुलगा धाकटा पिट हा मुख्य प्रधान झाला. त्याने बऱ्याच आर्थिक व व्यापारविषयक सुधारणा केल्या. याच काळामध्ये औद्योगिक क्रांती घडून आल्यामुळे इंग्लंडमध्ये थोड्या खर्चात अधिक माल तयार होऊ लागला आणि इंग्लंडची सांपत्तिक स्थिती सुधारली.

पहिल्या आर्थिक सुधारणांमुळे आणि औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंड संपन्न होत असतानाच फ्रान्समध्ये क्रांतीचे वारे वाहू लागले. फ्रेंच राज्यक्रांतीने (१७८९) इतके मोठे स्वरूप धारण केले की, इंग्लंडला त्यापासून अलिप्त राहणे कठीण झाले. क्रांतीकारकांनी यूरोपातील कोणत्याही राष्ट्राला आपल्या राज्याविरुद्ध उठण्यास मदत देऊ केली. लवकरच त्यांचे ऑस्ट्रिया व प्रशिया यांच्याशी युद्ध सुरू झाले. यामुळे इंग्लंडच्या हॉलंडबरोबरील व्यापारास अडथळा येऊ लागला. तेव्हा इंग्लंडने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले (१७९३). थोड्याफार अपवादाने हे युद्ध नेपोलियनचा पाडाव होईपर्यंत (१८१५) चालू राहिले. युद्धाच्या सुरुवातीसच नेपोलियनने ऑस्ट्रियाचा पराभव करून आपले सामर्थ्य जगास दाखविले. लवकरच त्याच्या हातात फ्रान्सची सर्व सत्ता आली. आरमारी युद्धात जरी इंग्लंडने फ्रेंचांचा पाडाव केला, तरी जमिनीवर नेपोलियनला विजयच प्राप्त झाला. १८०४ मध्ये नेपोलियनने आपणास फ्रान्सचा बादशाह म्हणून राज्याभिषेक करून घेतला. इंग्लंडवर स्वारी करण्याची मोठी तयारी करून त्याने मोठे आरमार इंग्लंडवर पाठविले. पण ट्रफॅल्‌गरच्या लढाईत नेल्सनने फ्रेंच आरमाराचा पूर्ण पराभव केला. परंतु ह्याच्या मागोमाग जमिनीवरच्या लढाईत नेपोलियनने त्यांच्या विरुद्ध तयार केलेल्या तिसऱ्या संघाचा पूर्ण पराभव केला. या पराभवामुळे पवित्र रोमन साम्राज्याचा बादशाह हा किताब टाकून देऊन ऑस्ट्रियाच्या राजाला फक्त ऑस्ट्रियाचा बादशाह एवढाच किताब धारण करावा लागला. या पराभवामुळे पिटची इतकी निराशा झाली, की तो लवकरच मरण पावला.

इंग्लंडवर स्वारी करण्याचे मनोरथ भंगल्यामुळे नेपोलियनने इंग्लंडची आर्थिक नाकेबंदी करण्याचा यत्न केला. इंग्लंड हे व्यापारी राष्ट्र असल्यामुळे आर्थिक कोंडमारा केल्यावर त्या राष्ट्रास शरण यावे लागेल, अशी त्याची कल्पना होती पण इंग्लंडने ऑर्डर्स इन कौन्सिल काढून फ्रान्स आणि त्यांची मित्र राष्ट्रे यांची आर्थिक नाकेबंदी जाहीर केली. इंग्लंडचे आरमार बलिष्ठ असल्यामुळे इंग्लंडला आपला हुकूम कृतीत उतरवता आला. नेपोलियनला मात्र ते शक्य झाले नाही उलट चोरटी आयात यूरोपमध्ये फार प्रमाणात होऊ लागली. नेपोलियनमुळे इंग्लंडने आपली आर्थिक नाकेबंदी केली, ह्या विचाराने नेपोलियनची मित्र राष्ट्रे त्याच्या विरुद्ध उठली. या शेवटच्या संघर्षात मॉस्कोवर स्वारी करण्याची चूक केल्यामुळे नेपोलियनची फार मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली. ह्याचा फायदा घेऊन इंग्लंडने नेपोलियनविरुद्ध चौथा संघ निर्माण केला आणि नेपोलियनचा पूर्ण पराभव केला (१८१५).

नेपोलियनबरोबर युद्ध चालू असतानाच इंग्लंड आणि आयर्लंड ह्यांच्यामध्ये एकीकरणाचा कायदा संमत झाला (१८००). १७७४ मध्ये पार्लमेंटने रेग्युलेटिंग ॲक्ट संमत करून ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात असलेल्या भारतातील मुलखावर आपली अधिसत्ता स्थापन केली. दहा वर्षांनंतर एक कायदा करून पार्लमेंटचा कंपनीवरचा अधिकार अधिक दृढ केला. अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणून भारतातील बऱ्याच राजे-नबाबांना कंपनीच्या जोखडाखाली आणले. १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करून ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपले अधिराज्य स्थापन केले.

अठराव्या शतकाच्या अखेरीस तिसऱ्या जॉर्जला वेडाचे झटके येऊ लागले. १८१० मध्ये तो पूर्णपणे वेडा झाला. त्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत (१८२०) प्रिन्स ऑफ वेल्स जॉर्जचा रिजंट या नात्याने राज्यकारभार पाहत असे.

पित्याच्या मृत्यूनंतर चौथा जॉर्ज (१८२०–३०) गादीवर आला. इंग्लंडमध्ये कॅथलिक पंथाविरुद्ध अनेक कडक कायदे होते. त्यांपैकी टेस्ट आणि कॉर्पोरेशन कायद्यांप्रमाणे कॅथलिक पंथीयांना कोणत्याही सरकारी अधिकाराच्या जागेवर राहता येत नसे. १८५८ मध्ये ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या प्रधान मंडळाने हे कायदे रद्द केले. कॅथलिक लोकांना पार्लमेंटचे सभासदही होता येत नसे. आयर्लंडमध्ये बहुसंख्य जनता कॅथलिक होती. त्यांचा पुढारी डॅन्येल ओकॉनल ह्याने कॅथलिकांना पार्लमेंटमध्ये प्रवेश मिळावा, म्हणून मोठी चळवळ उभारली. खरे पाहता कॅथलिक पंथीयांना सरकारी अधिकारांच्या जागा देऊ नयेत वा पार्लमेंटचे सभासद करू नये, असा कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. पण कोणाही अधिकाऱ्यास किंवा पार्लमेंटच्या सभासदास चर्च ऑफ इंग्लंडने तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे शपथ घ्यावी लागे. ह्या शपथेत राजा हा धार्मिक प्रमुख असे. कॅथलिक पंथी लोक पोप हा धर्माचा प्रमुख समजत असल्याने तेही शपथ घेऊ शकत नसत. त्यामुळे त्यांस ह्या जागा मिळत नसत. डॅन्येल ओकॉनल पार्लमेंटवर निवडून आला. पण अँग्लिकन चर्चची शपथ घेऊ न शकल्याने त्यास सभासद होता येईना. आयर्लंडमध्ये मोठी खळबळ माजली, हे पाहून १८२९ मध्ये कॅथलिक लोकांवरील निर्बंध दूर करण्याचा कायदा (कॅथलिक इमॅन्सिपेशन) पार्लमेंटने संमत केला.

नेपोलियनच्या पाडावानंतर दोस्त राष्ट्रांची व्हिएन्ना येथे परिषद भरली. तीमध्ये वेळोवेळी परिषदा भरवून यूरोपमध्ये शांतता राखावी असे ठरले. ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया, फ्रान्स, स्पेन येथील राजांनी ह्या कार्याकरिता होली अलायन्स म्हणून एक संघ स्थापन केला पण इंग्लंडने त्यास नकार दिला. १८३० साली फ्रान्समध्ये पुन्हा राज्यक्रांती होऊन बूर्‌बाँ राजघराण्याचा अंमल संपुष्टात आला आणि लूई फिलिपची नागरिक राजेशाही अस्तित्वात आली. या वेळी इंग्लंडच्या मदतीने बेल्जियम हे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आले. १८३० मध्ये चौथ्या जॉर्जच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ चौथा विल्यम (१८३०–१८३७) गादीवर आला. या वेळी पार्लमेंटची सुधारणा करण्याबाबत लोकांत फार मोठी चळवळ चालू होती. पार्लमेंटची रचना सु. साडेतीनशे वर्षांपूर्वी ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणेच होत होती. त्या वेळी जी शहरे अस्तित्वात होती, त्यांसच पार्लमेंटमध्ये प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार होता, त्यानंतर औद्योगिक क्रांतीमुळे नवी शहरे अस्तित्वात आली. उलट काही जुनी शहरे मोडकळीस आली होती. तरीसुद्धा जुन्या शहरांसच प्रतिनिधी पाठविण्याचा अधिकार होता. तसेच १४३० मध्ये ज्यांच्या जमिनीचे उत्पन्न ४० शिलिंग सारा देण्याएवढे होते, त्यांसच मतदानाचा अधिकार होता. त्यानंतर जमीन महसुलात अनेक फेरफार झाले होते. पण नवीन लोकांना अधिकार नव्हता. व्हिग पक्षाने ह्याविरुद्ध चळवळ करून १८३२ मध्ये सुधारणा कायदा संमत करून मतदानाचा हक्क विस्तृत केला आणि काही शहरांचे प्रतिनिधी पाठविण्याचे हक्क काढून घेऊन ते नवीन शहरांस दिले.

१८३७ मध्ये ⇨ व्हिक्टोरिया (१८३७–१९०१) इंग्लंडची राणी झाली. तिच्या कारकीर्दीमध्ये व्हिग आणि टोरी ही जुनी पक्षीय नावे मागे पडून लिबरल व कॉन्झर्व्हेटिव्ह ही नावे रूढ झाली. १८४६ मध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा मुख्य प्रधान सर रॉबर्ट पील याने संरक्षित व्यापाराची पद्धत नियंत्रित करून अनेक जिनसांवरील जकात कमी केली आणि धान्यावरील जकात पूर्णपणे काढून टाकली. १८४८ मध्ये चार्टिस्ट चळवळीत (१) सार्वत्रिक मतदानांचा हक्क, (२) गुप्तमतदानपद्धती, (३) पार्लमेंटची वार्षिक निवडणूक, (४) पार्लमेंटच्या सभासदांस मतदान, (५) लोकवस्तीच्या प्रमाणात मतदार संघ आणि (६) पार्लमेंटचे सभासद होण्यास विशिष्ट संपत्ती असण्याची अट नसावी, अशा सहा मागण्या मान्य होण्याकरिता विशेष खटपट झाली. त्या वेळी या मागण्या अमान्य करण्यात आल्या, तरी कालांतराने पार्लमेंटची वार्षिक निवडणूक या एका अटीखेरीज सर्व मागण्या संमत झाल्या.

व्हिक्टोरियाच्या कारकीर्दीत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा ⇨ डिझरेली व लिबरल पक्षाचा ⇨ ग्लॅडस्टन यांच्यातील सत्तास्पर्धा ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. दोघेही पहिल्याने कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षात होते आणि पीलचे अनुयायीही होते. धान्यावरील कर रद्द करण्याच्या बाबतीत कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षात फूट पडली व डिझरेलीच्या नेतृत्वाखालील बहुतेक जणांनी पहिला विरोध केला. ग्लॅडस्टन पीलबरोबर राहिला आणि नंतर लिबरल पक्षास मिळाला. खुल्या व्यापाराच्या धोरणाला ग्लॅडस्टनने आपला पाठिंबा दिला होता. ग्लॅडस्टनने प्राथमिक शिक्षण, गुप्तमतदान व आयर्लंडच्या जमिनीसंबंधीचा कायदा असे अनेक उपयुक्त कायदे संमत करून घेतले.

दुसऱ्या सुधारणा कायद्याने १८६७ मध्ये १८३२ च्या पहिल्या सुधारणा कायद्याचे कार्य पुढे रेटले आणि मतदानाचा हक्क जास्त विस्तृत प्रमाणावर लोकांना दिला. ग्लॅडस्टनच्या दुसऱ्यास प्रधान-मंडळाने १८८४ साली तिसरा सुधारणा कायदा संमत केला. या कायद्यान्वये शेतमजूर व शहरांतील मजूर यांस मतदानाचा हक्क मिळाला. ह्याच्या अगोदर डिझरेलीच्या प्रधान-मंडळाने व्हिक्टोरिया राणीला भारताची सम्राज्ञी हा किताब दिला (१८७७).

इंग्लंड आणि आयर्लंडचे एकीकरण १८०० मध्ये झाले खरे पण आयर्लंडमध्ये बहुसंख्य असलेल्या कॅथलिक लोकांना हा गोष्ट कधीही मानवली नाही. पहिल्याने डॅन्येल ओकॉनल आणि नंतर चार्ल्स पार्नेल यांच्या नेतृत्वाखाली एकीकरण रद्द करून आयर्लंडला स्वराज्य (होमरूल) मिळावे, अशी त्याने खटपट चालविली. अखेरीस ग्लॅडस्टनने आयर्लंडला होमरूल द्यायचे ठरविले. पण ह्या मुद्द्यावर लिबरल पक्षात मतभेद होऊन चेंबर्लिनच्या नेतृत्वाखाली अनेक लिबरल पक्षीयांनी पक्ष सोडून ग्लॅडस्टनला विरोध केला. यामुळे बरीच वर्षे चाललेली लिबरल पक्षाची कारकिर्द संपुष्टात येऊन कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार अस्तित्वात आले.

लिबरल पक्षाला १९०६ च्या निवडणुकीमध्ये पुन्हा सत्ता मिळाली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पार्लमेंटमध्ये नवीन स्थापन झालेल्या मजूर पक्षाचे ५१ सभासद निवडून आले हे होय. इंग्लंडमध्ये मजूर चळवळीचा उगम यापूर्वीच झाला होता. वेब पतिपत्नींनी स्थापन केलेली फेबियन सोसायटी आणि हार्डीची इंडिपेंडंट लेबर पार्टी या दोन संस्था मजुरांचे संघटन व समाजवादाचा प्रचार या काळी करीत होत्या.

नवीन पार्लमेंटमध्ये लिबरल पक्षाच्या हातात कॉमन्स सभा, तर कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे लॉर्ड्‌सच्या सभेत प्रचंड मताधिक्य यामुळे दोन्ही सभांत संघर्ष सुरू झाला. अखेरीस १९११ च्या पार्लमेंट कायद्यान्वये लॉर्ड्‌सच्या सभेला दुय्यम स्थान पतकरावे लागले. अर्थसंकल्पावरील त्यांचा अधिकार गेला व इतर कायद्यांच्या बाबतींत कॉमन्स सभेने केलेले विधेयक फक्त दोन वर्षे अडकवून ठेवण्याचा अधिकार त्यांच्या हातात राहिला.

व्हिक्टोरिया राणीच्या कारकिर्दीत भारतात उठाव झाल्यावर (१८५७) ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार बंद करण्यात आला आणि भारतामधील सत्ता राणीच्या सरकारकडे गेली.

तुर्कस्तानचे अफाट साम्राज्य एकोणिसाव्या शतकात कमी होत चालले होते. तुर्कस्तानचा उल्लेख युरोपमधील आजारी मनुष्य (सिक मॅन ऑफ यूरोप) असाच करीत. हिंदुस्थानकडे येण्याचा रस्ता या दृष्टीने इंग्लंडला तुर्कस्तानचे फार महत्त्व वाटे. म्हणून तुर्कस्तानमध्ये रशियाने हस्तक्षेप करताच, इंग्लंडने रशियाला विरोध करण्याचे धोरण स्वीकारले. ह्या धोरणाची परिणती १८५४ च्या क्रिमियन युद्धात झाली. या युद्धामध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल या सुप्रसिद्ध परिचारिकेमुळे या धंद्याची मुहूर्तमेढ रोविली.

सुएझच्या कालव्याचे काम १८६९ मध्ये पुरे झाले. भारताकडे जाण्याचा हा नवीन दर्यावर्दी मार्ग होता. फ्रान्स व ईजिप्त ह्यांच्याकडे सुएझ कालव्याच्या कंपनीचे शेअर्स होते. त्यामुळे तेच त्याचे मालक बनले. १८७५ मध्ये ईजिप्तच्या दुःस्थितीचा फायदा घेऊन डिझरेलीने ईजिप्तचे शेअर्स विकत घेतले. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडने आफ्रिकेतील फार मोठ्या भूभागावर सत्ता मिळविली. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्यांवरही इंग्लंडचा अधिकार होता. कॅनडा, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया ह्यांना अंतर्गत स्वायत्ततेचे हक्क देऊन त्यांना वसाहतींचे स्वराज्य देण्यात आले.

जर्मन राष्ट्र बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली १८७० मध्ये उदयास आले. १८७० च्या फ्रँको-जर्मन युद्धात फ्रान्सचा पाडाव झाल्यामुळे जर्मनीला यूरोपात मानाचे स्थान प्राप्त झाले. १८८८ मध्ये दुसरा कैसर जर्मनीच्या गादीवर आल्यावर त्याने चढाईचे धोरण अवलंबिले. त्यामुळे यूरोपात दोन गट पडले. जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटली ह्यांचा एक गट (ट्रिपल अलायन्स) व इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया ह्यांचा दुसरा गट (ट्रिपल अलायन्स). ह्यांची परिणती पहिल्या जागतिक महायुद्धात होऊन जर्मनीचा पूर्ण पराभव झाला.

व्हर्सायच्या तहाने (१९१९) जर्मनीवर इतक्या कठोर अटी लादल्या की, दुखावलेल्या जर्मन भावनांतून हिटलर व त्याचा नाझी पक्ष ह्यांचा उदय झाला. १९३३ मध्ये हिटलर जर्मनीचा सर्वसत्ताधीश झाला. बारा वर्षे त्याने सर्व यूरोपभर थैमान घातले. १९३८ मध्ये म्यूनिक करारावर सही करून ब्रिटिश पंतप्रधान नेव्हिल चेंबर्लिन याने हिटलरला शांत करण्यात प्रयत्न केला, पण त्यात त्यास अपयश आले व १९३९ मध्ये हिटलरने दुसऱ्या महायुद्धास सुरुवात केली. ह्या युद्धात ⇨ विन्स्टन चर्चिलने इंग्लंडला योग्य ते नेतृत्व देऊन एक थोर मुत्सद्दी आणि थोर युद्धमंत्री या नात्याने आपले नाव अजरामर केले.

सतत सहा वर्षे हे युद्ध चालले होते. इटली आणि जपान ह्यांनी जर्मनीच्या बाजूने रणांगणात उडी घेतली. पर्ल हार्बरवर जपानने केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिका युद्धात खेचली गेली. अखेरीस १९४५ मध्ये इंग्लंड प्रभृती दोस्त राष्ट्रांचा विजय होऊन युद्ध समाप्त झाले. ह्या युद्धात रशिया आणि अमेरिका यांनी हिटलरचा पाडाव करण्यात फार मोठा वाटा उचलला. हवाई युद्धातील फार मोठ्या प्रगतीमुळे इंग्लंडच्या नाविक वर्चस्वाची महती बरीच कमी झाली. अशा रीतीने जगातील पहिल्या क्रमांकाचे स्थान इंग्लंडला सोडावे लागले.

लढाईनंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रे या संघटनने (यूएन्) स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाला पाठिंबा दिल्यामुळे, लढाईतील एकंदर अनुभवामुळे आणि जागतिक परिस्थितीत झालेल्या बदलामुळे इंग्लंड व इतर देशांना आपले साम्राज्यवादी धोरण सोडावे लागले. युद्धानंतर आशिया खंड जागा झाला. इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड यांना तेथील आपल्या हुकमतीखालील राष्ट्रांना स्वातंत्र्य द्यावे लागले. ह्या नवीन लाटेची सुरुवात १९४७ मध्ये भारतास मिळालेल्या स्वातंत्र्याने झाली.

गेल्या वीस वर्षांत आफ्रिका खंडातही स्वातंत्र्याची लाट उसळली. एका मागोमाग तेथील वसाहतींना स्वातंत्र्य देणे इंग्लंडला भाग पडले. अशा रीतीने ज्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही, असा समज इंग्लिश साम्राज्यवादी करीत होते. त्या साम्राज्याचे विसर्जन झाले.

राव, व. दी.

राजकीय स्थिती : क्षेत्रफळ व लोकसंख्या यांच्या मानाने इंग्लंडने जागतिक इतिहासात अधिक मानाचे स्थान मिळविले आहे. औद्योगिक क्रांती तेथेच प्रथम झाल्याने आणि इंग्लंडने व्यापारी क्षेत्रात आघाडी मिळविल्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत आर्थिक दृष्ट्या, इंग्लंड हे जगातील एक श्रेष्ठ राष्ट्र बनले होते. आजसुद्धा जगातील पहिल्या दहा सधन राष्ट्रांत इंग्लंडची गणना करावी लागेल. आर्थिक उत्कर्षामुळे इंग्लंडचे लष्करी व राजकीय प्राबल्यही वाढत गेले. विसाव्या शतकात यामुळे इंग्लंडने चारही खंडांतील, जगाच्या सु. /भूभागावर पसरलेल्या सर्वांत मोठ्या अशा साम्राज्याची उभारणी केली. दुसऱ्या महायुद्धानंतर तौलनिक दृष्ट्या इंग्लंडचे लष्करी व आर्थिक सामर्थ्य घटले असले, तरी त्याचे राजकीय महत्त्व अद्यापि टिकून आहे. एके काळच्या त्याच्या विस्तृत साम्राज्यामुळे इंग्रजी भाषा, पाश्चात्त्य विचार आणि लोकशाही राज्यसंस्था आता स्वतंत्र झालेल्या बहुतेक ब्रिटिश वसाहतींनी स्वीकारल्या आहेत. या संस्थांमुळेच इंग्लंडला वैभव मिळविता आले, असे वाटून अनेक यूरोपीय व आशियाई-आफ्रिकी देशांनीही आपल्या राज्यव्यवस्थेची रचना इंग्रजी पद्धतीनुसार केली आहे. या राजकीय प्रभावामुळेच इंग्लंडला लोकशाही संस्थांची जननी मानण्यात येते.

संविधानात्मक इतिहास : इंग्लंडचा राजकीय विकास अत्यंत संथगतीने, फारसा रक्तपात न होता, सुरळीतपणे होत गेला. फ्रेंच राज्यक्रांती किंवा रशियन क्रांती यांसारखे प्रसंग इंग्लंडच्या इतिहासात दिसत नाहीत. प्राचीन काळातील जमात राज्याचे (ट्रायबल स्टेट) रूपांतर सरंजामी राजसत्तेत व त्यांची परिणती आजच्या संविधानात्मक राजेशाही लोकशाहीत झाली आहे. हे परिवर्तन शांततामय मार्गाने, टप्प्याटप्प्याने होत गेले. आज अनेक संस्थांचे सरंजामी नावरूप टिकून राहिले असले, तरी अधिकार मात्र बदलले आहेत. त्यामुळे इंग्लंडचे प्रचलित राजकारण समजण्यासाठी तेथील राजकीय संस्थांचा इतिहास समजावून घेणे आवश्यक आहे. हा बदल दोन टप्प्यांत झाला असे म्हणता येईल. पहिल्या टप्प्यात, म्हणजे १६८८ पर्यंतच्या काळात राजा आणि संसद यांच्यात सत्तेसाठी संघर्ष होत राहिला. या झगड्यात संसदेची सरशी झाली. संसद सार्वभौम बनली. १६८८ नंतर संसदेस प्रातिनिधिक व लोकाभिमुख करण्याच्या दिशेने सुधारणा होत गेली. विसाव्या शतकात राजा व संसद यांचे अधिकार लोकयुक्त मंत्री राबवू लागले. आज राज्य राणीचे पण सत्ता मात्र लोकांची अशी स्थिती आहे.

ट्यूडरपूर्व काळ : हा काळ सर्वार्थाने सरंजामशाहीचा काळ होय. अनेक राजकीय संस्थांचा उगम या काळात झाला. सरंजामशाही व्यवस्थेची सुरुवात अँग्लो-सॅक्सन काळात (६००–१०६६) झाली असली, तरी नॉर्मन आक्रमणानंतर ही व्यवस्था पूर्णावस्थेत आली. या व्यवस्थेत राजा हा सर्व जमिनीचा मालक समजण्यात येई. ही जमीन तो आपल्या अनुयायांना वाटून देई. हे सरंजामदार जमिनीच्या मोबदल्यात राजास लष्करी साहाय्य करण्यास तसेच वहिवाटीनुसार खंड व इतर कर देण्यास बांधलेले असत. अशाच अटींवर ते जमिनीचा काही भाग स्वतःकडे ठेवून बाकीचा आपल्या हाताखालील सरदारांना वाटून टाकीत. अशा रीतीने ही मालिका जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत जात असे. राजा आपल्या सरदारांच्या साहाय्याने राज्यकारभार पाही. या प्रथेमधूनच राष्ट्रीय सभेचा– पार्लमेंटचा– जन्म झाला.

इंग्लंडच्या इतिहासाच्या सुरुवातीपासूनच कोणत्या न कोणत्या स्वरूपात राष्ट्रीय सभा अस्तित्वात होती. अँग्लो-सॅक्सन काळात राज्यातील प्रमुख लोकांच्या सभेस विटन गेमॉट (शहाण्या लोकांची सभा) म्हणत. कायदे करण्याच्या, करवसुलीच्या आणि न्यायदानाच्या कामात ही सभा राजास साहाय्य करी. नॉर्मन आक्रमणानंतर विटनची जागा क्यूरिआ रेजीस या सभेने घेतली. या सभेस प्रमुख सरदार व धर्माधिकारी हजर असत, ट्यूडरपूर्व काळात फ्रान्सशी सतत चाललेल्या युद्धामुळे (शंभर वर्षांचे युद्ध) आणि वेळोवेळी धर्मयुद्धास मदत म्हणून राजास आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागे. हा खर्च सरंजामी करातून भागत नसे. तेव्हा राजे पैसा उभा करण्यासाठी जमीनदार सरदारवर्गांच्या सभा बोलावीत आणि त्यांच्या मान्यतेने अतिरक्त कर लादण्यात येत. असे कर संमतीशिवाय वसूल करण्याचा जॉन राजाचा प्रयत्न फसला. त्याच्या सरदारांनी बंड करून त्याच्याकडून ⇨ मॅग्ना कार्टा (१२१५) ही सनद मान्य करून घेतली. या सनदेस वैधानिक महत्त्व आहे. राजाहूनही श्रेष्ठ अशी काही मूलभूत तत्त्वे आहेत आणि त्यांचे पालन प्रसंगी राजाकडून सक्तीने करविले जाऊ शकते, हे या सनदेतून स्पष्ट होते. सरदारांच्या संमतीविना सरंजामी कराबाहेर करवसुली केली जाणार नाही, तसेच अन्यायाने कोणास कैद केले जाणार नाही, ही तत्त्वे त्यात मान्य केली गेली.

संसदेची खरी सुरुवात तिसऱ्या हेन्‍रीच्या काळात झाली. आपल्या पैशाच्या मागणीस आमजनतेचा पाठिंबा मिळेल, असे वाटून १२५४ मध्ये प्रत्येक परगण्यातून दोन प्रतिनिधींनाही उमरावांच्या सभेस हजर राहण्यास सांगण्यात आले. नंतर सायमनने हेन्‍रीविरुद्ध बंड केल्यावर बोलाविलेल्या सभेसही प्रत्येक परगण्यातून व शहरातून प्रत्येकी दोन प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले. अशा रीतीने देशातील सर्व वर्गांना संसदेमध्ये प्रतिनिधित्व दिले. यामुळे सायमनला संसदेचा जनक मानण्यात येते. प्रतिनिधित्वाची कल्पना ज्यूरी पद्धतीत अनुस्यूत होती. प्रत्येक व्यक्तीवरील कर निश्चित करण्यासाठीसुद्धा ही पद्धत अवलंबिली जात असे. तिसऱ्या हेन्‍रीच्या काळात यास राजकीय स्वरूप मिळाले. पहिल्या एडवर्डने १२९५ मध्ये जे पार्लमेंट बोलाविले, त्यास ‘नमुनेदार पार्लमेंट’ मानण्यात येते कारण यात देशातील सर्व वर्गांचे प्रतिनिधी होते. धर्माधिकारी व सरंजामदार यांशिवाय परगण्यांतून आणि शहरांतून प्रत्येकी दोन प्रतिनिधी बोलाविण्यात आले. १४१३ मध्ये प्रत्येक प्रतिनिधी हा त्या त्या परगण्याचा रहिवासी असावा, असा नियम करण्यात आला तर १४३० मध्ये चाळीस शिलिंग किमतीच्या उत्पन्नाची जमीन असणाऱ्यांनाच निवडणुकीचा हक्क प्राप्त झाला. प्रत्येक शहराचे मात्र निवडणुकीचे स्वतःचे असे स्वतंत्र नियम असत. विशिष्ट करांना ते देणाऱ्या वर्गाची मान्यता हवी, या सरंजामी कल्पनेतून राज्यातील प्रमुख जमीनदार व धर्माधिकारी (हेसुद्धा जमीनदार असत) आणि नागरी व ग्रामीण वर्गाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या सभांत बसू लागले. अशा रीतीने संसदेची दोन गृहे– हाउस ऑफ लॉर्ड्‌स व हाउस ऑफ कॉमन्स– निर्माण झाली.

सुरुवातीस आपल्या सरदारांच्या सल्ल्याने राजे महत्त्वाचे कायदे करीत. नंतर काही विषयांसंबंधी जनतेची गाऱ्हाणी दूर करण्यासाठी कायदे करावेत, म्हणून कॉमन्स सभा राजास विनंती (पिटिशन) करू लागली. पुढे पार्लमेंटच्या (कॉमन्स सभेच्या विनंतीवरून आणि उमरावांच्या सल्ल्याने) संमतीनेच कायदे व्हावेत, हे तत्त्व दुसऱ्या एडवर्डच्या काळात मान्य झाले (१३२२), तरी बहुधा राजे आपल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानेही नियम वा कायदे करीत. सुरुवातीस संसद विसर्जित झाल्यावरच तिने विनंती केलेल्या विषयावर कायदा करण्यात येई प्रसंगी हा कायदा मूळ विनंतीशी विसंगत असे. म्हणून १४१४ मध्ये संसदेने आपला हक्क मान्य करून घेतला आणि यापुढे केवळ विनंती-अर्ज पाठविण्याऐवजी राजाकडे विधेयके पाठवू लागले.

मॅग्ना कार्टानुसार कर संसदेच्या संमतीनेच लादावयास हवेत. तिसऱ्या हेन्‍रीच्या काळात ही अट काही काळ दुर्लक्षिण्यात आली. १२९५ नंतर ही परंपरा दृढ झाली. १२९७ मध्ये पहिला एडवर्ड आर्थिक अडचणीत असताना धर्मगुरूंनी कर द्यावयाचे नाकारले, तर सरदारांनी फ्रान्समध्ये जाऊन लढण्यास नकार दिला. यावर एडवर्डने लोकर जप्त करून त्यावर कर लादला. परंतु सर्व उमारावांनी शस्त्रबळावर एडवर्डला हा पायंडा पाडणार नाही, हे मान्य करावयास लावले. यानंतर पहिला, दुसरा व तिसरा एडवर्ड यांनी काही प्रत्यक्ष कर लादले असले, तरी १३४० मध्ये या तत्त्वास दुजोरा मिळाला. लोकर, मद्य आणि इतर मालांवर राजे निर्यात कर लावीत असत. परंतु याविरुद्धही संसदेची तक्रार सुरू झाली आणि शेवटी तिसऱ्या एडवर्डने संसदेच्या अनुमतीशिवाय असे प्रत्यक्ष कर बसवू नये हे मान्य केले (१३६२), १३७१ व १३८७ मध्ये हे बंधन अधिक दृढ करण्याचे प्रयत्न झाले परंतु काही परंपरागत अप्रत्यक्ष कर लादण्याचा राजाचा हक्क तसाच कायम राहिला.

सुरुवातीस तिन्ही वर्गांचे प्रतिनिधी आपल्या वर्गातर्फे कर मान्य करीत. हळूहळू हा हक्क कॉमन्सच्या प्रतिनिधींनी स्वतःकडे घेतला व त्यांच्या ठरावास लॉर्ड्‌सची सभा फक्त मान्यता देऊ लागली. हे कर विशिष्ट प्रसंगांसाठी असत. त्यामुळे करापोटी आलेली रक्कम अमुक कारणासाठीच खर्च व्हावी, हे तत्त्व मान्य झाले. अर्थात तसा खर्च झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी अधिकारी नेमणे, राजाने हिशेब सादर करणे हे ओघाने आले. १३४० ते १३९० या दरम्यानच्या काळात ही प्रथा पडली.

राजेपद हे अँग्लो-सॅक्सन काळात वंशपरंपरागत नव्हते. राजे निवडले जात. नॉर्मन आक्रमणानंतरही ही परंपरा औपचारिक रीत्या चालू राहिली. तिसऱ्या हेन्‍रीच्या काळापासून राजेपद आनुवंशिक बनले. नैसर्गिक कायदे हे राजाहून श्रेष्ठ आहेत, ही कल्पना होती. सरंजामदारांच्या व चर्चच्या हक्कांमुळे त्याच्या अधिकारावर मर्यादा पडत. या कायद्याविरुद्ध जाणाऱ्या राजास पदच्युतही केले जाई. दुसऱ्या एडवर्ड आणि दुसरा रिचर्ड यांना अनुक्रमे १२३७ व १३९९ मध्ये पदच्युत करण्यात आले होते. जॉन आणि तिसरा हेन्‍रीच्या यांनाही पदच्युत करण्याचे प्रयत्न झाले. परंतु यासाठी कोणतीही वैधानिक यंत्रणा नव्हती. पदच्युतीची कल्पना सरंजामी व्यवस्थेशी निगडित होती. रिचर्डच्या पदच्युतीनंतर संसदेने लँकेस्टर घराण्याची निवड केली. हे घराणे संसदेवर अवलंबून असल्यामुळे तिचे अधिकार व हक्क वाढले. या काळातच सभासदांचा भाषणस्वातंत्र्याचा हक्क मान्य झाला, मुलकी कारणावरून त्यांस बंदिस्त करण्यास मनाई करण्यात आली. संसदेचा अनादर करणाऱ्यास शिक्षा करण्याचा हक्क प्राप्त झाला.

ट्यूडर व स्ट्यूअर्ट काळ : ट्यूडर काळापर्यंत राजाच्या अधिकारावरील मर्यादा सरंजामदारांच्या हिताच्या दृष्टीने घातल्या गेल्या. इतर यूरोपीय देशांतही अशाच सरंजामी मर्यादा होत्या परंतु इंग्लंडचे वैशिष्ट्य हे की, तेथे उमरावांचा विरोध संस्थेच्या रूपात प्रकट झाला. त्यामुळे संसदेसारख्या संस्था बळकट झाल्या. ट्यूडर काळापासून राजकारणास वेगळे वळण लागले. गुलाबांच्या युद्धात जुनी सरंजामी घराणी नामशेष झाली. नवीन सरदार राजावर अवलंबून होते. आर्थिक उत्कर्षाबरोबर व्यापारी वर्गाचे महत्त्व वाढीस लागले. संसदेच्या कार्यावर त्यांच्या हितसंबंधाचा बराच प्रभाव दिसतो. या वर्गात आर्थिक उत्कर्षासाठी शांतता व सुबत्ता हवी होती. यादवी युद्धाची आठवण ताजी होती. मेरी व एलिझाबेथच्या काळात परकी आक्रमणाचीही भीती होती. धार्मिक आणि इतर क्षेत्रांत राजाचे धोरण या वर्गास अनुकूल होते. या सर्व कारणांमुळे पार्लमेंट अत्यंत नरम बनले. ट्यूडर राजांनी त्याला साधन म्हणून वापरले. परंतु अशा वापरामुळे पार्लमेंटच्या कार्यक्षेत्रात वाढच झाली. उदा., आतापर्यंत चर्च ही स्वायत्त संस्था होती. धार्मिक क्षेत्रात राजा हस्तक्षेप करू शकत नसे. परंतु हेन्‍रीने पोपशी संबंध तोडून टाकला. आता राजाच चर्चचा प्रमुख बनला (१५३५). त्याने सर्व धार्मिक मठ खालसा करून टाकले (१५३६, १५३९). एडवर्ड याने युनिफॉर्मिटीचा कायदा करून सर्व चर्चमध्ये प्रार्थनेचे एकच पुस्तक सक्तीचे केले. ह्या सर्व गोष्टी संसदेच्या अधिकारात कायद्याने केल्या गेल्या. आठव्या हेन्रीने पार्लमेंटकडून देहदंड देवविला. पार्लमेंटने काही काळापुरता कायदे करण्याचा हक्क राजास दिला. एवढेच नव्हे, तर राजाचा वारस कोण असावा, हेसुद्धा पार्लमेंटने राजाच्या इच्छेनुसार कायद्याने ठरविले.

ट्यूडर काळात पार्लमेंटच्या रचनेत बरेच बदल झाले. मठ खालसा झाल्यामुळे लॉर्ड्‌सच्या सभेत धर्माधिकाऱ्यांची संख्या घटली. ट्यूडर राजांनी अनेकांना सरदारकीच्या पदव्या बहाल केल्या. राजांनी नवनवीन शहरांना सनदा अर्पण केल्यामुळे कॉमन्स सभागृहात शहरी प्रतिनिधींची संख्या वाढली. हे प्रतिनिधी सुरुवातीस राजांनी नेमलेल्या नगरपित्यांनी निवडलेले असल्यामुळेही या सभेवर राजाचा प्रभाव पडे. संपूर्ण ट्यूडर काळात (११८ वर्षे) पार्लमेंटची सभा ३३ वेळा बोलावली गेली. तथापि प्रत्येक पार्लमेंटच्या सभेचा कार्यकाळ नियमित नव्हता.

पार्लमेंटने राजाच्या अधिकारावर घातलेली सरंजामी बंधने ट्यूडर राजांनी नव्या मार्गांनी झुगारली. कायदे करण्याचा अधिकार पार्लमेंटचा असला, तरी राजे अध्यादेश जारी करू शकत. या अधिकारात अनेक प्रकारचे नियम करण्यात येत. ते मोडणाऱ्यास शिक्षा होई. राजाने स्टार चेंबर, हायकमिशन यांसारखी नवीन न्यायालये निर्माण केल्यामुळे असे अध्यादेश अंमलात आणणे सोईचे झाले. या न्यायालयांत राजाचे मंत्रीच न्यायदान करीत. सरंजामी पारंपरिक करांपलीकडे नवीन कर राजाने लादू नयेत, हे तत्त्व मान्य झाले असले, तरी लोकांकडून राजे देणग्या वसूल करू लागले. व्यापारी क्षेत्रात नवीन कर लादण्यास वाव मिळाला. आयात-निर्यात होणाऱ्या मालांवर कर लादले जाऊ लागले.

राजाची पार्लमेंटवरील पकड एलिझाबेथ राणीच्या काळात ढिली पडू लागली. एलिझाबेथच्या कारकिर्दीच्या शेवटी पार्लमेंटमध्ये राणीविरोधी सूर उमटू लागला होता. परंतु राजा आणि पार्लमेंट यांच्यातील खऱ्या संघर्षाची सुरुवात स्ट्यूअर्ट काळात झाली. आठव्या हेन्‍रीच्या काळात वारसाहक्कासंबंधी पार्लमेंटने केलेल्या कायद्याविरुद्ध जेम्स हा राजा झाला. त्यामुळे राजाचा अधिकार हा दैवी प्रेरणेने त्यास मिळतो, त्यास विरोध करणे केवळ गुन्हाच नव्हे तर पापही आहे, अशी पहिल्या जेम्सची श्रद्धा होती. पार्लमेंटच्या वाढत्या अधिकारांस त्याने आव्हान दिले. स्पॅनिश आरमाराचा एलिझाबेथने पराभव केल्यामुळे परकी आक्रमणाची भीती कमी झाली होती. इंग्लंडमध्ये प्रॉटेस्टंट पंथ लोकप्रिय होत होता. या पंथाच्या, विशेषतः कॅल्व्हिनवादाच्या शिकवणुकीत, लोकसत्तेस महत्त्वाचे स्थान असल्यामुळे अनियंत्रित राजसत्तेस विरोध करण्याची वृत्ती वाढत होती. स्ट्यूअर्ट राजांच्या धार्मिक आणि परराष्ट्रीय धोरणांस इंग्लंडमधील लोकमत विरोधी होते. पौंडाची किंमत घटल्यामुळे राज्यकारभाराचा खर्च वाढला होता. स्ट्यूअर्ट राजांत पार्लमेंटला सांभाळून घेण्याचे व लोकमत अजमावण्याचे चातुर्य नव्हते. या सर्व कारणांमुळे संघर्ष अटळ होता. राजा व पार्लमेंट यांत श्रेष्ठ कोण, हे या संघर्षातून ठरावयाचे होते.

पहिल्या जेम्सच्या कारभाराची सुरुवातच पार्लमेंटच्या संघर्षापासून झाली. पार्लमेंटमध्ये कोण निवडून यावे, यावर चॅन्सरी कोर्टातर्फे जेम्सने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. हा हक्क आपला असल्याचे आणि पार्लमेंटचे हक्क हे प्राचीन व जन्मसिद्ध असल्याचे पार्लमेंटने जेम्सच्या निदर्शनास आणून दिले. याउलट पार्लमेंटचे सर्व हक्क राजाच्या मर्जीवर अवलंबून असावेत, असे जेम्सने फर्मावले. १६२१ मध्ये पार्लमेंटने राजकुमाराचा विवाह स्पेनच्या राजकुमारीशी न करता प्रॉटेस्टंट पंथीय मुलीशी करावा, अशी विनंती केली. परराष्ट्रीय धोरणात लुडबुड करण्याचा पार्लमेंटचा अधिकार नाही, असे जेम्सने बजाविले. याउलट आपले हक्क परंपरेने मिळाले आहेत, असे एका निषेधाच्या ठरावात पार्लमेंटने ठामपणे मांडले. जेम्सने हे निषेधाचे पान इतिवृत्तातून फाडून टाकले व आपल्या विरोधात असणाऱ्या सभासदांना तुरुंगात टाकले.

पार्लमेंटने जेम्सला पुरेसे अनुदान दिले नाही, तेव्हा त्याने आयातीवर पार्लमेंटच्या संमतीविना कर लादला. बेट्सच्या खटल्यात हा कर परराष्ट्रीय धोरणाशी निगडित असल्यामुळे कोर्टाने वैध ठरविला. यावर जेम्सने अनेक आयात करांत अध्यादेश काढून वाढ केली. सक्तीने देणग्या वसूल केल्या, सनदी मक्तेदारीचे हक्क विकले. या अध्यादेशास पार्लमेंटने विरोध केला व कोर्टाने राजास नवे गुन्हे ठरविणारे अध्यादेश काढण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला. पहिल्या चार्ल्सच्या काळात हा संघर्ष जास्त तीव्र झाला. पार्लमेंटने त्यास कायम अनुदान देण्याचे नाकारले, तेव्हा त्याच्या संमतीशिवाय तो कर वसूल करू लागला. त्याच्या दुसऱ्यात पार्लमेंटने राजाचा सल्लागार ड्यूक ऑफ बकिंगहॅम यास महाभियोग लावला. यापूर्वी जेम्सच्या काळातही त्याचा मंत्री बेकन याची चौकशी करून त्यास भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिक्षा केली होती. बकिंगहॅमला वाचविण्यासाठी चार्ल्सने पार्लमेंट विसर्जित केले. चार्ल्सने अवैध रीतीने कर जमा करावयाचा प्रयत्न केला. कर न देणाऱ्यांस तुरुंगात डांबले. स्पेन व फ्रान्स या देशांशी युद्धाचा धोका निर्माण झाला, केव्हा मात्र चार्ल्सला पार्लमेंटची सभा बोलाविणे भाग पडले. या पार्लमेंटने (१६२८) आपल्या हक्कांचा एक मसुदा (पिटिशन ऑफ राइट्स) राजापुढे ठेवला व मसुद्यास राजास संमती देण्यास भाग पाडले. यात पार्लमेंटच्या संमतीविना लोकांकडून देणग्या, कर्ज अथवा कर राजाने घेऊ नयेत, तसेच योग्य चौकशीशिवाय कोणास अटकेत ठेवू नये, शांततेच्या काळात लष्करी कायदा पुकारू नये इ. तत्त्वे होती. ह्या करारास इंग्लंडच्या इतिहासात मॅग्ना कार्टाच्या बरोबरीने स्थान आहे.

यानंतर पार्लमेंटने राजाने बसविलेल्या करांविरुद्ध निषेध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चार्ल्सने काही सभासदांना अटक केली व पार्लमेंटची सभा विसर्जित केली. त्याने पुन्हा अनियंत्रित कारभार करण्यास सुरुवात केली. जुने सरंजामी कर पुनरूज्जीवित करून पार्लमेंटशिवाय १६२९ पासून १६४० पर्यंत राज्यकारभार चालविला. या कामी त्यास टॉमस वेंटवर्थ (अर्ल ऑफ स्ट्रॅफोर्ड) आणि धार्मिक क्षेत्रात आर्च बिशप लॉर्ड यांचे साह्य झाले. लॉर्ड याने प्यूरिटन पंथविरोधी धोरण अवलंबिले. या धोरणाविरुद्ध स्कॉटलंडमध्ये बंड उद्‌भवले. तेव्हा पुन्हा पार्लमेंट बोलाविणे चार्ल्सला भाग पडले. या पार्लमेंटने राजाच्या जुलमी कारभारास पायबंद घालण्याचे ठरविले. पार्लमेंटने स्ट्रफोर्ड आणि लॉर्ड यांविरुद्ध महाभियोग चालविला आणि त्यांस फाशी दिले. सातवा हेन्‍री याने स्थापन केलेली स्टार चेंबर, हायकमिशन इ. न्यायालये बंद केली. तीन वर्षांत एकदा तरी पार्लमेंटची सभा बोलाविली पाहिजे, असा कायदा केला. पन्नास दिवसांच्या आत ती बरखास्त करू नये, अशीही त्यात तरतूद होती. पार्लमेंटने ग्रँड रेमॉन्स्ट्रन्स नावाच्या ठरावाद्वारे पार्लमेंटच्या विश्वासातील मंत्रीच राजाने नेमावे, अशी मागणी केली. चार्ल्सने पार्लमेंटच्या पुढाऱ्यांस सभागृहात जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच सनदशीर बदलाचे मार्ग सोडून दोन्ही पक्षांनी युद्धमार्गाचा अवलंब केला. आता पार्लमेंटला सर्व अधिकाऱ्यांच्या नेमणुकीवर, राष्ट्रीय सैन्यावर आणि चर्चवर स्वतःचे नियंत्रण हवे होते. १६४२ मध्ये सुरू झालेल्या या युद्धात चार्ल्सचा पराभव झाला. राष्ट्रद्रोहाच्या आरोपावरून त्यास फाशी देण्यास आले. १६४९ ते १६६० पर्यंत लोकसत्ताक स्वरूपाचे शासन लिखित घटनेनुसार करण्यात आले. क्रॉमवेलच्या मृत्यूनंतर हा प्रयोग चालू शकला नाही. १६६० मध्ये चार्ल्सच्या मुलास (दुसरा चार्ल्स) बोलावून गादीवर बसविण्यात आले.

या राज्यक्रांतीमुळे दोन गोष्टी सिद्ध झाल्या : (१) सार्वभौम सत्ता राज्यसंस्थेची असेल, आणि ती संसदेमधूनच व्यक्त होऊ शकते. (२) प्रत्यक्षात संसदेचे महत्त्व आणि अनिवार्यता सिद्ध झाली. यापुढे अनियंत्रित राज्यकारभार शक्य नाही हे स्पष्ट झाले. याचा पडताळा दुसरा चार्ल्सच्या काळातच आला. चार्ल्सचा ओढा कॅथलिक पंथाकडे होता. याउलट पार्लमेंटने अनेक कायदे– क्लँरन्डन विधिसंहिता–करून राष्ट्रीय चर्चला अनुसरून असलेले धार्मिक विधी या सर्वांसाठी सक्तीचे केले. या कायद्याच्या अंमलातून कॅथलिक लोकांना सूट द्यावयाचा मानस चार्ल्सने एका जाहीरनाम्यातून व्यक्त केला (१६६२). पार्लमेंटच्या विरोधामुळे त्यास हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. पार्लमेंटने टेस्ट ॲक्ट संमत केला. यानुसार सर्व अधिकाराच्या जागा– पार्लमेंटचे सभासदत्व, मंत्रिपद, राजेपद– इपिस्कोपेलियन पंथीयानाच मिळाव्यात असे ठरविले. १६७३ मध्ये चार्ल्सने सर्व धार्मिक गुन्हे ठरविणारे कायदे रद्द करावयाचे ठरविले. पुन्हा एकदा पार्लमेंटने असा हक्क राजास नाही, असा दावा केला. चार्ल्सला आपला आग्रह पुन्हा एकदा सोडावा लागला.

राजाच्या कृत्यासाठी त्याच्या मंत्र्यांना जबाबदार धरावयाचे तत्त्व बकिंगहॅमच्या खटल्यात प्रतिपादन करण्यात आले होतेच. आता पुन्हा डॅन‌्‌बी नावाच्या मंत्र्याची चौकशी चालवून हे तत्त्व स्पष्ट करण्यात आले. राज्यकारभारावर नियंत्रण करण्यासाठी पार्लमेंटने आणखी एक पद्धत अंगीकारली. राज्याचे हिशेब तपासण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. पार्लमेंटने संमत केलेल्या कारणासाठीच पैसा खर्च होईल, याची यामुळे खात्री झाली. राजाचा भाऊ जेम्स हा कॅथलिक होता, तो वारस होऊ नये, यासाठी पार्लमेंटमध्ये प्रयत्न सुरू झाले. तेव्हा चार्ल्सने पार्लमेंट-सभा बरखास्त केली. आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या काळात पार्लमेंटच्या पकडीतून सुटण्यासाठी चार्ल्सने वेगळा मार्ग अवलंबिला. फ्रान्सच्या राजाशी दोस्ती करून त्याकडून आर्थिक साह्य मिळविले. राजास विरोध नागरी प्रतिनिधींकडून होत असे. तेव्हा त्याने अनेक शहरांच्या जुन्या सनदा रद्द करून नव्या सनदा देऊ केल्या. यानुसार प्रतिनिधी निवडण्याचा हक्क काही थोड्या लोकांनाच देण्यात आला. शहरी प्रतिनिधीच्या निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्याचा हा एक प्रयत्न होता.

दुसरा जेम्स गादीवर आल्यावर धार्मिक क्षेत्रातील त्याच्या हटवादीपणामुळे पार्लमेंटवर नियंत्रण ठेवण्याचे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. सर्व कॅथलिकांना कायद्याच्या बंधनातून सूट द्यावयाचे त्याने ठरविले. अधिकार ग्रहण करण्यासाठी असलेली धर्माची अट त्याने काढून टाकली. विद्यापीठ, चर्च, मंत्रिमंडळ, सैन्य यांमध्ये कॅथलिक धर्मीयांना अधिकारपदी नेमण्याचे सत्र त्याने सुरू केले. आपला वरील जाहीरनामा सर्व चर्चमध्ये वाचण्याची त्याने सक्ती केली. यास विरोध करणाऱ्या धर्माधिकाऱ्यांस बंदिस्त केले. लंडन शहरास दहशत बसविण्यासाठी त्याने त्या शहराजवळ सैन्याचा तळ ठोकला. जेम्सच्या या सर्व कृत्यांस उत्तर म्हणून त्याच्या विरोधकांनी जेम्सच्या प्रॉटेस्टंट जावयास–विल्यम ऑफ ऑरेंज–राजपद स्वीकारण्याचे आमंत्रण दिले. विरोधकांचा जोर पाहून जेम्सने देशत्याग केला. अनियंत्रित राज्यकारभाराचा हा शेवटचा प्रयत्न व्यर्थ ठरला. स्वयंनिर्मित अशा कन्व्हेन्शन पार्लमेंटने काही अटींवर विल्यम आणि मेरी यांस संयुक्तपणे राजपद दिले. या अटी बिल ऑफ राइट्स (हक्कांचे परिपत्रक) यांत ग्रथित करण्यात येऊन त्यास कायद्याचे रूप देण्यात आले. १६८८ पर्यंत राजाशी झालेला संघर्षात मिळविलेल्या अधिकारांचे सार त्यात आले. पार्लमेंटच्या संमतीशिवाय कायदे करू नयेत, कर बसवू नयेत, केलेले कायदे रद्द करू नयेत असे ठरविण्यात आले. पार्लमेंटचे विशेष हक्क मान्य करण्यात आले. पार्लमेंटच्या संमतीशिवाय खडी फौज ठेवण्यास वा लष्करी कायदा पुकारण्यास राजास बंदी करण्यात आली.

पार्लमेंटने तिसऱ्या विल्यमच्या काळात तीन महत्त्वाचे कायदे केले. एका कायद्यान्वये पार्लमेंटची सभा एकदा तरी तीन वर्षांत बोलाविलीच पाहिजे आणि तिची कमाल कालमर्यादाही तीन वर्षे ठरविण्यात यावी (१६९४). वारसाहक्काच्या कायद्यान्वये (१७०१) विल्यमनंतर ॲन व तिच्यानंतर हॅनोव्हर घराण्यातील राणीची प्रॉटेस्टंट मुले-मुलीच गादीवर यावीत, असे ठरविण्यात आले. म्युटिनी ॲक्ट हा कायदा संमत करून सैन्यात शिस्त ठेवण्याचे अधिकार एक वर्षापुरते राजास देण्यात आले. हा अधिकार राजाकडे ठेवण्यासाठी दरवर्षी या कायद्याचे नूतनीकरण करावे लागे. त्यामुळे दरवर्षी पार्लमेंटची सभा बोलाविणे राजास आपोआपच सक्तीचे झाले. अशा रीतीने इंग्लंडच्या राजकीय विकासातील एक पर्व संपले. यानंतरही राजाचे अधिकार दीर्घकाळ न वापरल्याने नंतर ते वापरू नयेत असा संकेत झाला. इतर अधिकार राजातर्फे मंत्रिमंडळ वापरू लागले. १६८८ नंतरच्या काळात इंग्रजी संविधानाच्या तीन अंगांची प्रामुख्याने वाढ झाली. (१) मंत्रिमंडळ आणि कॅबिनेटपद्धती, (२) पार्लमेंटचे लोकशाहीकरण व (३) पक्ष पद्धतीचा विकास.

१६८८च्या घटनांमुळे पार्लमेंटचे वर्चस्व सिद्ध झाले. परंतु राजाकडे अनेक विशेषाधिकार, विशेषतः कार्यकारी क्षेत्रात, तसेच राहिले. १६८८ पर्यंत अनियंत्रित राजेशाहीचे परिवर्तन मर्यादित राजेशाहीत झाले होते. लोकशाही राज्यव्यवस्था स्थापन होण्यासाठी दैनंदिन राज्यकारभारावर संसदेने नियंत्रण असावयास हवे होते, पण हे नियंत्रण ठेवण्याची पद्धत अद्याप गवसली नव्हती. मध्ययुगात आणि स्ट्यूअर्ट काळात या दिशेने काही अर्धवट प्रयत्न झाले, यांत मंत्री हे संसदेच्या विश्वासातील असावेत अशी योजना होती. वेळोवेळी मंत्र्यांविरुद्ध संसदेने चालविलेल्या महाभियोगामागे ही भूमिका होती. तथापि मुख्यतः कॅबिनेटपद्धतीचा विकास अभावितपणे झाला.

फार पूर्वीपासून राज्यभार काही सरदारांच्या सल्ल्यानुसार चालविण्यात येत असे. या सरदारांच्या समितीस प्रिव्ही कौन्सिल हे नाव पडले. स्ट्यूअर्ट काळात याच्या सभासदांची संख्या एवढी वाढली की, स्ट्यूअर्ट राजे त्यातील काही लोकांवरच विसंबून राहू लागले. आजसुद्धा ही संस्था अस्तित्वात आहे, पण ती समारंभप्रसंगीच फक्त कार्य करते. १६८८नंतर राजांना पार्लमेंटवर अवलंबून रहावे लागू लागले, तेव्हा साहजिकच पार्लमेंटच्या सभेत वजन असणाऱ्या सभासदांना मंत्री करणे राजकीय दृष्ट्या सोयीचे ठरले. तिसरा विल्यम आणि ॲन यांच्या काळात सर्व राजकीय गटांतून मंत्री निवडण्यात येत. कॅबिनेटची खरी वाढ पहिला जॉर्ज याच्या कारकिर्दीपासून झाली. त्यास आणि त्याच्यानंतर गादीवर आलेला दुसरा जॉर्ज यांस इंग्रजी येत नव्हते, शिवाय इंग्रजी राजकारणात रस नव्हता. त्यांचे लक्ष हॅनोव्हर व जर्मनीतील राजकारणाकडे होते. यामुळे ते मंत्रिमंडळाच्या सभेस हजर नसत. त्याच्या घराण्यास व्हिग पक्षाचा मुख्य आधार होता, टोरी पक्षाचा ओढा स्ट्यूअर्ट घराण्याकडे होता. यामुळे इंग्लंडचा कारभार त्यांनी व्हिग पक्षाच्या मंत्र्यांवर सोपविला. या मंत्र्यांत वॉल्पोल हा व्यवहारचतुर होता. राजा व संसद यांना सांभाळण्यात त्याने कौशल्य दाखविले धोरणात आणि मंत्रिमंडळात शिस्त आणली. या नेतृत्वगुणांमुळे इतर मंत्र्यांहून तो वरचढ झाला. त्यास पंतप्रधान म्हणण्यात येऊ लागले. आपल्या धोरणास विरोध करणाऱ्या मंत्र्यांस त्याने काढून टाकले. अनेक प्रकारची आमिषे, उदा., पदव्या, नोकऱ्या, बक्षिसे यांच्या साह्याने त्याने संसदेच्या सभासदांना स्वतःच्या धोरणास अनुकूल करून घेतले. अशा रीतीने १७२१ पासून सतत २१ वर्षे वॉल्पोस पंतप्रधान राहिला. त्यामुळे एका पक्षाचे मंत्रिमंडळ व पंतप्रधानपद हा प्रकार दृढ झाला. १९३७ मध्ये मंत्र्यांचे पगार ठरविणाऱ्या कायद्यान्वये या पदास (कॅबिनेट मंत्र्यास) कायद्याची मान्यता मिळाली.

तिसऱ्या जॉर्जने पंतप्रधानाकडून पुन्हा आपल्या हाती सत्ता घेण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात त्याचे धोरण फसल्यामुळे लोकमत प्रक्षुब्ध झाले व पुन्हा सत्ता पंतप्रधानांच्या (धाकटा पिट) हाती सोपवावी लागली. या काळात मंत्रिमंडळ व संसद यांच्यात एकमत असल्यामुळे संसदेने संमत केलेल्या विधेयकास नकार देण्याचा राजाचा अधिकार मागे पडला. १७०७ नंतर तो पुन्हा कधी वापरला गेला नाही. १८३२ च्या संसदेच्या सुधारणेच्या संदर्भात हे स्पष्ट झाले की, संसदेचा पाठिंबा असल्याशिवाय केवळ राजाच्या मर्जीच्या आधारे मंत्र्यांना काम करता येणार नाही. १७८२ च्या व १८३२ च्या सुधारणा झाल्यावर केवळ आमिषे दाखवून सभासदांवर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. यापुढे मंत्र्यांना राजापेक्षा लोकमताकडे लक्ष देणे आवश्यक भासू लागले. १८४१ मध्ये कॉमन्समध्ये त्या सभेच्या विश्वासातील मंत्रीच अधिकारपदी असावेत, असा ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर कॉमन्स सभेत बहुमत असणाऱ्या पक्षाचा नेता पंतप्रधान व्हावा, ही प्रथा रूढ झाली.

यानंतर संसदेच्या लोकशाहीकरणास गती मिळाली. १७०७ मध्ये स्कॉटलंड व १८०० मध्ये आयर्लंड यांचा समावेश ग्रेट ब्रिटनमध्ये झाल्यावर कॉमन्स सभेची सभासदसंख्या ६५८ झाली. यात ४५ स्कॉटलंडचे व १०० आयर्लंडचे प्रतिनिधी होते. इंग्लंडच्या प्रतिनिधींपैकी / प्रतिनिधी शहरी भागांतून येत. निवडणूकपद्धत इतकी सदोष होती की, बहुसंख्य सभासद फक्त ६,००० मतदारांनी निवडलेले असत. संपूर्ण देशात मतदानाचा अधिकार फक्त ४·३५ लक्ष लोकांनाच होता. औद्योगिक क्रांतीमुळे अनेक ठिकाणच्या लोकसंख्येत कमालीचे बदल झाले होते. जुन्या शहरांची खेडी झाली होती. नवीन शहरे उदयास आली होती. या नवीन शहरांस प्रतिनिधित्व नव्हते. या कारणांमुळे भ्रष्टाचारास खूप वाव होता. संसदेवर जमीनदार व धनिकवर्गाची पकड होती. औद्योगिक क्रांतीमुळे मध्यमवर्गात वाढ झाली होती, परंतु त्यास पुरेसे प्रतिनिधित्व नव्हते. तिसरा जॉर्ज याने स्वतःच्या हाती कारभार घेण्यासाठी अनैतिक उपायांनी कॉमन्स सभेवर नियंत्रण ठेवले होते. या सर्व कारणांमुळे निवडपद्धतीत सुधारणेची मागणी जोर धरू लागली. १८३२ मध्ये व्हिग पक्षास बहुमत मिळाल्यावर ती रोखणे राजास व लॉर्ड्‌सच्या सभेस जड गेले. १८३२ मध्ये सुधारणेचा कायदा संमत झाला. ह्या कायद्यान्वये मतदानाचा हक्क आणखी दोन लक्ष लोकांना मिळाला. शहराची लोकसंख्या व प्रतिनिधींची संख्या यांत प्रमाण राखण्यात आले. या सुधारणेमुळे पक्षबांधणीस चालना मिळाली. आता संसदेमध्ये बहुमत मिळविण्यासाठी जनता संचलित करणे आवश्यक झाले. १८६७ मध्ये आणखी एक कायदा करून मतदान करण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्नाची अट सैल केली. त्यामुळे २० लक्ष लोक मतदार बनले. १७७२ मध्ये गुप्तमतदानपद्धती अंमलात आली. १९१८ मध्ये मतदानाचा हक्क स्त्रियांना देण्यात आला. उत्पन्नाची अट संपूर्णपणे काढून टाकण्यात आली. या सुधारणा इंग्लंडमधील सामाजिक व आर्थिक बदलांमुळेच घडून आल्या. वाढत्या मध्यमवर्गीयांना व कामगारांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सत्तेत सहभाग हवा होता. त्यांच्या वाढत्या दबावामुळे या सुधारणा शक्य झाल्या.

१८३२ पर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहांत जमीनदारांचाच प्रभाव असल्यामुळे त्यांच्यात फारसा संघर्ष होत नसे. कॉमन्सचे सभासद हे अनेकदा लॉर्ड्‌समधील उमरावांच्या पाठिंब्याने पुढे आलेले नेते असत. १८३२ च्या सुधारणांना लॉर्ड्‌सच्या सभेचा कडवा विरोध होता. लोकमताच्या दबावाखाली आणि राजाने त्या विधेयकास अनुकूल असलेल्या लोकांस उमरावकी देण्याची धमकी दिल्यावरच ते विधेयक संमत झाले. यानंतर मात्र दोन्ही सभागृहांचे खटके उडू लागले. विशेषतः लॉर्ड्‌सनी उदारमतवादी पक्षास व त्याच्या धोरणास सतत विरोध चालविला. उदा., आयर्लंडला स्वायत्तता देण्यास व धान्यावरील आयात कर काढून टाकण्यास त्यांनी विरोध केला. १९०९ मध्ये त्यांनी अर्थसंकल्प नामंजूर केला. नवीन निवडणुकीत उदारमतवादी पक्षास बहुमत मिळाले. तेव्हा त्या पक्षाने लॉर्ड्‌सचे अधिकार कमी करावयाचे ठरविले. अर्थात या विधेयकासही विरोध झाला. पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. यात पुन्हा उदारमतवादी पक्षच निवडून आल्यावर मात्र हा सुधारणेचा कायदा संमत झाला. यानुसार अर्थ विधेयके नामंजूर करण्याचा लॉर्ड्‌सचा अधिकार काढून घेण्यात आला. इतर विधेयके कॉमन्स सभेच्या मताविरुद्ध किमान दोन वर्षे रोखून धरण्याचाच त्यांचा अधिकार राहिला. १९४९ मध्ये मजूर पक्ष अधिकारारूढ असताना ही मुदत एक वर्षाची करण्यात आली.

इंग्लंडमधील प्रमुख पक्ष स्ट्यूअर्ट काळात निर्माण झाले. धार्मिक, ऐतिहासिक कारणांतून त्यांचा जन्म झाला. प्रॉटेस्टंट पंथ व संसद यांचा पक्ष उचलून धरणाऱ्यांना व्हिग म्हणण्यात येऊ लागले. राष्ट्रीय चर्च व राजाच्या बाजूस झुकणाऱ्यास टोरी हे विशेषण मिळाले. निवडणुकपद्धतीत सुधारणा होईपर्यंत पक्षाची बांधणी राजकीय आणि आर्थिक मतप्रणालींच्या आधारे होत नसे. काही प्रमुख घराण्यांभोवती, त्यांच्या अनुयायांच्या मदतीने पक्ष उभा राही. पक्षसंघटना देशव्यापी न राहता फक्त संसदेच्या सभासदांपुरतीच मर्यादित असे. त्यांच्यात शिस्त फारशी नव्हतीच. त्यामुळे संसदेमध्ये सरकारचा पराभव झाल्यानंतरही मंत्री राजीनामा देत नसत. १८३२ व विशेषतः १८६७ नंतर मतदारांना संघटित करण्याची जरूरी भासू लागली. यातून स्थानिक स्तरावर संघ निर्माण झाले. असे अनेक संघ नियंत्रितपणे एखाद्या पक्षास पाठिंबा देऊ लागले. अशा रीतीने पक्षसंघटना निर्माण झाली.

सर्वसाधारणपणे प्रॉटेस्टंट पंथीय, व्यापारी वर्ग व काही जमीनदार घराणी यांचा व्हिग पक्षास पाठिंबा असे. १७६० पासून १८३० पर्यंत काही थोड्या काळाचा अपवाद सोडल्यास टोरी पक्षाच्या हाती सत्ता होती. १८३० मध्ये व्हिग पक्ष अधिकारावर आला व त्याने निवडणुकीत सुधारणा घडवून आणल्या. त्यांना उद्योगपती, व्यापारी वर्ग आणि आयरिश लोकांची सहानुभूती होती. टोरी पक्ष हा ग्रामीण हिताचे प्रतिनिधित्व करीत असे. परंतु १८४६ मध्ये टोरी पुढारी पील याने धान्यावरील जकात कर काढून टाकला. यामुळे त्या पक्षात फूट पडली. त्यातील अनेक जण व्हिग पक्षास मिळाले. यातून पुढे उदारमतवादी पक्षाची निर्मिती झाली. १८४६ ते ६८ या काळात उदारमतवादी पक्षाच्या हाती सत्ता होती. १८८६ पर्यंत ग्लॅडस्टन व डिझरेली या अनुक्रमे उदारमतवादी व टोरी पक्षाच्या पुढाऱ्यांचा प्रभाव राजकारणावर होता. १८८६ मध्ये ग्लॅडस्टनने आयर्लंडला स्वायत्तता देण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे उदारमतवादी पक्षातील अनेकजण हुजूर पक्षास जाऊन मिळाले. काही काळपर्यंत या पक्षास युनिनिस्ट पक्ष असे नाव होते. हा पक्ष १९०६ पर्यंत सत्तेवर होता, तर १९०६–१५ या काळात उदारमतवादी पक्षाने सत्ता सांभाळली. आयरिश सभासदांनी व मजूर पक्षांनी त्यास पाठिंबा दिला.

औद्योगिक क्रांतीनंतर मजुरांच्या हक्कांच्या संरक्षणार्थ मजूर संघटना स्थापन झाल्या. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी त्यांनी देशव्यापारी संघटना स्थापना केल्या. आपल्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांना राजकीय सत्ता आवश्यक वाटू लागली. तेव्हा मजूर सभासद निवडून देण्यासाठी त्यांनी १८९३ मध्ये समिती स्थापन केली. १९०६ च्या निवडणुकीत या पक्षास २९ जागा मिळाल्या. अशा रीतीने मजूर पक्षाची स्थापना झाली. पहिल्या महायुद्धाच्या काळात सर्व पक्षांनी संयुक्तपणे सरकार स्थापन केले. १९२२ मध्ये मजूर पक्षास चांगलेच यश मिळाले. १९२४ मध्ये मजूर पक्षाचा नेता रॅम्से मॅक्डॉनल्ड हा प्रथमच पंतप्रधान झाला. त्यानंतर १९२९ मध्ये या पक्षास बहुमत मिळाले. परंतु १९३१ च्या आर्थिक पेचप्रसंगास तोंड देण्यासाठी मॅक्डॉनल्डने हुजूर पक्षाशी हातमिळवणी केली. त्यानंतर १९४५–५१ व १९६४–६८ या काळात मजूर पक्ष अधिकारावर होता. एरवी हुजूर पक्षास बहुमत मिळविता आले आहे. १९१८ नंतर उदारमतवादी पक्षाची शक्ती मात्र क्षीण होत गेली.

इंग्लंडमध्ये अजून राजेशाही टिकून आहे. हे राजे फक्त नामधारी आहेत. त्यांचे अनेक अधिकार १६८८ पूर्वी संसदेने हिरावून घेतले. इतर अधिकार त्यांच्या नावे मंत्री वापरतात. राजपद आनुवंशिक असले, तरी राजा कोण असावा हे ठरविण्याचा अधिकार संसदेला आहे. राजाने सर्व कार्य मंत्र्यांच्या सल्ल्यावरून करावे असा संकेत आहे, कारण सरकारच्या कृत्यासाठी मंत्र्यांना संसद जबाबदार धरते. ह्या संबंधीचे संकेत इतके दृढमूल झाले आहेत की, प्रत्यक्षात फक्त सरकारी धोरणाच्या कार्याची माहिती मिळविणे आणि मंत्र्यास वेळप्रसंगी सल्ला देणे एवढेच अधिकार त्यांच्या हाती उरले आहेत. राजा हा पक्षातील असल्यामुळे तो राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहे, असे मानण्यात येते. इंग्रज लोक परंपराभिमानी आहेत. ही इंग्रजी परंपरा राजाच्या रूपाने साकार होते. वर्गभेद व प्रांतीयता यांच्या भिंती मोडण्यास त्यांच्यामुळे मदत होते. हेतुपुरस्सर घडवून आणलेल्या सामाजिक व आर्थिक बदलांस त्याच्या संमतीमुळे प्राधान्य लाभते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राजा हा राष्ट्रकुलातील देशास जोडणारा एक दुवा होता.

रूढ संकेतानुसार कॉमन्स सभेत बहुमत असणाऱ्या पक्षाच्या नेत्यास पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळण्यासाठी राजा पाचारण करतो. त्याने शिफारस केलेल्या व्यक्तीस तो मंत्री नेमतो. संपूर्ण मंत्रिमंडळातील २० ते २२ व्यक्तींना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जातो. राज्याचे धोरण आणि महत्त्वाचे निर्णय कॅबिनेट ठरविते. सर्व मंत्री संसदेचे व पंतप्रधान हा कॉमन्स सभेचाच सभासद असावा असा संकेत आहे. सर्व मंत्र्यांचे धोरणासंबंधी एकमत असणे आवश्यक असल्यामुळे ते बहुधा सर्व एकाच पक्षाचे असतात. पंतप्रधान हा आपल्या पक्षाचा, कॉमन्सचा आणि म्हणूनच देशाचा नेता असतो. नेमणुका, राणीशी संपर्क, संरक्षण आणि परराष्ट्रीय व्यवहार व सर्व खात्यांत एकवाक्यता आणणे, ह्या त्याच्या विशेष जबाबदाऱ्या आहेत. यामुळे पंतप्रधानाचा दर्जा व अधिकार अतुलनीय असले, तरी क्वचित प्रसंगी त्याच्या सहकाऱ्यांनी बंड करून त्यास आपले पद सोडावयास लावल्याचीही उदाहरणे आहेत (१९४०, १९५६).

इंग्लंडच्या शासनपद्धतीस संसदीयपद्धती म्हणण्यात येते, कारण यात संसद– पार्लमेंट– केंद्रस्थानी असते. इंग्लंडमध्ये संसद ही सर्व अर्थाने सार्वभौम आहे. यातील कॉमन्स सभा ही जास्त महत्त्वाची आहे. तिचे सभासद लोकांनी निवडलेले असतात. तिची किमान कालमर्यादा पाच वर्षे आहे. कायदे संमत करणे, अर्थसंकल्प मंजूर करणे, मंत्र्यांच्या कार्यावर नजर ठेवणे हे तात्त्विक दृष्ट्या संसदेचे कार्य आहे. प्रत्यक्षात अर्थसंकल्प व बहुतेक विधेयके मंत्र्यांनी सादर केलेली असतात. त्यांच्या पक्षाचे संसदेमध्ये बहुमत असल्याने हे सर्व संमत होण्याची खात्री असते. सभासद आपल्या पक्षाच्या शिस्तीने बांधलेले असतात. पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणे कठीण असते, बहुधा मंत्रिमंडळात पक्षातील सर्व प्रमुख व्यक्तींना स्थान असते, फुटीर प्रवृत्तीमुळे विरोधी पक्षाचा फायदा होतो, पक्षनेते आणि अनुयायी यांच्यातील सल्लामसलतीनंतरच धोरण ठरविण्यात येते. या सर्व कारणांमुळे शिस्त मोडली जात नाही. संसदेची प्रमुख कार्ये (१) नेत्याची पारख करणे– कॉमन्स सभेत, कामकाजात कसोटीस उतरणाऱ्या व्यक्तींतूनच पक्षनेते व मंत्री निवडले जातात (२) पार्लमेंटच्या विविध समित्यांमधून आणि दैनंदिन होणाऱ्या चर्चेतून राज्यकारभारातील दोष व उणिवा यांवर प्रकाश टाकणे (३) संसदेमधील चर्चेतून जनतेसमोर पर्यायी धोरण व नेतृत्व आणणे, ही होत. या सर्वांत अल्पमतात असणाऱ्या विरोधी पक्षाचा वाटा बराच महत्त्वाचा असतो. प्रश्नोत्तरांतून, धोरणाच्या चर्चेतून, अर्थसंकल्पावरील चर्चेतून या सर्वांसाठी भरपूर वाव असतो.

इंग्लंडमधील लोकशाही ही तेथील वर्गाधिष्ठित समाजव्यवस्थेवर, त्यांतील राजकीय प्रक्रियेत भाग घेणारे हितसमूह आणि दबाव गट यांच्या पायावर उभी आहे. इंग्रजी समाज हा धर्म, भाषा, संस्कृती, वंश या दृष्टीने बराचसा एकसंध आहे. अखंड राजकीय परंपरा हे तिचे वैशिष्ट्य आहे. यामुळे त्या समाजात एकंदर राजकीय संस्थांविषयी, राजकीय विचारप्रणालींविषयी, राजकीय संघर्ष मिळविण्याच्या पद्धतींविषयी बरेचसे एकमत आहे. राजकारणाकडे पाहण्याची भूमिका व्यवहारी आहे. सामाजिक-आर्थिक बदलांच्या गतीसंबंधी, क्षेत्रासंबंधी फक्त दुमत आहे. ह्या एकसंधपणातून त्या समाजाचे चित्र स्पष्ट होते.

व्यवसायानुसार व परंपरेने त्यास दिलेल्या प्रतिष्ठेनुसार समाजाचे चार वर्ग पाडता येतील : उच्च व्यवसाय करणारा प्रतिष्ठित वर्ग–१५% लोक पांढरपेक्षा मध्यमवर्ग–२०% लोक कुशलकामगार–३०% लोक तर कनिष्ठ वर्ग–३५% लोक. तसा हा समाज विषमतेवर आधारलेला आहे कारण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५% उत्पन्न फक्त १% लोकसंख्येच्या हाती आहे. व्यावसायिक व शैक्षणिक संधी समान नाहीत. वरील दोन वर्गांत आपापसांत प्रवेश मिळविता येतो. तीच परिस्थिती खालील दोन वर्गांची आहे. साधारणतः कमाल उत्पन्नाचे प्रमाण किमान उत्पन्नाशी फार विषम नाही. यामुळे मध्यमवर्गाची संख्या बरीच मोठी आहे. पक्षपद्धतीचा आणि या वर्गांचा जवळचा संबंध आहे. खालच्या दोन वर्गातील ६०% हून अधिक मते मजूर पक्षास मिळतात, तर ७०% हून अधिक उच्च वर्गीयांची मते हुजूर पक्षास मिळतात, परंतु खालच्या मजूर वर्गातून, हुजूर पक्षास मिळतात हेसुद्धा महत्त्वाचे आहे. संघर्षविहीन समाज असल्याचे हे प्रमुख लक्षण आहे.

समाजातील सत्ताधारी वर्ग निवडण्यात खाजगी वसतिगृहे व शाळांचा तसेच ऑक्सफर्ड व केंब्रिज या विद्यापीठांचा बराच मोठा वाटा आहे. या संस्थांमधून राष्ट्रीय वृत्ती, परंपराभिमान व उच्चमध्यमवर्गीय जीवनमूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवली जातात. नेतृत्वगुणांची जोपासना केली जाते. १९५० च्या दशकात अर्ध्याहून अधिक संसदेचे सभासद वरील दोन विद्यापीठांचे पदवीधर होते. तीनचतुर्थांश हुजूर पक्षाचे व एकपंचमांश मजूर पक्षाचे खासदार यांनी पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले होते. अनेक लष्करी अधिकारी, जवळजवळ सर्व न्यायाधीश, सर्व धर्माधिकारी या शाळांतून शिक्षण घेतलेले लोक होते. ह्या शाळांतील शिक्षण महागडे असल्याने उच्च वर्गीयांनाच परवडते.

उच्च वर्गाचे हे राजकारणातील वर्चस्व हितसमूहांच्या व दाबाव गटांच्या कार्यामुळे कमी झाले आहे. प्रत्येक व्यवसायातील लोकांच्या स्वतःच्या संघटना असतात. उदा., ९०% शेतकरी नॅशनल फार्मर्स युनियन या संघटनेचे सभासद आहेत. जवळजवळ ६०,००० उद्योगांना प्रतिनिधित्व देणारी ऑल ब्रिटन चेंबर ऑफ कॉमर्स ही संघटना आहे. याप्रमाणेच कामगारांचे संघ आहेत. ट्रेड युनियन काँग्रेसचे हे संघ भाग असतात. अशाच संघटना डॉक्टरांच्या, शिक्षकांच्या, सरकारी नोकरांच्या आहेत. यांबरोबरच काही एका विशिष्ट ध्येयास वाहिलेल्या संघटनादेखील आहेत. उदा., निःशस्त्रीकरणाचा पाठपुरावा करणारी, वंशभेदास विरोध करणारी इत्यादी.

या संघटना सरकारी कार्यालयाशी औपचारिक स्तरांवर संपर्क ठेवतात. सरकारने चालविलेल्या एखाद्या चौकशीत अथवा सल्लागार समितीतून त्या आपल्या सभासदांच्या हिताच्या रक्षणार्थ जागरूक असतात. यासाठी शिष्टमंडळ नेणे, अर्ज-विनंत्या करणे ही कामे त्या करतात. अनेकदा ह्या संघटनांचे पक्षात खूप वजन असते. उदा., ८७% कामगार संघटना मजूर पक्षाशी संलग्न आहेत. मजूर पक्षाचे ४०% खासदार या संघटनांमधून वर आलेले असतात. तेव्हा संघटनेच्या हितासाठी ते कायदे मंडळावर दबाव आणू शकतात. कार्यक्रमातून ते लोकमत बदलविण्याचा प्रयत्न करतात. उद्योजकांचा असाच प्रभाव हुजूर पक्षावर आहे.

अनेकदा सरकारी खाती आपले कार्य सुकर करण्यासाठी, आवश्यक ती माहिती मिळविण्यासाठी अशा संघटनांशी सहकार्य करतात. त्यांच्याशी सल्लामसलत केल्यावर धोरण ठरवितात. त्यांच्या सहकार्याने धोरण कार्यक्षम पद्धतीने अंमलात येते. या समूहांचा प्रभाव, ते किती संघटित आहेत, त्यांचे क्षेत्र किती जीवनावश्यक आहे. यांवर अवलंबून असतो. या संघटनांचे हित स्पर्धात्मक असल्यामुळे साहजिकच तडजोड घडून येते. या संघटनांच्या कार्यावर वृत्तपत्रे नजर ठेवून असतात. यांशिवाय या सर्व हितसंबंधांच्या तळाशी राष्ट्रीय हितासंबंधी एकमत असल्यामुळे संघर्ष विकोपाला जात नाहीत. राजकीय पक्ष या हितसंबंधाचा समन्वय एकंदर जनतेस मानवेल, रुचेल अशा पद्धतीने साधतात. इंग्लंडमधील राजकीय प्रक्रिया अशी सर्वस्पर्शी, सर्वांचा सहभाग साधणारी अशी आहे. म्हणूनच येथील लोकशाही अर्थपूर्ण आहे.

न्यायव्यवस्था : इतर राजकीय संस्थांप्रमाणे इंग्लंडमधील न्यायसंस्थाही विकास पावत गेली आहे. नॉर्मन काळात तेथे चार प्रकारची न्यायालये होती : (१) स्थानिक स्वरूपाचे तंटे आणि लहान गुन्हे स्थानिक पंचायतीसमोर येत. (२) सरंजामदार आपल्या कुळांमधील तंटे स्वतः सोडवत. (३) राजा हा स्वतः मोठा सरंजामदार असल्याने, त्याच्या सरदारांमधील तंटे त्यासमोर येत. त्याशिवाय राज्यातील मोठे गुन्हे, कायद्याचे उल्लंघन यांच्याशी संबंधित खटल्यांची चौकशी त्याच्यासमोर होई. आपल्या सल्लागारांच्या मदतीने तो निवाडा करी. (४) दुसऱ्या हेन्‍रीच्या काळात अशा गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी न्यायाधिकाऱ्यास राज्याच्या वेगवेगळ्या विभागांत पाठविण्याची प्रथा पडली.

पहिल्या एडवर्डच्या काळात सरकारी न्यायालयांची विभागणी तीन प्रकारांत झाली : (१) किंग्ज बेंज–राजाचे अधिकारी येथे न्याय देत. कायद्याचे उल्लंघन अथवा गुन्हे यांची चौकशी येथे होई. स्थानिक न्यायालयांविरुद्ध तक्रारी (अपील) येथे गुदरल्या जात. (२) दिवाणी स्वरूपाचे खटले कोर्टापुढे येत. (३) महसुलाशी संबंधीत असे खटले एक्सचेकर कोर्टासमोर येत. या सर्व कोर्टांच्या निर्णयांविरुद्ध राजाकडे दाद मागितली जाई. त्याची चौकशी राजा संसदेमधील सरदारांच्या साह्याने करी. फिरती न्यायालये होतीच. दिवाणी खटले सोडविण्यासाठी खास न्यायाधिकारी (असायीझ) परगण्यात पाठविण्यात येत.

न्यायपद्धतीत शपथ घेणे किंवा दिव्य करणे, यांना महत्त्वाचे स्थान होते. आरोपीच्या शपथेवर विश्वास असणारी किंवा त्याच्या निवेदनास पाठिंबा देणारी १० ते १२ माणसे लागत. नॉर्मन काळात सत्य वस्तुस्थिती अजमाविण्यासाठी शेजाऱ्यांकडे विचारणा केली जाई. यातूनच ज्यूरी पद्धती निर्माण झाली. समाजातील रूढी-चालीरीतींच्या आधारे न्याय दिला जाई. यास कॉमन लॉ हे नाव पडले. नंतरच्या काळात संसदेने केलेले कायदे आणि कोर्टाने आधी दिलेले निर्णय, हे सुद्धा बंधनकारक मानण्यात येऊ लागले.

चौदाव्या-पंधराव्या शतकांत शांतता राखण्याकरिता, ती भंग करणाऱ्यास शिक्षा करण्यासाठी जस्टीस ऑफ पीस हे न्यायाधीश प्रत्येक परगण्यात नेमण्यात येऊ लागले. जास्त गुंतागुंतीचे खटले ते सरकारी कोर्टाकडे पाठवीत. कुळांना सरकारी मदत मिळू लागली, तेव्हा ते सरकारी कोर्टाकडे धाव घेऊ लागले. त्यामुळे सरंजामी न्यायालये मागे पडली. या काळात ज्यूरी हे फक्त साक्षीदार न राहता प्रत्येक घटनेसंबंधी ते निर्णय देऊ लागले. कोणत्याही आरोपीविरुद्धचा खटला समान प्रतिष्ठेच्या व्यक्तीसमोर चालावा, अशी धारणा होती. त्यामुळे सरदारांविरुद्धचे खटले लॉर्ड्‌सच्या सभेत चालत. कायद्याचा अन्वयार्थ लावताना खालील कोर्टाने केलेल्या चुका येथे केल्या जाऊ लागल्या. कॉमन्स सभेने चालविलेले महाभियोग येथेच चालत. हे इंग्लंडमधील सर्वोच्च न्यायालय बनले. अठराव्या शतकापासून लॉर्ड्‌सचे न्यायालयीन काम त्यासाठी नेमलेल्या खास लॉर्ड्‌सनीच करावे, असा संकेत झाला.

व्यापार व उद्योगधंद्याची वाढ झाल्यावर नवीन प्रकारचे खटले यावयास सुरुवात झाली. पारंपरिक कायदे अपुरे पडू लागले. न्यायासाठी लोक लॉर्ड चॅन्सलरकडे अर्ज करू लागले. तेव्हा राजाच्या मंत्रिमंडळात न्यायतत्त्वाच्या आधारे न्यायदान होऊ लागले. ट्यूडर काळात स्टार चेंबर कोर्ट असे त्यास नाव होते. धार्मिक गुन्हेगारास शिक्षा करण्यासाठीही असेच हायकमिशन कोर्ट स्थापन करण्यात आले होते. इंग्रजी परंपरेनुसार साधारण कोर्टात चौकशी झाल्याशिवाय कोणासही शिक्षा होऊ नये, असे तत्त्व होते. हे मॅग्ना कार्टा व त्यानंतर अनेक वेळी मान्य झाले होते. १६४१ मध्ये पहिल्या चार्ल्सच्या काळात फौजदारी न्यायालये खालसा करण्यात आली. स्ट्यूअर्ट काळात राजे न्यायाधीशावर दडपण आणीत आणि विरोध करणाऱ्या न्यायाधीशास बडतर्फ करीत. वारसाहक्काच्या कायद्यानुसार संसदेने विनंती केल्याशिवाय न्यायाधीशांना बडतर्फ करू नये, अशी तरतूद केली होती.

प्रचलित व्यवस्थेत राज्याच्या निरनिराळ्या भागांत कौटीं कोर्ट्‌स आहेत कमी महत्त्वाचे खटले येथे चालतात. उच्च न्यायालये तीन विभाग आहेत. किंग्ज बेंच कोर्टासमोर दिवाणी व फौजदारी खटले चालतात. चॅन्सरी विभागासमोर करार-मदार, कर्ज इत्यादींमधून निर्माण होणारे खटले येतात. घटस्फोट, मृत्युपत्र, विवाह यांसंबंधीचे खटले दुसऱ्या विभागाकडे जातात. या कोर्टाकडून वरील उच्च कोर्टाकडे दाद मागतात येते. अत्यंत महत्त्वाचे खटले लॉर्ड्‌स सभागृहापर्यंत जाऊ शकतात. फौजदारी प्रकरणातील न्यायदानातील दिरंगाई कमी करण्याकरिता १९७१ च्या संसद विधिनियमानुसार सर्व न्यायालयीन व्यवस्थेची पुनर्संघटना करण्यात आली आहे. या कायद्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात उच्चकोर्ट (हायकोर्ट), अपील कोर्ट आणि क्राउन कोर्ट यांना सामावून घेतले आहे.

मोरखंडीकर, रा. शा.

संरक्षणव्यवस्था : इतर दोस्त राष्ट्रांसह जागतिक स्थैर्य व शांतता कायम राखण्याच्या जबाबदारीचा आपला योग्य तो वाटा उचलता यावा, या दृष्टीने ब्रिटनने आपले संरक्षण धोरण आखलेले आहे व त्यासाठी राष्ट्राची संरक्षणव्यवस्था सज्ज ठेवण्यात येते. ब्रिटनची मूलभूत सुरक्षितता उत्तर अटलांटिक प्रदेशातील सख्यसंबंधावर अवलंबून असल्यामुळे उत्तर अटलांटिक तह संघटनेसाठी (नाटोसाठी) ब्रिटनचे सेनाबल मुख्यतः वापरले जाते. यूरोपबाहेरही इतरत्र ब्रिटनचे हितसंबंध असल्यामुळे सेंटो (CENTO) आणि सिआटो (SEATO) या संघटनांचा ब्रिटन एक क्रियाशील सभासद आहे. शिवाय मलेशिया व सिंगापूर यांच्या संरक्षणव्यवस्थेतही ब्रिटनला सहभागी व्हावे लागते. अन्य आश्रित देशांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटनला घ्यावी लागत असल्याने ब्रिटिश सेना तेथेही कामगिरी बजावीत असते. संरक्षणाच्या या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ब्रिटिश लष्करी उपस्थिती अटलांटिक महासागर, भूमध्य समुद्र, पश्चिम जर्मनी, उत्तर आयर्लंड, माल्टा, सायप्रस, हिंदी महासागर, आग्नेय आशिया इ. प्रदेशांत पसरलेली आहे.

ब्रिटिश संरक्षणव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांच्यावर असून ते संसदेला जबाबदार असतात. संरक्षण आणि समुद्रपार धोरण समिती प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. संरक्षणधोरणाची मांडणी करण्याचे काम संरक्षण राज्यसचिवाकडे असते. त्याला एक राज्यमंत्री आणि तीन उपसचिव मदत करतात. हे सर्व व संरक्षणकर्मचारी प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) आणि नौसेना, भूसेना व वायुसेना यांचे प्रमुख आणि इतर काही अधिकारी यांची मिळून संरक्षण परिषद (डिफेन्स कौन्सिल) बनते आणि तिच्याकडे संरक्षणधोरणासंबंधीच्या सर्व प्रश्नांवर विचार करण्याचे काम असते.

ब्रिटनचे एकूण सेनाबल १ जानेवारी १९७३ रोजी ३,७१,००० होते. त्यापैकी ८२,३०० नौदलात, १,८१,४०० भूदलात व १,०७,३०० वायुदलात होते. शिवाय संरक्षण मंत्रालयाखालील नागरी कर्मचाऱ्यांची संख्या ३,२४,००० होती. १९७३-७४ चा संरक्षण खर्चाचा अंदाज ३३० कोटी पौंड म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या ५·६ टक्के होता. १९७४-७५ चा संरक्षण खर्च अंदाजे ३५५·९ कोटी पौंड होता.

सेनाबलाच्या तीन प्रमुख शाखा आहेत : नौदल, भूदल व वायुदल. नौदलाचे चार प्रमुख भाग आहेत. सामान्य आरमार सेवा, आरमार वायुसेनांग, पाणबुडी सेवा व रॉयल मरीन्स. सेनादलात सु. ३० सेनांग व सेवा यांचा समावेश होतो. वायुसेनेचे (रॉयल एअर फोर्स) अनेक विभाग असून त्यांची विवक्षित कार्यक्षेत्रे आहेत. स्त्रियांना लष्करात प्रवेश आहे व शिवाय स्त्रियांसाठी खास सेनाविभाग आहेत. राखीव सेनाबल, साह्यकारी सेनादले आणि नागरी संरक्षण या संघटनाही अस्तित्वात आहेत.

ब्रिटनचे सेनाबल बऱ्याच ठिकाणी विखुरलेले असते. उदा., १९७१ च्या सुमारास प. जर्मनीमध्ये ६०,००० हून अधिक व भूमध्य समुद्र भागात सु. २५,००० नौदलात समुद्रावर सु. ३७,००० (मुख्यतः यूरोप व अटलांटिक भागांत) आणि २,५९,००० ब्रिटनमध्ये होते. काही सैन्य उ. आयर्लंडमध्येही ठेवावे लागते.

लष्करात भरती होण्यासाठी सक्तीची योजना नाही. स्वेच्छेने अनायुक्त अधिकारी म्हणून तीन ते बावीस वर्षांसाठी भरती होता येते व तीन वर्षांच्या सेवेनंतर १८ महिन्यांची सूचना देऊन सेवेतून मुक्त होता येते. अनायुक्त अधिकाऱ्यांना गुणवत्ता व पात्रता लक्षात घेऊन राजादिष्ट अधिकारी म्हणून बढती मिळू शकते. निम्मे राजादिष्ट अधिकारी असे बढती मिळालेले असतात. लष्कराच्या सर्व शाखांतून विविध तांत्रिक शिक्षणाच्या मुबलक सोयी उपलब्ध आहेत. त्यांचा अनेकजण फायदा घेतात कारण सेवानिवृत्तीनंतर नागरी जीवनात पुन्हा प्रवेश करताना हे शिक्षण त्यांना फार उपयोगी ठरते. राजादिष्ट अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी डार्टमथ (नौसेना), सँढर्स्ट (भूदल) आणि क्रॅनवेल (वायुसेना) येथे खास प्रशिक्षणसंस्था आहेत. शिवाय ग्रिनिच, कँबर्ली, ब्रॅकनेल व चेशॅम येथे विशिष्ट प्रशिक्षणसंस्था असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लंडन येथे रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज ही संस्था आहे.

ब्रिटिश लष्कराच्या सर्व शाखांना आधुनिक शस्त्रास्त्रे व साधनसामग्री पुरविण्यात येते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन व विकासकार्य चालू असते व अनेक प्रकल्प कार्यान्वित केले जातात. शासन व खाजगी उद्योगसंस्था यांच्यामध्ये आवश्यक ते सहकार्य आढळते. ऑगस्ट १९७१ पासून विमाने, जहाजे, पाणबुड्या, सेनासामग्री, विद्युत् उपकरणे, क्षेपणास्त्रे इत्यादींच्या प्राप्तीसाठी संरक्षण मंत्रालयात एक खास प्रापण-विभाग सुरू करण्यात आला आहे. आण्विक शस्त्रदलामध्ये चार आण्विक पाणबुड्यांचा समावेश आहे.

धोंगडे, ए. रा.

आर्थिक स्थिती : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत शेती हाच इंग्लंडचा प्रधान व्यवसाय होता. १६८८ साली इंग्लंडची लोकसंख्या ५३-५४ लाख होती व तीमधील ३१ टक्के लोक शेतीवर अवलंबून होते. बहुसंख्य लोक खेड्यांत राहणारे होते. लंडनखेरीज इंग्लंडमध्ये मोठी शहरे नव्हतीच. शेतीशी कमीअधिक संबंध असणारे समाजाच्या सर्व थरांत होते व अशांचे प्रमाण एकूण लोकसंख्येशी सु. ६०–६५ टक्के होते. तेव्हाच्या समाजात उद्योगपतींना स्थान नव्हते व्यापाऱ्यांना मानाचे स्थान नव्हते. शेतजमिनीवरील मालकीहक्कांच्या संदर्भात समाजातील प्रत्येकाचे स्थान ठरत असे.

तेव्हाची शेतीची उत्पादनपद्धती आजच्या तुलनेने अशास्त्रीय व जुनाट होती. आज मागासलेल्या देशांत वापरली जाणारी अवजारे तेव्हा इंग्लंडमध्ये प्रचलित होती. प्रत्येकाचे शेत वेगळे असले व त्यावर त्याचा कमीअधिक प्रमाणात मालकीहक्क असला, तरी शेतजमिनीतील मालकीचा वेगळेपणा आपल्या जमिनीभोवती कुंपण घालून दर्शविण्याची पद्धत तेव्हा नव्हती. ‘मुक्त शेतजमीन पद्धत’ असे तत्कालीन शेतीचे वर्णन करता येईल. उद्योगव्यवस्था कुटिरोद्योगावर आधारित होती. वस्त्रोत्पादन हाच प्रमुख उद्योग होता. धातूकाम, चामड्याच्या वस्तूंची निर्मिती करणारेही उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर होते. उत्पादनाचे अल्प प्रमाण, अवजारांचा साधेपणा व स्वावलंबी कारागीर ही उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये होती.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांतीची चक्रे इंग्लंडमध्ये फिरू लागली. अर्थव्यवस्थेचे औद्योगिकीकरण आणि तदनुषंगाने होणारे लोकजीवनाचे नागरीकरण या घटनांमुळे शतकानुशतके स्थिर असलेले त्या देशाचे आर्थिक, सामाजिक व राजकीय जीवन शंभर–सव्वाशे वर्षांच्या अवधीत संपूर्णतः पालटून गेले व त्या देशांचा कल्पनातीत सांपत्तिक उत्कर्ष झाला. कारागिरांच्या घरांत औद्योगिक उत्पादन होण्याऐवजी ते गिरण्या-कारखान्यांतून होऊ लागले. उत्पादनासाठी श्रमशक्तीऐवजी यंत्रशक्तीचा उपयोग होऊ लागला व उत्पादन प्रचंड प्रमाणावर होऊ लागले. शेतीचे महत्त्व रोजगारदृष्ट्या इतर व्यवसायांपेक्षा कमी झाले व लोकसंख्येचा ओघ औद्योगिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या वायव्य भागातील परगण्यांकडे वळू लागला.

औद्योगिकीकरणामुळे ब्रिटनची राष्ट्रीय संपत्ती वाढली व लोकांचे सरासरी राहणीमान वर गेले. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे आणि बाजारपेठांच्या विस्तारामुळे शेतमालाला मागणी वाढत होती. नवीन शोध लागण्याची जी लाट देशात आली, ती शेतीपर्यंत येऊन पोहोचली होती. अशा परिस्थितीत शेतीचे स्वरूप पालटून तिला किफायतशीर व्यवसायाचे स्वरूप प्राप्त करून द्यावयाचे, अशी प्रेरणा जमीन-मालकांना झाली. साहजिकच मुक्त शेती त्यांना अडचणीची वाटू लागली. ह्या शेतीची मालकी निश्चित नव्हती आणि जेथे ती निश्चित होती, तेथे अनेक तुकड्यांत विभागलेली होती. त्यामुळे स्वतःच्या मालकीच्या शेतीवर उत्पादनतंत्राबाबत सुधारणा करण्यास वाव नव्हता. शेतीसुधारणा सुलभ व्हावी, ही अपेक्षा मनात धरून जमीनमालकांनी जमिनीची मालकी निश्चित व्हावी व ती मालकीच्या जमिनीभोवती कुंपण घालून व्यक्त केली जावी, अशी टूम काढली. ही टूम इतकी जोरदार होती की, तिला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. कुंपणविरहित शेतीचे परिवर्तन कुंपणयुक्त शेतीत व्हावे, म्हणून १८५० पर्यंत पार्लमेंटने ४,००० कायदे केले. या चळवळीच्या परिणामी जमिनीवर उपजीविका करणाऱ्या हजारो लोकांना शेतीपासून पारखे व्हावे लागले. शेतकऱ्यांना शेतमजूर तरी व्हावे लागले वा ते न जमल्यास शहराकडे धाव घेऊन औद्योगिक कामगारवर्गात भरती व्हावे लागले. मात्र शेतीत गुंतलेले मनुष्यबळ कमी होऊनही शेतीउत्पादन वाढले. शेतीत मोठ्या शेतांचे व यांत्रिक शेतीचे युग अवतरले. शेती हा एक परंपरागत जीवनमार्ग आहे, हा दृष्टिकोन बदलून शेती हा भांडवलशाहीतील अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय झाला.

औद्योगिक क्रांतीनंतर सु. शंभर वर्षे यूरोपमधील अन्य देश ब्रिटनच्या मागेच राहिले. या काळात ब्रिटनचे आर्थिक सामर्थ्य वाढत गेले आणि पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळात आर्थिक दृष्ट्या ब्रिटन हा देश नेहमीच अग्रस्थानी राहिला. ब्रिटनच्या या स्थानाला आव्हान देण्याचा प्रयत्न पहिल्या महायुद्धापूर्वी, मुख्यत्वे १८७० नंतर, जर्मनीने केला. १८६० नंतरच्या काळात अमेरिकेच्या आर्थिक विकासाला गतिमानता आली. एकोणिसाव्या शतकात फ्रान्समध्ये मंदगतीने आर्थिक विकास होतच होता. साहजिकच पहिल्या महायुद्धाच्या तडाख्यानंतर ब्रिटनचे आर्थिक वर्चस्व टिकून राहिले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर तर जागतिक अर्थकारणात ब्रिटनचे स्थान फारच घसरले. दोन महायुद्धांच्या दरम्यान जागतिक अर्थकारणात अमेरिकेला लाभलेले अग्रेसरत्व अद्यापि टिकून आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या पराभवामुळे खचून न जाता जर्मनीचा आर्थिक विकास द्रुतगतीने झाला आहे. फ्रान्समध्ये नवी ईर्षा निर्माण झाली आहे व निराळ्या मार्गाने रशियाची प्रगती झपाट्याने होत आहे. या सर्व घटनांमुळे जागतिक अर्थकारणात ब्रिटनला चांगलाच शह बसला आहे.

लोकसंख्या व साधनधन : औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाल्यानंतर पहिली शंभर वर्षे द्रुत आर्थिक विकासाप्रमाणेच द्रुतगतीने झालेली लोकसंख्यावाढ हेही ब्रिटनचे वैशिष्ट्य होते. १८०० ते १८५० या काळात दरसाल दर हजारी १४ या वेगाने ब्रिटनमध्ये लोकसंख्येची वाढ झाली, याचे मुख्य कारण जननमान दर हजारी ३५ असता मृत्युप्रमाण मात्र कमी होते, हेच होय. १७८० मध्ये मृत्युप्रमाण दर हजारी ३० होते, ते शंभर वर्षांनी २० वर आले. १८८० नंतर लोकसंख्या वाढण्याची गती मंदावली. विसाव्या शतकाच्या पहिल्या पन्नास वर्षांत मृत्युप्रमाण बारापर्यंत खाली आले पण जननमानही ३५ पासून १५ पर्यंत कमी झाले. दुसऱ्या महायुद्धकाळात जननमान वाढू लागले व युद्धोत्तर काळात (१९४७) ते दर हजारी २० झाले. नंतर ते थोडे थोडे खाली घसरू लागले, परंतु पुन्हा १९५६ पासून वाढू लागले, ते १९६४ मध्ये दर हजारी १८·७ झाले तेव्हापासून हे प्रमाण पुन्हा घसरले असून १९७२ साली ते दरहजारी १४·९ एवढे होते. मृत्युप्रमाणही दर हजारी १२·१ होते. त्यामुळे साहजिकच ब्रिटनची लोकसंख्या दरसाल दर हजारी फक्त सहाने वाढली. ३० जून १९७३ मध्ये लोकसंख्या ५,४३,८६,३०० होती, तीपैकी २,६४,१९,९०० पुरुष व २,७९,६६,४०० स्त्रिया होत्या. आज ब्रिटनमध्ये कुटुंबाचा आकार लहान झाला आहे. व्हिक्टोरियाकालीन इंग्लंडमध्ये कुटुंबात सर्वसाधारणपणे पाच मुले असत आता दोनच असतात. कुटुंबाचा आकार कमी झाला असला, तरी विभक्त कुटुंबे थाटण्याची प्रवृत्ती वाढत चालल्यामुळे कुटुंबांची संख्या मात्र वाढली आहे. १९६६ मध्ये ग्रेट ब्रिटनमधील १६९ लाख कुटुंबांपैकी सु. १५ टक्के कुटुंबांत प्रत्येकी एक, ३० टक्क्यांत दोन, २१ टक्क्यांत तीन, १८ टक्क्यांत चार व उर्वरित १६ टक्के कुटुंबांत प्रत्येकी पाच किंवा अधिक व्यक्ती होत्या.

लोकसंख्येचा विचार साधनधनाच्या संदर्भात करणे उचित ठरते. ब्रिटनमध्ये एकूण जमीन दर माणशी २·o२ ते २·४२ हे. आहे पण हा सर्व जमिनीचा हिशेब असून केवळ कृषिक्षम जमिनीचा नाही. ब्रिटनमधील कृषिक्षम जमीन सध्या फारच मर्यादित आहे. ब्रिटनमध्ये हल्ली सु. पन्नास टक्के अन्न आयात केले जाते. ही आयात चालू असण्यावर लोकसंख्येचे भवितव्य आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहे. अन्नाची आयात चालू राहण्यासाठी कारखानदारी मालाची निर्यात ब्रिटनला करता आली पाहिजे आणि त्यासाठी साधनधन किती प्रमाणात उपलब्ध आहे, उपलब्ध होण्याची शक्यता आहे हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. औद्योगिक क्रांतीच्या प्रारंभीच्या काळात लोखंड, कोळसा, कथील यांसारख्या औद्योगिक कच्च्या मालाचे ब्रिटनमध्ये वैपुल्य होते आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांची निर्यात केली जात होती. सध्या मात्र अलोहीय खनिज, लोखंड व पोलाद आणि कोळशाखेरीज सर्व साधनांबाबत ब्रिटनमध्ये कमतरतेची परिस्थिती आहे व कोळशाची स्वयंपूर्णता फार काळ चालू राहणार नाही, असे दिसते. इंधनवस्तूंमध्ये कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, जलशक्ती यांना महत्त्व आहे. या सर्व बाबतींत ब्रिटनची सध्याची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नाही. उद्योगप्रधान देश म्हणून ब्रिटनला लोकसंख्या सध्याच्या राहणीमानावर टिकवून धरावयाची असेल, तर कच्च्या मालाची, विशेषतः इंधन वस्तूंची, योग्य प्रमाणावर आयातीची शाश्वती असली पाहिजे.

कृषी : औद्योगिक विकास जसजसा होत गेला, तसतसे शेतीचे महत्त्व उत्पादनदृष्ट्या व रोजगारदृष्ट्या कमी झाले. पहिल्या महायुद्धाला प्रारंभ झाला, तेव्हा शेती ही ब्रिटनचा प्रधान व्यवसाय नव्हता. देशाला लागणाऱ्या धान्यांपैकी अवघे एकपंचमांश धान्य देशात पिकविले जात होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात देशात अधिक धान्य पिकविण्याचे महत्त्व सरकारला उमगले व किमतींची हमी देऊन धान्योत्पादनाला उत्तेजन देण्याचा थोडाफार प्रयत्न करण्यात आला. परंतु युद्धानंतर पुन्हा मुक्त व्यापारनीतीचा पाठपुरावा करण्यात आल्याने उत्पादन वाढले नाही. १९२९ नंतरच्या महामंदीचा फटका शेतीला फार जोराचा बसला. त्यामुळे निर्हस्तक्षेपनीतीचा त्याग करणे ब्रिटनला भाग पडले. १९३१ नंतर लागोपाठ कायदे करण्यात येऊन शेतीला किमान किंमतीची हमी देण्यात आली. पण तरीही शेतीला ऊर्जितावस्था प्राप्त झाली नाही. १९२० ते १९३९ या काळात राष्ट्रीय उत्पन्नाला शेतीचा लागणारा हातभार सहा टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आला.

दुसऱ्या महायुद्धात व तदनंतरच्या काळात धान्योत्पादन वाढविण्याचे महत्त्व सरकारला पुन्हा पटले. १९४७ मध्ये शेतीसाठी पंचवार्षिक योजना जाहीर करण्यात आली व या योजनाकाळात शेती-उत्पादन चाळीस टक्क्यांनी वाढले. त्यानंतरच्या काळातही शेती-उत्पादन वाढत आहे. योग्य किंमतींचे प्रलोभन आणि बाजारपेठेची हमी या सुत्रांवर आधारलेले शेतीविषयक धोरण फलद्रूप होत असून उत्पादन हळूहळू पण निश्चितपणे वाढत असल्याचे दिसून येते. १९३९ पासून ब्रिटनची लोकसंख्या ७५ लाखांनी म्हणजे १६ टक्क्यांनी वाढलेली दिसते. लोकसंख्येत वाढ झालेली असूनही १९६९ मध्ये अन्नधान्याच्या एकूण गरजेच्या निम्म्याहून अधिक धान्य ब्रिटन पिकवीत आहे. गेल्या दशकात दिसून येणारी आणखी एक लक्षणीय प्रवृत्ती म्हणजे, आट्यासारख्या कार्बोहायड्रेटचे सेवन कमी झाले असून मांस आणि अंडी यांसारख्या प्रथिनयुक्त अन्नपदार्थांचे सेवन वाढत असल्याचे दिसते. जीवनमान वाढत चालल्याचेच हे लक्षण होय.

ब्रिटन उद्योगप्रधान देश असूनदेखील कृषी हा महत्त्वाचा उद्योग मानण्यात येतो. २·५ टक्के लोकसंख्या (६·५१ लक्ष लोक) या व्यवसायावर अवलंबून आहे. एकूण २·४ कोटी हे. जमिनीपैकी १·९० कोटी हे. जमीन शेतीखाली आहे. ब्रिटनमधील जमीनप्रकारांत भरपूर वैविध्य आहे. पश्चिम व उत्तरेकडील खडकाळ जमिनींपासून नदीच्या खोऱ्यांतील सुपीक जमिनीपर्यंत वैचित्र्य आढळते. ब्रिटनमध्ये एकूण ३·०३ लक्ष शेते असून त्यांपैकी जवळजवळ ४५ टक्के छोटी शेते आहेत. अन्य व्यवसाय करणारे अर्धवेळ उद्योग म्हणून ही शेते पिकवितात. एकूण उत्पादनाच्या १०% भाग या छोट्या शेतांपासून उपलब्ध होतो. १०% शेते मोठ्या आकाराची असून एकूण उत्पादनाच्या निम्मे उत्पादन त्यांपासून मिळते. ग्रेट ब्रिटनमधील पूर्णवेळ शेतांचा सरासरी आकार २५० एकर (१०० हे.) असून स्कॉटलंडमध्ये हे प्रमाण १७० एकर (७० हे.) आहे.

गेल्या तीस वर्षांत एकूण कृषिउत्पादनात व दर हेक्टरी उत्पादकतेत वाढ झाल्याचे दिसते. मुख्यतः यंत्रांचा अधिक वापर केल्याने १९६८–६९ मधील कृषिउत्पादन १९३६–३७ मधील उत्पादनाच्या सु. दुप्पट होते. गव्हाचे उत्पादन या काळात ६६ टक्क्यांनी वाढून १९७२ मध्ये ते ४६.८ लाख टन झाले. सातूचे उत्पादन १९७२ मध्ये ९०·९ लाख टन होते १९७२ मध्ये डुकराच्या मांसाचे उत्पादन ६·५१ लक्ष मे. टन आणि अंड्यांचे १२४·७० कोटी डझन झाले. मांस व दूध उत्पादन (१,३१९·३२ कोटी लिटर १९७२ साली) हळूहळू वाढत आहे. तक्ता क्र. १ मध्ये १९७३ सालचे प्रमुख पिकांखालील क्षेत्र आणि त्यांचे उत्पादन दिले आहे.

तक्ता क्र. १ : प्रमुख पिकांखालील क्षेत्र व त्यांचे उत्पादन (१९७३)

पिकाचे नाव

क्षेत्र (हेक्टरांत)

उत्पादन (मेट्रिक टनांत)

गहू

सातू

ओट

मिश्र धान्य

बटाटे

बीटसाखर

१२,५२,८०४

२४,०१,२१२

२,८०,७८०

५०,९०४

२,२४,२२०

१,९२,७०८

४९,८१,३२०

८९,३४,४६०

१२,४२,३००

१,९०,८९०

६५,६६,०१०

७४,८८,१४०

ब्रिटनमधील शेती पशुधनाधिष्ठित आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान्यता पावलेल्या बहुतेक पशू, मेंढ्या व डुकरे यांच्या पैदाशी जाती ब्रिटनमध्ये होतात. हरफर्ड, शॉर्टहॉर्न, ॲबर्डीन अँगस या जाती मांसाकरिता, तर शॉर्टहॉर्न, ब्रिटिश फ्रिझियन, ग्वेर्नसी, जर्सी व आयरशर या जाती दुधाकरिता प्रसिद्ध आहेत. १९७२ मध्ये देशात गुरे १·३४ कोटी, मेंढ्या २·६८ कोटी, डुकरे ८६·१९ लक्ष आणि कोंबड्या १४ कोटी होत्या. शेतकऱ्यांच्या मिळकतीचा दोन-तृतीयांश भाग पशू अगर तज्जन्य उत्पादन विकून मिळतो. शेतकऱ्यांची एकूण निव्वळ मिळकत १९६०–६१ मध्ये ३९·२ कोटी पौंड होती, ती १९७०–७१ व १९७१–७२ या दोन वर्षांसाठी अनुक्रमे ६१·१ कोटी व ६६·८ कोटी पौंड झाली. शेतीवरील खर्चाचे प्रमाण पाहू जाता यंत्रे व अन्य अवजारांवर एक-षष्ठांश, वेतनावर एक-पंचमांश व पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी एक-तृतीयांश अशी विभागणी करता येईल. १९६० च्या मानाने मजुराचे वेतनमान ७० टक्क्यांनी वाढले आहे. ट्रॅक्टर उपयोगाचे प्रमाण ब्रिटनमध्ये प्रचंड असून १९७१ मध्ये एकूण ट्रॅक्टर पाच लाखांहून अधिक होते. हे प्रमाण १४·२ हेक्टरांसाठी एक ट्रॅक्टर असे पडते. त्याच साली कापणीयंत्रांची संख्या सु. ६६,००० होती. शेतीच्या विविध प्रक्रियांसाठी अनेक प्रकारची यंत्रे वापरण्यात येतात. दूध काढण्याची यंत्रे बहुतेक सर्व शेतांवर उपयोगात आहेत. ब्रिटनमध्ये शेतकऱ्यांनी स्थापन केलेले १,७०० च्या वर संघ असून महाग यंत्र सामग्री भाड्याने देण्याची सोय ते करतात. ब्रिटनमधील सु. ९५% शेतांना वीजशक्ती उपलब्ध आहे. शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे शेतीचा प्रकार, शेतीचा दर्जा आणि कसणाऱ्यांचे प्रावीण्य यांप्रमाणे बदलत असते. सरासरी निव्वळ उत्पन्नाचे प्रमाण दर हेक्टरी सु. १२ ते ५० पौंड असून फळांच्या बागा वा दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतीपासून मिळणारे निव्वळ उत्पन्न यांहून कितीतरी अधिक आहे. राष्ट्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेकडून कृषिअवजारांबाबत संशोधन, विकास आणि चाचणी केली जाते.

कृषिक्षेत्रात १९३० पासून सरकारचा हस्तक्षेप वाढता आहे. किंमती स्थिर राखणे, उत्पादकता वाढविणे, कर्जाची यंत्रणा उभारणे, कृषिविषयक अनेक कायदे करणे आदी मार्गांनी सरकार कृषिक्षेत्रात भाग घेत असते.

उद्योग : जगात सर्वप्रथम ब्रिटनचे औद्योगिकीकरण झाले. आज शेकडा २ माणसे कृषिव्यवसायात असतात, तर उरलेले शेकडा ९८ खाणउद्योग, घरबांधणी व उत्पादन यांत मग्न असतात. यंत्रोत्पादित माल निर्यात करणाऱ्या देशांत ब्रिटनचा तिसरा क्रमांक लागते. ब्रिटनमध्ये इतक्या विविध तऱ्हेचा औद्योगिक माल तयार होतो की, ब्रिटन हे जगातील एक फार मोठे वर्कशॉप आहे, असे म्हणणे सर्वार्थाने सार्थ ठरते.

औद्योगिक क्रांतिपूर्व काळात वस्त्रोत्पादन हा इंग्लंडचा प्रमुख उद्योग होता व त्यातही लोकरीच्या कापडाला प्राधान्य होते. श्रमशक्तीऐवजी यंत्रशक्तीच्या आधारे उत्पादन होऊ लागल्यावर प्रचंड प्रमाणावर उत्पादनवाढ झाली व उत्पादनक्षेत्रातही बदल झाला. १८१५ ते १९१५ या शंभर वर्षांच्या काळात ब्रिटनचे खऱ्या अर्थाने औद्योगिकीकरण झाले. या काळात लोखंड, पोलाद, कोळसा, अभियांत्रिकी, जहाजबांधणी, वस्त्रोत्पादन (विशेषतः सुती वस्त्रांचे) हे ब्रिटनमधील प्रमुख उद्योग होते. पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली, तेव्हा ब्रिटन औद्योगिक दृष्ट्या पहिल्या क्रमांकाचा देश होता. हळूहळू ब्रिटनच्या सर्वश्रेष्ठत्वाला जर्मनी व अमेरिका या देशांकडून आव्हान दिले जाऊ लागले.

ब्रिटनमधील उद्योगधंदे प्रामुख्याने खाजगी क्षेत्रातच आहेत. मात्र उद्योगक्षेत्रात सरकारचे धोरण निर्हस्तक्षेपाचे असावे, हे तत्त्व ब्रिटनने केव्हाच सोडले आहे. मध्यवर्ती व स्थानिक शासनसंस्थांच्या ताब्यात असलेले उद्योग एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या २५% माल उत्पन्न करतात. महामंदीकाळात उद्योगधंद्यांना उत्तेजन देण्यासाठी उद्योगक्षेत्रात शासनाला हस्तक्षेप करावा लागला. युद्धकाळात औद्योगिक उत्पादनाचा ओघ युद्धकालीन वस्तूंकडे वळला म्हणून हरप्रकारची वस्तुविषयक, चलनविषयक व अन्य नियंत्रणे उद्योगक्षेत्रावर घालावी लागली. ती नियंत्रणे कमीअधिक प्रमाणात सध्या आहेतच. पण मुख्य गोष्ट म्हणजे, आधुनिक काळात परिस्थित्यनुरूप खाजगी अर्थव्यवहारांवर नियंत्रण घालणे हे सरकारचे कर्तव्य आहे, हे तत्त्व निर्हस्तक्षेपवादी ब्रिटनने मान्य केले आहे.

औद्योगिक उत्पादन १९७२ मध्ये १९६३ च्या तुलनेने एक-तृतीयांशाने अधिक होते. युद्धपूर्व काळातील उत्पादनाच्या ते दुप्पट होते. १९६३–७२ या काळात विद्युत् अभियांत्रिकी उद्योगांच्या उत्पादनात सर्वांत अधिक म्हणजे ७३·३ टक्क्यांनी वाढ झाली. रासायनिक आणि तत्सम उत्पादनात ती ६९%, कोळसा व पेट्रोलजन्य पदार्थांत ५६% आणि गॅस, वीज या क्षेत्रात ७२% होती. या काळात मजुरांची संख्या काहीशी कमीच झाली. उत्पादनवाढीचे श्रेय यंत्रे, प्रक्रिया व कामाची पद्धती यांत झालेला बदल, भांडवल उभारणीची गती, अधिक जोरदार स्पर्धा व विक्री व्यवहारांतील प्रगती यांसारख्या बाबींना दिले पाहिजे. उद्योगक्षेत्रात स्वयंचलनावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे. त्यामुळे उद्योगधंद्यांची पद्धती बदलत असून उत्पादनक्षमतेत झपाट्याने वाढ होत आहे.

ग्रेट ब्रिटन हा जगातील सर्वाधिक प्रगत देशांपैकी एक आहे. त्याच्या अर्थव्यवस्थेत निर्मितिउद्योगांना विशेष स्थान आहे. एकूण कामगारांपैकी ३५% कामगार ह्या उद्योगांमध्ये असून त्यांचा एकूण राष्ट्रीय उत्पादनात सु. ३५% वाटा आहे. १९५८ पासून निर्मिती उद्योगाच्या उत्पादनात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे स्थिर भांडवल सामग्रीच्या रूपाने प्रतिवर्षी सु. १५० कोटी पौंड खर्च करण्यात येतात जरी उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर विकिरण झाले असले, तरीही उद्योगधंद्यांनी एकवटलेले असे भौगोलिक विभाग पुढीलप्रमाणे ठळकपणे दिसून येतात : (१) लंडन : या भागात निर्मितिउद्योगांचे मोठ्या प्रमाणावर जाळे पसरलेले आहे (२) मिडलंड्स अभियांत्रिकीय व धातुउद्योग, वाहने, कोळसा, मृत्पात्रउद्योग, कापडउद्योग (वस्त्रोद्योग), पादत्राणे, रसायने (३) यॉर्कशर (वेस्ट रायडिंग) : लोकरी कापडउद्योग, कृत्रिम तंतुउद्योग, कोळसा, पोलाद, अभियांत्रिकी, धातुउद्योग, वस्त्रोद्योग (४) लँकाशर : अभियांत्रिकी, सुती कापडउद्योग, मानवनिर्मित तंतुउद्योग, कोळसा, जहाजबांधणी, रसायने, काचकाम आणि वस्त्रोद्योग (५) साउथ वेल्स : कोळसा, पोलाद, कथील-पत्रा, अलोह धातू, रसायने (६) इंग्लंडचा ईशान्य किनारीय भाग : कोळसा, पोलाद, अभियांत्रिकी, जहाजबांधणी, रसायने (७) स्कॉटलंड : अभियांत्रिकी, जहाजबांधणी, कोळसा, पोलाद, कापडउद्योग, वाहने (८) उत्तर आयर्लंड : अभियांत्रिकी, जहाजबांधणी, लिनन, तंतुउद्योग. काही भागांमध्ये कापउद्योग, जहाजबांधणी, रेल्वेएंजिने यांसारख्या पारंपरिक उद्योगांची जागा इलेक्ट्रॉनिकी, तांत्रिक उपकरणे व कृत्रिम तंतुउद्योग यांसारख्या नव्या उद्योगांनी घेतल्याचे दिसते.

ग्रेट ब्रिटनमधील उद्योगधंद्यांची मालकी, संघटना व नियंत्रण विविध प्रकारचे आहे : सरकारी (सार्वजनिक), खाजगी व सहकारी उद्योगधंदे असे सर्व मिळून महत्त्वपूर्ण कार्य करतात. इंधनउद्योग व विद्युत्‌शक्तिउद्योग हे सरकारी क्षेत्रातील उद्योग वगळता, बहुतेक सर्व उद्योग खाजगी क्षेत्रातच आहेत. सर्वसाधारणपणे सरासरी उत्पादनसंस्थेचा आकार जरी लहान असला, तरी एकूण कामगारसंख्येच्या २५% कामगार देशातील सर्वांत मोठ्या उत्पादनसंस्थांत काम करतात. अलीकडील काही वर्षांत मोठाल्या उद्योगसंस्था बनण्याकडे कल दिसून येत आहे. अशा उद्योगांना औद्योगिक पुनःसंघटन निगमाकडून अर्थसाहाय्य केले जाते.

धातुउद्योग, अभियांत्रिकीय उद्योग आणि तदानुषंगिक उद्योग यांत पोलाद, अलोह धातू, वाहने, यंत्रसामग्री हे उद्योग येतात. ह्यांचा देशाच्या एकूण निर्यातीमध्ये अर्ध्याहून अधिक वाटा असून निर्मितिउद्योगातील एकूण कामगारसंख्येच्या निम्मे कामगार ह्या उद्योगांत गुंतलेले आहेत. ग्रेट ब्रिटनचा जगातील सर्वाधिक पोलाद उत्पादन करणाऱ्या देशांत पाचवा क्रम लागतो. १९५० साली पोलाद उत्पादन ८० लक्ष टन झाले तेच १९६८ साली २६० लक्ष टन, तर १९७३ मध्ये ते २६६·५ लक्ष टन झाले. ब्रिटनचा पोलाद उद्योग सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांमध्ये विभागलेला आहे. या उद्योगातील एकूण उत्पादनापैकी ९०% आणि एकूण कामगारांपैकी ७०% सरकारी क्षेत्रात आहेत. सरकारी क्षेत्रात ‘ब्रिटिश स्टील कॉर्पोरेशन’ हा मोठा निगम येत असून त्याची स्थापना २२ मार्च १९६७ रोजी झाली. या निगमात देशातील मोठे १४ पोलाद कारखाने व त्यांच्या सु. २०० शाखा सामील करण्यात आल्या. वर्षाकाठी १५० कोटी पौंड किंमतीचे पोलाद आणि अन्य वस्तू यांचे उत्पादन व विक्री हा निगम करीत असून, त्यामध्ये सु. २·२४ लक्ष लोक काम करतात.

अलोह धातूउद्योगांत सु. १·१० लक्ष कामगार गुंतलेले असून (सबंध यूरोपातील सर्वांत मोठे उद्योग) १९७२ साली त्यांच्या वस्तूंची निर्यात ३,४७० लक्ष पौंड झाली. ग्रेट ब्रिटन हे सबंध जगात व्यापारी वाहने निर्यात करणारे सर्वांत मोठे राष्ट्र आहे. १९७२ साली व्यापारी वाहनांचे उत्पादन ४.०८ लक्ष होते, तर मोटरगाड्यांचे उत्पादन १९·२१ लक्ष होते. ३० सप्टेंबर १९७३ रोजी सबंध जगामधील जहाजउत्पादन ११·४३ कोटी टनांहून अधिक होते, त्यापैकी सु. ६% उत्पादन (३२१ जहाजे व सु. ६८·४७ लक्ष टन, एकट्या ग्रेट ब्रिटनमध्ये होते. सबंध जगातील एकूण टँकरउत्पादनापैकी (२९१ टँकर व १५० लक्ष टन) १८ टँकर (९·६६ लक्ष टन) एकट्या ग्रेट ब्रिटनमध्ये तयार करण्यात येत होते. विमाननिर्मितिउद्योगाने १९७२ साली ४,१८० लक्ष पौंड किमतीच्या उत्पादनाची निर्यात केली. विद्युत् अभियांत्रिकी उद्योगात सु. ७·८० लक्ष लोक गुंतलेले असून वर्षाकाठी हा उद्योग सु. ६६ कोटी पौंड किंमतीच्या उत्पादित मालाची निर्यात करतो. याच उद्योगसमूहातील अतिशय वेगाने विकास पावलेला उद्योग म्हणजे इलेक्ट्रॉनीय उद्योग होय. रडार आणि नौकानयनाला साह्यकारी उपकरणे व यंत्रे, औद्योगिक नियंत्रण साधनसामग्री, रेडिओ व दूरचित्रवाणी संच वगैरे सु. ४,००० लक्ष पौंड किमतीचा माल प्रतिवर्षी या उद्योगाद्वारा निर्यात केला जातो. यांत्रिक अभियांत्रिकीय उद्योगात सु. ९·६ लक्ष लोक गुंतलेले असून, त्याची १९७२ सालची निर्यात सु. २०५ कोटी पौंड किमतीची होती. चाकू-सुऱ्या निर्मितिउद्योग, यांत्रिक उपकरणे व अवजारे उद्योग, धातुपेट्यानिर्मितिउद्योग यांसारख्या इतर धातुउद्योगांमध्ये सु. ५·६० लक्ष कामगार आहेत त्यांची प्रतिवर्षी निर्यात सु. १७·६० कोटी पौंडांच्या घरात जाते.

दुसऱ्या महायुद्धापासून कापड व वस्त्रोद्योग यांचे महत्त्व जरी कमी झाले असले, तरी एकूण निर्यातीत त्यांचा वाटा ५% असून त्या उद्योगात सु. १२ लक्ष लोक गुंतलेले आहेत. उंची दर्जाच्या लोकरीच्या कापडाची निर्यात करणारा देश म्हणून ग्रेट ब्रिटनचा सबंध जगात पहिला क्रम लागतो. परंतु यातही कृत्रिम धागाउद्योगाने फार मोठी मजल मारली असून, त्याचे उत्पादन १९७३ साली ४१·६० कोटी यार्ड झाले. रसायनोद्योगात सु. ४·६० लक्ष लोक असून, निर्मितिउद्योगाच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीच्या ९% आणि एकूण निर्यातीच्या १०% एवढा वाटा या उद्योगांचा आहे. १९६३–७३ या दशकात रसायननिर्मिती ६९ टक्क्यांनी वाढली. विशेषतः प्लॅस्टिक आणि औषधी उद्योग प्रकर्षाने विस्तारले. १९३८ साली प्लॅस्टिक उद्योगाचे उत्पादन ३० हजार टन होते ते १९७२ साली १२ लक्ष टनांवर गेले आणि औषधी उद्योगाने तर १९७२ मध्ये १८ कोटी पौंडांहूनही अधिक किमतीची निर्यात केली. खाद्यान्न, मद्य व तंबाखू या उद्योगांत ७·२९ लक्षांवर लोक गुंतलेले असून, १९७२ मध्ये या उद्योगांनी सु. ६२ कोटी पौंड किमतीची निर्यात केली. तीमध्ये सर्वांत महत्त्वाचा पदार्थ व्हिस्की असून तिचीच निर्यात २,२८० लक्ष पौंड किमतीची झाली. तक्ता क्र. २ वरून ब्रिटनमधील उद्योगधंद्यांचे समूह, त्यांचे उत्पादनमूल्य, कामगारसंख्या आणि स्थिर भांडवल परिव्यय यांचे आकडे स्पष्ट होतील.

शक्तीची साधने म्हणून ब्रिटनमध्ये मुख्यत्वेकरून कोळसा व पेट्रोलियम आणि थोड्या प्रमाणात अणुशक्ती, नैसर्गिक वायू व जलशक्ती यांचा उपयोग केला जातो. त्यांपाठोपाठ वीज व दगडी कोळसा यांचा क्रमांक लागतो. कोळसा देशातल्या देशात उपलब्ध होतो. जरुरीच्या ५०% शक्ती कोळसा पुरवितो. बहुतेक पेट्रोलियम बाहेरून आयात होते. इंधनशक्तीच्या एकूण सेवनातील पेट्रोलियमचा भाग १९५८ मध्ये २०% होता व १९६९ मध्ये तो ४० टक्क्यांपर्यंत वाढला. अणुशक्तीचा वापर हळूहळू वाढत असला, तरी त्याचे प्रमाण एकूण गरजेच्या अवघे ४% आहे. ३१ मार्च १९७२ रोजी राष्ट्रीय कोळसा मंडळाच्या मालकीच्या २८१ खाणींमधून कोळसा उत्पादन चालू होते. ३१ मार्च १९७३ रोजी कोळशाचा एकूण साठा ३२६ लक्ष टन होता. १९७१ च्या अखेरीस देशाची पेट्रोलियम परिष्करण (शुद्धीकरण) क्षमता प्रतिवर्षी १,२०० लक्ष टनांपर्यंत पोहोचली. १९७३ च्या अखेरीस ती प्रतिवर्षी १,३३० लक्षांपर्यंत जाण्याचा अंदाज होता. देशात २१ तेलशुद्धीकरण कारखाने असून त्यांपैकी ११ कारखान्यांची तेलशुद्धी क्षमता ५० लक्ष टनांहून अधिक आहे. आणखी तेलशुद्धी कारखाने बांधले जात आहेत. या कारखान्यांतून उत्पादित माल १९४८ सालातील ४० लक्ष टनांवरून १९७२ साली ९८० लक्ष टनांवर गेला आहे. १ मे १९४९ रोजी नैसर्गिक वायुउद्योगाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर या उद्योगाचे १ जानेवारी १९७३ रोजी ‘ब्रिटिश वायु निगम’ या नावाने पुनर्संघटन करण्यात आले. तेव्हापासून या निगमाने यापूर्वीच्या ‘गॅस कौन्सिल’ व १२ ‘एरिया गॅस मंडळे’ यांच्याकडे असलेले अधिकार आणि कार्ये स्वतःकडे घेतली. १९७२–७३ मध्ये १,०१,८०० लक्ष थर्म वायूची विक्री झाली. ३१ मार्च १९७३ रोजी निगमाकडे १·०५ लक्ष माणसे कामावर होती. १९४७ साली वीजउद्योगाचे राष्ट्रीयीकरण झाले असून विद्युत् उत्पादन व पारेषण मध्यवर्ती वीजउत्पादन मंडळाद्वारा आणि वितरण १२ विभागीय वीजमंडळांकडून केले जाते. ‘विद्युत् परिषद’ ही पर्यवेक्षक संस्था आहे. प्रतिवर्षी एकूण भांडवलसंचितीपैकी ९% वीजउद्योगाद्वारा होत असते. या उद्योगाचा भांडवली खर्च झपाट्याने वाढत आहे १९६१ साली तो ३,६४० लक्ष पौंड होता, तोच १९६९ मध्ये ५,७०० लक्ष पौंडांवर गेला. ३१ मार्च १९७३ रोजी देशात एकूण ५६,४२७ मेगॅवॉट क्षमतेची १७४ शक्तिउत्पादन केंद्रे व वीजग्राहकांची संख्या १,८९,२५,००० होती. ग्रेट ब्रिटनमधील बहुतेक वीजउत्पादन कोळसाप्रज्वलित बाष्पजनित केंद्रापासूनच होत असते. जलविद्युत्‌निर्मिती त्यामानाने बरीच कमी आणि तीही अधिककरून स्कॉटलंडमध्ये होते. स्कॉटलंडमध्ये ५० जलविद्युत् निर्मितिकेंद्रे कार्यवाहीत आहेत. १९६८ साली अणुशक्ति-उत्पादनकेंद्रापासून सु. १२% वीज निर्माण झाली, १९७०–७५ च्या दरम्यान हे प्रमाण २५% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अणुशक्ति- उत्पादनकेंद्रापासून वीजपुरवठा उपलब्ध करणारे ग्रेट ब्रिटन हे जगातील पहिले राष्ट्र होय. १९६९ च्या अखेरीस सु. ५,००० मेगॅवॉट क्षमतेची ८ अणुशक्ति-उत्पादनकेंद्रे कार्यशील होती. १९७० साली ब्रिटनमधील अणुशक्ती वीजनिर्मिती ही जगातील इतर सर्व राष्ट्रांच्या त्याच प्रकारच्या वीजनिर्मितीहून अधिक होती. १९७५ च्या सुमारास आणखी ८,००० मेगॅवॉट क्षमतेची अशी केंद्रे उभारली जाणार आहेत.

तक्ता क्र. २ : ब्रिटनमधील उद्योगसमूह

उद्योग समूह

उत्पादनमूल्य

१९७१ (लक्ष पौंडांत)

कामगार संख्या

जून १९७२

स्थिर भांडवल परिव्यय

१९७२ (लक्ष पौंडांत)

१. खाद्यान्ने, पेये व तंबाखू

८५,०७५

७,२९,८००

२,६२५

२. कोळसा व पेट्रोलियम पदार्थ

१५,०३८

४१,९००

१,०८८

३. रसायन व तज्‍जन्य उद्योग

३५,९९२

४,२४,०००

२,६४६

४. धातुनिर्मितिउद्योग

३८,२०४

५,१५,६००

२,५५०

५. यांत्रिक अभियांत्रिकी

४८,९०१

९,६३,८००

३,४३४

६. उपकरण अभियांत्रिकी

६,२९४

१,५५,७००

७. विद्युत् अभियांत्रिकी

३४,८९३

७,८०,४००

८. जहाज बांधणी व नाविक

अभियांत्रिकी

६,४४२

१,७६,९००

९. अन्य धातुपदार्थ

२६,२६४

५,५२,६००

१०. वाहने

४५,९२८

७,७५,६००

१,०८४

११. कापडउद्योग, कातडी व

वस्त्रोद्योग

४२,५६३

१०,२८,७००

१,१४७

१२. कागद, मुद्रण व प्रकाशन व्यवसाय

३०,२३६

५,७२,६००

१,११४

१३. इतर निर्मितिउद्योग

४४,१३७

८,९५,८००

२,०६२

एकूण

४,५९,९६७

७६,१३,३००

१७,७५०

इंधनशक्ती उद्योगात ७,७०,००० मजूर म्हणजे कामगारांच्या ३% मनुष्यशक्ती काम करते. १९७०-७१ मधील भांडवलगुंतवणूक ७० कोटी पौंडांच्या घरात असून ती एकूण गुंतवणुकीच्या एक-षष्ठांश आहे. वार्षिक उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५% आहे.

मच्छीमारी हा स्कॉटलंड भागातील महत्त्वाचा उद्योगधंदा आहे. ब्रिटनच्या उरलेल्या प्रदेशांत अनेकांच्या निर्वाहाचे ते साधन आहे. आधुनिक स्वरूपाचा मोठ्या प्रमाणावरील मत्स्योद्योग इंग्लंडच्या हल्‌, ग्रिम्‌झ्बी, फ्लीटवुड, यार्मथ आणि लोस्टॉफ्ट या बंदरांमध्ये एकवटलेला आहे. स्कॉटलंडमधील पूर्व किनाऱ्यावरील अनेक बंदरातून विशेषतः ॲबर्डीन बंदरातून, हेरिंग माशांची मोठी पैदास होते. ग्रेट ब्रिटनच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात मत्स्योद्योगाचा वाटा फक्त ०·४% एवढाच असला, तरी स्कॉटलंडला त्या उद्योगाचे फार महत्त्व आहे. १९६८ च्या अखेरीस, खोल समुद्रात जाऊन मत्स्य व्यवसाय करणारी १६५ जहाजे होती किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर मत्स्यव्यवसाय करणारी ३८३ जहाजे होती. १९७१ मध्ये स्कॉटलंडमधील २,६०० आणि इंग्लंड व वेल्समधील ३,२०० जहाजे मत्स्यव्यवसायात गुंतली होती. १९६८ साली या व्यवसायात पूर्णवेळ काम करणारे सु. १८,००० कोळी होते. त्या साली सर्व प्रकारचे मासे मिळून (डेमर्सल, पिलॅगिक व शेलफिश) ९ लक्ष टन उत्पादन (६ कोटी पौंड किमतीचे) झाले होते. त्या वर्षी सर्व प्रकारचे ताजे व हवाबंद डब्यातील मासे २.४ लक्ष टन आयात करावे लागले होते. १९७१ साली मासे-उत्पादन सु. ११ लक्ष टन (९·३ कोटी पौंड किमतीचे ) होते. पुढे मासे-सेवनाचे प्रमाण मात्र हळूहळू खाली येत असल्याचे दिसते. १९४८ मध्ये दरडोई सेवन १४ कि.ग्रॅ. होते, ते १९६९ मध्ये ८ कि.ग्रॅ. झाले.

ब्रिटनमधील उत्पादक जंगलाखालील जमीन ३७·६ लाख एकर (१५·३ लाख हे.) असून एकूण भूभागाच्या ती सु. ७% आहे. त्यांपैकी ५०% भाग इंग्लंडमध्ये, ४०% स्कॉटलंडमध्ये व उरलेला वेल्समध्ये आहे. देशांतर्गत जंगलसंपत्ती ब्रिटनच्या गरजेच्या मानाने फार कमी आहे. एकूण जंगलमालाच्या गरजेच्या ९० % भाग ब्रिटनला आयात करावा लागतो. आयात केलेले सर्व तऱ्हेचे लाकूड (कागद व लगदा अंतर्भूत) १९७२ मध्ये ८६·४ कोटी पौंड किमतीचे होते. त्यांपैकी इमारतीच्या लाकडाची किंमत २५·३ कोटी पौंड होती. शासकीय वन आयोगाकडे एकूण उत्पादक वनक्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र (७·५ लक्ष हे.) आहे. प्रतिवर्षी वनविकासाचे प्रमाण आयोगाद्वारा २२,००० हे. (मुख्यतः स्कॉटलंडमध्ये), तर खाजगी जंगलमालकांद्वारा २०,००० हे. असे पडते. आयोग मुख्यतः सूचिपर्णी वृक्षांची लागवड करतो. सूचिपर्णी वृक्षप्रकारांत सित्‌का, स्प्रूस, लॉजपोल पाइन, स्कॉट्‌स पाइन व नॉर्वे पाइन ह्यांचा अधिक भरणा आहे. बीच व ओक वृक्षांचीदेखील मोठ्या प्रमाणावर लागवड होते. १९७२ साली सरकारी व खाजगी क्षेत्रांतील वनांमध्ये मिळून २५,००० लोकांना रोजगारी होती, त्याचप्रमाणे आणखी ११, ००० लोक जंगलउद्योग व वाहतूक यांमध्ये गुंतलेले होते. वन आयोग हा राष्ट्रीय वन प्राधिकरण असून त्याच्याकडे वनविषयक सर्व बाबी– वनविकास, वनरोपणविकास, इमारती लाकडांचे उत्पादन व पुरवठा– सुपूर्द केलेल्या असतात. वन आयोगाच्या मालकीच्या वनक्षेत्रांमधून (३८० अरण्ये इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स यांमध्ये विखुरलेली) १९७२–७३ साली १५·९ लक्ष घ.मी. लाकूड उत्पादन झाले.

वेतन घेऊन काम करणाऱ्या कामगारवर्गाची संख्यात्मक वाढ औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात झपाट्याने झाली. जून १९७२ मध्ये देशातील श्रमशक्तीची आकडेवारी अशी होती : एकूण कामकरी लोकसंख्या : २,६६,१२,००० म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या सु. ५०% (पुरूष : १,५९,५४,००० स्त्रिया : ८९,१४,०००). सेनादले व स्त्रियांच्या सेवासंघटना यांमध्ये गुंतलेली लोकसंख्या ३·७२ लक्ष. नागरी सेवांमध्ये गुंतलेल्यांची एकूण संख्या (३० जून १९७२) २,३४,४१,००० असून विभागशः संख्या पुढीलप्रमाणे होती (आकडे लक्षांत) : कृषी, वन व मत्स्यव्यवसाय : ४·१६ खाणउद्योग : ३·७७ निर्मितिउद्योग (रसायने व अनुषंगी उद्योग धातु-अभियांत्रिकी व वाहन-उद्योग वस्त्रोद्योग पादत्राणे खाद्य, पेये व तंबाखू उद्योग इतर उद्योग) : ७६·१३ बांधकाम : १२·५८ गॅस, वीज व पाणी : ३·४७ वाहतूक व संदेशवहन : १५·२० वितरण व्यवसाय : २५·८८ व्यावसायिक, वित्तीय, शास्त्रीय व इतर सेवा : ६०·१५ राष्ट्रीय शासकीय सेवा : ५·८० स्थानिक शासकीय सेवा : ९·३४ नियोक्ते व स्वयंव्यावसायिक (सर्व उद्योग व सेवा): १७·९१. १५ ते ६४ वयाच्या काम करू शकणाऱ्या प्रमुख कामगारांपैकी ९०% लोकांना काम मिळाले असून उरलेले १०% एक तर शिक्षण घेत आहेत, अगर शारीरिक दृष्ट्या दुर्बल आहेत. १५ ते ५९ वयाच्या काम करू शकणाऱ्या एकूण स्त्रियांपैकी ५३% स्त्रिया कामावर आहेत. उरलेल्या ऐच्छिक बेकार आहेत. कामगार स्त्रियांपैकी ६४% स्त्रिया विवाहित आहेत.

ब्रिटनमधील बेकारीचे प्रमाण गेल्या पंचवीस वर्षांत अत्यल्प आहे. जगातील सर्व देशांतील बेकारीच्या मानाने ते खूपच कमी म्हणजे अवघे एक ते दोन टक्के आहे. १९६७ पासून हे प्रमाण किंचित वाढत असल्याचे दिसते. जुलै १९७२ मध्ये बेकारीचे प्रमाण ३·६% होते १९७२ मधील बेकारीचे सरासरी दरमहा प्रमाण ८·४४ लक्ष होते.

देशातील सर्व उद्योगधंद्यांतील बहुतेक कामगार व काही उद्योगधंद्यांतील सर्व कामगार संघटित असलेले दिसतात. ब्रिटनमधील कामगार संघटना दोनशे वर्षांपूर्वी स्थापन झाल्या. प्रारंभी त्या कुशल कारागिरांपुरत्या मर्यादित होत्या. नंतरच्या काळात त्या सर्वसाधारण मजुरांनी आणि अकुशल कामगारवर्गाने स्थापन केल्या. आता तर कारकूनवर्ग, तंत्रज्ञ व शासकीय वर्ग कामगार संघटनेच्या निशाणाखाली एकत्र आले आहेत.

ब्रिटनमधील एकूण २·६६ कोटी कामगारांपैकी १९७३ साली ट्रेड्‌स युनियन काँग्रेस ह्या सर्वांत मोठ्या कामगार संघटनेशी (महासंघाशी) १२६ कामगार संघटना संलग्न असून त्याची एकूण सभासद संख्या एक कोटीवर होती. त्यांपैकी २५·५६ लक्ष स्त्रीकामगारच होते. ‘ट्रेड्‌स युनियन काँग्रेस’ म्हणजे कामगार संघटना चळवळीचा राष्ट्रीय केंद्रबिंदू समजला जातो. ट्रेड्‌स युनियन काँग्रेसने आपल्या स्थापनेची शताब्दी १९६८ साली साजरी केली. ‘स्कॉटिश ट्रेड्‌स युनियन काँग्रेस’ ही एक मोठी कामगार संघटना स्कॉटलंडमध्ये कार्यशील असून तिचे सु.८·८८ लक्ष सभासद आहेत. एकूण कामगार संघटना ५५० हून अधिक असल्या, तरी ७० टक्के कामगार एकोणीस मोठ्या संघटनांचे सदस्य आहेत. गेल्या शतकात सदस्यांची संख्या वाढत आहे. परंतु अनेक संघटना एकत्र येऊन एक संघटना उभारत असल्याने संघटनांची संख्या कमी होत आहे. १९६९–७३ या पाच वर्षात औद्योगिक कलहांमुळे अनुक्रमे ६८·४६, १०९·८, १३५·५, २३९·०९ व ७१·७३ लक्ष कामाचे दिवस वाया गेले. औद्योगिक कलहांपेक्षा आजारपण, अपघात व गैरहजेरी यांमुळे मोठ्या प्रमाणावर कामगार तास फुकट गेले. शारीरिक व बौद्धिक श्रमाच्या कामासाठी अनुक्रमे ३९·४० व ३७·३८ तासांचा आठवडा असून तो साधारणतः ५ दिवसांचा असतो. संविधिमान्य सहा सार्वजनिक सुट्या असून बहुतेक कामगारांना– वर्षातून दोन, काहींना तीन– आठवड्यांची पगारी रजा मिळते. १९७० मध्ये पूर्णवेळ श्रमिकांचे साप्ताहिक वेतन सु. २८ पौंड होते. त्यापूर्वीच्या पाच वर्षात वेतनातील वाढ सरासरी ५०% झाली असून राहणीमानात सु. २०% सुधारणा झाली. १९७२ साली पूर्णवेळ पुरुष-कामगारांची साप्ताहिक प्राप्ती सरासरी ३५.८ पौंड व स्त्री-कामगारांची सरासरी १८.३ पौंड होती. पुरुष-कामगार आठवड्यास सरासरी ४५ तास, तर स्त्री-कामगार आठवड्यात ३८ तास काम करतात.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन पूर्णार्थाने कल्याणकारी राज्य बनले असून तो जवळजवळ सर्वंकष सामाजिक सुरक्षा पद्धतीचे पालन करीत असल्याचे दिसून येते. १९४६ मध्ये पार्लमेंटने केलेला राष्ट्रीय विमा कायदा, राष्ट्रीय औद्योगिक अपघात विमा कायदा, राष्ट्रीय आरोग्यसेवा कायदा यांची अंमलबजावणी १९४८ च्या जुलैत सुरू झाली. त्याच वर्षी बालक कायदा करण्यात आला. युद्धकाळात तयार झालेल्या बेव्हरिज अहवालाचा परिणाम म्हणजे विविध प्रकारच्या विमा योजना, मोफत औषधोपचार व अन्नाच्या किमती अल्प रहाव्यात म्हणून दिलेले अर्थसाहाय्य, गृहबांधणीसाठी अर्थसाहाय्य, शिक्षण व आरोग्य यांवरील खर्च आदी योजना कार्यवाहीत आल्या व ब्रिटिश कामगाराला किमान राहणीमानाची हमी लाभली. त्याला आपत्काळी योग्य ती मदत मिळण्याची खात्री असल्याने त्याच्या मनात स्थैर्याची व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नेहमी पूर्ण रोजगार राखण्यास सरकार वचनबद्ध असल्याने बेकारीची भीती त्यास वाटत नाही. रोजगार, स्थैर्य, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, समाधानकारक राहणीमान हे कामगारांचे हक्क असून त्यांना ते प्राप्त होत आहेत हे पहाण्यास सरकार कर्तव्यबद्ध आहे. ६ एप्रिल १९७५ पासून राष्ट्रीय विमा अधिनियम १९६५ मधील तरतुदींऐवजी सामाजिक सुरक्षा अधिनियम १९७३ मधील तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. अंशदान-रचनेमध्येच महत्त्वाचे बदल आहेत. कामगाराला मिळणाऱ्या एकूण मिळकतीच्या प्रमाणात अंशदान-दर आता ठरविण्यात आले आहेत. या अधिनियमामुळे कामगारास खालील फायदे मिळतात : (१) बेकारी व आजार (२) विकलांगता (३) प्रसूती (४) वैधव्य (५) अपत्य विशेष भत्ता (६) पालकभत्ता (७) निवृत्तिवेतन (पुरुषांसाठी ६५ ते ७० च्या दरम्यान स्त्रियांकरिता ६० ते ६५) (८) दुसरे (पूरक) निवृत्तिवेतन (ही योजना ६ एप्रिल १९७५ पासून कार्यान्वित झाली) (९) मृत्यु-अनुदान. १ एप्रिल १९७५ पासून, राष्ट्रीय विमा राखीव निधी व औद्योगिक अपघात निधी हे दोन्ही ‘राष्ट्रीय विमा निधी’ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.युद्धामध्ये विकलांग झालेल्यांना साप्ताहिक युद्ध-निवृत्तिवेतने मिळतात.

व्यापार : ब्रिटनमधील औद्योगिक क्रांतीचा एक अतिशय महत्त्वाचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विस्तार हा होय. सोळाव्या शतकापासूनच अंतर्गत व्यापार, वाणिज्य व आंतरराष्ट्रीय व्यापार यांची वाढ होत होती आणि तीतूनच औद्योगिक क्रांतीची बीजे रोवली गेली. व्यापारी क्रांती औद्योगिक क्रांतीपूर्वीच झाली. पहिल्या महायुद्धापूर्वीच्या काळात ब्रिटनच्या निर्यात व्यापारात कापड, भांडवली वस्तू, अन्य उपभोग्य वस्तू यांना त्या क्रमाने स्थान होते. कापडाची निर्यात नेहमीच मूल्यदृष्ट्या निम्म्यापेक्षा अधिक होती. या काळात निर्यातीबरोबरीने अथवा निर्यातीपेक्षाही झपाट्याने आयातीची वाढ झाली. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटनला इतर देशांची स्पर्धा जाणवू लागली व आपला निर्यात व्यापार टिकविणे कठीण झाले. राहणीमान टिकविण्यासाठी आयात कमी करणे अशक्य होते. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धोत्तर पुनर्घटनेच्या प्रश्नामुळे ब्रिटनमधील आयात अपरिहार्यपणे वाढत आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आणि जगाच्या एकूण लोकसंख्येच्या २ टक्क्यांहूनही कमी लोकसंख्या असली, तरीही जागतिक आंतरराष्ट्रीय व्यापारात ब्रिटनचा जगात तिसरा क्रमांक लागतो. १९७१ मधील उत्पादित मालाच्या एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारात ब्रिटनचा वाटा ७% होता. एक शतकाहूनही अधिक काळ ब्रिटनच्या अर्थकारणात आंतरराष्ट्रीय व्यापाराला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अन्नधान्याच्या गरजेपैकी निम्मा भाग व उद्योगधंद्यांना आवश्यक असलेला सर्वच कच्चा माल ब्रिटनला आयात करावा लागतो. वस्तू व सेवा यांची ब्रिटनहून होणारी निर्यात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २०% आहे. यंत्रसामग्री, वाहतूक साधने, विमाने, धातुमाल, वीजमाल, रसायने व कापड यांचा पुरवठा करणारे ब्रिटन हे महत्त्वाचे राष्ट्र आहे. ग्रेट ब्रिटन सबंध जगामध्ये अन्न पदार्थांची सर्वांत मोठी बाजारपेठ असून धातू व खनिजे, कापड उद्योगाचा कच्चा माल, पेट्रोलियम आणि इतर अनेक पदार्थांच्या सर्वांत मोठ्या बाजारपेठांमध्येही ग्रेट ब्रिटनची गणना होते.

ब्रिटनचा आयात व्यापार १९७३ मध्ये १,५८५·४ कोटी पौंड व निर्यात व्यापार १,२४५·५ कोटी पौंड किमतीचा होता. कृषिउत्पादनात वाढ झाल्याने आयात अन्नधान्याचे एकूण आयात व्यापारातील प्रमाण १९५६ मध्ये ३६% होते ते १९७२ मध्ये २१ टक्क्यांपर्यंत खाली आले. पेट्रोलियम व वंगण यांची आयात १९७२ मध्ये एकूण आयातीच्या ११·२% होती. गेल्या काही वर्षात तयार व भांडवली मालाची यात झपाट्याने वाढत आहे. १९५६ मध्ये त्यांचे प्रमाण एकूण आयातीच्या ५·९% होते, ते १९७२ मध्ये २८·१% झाले. अर्ध-निर्मित मालाचे आयात-प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. १९७२ साली या प्रकारच्या मालाची आयात एकूण आयातीच्या २६% झाली.

ब्रिटनहून परदेशी निर्यात होणाऱ्या मालापैकी सु. ८५% निर्यात उत्पादित मालाची होते. एकूण निर्यातीत अभियांत्रिकीय मालाचे प्रमाण १९७२ साली ४४%, रासायनिक द्रव्यांचे ९·९%, तर धातूचे १०·४% होते. कापडाचे प्रमाण १९४८ मध्ये १८% होते, ते १९६० मध्ये ७ टक्क्यांवर आले व १९७२ साली ते ४.६ टक्क्यांपर्यंत घसरलेले आढळते. पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीचे प्रमाण १९७१ साली २·३% होते.

ब्रिटनच्या पश्चिम यूरोपशी व्यापार वाढत आहे.मात्र राष्ट्रकुल देशांशी (विशेषतः कच्चा माल उत्पादक देशांशी) होणाऱ्या व्यापारात घट होत आहे. १९५८ साली पश्चिम यूरोपीय देशांशी ब्रिटनच्या एकूण निर्यात व्यापाराचे प्रमाण २७% होते, तेच १९७२ साली ४३ टक्क्यांवर गेले. यूरोपीय सामायिक बाजारपेठेतील देशांशी ब्रिटनचा व्यापार १९७२ साली १६ टक्क्यांनी वाढला. त्याच वर्षी उत्तर अमेरिकेशी व्यापारप्रमाण १६% होते. लॅटिन अमेरिकन देशांबरोबरील व्यापारात १९ टक्क्यांनी वाढ झाली. रशिया व पूर्व यूरोपीय देशांशी असलेला व्यापार अजून कमी असला, तरी गेल्या दहा वर्षांत त्यात हळूहळू वाढ होत आहे. जपानशी असलेला व्यापारही अधिकाधिक वाढत आहे. १९७२ साली निर्यात प्रमाण १० टक्क्यांनी वाढले, तर आयातीत ५६ टक्क्यांनी वाढ झाली.

अंतर्गत व्यापार : लंडन हे घाऊक व्यापार व आयात व्यापार यांचे प्रमुख केंद्र असून एकूण घाऊक व्यापारातील निम्म्याहून जास्त उलाढाल येथेच होत असते. देशातील इतर वितरणकेंद्रे म्हणजे लिव्हरपूल, मँचेस्टर, ब्रिस्टल, ग्लासगो व हल् ही होत. १९७१ च्या वितरण गणनेनुसार किरकोळ व्यापाराची ४·८५ लक्ष विक्रीकेंद्रे ग्राहकांना वस्तू व सेवा उपलब्ध करीत होती त्यांपैकी अन्न, खाद्यपदार्थ व किराणा मालाची २·०२ लक्षांवर तर कापड, वस्त्रे व पादत्राणे यांसारख्या मालाची ८१,००० दुकाने होती. त्यांद्वारा सु. ३० लक्ष लोकांना रोजगार मिळत होता व या दुकानांची वार्षिक उलाढाल १,५२२ कोटी पौंडांची होती.निम्म्याहून अधिक किरकोळ व्यापार स्वतंत्र व्यापार व्यावसायिकांकडून, तर सु. ४३% व्यापार साखळी दुकानांकडून चालविला जात होता.

किरकोळ व्यापारात सहकारी संस्थांचाही मोठा वाटा आहे. १९७३ साली देशात किरकोळ व्यापार करणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या २४६ होती. त्यांमधील सर्वांत मोठी सहकारी संस्था म्हणजे ‘को-ऑपरेटिव्ह रिटेल सर्व्हिसेस लिमिटेड’ ही असून तिची सदस्यसंख्या १२·९ लक्ष आहे. १९७२ मध्ये तिने १,४६० लक्ष पौंडांची उलाढाल केली. १९७१ मध्ये किरकोळ व्यापार करणाऱ्या सहकारी संस्थांची एकूण विक्री सु. ११० कोटी पौंडांची असून एकूण किरकोळ व्यापारात त्यांचा ७% वाटा होता.

देशात १९७१ साली एकूण ९१४ विभागीय वस्तुभांडारे (उलाढाल ९,३८० लक्ष पौंड) होती त्यांपैकी २९६ बहुविध दुकानांनी, ३६९ स्वतंत्र व्यावसायिकांनी व २४९ सहकारी संस्थांनी चालविली होती. गृहोपयोगी वस्तू व कापड, वस्त्रे यांसारख्या विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री किमान २५ माणसांकडून केली जात असलेल्या दुकानांना, वितरण गणनेनुसार, विभागीय वस्तुभांडारे असे म्हटले आहे.

गेल्या दोन दशकांत, स्वयंसेवा व्यापाराचा (सेल्फ सर्व्हिस ट्रेडिंग) होत असलेला विकास हे किरकोळ व्यापार पद्धतीचे एक वैशिष्ट्यच मानले पाहिजे. १९५० साली असा व्यापार करणारी ५०० हूनही कमी दुकाने होती १९६१ साली त्यांची संख्या ९,५००, १९६९ मध्ये २३,००० तर १९७१ मध्ये २८,००० च्या वर झाली. १९५६ पासून देशात सुपरबाजार असून १९६६ च्या गणनेनुसार १९६१ साली सुपरबाजारांची संख्या ८७० होती १९७१ च्या अखेरीस आणखी सु. ४,८०० सुपरबाजार किरकोळ खाद्यविक्रीपैकी ३३ टक्क्यांची उलाढाल करीत होते. १९५५ पासून बाजारात स्वयंचलित विक्री यंत्रांचे नवनवे प्रकार येऊ लागले आहेत. अशी सु. ४ लक्ष यंत्रे वापरात आहेत. या सर्व यंत्रांपासूनची एकूण विक्री १९७१ मध्ये सु. ११० लक्ष पौंड झाली. सिगरेटी विकणाऱ्या यंत्रांपासूनच ६० लक्ष पौंडांची विक्री झाली. ही यंत्रे सिगरेटी, मेवामिठाई, तिकिटे, तसेच गरम व शीत पेये, तयार अन्नपदार्थ, मोजे, कागदी बांधणीची पुस्तके (पेपरबॅक बुक्स) व अन्य वस्तू यांची विक्री करतात. १९७१ च्या वितरण गणनेनुसार, देशात २४,३०० फिरती दुकाने होती व त्यांची विक्री ९८० लक्ष पौंड होती. मध्यवर्ती मोठ्या दुकानांशिवाय, गावाबाहेर दुकाने मोठ्या प्रमाणावर काढण्यात येत आहेत. एकाच छताखाली सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध व्हाव्यात म्हणून ही योजना आहे. विक्री मोठ्या प्रमाणावरच व्हावी म्हणून ग्राहकांना आकृष्ट करणाऱ्या अनेक बक्षीसयोजना राबविण्यात येतात. ग्रेट ब्रिटनमध्ये विस्तृत प्रमाणावर पतपत्र पद्धती वापरात आहे. ‘टपाल विक्री व्यवसाय’ (डाक व्यापार) हा व्यापारप्रकार अलीकडे वेगाने प्रसृत होऊ लागला आहे.१९६६ च्या वितरण गणनेनुसार किरकोळ डाक व्यापाराची विक्री पाच वर्षात (१९६१–६६) २,२७० लक्ष पौंडांवरून जवळजवळ दुपटीवर म्हणजे ४,२९० लक्ष पौंडांवर गेली. १९६६–७१ या पाच वर्षांतही ही विक्री ६,१९० लक्ष पौंडांवर गेल्याचे दिसून येते. याच काळात एकूण किरकोळ व्यापाराच्या ४% विक्री डाक व्यापार पद्धतीने झाली.

देशातील उद्योगधंद्यांनी १९७१ मध्ये आवेष्टनांवर सु. १०० कोटी पौंड खर्च केल्याचे आढळते. स्वयंसेवा दुकानांमध्ये झालेली वाढ, चिन्हांकित व प्रमाणित वस्तूंचा अधिकाधिक प्रसार आणि अंशप्रक्रियित अन्नपदार्थाचा अधिकाधिक वापर, ह्या गोष्टी आवेष्टनमाध्यमांत झालेल्या बदलाची कारणे म्हणून सांगता येतील. आवेष्टनमाध्यम म्हणून कागदाचा (खोकी, कागदी पिशव्या) सर्वाधिक वापर होत असतो (वर्षाकाठी ५,००० लक्ष पौंडांची उलाढाल) इतर महत्त्वाची माध्यमे म्हणजे कथिलपत्रे – वर्ख, प्लॅस्टिके, काच व सेल्यूलोज फिल्म ही होत. दिवसेंदिवस प्लॅस्टिकांचा उपयोग वेगाने वाढत आहे.

हप्तेबंदी खरेदी कर्जपद्धतीमुळे गृहोपयोगी व टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीमध्ये (उदा., मोटारी, फर्निचर, धुलाई यंत्रे, दूरचित्रवाणी संच, प्रशीतक, कुकर इ.) झपाट्याने वाढ होत आहे. १९७२ साली नव्याने उपलब्ध केलेल्या कर्जाचा आकडा २४५ कोटी पौंडांवर गेला.

सर्व प्रकारच्या जाहिरातींवर १९७२ साली सु. ७,०८० लक्ष पौंड खर्च करण्यात आले. यांपैकी चित्रलेखन जाहिरातींवर (डिस्प्ले ॲडव्हर्टाइझिंग) ४,८०० लक्ष पौंड, तर वर्गीकृत, वित्तीय आणि औद्योगिक जाहिरातींवर २,२८० लक्ष पौंड खर्चण्यात आले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ प्रॅक्टिशनर्स इन ॲडव्हर्टाइझिंग’ ही जाहिरातसंस्थांची प्रातिनिधिक संघटना आहे. ‘ॲडव्हर्टाइझिंग असोसिएशन’ ही प्रमुख संघटना आहे. विविध जनसंपर्कसंस्था व जाहिरातसंस्थांचे जनसंपर्क विभाग सामान्य सेवांबरोबरच उद्योग व व्यापारव्यवसाय ह्यांनाही आपल्या विशेष सेवा उपलब्ध करून देतात. १९४८ साली ‘इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स’ ही जनसंपर्कसंस्था स्थापण्यात आली.

ग्राहकाचे संरक्षण व्हावे या हेतूने शासनाने अनेक कायदे केले आहेत. खाजगी ग्राहकहितेच्छू संघटनाही ह्याबाबत जागरूकपणे कार्य करताना आढळतात. ऐशींच्यावर अशा संघटना कार्यशील असून ‘कन्झ्यूमर्स असोसिएशन’ ही सर्वांत मोठी ग्राहकसंघटना आहे तिचे सहा लाखांवर सभासद आहेत. ही संघटना विविध वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल खात्री करते व तीनुसार ग्राहकांना मार्गदर्शन करते. यासंबंधीचे लेख, मते, तसेच गुणवत्ता अहवाल संघटनेच्या विच्‌ (Which) या मासिकातून सदस्यांना प्रसृत केले जातात. वर्षात सु. ६० व्यापारविषयक जत्रा व प्रदर्शने भरविण्यात येतात.

अर्थकारण : ब्रिटनमधील बँकांचा इतिहास फार जुना आहे. ‘बँक ऑफ इंग्लंड’ १६९४ मध्ये स्थापन झाली. सर्वार्थाने ती मध्यवर्ती बँक आहे. तिचे १९४६ साली राष्ट्रीयीकरण झाले. चलननियंत्रणाचे काम ती करते व सरकारचे सर्व आर्थिक व्यवहार तिच्यातर्फे होतात. १५ फेब्रुवारी १९७१ पासून ब्रिटनने चलनाची दशमान पद्धती स्वीकारली आहे. पौंड हे चलन कायम आहे. परंतु जुन्या शिलिंगांच्या जागी पौंडांची शंभर भागांत विभागणी करणारे ‘न्यू पेन्स’ प्रचारात आले आहेत.

मध्यवर्ती बँकेव्यतिरिक्त १९७२ साली अठरा प्रमुख ठेवी बँका असून त्यांच्या १४ हजार शाखा होत्या. त्याच वर्षी त्यांच्यापाशी १,८१७ कोटी पौंडांच्या ठेवी होत्या. यांखेरीज, ३७ विदेश व्यापारी बँका ग्रेट ब्रिटन व अन्य देश यांमधील व्यापारसंवर्धनाचे कार्य करतात. लंडनमध्ये सध्या ५० अमेरिकन, ६० युरोपीय, १९ जपानी आणि ७३ परदेशी बँकांच्या शाखा कार्य करीत आहेत. खाजगी क्षेत्रातील लहान व मध्यम आकारांच्या उद्योगधंद्यांना भांडवली साह्य, आर्थिक सल्ला व मार्गदर्शन आणि संगणन व इतर सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने औद्योगिक व वाणिज्यविषयक वित्तमहामंडळ १९४५ मध्ये स्थापण्यात आले. मोठ्या उद्योगधंद्यांना अशा प्रकारचे साह्य करण्यासाठी वित्तीय निगम त्याच वर्षी स्थापन करण्यात आला. राष्ट्रकुल प्रदेशातील उद्योगधंद्यांना साह्य करण्याकरिता १९५३ मध्ये राष्ट्रकुल विकासवित्त महामंडळ (कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट फिनान्स कॉर्पोरेशन) स्थापण्यात आले. ब्रिटनमध्ये आठ प्रमुख शेअरबाजार असून देशातील ७८ शहरांत व गावांत त्यांचा व्यवहार आहे. १७७३ साली ग्रेट ब्रिटनमधील पहिला शेअरबाजार लंडन येथे स्थापण्यात आला. ‘लंडन स्टॉक एक्स्चेंज’ हा शेअरबाजार लंडनमधील कॅपल कोर्ट भागात १८०१ साली उघडण्यात आला. तेव्हा पासून त्याने शेअरांच्या विक्री-खरेदीचे तसेच उद्योगधंद्यांकरिता नवे भांडवल उपलब्ध करून देण्याचे केंद्र म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. लंडन शेअरबाजारात शेअरांची होणारी दैनंदिन उलाढाल (सु. ९,००० शेअरांची खरेदीविक्री) आणि सदस्यसंख्या (२५ लक्ष) या दोहोंचा विचार केल्यास, हा शेअरबाजार जगात सर्वांत मोठा गणला जातो. ग्रेट ब्रिटन व इतर अनेक देशांमधील सु. ८,४०० कंपन्यांचे रोखे-व्यवहार या शेअरबाजारात चालतात. ३१ मार्च १९७३ अखेर १६,७२९ कोटी पौंडांच्या किंमतीचा रोखेव्यवहार येथे करण्यात आला. लंडन शेअरबाजार हा जगातील सर्व शेअरबाजारांशी केबल अथवा दूरध्वनीने जोडलेला आहे. युद्धोत्तर काळात शेअरांची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. देशात युनिट ट्रस्ट ह्या बचत संघटनांची झपाट्याने वाढ झालेली आहे. एप्रिल १९७३ अखेर या संघटनांत गुंतविलेली रक्कम १९५८ मधील ६ कोटी पौंडांवरून २४६ कोटी पौंडांवर गेली. देशात सु. ५९० विमाकंपन्या असून त्यांपैकी सु. १३० कंपन्या आयुर्विम्याचाच व्यवहार करतात. यांशिवाय सु. १६० परदेशी विमाकंपन्या देशात विमाव्यवहार करतात. १९७२ साली ब्रिटिश विमाकंपन्यांची एकूण मत्ता सु. १,९०० कोटी पौंड होती. ‘लॉइड्‌स’ ही जगप्रसिद्ध खाजगी विमासंस्था सतराव्या शतकात मुख्यतः सागरी विमाव्यवहार करण्यासाठी स्थापण्यात आली होती. परंतु आता ती सबंध जगातील इतर प्रकारचे विमाव्यवहारही हाताळते. सध्या तिचे सु. ७,१०० हमीदारसभासद आहेत. ब्रिटनमधील परकीय चलन बाजारात २०० अधिकृत बँका व ११ दलालसंस्था भाग घेतात. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी परकीय चलनपुरवठ्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. बरीच राष्ट्रे आपले मध्यवर्ती चलननिधी स्टर्लिंग पौंडांत ठेवीत असल्याने ब्रिटनला त्या राष्ट्रांचे बँकर म्हणूनही काम करावे लागते.

शासनाचे सु. ९०% महसुली उत्पन्न मुख्यतः प्राप्तिकार, भांडवली कर आणि अप्रत्यक्ष कर यांपासून मिळते. स्थानिक शासनाच्या उत्पन्नाच्या प्रमुख बाबी म्हणजे केंद्रीय शासनाने दिलेली अनुदाने, कर्जे व मालमत्तेवरील स्थानिक कर होत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्थानिक शासनाच्या करांचा वाटा एकूण करांमध्ये ३०% होता, तो आता १० टक्क्यांवर आला आहे, प्राप्ती व भांडवल यांच्यावर आकारण्यात येणाऱ्या करांपासून सु. निम्मे महसुली उत्पन्न मिळते. प्राप्तिकरांमध्ये उपरिकर व निगमकर यांचा, तर भांडवली करांमध्ये मृत्युशुल्क, भांडवली नफा कर आणि अल्पमुदती भांडवली नफा कर यांचा समावेश होतो. देशात अर्जित होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राप्तीवर तसेच ब्रिटिश नागरिकांच्या ब्रिटनबाहेरील प्राप्तींवरदेखील प्राप्तिकर आकारण्यात येतो. तथापि, अनेक देशांबरोबर ब्रिटनने दुहेरी कर आकारणीतून सूट मिळण्यासाठी करार केले आहेत. १९६६ पासून निगमांच्या नफ्यावर आणि भांडवली नफ्यांवर कर आकारण्यास सुरुवात झाली. अप्रत्यक्ष करांमध्ये सर्वांत अधिक महसूल पेट्रोल व तंबाखू यांपासून मिळतो. इतर मोठ्या महसुलीचे कर म्हणजे खरेदी कर, अल्कोहॉलयुक्त मद्यांवरील कर आणि निवडक रोजगार कर हे होत.

१९७४–७५ च्या अर्थसंकल्पात एकूण आय (महसुली उत्पन्न) २,३१८·८ कोटी पौंड अपेक्षित असून त्यापैकी २,२२७·७ कोटी पौंड कररूपाने गोळा होणार आहेत. एकूण व्यय २,२२०·३ कोटी पौंड धरण्यात आला आहे. प्राप्तीवरील, भांडवलावरील आणि अप्रत्यक्ष कर हे प्रमुख तीन करप्रकार असून व्यक्तींच्या प्राप्तीवरील करांपासून सर्वांत अधिक म्हणजे ९६८·२० कोटी पौंड उत्पन्न मिळाले. भांडवली नफाकर, मृत्युशुल्क व मुद्रांकशुल्क यांपासून अनुक्रमे ३२, ३८ व २४ कोटी पौंड, उत्पन्न मिळाले. निगमकरांपासून ३२६·५ कोटी पौंड, तर जकात व अबकारी कर यांपासून ७६५·० कोटी पौंड (अल्कोहॉलयुक्त मद्यांवरील कर : ११२·५ कोटी पौंड तंबाखू : १२७·५ कोटी हायड्रोकार्बन तेले : १६१·० कोटी) मिळाले. मूल्यवर्धित करापासून (व्हॅल्यू ॲडेड टॅक्स) २७० कोटी पौंड उत्पन्न मिळाले. मोटारगाड्या आणि जड वाहने यांवरील करांपासून अनुक्रमे १२·५ कोटी व ५४ कोटी पौंड उत्पन्न मिळाले. व्ययापैकी प्रामुख्याने संरक्षणावर ३६५·४ कोटी, आरोग्य व व्यक्तिगत समाजसेवा यांवर २९८ कोटी, सामाजिक सुरक्षेवर २२१.२० कोटी व गृहनिवसनावर ६४·७ कोटी पौंड खर्ची टाकण्यात आले. १९७५-७६ च्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराचा दर ३३ टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. मूल्यवर्धित कराच्या दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली असून हा कर बव्हंशी सर्व वस्तू आणि सेवा ह्यांवर आकारण्यात येतो. त्याचप्रमाणे चैनीच्या वस्तूंवर (सिगारेट व मद्ये यांपासून ते फर-कोट व जडजवाहीर यांपर्यंत) अतिशय चढत्या दराने कर आकारण्यात आले आहेत. या नव्या करांपासून १९७५–७६ या आर्थिक वर्षात १२५ कोटी पौंडांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. तिसऱ्या विल्यमच्या काळापासून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय कर्ज उभारणीस सुरुवात झाली असे दिसते. १६८९ साली ते ६·६४ लक्ष पौंड होते. सप्तवार्षिक युद्धाच्या प्रारंभी (१७५६) ते ७·५ कोटी पौंड, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रारंभी (१७७५) व शेवटी (१७८४) ते अनुक्रमे १२·७ व २४·३ कोटी पौंड होते. क्रिमियाच्या युद्धाच्या अखेरीस (१८५७) ते ८३·७ कोटी पौंड होते. पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभी (१९१४) राष्ट्रीय कर्ज ७०·८ कोटी पौंड झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभी (१९३९) राष्ट्रीय कर्ज ८३० कोटी पौंड होते दुसऱ्या महायुद्धानंतरच्या (१९४६) त्याने २,३७७ कोटी पौंडांची पातळी गाठली. १९७०-७१ मध्ये राष्ट्रीय कर्ज ३,३४२ कोटी पौंड होते, ते ३१ मार्च १९७३ रोजी ३,५२६·८ कोटी पौंड झाले.

उत्पन्न व संपत्तीचे वाटप : ब्रिटनमधील एकूण व्यक्तिगत करपूर्व उत्पन्न १९७२ साली ५,३०० कोटी पौंड होते. १९६९ मध्ये देशातील करपूर्व उत्पन्नाचे वाटप तक्ता क्र. ३ प्रमाणे होते.

तक्ता क्र. ३

करपूर्व वार्षिक उत्पन्न

व्यक्तींची संख्या

२५० पौंडाहून कमी

२२·५० लक्ष

१,००० पौंडाहून कमी

१६६·०० लक्ष

२०,००० पौंडाहून अधिक

सात हजार

ह्या सात हजार व्यक्तींचे एकूण करपूर्व उत्पन्न २,२१० लक्ष पौंड होते त्यांचे करोत्तर उत्पन्न ५६० लक्ष पौंड झाले. १९६९ मध्ये १४० लक्ष लोकांची निव्वळ संपत्ती १,००० पौंडांहून अधिक असून त्यांची एकूण ८,९०० कोटी पौंड होती. यापैकी ८% संपत्ती केवळ २०,००० व्यक्तीकडे होती.

परदेशातील भांडवल गुंतवणूक : पहिल्या महायुद्धापूर्वी ग्रेट ब्रिटनची परदेशांतील भांडवल गुंतवणूक ३,००० कोटी डॉलरांवर होती. दोन महायुद्धांच्या मधल्या काळातही गुंतवणुकीचा आकडा पुष्कळच मोठा राहिला. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रेट ब्रिटनला, आपल्या साम्राज्यातील बरीच राष्ट्रे स्वतंत्र झाल्याने आणि युद्धात झालेल्या अवाढव्य परदेशी कर्जामुळे, परदेशी गुंतवणुकीतील बराच मोठा भाग सोडावा लागला. अर्थव्यवस्था जसजशी सुधारत गेली, तसतसा ग्रेट ब्रिटनचा परदेशांतील भांडवल-गुंतवणुकीचा वेगही वाढत गेला. १९५५–६४ या काळात खाजगी भांडवलाची सरासरी स्थूल गुंतवणूक प्रतिवर्षी ३० कोटी पौंड होती. १९६७ साली ‘बोर्ड ऑफ ट्रेड’ च्या अंदाजानुसार, ब्रिटिश कंपन्यांचे (तेल कंपन्या वगळून) भांडवल–गुंतवणुकीचे प्रमाण सु. २६·७ कोटी पौंड होते. १९७० साली परदेशी भांडवल गुंतवणूक पुढीलप्रमाणे होती : (आकडे कोटी पौंडांत) : सामायिक बाजारपेठीय देश ७२·१० एफ्टा देश : २·१० लॅटिन अमेरिका : १·३० पश्चिम यूरोप : १०·१० उत्तर अमेरिका : १७·८०. १९७१ साली प्रत्यक्ष विदेशीय भांडवल गुंतवणूक (तेल कंपन्या धरून) ७२·५ कोटी पौंड होती. १९७२ च्या अखेरीस, परदेशी गुंतवणुकीमुळे उत्पन्न झालेली ग्रेट ब्रिटनची एकूण मत्ता १,८५२ कोटी पौंड झाली. हाच आकडा, १९६२ साली ८०७ कोटी पौंड होता. विकसनशील देशांना ग्रेट ब्रिटनकडून देण्यात येणाऱ्या मदत कार्यक्रमाचे त्रिविध स्वरूप असते : आर्थिक व सामाजिक विकासासाठी कर्जे व अनुदाने तांत्रिक साहाय्य आणि विकसनशील देशांना आर्थिक व तांत्रिक मदत देणाऱ्या विविध संस्थांसाठी अर्थसंकल्पात वित्तीय तरतूद. १९४५ पासून ग्रेट ब्रिटनने केलेल्या साहाय्याचा आकडा ३३० कोटी पौंडांवर गेला आहे. १९७१ साली हे साहाय्य २७·७० कोटी पौंड होते.

दळणवळण : अंतर्गत व परदेशी दळणवळण क्षेत्रांत ३० जून १९७१ रोजी, ब्रिटनमध्ये १६ लाख म्हणजे एकूण कामगारांपैकी ७% कामगार गुंतलेले होते. १६ लाख कामगारांपैकी रस्तेमार्ग वाहतुकीत ३१%, लोहमार्ग वाहतुकीत १७%, जलवाहतूक व हवाई वाहतूक ह्यांमध्ये प्रत्येकी ५% आणि डाक-सेवा व संदेशवहन क्षेत्रात ३०% कामगार काम करीत होते. बंदर व अंतर्गत जलवाहतूक आणि संकीर्ण वाहतूक सेवा यांमध्ये १२% कामगार गुंतलेले होते. वाहतूक आणि दळणवळण यांचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात ९% वाटा आहे. राष्ट्राच्या एकूण भांडवल गुंतवणुकीतील मोठा भाग या दोन गोष्टीसाठी खर्ची पडला आहे. ब्रिटनमधील १९७० सालचे अंतर्गत मालवाहतुकीचे स्वरूप तक्ता क्र. ४ वरून अधिक स्पष्ट होईल.

तक्ता क्र. ४ अंतर्गत मालवाहतूक (१९७०)

प्रकार

टन-मैल (कोटी)

१. रस्ते

५,०८० (६१%)

२. लोहमार्ग

१,६४० (२०%)

३.किनारी जहाज

वाहतूक

१,४२० (१६·९%)

४. नळमार्ग

१८० (२%)

५. अंतर्गत जलमार्ग

१० (०.१%)

एकूण

८,३३० (१००%)

ग्रेट ब्रिटनमध्ये सर्व वाहतूक प्रकारांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. रेल्वे, रेल्वेच्या मालकीची जहाजे, गोद्या, हॉटेले, रस्ता वाहतूक, कालवे आणि लंडन प्रवासी वाहतूक व्यवस्था– सबंध जगात सर्वांत मोठी नागरी वाहतूक यंत्रणा– ह्यांचे १ जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि ब्रिटिश रेल्वे मंडळ, लंडन वाहतूक मंडळ, ब्रिटिश वाहतूक गोदी मंडळ व ब्रिटिश जलमार्ग वाहतूक मंडळ अशी मंडळे उभारण्यात आली. १९६८ च्या वाहतूक अधिनियमानुसार देशातील वाहतूक यंत्रणेचे पुनर्घटन करण्यात आले आहे. रेल्वेमार्गाची लांबी सु. १८,७३७ किमी. असून १९७२ साली ७५·४० कोटी प्रवासी वाहतूक व १६·९० कोटी टन मालवाहतूक झाली. (कोळसा व कोक ८·८ कोटी टन लोखंड व पोलाद ३·१ कोटी टन व इतर वस्तू ५·० कोटी टन). १९७१ च्या अखेरीस, रेल्वे वाहतूक उद्योगात २·६४ लक्ष लोक कामावर होते. १९७१ मध्ये रेल्वे मंडळाचीच एक दुय्यम कंपनी ‘ब्रिटिश ट्रॅन्स्पोर्ट होटेल्स लि.’ हिच्या मालकीची ३३ हॉटेले होती व त्यांपैकी ३२ हॉटेले ती कंपनी चालवीत होती. आणखी एक दुय्यम कंपनी ‘ब्रिटिश रेल होव्हरक्रॅफ्ट लि.’ १९६६ पासून नियमित होव्हरक्रॅफ्ट सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करीत असते. रेल्वे मंडळाच्या मालकीची सु. ६० जहाजे असून त्यांद्वारा ते प्रवाशांकरिता व मालवाहतुकीसाठी यूरोप खंडातील लहान सागरी मार्गावर सेवा उपलब्ध करते. रेल्वे मंडळाने हाती घेतलेले विकास कार्यक्रम : वाफेच्या एंजिनाऐवजी डीझेल व विजेच्या एंजिनांचा वापर हे काम १९६८ साली पूर्ण करण्यात आले. आंतरशहरी प्रवासी वाहतुकीत सुधारणा करणे व हे करीत असताना वेग, अचूकता आणि आराम यांवर अधिक भर देणे जलद मालवाहतूक सेवा उपलब्ध करणे व कोळसा वगैरेंसारख्या राशिस्वरूप मालाची वाहतूक अधिक यांत्रिक पद्धतीने करणे. लंडन ते लिव्हरपूल व मॅचेस्टर या मार्गावरील बऱ्याच गाड्या ताशी १३० किमी. वेगाने धावतात. त्यांचा वेग ह्याहूनही अधिक वाढविण्याबाबत संशोधन चालू आहे. १९७१ अखेर, रेल्वेमार्गांवर ३,८०६ डीझेल व ३१८ विजेची एंजिने होती. ब्रिटिश रेल्वे मंडळाच्या पुढीलप्रमाणे आणखी काही दुय्यम कंपन्या आहेत : ब्रिटिश रेल एंजिनिअरिंग लि. हिच्या १९७१ मध्ये १४ प्रमुख कर्मशाळा असून त्यांमध्ये सु.३५,००० लोक काम करीत होते. रेल्वेचे डबे, इतर साहित्य यांची निर्मिती तसेच दुरुस्तीकाम या कंपनी मार्फत चालते. डर्बी येथे ८ हे. जागेत ‘रेल्वे तांत्रिक केंद्र’ असून तेथे सु. १,९०० माणसे काम करतात. ‘ट्रॅन्स्पोट्रेशन सिस्टिम्स अँड मार्केट रिसर्च लि.’ (ट्रॅन्स्मार्क),‘द शिपिंग अँड इंटरनॅशनल सर्व्हिसेस डिव्हिजन’ आणि ‘द ब्रिटिश रेल प्रॉपर्टी बोर्ड’ या इतर कंपन्या होत. १९७२ अखेर रेल्वे बोर्डाकडे पुढील साहित्य होते : ३,९५० एंजिने १७,००५ प्रवासी डबे (पुलमन कार अंतर्भूत ) ५,९३३ सामान व टपालाचे डबे आणि २,६८,५५२ माल वाहून नेणाऱ्या वाघिणी. १९५५ पासून रस्ते बांधणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर कार्यवाहीत आणला जात आहे. वाहतूक उपयोगितेनुसार रस्त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे : राष्ट्रीय महामार्ग, मुख्य रस्ते व दुय्यम रस्ते. गतिमान वाहतुकीसाठी विशिष्ट रस्ते बांधण्यात येतात. जून १९७३ मध्ये देशात सु. ३.३९ लक्ष किमी. लांबीचे रस्ते होते. राजमार्ग १५,००० किमी. (त्यांपैकी गतिमान मार्ग १,७०४ किमी.), मुख्य रस्ते ३३,००० किमी. (त्यांपैकी गतिमान मार्ग ५५ किमी.) आणि इतर रस्ते २,९१,६०० किमी. (यांत कच्च्या रस्त्यांचाही समावेश आहे.) १९८० पर्यंत शासनाने ५,६३३ किमी. लांबीचे महत्त्वाचे राजमार्ग (यांमध्ये ३,२१९ किमी. लांबीचे गतिमान मार्ग) बांधण्याचे ठरविले आहे. त्यायोगे देशातील महत्त्वाची बंदरे, विमानतळ, औद्योगिक केंद्रे यांच्यांशी संपर्क साधणे सुलभ होईल. अलीकडे काही वर्षांत, पूल आणि बोगदे बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. १९७१ साली क्लाईड नदीवर ७० लक्ष पौंड खर्चून बांधलेला पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. टेम्स नदीवर लंडन पूल ४० लक्ष पौंड खर्चून बांधण्यात आला आहे. टीसाईड येथे एक कोटी पौंड खर्चाची पूल व राजमार्ग योजना कार्यवाहीत आहे. सबंध जगात रस्तावाहतुकीची अतिशय उच्च घनता असलेले ग्रेट ब्रिटन हे एक राष्ट्र आहे. असे असले तरी, अपघाती मृत्युमानाचे प्रमाण इतर कोणत्याही यूरोपीय देशांमध्ये कमी आहे. १९७२ साली जखमींचा आकडा ३,५९,७२७ (१५ वर्षाखालील ६४,१५७) असून त्यांपैकी ७,७६३ मरण पावले. ३० सप्टेंबर १९७२ रोजी देशात १६१·२ लक्ष वाहने असून, त्यांपैकी १२७·२ लक्ष मोटारी, ९·८० लक्ष मोपेड, स्कूटर व मोटारसायकली, १·०५ लक्ष सार्वजनिक बसगाड्या व टॅक्सी आणि १६·५० लक्ष ट्रक होते. १९७२ साली नोंदणी झालेल्या नवीन वाहनांची संख्या २१,८३,८१२ होती. लंडन वाहतूक व्यवस्थेखालील लोहमार्गाचे जाळे उत्तर-दक्षिण ३२ किमी. व पूर्वपश्चिम ५६ किमी. पसरले आहे. मार्च १९७२ मध्ये लंडन वाहतूक यंत्रणेखालील लोहमार्गांची एकूण लांबी ४१४ किमी. असून त्यांपैकी १६७ किमी. भुयारी लोहमार्ग आहे. या यंत्रणेच्या आगगाड्या २७८ रेल्वे स्थानकांना आपली सेवा उपलब्ध करतात, तर तिच्या बसगाड्या २,७४४ किमी. मार्गांवरून धावतात. या यंत्रणेच्या मालकीच्या ४,३५० रेल्वेकार व ६,२७३ बसगाड्या असून ५९,००० वर लोक कामावर गुंतलेले आहेत. भुयारी मार्गांचा विस्तार व आधुनिकीकरण, तसेच स्वयंचलित तिकीटविक्रीसेवा आणि स्वयंचलित आगगाड्या या तीन गोष्टींची कार्यवाही करण्यामध्ये लंडन वाहतूक यंत्रणा सध्या गुंतलेली आहे. दुमजली बसगाड्या प्रयोग म्हणून १९७१ साली कार्यवाही आणण्यात आल्या. १९७५ मध्ये अशा प्रकारच्या २,००० दुमजली बसगाड्या वाहतुकीसाठी धावविण्याची योजना होती.

खाजगी मोटारींचे प्रमाण १९२० पासून वाढत गेल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण प्रतिवर्षी कमी होत गेल्याचे दिसते. १९१४ मध्ये लोहमार्गावरील मालवाहतूक ५० कोटी टन व प्रवासी वाहतूक १३० कोटी इतकी होती. १९७० मध्ये ती अनुक्रमे २० कोटी टन व ८२·४ कोटी प्रवासी इतकी कमी झाली. १९७१ मध्ये एकूण प्रवासी मैल वाहतुकीपैकी सु. ७५% वाहतूक खाजगी मोटारींमधून झाली.

देशांतर्गत जलवाहतूक नियंत्रण १९६३ पासून ब्रिटिश जलमार्ग वाहतूक मंडळाकडे सोपविण्यात आले. १९७४ मध्ये मात्र नवीनच स्थापण्यात आलेल्या विभागीय जलवाहतूक प्राधिकरणाकडे हे नियंत्रण अधिकार देण्यात आल्यामुळे ब्रिटिश जलमार्ग वाहतूक मंडळ रद्द करण्याचा शासनाचा विचार आहे. देशात नौकानयनयोग्य असे ४,०२३ किमी. लांबीचे जलमार्ग असून, त्यांपैकी ३,२१९ किमी. मार्ग ब्रिटिश जलमार्ग मंडळ नियंत्रित करते उरलेले मार्ग स्थानिक मंडळे अथवा खाजगी कंपन्या नियंत्रित करतात. सु.५४७ किमी. लांबीचे जलमार्ग हे व्यापारी दृष्ट्या वाहतूकयोग्य असून १,७७० किमी. लांबीचा जलमार्ग जलक्रीडा, मासेमारी व अन्य विनोदने यांकरिता राखून ठेवण्यात आला आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये सु. ३०० बंदरे असून लंडन बंदर हे जगातील सर्वात मोठ्या बंदरापैकी एक समजले जाते. सु. १४५ किमी. लांबीचा जलमार्ग या बंदराला उपलब्ध असून सु. १६२ हे. क्षेत्रफळाचा या बंदराचा विस्तार आहे. इतर मोठी बंदरे म्हणजे लिव्हरपूल, साउदॅम्प्टन, हल्‌, क्लाइडपोर्ट (ग्लासगोजवळ), मँचेस्टर, ब्रिस्टल, इमिंगहॅम, टीझ, हार्टलपूल, मिलफोर्ड हॅव्हन, मेडवे व टाइन ही होत. टेम्स, ग्रेट ऊझ, नीन, यॉर्कशर ऊझ ह्या नद्या व नॉरफॉक ब्राँड्‌झ व मँचेस्टर कालवा हे दोन कालवे यांमधून नौकानयन होत असते. १९७२ साली ब्रिटिश जलमार्ग मंडळाला ५९ लक्ष पौंडांचे महसूली उत्पन्न मिळाले. त्याच वर्षी मंडळाचे नियंत्रण असलेल्या जलमार्गामधून ५४ लक्ष टन मालवाहतूक झाली. १९७१ च्या अखेरीस मंडळाच्या मालकीची ४९९ मालवाहू जहाजे होती. मंडळ दोन गोद्या व २५ गुदामे यांचीही व्यवस्था पाहते. १९७१ साली मंडळाची एकूण उलाढाल ५४ लक्ष पौंडांची झाली १९७१ साली परवाना मिळालेल्या जलक्रीडा नौकांची संख्या १३,९४८ होती.

ब्रिटिश जहाजांचा १ जुलै १९७३ रोजी एकूण स्थूल टनभार सु. २·९३ कोटी टन होता. त्यापैकी टँकर जहाजांचा टनभार सु. १·४८७ कोटी टन व बिगर – टँकर जहाजांचा सु. १·४४७ कोटी टन होता एकूण जहाजांची संख्या २,२२५ होती. २० नोव्हेंबर १९७२ रोजी ब्रिटिश व्यापारी नौदलात ९०,१२६ लोक कामावर होते. १ जुलै १९७३ रोजी जगातील एकूण तेलवाहू जहाजांची संख्या ६,६०७ आणि वजन १,१५४ लक्ष स्थूल टन होते, ग्रेट ब्रिटनचा तेलवाहू जहाजांमध्ये तिसरा क्रम (१४१ लक्ष टन) होता. सबंध जगामध्ये जहाज बांधणीत ग्रेट ब्रिटनचा चौथा क्रम (३·५%) लागतो पहिले तीन क्रम जपान (५०·३%), स्वीडन (८%) व पश्चिम जर्मनी (५·४%) या देशांचे आहेत.

सरकारी मालकीचे दोन हवाई वाहतूक निगम (बीओएसी आणि बीईए– ‘ब्रिटिश ओव्हरसीज एअरवेज कॉर्पोरेशन’ व ‘ब्रिटिश यूरोपियन एअरवेज’) हे ‘ब्रिटिश एअरवेज ग्रुप’ चे दोन विभाग म्हणून ओळखले जातील, अशी योजना २३ जानेवारी १९७३ रोजी जाहीर करण्यात आली. बीओएसी व बीईए हे दोन निगम अनुक्रमे १९३९ व १९४६ मध्ये स्थापण्यात आले. या दोन राष्ट्रीयीकृत निगमांखेरीज, ग्रेट ब्रिटनमध्ये सु. २० खाजगी हवाई वाहतूक कंपन्या आहेत. बीओएसी दूरगामी हवाई वाहतूक करते, तर बीईए कमी अंतरावरील हवाई वाहतूक करते. बीओएसीच्या सेवा यूरोप, मध्यपूर्व, अतिपूर्व ऑस्ट्रेलेशिया, आफ्रिका, उत्तर व दक्षिण अमेरिका यांच्याशी ब्रिटनला जोडतात राष्ट्रकुलातील अनेक देशांच्या विमानकंपन्यांशी हा निगम विविधप्रकारे सहकार्य करतो. बीईएची हवाई वाहतूक ब्रिटन, यूरोप, उत्तर आफ्रिका व मध्यपूर्व यांमधील शंभरांहून अधिक स्थळांशी चालू असते. ब्रिटिश कॅलिडोनियन एअरवेज ही खाजगी हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकाची ठरली आहे. १९७१ च्या नागरी हवाई वाहतूक अधिनियमानुसार, ‘नागरी हवाई वाहतूक प्राधिकरण’ नावाची एक स्वतंत्र संस्था स्थापण्यात आली. तिच्याकडे ब्रिटिश हवाई वाहतुकीबाबतचे आर्थिक व सुरक्षितताविषयक अधिकार देण्यात आले . १९७२ अखेर हवाई वाहतूकयोग्य प्रमाणात असलेली ३,१२० विमाने होती. देशात सु. १४४ मुलकी विमानतळ असून लंडनमधील हीथ्रो (लंडनच्या पश्चिमेस २२ किमी.) विमानतळ जगातील सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक समजला जातो १९६० साली या विमानतळाची प्रवासी वाहतूक हाताळण्याची क्षमता ५४ लक्ष प्रवाशांवरून १९७१ साली १६४ लक्षांवर गेली. हीथ्रो विमानतळावरच संगणकाच्या साहाय्याने बाहेरून येणारा माल हाताळण्याची पद्धत १९७१ पासून सुरू झाली असून, अशा प्रकारची पद्धत हाताळणारे ग्रेट ब्रिटन हे पहिले राष्ट्र होय. हीथ्रोच्या वाहतुकीपैकी निम्मी यूरोप खंडाशी, १८ % देशातील शहरांशी व १५ % उत्तर अमेरिकेशी सुरू होती. लंडन येथील गॅटविक (लंडनच्या दक्षिणेस ४५ किमी.) हा दुसरा विमानतळ १९५८ साली कार्यवाहीत आला. एकाच ठिकाणी रस्ते-रेल्वे आणि हवाईवाहतूक हाताळणारा गॅटविक हा जगामधील पहिला विमानतळ मानला जातो. लंडन भागात एसेक्स किनाऱ्याजवळ मॅप्लिन येथे तिसऱ्या विमानतळाचे बांधकाम चालू असून तो १९८० च्या सुमारास कार्यवाहीत येईल. इतर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलप्रमाणे : प्रेस्टविक (स्कॉटलंड), रिंगवे (मॅचेस्टर), ॲल्डरग्रोव्ह (बेलफास्ट), ॲबटसिंच, एडिंबरो, स्टॅन्स्टेड व लिव्हरपूल.

ग्रेट ब्रिटनमधील १६५७ साली स्थापन झालेले डाक कार्यालय, हे डाकविषयक सर्व सेवा, सार्वजनिक संदेशवहन, आधारसामग्री संस्करण (डेटा प्रोसेसिंग) आणि गायरो ह्यांविषयीच्या सेवा उपलब्ध करते. डाकघर अधिनियम १९६९ च्या अन्वये, डाक कार्यालय हा शासकीय विभाग राहिला नसून त्याला सार्वजनिक प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे. ३१ मार्च १९७३ रोजी डाक कार्यालयाच्या शाखांची संख्या २४,१३२ असून टपालपेट्यांची संख्या एक लाखांवर होती त्याच साली ४,४३,४९४ लोक कामावर होते. सबंध जगात ज्या देशांच्या तारसेवा अतिशय अद्ययावत गणल्या जातात, त्यांमध्ये ग्रेट ब्रिटनचा फार वरचा क्रमांक लागेल. तारस्वीकृती कार्यालये ३१ मार्च १९७३ रोजी ९,८६४ होती टेलेक्स सेवा वापरणाऱ्याची संख्या देशात वाढत आहे ती १९७१ च्या अखेरीस ३८,००० होती. १९८० च्या सुमारास ती एक लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे. जगातील १७० हून अधिक देशांना ब्रिटन टेलेक्सद्वारा जोडलेले आहे. ग्रेट ब्रिटनमधील टेलेक्ससेवा पूर्णपणे स्वयंचलित आहे. डेटेल सेवा केंद्रांची संख्या मार्च १९७२ अखेर १९,००० होती. ३१ मार्च १९७२ रोजी देशात ६,१६७ दूरध्वनी कार्यालये आणि सु. १.५ कोटी दूरध्वनी होते. ३१ मार्च १९७३ रोजी ४५,९३,६२४ दूरध्वनिकेंद्रे असून दूरध्वनियंत्रांची संख्या १,७५,७०,९०४ होती. लंडनमधील सर्व दूरध्वनी कार्यालये स्वयंचलित असून, प्रत्यक्ष दूरध्वनी सेवा (सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग–एस्‌टीडी) ब्रिस्टलमध्ये १९५८ पासून सुरू झाली मार्च १९७२ पर्यंत ही सेवा ३,८६१ दूरध्वनी कार्यालयांना उपलब्ध झाली असून सु. ९३% दूरध्वनि-धारकांना या सेवेचा फायदा घेता आला आहे. १९६६ मध्ये यूरोपातील पहिले इलेक्ट्रॉनीय दूरध्वनी कार्यालय डर्बीशरमधील अँबर्गेट येथे उघडण्यात आले १९७३ मध्ये अशी १०० हून अधिक कार्यालये ग्रेट ब्रिटनमध्ये होती. ग्रेट ब्रिटनमध्ये दोन स्वयंचलित आंतरराष्ट्रीय दूरध्वनी कार्यालये असून तिसऱ्याचे बांधकाम चालू आहे. १९७५ च्या अखेरीस ७५% आंतरराष्ट्रीय दूरध्वनि-भाषिते प्रत्यक्ष दूरध्वनि-धारकांना करता येतील असा अंदाज आहे १९७१ मध्ये हे प्रमाण ६२% होते. विशिष्ट दूरध्वनी सेवा उपलब्ध असून ‘९९९’ हा संकटकालीन शुल्करहित दूरध्वनि-क्रमांक असून त्यायोगे पोलीस, रुग्णवाहिका अथवा आगरक्षक संघटनेशी त्वरित संपर्क साधता येतो. मे १९७२ च्या सुमारास, ग्रेट ब्रिटनला २९ कृत्रिम उपग्रहांच्या योगे ३५ देशांशी उपग्रहीय संपर्क साधता येऊ लागला. ‘इंटेलसॅट’ (इंटरनॅशनल कम्युनिकेशन्स सॅटलाइट कंसॉर्टियम ) या आंतरराष्ट्रीय संस्थेचा ग्रेट ब्रिटन हा दुसऱ्या क्रमांकाचा भागधारक सदस्य-देश आहे. दूरचित्रवाणीद्वारा परिषदा भरविण्याचा प्रयोग– जगातील पहिला प्रयोग– ज्याला ‘कॉन्फ्राव्हिजन’ (Confravision) असे नाव आहे– ब्रिटिश डाक कार्यालयाने सप्टेंबर १९७१ मध्ये कार्यान्वित केला. डाक कार्यालयातील दृश्य मंडलांचा वापर करून लंडन, बर्मिंगहॅम, ब्रिस्टल, ग्लासगो व मँचेस्टर येथील कलामंदिरांमधून संपर्क साधणे शक्य झाले आहे. डाक कार्यालय प्रतिवर्षी संशोधन व विकास यांवर १८० लक्ष पौंडांहून अधिक खर्च करीत असते. यांमध्ये ते उद्योगधंदे व विद्यापीठे यांचे आवर्जून सहकार्य घेते.

नभोवाणी व दूरचित्रवाणी सेवा ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ (बीबीसी –स्थापना १९२२ आणि ‘इंडिर्पेडंट ब्रॉडास्टिंग ऑथॉरिटी’ (आय्‌बीए–स्थापना १९५४) या दोन निगमांमार्फत उपलब्ध केली जाते. १४ फेब्रुवारी १९२२ रोजी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीने ध्वनिक्षेपण-कार्यक्रमांना प्रांरभ केला. या कंपनीचे ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोऱेशन’ मध्ये १९२७ साली रूपांतर झाले. बीबीसीव्यतिरिक्त दूरचित्रवाणी सेवा उपलब्ध करण्यासाठी आय्‌बीएची स्थापना झाली. दूरचित्रवाणी केंद्रे बांधण्यापासून चालविण्यापर्यंत सर्व कार्य हाच निगम करतो. दोन्ही निगमांच्या दैनंदिन व्यवहारांत शासनाचा हस्तक्षेप नसतो. नोव्हेंबर १९३६ मध्ये बीबीसीने जगातील पहिली नियमित दूरचित्रवाणी सेवा कार्यान्वित केली. बीबीसी व आय्‌बीए अनुक्रमे दोन व एक रंगीत कार्यक्रम दूरचित्रवाणीद्वारा उपलब्ध करतात. ३१ ऑगस्ट १९७३ रोजी, अनुक्रमे साध्या व रंगीत दूरचित्रवाणी संचांची संख्या (परवानाधारकसंख्या) १,३१,९७,७६१ आणि ४०,५५,८६८ होती. विदेश सेवा कार्यक्रम ३० भाषांतून बीबीसी उपलब्ध करते. १ फेब्रुवारी १९७१ पासून रेडिओपरवाने रद्द करण्यात आले आहेत. १९७३ साली बीबीसीला ५० वर्षे पूर्ण झाली. बहुतेक कुटुंबांकडे दूरचित्रवाणी असते. प्रत्येक कुटुंब प्रतिदिनी सरासरी चार तास या करमणुकीचा लाभ घेत असल्याचे आढळते.

पर्यटन उद्योग हा ग्रेट ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत फार प्रभावी भूमिका बजावीत आहे. १९७२ साली ७२·५५ लक्ष परदेशी पर्यटकांनी ग्रेट ब्रिटनला भेट दिली यामुळे देशाला एकूण ७,२१० लक्ष पौंड उत्पन्न मिळाले. ग्रेट ब्रिटनचा इतिहास व परंपरा आणि निसर्गसौंदर्य ही पर्यटकांची विशेष आकर्षणे होत. १९६९ साली ‘ब्रिटिश पर्यटन प्राधिकरण’ स्थापण्यात आले व त्याच्याकडे पूर्वीच्या ‘ब्रिटिश ट्रॅव्हल असोसिएशन’चे सर्व अधिकार, कार्ये व जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. याशिवाय पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी विभागीय पर्यटन मंडळे स्थापण्यात आली. नवी हॉटेले आणि हॉटेल-सुधारणा यांकरिता आर्थिक साहाय्य देण्याची योजना आखण्यात आली.

औद्योगिक दृष्ट्या प्रगत पश्चिमी देशांप्रमाणे, ग्रेट ब्रिटन हा उच्च रोजगारीचे प्रमाण, वर्धमान उत्पादकता आणि जीवनमानामध्ये वाढती सुधारणा यांकडे लक्ष देऊन धीमेपणाने आर्थिक प्रगतीची वाटचाल करीत असल्याचे आढळते. युद्धोत्तर काळात वरील उद्दिष्टांची पूर्तता करीत असताना ग्रेट ब्रिटनला आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदांमधील पुनरुद्‌भवणारी गंभीर घट तसेच चलनवाढीचे ताण या दोन समस्यांना सतत तोंड द्यावे लागले आहे. परिणामी, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी असणाऱ्या या दोन गंभीर दोषांचे निवारण करण्याच्या कामीच अर्थनीतीला वारंवार वळवावे लागले आहे. उत्पन्ननीतीचे काटेकोर पालन करण्यासाठी १९६५ मध्ये शासनाने ‘राष्ट्रीय किंमत व उत्पन्न मंडळ’ (नॅशनल बोर्ड फॉर प्राइसेस अँड इन्कम्स) स्थापिले आहे. युद्धोत्तर काळात आर्थिक दोष व ताण दूर करण्यासाठी शासनाने अनेक परिणामकारक उपाय योजल्याचे आढळते. उद्योगांमध्ये संरचनात्मक बदल करून उत्पादकता अधिकाधिक वाढविली जावी यावर शासनाने प्रकर्षाने दिलेला भर, मनुष्यबळाचा अधिक कार्यक्षम वापर, चांगले औद्योगिक संबंध, प्रदेशीय विकासयोजना व दीर्घकालीन नियोजन हे सर्व हेतू साध्य करण्यासाठी गेल्या दशकात शासनाने ‘राष्ट्रीय आर्थिक विकास परिषद’ (नॅशनल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल), आर्थिक व्यवहार खाते (डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स) यांसारख्या महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या आहेत.

ग्रेट ब्रिटन यूरोपीय सामायिक बाजारपेठेत जानेवारी १९७३ मध्ये सामील झाल्यावर ब्रिटनला आर्थिक अनुकूलता फारशी लाभल्याचे दिसत नाही. ब्रिटिश पौंड तरता ठेवावा लागला. बेल्जियम व आयर्लंड हे दोन देश वगळता, सामायिक बाजारपेठेतील इतर देशांशी ब्रिटनचा व्यापार निराशाजनकच ठरला स्टर्लिंगचे मूल्य अधिकच खाली घसरत चालले जागतिक किंमतींमध्ये झालेली वाढ आणि १९७३ च्या शेवटी, अंतर्गत व बाह्य घटनांमुळे निर्माण झालेले विद्युत्‌उत्पादन अरिष्ट, या सर्वांमुळे व्यापारविषयक आकडेवारीमध्ये प्रतिकूलता स्पष्ट झाली.

आर्थिक तणावांमुळे १९७३ साली मागील वर्षापेक्षा अधिकच औद्योगिक अशांतता निर्माण झाली. मे दिनी १६ लक्ष कामगारांनी देशभर संप पुकारला त्यामुळे औद्योगिक उत्पादनाला खीळ बसलीच त्यांमध्ये खाण कामगार, रेल्वे कामगार, गॅस कामगार, बिगर-औद्योगिक क्षेत्रातील नागरी कर्मचारी, शिक्षक, आरोग्य विभागातील कामगार व डाक कर्मचारी या सर्वांनी औद्योगिक उत्पादनात खंड पाडण्यात हातभार लावला. ही परिस्थिती, तसेच मध्यपूर्वेच्या संघर्षामुळे निर्माण झालेला तेलतुटवडा यांमुळे नोव्हेंबर १९७३ मध्ये ब्रिटिश सरकारला आणीबाणी घोषित करावी लागली त्याचप्रमाणे सर्व उद्योगांना आपापल्या ऊर्जा-वापरामध्ये बचत करण्याचा इशारा देण्यात आला. डिसेंबरमध्ये शासनाने पुढील दोन वर्षांसाठी नियोजित सरकारी खर्चात १२० कोटी पौंडांची कपात करण्याचे घोषित केले. या सर्व अडचणी असूनही, १९७३ मध्ये आर्थिक विकासाचा दर ५ टक्क्यांहूनही अधिक वाढल्याचे दिसून आले. अशी वाढ गेल्या कित्येक वर्षांत झालेली नव्हती. आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद मात्र चिंतेचा विषय ठरला असून, १९७३ मध्ये १४६·८ कोटी पौंडांच्या घटीचा अंदाज करण्यात आला. आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद अनेक वर्षे सतत प्रतिकूल असूनही उद्योगधंद्यांचे आधुनिकीकरण करण्यात आणि अर्धविकसित व विकसनशील राष्ट्रांना आर्थिक विकास आणि संरक्षण यांकरिता साहाय्य करण्यात ग्रेट ब्रिटनने कौतुकास्पद यश मिळविले आहे.

सहस्रबुद्धे, व. गो. गद्रे, वि. रा.

लोक व समाजजीवन : ग्रेट ब्रिटनची लोकसंख्या सतराव्या शतकापर्यंत २० ते ४० लाखांच्या दरम्यान राहिली. वारंवार उद्‌भवणारी युद्धे व साथी यांमुळे तीत चढउतार होत असत. सतराव्या शतकात ती झपाट्याने वाढू लागली, अठराव्या शतकामध्ये दुप्पट व एकोणिसाव्या शतकात तिप्पट झाली. ग्रेट ब्रिटनमधून वसाहतीत जाणारे लोक, युद्धे व निसर्गत: पुरुषांपेक्षा स्त्रियांचे अधिक असलेले आयुर्मान इ. संख्याधिक्याची कारणे होत. आधुनिक काळात वैद्यकीय प्रगती, कल्याणकारी योजना व राहणीमानातील सुधारणा यांमुळे ग्रेट ब्रिटनमधील लोकांची आयुर्मर्यादा वाढली आहे. १९२०–२२ मध्ये सरासरी आयुर्मान पुरुष व स्रिया यांच्या बाबतीत अनुक्रमे ५५·६ व ५९·६ वर्षे होते तेच १९६०–६२ या दरम्यान ६८·३ व ७४ वर्षे झाले. वरील कारणे तसेच संततीनियमनाचा शोध व सवलती यांचा सामाजिक जीवनावर कसा परिणाम झाला आहे, हे तेथील विवाहाची वयोमर्यादा कमी होऊ लागली आहे, यावरून दिसून येते.

या प्रदेशात मानवी वस्ती प्रथम केव्हा झाली, हे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी तेथे सापडलेल्या अश्महत्यारांवरून अतिप्राचीन काळापासून त्या ठिकाणी वस्ती होती, हे दिसून येते. स्टोनहेंज येथील अतिप्राचीन शिल्पावशेष केल्ट लोकांचे नसून इतिहासपूर्व काळातील आहेत, असे आता बहुतेक तज्ञ मानतात. ख्रि. पू. ५५ मध्ये सीझरने इंग्लंडवर स्वारी केली, तेव्हा त्याला तेथे केल्ट वस्ती आढळली. हे लोक गाल (आताचे फ्रान्स) येथून आलेले असावेत, असा अंदाज आहे. कासे व सोने त्यांना ज्ञात असून, सोन्याची नाणीही त्यांनी पाडली होती व कलाकौशल्यात ते त्या काळाच्या मानाने प्रगत होते. इ.स. ४३ पासून रोमन लोकांनी इंग्लंडवर राज्य केले. परंतु काही शतकांनंतर त्यांना आपल्या देशात परतावे लागले. रोमन संरक्षण नाहीसे होताच यूरोपातील रानटी टोळ्यांच्या धाडी इंग्लंडवर सुरू झाल्या. त्यांत अँगल, सॅक्सन व ज्यूट या तीन जर्मन जमाती महत्त्वाच्या आहेत. कालांतराने त्यांनी सर्व देश जिंकला व आजचा इंग्लिश वंश मुख्यतः या तीन जमातींचा मिश्रवंशज आहे. या अँग्लो-सॅक्सन रक्तात नॉर्मन, डॅनिस, व्हायकिंग, ह्यूगनॉत्स आणि जिप्सी रक्तही मिसळलेले आहे. या सर्वांचे आचारविचार व भाषा यांच्या संमिश्रणाने आजचे इंग्लिश समाजजीवन घडविले आहे.

यूरोपीय जीवनाच्या मध्य धारेपासून इंग्लिश सामुद्रधुनीमुळे हा देश दूर राहिला. त्यामुळे रोमन संस्कृती, ख्रिस्ती धर्म व यूरोपीय प्रबोधन तेथे उशिरा पोहोचले. इंग्लंडचा १०८६ पूर्वीचा इतिहास म्हणजे यूरोपीय जमातींनी त्यात केलेल्या वसाहतींचाच इतिहास होय. हे नव-रहिवासी पुढारलेले असल्याने त्यांची भाषा आणि रीतिरिवाज मूळ रहिवाशांनी घेतले. या मध्ययुगीन काळाचे दोन ठळक खंड पडतात : १०८६ ते १३०० हा पहिला व १३०० ते १५०० हा दुसरा. पहिल्या खंडात लोकसंख्या झपाट्याने वाढली पण दुसऱ्या खंडात तीत फारसा चढउतार झाला नाही. यानंतर दुष्काळ व प्लेग (१३४८-४९) यांनी भयंकर बळी घेतल्याने तीत एक-तृतीयांशाहून अधिक घट झाली व १५०० पर्यंत ती प्लेगपूर्वीइतकीही होऊ शकली नाही. सोळाव्या शतकात ट्यूडर राजवटीतील स्थिर व समृद्ध जीवनाने ती झपाट्याने वाढू लागली व त्या शतकाच्या अखेरीस ती ६० लाखांवर गेली असावी. याच काळात लंडन शहराच्या अफाट वाढीस सुरुवात झाली, ती अद्याप थांबलेली नाही. या काळात फ्लेमिश व ह्यूगनॉत्स इंग्लंडमध्ये आसऱ्यास आले, परंतु या सुमारासच अमेरिकन वसाहतीस सुरुवात झाल्याने लोकसंख्येत फारसा फरक पडला नाही. अठराव्या शतकात मात्र विज्ञानाची प्रगती आणि वैद्यकीय उपचार यांमुळे मृत्यूवर काही अंशी नियंत्रण घातले जाऊन, लोकसंख्या एकदम वाढू लागली व शहरवस्तीची अफाट वाढ व वसतिघनता ही हल्लीच्या इंग्लंडची पूर्वचिन्हे दिसू लागली.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्लंडमधून वसाहतीकरिता लोक बाहेर जाऊ लागले. १९३० पर्यत अशा परदेशगमन करणाऱ्याची संख्या एक कोटीवर झाली असावी. याच काळात विशेषतः १८७१ ते १९३१ मध्ये, यूरोपातील राजकीय व धार्मिक घडामोडी आणि छळ यांमुळे असंख्य लोक इंग्लंडमध्ये आसऱ्यास आले. त्यांत रशियन, पोलिश, जर्मन व हंगेरियन लोकांचा विशेष भरणा होता. १९३१ ते १९४० या काळात नाझी छळास त्रासून आलेल्या लोकांची भर पडली. दुसऱ्या महायुद्धानंतर काही वर्षांनी १९५४ पासून इंग्लंडच्या समाजव्यवस्थेत खळबळ उडवून देणारा राष्ट्रकुलातील यूरोपबाहेरील अप्रगत लोकांचा लोंढा सुरू झाला. त्यांत पूर्व व मध्य आफ्रिकेतील भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक बहुसंख्य होते. १९६३ पर्यंत त्यांना इंग्लंडमध्ये येण्यास प्रवेशपरवाना लागत नसे. या लोकांची भाषा, संस्कृती, राहणी, आहार व आचार इंग्लिश परंपरेहून सर्वस्वी भिन्न आणि स्थानिक जीवनात सामावून जाण्यास कठीण होते. त्यातच तथाकथित आर्थिक स्पर्धेची भर पडल्याने वर्णविद्वेष वाढू लागला. क्वचित वांशिक दंगेही उद्‌भवू लागले. अलीकडे सामाजिक जीवनातील ही समस्या अधिक बिकट होऊ नये, म्हणून अशा लोकांच्या प्रवेशावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु त्याचबरोबर जे गौरेतर लोक स्थायिक झालेले आहेत, त्यांना वर्णभेदाचा वा वंशभेदाचा उपसर्ग होऊ नये, म्हणून कायदेशीर इलाजही योजण्यात येतात. या कायद्यान्वये नोकरी, धंदा वा वसती यांबाबत भेदभाव पाळणाऱ्यास शासन केले जाते.

जगातील इतर देशांप्रमाणे इंग्लंडमध्येही नागरी विभागात घरटंचाई ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाश्चात्त्य रिवाजांनुसार विवाह होताच नवविवाहितांस निराळे बिऱ्हाड थाटावे लागते. अलीकडे विवाहाची वयोमर्यादाही कमी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबास स्वतंत्र जागा, या समस्येने उग्र रूप धारण केले आहे.

तरुणांमध्ये मादक द्रव्यसेवनाची वाढती सवय व त्यातून उद्‌भवणारी गुन्हेगारी यांमुळेही नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना तोंड देण्याचे कार्य शासकीय कल्याणसंस्था व धार्मिक मंडळे करीत आहेत.

धार्मिक स्थिती : इंग्लंडचा प्रमुख धर्म प्रॉटेस्टंट ख्रिश्चन होय. एकोणिसाव्या शतकापर्यंत तेथे कॅथलिक व ज्यू लोकांना काही प्रमाणात सावत्रपणाची वागणूक मिळत असे. काही राजकीय हक्कांपासूनही ते वंचित होते. १८२९ पर्यंत त्यांना महाविद्यालयांत वा पार्लमेंटमध्ये प्रवेश मिळणे कठीण होते. तसेच ख्रिस्ती धर्मावर शपथ आधारलेली असल्याने ज्यूंना पार्लमेंट सभासद होता येत नसे. ही अडचण १८५८ मध्ये दूर झाली. आता मात्र सर्व धर्मांच्या लोकांस आपापल्या श्रद्वेप्रमाणे उपासना करण्यास मोकळीक आहे. तथापि अद्यापही तेथील लॉर्ड चॅन्सेलर हा कॅथलिक पंथाचा असू शकत नाही व राजा प्रॉटेस्टंट अँग्लिकन चर्चचा असावा लागतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे तोच त्या पंथाचा धर्मरक्षक असतो. देशात कोणत्याच धर्मास मानीत नसणाऱ्या लोकांची संख्या एक-तृतीयांश असावी, असा अंदाज आहे.

पार्लमेंटने १६८९ मध्ये कायदा करून पोपला मानणाऱ्या कॅथलिक व्यक्तीला वा कॅथलिकाशी विवाह करणाऱ्या व्यक्तीला राज्याधिकारास अपात्र ठरविले. अँग्लिकन चर्च हे सोळाव्या शतकापर्यंत रोमन कॅथलिक पंथाचेच अंग होते. ख्रिस्ती धर्माचा प्रवेश इंग्लंडमध्ये चौथ्या शतकात झाला, असे समजतात परंतु रोममधील पोपला या देशाच्या धार्मिक गरजांची जाणीव दोन शतके नव्हती. इ.स. ५९७ मध्ये पोप ग्रेगरीने इंग्लंडला एक धर्ममंडळ पाठविले. त्यांना कँटरबरीस राहण्यास परवानगी मिळाली व त्यांच्या प्रयत्नाने खुद्द राजा एथेलबर्ट ख्रिस्ती झाला व ते गाव इंग्लंडमधील ख्रिस्ती पंथाचे प्रमुख केंद्र बनले. या अँग्लिकन चर्चच्या अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. ४ कोटी (१९६१) आहे. रोमन कॅथलिक लोकांना धर्मस्वातंत्र्य मिळाल्यावर १८५० साली तेथील कॅथलिक धर्मशासनाची रीतसर व्यवस्था करण्यात आली. त्याचा मुख्य वेस्टमिन्स्टरचा आर्चबिशप आहे. रोमन कॅथलिक चर्चच्या अनुयायांची एकूण जागतिक संख्या सु. ३१,६२,८६,१०० (१९६१) आहे.

देशात अनेक स्वतंत्र ख्रिश्चन पंथोपपंथ आहेत. त्यांमध्ये ‘बॅप्टिस्ट चर्च’, ‘कॉग्रिगेशनॅलिझम’, ‘मेथडिस्ट चर्च’, ‘रिफॉर्म्‌ड चर्च’ इ. प्रमुख आहेत. त्याशिवाय ‘प्लिमथ ब्रेद्‌रेन’, ‘ख्राइस्ट’ अथवा ‘न्यू जेरूसलेम चर्च’, ‘सोसायटी ऑफ फ्रेंड्‌स’ (क्वेकर्स), ‘ख्रिश्चन सायन्स’, ‘यूनिटे अरिअनिझम ’व ‘फ्री ख्रिश्चन यूनियन’, ‘साल्व्हेशन आर्मी’, ‘सेव्हन्थ डे ॲड्‌व्हेंटिस्ट्‌स’, ‘फ्री चर्च ऑफ इंग्लंड’ असे छोटे धर्मपंथ आहेतच. देशामध्ये हिंदू, इस्लाम आणि शीख धर्मपंथीयांची संख्या १९५० नंतर खूपच वाढली आहे. त्यांची मंदिरे, मशिदी व गुरुद्वारे निरनिराळ्या गावी दिसून येतात.

स्रियांचे स्थान : इंग्लंडसारख्या प्रगत देशांतही पहिल्या महायुद्धापर्यंत स्त्रियांना समान हक्क नव्हते व मताधिकार नव्हता. अर्थात ही परिस्थिती त्या काळी जगातील सर्व देशांत होती. सारख्याच कामाकरिता स्त्रीपुरुषांची वेतनश्रेणीही निराळी होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्त्रियांनी या विषमतेविरुद्ध बंड पुकारले व चळवळ सुरू केली. १९१०–११ नंतर या चळवळीस उग्र स्वरूप आले आणि दंगे करणे चर्च, कचेऱ्या, आगगाड्या इत्यादींचा विध्वंस करणे, आगी लावणे असे सत्र सुरू होऊन अशा सत्याग्रही स्त्रियांनी तुरुंग भरून गेले. तुरुंगांत अन्नसत्याग्रह करून त्यांनी शासनास अडचणीत टाकले. चळवळ आटोक्याबाहेर जाण्यापूर्वीच पहिले महायुद्ध सुरू झाल्याने ती थंडावली. त्या युद्धात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने धैर्य दाखवून अपूर्व कामगिरी केल्याने, त्यांना १९१८ च्या सुमारास मतदान व इतर समान हक्क मिळाले. तरीही पुरुषांस एकविसाव्या वर्षी, तर स्त्रियांस तिसाव्या वर्षी मताधिकार असे काही भेद होतेच, ते १९२८ साली नष्ट झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर या संदर्भात अधिक सुधारणा होऊन आता स्त्रिपुरुषांतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असमानता संपूर्ण नष्ट झाली आहे व सर्व क्षेत्रांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कर्तबगारी दाखवू लागल्या आहेत.

समाजकल्याण व आरोग्य : नागरिकांच्या जीवनाच्या सर्व अंगोपांगांची जबाबदारी, स्वीडन सोडल्यास इंग्लंडइतकी दुसऱ्या कोणत्याही देशाने स्वीकारली नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्या स्वास्थ्याची काळजी शासनाने घेतलेली आहे, असेच दिसून येते. कुटुंबभत्ता, सामाजिक विमा, युद्धग्रस्तांना मदत, आवश्यक ते आर्थिक साहाय्य माता, बालके, रुग्ण, बुद्धिमंद, अपंग, वृद्ध व्यक्ती, तसेच बेघर मुले, आपद्‌ग्रस्त कुटुंबे इत्यादींची काळजी शिक्षण, घरबांधणी, नोकरी या बाबतींतील जबाबदारी केंद्र वा स्थानिक शासनाने घेतली आहे. यांशिवाय त्यात स्वयंस्फूर्त संस्थांचाही वाटा असतो. अशी कल्याणकारी कामे प्रथम स्वेच्छासंघटनांनी, विशेषतः चर्चसारख्या संघटनांनी, हाती घेतली होती व आजही वर उल्लेखिलेल्या शासकीय योजनांशिवाय अशा हजारो संस्था व संघटना कामे करीत आहेत. त्यांमध्ये ‘फॅमिली वेल्फेअर असोसिएशन’, नॅशनल मॅरेज गाइडन्स कौन्सिल’ व फॅमिली सर्व्हिस युनिट’ ह्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. रुग्णांच्या सेवेकरिता ‘रेडक्रॉस’, ‘सेंट जॉन अँम्ब्युलन्स’ इ. संस्था असून अंध, बहिरे, अपंग यांच्याकरिता स्वतंत्र संस्था-संघटना आहेत. त्या ‘सेंट्रल कौन्सिल फॉर द डिसएबल्ड’ च्या घटक आहेत. या स्वेच्छासंघटना व शासकीय संस्था यांच्या कार्याचा समन्वय ‘नॅशनल कौन्सिल फॉर सोशल सर्व्हिस’ या शासकीय संघटनेतर्फे होतो. ही कार्ये योग्य व्हावीत, म्हणून १९६२ मध्ये कायदा करून समाजसेवकांच्या शिक्षणाकरिता ‘कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन सोशल वर्क’ ही संस्था स्थापन करण्यात आली. अलीकडे राष्ट्रकुलातील नागरिक इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याकरिता मोठ्या संख्येने येऊ लागल्याने त्यांच्या एकात्मतेचा मोठा बिकट प्रश्न उद्‌भवला आहे. या समस्येचा विचार करण्याकरिता ‘नॅशनल कमिटी फॉर कॉमनवेल्थ इमिग्रंट्‌स’ अशा काही खास योजना आहेत.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने स्वीकारण्यास सुरुवात केली आणि १८४८ साली सार्वजनिक आरोग्य अधिनियम संमत झाला. या काळात मुख्यतः पिण्याचे पाणी पुरवणे, गटारे बांधणे, केरकचऱ्याची विल्हेवाट लावणे, रस्तासफाई यांसारखी सार्वजनिक कामे शासनाने हाती घेतली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात नागरिकांच्या वैयक्तिक आरोग्याचीही जबाबदारी शासनाने घेतली व त्यानुसार अनेक आरोग्ययोजना कार्यान्वित झाल्या. सार्वजनिक आरोग्य अधिनियमानंतर १९४८ साली राष्ट्रीय आरोग्य सेवा स्थापन होऊन त्यावर कळस चढला. ह्याच काळात नवनव्या औषधींचे शोध, प्रसूती व बालसेवा, शालेय आरोग्यसेवा, शाळेतील आहारव्यवस्था इत्यादींमुळे सार्वजनिक आरोग्य सुधारू लागले. वैद्यकीय तपासणी व औषध योजना, रुग्णालयातील शुश्रूषा इ. सेवा, काही अपवाद वगळता, मोफत मिळू लागल्या. राष्ट्रीय आरोग्य सेवेतर्फे सु. ४,६४,००० रुग्णशय्या असलेली २,५०० रुग्णालये चालविली जातात. त्यांत १,९५,००० पूर्णकालिक व १,१०,००० अंशकालिक परिचारिका आहेत. त्यामुळे आयुर्मानाची सरासरी वाढली असल्याचे दिसून येते. स्वास्थ्यपूर्ण राहणी, पौष्टिक अन्न, नोकरीतील सवलती, वैयक्तिक आरोग्याची वाढती जाणीव, सरकारी व खाजगी आरोग्ययोजना, लहान कुटुंबे यांमुळे मृत्युप्रमाण दर हजारी वीसवरून बारावर आले आहे.

भाषा व साहित्य : इंग्लंडची भाषा इंग्रजी आहे. जगातील अत्यंत समृद्ध भाषांपैकी ही एक असून, अनेक भाषांतील शब्द सामावून घेण्याचे तिचे सामर्थ्य हे या समृद्धीचे रहस्य आहे. दर्यावर्दी इंग्रजांनी जगभर पाय पसरले व अनेक देशांतील शब्द आत्मसात केले आणि या जर्मनोद्‌भव अँग्लो-सॅक्सन भाषेचे स्वरूप आमूलाग्र बदलून टाकले. इंग्लंडबाहेर कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लायबीरिया येथे ती बोलली जात असून द. आफ्रिका, भारत, पूर्व व मध्य आफ्रिकन राष्ट्रे इ. इंग्रजांच्या पूर्वीच्या वसाहतींमध्ये ती शिक्षण व राजकारण ह्यांचे माध्यम म्हणून प्रमुख आहे. भारतातील नागालँड या घटकराज्याची ही राजभाषा आहे. सोळाव्या शतकात इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड या भागांतच माहीत असलेली इंग्रजी आज पंचवीस कोटींवर लोकांची मातृभाषा असून आणखी तितक्याच लोकांना ती बोलता व लिहितावाचता येते. गेल्या शतकापर्यत आंतरराष्ट्रीय व्यवहारात फ्रेंच मान्य भाषा होती, आता तिची जागा इंग्रजीने घेतली आहे. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात चॉसरच्या कँटरबरी टेल्सने इंग्रजीच्या उत्कर्षास सुरुवात झाली व दोन शतकांनी शेक्सपिअरने त्यावर कळस चढविला. एलिझाबेथच्या कारकीर्दीत (१५५८–१६०३) इंग्रज दर्यावीरांच्या पराक्रमाने नवी क्षितिजे खुली झाली. याचा परिणाम त्यांच्या भाषेच्या वाढीमध्ये होऊन तिला व्यापकता, अर्थवाहकता, लवचीकपणा आणि भारदस्तता आली. आजच्या तिच्या जगन्मान्यतेत अमेरिकेचा जागतिक महत्त्वाचा मोठा वाटा आहे. तथापि खुद्द इंग्लंडमध्येही मातब्बर साहित्यिक, द्रष्टे कवी व प्रयोगशील लेखक यांची परंपरा अखंडित आहे. वृत्तपत्रांच्या खपामध्ये इंग्लंडचा उच्चांक असून प्रत्येकी दोन माणसांमागे एक वृत्तपत्र, असे हे प्रमाण आहे. शंभरांवर दैनिके व साप्ताहिके, हजारांवर स्थानिक वृत्तपत्रे, शेकडो खास विषयांना वाहिलेली व चार हजारांवर पाक्षिके देशात प्रसिद्ध होतात. यांत लंडन टाइम्स, गार्डीयन, ऑब्झर्व्हर, न्यू स्टेट्‌समन यांसारखी जगन्मान्य पत्रे आहेत. देशात ९०० पेक्षा अधिक संग्रहालये असून ग्रंथालय नाही, असे गाव क्वचित सापडेल. लंडनमधील ‘ब्रिटिश म्युझियम’ चे ग्रंथालय जगातील सर्वोत्कृष्ट संदर्भकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

शहाणे, मो. ज्ञा.

शिक्षण : ग्रेट ब्रिटनच्या (ह्यात इंग्लंड, वेल्स व स्कॉटलंड ह्यांचा समावेश होतो) शिक्षणपद्धतीला प्राचीन परंपरा आहे त्यामुळे त्यास आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्ययुगाच्या पूर्वी इंग्लंडमध्ये काही चर्चमधून व त्यांनी चालविलेल्या विद्यालयांतून शिक्षण दिले जात असे. मात्र अशा विद्यालयांत धार्मिक शिक्षणावर अधिक भर असे, किंबहुना त्या संस्था धार्मिक शिक्षणच देत. त्यानंतर दहाव्या-अकराव्या शतकांत ‘स्टडियम जनरेला’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिक्षणसंस्था अस्तित्वात आल्या व मध्ययुगात तर ⇨ऑक्सफर्ड व ⇨केंब्रिज ह्यांसारखी जगप्रसिद्ध विद्यापीठे स्थापन झाली. एवढेच नव्हे, तर चौदाव्या ते सतराव्या शतकांच्या दरम्यान विंचेस्टर (१३८८) , ईटन (१४४०) , हॅरो (१५७१) ह्यांसारखी प्रसिद्ध विद्यालये (पब्लिक स्कूल्स) आणि युनिव्हर्सिटी ऑफ अँड्रूज (१४१०), युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो (१४५१), ॲबर्डीन (१४९४), एडिंबरो (१५८३) यांसारखी काही विद्यापीठे स्थापन झाली. म्हणून इंग्लंडच्या शैक्षणिक इतिहासास मध्ययुगापासून सुरुवात झाली, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. तथापि अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ब्रिटनमध्ये शिक्षणाचा प्रसार बेताचा झालेला होता. शिक्षणाची संधी मुख्यतः वरिष्ठ वर्गास व काही प्रमाणात मध्यम वर्गास मिळे. परंतु सामान्य लोक शिक्षणापासून वंचितच राहिले होते. शिक्षणाची जबाबदारी पालकांची आहे, सरकारची नाही, अशी सर्वसाधारण विचारसरणी होती. वरील परिस्थितीत १८०७ ते १९४४ च्या दरम्यान बदल झाला. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्गाच्या संघटना उदयाला आल्या आणि ब्रिटिश संसद अधिक लोकाभिमुख झाली. एकोणिसाव्या शतकात एकामागून एक शैक्षणिक कायदे संमत होऊन शैक्षणिक सुधारणांस आणि शिक्षण प्रसारास प्रारंभ झाला. १८३३ मध्ये सरकारने शिक्षणसंस्थांना अनुदाने देण्यास सुरुवात केली. १८७० साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले. त्यामुळे साहजिकच सरकारवर शिक्षणाची जबाबदारी पडली आणि राष्ट्रीय पद्धतीची शिक्षणपद्धती अस्तित्वात आली. कायद्याने १९०२ साली माध्यमिक शिक्षणात सांविधिक तरतूद केली. १९१८ च्या फिशर कायद्यानेसक्तीच्या शिक्षणाचे वय १४ वर्षे करण्यात आले. १९२१ च्या कायद्याने १९१८च्या कायद्यातील उणिवा भरून काढून पूर्वीच्या कायद्यांचे एकत्रीकरण केले.दुसऱ्या महायुद्धामुळे १९३६ चा कायदा संमत होऊ शकला नाही तथापि तत्पूर्वी १९३३ मध्ये हॅडो अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्यात तत्कालीन प्राथमिक शिक्षणातील दोष व त्यांवरील उपायांची चर्चा केलेली होती. १९४३ मध्ये शिक्षणविषयक श्वेतपत्रिका संसदेस सादर करण्यात आली आणि त्यानंतर १९४४ मध्ये इंग्लंडच्या शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा करणारा क्रांतिकारक असा बटलर कायदा संमत झाला. त्यास शिक्षण क्षेत्रातील मॅग्ना कार्टा म्हणतात. शिक्षण क्षेत्रांतील सर्वागीण प्रगतीच्या दृष्टीने ह्या कायद्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात आणखी काही दुरुस्त्या पुढे १९४६, १९४८, १९५३ आणि १९५९ ह्या सालांत पोटकायदे संमत करून जोडण्यात आल्या. १९५९ मध्ये प्लॉवडन अहवालाने प्राथमिक शिक्षणासंबंधीची माहिती गोळा करून तत्संबंधी अनेक मौलिक फेरबदल सुचविले. त्याचीही सरकारने अंमलबजावणी केली आहे. रॉबिन्सने उच्च शिक्षणाबाबत १९६३ मध्ये एक अहवाल सादर केला. उच्च शिक्षणास लायक असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास ते मिळाले पाहिजे, असा त्याचा कटाक्ष होता. १९६६ च्या स्वॉन अहवालात पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आग्रहाने पुरस्कार केला आहे. १९७२–७३ साली माध्यमिक शिक्षणाचे शेवटचे वय पंधराऐवजी सोळा करावे, असाही एक विचार इंग्लंडमध्ये प्रसृत झाला. त्यास कायद्याचे स्वरूप यथावकाश प्राप्त होईल. वरील सर्व कायद्यांनी शिक्षणात पूर्वी असलेला गरीब-श्रीमंत हा भेद जवळजवळ नष्ट झाला आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपापला चाळीस वर्षांचा आराखडा तयार केला असून त्याप्रमाणे शाळांच्या इमारती, साहित्य-सामग्री आणि नवीन संस्था यांची निर्मिती दरवर्षी होत आहे. उपलब्ध शिक्षणसंस्थांचा लाभ घेता यावा, म्हणून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नादारी, वसतिगृहाच्या सोयी इ. मार्गांनी मदत दिली जात आहे. लोकशाही राज्यपद्धतीमधील एक आदर्श शिक्षणपद्धती निर्माण करण्याचा इंग्रजी लोकांचा प्रयत्न सदैव चालू आहे.

शंभर टक्के साक्षर असलेल्या ग्रेट ब्रिटनमध्ये शिक्षणाचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च असे तीन विभाग केलेले असून स्वतंत्र मंत्रालय व शिक्षणमंत्री अनुभवी शिक्षणतज्ञांच्या व मध्यवर्ती सल्लागार मंडळाच्या सल्लामसलतीने शिक्षणविषयक कार्य करते. बहुतेक शिक्षणसंस्था खाजगी आहेत. तसेच धार्मिक संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाही काही शिक्षणसंस्था चालवितात. त्यांच्यावर देखरेख आणि त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता मध्यवर्ती शासनाचे तपासनीस असतात. यांतील काही संस्था स्वतंत्र व स्वायत्त आहेत, तर काहींना त्यांच्या खर्चाचा निम्मा किंवा दोन-तृतीयांश खर्च सरकारकडून मिळतो. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असून काही शाळांतून दुपारच्या जेवणाची व दूधपुरवठ्याची मोफत व्यवस्था असते. सरकारी आणि खाजगी संस्थांचे सहजीवन आणि सहकार्य हे इंग्रजी शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे अंग समजले जाते.

वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी बालोद्यान व बालक मंदिरांची सोय आहे. १९६९ मध्ये अशा सु. ५०० संस्था होत्या पण हे शिक्षण पूर्णतः ऐच्छिक आहे. ६ ते १५ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण आहे. ६ ते ७ वर्षांपर्यंतची मुले ज्युनिअर शाळांत जातात. ११ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना माध्यमिक विद्यालयांत घालण्यात येते. माध्यमिक विद्यालयांना मॉडर्न, टेक्निकल आणि ग्रामर अशी नावे आहेत. खाजगी आणि श्रीमंत वर्गाकरिता खास असणाऱ्या शाळांना पब्लिक स्कूल म्हणतात. अशीही अनेक विद्यालये आहेत. ईटन व हॅरो ही त्यांचीच उदाहरणे होत. या बहुतेक शाळा निवासी आहेत. मात्र इतर शाळांत दोन्ही प्रकारच्या शाळा आहेत. अलीकडे माध्यमिक शिक्षण सर्वसमावेशक असावे, ह्या कल्पनेतून काही कॉम्प्रीहेन्सिव्ह विद्यालये उघडण्यात आली आहेत. प्राथमिक शिक्षणानंतर काही चाचण्या दिल्या जातात आणि मुलाचे वय, पात्रता व कल पाहून त्याला योग्य त्या माध्यमिक विभागात घातले जाते. साधारणतः शेकडा २० ते २५ विद्यार्थी ग्रामर विद्यालयांमध्ये घेतले जातात. त्याच्या खालोखाल टेक्निकल विद्यालयांत जातात. उरलेल्यांपैकी बहुतेक सामान्य बुद्धीची मुले मॉडर्न व कॉम्प्रीहेन्सिव्ह विद्यालयांमध्ये जातात. १९७० मध्ये १,१०० ग्रामर, ३,५०० मॉडर्न व १,००० कॉम्प्रीहेन्सिव्ह विद्यालये होती. ग्रामर विद्यालयांमधून मुख्यत्वे विद्याविषयक शिक्षण दिले जाते. त्यामुळे त्या शाळांतील विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणाकरिता प्रथमपासूनच तयारी करतात. उरलेल्या विद्यालयांत (तंत्रविषयक शाळा सोडून) सर्वसाधारणतः लेखन, वाचन, गणित, वाङ्‌मय, इतिहास, भूगोल, वनस्पतिविज्ञान, शारीरिक शिक्षण, हस्तव्यवसाय, संगीत हे विषय शिकविले जातात. वेल्समधील शाळांतून शिक्षणाचे माध्यम वेल्श भाषा असून इंग्रजीस दुय्यम भाषेचे स्थान दिले आहे. इतरत्र मात्र इंग्रजीच माध्यम आहे.

ह्यांव्यतिरिक्त अपंगांसाठी खास विद्यालये आहेत. १९६९ मध्ये अशा प्रकारची ८०० विद्यालये होती व त्यांतून सु. ७६,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यांपैकी ६०% मुले होती. १९७२ मध्ये ब्रिटनमध्ये एकूण ३६,६९७ विद्यालये होती आणि त्यांतून सु. १,००,४०,००० विद्यार्थी शिकत होते. १९६९ मध्ये एकूण ३,२०,९१४ पूर्णवेळ शिक्षक होते, त्यांपैकी १,८७,०४३ शिक्षिका होत्या. वैद्यकीय मदत मोफत असून सर्व विद्यालयांतून आरोग्य-शिक्षणावर भर दिला जातो.

बहुसंख्य विद्यार्थी सक्तीचे वय पूर्ण झाल्यामुळे सोळाव्या वर्षांनंतर शाळा सोडतात. अशा विद्यार्थ्यांस आठवड्यातून दहा तास शिक्षण देणारी कौंटी महाविद्यालये असावीत, अशी एक योजना आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना जी. सी. ई. हे प्रमाणपत्र घेता येते. तथापि अद्याप राष्ट्रीय पातळीवर कोणत्याही पद्धतीची शालान्त परीक्षा नाही. प्रौढ नागरिकांकरिता बौद्धिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. ह्यांशिवाय ग्रामीण भागातील जनतेला सांस्कृतिक शिक्षण देणाऱ्या हेन्‍री मॉरिस ह्यांच्यासारख्यांनी सुरू केलेल्या व्हिलेज कॉलेज ह्याही संस्था आहेत. रात्रीच्या उच्च शिक्षण देणाऱ्या सु. ७,३०० संस्था असून त्यांत सु. १३,९४,७४२ विद्यार्थी १९७० साली शिकत होते. ह्यांतून बहुतेक सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते.

शिक्षण मंत्रालय आदर्श अभ्यासक्रम तयार करून त्यावर वाङ्‌मय प्रसिद्ध करते. पण या अभ्यासक्रमाची विद्यालयांवर सक्ती नसते. मुख्याध्यापक व शिक्षक आपापला अभ्यासक्रम तयार करून त्याला मान्यता घेऊ शकतात. अध्यापन-पद्धतींबाबत शिक्षकांना स्वातंत्र्य असते. शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवण्याबद्दल दक्षता घेतली जाते. क्रमिक पुस्तके, दूध, फराळ, वाहतूक यांची जरुरीप्रमाणे मोफत किंवा थोडे पैसे भरून सोय करण्यात येते.

शाळांच्या इमारती भव्य, सुंदर व आकर्षक असतात. तेथे क्रीडांगणे, व्यायामगृहे, पोहण्याचे तलाव, ग्रंथालये, कृतिअभ्यास निकेतन, ललित कलागृहे इ. अद्ययावत सोयी असतात.

महाविद्यालयीन शिक्षणाचा आणि विद्यापीठांचा विस्तार विसाव्या शतकात झपाट्याने होत आहे. सामान्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, म्हणून नादाऱ्या व शिष्यवृत्त्या यांची भरपूर सोय अलीकडे केलेली आहे. उच्च शिक्षणाचा दर्जा राखण्याचाही प्रयत्न कसोशीने केला जातो. बहुतेक विद्यापीठांची प्रवेशपरीक्षा असून ती उत्तीर्ण होणाऱ्यास विद्यापीठांत प्रवेश मिळतो. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर पहिली पदवी प्राप्त होते. पदव्युत्तर अभ्यासाची व संशोधनाची व्यवस्था विद्यापीठांतून आहे. विद्यापीठांना सरकारी मदत योग्य रीतीने देण्याकरिता विद्यापीठ अनुदान समिती नेमलेली आहे. अनुदानाव्यतिरिक्त इतर काही अडचणींचाही विचार ह्या समितीतर्फे करण्यात येतो.

१९६८–६९ मध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या सु. ७३० संस्था आस्तित्वात होत्या. त्यांपैकी ५३७ तांत्रिक शिक्षण देणारी महाविद्यालये, १४३ मानव्यविद्येच्या अभ्यासांची महाविद्यालये, ५ राष्ट्रीय महाविद्यालये व ४५ कृषिमहाविद्यालये होती. १९७० मध्ये आणखी १४ विद्यानिकेतने स्थापन झाली. ह्या सर्वांतून २,४३,८७९ विद्यार्थी शिकत होते. त्यांपैकी ५८,५७२ स्त्रिया होत्या. प्रशिक्षण देणारी महाविद्यालये वाढत असून विद्यालयांवर प्रशिक्षित अध्यापक अधिक असावेत, असे बंधनही घालण्यात येत आहे. बी.एड्‌. ह्या पदवीचा अभ्यासक्रम आणखी एका वर्षाने वाढविण्यात आला आहे. १९७३ साली ब्रिटनमध्ये ४४ विद्यापीठे होती. ह्याशिवाय मँचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी आणि द लंडन अँड मँचेस्टर बिझनेस स्कूल ह्यांना विद्यापीठीय दर्जा प्राप्त झाला आहे. सर्वत्र सहशिक्षण असूनसुद्धा फक्त स्त्रियांकरिताही काही महाविद्यालये आहेत. १९६९–७० साली ग्रेट ब्रिटनमध्ये शिक्षणावर लेखापरीक्षापूर्व निव्वळ खर्च १८७ कोटी पौंड एवढा झाला. त्यात सार्वजनिक पैसाही होता.

इंग्लंडमधील ईटन, हॅरो व विंचेस्टर ह्यांसारख्या विद्यालयांना आणि ऑक्सफर्ड व केंब्रिज यांसारख्या मध्ययुगीन विद्यापीठांना, तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स ह्यांसारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना आगळे महत्त्व व जागतिक कीर्ती लाभली आहे. ह्या राष्ट्रव्यापी मान्यवर शैक्षणिक संस्था आहेत. वर्कर्स एज्युकेशन असोसिएशन ही प्रौढ कामगारांना शिक्षण देणारी संस्थाही प्रसिद्ध आहे. यांशिवाय बीबीसी नभोवाणी आणि दूरचित्रवाणी केंद्र राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शिक्षणाचे बहुमोल कार्य करीत असते. १९३४ मध्ये स्थापन झालेली ब्रिटिश कौन्सिल ही आणखी एक ग्रंथालयीन विश्वव्यापी संस्था इंग्रजी भाषेच्या शिक्षणाचा परदेशात प्रचार करीत असून तिच्याकरवी ब्रिटनच्या इतिहासाची व सांस्कृतिक जीवनाची तोंडओळख इतरत्र केली जाते.

ब्रिटिश माणसाच्या स्वभावाचे व परंपरेचे काही विशेष ब्रिटनच्या शिक्षणपद्धतीत उमटलेले दिसतात. शालेय शिक्षणात प्रार्थना-पूजा व धार्मिक शिक्षण यांचा समावेश कायद्याने केलेला आहे. मात्र शिक्षक व संस्था ह्यांच्या बौद्धिक स्वातंत्र्याची सरकार व जनता काळजीपूर्वक जपणूक करते. म्हणूनच पालकांची इच्छा नसेल, तर अशा मुलांना धार्मिक शिक्षणातून अपवादादाखल वगळण्यात येते. तसेच शिक्षणक्षेत्रात खाजगी शिक्षणसंस्थांना फार महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय शिक्षणपद्धतीवर ब्रिटनच्या शिक्षणपद्धतीचा फार मोठ्या प्रमाणावर ठसा उमटलेला असून, काही भारतीय विद्यापीठांतून इंग्लंडमधील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाची प्रतिकृती आढळते.

खैर, ग. श्री.

कला व क्रीडा :वास्तुकला : स्टोनहेंजसारखे एकदोन इतिहासपूर्व अवशेष सोडल्यास ग्रेट ब्रिटनमधील सर्वांत जुन्या वास्तुरचना पाचव्या शतकापूर्वीच्या रोमन काळातील आहेत. त्यांचे उपलब्ध अवशेष रोममधील इमारतींपेक्षा निकृष्ट असून, ते रोमनांनी स्थापलेल्या कोल्चेस्टर, बाथ, सिल्चिस्टर, सेंट ऑल्बॅन्झ इ. ठिकाणी सापडतात. त्यांत आखाडे, नाट्यगृहे, स्नानगृहे, राजवाडे, मंदिरे, घरे अशा वास्तूंचा समावेश होतो. ४१० ते ५९७ या अँग्लो-सॅक्सन काळातील अवशेष सापडलेले नाहीत. ५९७ साली इंग्लंडमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रवेश झाला व कँटबरी, रॉकेस्टर इ. केंट परगण्यातील शहरांत चर्च-वास्तू उभारण्यात आल्या. त्यांपैकी नॉर्‌दॅम्प्टनमधील ६७० साली बांधलेले चर्च अद्याप अस्तित्वात आहे. ही सातव्या शतकातील सर्वांत भव्य वास्तू समजली जाते. आठव्या व नवव्या शतकांत डॅनिश लोकांच्या सतत हल्ल्यांमुळे उल्लेखनीय बांधकाम झाले नाही. १०६६ पासून इंग्लंडमध्ये नॉर्मन युग सुरू झाले. या काळात मुख्यतः किल्ले व चर्च बांधली गेली. कारण उपऱ्याजेत्यांनी सरंजामशाही निर्माण करून आपली सत्ता भक्कम करण्याचा तो काळ होता. थेटफर्ड, ॲरंडल, लंडन टॉवर, विंझर येथे तत्कालीन प्रेक्षणीय किल्ले आहेत. तसेच चिचिस्टर, डरॅम, ग्लॉस्टरशर, नॉर्विच, ऑक्सफर्ड, विंचेस्टर येथील कॅथीड्रल्सही उत्कृष्ट नॉर्मन बांधणीचे नमुने आहेत. अर्धवर्तुळाकृती कमानी हे नॉर्मन वास्तुरचनेचे वैशिष्ट्य आहे. बाराव्या शतकात प्रथमच साग्र कमानींचा उपयोग होऊ लागला आणि गॉथिक वास्तूंचा काळ सुरू झाला. सोळाव्या शतकात यूरोपीय प्रबोधनकाळाचा प्रभाव इंग्लंडमध्येही जाणवू लागला. आरंभी वास्तुरचनेसाठी इटालियन कारागीर आणावे लागले. परंतु नंतर इंग्रज कारागीर इटालियन कलाकुसरीची उत्तम नक्कल करू लागले. या कारागिरीसंबंधीच्या जर्मन भाषेतील ग्रंथांचा इंग्लंडमध्ये अभ्यास होऊ लागला. ट्यूडर (सोळावे शतक), एलिझाबेथन (१५५८–१६०३) व जेकोबियन (१६०३–२५) हे इंग्लंडच्या कलेतिहासातील महत्त्वाचे कालखंड होत. १५४० ते १६६० या काळात नवीन चर्च-वास्तू फारशा निर्माण झाल्या नाहीत. या काळातील लीड्‌समधील सेंट जॉनचे चर्च (१६३४) उल्लेखनीय आहे. याची बांधणी गॉथिक शैलीतील असून, आतील भाग जेकोबियन काष्ठकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. या कालखंडात बरेच प्रासाद व शाळा बांधल्या गेल्या आणि इंग्लिश वास्तुरचनेच्या शैलीत क्रांतिकारक फरक झाला.

सतराव्या व अठराव्या शतकांत ⇨इनिगो जोन्स (१५७३–१६५२) व ⇨क्रिस्टोफर रेन (१६३२–१७२३) हे दोन वास्तुविशारद अत्यंत प्रभावी ठरले. जोन्स आणि त्याचा शिष्यवर्ग यांच्या प्रभावाने गॉथिक वास्तुरचना मागे पडली व इटालियन वास्तुविशारद आन्द्रेआ पाललाद्यो याच्या अनुकरणातून निर्माण झालेली ‘पाललाद्यियन’ शैली (१७१०–५०) लोकप्रिय झाली. क्रिस्टोफर रेनने आपल्या अनेक इमारतींनी इंग्लंडच्या वास्तुरचनेवर आपला कायमचा ठसा उमटविला. त्या दृष्टीने हॅम्पटन कोर्ट, विंझर कॅसल, चेल्सी हॉस्पिटल, केंब्रिजमधील चर्च इ. वास्तू उल्लेखनीय आहेत. एकोणिसाव्या शतकात जॉन नॅशने (१७५२–१८३५) ग्रीक आणि रोमन वास्तुशैलींच्या मिश्रणाने स्वतःची स्वतंत्र वास्तुशैली निर्माण केली. या ‘व्हिक्टोरियन’ आणि काही अंशी ‘एडवर्डियन’ काळात डामडौल व दिखाऊपणा यांस महत्त्व होते त्यांचे प्रतिबिंब वास्तुरचनेतही दिसून येते. तथापि याच सुमारास जॉन रस्किन (१८१९–१९००) व त्याचा अनुयायी विल्यम मॉरिस (१८३४–९६) यांच्या काव्यात्म सौंदर्याभिरूचीचा प्रभाव वास्तुकलेवर पडू लागला व बांधकामात फालतू कलाकुसर आणि अवास्तव डामडौल न आणता साधेपणातही सौंदर्य व्यक्त करता येते, हे लोकांना पटू लागले. विसाव्या शतकातील कार्यवादी वास्तुशैलीचा हा बीजारंभ होता.

मूर्तिकला : ग्रेट ब्रिटनमधील मूर्तिकला ही वास्तुकलेचा एक भाग म्हणूनच वाढली. गेल्या शतकापर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मूर्तिकार तेथे झाला नाही. वास्तुकलेतही मुख्यतः चर्चे व दफनभूमी यांतील समाध्यांमध्येच मूर्तिशिल्पाचा उपयोग केला जात असे. राजकुटुंबीय व्यक्ती व सरदार यांच्या कबरींवरील मूर्ती आणि चर्चच्या आतील व बाहेरील येशू ख्रिस्त, मेरी, साधुसंत यांच्या मूर्ती एवढ्यांपुरतीच मूर्तिकला मर्यादित होती. त्याचप्रमाणे श्रीमंतांच्या उद्यानांत व क्वचित सार्वजनिक बागांत ग्रीक पुराणातील स्त्री-पुरुषांच्या मूर्ती ठेवल्या जात. या काळात इंग्लिश मूर्तिशिल्पाला यूरोपीय कलाजगात फारसे उच्च स्थान नव्हते. आधुनिक काळात ⇨जेकब एप्स्टाइन व ⇨हेन्‍रीच्या मुर यांनी इंग्लिश मूर्तिशिल्पास कलाजगात मानाचे स्थान मिळवून दिले. जुन्या इंग्लिश शिल्पाकृतींत काव्यात्म विषण्णतेचा प्रत्यय येत असे. बहुतेक नव्या मूर्तिकारांवर आंतरराष्ट्रीय कलाप्रवाहाचा प्रभाव झालेला आहे. तथापि समतोल व अवनिर्देश ही इंग्रज स्वभावाची वैशिष्ट्ये त्यांत आढळतातच. नव्या मूर्तिकारांत डॉब्सन, चॅडविक, डालवूड, मेडोझ, बार्बारा हेप्‌वर्थ, रेग बटलर यांची नावे घेतली जातात. त्यांच्या शिल्पाकृतींत जोम व नवकल्पकता यांचा मनोहर संगम आढळतो.

चित्रकला : ग्रेट ब्रिटनमध्ये चर्चच्या आश्रयानेच चित्रकला वाढली. ख्रिस्तचरित्र, बायबलमधील कथा आणि संतमाहात्म्य यांपासून तिला स्फूर्ती मिळाली. सातव्या व आठव्या शतकांत खास इंग्लिश शैलीचे हस्तलिखितातील सुनिदर्शन यूरोपमध्येही प्रसिद्ध होते. याच काळात चर्चमधील भित्तिचित्रण व काष्ठचौकटचित्रण यांस उत्तेजन मिळाले. तेराव्या शतकात तिसऱ्या हेन्‍रीच्या आश्रयाने लंडन या कलाप्रकारांचे माहेरघर झाले. वेस्टमिन्स्टर राजवाड्यातील भित्तिचित्रे तत्कालीन इंग्लिश चित्रकलेची उत्कृष्ट उदाहरणे समजली जात. दुर्दैवाने ती नष्ट झाली आहेत. पंधराव्या शतकात ‘वॉर्स ऑफ द रोझेस’ (१४५५–८७) या यादवी युद्धामुळे इंग्लिश चित्रकला मागे पडली व त्यानंतरच्या धर्मसुधारणेच्या काळातील विध्वंसामुळे अनेक कलाकृतीही नष्ट झाल्या. हा विध्वंस सतराव्या शतकापर्यंत चालू होता. आठव्या हेन्‍रीच्या पोपविरुद्धच्या मोहिमेने चर्चमधील चित्रकलेतही खंड पडला. अशा अस्थिर काळात व्यक्तिचित्रांची कला इंग्लंडमध्ये काही काळ स्थायिक झालेल्या हान्स होल्बाइन (सु. १४९७–१५४३) या जर्मन चित्रकाराच्या कर्तृत्वाने जिवंत राहिली. या काळाचे वैशिष्ट्य हे, की होल्बाइनप्रमाणेच इंग्लंडमधील इतर श्रेष्ठ कलावंतही परकीय होते. एलिझाबेथच्या कारकीर्दीत लघुचित्रणाचा प्रकार विशेष प्रसिद्धीस आला. या कलेत निकोलस हिल्यर्ड (सु. १५४७–१६१९), आयझाक ऑलिव्हर (सु. १५६४–१६१७) व त्याचा मुलगा पीटर ऑलिव्हर (१५९४–१६४७) हे उल्लेखनीय आहेत.

स्ट्यूअर्ट काळातही इंग्लिश चित्रकलेच्या प्रगतीस व्हान डाइक (१५९९–१६४१) या फ्लेमिश कलावंतानेही हातभार लावला. त्याच्याच परंपरेत विल्यम डॉब्सन (१६१०–४६), रॉबर्ट वॉकर (सु. १६०५–सु. १६६०) इ. प्रसिद्ध चित्रकार होऊन गेले. क्रॉमवेलच्या काळात व नंतरही इंग्लिश चित्रकलेवरील परकीय पकड सैल झाली नाही. या संदर्भात पीटर लीली व गॉडफ्री नेलर या चित्रकारांचा अग्रक्रम आहे. त्यांच्या बरोबरीने नाव घेता येतील, असे इंग्रज चित्रकार जॉन रायली (१६४६–९१) व रॉबर्ट स्ट्रीटर (१६२४–८०) हे दोघेच आहेत. लघुचित्रांच्या त्या काळात त्यांची भित्तिचित्रे उल्लेखनीय ठरली. १७६८ साली लंडन येथे ‘रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्‌स’ ची स्थापना होऊन चित्रकलेस राजमान्यता व लोकमान्यता मिळाली. तत्पूर्वी पन्नास वर्षे नेलरने आपली चित्रशाळा सुरू केली होती (१७११). तिला रॉयल अकॅडमीची पूर्वप्रवर्तक समजतात. विख्यात चित्रकार जॉश्युआ रेनल्ड्‌झ (१७२३–९२) या अकॅडमीचा पहिला अध्यक्ष होता. याच सुमारास विल्यम होगार्थ (१६९७–१७६४) हा इंग्रज चित्रकार आपल्या कुंचल्याने समकालीन जीवनातील वास्तव दृश्ये चित्रित करीत होता. त्याच्या प्रभावी कुंचल्याने इंग्लिश चित्रकलेस यूरोपीय जोखडातून मुक्त केलेच शिवाय सुखवस्तू उच्चभ्रूंच्या व्यक्तिचित्रांतूनही बाहेर काढून, सभोवतालच्या जगाची जाणीव करून दिली आणि शाश्वत मूल्यांच्या आविष्काराकडे वळविले. सुदैवाने होगार्थच्या ह्यातीतच इंग्लिश चित्रकलेस टॉमस गेन्झबर (१७२७–८८) हा समर्थ नेता मिळाला. त्यास इंग्लिश चित्रकलेचा जनक समजतात. तो व त्याचा समकालीन रेनल्ड्‌झ हे दोघे दरबारी लोकांच्या तसबिरी रेखण्यात कुशल होते. पण गेन्झबर निसर्गचित्रणात अग्रेसर होता. रेनल्ड्‌झ व्यक्तिचित्रात श्रेष्ठ होता. या दोघांमुळे इंग्लिश चित्रकलेस यूरोपमध्ये मानाचे स्थान मिळाले. रेनल्ड्झ वर इटालियन शैलीचा प्रभाव होता. गेन्झबर इंग्लंडबाहेर गेलाच नाही पण त्याच्या शैलीवर डच शैलीचा व रूबेन्स या चित्रकाराचा प्रभाव स्पष्ट आहे. निसर्गदृश्यांतून प्राणिचित्रांची आवड उद्‌भवली. या क्षेत्रात सर एडविन लॅन्सिअर (१८०२–७३) याच्या चित्राकृती उल्लेखनीय आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकात इंग्लिश चित्रकलेस प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्यांत गेन्झबरप्रमाणेच ⇨जॉन कॉन्स्टेबल (१७७६–१८३७) व ⇨जोसेफ टर्नर (१७७५–१८५१) यांची नावे घ्यावी लागतात. हे तिघेही आधुनिक इंग्लिश चित्रकलेचे प्रणेते होत. कॉन्स्टेबलच्या निसर्गचित्रांचा यूरोपीय चित्रकलेवर खोल ठसा आहे. जीन फ्रांसीस्क मिले (१८१४–७५) आणि झां कॉरो (१७९६–१८७५) यांसारख्या नामवंत चित्रकारांचा समावेश असलेल्या ‘बार्बिझाँ’ या निसर्गचित्रणाच्या क्षेत्रातील फ्रेंच संप्रदायाचे प्रेरकत्व कॉन्स्टेबलकडेच जाते. टर्नरचे स्थान यूरोपीय चित्रकलेत अद्वितीय आहे. इंग्लिश चित्रकलेशी त्याचे नाते शेक्सपिअरच्या इंग्रजी वाङ्‌मयाशी असलेल्या नात्यासारखेच आहे. प्रकाशाची निरनिराळी रम्य रूपे दाखवून, काव्यात्मक निसर्गदृश्ये चित्रित करण्याचे त्याच्या कुंचल्याचे कौशल्य अपूर्व व अद्वितीय आहे. इंग्लिश चित्रकलेचा हा वैभवशाली काळ होय. याच काळात विल्यम ब्लेक (१७५७–१८२७) याने स्वतःची खास चित्रसृष्टी निर्माण केली. जगातील एक श्रेष्ठ गूढवादी चित्रकार म्हणून तो प्रसिद्धीस आला. याच सुमारास व्यंगचित्रे आणि सचित्र पुस्तके यांची प्रथा सुरू झाली. त्यामध्ये जॉर्ज क्रुक्‌शँक (१७९२–१८७८) हा व्यंगचित्रकार व टॉमस स्टॉथर्ड हे उल्लेखनीय आहेत.

डँटी गेब्रिएल रोसेटी (१८२८–८२), विल्यम होलमन हंट (१८२७–१९१०) व सर जॉन एव्हरेट मिले (१८२९–९६) यांनी ⇨ प्री-रॅफे-एलाइट्‌स ही कलावंतांची संघटना १८४८ मध्ये स्थापन केली. या संघटनेचा प्रभाव एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विशेष होता. चित्रकलेतील दरबारी कलाकुसरीविरुद्ध हे बंड असून त्यात साधेपणा व अचूकपणा यांवर भर होता. त्यांच्या अनुयायांत बर्न-जोन्स (१८३३–९८) व विल्यम मॉरिस (१८३४–९६) हे प्रमुख आहेत. पुढील विकासाचा टप्पा जेम्स ॲबट मॅकनेल व्हिस्‌लर (१८३४–१९०३) याने गाठला. हा जन्माने अमेरिकन होता परंतु इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. याने इंग्लिश चित्रकलेस फ्रेंच सौंदर्यशास्त्रीय कल्पनांच्या आधारे नवे वळण लावले. १८८६ मध्ये ‘न्यू इंग्लिश आर्ट क्लब’ स्थापन झाला व त्यातील फिलिप विल्सन स्टिअर (१८६०–१९४२), जॉर्ज क्लाउस (१८५२–१९४४) आणि चार्ल्‌स होम्झ (१८६८–१९३६) यांनी दृक्‌प्रत्ययवादी चित्रणास सुरुवात केली. व्हिसलरप्रमाणेच जॉन सार्जंट (१८५६–१९२५) हाही इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला अमेरिकन चित्रकार होता. त्याने अनेक काव्यात्म दृक्‌प्रत्ययी चित्रे रंगवली. याच परंपरेत वॉल्टर सिकर्ट (१८६०–१९४२) व ऑगस्टस जॉन (१८७८–१९६१) यांचीही नावे घेता येतात. नेव्हिनसन, विल्यम रॉबर्ट्‌स, हेन्‍री लँब, स्टॅन्ली स्पेन्सर, एरिक केनिंग्टन या चित्रकारांनी व पॉल नॅश आणि जॉन नॅश या बंधुद्वयाने पहिल्या महायुद्धानंतरच्या मानसिक अस्वस्थेचे व नैतिक गोंधळाचे प्रतिबिंब आपल्या चित्रणात उमटविले. पॉल नॅशची कला घनलादी पंथांच्या प्रेरणने प्रभावित झालेली दिसते. तथापि आधुनिक पंथाचा खराखुरा इंग्लिश प्रतिनिधी विंडम लूइस (१८८४–१९५७) हा होय. दोन महायुद्धांतील काळात कलाक्षेत्रात नवनवे प्रयोग झाले. दुसऱ्या महायुद्धानंतरही या प्रगतिशील गतिमानतेत खंड पडला नाही. आधुनिक काळात रोथेनस्टाइन, ऑर्पेन, ग्रॅहॅम सदरलंड, जॉन पायपर, व्हिक्टर पासमोर वगैरे चित्रकारांनी आपल्या कलाकृतींनी इंग्लिश चित्रकलेचे नाव उज्ज्वल केले आहे.

सामान्य जनतेस उत्कृष्ट चित्रे पाहण्याची इंग्लंडइतकी सोय इतरत्र सापडणे कठीण. लंडन व एडिंबरो येथे प्रचंड कलासंग्रहालये असून इतर बहुतेक शहरांत चित्रसंग्रहालये आहेत. शिवाय पूर्वीच्या सरदारांचे भव्य वाडे जनतेस खुले झाल्याने त्यांतील खाजगी चित्रसंग्रहही सहजपणे पाहता येतात. ‘आर्ट कौन्सिल ऑफ ग्रेट ब्रिटन’, ‘नॅशनल ट्रस्ट’ यांसारख्या मध्यवर्ती संस्था इंग्लिश चित्रकलेची परंपरा व वैभव कायम ठेवण्यास व वाढविण्यास हातभार लावीत आहेत.

संगीत व नृत्य : नाट्याप्रमाणेच संगीताचेही इंग्लिश लोकांस वेड आहे. संगीतोत्सवांची प्रथा ग्रेट ब्रिटनमध्ये दोन शतकांपासून चालत आली आहे. बहुतेक मोठ्या शहरांतून हे वार्षिक संगीतोत्सव होत असतात आणि त्यांस सरकार व स्थानिक संस्था साहाय्य देतात. लंडनमध्ये संगीतास वाहिलेले ‘रॉयल फेस्टिव्हल हॉल’, रॉयल ॲल्बर्ट हॉल’ व ‘विग्‌मोर हॉल’ प्रसिद्ध आहेत. याशिवाय ‘ग्रेटर लंडन कौन्सिल’तर्फे मध्यम आणि गरीब वस्तीत छोटी संगीतगृहे बांधण्यात आली आहेत. ‘रॉयल ऑपेरा हाउस’ व ‘कर्व्हेट गार्डन’ ही नाट्यगृहे बॅले नृत्यनाट्यासाठी प्रसिद्ध आहेत. यांशिवाय ‘सॅडलर्स वेल्स नाट्यगृह’ केवळ नृत्यास व नृत्यनाट्यास वाहिलेले आहे. त्यामधील एक नृत्यशाळा जागतिक कीर्तीची आहे. मार्गो फॉन्टेनसारख्या नर्तिकांनी जागतिक कीर्ती मिळवली आहे. जनसामान्यांकरिता अनेक गावी उघड्या मैदानांवर वाद्यवृंदांचे प्रयोग होतात.

‘लंडन सिंफनी’, ‘बी. बी. सिंफनी’, ‘रॉयल फिलहॉर्मानिक’, न्यू फिलहॉर्मानिक’ इ. वाद्यवृंद उल्लेखनीय आहेत. या सर्व संस्थांस सरकारी अनुदान मिळते. ‘पॉप’ संगीतही आता मान्यता पावले आहे व ‘बीटल्स’ ना पदवी विभूषित करून त्यांवर लोकमान्यतेचे शिक्कामोर्तब झाले आहे. संगीतकारांबद्दल इंग्लंडची फारशी ख्याती नाही. तथापि सार्जट, बोल्ट यांसारखे संगीतकार जगन्मान्यता पावले आहेत.

आपल्याकडील तमाशागृहांच्या धर्तीवर इंग्लंडमध्ये ‘म्युझिक हॉल’ आहेत व त्यांमध्ये लोकनाट्ये दाखविली जातात.

रंगभूमी व चित्रपट : इंग्लिश लोकांस रंगभूमीचे वेड आहे. मात्र परवा परवापर्यंत व्यवसायी नटनट्यांना तुच्छ व कमी प्रतीचे लेखले जाई. शेक्सपिअरमुळे इंग्लिश रंगभूमी जगप्रसिद्ध झाली. अद्यापही त्याच्या नाटकांतील मुख्य भूमिका यशस्वीपणे वठविणे, हे नटांच्या अभिनय कौशल्याचे निदर्शक मानले जाते. त्याच्या जन्मस्थानी, स्ट्रॅटफर्ड-ऑन-ॲव्हनमध्ये होणाऱ्या वार्षिक नाट्यमहोत्सवात जागतिक कीर्तींच्या नटनट्या अभिमानाने भाग घेतात. शाळा, चर्च, नगरपालिका, औद्योगिक व खासगी संस्थाही आपापल्या हौशी नाट्यसंस्था चालवितात. लंडन हे रंगभूमीचे केंद्र असून तेथे तीस मोठी आणि देशभर दोनशेच्या वर व्यावसायिक नाट्यगृहे आहेत.

जगातील इतर देशांप्रमाणेच इंग्लिश रंगभूमीचा विकास मध्ययुगीन पौराणिक व धार्मिक चमत्कृतिपूर्ण नाटकांतून झाला. या नाटकांस व नाट्यसंस्थांस राजेरजवाडे व व्यावसायिक संघांचा आश्रय असे. शेक्सपिअरच्या पूर्वी अभिजात ग्रीक नाट्याने प्रेरित झालेले नाट्यप्रयोगही इंग्लिश रंगभूमीवर होत असत. या संदर्भात क्रिस्टोफर मार्लो (१५६४—९३) हा नाटककार उल्लेखनीय ठरतो. मार्लोप्रमाणेच त्याचा समकालीन नाटककार म्हणून बेन जॉन्सनही ( १५७२—१६३७) प्रसिद्ध आहे.

दुसऱ्या चार्ल्सच्या कारकिर्दीत दरबारी शिष्टाचारांची टिंगल करणारी विनोदी नाटके लोकप्रिय झाली. या काळातील रंगभूमी बड्या लोकांच्या करमणुकीकरिता राबत होती. जॉन ड्रायडन (१६३१–१७००) आणि विल्यम काँग्रीव्ह (१६७०–१७२९) हे त्यावेळचे नाटककार होत. अठराव्या शतकात इंग्लिश रंगभूमी दरबारी आश्रयदात्यांकडून सामान्य नागरिकांकडे वळली. त्यामुळे संगीतिका लोकप्रिय झाल्या. या नाट्यप्रकारास विशेष वेशभूषा व नेपथ्य यांची आवश्यकता असल्याने रंगभूमीच्या स्वरूपातही फरक पडला. तथापि या शतकात एकही उल्लेखनीय नाट्यकृती निर्माण झाली नाही. ऑलिव्हर गोल्डस्मिथ (१७३०—७४) व शेरिडन (१७५१—१८१६) यांची नाटके मात्र उल्लेखनीय आहेत.

एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध रंगभूमीच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. विदूषकी व झगमगीत हलकीफुलकी नाटके या काळात निर्माण झाली. हा कवींचा काळ होता. बायरन, शेली, वर्ड्‌स्वर्थ, कोलरिज, ब्राउनिंग, टेनिसन यांनी नाटके लिहिली पण ती यशस्वी झाली नाहीत. या शतकाच्या उत्तरार्धात इब्सेनच्या (१८२८—१९०६) नव्या नाटकांचा प्रभाव दिसू लागला. रंगभूमीवरील हालचाली, संवाद, नेपथ्य यांमधील सहजता व नैसर्गिकता त्यामुळे वाढली. तथापि हलकीफुलकी, मनोरंजक व खळखळणारा संवाद असणारी नाटके मागे पडली नाहीत. या काळात ऑस्कर वाईल्डची मोहिनी विशेष होती.

इंग्लंडमधील विसाव्या शतकातील एक महान नाटककार म्हणजे जॉर्ज बर्नार्ड शॉ (१८५६–१९५०) होय. त्याने इब्सेनची सहज सुंदरता व मानवी समस्यांचे सखोल ज्ञान यांत आपल्या विलक्षण बुद्धीची, संवादकौशल्याची, खोल तत्त्वज्ञानाची व रंगभूमीच्या तांत्रिक ज्ञानाची भर घालून एक नवी नाट्यसृष्टी निर्माण केली. याच कालखंडात जेम्स बॅरी (१८६०—१९३७), गॉल्झवर्दी (१८६७—१९३३), मॉम (१८७४—१९६५), नोएल कौअर्ड (१८९९— ) हेही नाटककार उदयास आले. ह्याच मालिकेत येट्स् (१८६५—१९३९), सिंग (१८७१—१९०९) आणि ओकेसी (१८८०—१९६४) या आयरिश नाटककारांची नावे द्यावी लागतात. त्यांच्या नाटकांमुळे इंग्लिश नाट्यच नव्हे, तर त्यांचे विषय, नेपथ्य व अभिनय यांमध्येही नव्या कल्पना रूढ झाल्या व इंग्लिश रंगभूमीस जगात मानाचे स्थान मिळाले.

दुसऱ्या महायुद्धामुळे पश्चिमी राष्ट्रांत मानवी मूल्यांविषयीच्या मूलभूत समस्या निर्माण झाल्या. त्यांतूनच निषेधनाट्य आणि मृषानाट्य यांचा उदय झाला. या नव्या नाट्ययुगाची बांग जॉन ऑस्बर्नच्या (१९२९– ) लुक बॅक इन अँगर (१९५६) या नाटकाने दिली, असे मानतात. ब्रेंडन बीहॅन, सॅम्युएल बेकेट, आर्डेन, पिंटर, सिंप्सन, फ्राय, वेस्कर, बोल्ट हे तरुण नाटककार नवनवे प्रयोग करून इंग्लिश रंगभूमीची गतिशीलता सिद्ध करीत आहेत.

या रंगभूमीच्या कीर्तीत जुन्या-नव्या अनेक नटांचाही मोठा वाटा आहे. गॅरिक (१७१७—७९), एडमंड कीन (१७८७ —१८३३), सेरा सिडन्झ (१७५५—१८३१), अर्व्हिंग (१८३८—१९०५), एलेन टेरी (१८४७—१९२८), ऑलिव्हर (१९०७— ), गिलगुड (१९०४— ) इ. नटनट्यांनी इंग्लिश रंगभूमीला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

रंगभूमीची जोपासना व विकास करण्याच्या दृष्टीने सरकारी उत्तेजन मिळते. ‘आर्ट्‌स कौन्सिल ऑफ ग्रेट ब्रिटन’ तर्फे ‘न फायदा न तोटा’ या तत्त्वावर चाललेल्या नाट्यसंस्थांस मदत मिळते. याशिवाय ‘ब्रिटिश कौन्सिल’ अनुदाने देऊन उत्तम नाट्यसंस्थांस परदेशी दौऱ्यांवर पाठविते. ‘आर्ट कौन्सिल’ होतकरू लेखकांच्या नाट्यप्रयोगांसाठी तसेच नेपथ्य, दिग्दर्शन, व्यवस्थापन यांच्या शिक्षणाकरिता मदत देते.

इंग्लंडमध्ये १८९६ मध्ये चित्रपटांचा प्रवेश झाला आणि पुढील दहा वर्षांत इंग्लिश चित्रपट जगप्रसिद्ध झाले. नव्या माध्यमाच्या नव्हाळीने स्फुरलेले चित्रपट, केवळ व्यापारी दृष्टीने निर्माण केलेले गल्लाभरू चित्रपट आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात प्रायोगिक ध्येयाने काढलेले चित्रपट अशा अवस्थांतून इंग्रजी चित्रपट विकसित झाले. पहिल्या महायुद्धापूर्वी इंग्लिश चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत— विशेषतः साम्राज्याधीन देशांत— भरपूर मागणी होती. त्यानंतर अमेरिकन चित्रपटांच्या स्पर्धेत इंग्लिश चित्रपट मागे पडले. दुसऱ्या महायुद्धानंतर रंगभूमीवर नाव कमावलेल्या ऑलिव्हरसारख्या नटांनी मॅक्बेथसारखे काही उत्कृष्ट चित्रपट काढले. परंतु कुशल पटकथालेखक, नट आणि निर्माते हॉलिवुडच्या प्रलोभनाने आकर्षिले गेल्याने इंग्लिश चित्रपटसृष्टी दुय्यमच राहिली. इंग्लिश माहितीपट विशेष दर्जेदार असतात. निर्मात्यांमध्ये रँक आणि हेन्‍री फोंडा ही नावे उल्लेखनीय आहेत. आधुनिक काळात मायकेल पॉवेल, डेव्हिड लीन, कॅरल रीड इत्यादींनी चित्रपटसृष्टीत आपले विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. दूरचित्रवाणीमुळे चित्रपटांचे आकर्षण कमी झाले असावे. कारण १९४६ मध्ये चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या १,६३,५०,००,००० होती, ती १९६५ मध्ये ४०,८०,००,००० झाली. तसेच चित्रपटगृहांची संख्याही ४,७०९ वरून २,०५६ वर आली.

खेळ व मनोरंजन : ‘वॉटर्लूची लढाई ईटनच्या क्रीडांगणावर जिंकली’, अशी इंग्रजीत म्हण आहे. त्यावरून या देशात खेळांस किती महत्त्व आहे, ते दिसून येते. क्रिकेट, फुटबॉल यांसारखे सांघिक खेळ, व्यायामी खेळ, टेनिस, नौकानयन, पोहणे, अश्वक्रीडा, कुत्र्यांच्या शर्यती, मुष्टियुद्ध, गिर्यारोहण, सायकल व मोटार स्पर्धा, गोल्फ, नेमबाजी, तिरंदाजी, दांडपट्टा, स्केटिंग इ. खेळ ग्रेट ब्रिटनमध्ये लोकप्रिय आहेत. सर्व खेळांचे अधिकृत नियम व नियामक मंडळे आहेत. व्यावसायिक खेळाडूंची संख्या मोठी आहे. परंतु इंग्लिश क्रीडांचा मुख्य आधार हौशी खेळाडू व त्यांचे पाठीराखे हा होय. आपला वेळ व पैसा खर्चून लोक खेळांना उत्तेजन देतात व त्यामुळे श्रेष्ठ खेळाडूंना आपला चरितार्थ चालवणे शक्य होते. सर्व शाळांतून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे खेळ शिकविण्याची सोय असते. खेळात केवळ शरीरस्वास्थ्य वा हौस एवढेच उद्दिष्ट नसून, आत्मसंयम, आत्मविश्वास, संघभावना, शिस्त इत्यादींना उत्तेजन देणे, हा मुख्य उद्देश असतो.

क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेटचे क्रीडांगण नाही, असा गाव या देशात सापडणे कठीण. या खेळाची मोहिनी इंग्लंडचा ज्या ज्या देशांशी घनिष्ट संबंध आला, त्यांच्यावरही पडली आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण भारत होय. क्रिकेटनंतर फुटबॉल किंवा सॉकर आणि रग्बी या खेळांचा क्रम लागतो. या खेळांना सामान्य जनता उत्तम प्रतिसाद देते.

इंग्लंडचे शासनही या सांघिक, मैदानी व व्यायामी खेळांस उत्तेजन देते. याबाबतीत सल्ला देण्याचे काम ‘स्पोर्ट्‌स कौन्सिल’ ही संस्था करते. शाळांमध्ये क्रीडाक्षेत्रे आवश्यक गणलेले असून, स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांस क्रीडाक्षेत्रे, आखाडे, टेनिस कोर्ट, पोहण्याचे तलाव उपलब्ध करून देतात. ‘स्पोर्ट्‌स कौन्सिल’शिवाय ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ फिजिकल रीक्रिएशन’ ही संघटनाही खेळांचे नियमन करते. दोहोंनाही सरकारी अनुदान मिळते.

शहाणे, मो. ज्ञा.

प्रेक्षणीय स्थळे : चौथ्या शतकातील रानटी अवस्थेपासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या जगातील सर्वश्रेष्ठ नाविक व साम्राज्यसत्तेच्या वैभवसंपन्न स्थानापर्यंत पोहोचलेल्या, राजेशाही व सरदारशाही यांच्याशी यशस्वी झगडा करून आधुनिक लोकशाहीचा एक आदर्श प्रथमच जगासमोर ठेवणाऱ्या, शास्त्रीय शोधांच्या जोरावर औद्योगिक क्रांतीचा पाया घालणाऱ्या जगातील नामवंत राज्यकर्ते, सेनापती, शास्त्रज्ञ, प्रतिभासंपन्न लेखक, कवी, नाटककार, नट, टीकाकार इत्यादींची मायभूमी असलेल्या, मूलतः व्यापारी वृत्तीच्या व प्राप्त सत्तेच्या जोरावर जगाच्या सर्व भागांतून संपत्तीचा मोठा ओघ आपल्याकडे वळविणाऱ्या चिमुकल्या देशात महत्त्वाची व प्रेक्षणीय स्थळे पुष्कळच आहेत. राजधानी लंडन हे टोकिओ व न्यूयॉर्क यानंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर असून जगातील एक मोठी व्यापारी उतारपेठ आहे. नदीवर मोठमोठ्या गोद्या आहेत. हीथरो आणि नॉर्थोल्ट हे आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय आणि यूरोपीय वाहतुकीचे विमानतळ आहेत. लंडन विद्यापीठाचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जगप्रसिद्ध आहे.पार्लमेंट स्क्वेअरच्या एका बाजूस वेस्टमिन्स्टर ॲबे व दुसऱ्या बाजूस पार्लमेंटची सभागृहे आहेत. जवळच व्हाइट हॉल येथे महत्त्वाच्या शासकीय कचेऱ्या आहेत. डाउनिंग स्ट्रीटवर मुख्य प्रधानांचे वसतिस्थान आहे. बकिंगहॅम राजवाड्यात व विंझर राजवाड्यात कधीकधी राजकुटुंब राहते. सेंट जेम्स पॅलेसमध्ये कोर्ट ऑफ सेंट जेम्स आहे. फ्लीट स्ट्रीट हे वर्तमानपत्रांचे, रीजंट, बाँड व ऑक्सफर्ड स्ट्रीट ही शौकीन खरेदीची केंद्रे असून हाइड पार्क, केन्झिंग्टन गार्डन आणि रीजंट पार्क ही प्रसिद्ध उद्याने आहेत. सध्याचे सेंट पॉल कॅथीड्रल हे प्रसिद्ध वास्तुशिल्पशास्त्रज्ञ रेन याने सतराव्या शतकात बांधले. त्याचा बाह्य घुमट १११ मी. उंच आहे. ओल्ड बेलो हे प्रसिद्ध फौजदारी न्यायालय असून टॉवर ऑफ लंडन येथे आता सैनिकी कारागृह व संग्रहालय आहे. टॉवरवर बिगबेन हे प्रसिद्ध घड्याळ आहे. यांशिवाय रॉयल ऑपेरा हाउस, ओल्ड व्हिक, सॅडलर्स यांसारखी नाट्यगृहे व नृत्यगृहे व्हिक्टोरिया, ॲल्बर्ट, साउथ केन्झिंग्टन, नॅशनल गॅलरी, टेट गॅलरी, वॅलेस संग्रह इ. संग्रहालये व कलावीथी आणि इतर अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तू प्रेक्षणीय आहेत. ग्रिनिच या उपनगरातील जुन्या वेधशाळेवरून ०° रेखावृत्त जाते. क्यू येथे महत्त्वाचे वनस्पतिउद्यान आहे. बाथ येथे गरम झरे व रोमनकालीन अवशेष असून अनेक प्रसिद्ध लेखकांशी त्याचा संबंध आहे.

ऑक्सफर्ड व केंब्रिज येथील विद्यापीठे आणि हॅरो ईटन येथील विद्यालये (पब्लिक स्कूल्स) विख्यात आहेत. सॉल्झबरीजवळील स्टोनहेंज येथे इतिहासपूर्वकालीन दगडी अवशेष आहेत. स्ट्रॅटफर्ड ऑन ॲव्हन हे शेक्सपिअरचे जन्मस्थान असून राष्ट्रीय स्मारक आहे. रग्बी येथे रग्बी फुटबॉल हा खेळ १८२३ मध्ये प्रथम सुरू झाला. विंबल्डन हे टेनिस स्पर्धाचे केंद्र आहे, तर मेरिलिबोन क्रिकेट क्लब एम्‌. सी. सी. म्हणून विख्यात आहे. मॅथ्यू आर्नल्डचे वडील टॉमस आर्नल्ड मुख्याध्यापक असलेले तेथील पब्लिक स्कूल १५६७ मध्ये स्थापन झाले. आता ते औद्योगिक शहर आहे. बर्मिंगहॅम, लीड्स, शेफील्ड, स्टोक, डर्बी, कॉव्हेंट्री, मँचेस्टर, स्वान्सी व कार्डिफ (वेल्स) ग्लासगो व डंडी (स्कॉटलंड) ही औद्योगिक केंद्रे आहेत. स्कॉटलंडमधील एडिंबरो हे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र असून तेथे विद्यापीठ, रॉयल स्कॉटिश अकादमी, नॅशनल गॅलरी ऑफ स्कॉटलंड, नॅशनल लायब्ररी, रॉयल स्कॉटिश म्यूझियम इ. संस्था आहेत. ग्लासगो हे जहाजबांधणीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. प्लिमथ, साउदॅम्प्टन, पोर्टस्मथ, हल्‌, ग्रिम्स्बी, ग्लासगो, लिव्हरपूल, कार्डिफ, स्वान्सी, ब्रिस्टल ही ग्रेट ब्रिटनच्या दंतुर किनाऱ्यावरील विशेष प्रसिद्ध बंदरे आहेत. आइल ऑफ मॅन या छोट्या बेटावरील सृष्टिसौंदर्य प्रेक्षणीय असून तेथे फुले, फळे, भाजीपाला, दुग्धपदार्थ इत्यादींचे उत्पादन होते. आइल ऑफ वाइट येथील खडूचे डोंगर व सृष्टिसौंदर्य प्रसिद्ध असून तेथेही फळे, भाजीपाला यांचे उत्पादन व मेंढपाळी होते. ही दोन्ही बेटे प्रवाशांची विश्रामस्थाने आहेत. सृष्टिसौंदर्याच्या दृष्टीने ग्रेट ब्रिटनमध्ये उत्तर, पश्चिम व नैर्ऋत्य भाग डोंगराळ असून बेन नेव्हीस हे स्कॉटलंडमधील सर्वोच्च शिखर १,३४३ मी. म्हणजे सु. महाबळेश्वरइतके उंच आहे. आग्नेय किनाऱ्यावर खडूचे डोंगर आहेत. इंग्लंडच्या वायव्य भागातील लेक डिस्ट्रिक्ट हा सरोवर-प्रदेश या देशातील सर्वांत रमणीय प्रदेश आहे. त्याजवळच्या टेकड्यांच्या प्रदेशात व दऱ्याखोऱ्यात हिरवीगार कुरणे असून त्यांवर गाईची खिल्लारे व मेंढ्यांचे कळप चरत असतात. उत्तम जातिवंत गाई, मेंढ्या व डुकरे यांच्या पैदाशीसाठी व निर्यातीसाठी ग्रेट ब्रिटन दीर्घकाळ विख्यात आहे.स्कॉटलंडच्या डोंगराळ प्रदेशाची —हायलँड्सची — शोभाही प्रेक्षणीय आहे. तेथील तगडे हायलँडर जवान, त्यांचे विशिष्ट पोषाख, वाद्ये, गीते व शौर्य यांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे त्यांची घागरा पलटण व सुंदरी (बॅगपाइप) वाद्य परिचित आहे.

कुमठेकर, ज. ब.

संदर्भ : 1. Boase, T. S. Ed. The Oxford History of English Art, London, 1949-1959.

2. Central Office of Information, Britain, 1967, London, 1970.

3. Churchill, W. S. The History of the English Speaking Peoples, 4 Vols, New York, 1956-1958.

4. Curtis, S. J. History of Education in Great Britain, London, 1954.

5. Halliday, F. E. A Concise History of England, London, 1964.

6. Harris, Kenneth, About Britain, London, 1967.

7. Maurois, Andre Trans. Miles, Hamish, The History of England, New York, 1960.

8. Richard, J. A. History of England, New York, 1958.

9. Trevelyan, J. M. A Shortened History of England, New York, 1962.

10. Wilenski, R. H. English Painting, London, 1964.

११. खैर, ग. श्री. पाश्चिमात्य शिक्षणपद्धति, पुणे, १९३७.


ग्रेट ब्रिटन


स्टोनहॅज, सॉल्शबरीविंझर किल्ल्याचे प्रवेशद्वार, विंझर

विग टेन मनोरा व पार्श्वभागी ब्रिटिश संसदगृह, लंडनविद्यापीठ महाविद्यालय, ऑक्सफर्ड विद्यापीठ.

बकिंगहॅम राजवाड, लंडन

वेस्टमिन्स्टर ॲबे, लंडन

एडिंबरो विद्यापीठ, स्कॉटलंड

हॅम्प्टन कोर्ट राजवाडा, लंडन


विंबल्डनचे टेनिस कोर्ट, लंडनलॉर्ड्‌स क्रिकेट मैदान, लंडन.

ब्रिस्टल बंदराचे दृश्य

'पीटर पॅन' चा पुतळा,केंन्झिग्टन गार्डन्स, लंडन.नेल्सन स्मृतिस्तंभ, ट्रफेल्गर स्क्वेअर, लंडन.

सेंट पॉल्स कॅथीड्रल, लंडन

ग्रेट ब्रिटनमधील वैशिष्ट्यपूर्ण डेव्हन जातीचा बैल

महान नाटककार शेक्सपिअर यांचे जन्मस्थळ, स्टॅटफर्ड आंत ॲव्हन