कृष्णा-वेण्णेचे संगमस्थान, माहुली

माहुली : महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. ते सातारा शहराच्या पूर्वेला सु. ५ किमी. वर कृष्णा आणि वैण्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्या २,९३५ (१९८१) होती. संगमाच्या पूर्वेकडील वस्तीला ‘क्षेत्र माहुली’ आणि पश्चिमेकडील वस्तीला ‘संगम माहुली’ अशी नावे आहेत. गावाजवळून पुणे-मिरज लोहमार्ग गेल्यामुळे माहुली हे सातारा शहराचे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक बनले आहे. दोन्ही माहुलींचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. क्षेत्र माहुलीवर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत आदिलशाहीचा अंमल होता त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली ती गेली. छ. राजारामाने क्षेत्र माहुली प्रभुणे कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिली. छत्रपती शाहूंच्या वेळी (कार. १७०७–४९) व उत्तर पेशवाईत त्याचे महत्त्व वाढले. छ. शांहूनी ग्रहणादिनी श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांस संगम माहुलीचे दान केले (१७२०). पंतप्रतिनिधी, मामा पेठे, ज्योतिपंत भागवत, परशुराम अनगळ, कृष्णा दीक्षित व राजघराण्यातील राण्या यांनी तेथे सु. दहा मंदिरे, मुख्यतः अठराव्या शतकात बांधली. त्यांपैकी विश्वेश्वर महादेव, बिल्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर, कृष्णेश्वर महादेव, कृष्णाबाई इ. प्रसिद्ध असून विश्वेश्वर महादेव हे मंदिर सर्वांत मोठे आहे. ही मंदिरे मराठा वास्तुशैलीतील असून चुनेगच्ची सभास्तंभ, शिखर आणि कोनाड्यांतून मूर्तिकाम आढळते. क्वचित काही ठिकाणी भित्तीचित्रे आहेत. त्यांतील लक्ष्मीचे चित्र सुरेख आहे. चुनेगच्चीतील मूर्तीत प्रामुख्याने दशावतार, शंकरपार्वती आणि शैव परिवारातील देव-देवता, प्राणी इ. आढळतात. बहुतेक मंदिरे नदीकाठावर असून येथील दोन दीपमाळा रेखीव व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी बांधीव घाट व पायऱ्या आहेत. छ. शाहू पेशवे, पंतप्रतिनिधी, पंतसचिव हे स्नानासाठी प्रसंगोपात्त या स्थळास भेटी देत. उत्तर पेशवाईतील इतिहासप्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे या न्यायाधीशाची माहुली ही जन्मभूमी. निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी येथेच व्यतीत केले. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीने एक इमारत बांधली असून रामशास्त्रीच्या वारसांनी त्यांच्या नावे सामाजिक न्यायासाठी एक पुरस्कार १९८४ पासून सुरू केला आहे. दुसरा बाजीराव व जॉन मॅल्कम यांची भेट व बोलणी तिसऱ्या निर्णायक इंग्रज-मराठे युद्धापूर्वी (खडकीचे युद्ध) येथेच झाली. माहुलीला शेवटच्या श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. कन्यागतात येथे अनेक लोक संगमावर स्नानांसाठी जमतात. छत्रपती घराण्यातील छ.शाहू त्यांची राणी सकवरबाई, कुत्रा खंड्या यांच्या येथे समाध्या आहेत.

संदर्भ : 1. Govt. of Maharashtra, Maharashtra State Gazetteers: Satara District, Bombay, 1963. 

             2. Parasnis, D. B. Satara: Brief Notes, Bombay, 1909.

देशपांडे, सु. र.