कॅमरन, व्हर्नी लव्हेट:(१ जुलै १८४४–२७ मार्च १८९४). विषुववृत्तीय आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत प्रवास करणारा पहिला यूरोपीय. इंग्‍लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील रॅडीपोल गावी जन्म. वयाच्या तेराव्या वर्षी हा आरमारात शिरला. आफ्रिकेतील गुलामांच्या व्यापाराचे उच्चाटन व ॲबिसिनियाची मोहीम यांमध्ये याने १८६८ साली भाग घेतला होता. १८७२ मध्ये रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीने लिव्हिंगस्टनला साहाय्य करण्यासाठी व स्वतंत्र समन्वेषणाकरिता म्हणून याची निवड केली. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील झांझिबार मार्गे आत शिरल्यावर थोड्याच दिवसात लिव्हिंगस्टनचे प्रेत घेऊन येणाऱ्या लोकांशी त्याची गाठ पडली. कॅमरन तसाच पुढे निघाला. १८७४ मध्ये टांगानिका सरोवराजवळील उजीजी येथे जाऊन त्याने लिव्हिंगस्टनचे कागदपत्र गोळा केले. सरोवराच्या दक्षिण भागाचे समन्वेषण करून लूकूगा नदीचा उगम तेथून होत असल्याचे त्याने सिद्ध केले. तेथून पश्चिमेकडे वळून लुआलाबा नदीकाठच्या न्यांग्वे येथे गेला. ही नदी त्याला काँगो खोऱ्याची मुख्य नदी वाटली. होडीची सोय नसल्याने तो नदीमार्गे न जाता नैर्ऋत्येकडे वळला. काँगो व झॅंबीझी नद्यांमधील जलविभाजकाची शेकडो किलोमीटरची हद्द तुडवून शेवटी तो १८७४ मध्ये आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील अंगोला देशाच्या बेंग्वेला बंदराशी गेला. येताना त्याने झँबीझीचे उगमस्थान शोधून काढले. इंग्‍लंड व फ्रान्सच्या भौगोलिक संस्थांनी त्याचा सत्कार केला त्याला सरकारकडूनही पदवी मिळाली. त्याच्या ॲक्रॉस आफ्रिका (१८७७) या प्रवासवर्णनाच्या पुस्तकात त्याने खूप माहिती व सूचना केल्या: त्यांपैकी एक म्हणजे केप ते कैरो रेल्वे बांधण्याची होय. १८८२ मध्ये सर रिचर्ड बर्टनबरोबर त्याने गोल्डकोस्टचे समन्वेषण केले व त्यावर दोघांनी पुस्तक लिहिले. आफ्रिकेशी व्यापारवृद्धी व विकास घडविण्याच्या निरनिराळ्या योजना आखण्यात त्याचे उर्वरित आयुष्य गेले. हिंदुस्थानशी खुष्कीच्या मार्गाची शक्यता पाहण्यासाठी त्याने १८७८–७९ मध्ये मध्य आशियाचा दौराही केला. घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.

शाह, र. रू.