तूगेला : द. आफ्रिका प्रजासत्ताकाच्या नाताळ प्रांतातील सर्वांत लांब (५०२ किमी.) नदी. ही ड्रेकन्सबर्ग पर्वतात लेसोथोच्या सरहद्दीवर माँटोसूर्स या ३,२९९ मी. उंच शिखराजवळ उगम पावून तूगेला फॉल्स या द्रुतवाह श्रेणीवरून एका उडीत ४११ मी. व एकूण ९४५ मी. खाली येते आणि लेडीस्मिथ खोऱ्यात उतरते. कोलेन्सोच्या खाली अरूंद, खोल घळईवजा खोऱ्यातून जेमिसन ड्रिफ्टजवळ ती रुंद खुल्या खोऱ्यात येते. मग पूर्वेकडील वालुकाश्म फोडून किनारपट्टीवर येऊन ती दरबानच्या उत्तरेस ८३ किमी.वर हिंदी महासागरास मिळते. वाळूच्या दांड्यामुळे या नदीचे मुख बंद असते आणि त्याच्या आतील खारकच्छातच फक्त थोडी वाहतूक चालते. बफालो व मूई या तूगेलाच्या प्रमुख उपनद्या आहेत. तूगेलामुळे फक्त ६,००० हे. जमीन सिंचाईखाली येते. मात्र आता तिच्या खोऱ्यात जलविद्युत्‌च्या आधारे औद्योगिक विकास वेगाने होऊ लागला आहे.

यार्दी, ह. व्यं. पाठक, सु. पुं.