स्ट्रॅटफर्ड ऑन ॲव्हन येथील ख्रिस्ती मठ

स्ट्रॅटफर्ड ऑन ॲव्हन : ( स्ट्रॅटटफर्ड ). ग्रेट ब्रिटनच्या वॉरिक परगण्यामधील प्रसिद्ध शहर. लोकसंख्या २५,५०५ (२००७). जगप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक ⇨ विल्यम शेक्सपिअर याचे जन्मस्थळ. त्याच्या वास्तव्यामुळे हे शहर प्रमुख पर्यटनस्थळ बनले असून ते बर्मिंगहॅमच्या दक्षिणेस ३५ किमी. व लंडनच्या वायव्येस १४६ किमी.वर ॲव्हन नदीकाठी वसलेले आहे. हे शहर रोमन वसाहतीचे व कृषिप्रदेशाचे केंद्र होते. ६९३ च्या सुमारास येथे एक ख्रिस्ती मठ स्थापन करण्यात आला होता. तेराव्या शतकात या शहराचा व्यापारी पेठ म्हणून विकास झाला. १५५३ मध्ये याचे स्वयंशासित बरोमध्ये रूपांतर झाले. १५६४ मध्ये विल्यम शेक्सपिअर याचा जन्म येथील हेन्ले रस्त्यावरील लहानशा घरात झाला होता. ते घर शेक्सपिअरचे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेले आहे. येथील नव्याने बांधलेल्या शेक्सपिअर स्मारकात ग्रंथालय, कलाविथी (१८८१) व थिएटर आहे. १९२६ मध्ये लागलेल्या आगीमुळे या थिएटरची हानी झाली होती. तदनंतर थिएटरची पुनर्बांधणी करून ‘ रॉयल शेक्सपिअर थिएटर ’ या नावे हे सुरू करण्यात आले (१९३२). २३ एप्रिल हा शेक्सपिअरचा जन्मदिन व मृत्युदिन असल्यामुळे हाच दिवस १७६९ पासून त्याचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त येथे दरवर्षी मार्च ते ऑक्टोबरपर्यंत साहित्य महोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवात येथील रॉयल शेक्सपिअर थिएटरमध्ये शेक्सपिअरची नाटके सादर केली जातात.

येथे बिरनिर्मिती, फळे डबाबंद करणे, ॲल्युमिनियमाच्या वस्तू निर्माण करणे इ. उद्योग चालतात. शेतमालाची बाजारपेठ म्हणूनही यास महत्त्व आहे. ॲव्हन नदीतून होणाऱ्या जलवाहतुकीमुळे अलीकडे शहराची भरभराट झाली आहे. येथील होली ट्रिनिटी चर्च, शेक्सपिअरचा अर्धपुतळा, गिल्ड हॉल, गिल्ड चॅपेल, ग्रामर स्कूल ( जेथे शेक्सपिअरने शिक्षण घेतले असे मानतात ), कॉम्प्टन बिज ( पंधरावे शतक ), न्यू प्लेस व एलिझाबेथ उद्यान इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.