स्केल्ट : फ्रान्स, बेल्जियम व नेदर्लंड्समधून वाहणारी व उत्तर समुद्रास मिळणारी नदी. लांबी ४३५ किमी. ही नदी फ्रान्सच्या एन विभागात, पिकार्डीतील सेंट मार्टिन या विहाराजवळच्या लहान सरोवरात उगम पावते. येथे या नदीस एस्को म्हणतात. उगमानंतर ही नदी साधारणतः उत्तर, ईशान्य व नंतर वायव्य या दिशेने बेल्जियममधील हेनो, ईस्ट फ्लँडर्स व अँटवर्प या प्रांतांतून वाहत जाऊन नेदर्लंड्समध्ये उत्तर समुद्रास मिळते. नेदर्लंड्समध्ये तिच्या नदीमुखाशी असलेल्या नॉर्थ बेव्हलाँट, साउथ बेव्हलाँट व वॉलकारन या बेटांमुळे हिचे दोन प्रवाह होतात. त्यास ओस्टर स्केल्ट व वेस्टर स्केल्ट असे म्हणतात. वेस्टर स्केल्ट हा प्रवाह ‘ द हॉट ’ या नावानेही ओळखला जातो. स्कॉर्प, लीस या डाव्या तिरावरून व डेन्डर, र्‍यूपल या उजव्या तिरावरून मिळणार्‍या हिच्या प्रमुख उपनद्या आहेत.

हिच्या आसमंतात शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण फ्लँडर्स मैदान, बेल्जियममधील कापड उद्योग, उत्तर फ्रान्समधील कोळसा क्षेत्र व लील–रूबे-तुरीकान उद्योगसमूह आहे. ही नदी कँब्रेपासून द सेंट-क्वेंटिन कालव्याद्वारे सॉम-सम, मॉन्स-काँडे कालव्याने सँब्रा-म्यूज नदीप्रणालीशी जोडली आहे. हिच्यापासून बेल्जियममध्ये सु. २०२ किमी. व फ्रान्समध्ये सु. ६३ किमी. जलवाहतूक होते. हिच्या ओस्टर स्केल्ट प्रवाहावर बांध घालून नेदर्लंड्सचे व्हलिसिंगेन हे शहर मुख्य भूमीशी लोहमार्गाने जोडलेले आहे. नदीमुखाशी होणार्‍या जलवाहतुकीमुळे फ्लेमिश व डच यांच्यात तंटे झाले होते.

दुसर्‍या महायुद्धात नदीमुखाशी असलेल्या वॉलकारन या बेटास विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. फ्रान्समधील कँब्रे, व्हालेन्सिएंझ, बेल्जियम-मधील तूर्ने, आउडानार्डा, गेंट, अँटवर्प व नेदर्लंड्समधील व्हलिसिंगेन, टेर्नाझन, ब्रेस्कन्स ही हिच्या किनार्‍यावरील प्रमुख शहरे आहेत.

गाडे, ना. स.