बांकुरा : प. बंगाल राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७९,१२९ (१९७१). हे कलकत्त्याच्या वायव्येस सु १५३ किमी. वर द्वारकेश्वरी व गंधेश्वरी या नद्यांच्या दुआबात वसले आहे. इ. स. १६३९ च्या सुमारास बांधलेले रघुनाथाचे मंदिर, ही येथील सर्वांत जुनी वास्तू होय. येथील बांकुराय नावाच्या एका रहिवाशावरून शहरास ‘बांकुरा’ हे नाव पडले असावे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात त्यास ‘बाकूदा’ किंवा ‘भांकूराह’ म्हणत. १७६५ मध्ये कंपनाच्या सैन्याचा तळ येथे होता. १८६९ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. ग्रँड ट्रंक रोड तसेच दक्षिण–पूर्व रेल्वेच्या खरगपूर–आद्रा-टाटानगर शाखेवर हे वसलेले आहे. रस्त्यांनी तसेच बांकुरा–दामोदर रिव्हर रेल्वेने हे शहर इतर प्रदेशांनी जोडलेले आहे. शहरात गहू, तांदूळ, मका, हरभरा, मोहरी, बटाटे, ऊस, तेलबिया, लाख, कापड यांचा व्यापार चालतो. तेल व भातसडीच्या गिरण्या या प्रमुख उद्योगांशिवाय कापड विणणे, कातडी वस्तू व धातुसामान निर्मिती इ. उद्योगही येथे चालतात. ‘टसर’ रेशीम उत्पादनासाठी बांकुरा प्रसिद्ध आहे. येथे रेल्वे कर्मशाळाही आहे. १९०२ पासून येथे मेथडिस्ट चर्चकडून कुष्ठरोग्यांसाठी एक दवाखानाही चालविला जात आहे. शहरात महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सोयी उपलब्ध आहेत. शासकीय केंद्र, लोहमार्ग, वाहतुकीची साधने, तांदूळ व इतर कृषि-उत्पादनांनी समृद्ध असलेला पृष्ठप्रदेश व ख्रिस्ती मिशनरी संस्था इ. प्रमुख घटक शहराच्या विकासाला कारणीभूत ठरले आहेत.

चौधरी. वसंत