तूकूमान : (सान मीगेल दे तूकूमान). अर्जेंटिनातील तूकूमान प्रांताच्या राजधानीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३,६६,००० (१९७०). हे प्रथम १५६५ मध्ये स्पॅनिश गव्हर्नर द्येगो दे व्हिलारोएल याने इबातीनजवळ रीओ देल तेहार नदीकाठी वसविले होते पण पुरामुळे स्थलांतर करून ते आजच्या जागी रीओ साली नदीकाठी १६८५ मध्ये पुन्हा वसविले. बोलिव्हियातील चांदीच्या खाणींच्या मार्गावरच असल्याने हे महत्त्वाचे आहे. जनरल मॅन्यूएल बेलग्रानोने २४ सप्टेंबर १८१२ रोजी स्पॅनिश राजनिष्ठांचा येथे पराभव केला. तसेच जुलै १८१६ रोजी अर्जेंटिनाचे स्वातंत्र्य येथेच जाहीर करण्यात आले. हे दळणवळणाच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी आहे. लोहमार्गाची सोय व ऊसाचे उत्पादन यांमुळे शहराचे व्यापारी दृष्ट्या महत्त्व वाढले असून येथे साखरेची मोठी बाजारपेठ आहे. सौम्य हवामान व सृष्टीसौंदर्यामुळे यास ‘प्रजासत्ताकाचे उद्यान’ म्हणतात. पर्यटन व्यवसायाकडे उत्पन्नाच्या दृष्टीने जास्त लक्ष पुरविले जात आहे. राष्ट्रीय विद्यापीठ, कॅथीड्रल, विविध प्रकारची वस्तुसंग्रहालये, सरकारी कार्यालय व बिशप कोलोंब्रेस याचा वाडा ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

शहाणे, मो. ज्ञा.