जाफना : श्रीलंकेचे वायव्येकडील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि बंदर. लोकसंख्या १,०७,६६३ (१९७१). हे जाफना द्विपकल्पात अनुराधपुरच्या उत्तरेस सु. १५५ किमी.वर वसले आहे. इ. स. पू. दोनशे वर्षे तमिळ लोक दक्षिण भारतातून येऊन येथे स्थायीक झाले व अद्यापिही ते या शहरात बहुसंख्येने आहेत. पुढे पोर्तुगीज, डच व ब्रिटीश तेथे अनुक्रमे १६१७, १६५८ व १७९५ मध्ये आले. त्या काळातील काही अवशेष अद्याप सुस्थितीत असून त्यांतील डचांनी बांधलेला किल्ला उत्कृष्ट आहे. येथील लोकांवर भारतीय संस्कृतीची छाप दिसते. हवामान उष्ण व दमट असून पावसाचे प्रमाण अनिश्चित आहे, तथापि येथील चुनखडीच्या जमिनीमुळे विहिरींना भरपूर पाणी असते. त्यावर शेती होते. तांदूळ, कापूस, नारळ व तंबाखू ही आसमंतातील प्रमुख पिके असून येथील शेतकरी कष्टाळू आहे. किनाऱ्यावर मच्छीमारीचाही धंदा चालतो. जाफना हे मुख्यत्वे चिरूट आणि १६ किमी.वरील कंग्केसंतुराई येथील गरम औषधी पाण्याचे झरे यांकरिता प्रसिद्ध आहे. हे हवाई मार्गे, लोहमार्ग व सडका यांनी इतर भागांशी जोडले असून ३०४ किमी. वरील कोलंबोशी जाफनाची हवाई वाहतूक दररोज चालते. अलीकडे येथे बँक ऑफ सीलोन व मर्कंटाइल बँक सुरू झाली आहे. इतर आधुनिक सुखसोयीही उपलब्ध आहेत. जाफना हे त्या द्विपकल्पाचे आणि कारभाराचे केंद्र आहे.

देशपांडे, सु. र.