वैतरणा : महाराष्ट्र राज्याच्या नासिक व ठाणे जिल्ह्यांतून वाहत जाऊन पश्चिमेस अरबी समुद्राला मिळणारी नदी. लांबी सु. १५४ किमी. या नदीने नासिक जिल्ह्याच्या पश्चिम भागाचे व ठाणे जिल्ह्याच्या उत्तर भागाचे जलवाहन केलेले आहे. ही नदी नासिक जिल्ह्यात, सह्याद्रीच्या त्रिंबक-अंजनेरी डोंगररांगेच्या दक्षिण उतारावर उगम पावते. या नदीचे तीन मुख्य शीर्षप्रवाह असून ते नासिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील दापूरे गावाच्या उत्तरेस एकत्र येतात व तेथपासून वैतरणा नदीचा प्रवाह ठाणे व नासिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील थळघाटापर्यंत दक्षिणेस वाहत जातो. हा संपूर्ण प्रदेश खडकाळ व दऱ्याखोऱ्यांचा असल्याने या भागातून नदी अनेक वळणे घेत जाते. या मार्गात झारवड बुद्रुक (तालुका इगतपुरी) गावाच्या दक्षिणेस तिला उजवीकडून आळवंड नदी मिळते. या संगमानंतर वैतरणा नदी प्रथम आग्नेयीस, नंतर नैर्ऋत्येस व पुन्हा दक्षिणेस मोठे वळण घेते. या भागात तिने खोल निदरी तयार केली आहे. या प्रदेशात तिला मिळणाऱ्या प्रवाहांमुळे वैतरणेचा प्रवाह अखंड राहिला आहे. पुढे काही अंतर नासिक व ठाणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून गेल्यावर तिला डावीकडून भीमा ही एक लहान नदी मिळाल्यानंतर वैतरणा नदी थळघाटाजवळ एकदम पश्चिमेस वळून ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यात व्हीगाव येथे प्रवेश करते. पुढे वाडा तालुक्याच्या पश्चिम सरहद्दीवर ती एकदम उत्तरेस वळते व मनोर गावाजवळ पुन्हा नैर्ऋत्य व नंतर दक्षिण -वाहिनी होऊन पालघर तालुक्याच्या दक्षिणेला नवघर येथे वैतरणा खाडीद्वारा अरबी समुद्राला मिळते.

वैतरणा नदीच्या ठाणे जिल्ह्यातील पिंजळ, देहेरजा व सूर्या या महत्त्वाच्या तीन उपनद्या असून त्या तिला उजवीकडून अनुक्रमे आलमन (वाडा तालुका), दुर्वेस व साखरे (पालघर तालुका) या गावांजवळ मिळतात. याशिवाय वैतरणेला या जिल्ह्यात तानसा नदी डावीकडून वसई तालुक्यातील चिमणे येथे मिळते. अरबी समुद्रातून खाडीद्वारा सु. २५ किमी. आतापर्यंत वैतरणा नदी जलवाहतुकीस उपयुक्त ठरली आहे.

प्राचीन काळापासून या नदीला गोदावरी नदीप्रमाणे धार्मिक महत्त्व असल्याचे उल्लेख आढळतात. दख्खनच्या पूर्व व मध्य भागातील एक व्यापारी मार्ग म्हणून हिचे खोरे प्रसिद्ध असून याच्या दक्षिण भागातील सुपीक प्रदेश व निसर्गसौंदर्य यांमुळे आर्यांनी येथे वसाहती केल्याचे उल्लेख आढळतात. एक पवित्र नदी म्हणून हिचा महाभारतात उल्लेख आढळतो. गोदावरी व वैतरणा ही एकच नदी आहे, असा टॉलेमीचा समज झालेला दिसतो.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी नदी म्हणून, हिचे महत्त्व वाढले आहे. या नदीवर शहापूर तालुक्यात बांधण्यात आलेल्या मोडक धरणाचा `मोडक सागर’ हा जलाशय प्रसिद्ध आहे. येथील वैतरणा हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांचे आकर्षण असून खर्डी या लोहमार्ग स्थानकापासून ते १३ किमी. वर आहे. येथे विश्रामधामाची सोय आहे.

चौंडे, मा. ल.