गुयाना : गाय्‌आन्ना गायाना. दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावरील प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ २,१४,९६९ चौ. किमी. लोकसंख्या ७,४०,००० (१९७१ अंदाज). याच्या उत्तरेस आणि ईशान्येस अटलांटिक महासागर, पूर्वेस सुरिनाम, दक्षिणेस ब्राझील व पश्चिमेस ब्राझील व व्हेनेझुएला आहेत. गुयाना आणि सुरिनाम यांच्या सीमेवर कॉरंटाइन नदी आहे. देशाचा समुद्रकिनारा सु. ४३२ किमी. आहे. १ उ. ते ९ उ. व ५७ प. ते ६१ प. यांदरम्यान हा देश आहे. जॉर्जटाउन ही राजधानी असून तिची लोकसंख्या ६६,०७० (१९७० अंदाज) व उपनगरांसह १,६७,०६८ आहे.

भूवर्णन : गुयानाची बहुतेक भूमी म्हणजे आर्कियन कालीन, सु. १५२ मी. उंचीचे पठार होय. हा स्फटिकी मंच तृतीयक व चतुर्थक काळांत समुद्राखाली दबला गेला. त्याच्या ग्रॅनाइटी बेटांपासून बनलेली पांढरी वाळू किनारी गाळमैदानाच्या दक्षिणेस आढळते. पुढे मंचाचे उत्थान होऊन तो समुद्राकडे कलला. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सोने व हिरे यांच्या शिरा व अतिक्षरणामुळे झालेल्या जांभ्या मृदेपासून मिळणारे बॉक्साइट हे होय.

गुयानाचे तीन स्वाभाविक विभाग पडतात. पहिला किनारी गाळमैदानाचा, दुसरा त्याच्या दक्षिणेचा टेकड्यांचा, ऊर्मिल, दाट वर्षावनांचा आणि तिसरा अगदी दक्षिणेचा व पश्चिमेचा डोंगराळ व सॅव्हाना पठाराचा. पहिला किनारी विभाग सु. १६ ते ६५ किमी. रुंद असून तो देशाची ७% भूमी व्यापतो परंतु येथेच देशातील ९०% लोकसंख्या केंद्रित झालेली आहे. यातील बराच भाग भरतीच्या पाणीपातळीच्या सरासरी १·५ मी. खाली असून पहिल्या डच वसाहतकऱ्यांनी त्यांच्या मायदेशातल्या अनुभवाने समुद्रकाठी भिंती उभारून, कच्छ वनस्पती व दलदली काढून टाकून तो प्रदेश शेतीयोग्य केला आहे. सरासरी २०० सेंमी. हून अधिक पावसाचे वाहून येणारे पाणी काढून लावण्यासाठी चर खणून भिंतीत दारेही ठेवलेली आहेत. हाच देशाचा व्यापारी व शेतीविभाग असून राजधानी व प्रमुख शहरे याच भागात आहेत. गाळमैदानाच्या दक्षिणेचा डबरी जमिनीचा पट्टा सोडला म्हणजे १६० किमी. रुंदीचा विषुववृत्तीय वर्षावनांचा प्रदेश आहे. याने देशाचा सु. ८७% भूप्रदेश व्यापलेला आहे. देशाची बहुतेक वृक्षसंपत्ती व खनिजसंपत्ती याच भागात आहे. खाणींचे व लाकूडतोडीचे प्रदेश सोडले, तर या विभागात मूळच्या दक्षिण अमेरिकन इंडियनांची तुरळक वस्ती मोठ्या नद्यांच्या काठी आहे. तिसऱ्या पर्वतीय विभागात पश्चिमेस पाकाराइमा पर्वतराजी असून तिचे अत्युच्च शिखर रॉराइमा (२,८१० मी.) हे गुयाना, व्हेनेझुएला व ब्राझील यांच्या सीमेवर आहे. दक्षिण भागात कनूकू, मारूडी व आमूकू पर्वत असून दक्षिण सीमेवर अकाराई पर्वतश्रेणी आहे. पर्वतांच्या पायथ्याजवळच जी काही थोडी शेतीयोग्य जमीन आहे तेथे मूळचे इंडियन लोक फिरती शेती करतात. येथील रूपुनूनी पठारी भाग सॅव्हाना गवताचा असून तेथे गुरे पाळण्याचा व्यवसाय थोडाबहुत चालतो.

बॉक्साइट, हिरे, सोने व मँगॅनीज ही येथील प्रमुख खनिजे होत. त्यांशिवाय शिसे, जस्त, लोखंड, निकेल, तांबे यांचेही साठे आहेत. परंतु भांडवल व वाहतुकीची साधने यांच्या अभावी ते पडून आहेत.

एसक्वीबो ही सु. १,००८ किमी. लांबीची नदी देशाच्या जवळजवळ निम्म्या प्रदेशाचा जलवाहन करते तिला कूयूनी, मॅझरूनी, पोतारो, बुरॉ-बुरॉ, रूपुनूनी, कुयुविनी या प्रमुख उपनद्या मिळतात. पोतारोवर प्रसिद्ध काइअतुर धबधबा आहे तो १०७ मी. रुंद असून प्रथम सरळ २२६ मी. व नंतर पुन्हा २२ मी. खाली पडतो. याशिवाय कूयूनीवर कामारिया, डेमरारावर ग्रेट व कॉरंटाइनवर फ्रेडरिक विल्यम चौथा इ. धबधबे आहेत. डेमरारा ही ३२० किमी. ची नदी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असून मुखापासून १०४ किमी, नौकासुलभ आहे. तिच्या मुखाशी जॉर्जटाउन वसलेले आहे. गुयाना-सुरिनाम सीमेवरील कॉरंटाइन नदी ७६० किमी. लांब असून तिच्या मुखाशी गुयानाचे स्प्रिंगलॅंडस् व सुरिनामचे नीऊ निकेअरीअ ही बंदरे आहेत. बर्बीसच्या मुखाशी न्यू ॲम्स्टरडॅम आहे. देशाच्या वायव्य भागात आमापुरा, बारीमा, बाराम, वाइनी, मोरूका, पॉमरून इ. नद्या आहेत. गुयानातील नद्या उंच डोंगरांतून व दाट जंगलांतून येतात आणि त्यांच्यावर धबधबे व द्रुतवाह आहेत. यामुळे त्या किनाऱ्यापासून ६०–७० किमी.पर्यंतच नौसुलभ आहेत.

गुयानाचे हवामान उष्ण आणि दमट असून सरासरी तपमान सु. २६-२७ से. असते. त्यात चढउतार फारसा होत नाही. पाऊस १७५ ते २२५ सेंमी. पडतो. मलेरिया निर्मूलनामुळे हवा अनारोग्यकारक नसली, तरी लवकर थकवा आणणारी आहे. अगदी किनारी भागात ईशान्य व्यापारी वाऱ्यांमुळे ती काहीशी सुसह्य होते.

उष्ण हवा व ‘पाण्याचा देश’ या अर्थाचे देशाचे नाव सार्थ करण्याइतके पाऊसपाणी यांमुळे गुयानात समृद्ध विषुववृत्तीय वनश्री आहे. येथे जंगलांत जहाजे, धक्के वगैरेंसाठी लागणारे कठीण लाकूड देणारे वृक्ष, लाकडी सामानसुमानासाठी उपयोगी पडणारे विशिष्ट लाकूड देणारे वृक्ष, रबर, बलाटा इ. उपयुक्त वृक्ष भरपूर आहेत. ग्रीनहार्ट वृक्ष हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. गरुड, घुबड, कापूरपक्षी, शिंजिर, खंड्या, ढोक, आयबिस इ. विविध पक्ष्यांसाठी गुयाना प्रसिद्ध आहे. विषुववृत्तीय वर्षावनांतील समृद्ध प्राणिजीवनात मोठाली जनावरे नाहीत पण जॅगुअर, टॅपीर, आर्मडिले, ऑपोसम, मॅनॅटी, रानमांजर, मुंगीखाऊ, विविध प्रकारचे कीटक हे प्राणी आढळतात. तापीर हा येथील जमिनीवरील सर्वांत मोठा, ॲसिलोट हा सर्वांत क्रूर आणि माकडे व हरिणे हे सर्वांत अधिक संख्येने आढळणारे प्राणी होत. सर्पांपैकी ॲनाकोंडा हा अतिशय मोठा व बुशमास्टर हा अतिभयंकर आहे. सरडे पुष्कळ असून नद्यांतून इग्वाना आढळतो. शार्क, स्टिंगरेज, स्नॅपर व ग्रूपर हे मासे विशेष प्रमाणात आहेत.


इतिहास :  अमेरिकन इंडियनांच्या अनेक टोळ्या या देशात फार पूर्वीपासून राहत आल्या आहेत. कोलंबसने १४९८ मध्ये गियानाचा किनारा पाहिला होता परंतु सोन्याची लूट मिळण्याची असंभवनीयता व सुलभ संचाराच्या दृष्टीने देशाची दुर्गमता यांमुळे स्पॅनिश व पोर्तुगिज खलाशांनी या प्रदेशाकडे दुर्लक्ष केले. डचांच्या वस्त्या १६१६ पर्यंत प्रमुख नद्यांच्या काठी स्थिरावल्या होत्या. १६२१ मध्ये डच वेस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. गुलामांचा व्यापार वाढला व १६२४ मध्ये एसक्वीबो, बर्बीस व डेमरार नद्यांकाठी डचांच्या वसाहती स्थापन झाल्या. एल् डोरॅडोच्या गुप्त सोनेसाठ्याच्या आशेने काही यूरोपीय अंतर्भागात जाऊ लागले परंतु किनारी प्रदेशाच्या सुपीक जमिनीचे आकर्षणही वसाहतकऱ्यांना जाणवू लागले १७०० च्या पूर्वीच ऊसमळे, आफ्रिकी निग्रो गुलामांच्या श्रमांवर भरभराटू लागले. डचांनी कौशल्याने किनारी प्रदेश ऊर्जितावस्थेस आणला. मग १७८१ मध्ये चाचेगिरी करणाऱ्या इंग्रज खलाशांनी हा प्रदेश बळकावला आणि जॉर्जटाउनची स्थापना केली. पुढच्याच वर्षी फ्रेचांनी प्रदेश जिंकला. १७८४ ते १७९६ व १८०२-०३ मध्ये पुन्हा डचसत्ता आली. परंतु पुनःपुन्हा ब्रिटिशांनी शस्त्रबळाने हा भाग घेतला. अखेर १८१४ मध्ये नेपोलियनी युद्धानंतरच्या प्रादेशिक वाटणीत हा प्रदेश पुरा ब्रिटिशांकडे आला. डचांची राजकीय व कायदेविषयक वैशिष्ट्ये कायम राखून ब्रिटिश गव्हर्नर जनरलचा अंमल सुरू झाला. १८३१ मध्ये एसक्वीबो, बर्बीस व डेमरारा या वसाहतींचा प्रदेश ब्रिटिशांकडे, कॉरंटाइन नदीच्या पूर्वेचा डचांकडे व अगदी पूर्वेचा फ्रेंचांकडे जाऊन ब्रिटिश गियाना हा राजकीय विभाग अस्तित्वात आला. तेथे इंग्रजांचे वसाहती राज्य सुरू झाले व त्याचा कारभार ऊसमळ्यांच्या हितसंरक्षणाच्या धोरणानेच चालू राहिला. कारभार गव्हर्नर जनरलकडे असला, तरी आर्थिक बाबींवर मळेवाल्यांचेच वर्चस्व होते. पुढे १९२८ मध्ये ब्रिटिश गियाना ही ब्रिटिश क्राऊन कॉलनी झाली व राजकीय आणि आर्थिक सत्ताही गव्हर्नर जनरलकडे आली. निबिड अरण्यांच्या  प्रदेशाचे व पर्वतप्रदेशाचे समन्वेषण फारसे पार पडू शकले नाही. पश्चिम सीमेवरील सु. दीड लक्ष चौ. किमी. प्रदेशावर व्हेनेझुएला हक्क सांगू लागला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या बाजूने मत व्यक्त केले असले, तरी अद्याप ही सीमावाद मिटलेला नाही. आग्नेयीकडील कॉरंटाइन व तिची उपनदी न्यू यांदरम्यानच्या सु. १५ हजार चौ.किमी. प्रदेशावर सुरिनाम हक्क सांगत आहे. तोही एक वादग्रस्त प्रश्न आहे.

१८३७ मध्ये गुलामगिरी नष्ट होताच मळ्यावरील आफ्रिकी कामगार तेथील काम सोडून शेती करू लागले. यामुळे मळेवाल्यांची मोठी पंचायत झाली. त्यांनी पोर्तुगीज व चिनी मजूर आणून पाहिले. परंतु त्यांनी छोटे व्यापारी, दुकानदार किंवा फेरीवाले हे व्यवसाय पतकरले. अखेर भारतातून करारबद्ध मजूर आणविले गेले. ते मात्र गुलामांसारखेच मळ्यांवर कष्टत राहिले. ऐंशी वर्षांत २,४०,००० हिंदी मजुरांची भरती झाली. १९१७ मध्ये तिच्याविरुद्ध प्रचंड हाकाटी झाल्याने ती बंद पडली. मायदेशीतील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींपासून अलग पडलेले हे हिंदी मजूर अज्ञानी, दरिद्री व मागासलेले राहिले परंतु शेतीत फारसे यशस्वी न झालेले मुक्त निग्रो मात्र शहरांकडे लोटले व तेथील शैक्षणिक सवलतींचा भरपूर लाभ घेऊन पुढारले. दोन भिन्न संस्कृतींच्या देशांतून एकाच कारणासाठी गुयानात आयात झालेल्या या दोन लोकसमूहांच्या जीवनपातळीतील हा फरक त्यांच्यातील भावी संघर्षणाचे बीज ठरला यात नवल नाही. वसाहतींना हप्त्याहप्त्यांनी स्वायत्तता देण्याच्या ब्रिटनच्या धोरणाप्रमाणे गुयानालाही १८९१, १९२८, १९४३, १९५३, १९५६ व १९६१ मध्ये सुधारणेचे हप्ते मिळाले. प्रथम काही हक्क राखून ठेवून थोडी अंतर्गत स्वायत्तता, नंतर संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता, निर्वाचित विधानसभेस जबाबदार मंत्रिमंडळ, जातिधर्मांवर विभागलेले निर्वाचन क्षेत्र, जातीय व वांशिक दंगली, नंतर अंतर्गत सुरक्षा व तथाकथित अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल साशंकता, वाटाघाटी व अखेर त्याबद्दल खास मर्यादा असलेली स्वायत्तता देणारे ब्रिटिश संसदमान्य संविधान या भारत-परिचित अवस्थानंतर २६ मे १९६६ पासून गुयानास स्वायत्त वसाहतीचा दर्जा मिळाला. २३ फेब्रुवारी १९७० रोजी गुयानाचे प्रजासत्ताक घोषित झाले व ब्रिटिश गव्हर्नर जनरलऐवजी अध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख झाला.

गुयानातील राष्ट्रीय वृत्तीचा उदय १९५० पासून दिसून येऊ लागला. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यास ईस्ट इंडियन म्हणजे प्रामुख्याने हिंदी लोकांचा नेता डॉ. चेद्दी जगन व निग्रोंचा नेता बॅ. फोर्बेस बर्‌नॅम यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पी.पी.पी.–पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टी–या पक्षाने १९२८ पासून निर्वाचित प्रतिनिधित्वासाठी जोपासली गेलेली, वंशभेदावर आधारली गेलेली तेढ बाजूला सारून १९५३ च्या नवीन संविधानाखाली २४ पैकी १८ जागा जिंकल्या व डॉ. जगन मुख्यमंत्री झाला. या पक्षाचे धोरण समाजवादी व वसाहतवादाविरुद्ध होते परंतु डॉ. जगन मार्क्सवादी आहे व त्याचे कित्येक अनुयायी साम्यवादी आहेत या सबबीवर ब्रिटनने संविधान स्थगित केले व कामचलाऊ तात्पुरत्या शासनाकडे कारभार सोपविला. भेदनीतीला यश येऊन १९५५ मध्ये बॅ. बर्‌नॅमनी वेगळा पी.एन्.सी.–पीपल्स नॅशनल काँग्रेस–पक्ष स्थापिला. तरीही १९५७ मध्ये पी.पी.पी. ने १४ पैकी ९ जागा जिंकल्या परंतु त्याला निर्णायक बहुमत मिळाले नाही. १९६१ च्या निवडणुकांत पी.पी.पी. २०, पी.एन्.सी. ११ व भांडवलदार आणि मळेवाले यांचा यू.एफ्.–युनायटेड फोर्स–या पक्षास ४ जागा मिळाल्या. डॉ. जगन पुन्हा मुख्यमंत्री झाला व त्याने गुयानाचे पहिले जबाबदार मंत्रिमंडळ बनविले. त्याने आपले धोरण काहीसे सौम्य केले, तरी १९६१–६४ पर्यंत देशात संप व दंगली यांचा धुमाकूळ माजून ब्रिटिश सैन्याला मदतीस बोलवावे लागले. १९६४ मध्ये ब्रिटिशांनी आपाती निर्वाचनपद्धतीची (प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची) नवीनच टूम काढली. तिच्यामुळे वंशभेद अधिकृत रीत्या स्पष्ट आणि कायम झाले. आता पी.एन्.सी. व यू.एफ्. यांची युती होऊन बॅ. बर्‌नॅम मुख्यमंत्री झाला आणि पी.पी.पी.वर अमेरिकेने व तेल कंपन्यांनी टाकलेला बहिष्कार उठला. १९६५ मध्ये लंडन येथे गुयानाच्या स्वातंत्र्यासाठी भरलेल्या परिषदेस डॉ. जगन व त्याचे अनुयायी उपस्थित राहिले. १९६६ मध्ये वसाहतीचे स्वराज्य मिळाल्यावर १९६८ च्या आपाती निर्वाचनपद्धतीच्या निवडणुकीत एकदली संसदेच्या ५३ जागांपैकी पी.एन्.सी.ला ३०, पी.पी.पी. ला १९ व यू.एफ्. ला ४ जागा मिळाल्या. निवडणुकांतील गैरप्रकारांबद्दल डॉ. जगनने तक्रारी केल्या, परंतु बर्‌नॅम पुन्हा मुख्य मंत्री झाला व मग १९७० मध्ये गुयाना स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र झाले. गुयानातील राष्ट्रवादाचा इतिहास म्हणजे शीतयुद्धाच्या पकडीत सापडलेल्या लहानशा दरिद्री देशाची कशी ससेहोलपट होते याचे करुणास्पद उदाहरण होय. यामुळेच बहुसंख्याकांच्या पी.पी.पी पक्षाच्या विरोधास न जुमानता आपाती निर्वाचनपद्धती अंमलात येऊन वांशिक भेद बळावले आणि पी.एन्.सी. व यू.एफ्. युती होऊन बर्‌नॅमशासन अधिकारावर येऊ शकले.


राजकीय स्थिती : गुयाना प्रजासत्ताकाचा अध्यक्ष बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्यास मंत्रिमंडळ बनविण्यास सांगतो. ५३ सदस्यांच्या एकदली, आपाती निर्वाचनपद्धतीने निर्वाचित संसदेची मुदत पाच वर्षे व संसदेने निवडलेल्या अध्यक्षांची सहा वर्षे आहे. सध्याचे संविधान १९६५ च्या लंडन स्वातंत्र्य परिषदेच्या ठरावांवर अधिष्ठित आहे. २१ वर्षांवरील साक्षर प्रौढास मताधिकार आहे. मतदार जागृत आहे.

देशाचे नऊ कारभारी विभाग आहेत. तेथीस स्थानिक स्वराज्य अधिकारी जिल्हा आयुक्तांच्या सल्ल्याने केंद्र सरकारशी समन्वय साधतात. किनारी प्रदेशाची गावे व विभाग यांत विभागणी केलेली असून त्या सर्वांच्यावर स्थानिक स्वराज्य मंडळ आहे. विस्तीर्ण अंतर्भागाच्या कारभारासाठी वेगळे खाते आहे. जॉर्जटाउन व न्यू ॲम्स्टरडॅम येथे महापौर आणि टाउन कौन्सिल यांच्या अधिकाराखालील नगरपालिका आहेत.

गुयाना संयुक्त राष्ट्रांचा व अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. तो दक्षिण अमेरिकेच्या इतर देशांपेक्षा कॅरिबियन देशांशी अधिक संबंधित आहे. कॅरिबियन फ्री ट्रेड एरिया ॲग्रिमेंट–सी.ए. आर्. आय्. एफ्.टी.ए.चा बार्बेडोस व अँटिग्वा यांप्रमाणे तो कार्यकारी सभासद आहे. शेतीचे तंत्र, शैक्षणिक सवलती, शासकीय संघटना इत्यादींसाठी त्याने ब्रिटन, अमेरिका, कॅनडा वगैरेंमधून तांत्रिक व आर्थिक साहाय्य मिळविले आहे. देशाची खनिज व जंगल संपत्ती आणि जलविद्युत् विकास यांच्या पाहणीसाठी संयुक्त राष्ट्रांनी खास कार्यक्रम हाती घेतला आहे. १९७२ पासून गुयानाने रशिया व चीन यांच्याशीही जवळीक साधली असून आफ्रिकी स्वातंत्र्य सैनिकांस रोख मदत, जिंकलेल्या प्रदेशातून इझ्राएलने व आग्नेय आशियातून परकी सैन्याने माघार घेण्याच्या धोरणास पाठिंबा, तसेच गुयाना, डोमिनिकन प्रजासत्ताक, ग्रेनेडा, सेंटकिट्स नेविस, सेंट लुसीया व सेंट व्हिन्सेंट यांच्या संयुक्त राज्याची योजना यांबाबत पावले टाकली आहेत. ब्रिटिश साखरधंदा किंवा अमेरिकन धातू उद्योग यांस धक्का न लावता कॅनेडियन डेमरारा बॉक्साइट कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले आहे. शासनाचे ९०% भांडवल असलेल्या गुयाना सहकारी बँकेकडे बँकव्यवसायाचे नेतृत्व देऊन परदेशी बँकाचे महत्त्व कमी केले आहे. गुयानाचे स्वतंत्र बिनतारी प्रक्षेपण केंद्रही सुरू झाले आहे.

न्यायपद्धती भारताप्रमाणेच असून इंग्रजांचा सामान्य कायदा व जमीनमालकीबाबत रोमन-डच कायदा प्रचलित आहे. देशाचे आठ न्यायविभाग असून प्रत्येकावर एक प्रमुख न्यायाधीश असतो. सर्वांत वरिष्ठ न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे आहे.

संरक्षणाची जबाबदारी गुयाना सुरक्षा दलाकडे आहे आणि एका स्त्रीपथकासह त्याचे एकूण बळ सु. २,२०० आहे. लहानसे आरमार नुकतेच उभारले जात आहे. अमेरिकेला १९४० मध्ये डेमरारा आणि एसक्वीबो नद्यांकाठी लष्करी तळास जागा दिली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अमेरिकेने ते परत केले आहेत. एसक्वीबो नदीकाठचा ॲटकिन्सन फील्ड हा तळ आता गुयानाच्या नागरी हवाई वाहतुकीसाठी व आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून वापरला जात आहे. दीड हजार पोलिसांचे व स्वयंसेवकांचे अंतर्गत सुरक्षादल आहे. लोकांच्या तक्रारींची दाद लवकर लागावी म्हणून लोकपालाची तरतूद आहे.

आर्थिक स्थिती : कृषी हाच देशाच्या आर्थिक धोरणाचा पाया आहे. देशाची फक्त ६·५% भूमी लागवडीखाली असून ती किनरापट्टीत आहे. तेथे मुख्यतः ऊस, भात व नारळ यांचे उत्पादन होते. त्यांशिवाय कॉफी, कोको, मका, कॅसाव्हा, लिंबू जातीची व पेरू, चेरी, ॲव्हाकॅडो, पोपई, अननस इ. फळे, काही गुरेढोरे व कोंबडी-बदके यांचेही उत्पादन होते. भातशेतीची वाढ, यंत्रशेतीचा वाढता वापर यांमुळे गुरांची संख्या कमी होत जाते. त्यांच्या चांगल्या पैदाशीचे प्रयत्न होत आहेत. १९७२ च्या अंदाजाप्रमाणे गुरे २,६०,००० मेंढ्या १,००,००० डुकरे ८०,००० शेळ्या ३०,००० घोडे, खेचरे व गाढवे ६,००० व कोंबडी-बदके ८० लक्ष होती. येथील शेती सोपी नाही. जमीन उथळ असून भारी पावसामुळे तिच्यातील खनिजद्रव्ये निचरून जातात. किनारपट्टीत समुद्राचे आक्रमण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांस तोंड द्यावे लागते. अंतर्भागात वाहतुकीच्या साधनांच्या अभावी शेती शक्य होत नाही. गवताळ प्रदेशातही फारशी गुरे पोसता येत नाहीत.

खनिजांची निर्यात हा अर्थव्यवस्थेचा दुसरा आधार आहे. मुख्यतः बॉक्साईट व मग मँगॅनीज, सोने, हिरे, ‌‍ॲल्युमिनियम निर्यात होतात. येथील बॉक्साइटचा साठा हा जगातील प्रमुख साठ्यांपैकी एक आहे. बॉक्साइटच्या जागतिक उत्पादनात गुयानाचा क्रमांक तिसरा आहे. याची केंद्रे डेमरारावरील मॅकेंझी व बर्बीसवरील क्वाक्वानी ही आहेत. वायव्य भागात मँगॅनीजच्या खाणी १९६० पासूनच सुरू झाल्या आहेत. सोने व हिरे यांचे उत्पादन मागे पडत आहे. इमारती लाकूडही अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहे. परंतु जंगलांचा फक्त २०% भागच काहीसा सुगम आहे.

गुयानाचे चलन गुयाना डॉलर हे आहे. एप्रिल १९७४ मध्ये २·२१ गु. डॉ.= १ अमेरिकन डॉलर व ५·२१ गु. डॉ.= १ ब्रिटिश पौंड असा विनिमय दर होता. नोव्हेंबर १९६७ च्या अवमूल्यनापूर्वी १ गु. डॉ.= ०·५९ अमे. डॉ. होता. १, ५, १०, २० गु. डॉ. च्या नोटा व १, ५, १०, २५, ५० सेंटची नाणी असतात. २७ सप्टेंबर १९७१ रोजी १·९४ गु. डॉ. = १ अमे. डॉ. होता. १९७२ च्या अर्थसंकल्पात २०·१३ कोटी गु. डॉ. जमा व २२ कोटी गु. डॉ. खर्च अंदाजलेला होता. १९७३ मध्ये अनुक्रमे ३१·२ कोटी व ३१·८ कोटी गु. डॉ. चा अंदाज होता.

१९७२ मध्ये २९,७८,८१,००० गु. डॉ. ची आयात आणि २९,५३,००० गु. डॉ. ची निर्यात झाली. पैकी ब्रिटनकडून ३१%, अमेरिका २४%, कॅरिफ्टा प्रदेश १५%, कॅनडा ५% अशी प्रमुख आयात झाली. अमेरिका २६%, ब्रिटन २४%, कॅरिफ्टा प्रदेश १७% व कॅनडा ११% अशी निर्यात झाली. अगदी अलीकडे भारतातूनही मालमोटारीसारखी काही आयात होऊ लागली आहे. निर्यातीत बॉक्साइट ३४%, साखर २७%, ॲल्युमिना १७ %, तांदूळ ७% होते. आयात मुख्यतः यंत्रे, वाहतुकीची साधने, कारखानदारी माल, अन्नपदार्थ, रसायने, खनिजे, इंधने, वंगणे, प्राणिज व वनस्पतिज तेले आणि चरबी, मद्ये, तंबाखू, कापड, पादत्राणे, दुग्धपदार्थ इत्यादींची होते, तर निर्यात साखर, रम, तांदूळ, इमारती लाकूड, हिरे, बॉक्साइट, ॲल्युमिना, साखरेची मळी, कोळंबी इत्यादींची होते.

बॅंक ऑफ गुयाना ही मध्यवर्ती बँक असून ब्रिटिश, अमेरिकी, कॅनेडियन व एक भारतीय (बँक ऑफ बरोडा) अशा व्यापारी बँका आहेत. शेती व उद्योगधंदे यांस बँका मदत करतात. पोस्टाची बचतबँक आहे. विमाक्षेत्रात १९६९ मध्ये ३७ विमाकंपन्या काम करीत होत्या.

साखर, बॉक्साइट व तांदूळ यांवरील प्रक्रिया हे सध्या प्रमुख उद्योग आहेत. लाकूड कापणे, बोटी बांधणे, बंदरावरील काम यांतही बरेच कामगार आहेत. कुशल कामगारांचा तुटवडा असला, तरी व्यावसायिक शिक्षणावरील भरामुळे तो कमी होत आहे. सर्वांत अधिक कुशल व उच्च वेतन मिळविणारे कामगार बॉक्साइटच्या धंद्यात आहेत, तर संख्येने सर्वांत जास्त कामगार साखरउद्योगात आहेत. गुयानात कोळसा, तेल वगैरे शक्तिसाधने नाहीत पण जलविद्युत् विकासाला भरपूर वाव आहे. १९६९ मध्ये २,९२,००० किवॉ. ता. वीज उत्पन्न झाली. ऊसमळे व खाणी येथे खाजगी वीज उत्पन्न होते. शासनाचे आर्थिक धोरण बॉक्साइट, साखर व तांदूळ यांवरील अवलंबनाचा भार कमी करून केळी, कातडी सामान, मांस, फळे इ. उत्पादनांस प्रोत्साहन देण्याचे आहे. अमेरिका, कॅनडा व ग्रेट ब्रिटन यांनी गुयानाच्या उद्योगधंद्यांत मोठे भांडवल गुंतवलेले आहे व त्यामुळे त्यांचे वर्चस्व चांगलेच जाणवण्याजोगे आहे.


वाहतुकीच्या सोयी ही गुयानामधील एक मोठी समस्या आहे. बहुतेक भार जलमार्गांवरच आहे. समुद्रमार्गे शेजारच्या आणि कॅरिबियन व अटलांटिकवरील देशांशी वाहतूक होते. डेमरारा, एसक्वीबो, बर्बीस वगैरे नद्यांतून सु. ३६२ किमी. वाहतूक होते. छोट्या होड्या, यंत्रसज्ज होड्या वगैरेंतून किनारी, नदीमुखांजवळ व अंतर्भागातही थोडी वाहतूक होते. डेमरारावरील मॅकेंझी व बर्बीसवरील एव्हर्टन येथे बॉक्साइट व कायटुमा येथे मँगॅनीज बोटींवर चढविले जाते. एसक्वीबोवर अनेक ठिकाणी इमारती लाकूड भरले जाते. कॉरंटाइनवरील स्प्रिंगफील्ड येथे सुरिनामच्या प्रवाशांची ये-जा होते व जॉर्जटाउनला तांदूळ रवाना होतो. बहुतेक व्यापार जॉर्जटाउनमधून होतो. न्यू ॲमस्टरडॅम हे त्याखालोखाल महत्त्वाचे आहे.

गुयानात अगदी थोडे लोहमार्ग आहेत. जॉर्जटाउन ते न्यू ॲमस्टरडॅम हा ईस्ट कोस्ट रेल्वेचा प्रमाणमापी सु. ९७ किमी.चा व जॉर्जटाउन ते एसक्वीबोवरील पारीका हा अरुंदमापी सु. ३० किमी.चा वेस्ट कोस्ट रेल्वेचा मार्ग एवढेच. बॉक्साइट खाणीभागात सु. १२८ किमी. व मँगॅनीज खाणीभागात अगदी थोडा असे खाजगी लोहमार्ग आहेत. डेमरारा नदीवर १९६७ मध्ये पूल झाला आहे.

एकूण १,७७० किमी. रस्त्यांपैकी ४८२ किमी. डांबरी किंवा काँक्रीटचे आहेत. ते सर्व किनारी भागात आहेत. गुयानातून दुसऱ्या कोणत्याही देशात जाणारे येणारे रस्ते नाहीत. गवताळ भागांतून गुरांसाठी ६४४ किमी. पायरस्ते आहेत. जंगल, खाणी व गवती विभागातील रस्त्यांवर बार्टीका, इसानो, टाकामा, अन्नाई इ. गावे आहेत. १९७१ अखेर प्रवासी व मालमोटारी, ट्रॅक्टर, ट्रेलर व मोटारसायकली मिळून ४४,११० वाहने होती.

प्रदेशाच्या दुर्गमत्वामुळे विमानवाहतुकीस महत्त्व आहे. जॉर्जटाउनजवळचा ॲटकिन्सन फील्ड (आना टिमेरी) हा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देशात ठिकठिकाणी विमानांसाठी धावपट्ट्या आहेत. जलाशयांवर जलयाने उतरविता येतात. पॉमरून खोऱ्यातून मोसंब्याचा रस व गवती प्रदेशांतून मांस यांची वाहतूक आता विमानांतून होते.

तारायंत्र, दूरध्वनी, रेडिओ व पोस्ट ही संपर्कसाधने उपलब्ध आहेत. १९७२ मध्ये देशात १२,९१३ दूरध्वनी यंत्रे, १४७ टपालकचेऱ्या, अंतर्भागात ८ तारकचेऱ्या होत्या. परदेशी तारा व रेडिओ टेलिफोनची सोय आहे. जॉर्जटाउनमध्ये मध्यवर्ती रेडिओ केंद्र असून शासकीय व खासगी मिळून ६१ रेडिओ संपर्क केंद्रे आहेत. एक खासगी कंपनीचे आणि एक शासकीय व्यापारी प्रक्षेपण केंद्र आहे. तपांबरीय प्रकीर्णन प्रणालीनेही (ट्रॉपॉस्फेरिक स्कॅटर सिस्टिम) जगाशी संबंध राखला जातो.

लोक व समाजजीवन : गुयानाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. जून १९७० च्या अंदाजाप्रमाणे ती ७,४०,१९६ असून त्यांत ३,७७,२५६ ईस्ट इंडियन व २,२७,०९१ आफ्रिकी निग्रो आहेत. १९६४ मध्ये लोकसंख्येतील ५०·२% ईस्ट इंडियन, ३१·३% निग्रो, ११·९ % मिश्रवंशीय मेस्तिझो व मुलेट्टो, ४·६ % अमेरिकन इंडियन, १% पोर्तुगीज आणि इतर यूरोपीय व चिनी प्रत्येकी १ टक्क्यांहून कमी अशी वाटणी होती. १८३८ ते १९१७ या काळात आणलेल्या भारतीयांपैकी १६% मुस्लिम होते आणि बाकीचे शेतकरी व कामकरी वर्गांतील हिंदू होते. हे ‘ईस्ट इंडियन’ व त्यांचे वंशज यांचा गुयानाच्या समाजात सर्वात मोठा गट आहे. निग्रो बहुतेक सर्व ख्रिस्ती आहेत व ईस्ट इंडियनांत आणि अमेरिकन इंडियनांतही काही ख्रिस्ती आहेत. परंतु ईस्ट इंडियनांशी विवाह, अंत्यसंस्कार, मुलांची जोपासना, नातेवाइकांशी संबंध, जाती इ. संस्कृतिवैशिष्ट्येच इतरांपेक्षा भिन्न असल्यामुळे ते आफ्रिकी लोकांप्रमाणेच यूरोपीय संस्कृतीच्या वर्चस्वाखाली गेलेले नाहीत. यामुळे सर्वांस समान नागरिकत्वाचे हक्क असूनही व इंग्रजी हीच सर्वांची प्रचलित भाषा असूनही ईस्ट इंडियनांना सर्वांत जास्त अडचणी व गैरसोयी सोसाव्या लागल्या आहेत. त्यांच्यापैकी बहुसंख्य मळेमजूरच राहिले. परंतु आफ्रिकी लोक मात्र शहरात जाऊन शिक्षण, आधुनिक जीवन, कामगार संघटना वगैरेंमुळे अधिक पुढारले. या दोन गटांतील वैमनस्य अनेक वेळा उग्र रूप धारण करते. प्रचलित राज्यव्यवस्थेमुळे हे गट वेगळेच राखले जातात. अमेरिकन इंडियनांच्या अनेक टोळ्या असून त्यांची संख्या १९५१–६० यांदरम्यान (२९,५००) पूर्वीच्या तिप्पट झाली. त्यांच्यासाठी राखीव क्षेत्रे असली, तरी त्यांनी तेथेच राहिले पाहिजे अशी सक्ती नाही. दगडी हत्यारे, मातीची भांडी, टोपल्या इ. तयार करणे, मासे पकडणे, शिकार, काही ठिकाणी फिरती शेती हे त्यांचे व्यवसाय आहेत. पोर्तुगीज व चिनी यांच्या संख्येच्या मानाने त्यांचे वर्चस्व जाणवण्यासारखे आहे. ते छोटी व फिरती दुकानदारी करतात. शहरांतून बेकारी बरीच आढळते. पूर्वीच्या गुलामगिरीचे अवशेष म्हणूनच काय, त्यांच्यात जंगलात किंवा इतरत्र जाऊन धाडसाने नवीन उद्योग करण्याची प्रवृत्ती कमी दिसते. त्याऐवजी शासनानेच आपल्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी धारणा दिसते. देशात विशीच्या आतील लोकसंख्या निम्म्याहून अधिक आहे. नवीन पिढी निरोगी व उल्हसित आहे. पुष्कळसे तरुण शिक्षणासाठी परदेशी जातात परंतु त्यांपैकी निम्मे परत येतच नाहीत. तरुणांस कामधंदा उपलब्ध न झाल्यास गुन्हेगारी वाढण्याचा संभव आहे. इतर अविकसित देशांच्या मानाने गुयानातील लोक अधिक साक्षर, शिक्षित व कमी दरिद्री आहेत. इतर देशांच्या आर्थिक जोखडातून मुक्त होण्याची त्यांची धडपड चालू आहे.

सहा ते चौदा वर्षे वयाच्या मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. १९७० मध्ये साक्षरता ८६% होती. १९७२ मध्ये गुयानात ३९० प्राथमिक शाळांतून १,३०,६७१ विद्यार्थी व ३,९८५ शिक्षक होते. ८० शाळा दूर अंतर्भागात होत्या. १५८ शासकीय व २३१ अनुदान घेणाऱ्या होत्या. माध्यमिक शाळा शासकीय ३१, अनुदान घेणाऱ्या १३ व खाजगी ५० होत्या. १९६७–६८ मध्ये माध्यमिक शाळांतील विद्यार्थी ४९,१६३ व शिक्षक १,७४१ व्यावसायिक शाळांतील विद्यार्थी १७,१७१, शिक्षक ११५ शिक्षक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थी ५६१ व शिक्षक ३९ उच्च शिक्षणाचे विद्यार्थी ५,९७५, शिक्षक ६३ होते. शिक्षणासाठी रेडिओचा चांगला उपयोग केला जातो. क्वीन्स कॉलेज (१८४४) व कार्नेगी स्कूल ऑफ होम इकॉनॉमिक्स या सुप्रतिष्ठित संस्था आहेत. जॉर्जटाउन येथे गुयाना विद्यापीठ ऑक्टोबर १९६३ मध्ये स्थापन झाले. त्यात नोव्हेंबर १९७२ मध्ये १,११२ विद्यार्थी होते त्यांपैकी ८६६ पदवी शिक्षणक्रम घेतलेले होते. एकूण शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे.

गुयानात हिवताप व इतर अनेक रोगांचे निर्मूलन आणि नियंत्रण झाले असल्यामुळे सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती चांगली आहे. १९६९ मध्ये ३८६ लोकांमागे एक रुग्णशय्या व ३,००० लोकांमागे एक डॉक्टर होता. आरोग्यावर मोठा खर्च होत असून ग्रामीण भागात आरोग्यकेंद्रे, रुग्णालये, आरोग्यशिक्षण प्रसार, शुद्ध पाणीपुरवठा इ. सुधारणा वाढत आहेत.

समाजकल्याणाच्या योजना शासकीय व खाजगी स्तरांवर चालू आहेत. वृद्ध, अपंग व मुले यांस साह्य दिले जाते. प्रसूती व शिशुसंगोपन यांसाठी सवलती आहेत. घरबांधणीसाठी कर्जे व देखरेख यांची सोय आहे. देशात सु. ६०० सहकारी संस्था आहेत.

जॉर्जटाउन येथे मोफत सार्वजनिक वाचनालय व संग्रहालये आहेत. १९६९ मध्ये एकूण ८६,००० खपाची गुयाना ग्राफिक, ईव्हनिंग पोस्ट  व मिरर  ही तीन दैनिके, आठ रविवारची वृत्तपत्रे व एकूण १,३५,००० खपाची साप्ताहिके, पाक्षिके, मासिके व इतर नियतकालिके आहेत. १९७२ मध्ये ३९,७४५ प्रेक्षकांची सोय करणारी एकूण ४९ चित्रपटगृहे होती.

शासकीय भाषा इंग्रजी असली आणि प्रमुख भाषा इंग्रजी व हिंदी या असल्या, तरी डच, फ्रेंच, हिंदी व काही आफ्रिकी शब्दांचे मिश्रण होऊन गुयानातील लोकांची स्वतःची इंग्रजी बोलीभाषा ‘क्रेओलिज’ म्हणून तयार झाली आहे. एडगर मिट्टेल होल्स्टर हा कादंबरीकार, ए. जे. सेमोर, मार्टिन कार्टन, जॅनकॅरा, विल्सन हॅरिस वगैरे कवी गुयानाच्या कथा व आकांक्षा शब्दांकित करीत आहेत. चित्रकारांत डेविस विल्यम्स उल्लेखनीय आहे.

महत्त्वाची स्थळे : जॉर्जटाउन या राजधानीखेरीज न्यू ॲमस्टरडॅम, मॅकेंझी, स्प्रिंगलँड्‌स, बार्टीका, पारीका, रॉकस्टोन इ. ठिकाणे महत्त्वाची आहेत. गुयानातील डोंगर, नद्या, अरण्ये, पशुपक्षी इ. सृष्टिसौंदर्याची पर्यटकांना अद्याप पुरेशी माहिती नाही आणि त्यासाठी आवश्यक ती वाहतुकीची साधने आणि सुखसोयीही उपलब्ध नाहीत. मात्र पोतारोवरील प्रसिद्ध काइअतुर धबधबा हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.

शहाणे, मो. ज्ञा. कुमठेकर, ज. ब.


गुयानापोतारो नदीवरील काइअतुर धबधबाराजधानी जॉर्जटाउन