वेझान : मोरोक्को देशातील एक धर्मस्थळ. लोकसंख्या ४०,४८५ (१९८२). देशाच्या उत्तरमध्य विभागात रिफ पर्वताच्या नैऋत्य भागात, ३२५ मी. उंचीवर वेझान वसलेले आहे. दुसरा इद्रिस याचा वंशज मौली अब्द अल्लाह याने १७२७ मध्ये वेझानची स्थापना केली. येथे तैयबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूफी पंथीयांचे अनेक मठ स्थापन झाले. हे ठिकाण मागरिब प्रदेशातील एक पवित्र स्थळ बनले. १९२० मध्ये हे फ्रेंचांनी घेतले होते. वेझानच्या आसमंतात तृणधान्याची शेती व पशुपालन हे व्यवसाय केले जातात. या परिसरातील हे एक व्यापारी ठाणे आहे.                                            

चौधरी, वसंत