दिवा : ठाणे जिल्ह्यातील एक लोहमार्ग स्थानक. लोहमार्गाने ठाण्याच्या पूर्वेस ठाणे–कल्याण मार्गावर ठाण्यापासून सु. ५ किमी. अंतरावर दिवा स्थानक आहे. दिवा स्थानकापासून दक्षिणेस पनवेलपर्यंत लोहमार्ग गेलेला असून ते मुंबई बंदराच्या ईशान्येस सु. ४५ किमी. वर आहे.

‘दिवा–पनवेल–उरण–आपटा’ या लोहमार्गबांधणीचा आरंभ १ फेब्रुवारी १९६२ रोजी पनवेल येथे झाला. सदर लोहमार्ग–आखणीचे सर्वेक्षण १९१८–२७ पर्यंत चालू होते पण या रुंदमापी लोहमार्गाच्या बांधणीचा आणि वेळेचा खर्च विचारात घेता हा मार्ग किफायतशीर ठरणार नसल्याचे लक्षात येऊन रेल्वे खात्याकडून त्याचा बांधणीखर्च नामंजूर झाला. याच लोहमार्गबांधणीची कल्पना पुढे पंचवार्षिक योजनांमुळे प्रत्यक्षात येऊ शकली. दिवा–आपटा (लांबी ४१·२८ किमी.) व पनवेल–उरण (लांबी २८·१६ किमी.) अशा अपेक्षित लोहमार्गाची एकूण लांबी ६९·४४ किंमी असून त्यातील १०·८८ किमी. लांबीचा लोहमार्ग ठाणे जिल्ह्यात व उरलेला कुलाबा जिल्ह्यात येतो. दिवा–पनवेल–उरण–आपटा लोहमार्गाने उ. कुलाबा जिल्ह्याचे प्रगतीचे व भरभराटीचे नवे पर्व सुरू होईल. त्याने मुंबई उपनगरांचाही विकास होईल. संकल्पित कोकण लोहमार्ग येथूनच जाणार आहे.

सावंत, प्र. रा.