ट्युनिशिया : (अरबी अल्-जम्हूरिया अत्-तूनिसिया). आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील छोटेसे अरब, मुस्लिम प्रजासत्ताक. क्षेत्रफळ १,६४,१५० चौ. किमी. लोकसंख्या ५५,०९,००० (१९७३). विस्तार २९° ५४’ उ. ते ३७° २१’ उ. व ७° ३३’ पू. ते ११° ३८’ पू. यांदरम्यान. दक्षिण–उत्तर जास्तीत जास्त अंतर ७२० किमी. पूर्व–पश्चिम ३२० किमी. किनारा १,२०० किमी. राजधानी ट्युनिस. अधिकृत धर्म इस्लाम, अधिकृत भाषा अरबी. याच्या उत्तरेस व पूर्वेस भूमध्य समुद्र, आग्नेयीस लिबिया, नैर्ऋत्येस व पश्चिमेस अल्जीरिया आहेत. उत्तर किनाऱ्यावर ट्युनिसचे आखात असून पूर्व किनाऱ्यावर हाम्मामेतचे आखात आणि गॅबेसचे आखात आहे. गॅबेसच्या आखातात जेर्बा, केर्केना व शेर्गुई ही बेटे आहेत. ट्युनिसच्या व हाम्मामेतच्या आखातांदरम्यानच्या केप बॉन द्वीपकल्पाजवळ झेंब्रा व उत्तर किनाऱ्यापासून काही अंतरावर ला गालीट ही छोटी बेटे आहेत. सुएझ कालवा व जिब्राल्टर यांदरम्यानचे ट्युनिशियाचे स्थान मोक्याचे समजले जाते.

भूवर्णन : ट्युनिशियातील प्रमुख पर्वतश्रेणी म्हणजे मोरोक्को-अल्जीरियाकडून आलेल्या ॲटलास पर्वताच्या टेल ॲटलास आणि सहारा ॲटलास या दोन शाखा. त्या नैर्ऋत्य ईशान्य दिशेने ट्युनिसच्या आखाताकडे जातात. अल्जीरियाच्या सरहद्दीजवळील तेबेसा श्रेणीतील काफ अश-शनाबी किंवा जेबेल चंबी (१,५४४ मी.) आणि ट्युनिसच्या नैर्ऋर्त्येस सु. ४८ किमी. वरील जेबेल झाग्‌वान (१,२९५ मी.) ही त्यांतील प्रमुख शिखरे होत. वायव्येकडे क्रूमीरी व उत्तर किनाऱ्याजवळ मोगोद पर्वत आहेत. ॲटलासच्या दोन्ही शाखांच्या मधून ट्युनिशियाची प्रमुख नदी मेजेर्दा ईशान्येकडे वाहत जाऊन ट्युनिसच्या आखातात भूमध्य समुद्राला मिळते. तिच्याप्रमाणे तिची उपनदी मेलेग ही अल्जीरियातूनच येते. मेजर्दाचे खोरे प्राचीन सरोवरांच्या द्रोणीत गाळ साठून निर्माण झालेले असल्यामुळे रोमन काळापासून ते धान्याचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. या सर्व डोंगराळ प्रदेशाला डॉरसेल म्हणतात. त्याच्या दक्षिणेला २०० ते ५०० मी. उंचीचा पठारी स्टेप गवताळ प्रदेश असून त्याच्याही दक्षिणेस सखल गवताळ प्रदेश आहे. त्यानंतर दक्षिणेस शॉट या खाऱ्या सरोवरांचा अंतर्गत जलवाहनाचा प्रदेश आहे. त्यातील जेरीद सरोवर समुद्रसपाटीखाली १५ मी. आहे. यांच्या दक्षिणेस सहारा मरुप्रदेशाचा भाग असलेला देशाचा सु. दोन पंचमांश भाग व्यापणारा मरुप्रदेश आहे. लिबियाच्या हद्दीकडे भूभाग पुन्हा सु. ७६० मी. पर्यंत उंचावत जातो. अगदी उत्तरेस किनारा तुटक असून काही ठिकाणी डोंगर समुद्रात घुसले आहेत. यामागे चिंचोळी किनारपट्टी आहे. पूर्वेकडील आखातांच्या मागे केप बॉनपासून दक्षिणेकडे साहेल नावाचा विस्तृत सपाट सखल भूप्रदेश आहे. अरबीत टेल म्हणजे डोंगर व साहेल म्हणजे मैदान असा अर्थ आहे.

खनिजे :ट्युनिशियाचे प्रमुख खनिज फॉस्फेट हे देशाच्या मध्यभागात सापडते. अल्जीरियाच्या सरहद्दीजवळ लोखंड आणि उत्तर भागात शिसे, पारा व जस्त मिळतात. दक्षिणेकडे अल बोर्मा येथे खनिज तेल सापडले असून ते महत्त्वाचे ठरत आहे. पूर्व किनाऱ्यावरील स्फाक्सजवळ व गॅबेसच्या आखातात तेल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हवामान :ट्युनिशियाचे हवामान सामान्यतः भूमध्यसागरी म्हणजे सौम्य, आर्द्र हिवाळे व उष्ण, कोरडे उन्हाळे असे आहे. जवळजवळ वर्षभर अस्थिर पश्चिमी वारे वाहतात. मात्र कधी कधी दक्षिणेकडून सहारातून सिरोको हे अत्यंत उष्ण व कोरडे वारे येतात. यांना ट्युनिशियात ‘शेहेली ’ म्हणतात. त्यांनी वनस्पती अगदी वाळून जातात. समुद्रसान्निध्याचा परिणाम तपमानावर होतो.उदा., किनाऱ्यावरील सूस येथे जानेवारीचे किमान सरासरी तपमान ७° से. व ऑगस्टमधील कमाल सरासरी तपमान ३२° से. असते. अंतर्भागातील केरवाँ (अल् कायरवान) येथे ही तपमाने अनुक्रमे ४° से. व ३७° से. असतात. ट्युनिस येथे हिवाळ्यात किमान ६·६° से., कमाल १८·३° से. व सरासरी ११·१° से. तपमान असते. उन्हाळ्यात ते किमान १८·३° से., कमाल ३३·९° से. व सरासरी २६·१° से. असते. अंतर्भागात आणि दक्षिणेकडे कमाल तपमान यापेक्षा जास्त व किमान तपमान यापेक्षा कमी असते. सिरोकोमुळे किनारी भागातही तपमान ५०° से.पर्यंत जाते. दक्षिणेकडे कमाल तपमान ६०° से. पर्यंत जाते. अशा वेळी वाळूचे तपमान ६४·४° से. असते.

सामान्यतः ऑक्टोबर ते मे पावसाचे महिने असले, तरी खरोखर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळातच बहुधा पाऊस येतो. तो अनिश्चित स्वरूपाचा असतो. उत्तर भागात सु. ४० सेंमी. तर गवताळ प्रदेशात १५ ते ४० सेंमी. पाऊस पडतो. दक्षिणेकडे पावसाचे प्रमाण वेगाने कमी होत जाते. सरोवर प्रदेशात फार १२ सेंमी. पाऊस पडतो. मात्र तेथे मरूद्यानात भूमिगत पाणी मिळते. दक्षिण साहेलमध्ये फक्त २० ते २५ सेंमी. पाऊस पडतो. उत्तर साहेलमध्ये तो सु. ४० सेंमी. पडतो.

वनस्पती :उत्तरेकडील डोंगराळ भागात आणि क्रूमीरी विभागात दाट अरण्ये आहेत. त्यात बुचाचा ओक, ओक, चीड, थूया, अलेप्पो, पाइन, जेतून व जुजुबे, गम इ. वृक्ष आहेत. त्यांखाली नेचे उगवलेले असतात. गवताळ प्रदेशात आल्फा व विशेषकरून एस्फार्टो गवत होते. ते कागदासाठी उपयोगी पडते. दक्षिण भागात मरुदेशीय वनस्पती होतात.मरूद्यानात व सरोवरांभोवतीच्या प्रदेशात खजूर, साहेलच्या दक्षिण भागात ऑलिव्ह व उत्तर भागात आणि देशाच्या ईशान्य भागात द्राक्षे, लिंबू जातीची फळे यांस अनुकूल परिस्थिती आहे.

प्राणी :अरण्यात रानडुकरे, गवताळ भागात छोटे प्राणी, अस्वले, प्लोव्हर, चित्ते, क्वचित तरस व कोल्हे तर दक्षिणेकडे कुरंग आढळतात. कुरंगाच्या शिकारीला बंदी करण्यात आली आहे. सर्वत्र विंचू पुष्कळच आहेत. सर्पांपैकी शिंगांचा व्हायपर व फड्या नाग आढळतात. रुक्ष प्रदेशातून कधी कधी टोळधाडी येतात. देशात विविध प्रकारचे पक्षीही भरपूर आहेत. समुद्रात सार्डीन, ट्यूना इ. मासे भरपूर मिळतात.

इतिहास :ट्युनिशियातील मूळचे लोक बर्बर हे होत. इ.स. पू. बाराव्या शतकात फिनिशियनांनी हल्लीचे ट्युनिस व बीझर्ट यांदरम्यान उटिका वसविले. टायरच्या वसाहतकऱ्यांनी इ.स. पू. नवव्या शतकात सध्याच्या ट्युनिसजवळ कार्थेज वसविले. त्यानंतर बर्बर व फिनिशियन यांचा संकर झाला. रोमबरोबरच्या तिसऱ्या प्यूनिक युद्धात कार्थेज पडले व नंतर तेथे रोमन, व्हँडाल व बायझंटिन यांच्या सत्ता एकामागोमाग आल्या. रोमन काळात शहरे वसली व शेतीचा विकास होऊन हा भूप्रदेश ‘रोमचे धान्याचे कोठार’ बनला. आजही एल् जेम (थायसद्रस) येथील रोमच्या कलॉसियमच्या खालोखाल मोठे असलेले कलॉसियम, दूग्गा येथील मंदीरे, ट्युनिसमधील बार्दो संग्रहालयातील मोझेइकांचा संग्रह इ. अवशेष रोमन वैभवाची साक्ष देतात. चौथ्या शतकात येथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला होता परंतु सहाव्या व सातव्या शतकात बायझंटिनांच्या कारकीर्दीत आपसातील धार्मिक कलह व बेबंदशाही वाढली. सातव्या शतकात अरबांची स्वारी होऊन त्यांनी केरवाँ शहर स्थापिले. मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया आणि लिबिया या पश्चिम अरबी राष्ट्रांचे ऐक्य दर्शविणाऱ्या ‘मागरिब’ प्रदेशातील हे पहिले शहर होय. बर्बरांनी अरबांना कडवा प्रतिकार केला परंतु अखेर अरबी सत्ता दृढमूल झाली आणि इस्लामचा यशस्वी प्रसार झाला.


इ. स. ८०० मध्ये इब्राहिम इब्न अल् अगलब याने आपले राज घराणे स्थापले व राज्य वाढविले. नंतर फातिमी या खिलाफतीची महदिया येथे राजधानी केली व नंतर ईजिप्त जिंकून कैरो राजधानी केली. अकराव्या शतकात महदिया येथील राज्यपालाचे पारिपत्य करण्यासाठी कैरोच्या खलिफाने सैन्य पाठविले. ही मागरिबवरील दुसरी अरबस्वारी होय. ११३५ मध्ये सिसिली घेऊन नॉर्मनांनी किनाऱ्यावर सत्ता स्थापिली होती. परंतु मोरोक्कोच्या अल्मोहेदांनी ११५९ मध्ये ट्युनिशिया जिंकून संपूर्ण मागरिब प्रदेश मोरोक्कोच्या अंमलाखाली आणला.

ट्युनिसच्या राज्यपालाने १२२८ मध्ये स्वतंत्र हाफ्‌सिद घराणे स्थापिले. ती सत्ता ३०० वर्षे टिकून त्या काळात इस्लामी कला व संस्कृती यांची चांगली वाढ होऊन ट्युनिसमधील झैतून (मशीद) विद्यापीठाची स्थापना झाली. १५७४ मध्ये तुर्कांनी ट्युनिशियातून स्पॅनिश लोकांस घालवून देऊन तो तुर्की प्रांत केला.

सतराव्या शतकाच्या मध्यास तुर्की सुलतानाने नेमलेल्या ‘बे’ ची सत्ता ट्युनिशियात आली. हुसेन बेन अली याने १७०५ मध्ये वंशपरंपरा राजसत्ता स्थापिली.

तुर्कस्तानातील १८३९ च्या सुधारणा आणि यूरोपीयांची सामाजिक व ऐहिक प्रगति यांच्या प्रभावामुळे ट्युनिशियातील विचारवंतही सुधारणा व आधुनिकता यांची जोरदार मागणी करू लागले. १८५७ मध्ये मुहंमद बेने मुस्लिम आणि बिगरमुस्लिम यांची कायदेशीर समानता व त्यांस संरक्षण जाहीर केले आणि त्याच्या नंतरच्या सादिक बेने मुस्लिम बेची निरंकुश सत्ता संपुष्टात आणणारे संविधान (दस्तूर) जारी केले. तथापि यूरोपीय घेणेकऱ्यांनी तगादा लावल्यामुळे सादिक बेने करवाढ केली. तिला लोकांनी विरोध केला तेव्हा १८६४ मध्ये बेने सुधारणा स्थगित केल्या.

इटली, ब्रिटन आणि फ्रान्स यांचा ट्युनिशियावर डोळा होताच. १८७८ च्या बर्लिन काँग्रेसने आधीच अल्जीरियात घुसलेल्या फ्रान्सला ट्युनिशियात हातपाय पसरण्यास उत्तेजन दिले. १८८१ मध्ये फ्रेंच ट्युनिशियात घुसले व त्यांनी फ्रेंच संरक्षण पतकरण्यास सादिक बेला भाग पाडले. तो आता नामधारी राजा राहिला. खरी सत्ता फ्रेंच अधिकाऱ्यांच्या हाती आली. वसाहतवादास प्रोत्साहन मिळाले व देशातील यूरोपीयांची संख्या वाढू लागली. यूरोपीयांना सर्व प्रकारच्या सवलती व हक्क प्राप्त होत आणि ते ट्युनिशियनांना नाकारले जात, तथापि देशाची प्रगती व विकास यांस सुरुवात झाली. लवकरच राष्ट्रीय चळवळीची बीजे दिसू लागली. फ्रेंच संस्कृतीचे इस्लामी संस्कृतीवरील वर्चस्व पुराणमतवाद्यांना रुचेना आणि पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्यांना फ्रेंचांनी ट्युनिशियनांना दिलेली अपमानास्पद वागणूक मानवेना. पहिल्या महायुद्धानंतर १९१९ मध्ये शेख अब्द अल् अझिझ तालबी याच्या नेतृत्वाने पॅरिसच्या शांतता परिषदेपुढे ट्युनिशियाच्या स्वायत्ततेची मागणी करणारे शिष्टमंडळ गेले परंतु त्याची दाद लागली नाही. तालबीने मग दस्तूर (संविधान) पक्ष काढला. १९३४ मध्ये तालबीच्या नेतृत्वाखालचा जुना दस्तूर पक्ष व हबीब बुर्गीबच्या नेतृत्वाखालील सामान्यजन हितैषी, आधुनिकतावादी नवा दस्तूर पक्ष असे दोन पक्ष झाले. फ्रान्सला हे काहीच पसंत नसल्यामुळे त्याने दोन्हीकडील नेत्यांची धरपकड व हद्दपारी केली. दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्सच्या पाडवानंतर मार्शल पेनॉच्या व्हिशी शासनाकडे ट्युनिशियाची सत्ता आली. १९४२ मध्ये फ्रेंच उत्तर आफ्रिकेत दोस्त सैन्ये उतरली व १९४३ मध्ये अमेरिकेच्या व ब्रिटनच्या सैनिकांनी आफ्रिकेतील जर्मनांना हुसकून देऊन ट्युनिशियात पुन्हा फ्रेंच सत्ता आणली. फ्रेंच सत्ताधिकाऱ्यांनी बाह्यतः अक्षराष्ट्रांना मदत केली म्हणून पण खरे म्हणजे राष्ट्रीयत्वास पाठिंबा दर्शविला म्हणून मौन्सिफ बे याला पदच्युत करून लामीन बेला राज्यावर बसविले.

दुसऱ्या महायुद्धानंतर हबीब बुर्गीबचा नवा दस्तूर पक्ष व ट्युनिशियाची कामगार चळवळ यांनी जोर केला. फ्रान्सने १९४७ मध्ये काही कारभारविषयक सुधारणा जाहीर केल्या, त्या राष्ट्रीयतावाद्यांस अपुऱ्या वाटल्या, तर यूरोपीय वसाहतवाल्यांस फारच पुरोगामी वाटल्या. १९५०–५१ मध्ये नव दस्तूर पक्ष व फ्रेंच सत्ताधारी यांच्यात समझोता होऊन मुहंमद चेनिक या मवाळ राष्ट्रीय नेत्याच्या नेतृत्वाखाली नवीन शासन सिद्ध झाले. त्यात बुर्गीबचा प्रमुख सहकारी सलाह बेन युसूफ हा न्यायमंत्री होता. काही किरकोळ सुधारणा झाल्या. परंतु नव दस्तूर पक्षाची पूर्णतः ट्युनिशियन संसदेची आग्रही मागणी आणि यूरोपीय वसाहतवाल्यांची ५०% जागांची व ट्युनिशियाच्या सार्वभौमत्वाऐवजी फ्रान्स व ट्युनिशिया यांच्या संयुक्त सार्वभौमत्वाची मागणी यांमुळे हे शासन कोलमडले. ट्युनिशियन नेत्यांनी संयुक्त राष्ट्रापुढे प्रश्न नेताच फ्रेंच अधिकाऱ्यांनी पंतप्रधान चेनिक बुर्गीब व इतर नेत्यांस अटक केली. यामुळे राष्ट्रीयतावाद्यांनी सशस्त्र उठाव केला व फ्रेंच देशात, प्रतिदहशत यांचा धुमाकूळ आणि वेढ्याची परिस्थिती निर्माण झाली. ३१ जुलै १९५४ रोजी फ्रान्सचा मुख्य प्रधान पिएर मेंदेझ-फ्रान्स हा विमानाने ट्युनिसला आला आणि त्याने ट्युनिशियाला संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता जाहीर केली. मवाळ राष्ट्रीयतावादी तहार बेन अमर याच्या नेतृत्वाखाली बरेच नव दस्तूर मंत्री असलेले नवीन शासन प्रस्थापित झाले. १९५६ मध्ये फ्रान्सने मोरोक्कोला स्वातंत्र्य दिले तेव्हा ट्युनिशियालाही ते देणे क्रमप्राप्त होऊन २० मार्च १९५६ रोजी ट्युनिशिया पूर्ण स्वतंत्र झाला व बुर्गीब मुख्य प्रधान झाला. २५ मार्च १९५६ रोजी घटना समिती निर्वाचित होऊन तिने २५ जुलै १९५७ रोजी लामीन बेला पदच्युत केले, ट्युनिशियाचे प्रजासत्ताक उद्‌घोषित केले आणि हबीब बुर्गीब यास राष्ट्रप्रमुख निवडले. २३ जुलै १९५६ रोजी ट्युनिशिया संयुक्त राष्ट्रांचा सदस्य झाला. त्यांच्या अनेक संस्थांचा तो सभासद आहे. काँगोत संयुक्त राष्ट्रांच्या फौजात ट्युनिशियाचे सैनिक होते. स्वतंत्र आफ्रिकी राष्ट्रांच्या परिषदांत त्याने भाग घेतला होता. १९६० मध्ये ट्युनिस येथे अखिल आफ्रिकी जन परिषद भरली होती. १ जून १९५९ रोजी नवीन संविधान अंमलात आले व १९५९ च्या निवडणुकात बुर्गीब अध्यक्ष म्हणून निवडून आला. नवीन निधर्मी कायदे, स्त्रियांस मतदान अधिकार, बहुपत्नीकत्वास बंदी इ. सुधारणा झाल्या. काम करण्यास अडथळा येत असेल, तर रमझानचे उपवासही करू नयेत अशी मोहिम १९६० मध्ये बुर्गीबने सुरू केली. आर्थिक विकासासाठी धर्मयुद्धाच्या तिडिकेने शिकस्त केली पाहिजे, असे बुर्गीबचे मत आहे.

नव दस्तूर पक्षातील सत्तास्पर्धा १९५५ मध्ये सुरू होऊन १९५६ मध्ये संपलीही. सलाह बेन युसुफ या प्रतिस्पर्ध्यावर बुर्गीबने निर्णायक विजय मिळविला. बुर्गीबविरूद्ध प्राणघातक कट केल्याबद्दल बेन युसूफवर त्याच्या गैरहजेरीत खटला होऊन त्याला देहांताची सजा देण्यात आली. त्याने कैरोत आश्रय घेऊन ईजिप्तचा अध्यक्ष नासेर याचा पाठिंबा मिळविला होता. १९६१ मध्ये त्याचा जर्मनीत गूढ रीतीने वध झाला. नासेरच्या धोरणाने ईजिप्त आणि ट्युनिशिया यांच्यात वितुष्ट आले. ट्युनिशिया १९५८ मध्ये अरब लीगचा सभासद झाला होता परंतु त्याने नासेरच्या वर्चस्वास विरोध करून लीगच्या बैठकींस उपस्थित राहण्याचे बंद केले. पुढे उभय देशांतील संबंध थोडेसे सुधारले परंतु ट्युनिशियाने १९६५ मध्ये लीगवर पुन्हा बहिष्कार घातला आणि नासेरने ट्युनिशियाविरुद्ध वृत्तपत्रात चालविलेला प्रचार बंद होईपर्यंत तो चालू ठेवण्याचे ठरविले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अल्जीरियाच्या स्वातंत्र्यवादी तात्पुरत्या सरकारला ट्युनिशियात आश्रय, फ्रेंचांची ट्युनिशियातील लष्करी ठाणी इत्यादींवरून ट्युनिशियाचे फ्रान्सशी संबंध बिघडलेच होते, बीझर्ट येथील मोठ्या नाविक तळाला ट्युनिशिया सशस्त्र स्वयंसेवकांनी १९६१ मध्ये वेढा घातला. तत्पूर्वी फ्रेंच सैन्य काढून घेण्याबद्दल बुर्गीबने अनेक वेळा आग्रह धरला होता. नंतर जोराच्या चकमकी सुरू होऊन एक हजार ट्युनिशियन लोक मारले गेले. १९६३ मध्ये फ्रान्सने सर्व सैनिक काढून घेतले. १९६४ मध्ये ट्युनिशियाने देशातील फ्रेंचांच्या जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले. तेव्हा फ्रान्सने ट्युनिशियाच्या व्यापारी सवलती व आर्थिक मदत बंद केली. ही मदत १९६६ पासून पुन्हा चालू झाली आहे.


मागरिब एकतेस मान्यता असली, तरी मोरोक्कोच्या मॉरिटेनियाविषयक धोरणास ट्युनिशियाचा विरोध होता व १९६२ मध्ये बुर्गीबला ठार करण्याच्या अयशस्वी कटात भाग घेणाऱ्यांपैकी काही जणांस आश्रय दिल्यामुळे अल्जीरियाशीही वाकडे आले. तथापि मागरिब देशांचे परस्परसंबंध पुन्हा सुधारत असून १९६४ मध्ये त्यांनी व्यापारी संघटना स्थापण्याच्या करारावर सह्या केल्या आहेत.

ट्युनिशियाचे परराष्ट्रीय धोरण सामान्यतः तटस्थतेचे आहे. तथापि अमेरिकेच्या बाबतीत ते अधिक अनुकूल असते व त्यामुळे त्याला अमेरिकेचे सर्व प्रकारचे साह्यही मिळते. अरब–इझ्राएल वादातही त्याचे धोरण कडवे अरबी नाही. जानेवारी १९७४ मध्ये अध्यक्षाने ट्युनिशिया व लिबिया यांचे संयुक्त राज्य होईल अशी घोषणा केली परंतु त्यानेच नंतर ती योजना स्थगित केली. त्यावेळचा परराष्ट्रमंत्री मुहंमद मस्मूदी यास नंतर बडतर्फ करण्यात आले.

राज्यव्यवस्था :देशाचा अध्यक्ष हा राज्याचा व शासनाचा प्रमुख असून सेनाप्रमुखही असतो. खरी कार्यकारी सत्ता अध्यक्षाच्याच हाती असते. मंत्रीमंडळात १५ मंत्री व ७ राज्यसचिव असतात. देशाचा कारभार मंत्रिमंडळ करते. १९६९ पासून प्रधानमंत्री त्याचा मुख्य असतो. अध्यक्षाची जागा अकस्मात रिकामी झाली, तर प्रधानमंत्री अध्यक्ष म्हणून काम पाहील अशी दुरुस्ती १९६९ मध्ये संविधानात झाली आहे. एकसदनी लोकसभा १०१ सदस्यांची असते. त्यांची व अध्यक्षाचीही निवडणूक प्रत्यक्ष सार्वत्रिक व गुप्त मतदानाने दर पाच वर्षांनी एकाच वेळी होते. अध्यक्षाला लागोपाठ तीन वेळा अध्यक्ष होता येते. तो मुस्लिम, निदान ४० वर्षे वयाचा व ट्युनिशियन वडील व आजोबा असलेला असावा लागतो. हबीब बुर्गीब याची अध्यक्ष म्हणून निवडणूक १९५९, १९६४ आणि १९६९ मध्ये होऊन नोव्हेंबर १९७४ मध्ये त्याची आजन्म अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. वीस वर्षांवरील सर्व प्रौढांस मताधिकार आहे.

कारभारासाठी देशाचे १३ विलायत (गव्हर्‌नॉरेट) हे विभाग केले असून प्रत्येक विलायतचा प्रमुख ‘वाली’(गव्हर्नर) असतो. विलायतचे विभाग मुतामदीयात (डेलेगेशन) असून त्या प्रत्येकाचा मुख्य ‘मुतामद’ असतो. त्याहून लहान विभाग म्हणजे शेखत व कम्यून हे होत. शेखतांऐवजी कम्यूनांची संख्या वाढत आहे. देशात ११६ नगरपालिका असून त्यांचा कारभार नगरपालिका अध्यक्ष आणि नगरसभा यांचेकडे असतो.

सर्व सत्ता नव दस्तूर पक्षाच्या हाती आहे. इतर पक्षांना बंदी नाही. जुना दस्तूर पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष नाममात्र अस्तित्वात आहेत. नव दस्तूर पक्षात कामगार, विद्यार्थी, स्त्रिया, उद्योग व व्यापार, शेतकरी यांच्या स्वायत्त संस्था आहेत परंतु त्यांना राजकीय सत्ता नाही. पक्षाचे १५ सदस्यांचे कारभारी मंडळ प्रमुख असून त्याच्या शाखा देशभर पसरलेल्या आहेत. तेथे सर्व नागरिकांस चर्चा, मार्गदर्शन इत्यादींद्वारा राजकीय शिक्षण मिळू शकते.

न्याय :संविधानाने न्यायालयांचे स्वातंत्र्य मान्य केलेले आहे. पूर्वीची धार्मिक पायावरील शरियत व रबिनिक न्यायालये रद्द करून नवीन निधर्मी न्यायालये स्थापन झाली आहेत. ती प्राथमिक, अपील व उच्च या तीन स्तरांवर असतात. १९५६ च्या वैयक्तिक प्रतिष्ठा संहितेमुळे स्त्रियांचा दर्जा वाढला आहे. विवाहाची कमीत कमी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे बहुपत्नीकत्वाला बंदी झाली आहे आणि विवाहविच्छेद न्यायालयीन अधिकारक्षेत्रात आला आहे.

संरक्षण : १९५६ मध्ये स्थापिलेल्या ट्युनिशियन राष्ट्रीय सेनेत १९७२ मध्ये अधिकारी व सैनिक यांची संख्या २०,००० होती. भूदलात एक चिलखती, पाच पायदळ, एक कमांडो, एक मरुभूमी, एक तोफखाना व एक अभियांत्रिकी अशा तुकड्या आहेत. नौदलात १९७५ मध्ये १,९०० अधिकारी व सैनिक होते. आरमारात एक किनारी सुरुंगकाढी, १६ लहानमोठ्या गस्त नौका व दोन टग बोटी होत्या. वायुदल २,००० जणांचे असून निरनिराळ्या प्रकारची सु. ५० विमाने आहेत.

आर्थिक स्थिती :ट्युनिशिया हा विकसनशील देश आहे. त्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवरच आधारलेली आहे. १९७२-७३ च्या सुमारासही तेथील लोकसंख्येपैकी सु. ६० टक्के लोक शेतीव्यवसायातच होते आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त १८ टक्के भागाचे उत्पादन करीत होते. निर्मिती व्यवसाय नीटसा विकसित झालेला नाही. शिवाय उत्तरेकडील डॉरसेल विभाग आणि पूर्वेकडील साहेल विभाग हे मध्य व दक्षिण भागांपेक्षा जास्त समृद्ध आणि विकसित असल्यामुळे अर्थव्यवस्था एकारल्यासारखी आहे.

शेती :एकूण १,५५,८३,००० हे. जमिनीपैकी सु. ९० लक्ष हे. उत्पादनक्षम आहे. त्यांत २० लक्ष हे. धान्यपिकांखाली, ३६ लक्ष हे. चराऊ रान, ९ लक्ष हे. अरण्ये व १३ लक्ष हे. पडीक आहे. शेतीची प्रमुख उत्पन्ने गहू, बार्ली, ऑलिव्हचे तेल, लिंबे व संत्री, मोसंबी, खजूर, साखर, बीट, द्राक्षे व त्यापासून बनविलेली मद्ये ही असून त्यांशिवाय जर्दाळू, पेअर, सफरचंद, पीच, प्लम, अंजीर, डाळिंब, बदाम, शॅडॉक, पिस्ते, एस्पार्टो गवत, मेंदी आणि बूच यांचे उत्पन्न येते. शेतीची पारंपरिक पद्धत अद्याप पुष्कळ ठिकाणी प्रचलित असून जमिनीचे लहान तुकडे व अनिश्चित पाऊस यांमुळे उत्पादन कमी येते व खात्रीचे नसते. आधुनिक पद्धत, यांत्रिक अवजारे, मेजेर्दावरील वीजधरणांच्या योजनेसारख्या मार्गांनी व साध्या आणि आर्टेशियन विहिरींनी पाणीपुरवठा, खते इ. मार्गानी उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. सहकारी शेतीचा प्रयोग व प्रसार बळाने करण्यात आला, तो लोकांस न मानवल्याने १९६९ मध्ये मागे घेण्यात आला. घेतलेल्या जमिनी मूळ मालकांस परत दिल्या व संबंधित मंत्र्यास बडतर्फ व कैद करण्यात आले. १९६६ मध्ये देशात १८,३६० ट्रॅक्टर होते. सामान्यतः वायव्येकडील क्रूमीरी अरण्यात लाकूड व बूच मेजेर्दा खोऱ्यात धान्ये ईशान्य भागात मुख्यतः द्राक्षे, लिंबू जातीची व इतर फळे आणि धान्ये पूर्वेकडील साहेल भागात ऑलिव्ह मध्य भागात गवत व सरोवरांच्या आणि द. भागात खजूर अशी वाटणी आहे. निर्यातीचा २२% भाग शेतमाल असतो.

पशुपालनाचाही व्यवसाय चालतो. १९७३ मध्ये देशात ३२,००,००० मेंढ्या ४,६०,००० शेळ्या ६,८०,००० गुरे १,८०,००० उंट १,८७,००० गाढवे १,००,००० घोडे ६३,००० खेचरे व ८,००० डुकरे होती. हा मुख्यतः मध्य व दक्षिण भागांतील व्यवसाय असला, तरी मोठाले कळप उत्तरेकडेच आढळतात. रुंद शेपटीची मेंढी हे ट्युनिशियातील प्राणिजीवनाचे वैशिष्ट्य आहे.


मुख्यतः किनाऱ्यावर व काही सरोवरांत मासेमारी चालते. १९७४ मध्ये ३७,८५० टन मासे मिळाले. १९६७ मध्ये सु. २०,००० कोळी व ५,००० मच्छीमारी बोटी होत्या. या व्यवसायातही आधुनिक तंत्राचा अवलंब अधिकाधिक करण्याचा प्रयत्न चालू आहे. ट्यूना, सार्डीन, कालवे व शेवंडे यांची निर्यात होते. जंगलापासून इमारती लाकूड व बूच यांशिवाय खाणींसाठी लागणारे आधार, द्राक्षवेलींसाठी आधार, रेल्वेला उपयुक्त लाकूड व जळाऊ लाकूड मिळते.

शक्तिसाधने :ट्युनिशियात कोळसा मिळत नाही. अलीकडे केप बॉन द्वीपकल्पभागात कनिष्ठ प्रतीचा लिग्नाइट व नैसर्गिक वायू आढळला आहे. १९६८ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील एकूण २,१९,००० किवॉ. विद्युत् उत्पादन क्षमतेपैकी फक्त ३२,००० किवॉ. जलविद्युत् उत्पादनक्षमता होती. एकूण उत्पादन २,६२,००० किवॉ. होते. अलीकडे खनिज तेल मिळू लागल्यामुळे परिस्थिती थोडी सुधारली आहे. १९७३ मध्ये ११२·५१ कोटी किवॉ. ता. वीज उत्पादन झाले.

उद्योगधंदे :कच्च्या मालाचा व शक्तिसाधनांचा अपुरा पुरवठा व मर्यादित अंतर्गत बाजारपेठ या उद्योगधंद्यांतील प्रमुख अडचणी आहेत. तरीही मेंझेल बुर्गीब येथील लोखंड व पोलादाचा मोठा आणि भारी किंमतीचा कारखाना यशस्वी झाला आहे. अरण्ये, शेते, फळबागा, ऑलिव्ह तेल, मासे यांच्या उत्पादनांवरील प्रक्रिया कापड व कपडे, बांधकाम साहित्य, घरगुती सामान, खते यांचे कारखाने व उद्योग प्रमुख आहेत. गॅबेस येथे मागरिब केमिकल इंडस्ट्रीज हा रासायनिक पदार्थांचा कारखाना १९७१ मध्ये निघाला आहे. तेथे व १९७२ पासून घानूशे येथे फॉस्फॉरिक अम्लाचे उत्पादन होते. सुपर फॉस्फेट, हायपर फॉस्फेट, शिसे, सिंमेट यांचेही कारखाने ट्युनिस, स्फाक्स इ. शहरी आहेत. बीर व इतर पेये, माल ठेवण्याचे डबे, द्रवरूप हवा यांचेही उत्पादन होते. एका शासकीय कारखान्यात देशाला लागणाऱ्या तंबाखूच्या सर्व पदार्थांचे उत्पादन होते. कॅसरीन येथे सेल्युलोजचा आणि ग्राँबाल्या येथे द्राक्षांच्या व मोसंब्यांच्या रसाचा कारखाना आहे. बेझा येथे साखरेचा, बीझर्ट येथे तेलशुद्धी कारखाना आहे. मेग्रीन येथे संगमरवरी कामाचा व रबरी  धावांचा कारखाना आहे. फळे, भाजीपाला, मासे इ. डबाबंद करणे, पीठाच्या गिरण्या, साबण, सिगारेट, मद्ये, ॲल्युमिनियमची भांडी, पादत्राणे इत्यादीचे छोटे कारखाने निघाले आहेत. गालिचे, तांब्यावरील नक्षीकाम, कातड्याच्या वस्तू, पादत्राणे, भरतकाम, मातीची भांडी, जडजवाहीर इ. हस्तव्यवसाय पूर्वीपासून चालू आहेत. पर्यटनव्यवस्था हा अलीकडे एक फार महत्त्वाचा उद्योग झाला आहे. १९७४ मध्ये ७,१६,००० पर्यटक ट्युनिशियात येऊन गेले.

कामगार :ट्युनिशियन कामगारांची सर्वसाधारण संघटना ही सर्वांत मोठी संघटना असून ती १९४६ मध्ये स्थापन झाली. याशिवाय शेतकरी, विद्यार्थी, कारागीर व व्यापारी, स्त्रिया इत्यादींच्या संघटना असून तेवीस विभागीय संघटना आहेत. या सर्वसाधारण संघटनेशी संलग्न असून ती शासनाच्या अधिकारात आहे. १९६६ मध्ये एकूण १०,९३,७३५ कामगारांपैकी ४१% शेती जंगल, शिकार व मासेमारी यांत ९·५% निर्मिती व्यवसायात २·२% खाणींत ५·४% बांधकामावर, वीज, वाफ व पाणी १·६% वाहतूक, साठा व दळणवळण ३·५% व्यापार ६·४% सेवा १९·६% व इतर १०·६% होते. उत्तरेकडील व दक्षिणेकडील भागांसाठी ट्युनिस व स्फाक्स येथील आयोगांनी किमान वेतने ठरविली आहेत. तंटे शासनाच्या समाजकार्य सचिवाकडे सोडविण्यासाठी जातात. विभागीय कामगार मंडळे मालक–कामगार सहकार्य वाढवितात. शेती कामगारांना पीक-कौशल्य, सेवाज्येष्ठता यावरून बोनस मिळतो. औद्योगिक अपघात व व्यावसायिक रोगराई यांविरुद्ध विमा सक्तीचा आहे. चाळीस तासांचा आठवडा व जादा कामाचे जादा वेतन अंमलात आहे. कामाच्या २४ तासांस एक दिवस या हिशेबाने वर्षास पगारी रजा मिळते. याशिवाय विविध प्रकारचे भत्ते व सोयीसवलती कामगारांस उपलब्ध आहेत. ट्युनिशियाचे सामान्य धोरण लवचिक व अनाग्रही समाजवादाचे आहे.

अर्थकारण :नोव्हेंबर १९५८ पासून दिनार हे चलन सुरू झाले आहे. १ दिनार=१,००० मिलिम होतात. १, २, १०, २०, ५० व १०० मिलिमची नाणी व ५०० मिलिम आणि १, ५ व १० दिनारांच्या नोटा असतात. एप्रिल १९७४ मध्ये ०·४३५२ दिनार = १ अमेरिकी डॉलर व १.०२८ दिनार = १ पौंड स्टर्लिंग असा विनिमय दर होता. सेंट्रल बँक ऑफ ट्युनिशिया चलन वितरण करते. १९६९ चा संतुलित अर्थसंकल्प १३,००,००,००० दिनारांचा, १९७० चा १४,६५,००,००० दिनार, १९७१–१५,४०,००,००० दि., १९७२–१७,६५,००,००० दि., १९७३–२०,८१,००,००० दि. व १९७४ चा २१,५७,००,००० दिनारांचा होता. १९७० मध्ये जमेपैकी ३९% अप्रत्यक्ष करांपासून, १४% प्रत्यक्ष करांपासून व ८·८% सार्वजनिक उद्योगांपासून होते. खर्चापैकी अर्थ २७%, शिक्षण, युवक आणि क्रीडा २४·९%, शेती ७.४%, सार्वजनिक आरोग्य ६·९%, अंतर्गत ४·८%, राष्ट्रीय संरक्षण ४·४%, घरे आणि सार्वजनिक बांधकाम ३·८% होते. परदेशी राष्ट्रीय कर्ज ४६·३ कोटी डॉलरचे होते. पर्यटकांपासूनचे उत्पन्न ५·८ कोटी डॉलरांचे होते.

ट्युनिशियन बँकिंग कंपनी, फ्रँको ट्युनिशियन व किंग अँड लोन कं., व नॅशनल अँग्रिकल्चरल बँक या उद्योगधंद्यांच्या व शेतीच्या विकासास मदत करतात. नॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक कर्जे देते. १९६८ मध्ये देशात ९ ट्युनिशियन, ३ फ्रेंच, १ ब्रिटिश व १ अरब अशा १४ बँका होत्या. १९६८ मध्ये १६,७२,७०,००० दिनारांचा अर्थपुरवठा झाला आणि ६,४५,३०,००० दिनार राखीव पैसा होता. १९७२ अखेर बँकांतील ठेवी २६,७८,००,००० दिनारांच्या होत्या.

विमा कंपन्यांवर शासकीय देखरेख असते. काही सुप्रतिष्ठित फ्रेंच विमा कंपन्यांच्या कचेऱ्या ट्युनिशियात आहेत. देशाची राष्ट्रीय विमा कंपनी आहेच.

सार्वजनिक महसुलापैकी ५०% भाग करांपासून मिळतो. १०० दिनारांपेक्षा अधिक करपात्र उत्पन्नावर १ ते ८० टक्के अशा चढत्या श्रेणीने वैयक्तिक राष्ट्रीय कर आहे. विवाहितांस व २१ वर्षे वयाखालील प्रत्येक मुलासाठी सूट असते. वार्षिक १०० दिनार व अधिक पगार आणि मजुरी यांवर सरसकट ३% प्राप्तीकर असतो. त्यावरही मुलांमागे सूट असते. प्राप्तीकराच्या १०% खास राष्ट्रीय संरक्षण कर असतो. सामाजिक सेवांसाठी एकूण पगारावर ५% कर मालकाने परस्पर राष्ट्रीय सुरक्षितता निधीत भरावयाचा असतो. याशिवाय व्यावसायिकांस परवाना कर, उत्पादन कर, आयात कर, लाभांश कर, भाड्याच्या प्रमाणात नगरपालिकेचे कर, बाजारात येणाऱ्या शेतमालावर कर, जनावरे व फळे यांवरील कर, सामाजिक सुरक्षितता कर इ. अनेक प्रकारचे कर द्यावे लागतात. कोणाही करदात्यास त्याने या देशात मिळालेला सर्व किंवा काही नफा पुन्हा व्यवसायात गुंतविला तर करात सूट मिळते. १९५९ मध्ये ट्युनिशियाने फ्रेंच जकात संघ व १९५५ चा फ्रँको ट्युनिशियन आर्थिक आणि वित्तीय करार यांतून अंग काढून घेतले. फ्रेंचांच्या हातातील जमिनी काढून घेतल्यावर ट्युनिशियन मालावर फ्रान्समध्ये मिळणाऱ्या जकात सवलती रद्द झाल्या. निर्यात मालावर १०% ते १५% कर असतो. प्राथमिक गरजेच्या वस्तूंपेक्षा अन्य वस्तूंतील आयात जकात १९६४ मध्ये ८% वरून २५% करण्यात आली. १९६९ मध्ये ट्युनिशियाला यूरोपीय आर्थिक संघटनेत अंशतः सहभाग मिळाल्यामुळे त्या देशात ट्युनिशियन मालावर बहुतेक सर्व जकात माफ झाली व ट्युनिशियाने त्या देशातून येणाऱ्या मालावरील जकात ४०% कमी केली.


स्वातंत्र्यानंतर फ्रान्सची ट्युनिशियातील गुंतवणूक कमी झाली. तेव्हा १९५७ मध्ये परदेशी गुंतवणूक हमी निधी उभारण्यात आला व परकी भांडवलदारांस नफा, लाभांश, व्याज किंवा भांडवल वर्ग करण्यास सवलत दिली गेली. पूर्वी गव्हाची शेती व द्राक्षमळे यांत परदेशी भांडवल गुंतत असे ते आता खाणी, वाहतूक उद्योग यांत येऊ लागले. सर्व परकीय भांडवल गुंतवणुकीस शासकीय परवानगी लागते. खाणी राष्ट्रीय मालकीच्या आहेत व खनिजांचा शोध घेण्यास परवाना घ्यावा लागतो.

व्यापार :देशांतर्गत व्यापार–ट्युनिस हे सर्वप्रमुख व्यापारी आणि वितरणकेंद्र असून तेथे बँका, आयात-निर्यात कचेऱ्या तसेच खाणी व इतर उद्योगधंद्यांची कार्यालये आहेत. स्फाक्स हे ऑलिव्ह तेल व फॉस्फेट यांच्या निर्यातीचे आणि बीझर्ट हे धान्य व ऑलिव्ह तेल यांचे केंद्र आहे. सूस हे एस्पार्टो गवताचे केंद्र आहे. प्रमुख शहरी दरवर्षी व्यापारी जत्रा भरविण्यात येतात. व्यवहारांची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी २ ते संध्याकाळी ६ पर्यंत असते. दुकाने व कार्यालये शनिवारी अर्धवेळ उघडी राहतात.

परदेशी व्यापार – १९६९ ची एकूण आयात १३,९१,८२,३०० दिनारांची होती. त्यात विजेची सोडून इतर यंत्रे १२·७% त्यांपैकी खास उद्योगांसाठी १·८% गहू ९·८% कापड, कपडे इ. ७·४% त्यांपैकी दोरा व कापड ४·४% विजेची यंत्रे, उपकरणे इ. ७·३% त्यांपैकी दूरसंदेशवहन सामग्री १·८% लोखंड व पोलाद ५·२% वाहने ४·५% त्यांपैकी वाहनाचे सुटे भाग १·८% औषधे व औषधी पदार्थ २·७% अशुद्ध व अंशतः शुद्ध खनिज तेल २·५% वनस्पती तेल २.५% साखर २·३% होती. यांपैकी फ्रान्सकडून ३३·१% अमेरिका २०·३% इटली ९% प. जर्मनी ७·६% ब्रिटन २·९% पोलंड १·९% रशिया १·९% यूगोस्लाव्हिया १·८% अशी आयात झाली.

१९६९ ची एकूण निर्यात ८,६९,५८,००० दिनारांची होती. त्यापैकी अशुद्ध व अंशतः शुद्ध खनिज तेल २४·३%, ऑलिव्ह तेल १२·५%, नैसर्गिक फॉस्फेट १०·६%, फॉस्केट खते ९·४%, ताज्या द्राक्षांची दारू ४%, संत्री, मोसंबी व मँडरीन ३·९%, धातुके आणि धातूंचे टाकाऊ तुकडे इ. ३·६%, त्यांपैकी लोहधातुक २%, शिसे व मिश्रधातू २·६%, लोखंड व पोलादी सळया आणि इतर स्वरूपातील सामान २·३%, रद्दी कागद व लगदा २·१% अशी निर्यात होती. यांपैकी फ्रान्सला २६·६%, प. जर्मनीला १३·९%, इटलीला १३·५%, लिबियाला ७·३%, स्वित्झर्लंडला ५·८%, बल्गेरियाला ४·९%, ब्रिटनला ३·१%, यूगोस्लाव्हियाला ३·१% अशी निर्यात झाली.

१९७०, १९७१ व १९७२ सालांची आयात व निर्यात खालील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे होती. बेल्जियम, लक्सेंबर्ग, ब्राझील, इराक, नेदर्लंड्स, पोलंड, अल्जीरिया इ. अनेक देशांशीही ट्युनिशियाचा आयात-निर्यात व्यापार चालतो.

तक्ता

साल

आयात (लक्ष दिनार)

निर्यात (लक्ष दिनार)

१९७०

१,६०३·९६

९५८·०४

१९७१

१,७९९·५८

१,१३३·०४

१९७२

२,२२२·००

१,५०३·००

सामान्यत: देशाचा व्यवहारशेष प्रतिकूलच असतो. तथापि नियोजन, उद्योगधंद्यांची वाढ, काटकसर इ. मार्गांनी तो अनुकूल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नियोजनाद्वारा आर्थिक विकास साधण्याचे ट्युनिशियाचे धोरण आहे. १९६२ ते १९७१ च्या दशवार्षिक योजनेत १९६२–६४ ची त्रिवार्षिक व १९६४–७१ ची सप्तवार्षिक अशा दोन योजना अंतर्भूत होत्या. एकूण राष्ट्रीय उत्पादनात ६% वाढ व्हावी हा उद्देश होता. त्यासाठी ११७·६८ कोटी दिनारांची तरतूद केलेली होती. त्यांपैंकी ३७·५ कोटी दिनार परदेशांकडून मिळवावयाचे होते. शेतीवर २०%, उद्योगधंद्यांवर ११% प्रशिक्षण ६%, पर्यटन २% अधःसंरचना ३८% अशी खर्चाची विभागणी होती. योजना संपूर्णतः यशस्वी झाली नाही, तरी बऱ्याच अंशी फलद्रूप झाली. त्यानंतर १९७२–७६ अशी चतुर्वार्षिक योजना चालू आहे. मेजेर्दा नदीयोजना हाती घेतली असून त्यामुळे दर वर्षी ३ कोटी किवॉ. वीज मिळून ५०,००० हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. मध्य व दक्षिण भागाच्या विकासासाठी २० वर्षांत सु. १ अब्ज डॉलर खर्च होईल. ऑलिव्ह तेलाची किंमत निश्चित करणे, जमिनी ताब्यात घेऊन त्यांचे फेरवाटप करणे इ. गोष्टी आर्थिक धोरण सूचित करतात. शेती, फळबागा, खाणी व उद्योगधंदे यांचा आधुनिक पद्धतीने विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

वाहतूक व दळणवळण :अल्जीरिया व मोरोक्को यांच्याशी लोहमार्गाने व सडकेने आणि ट्रिपोली (लिबिया) व कैरो यांचेशी सडकेने ट्युनिशिया जोडलेला आहे. देशातील सर्व विभाग रस्ते व लोहमार्ग यांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहेत. १९६९ मध्ये २,३०५ किमी. लोहमार्ग आणि १९७१ मध्ये १८,२६७ किमी. सडकांपैकी १०,४८३ किमी. प्रमुख व ५,६०३ किमी. दुय्यम सडका होत्या. रेलगाडीचा प्रवास सावकाशीचा व कमी सुखसोयींचा असला, तरी दर वर्षी सु. एक कोटी लोक रेलप्रवास करतात. प्रमुख मार्गांखेरीज बाकीचे रस्ते अरुंद आहेत. दक्षिणेकडे अद्यापही उंटाला महत्त्व आहे. १९७३ मध्ये देशात ७४,६२७ खाजगी मोटारी ४१,५०६ बसगाड्या, मालट्रक इ. १९,६६१ ट्रॅक्टर व १०,०६३ मोटरसायकली होत्या. ट्युनिस, ला गूलेट, बीझर्ट, सूस, स्फाक्स व गॅबेस ही प्रमुख बंदरे आहेत. ला साकीरा (अस सुखायरा) हे खास खनिज तेलाचे बंदर आहे. तेथपर्यंत अल्जीरियातून तेलनळ आणलेला आहे. गॅबेस येथे सर्वसामान्य माल, खनिजे व तेल यांच्या सोयी असलेले एक त्रिविध बंदर निर्माण होत आहे. ट्युनिसजवळचा एल् आवीना (अल् आउना) व ट्युनिस-कार्थेज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून मॉनस्तिर, जेर्बा, स्फाक्स, गॅबेस व तोझर येथे आंतर्देशीय विमानतळ आहेत. ट्युनिस एअर ही राष्ट्रीय विमान कंपनी आहे. ट्युनिशियाचा लिबियाशी संपर्क लघुलहरींनी व अल्जिअर्स व राबात यांच्याशी दूरध्वनीने साधता येतो. तसेच सिसिली व मार्सेलद्वारा अनुक्रमे ट्युनिसहून व बीझर्टहून यूरोपातील स्वयंचलित यंत्रणेचा लाभ घेता येतो. १९७२ मध्ये देशात ८८,०६० दूरध्वनी, २,७७,१४५ रेडिओ व १,४७,१०४ दूरचित्रवाणी संच होते. १९६६ मध्ये ३८१ डाकघरे व एक बिनतारी प्रक्षेपण केंद्र होते.


लोक व समाजजीवन :ट्युनिशियातील लोक भूमध्यसामुद्रिक कॉकेसाइड वंशाचे, त्यांत थोडेसे दक्षिणेकडील निग्रॉइडांचे मिश्रण असलेले आहेत. येथील मूळच्या बर्बर लोकांचा फिनिशियन, हिब्रू, ग्रीक, रोमन, व्हँडाल, बायझंटिन, अरब, स्पेनमधील मूर व तुर्क यांच्याशी संबंध येऊन तेथील आजचा समाज बहुतांशी बनलेला आहे. दक्षिणेकडील पुष्कळसे बर्बर अरब लोक गौरवर्णी, धारदार नाकाचे, काळ्या व पिंगट डोळ्यांचे, आखूड हनुवटीचे, काळ्या व पिंगट केसांचे, ग्रीकांसारख्या बांध्याचे सुंदर गणले गेलेले आहेत. उत्तरेकडे ज्यू व अन्य युरोपीय लोकांची भेसळ झालेली दिसते. त्यांत मुख्यतः फ्रेंच, इटालियन व थोडे मॉल्टातील लोक आहेत. ते ट्युनिशियनांपेक्षा अगदीच निराळे आहेत. पूर्वी तेच सत्ताधीश व आर्थिक क्षेत्रातही प्रभावी होते. तंत्रज्ञ व कुशल कामगार तेच असत. ते क्रमशः कमीकमी झाल्याने त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही. येथील ज्यू लोक फिनिशियनांबरोबर सु. तीन हजार वर्षांपूर्वी आलेले व नंतर १४९२ मध्ये स्पेनमधून परांगदा झालेले असून ते सर्व नगरवासी आहेत. ते बहुतेक यूरोपीय प्रभावाखालचे होते, मात्र जेर्बा बेटावरले ज्यू प्राचीन परंपरेचे आहेत. १९५६ मध्ये ५७,७९२ संख्येने असलेले ज्यू १९६४ मध्ये ३०,००० पर्यंत घटले. सिसिलीतून अकराव्या शतकात आलेले मुस्लिम निर्वासित साहेलमध्ये व स्पेनमधून तेराव्या ते सतराव्या शतकांपर्यंत आलेले सु. दोन लक्ष मुस्लिम ट्युनिस, मेजेर्दा खोरे व केप बॉन द्वीपकल्प येथे वस्ती करून राहिले. यांनी नागरी परंपरा शेतीतील व सिंचाईतील सुधारणा आणल्या. सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांपर्यंत तुर्कांनी अनेक आशियाई व युरोपीय संस्कृतींच्या गोष्टी आणल्या. १९५६ मध्ये अडीच लाख असलेले बिगरमुस्लिम लोक १९७०–७३ मध्ये फक्त चाळीस हजारपर्यंतच उरले. देशात १३,००० रोमन कॅथलिक असून ग्रीक चर्च, फ्रेंच प्रॉटेस्टंट व इंग्लिश चर्चचे काही अनुयायी आहेत. येथील मुस्लिम अरब मुख्यतः सुन्नी पंथीय असून देशाचा अधिकृत धर्म इस्लाम असला, तरी धर्मस्वातंत्र्याची हमी संविधानातच आहे.

ट्युनिशियातील लोकसंख्येचे वितरण अत्यंत विषम आहे. उत्तेरकडील देशाच्या सु. ३०% भागात लोकसंख्येपैकी सु. ७०% लोक राहतात. लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ. किमी. ३३·६ आहे परंतु उत्तरेकडे ती दर चौ. किमी.ला ७२, तर स्टेप गवताळ प्रदेशात दर चौ. किमी.ला फक्त १० आहे. दक्षिणेकडे अगदी अंतर्भागात ती दर चौ. किमी. २·८ तर ट्युनिस विलायतेत दर चौ. किमी. १०१·६ आहे. संतती नियमनाचा अवलंब करूनही लोकसंख्या वाढीचा वेग मोठा (वर्षाला शेकडा २·५) आहे. ४६% लोकसंख्या १५ वर्षे वयाखालची आहे. या वाढीमुळे देशांतरास उत्तेजन मिळून सु. १,३०,००० ट्युनिशियन लोक बाहेरदेशी काम करतात. त्यांपैकी ८०,००० फ्रान्समध्ये, ३०,००० लिबियात व १०,००० जर्मनीत आहेत.

देशातील सु. ३०% लोकसंख्या नगरवासी असून त्यांपैकी जवळजवळ निम्मे लोक ट्युनिसमध्ये आहेत. इतर मोठ्या शहरांची लोकसंख्याही १९४६ ते १९५६ या काळात ३०% वाढली. लोकसंख्या वाढीच्या वेगाप्रमाणेच यांत्रिकीकरणामुळे झालेले शेतमजुरांचे विस्थापन व वर्षातून ठराविक काळातच शेतावर काम मिळणे यामुळे लोक शहरांकडे धाव घेऊ लागले. या अकुशल ग्रामीण लोकांच्या ओघामुळे शहरांभोवती गलिच्छ वस्त्या व गुर्बी म्हणजे वाटोळ्या, कुडाच्या भिंतीच्या व शंक्वाकार छपरांच्या झोपड्या यांची वाढ झाली. तेथील लोक पुन्हा आपापल्या ठिकाणी जाण्यास नाखूष असल्यामुळे अशा वस्त्यांचे निर्मूलन करण्याचे शासकीय धोरण फारसे यशस्वी झालेले नाही. मागरिब प्रदेशात ट्युनिशियाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शहरातील मध्यमवर्गीय लोकांची वस्ती यांची राहणी, आचारविचार इ. ग्रामीण लोकांपेक्षा सुविकसित असल्यामुळे फ्रेंच संरक्षणकाळात त्यांचा यूरोपीय संस्कृती व मूल्ये यांच्याशी निकट संबंध येऊन देशातील आधुनिक मध्यमवर्ग निर्माण झाला.

समाजकल्याण व आरोग्य :शेतमजुराची दररोजची मजुरी ०·६ दिनारपर्यंत तर कामगाराचे मासिक वेतन सु. २५ दिनार असते. शासकीय सेवेतील वेतन निदान ३५ दिनार असते. खासगी सेवेत यापेक्षा अधिक ५० ते २५० दिनार वेतन असते. बऱ्यापैकी घराला दरमहा १०० दिनारांपर्यंत भाडे पडते तर अधिक वरच्या दर्जाच्या, सर्व सुखसोयींयुक्त व आरामशीर घराला २०० दिनारांच्या पुढे भाडे पडते. शासकीय सामाजिक सुरक्षा यंत्रणेचा लाभ आजारीपणा, बाळंतपण व वृद्धत्व यांसाठी मिळतो. ८०% लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. सामाजिक सुरक्षा विभाग समित्या वृद्ध, गरजू व अनाथ यांची काळजी घेतात. अर्भकांना दूध आणि शाळकरी मुलांना दुपारचे जेवण मिळते. १९७२ मध्ये ९२ रुग्णालये व त्यांत १३,५५० खाटा होत्या, ३७४ ट्युनिशियन व ४९० परदेशी डॉक्टर, २३३ औषधनिर्माते, ६५ दंतवैद्य व ४२ पशुवैद्य होते.

शिक्षण : स्वातंत्र्यपूर्व काळात तद्देशीयांसाठी पवित्र कुराणाच्या वर्चस्वाखालील शाळा प्रभावी होत्या. कुराणपठण, थोडेसे अंकगणित, लिहिणे, वाचणे व धर्मशिक्षण यांवर भर असे. ह्यातून विद्यापीठात उच्च धार्मिक शिक्षण मिळे. १८७० मध्ये आधुनिक अभ्यासक्रमाचे सादिक कॉलेज निघाले. तेथे अरबी व फ्रेंच या दोन्ही भाषा व दोन्ही संस्कृतींचे शिक्षण मिळे. त्यामुळे आधुनिक राजकीय विचारसरणी व नवीन शिक्षणपद्धती यांचा पाया घातला गेला. फ्रेंचांनी या प्रवृत्तीस उत्तेजन दिले नाही तरी यूरोपीयांसाठी प्राथमिक, माध्यमिक आणि विद्यापीठीय शिक्षणांची सोय केली. बरेच ट्युनिशियन विद्यार्थी अशा धर्तीच्या शाळांतून जात. फ्रेंचांनी कुराणप्रभावी शाळांना हात लावला नाही. स्वातंत्र्योत्तर काळात सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण देणारी, सादिकी धर्तीची एकच शिक्षण पद्धती अंमलात आणली गेली. मार्च १९६० मध्ये ट्युनिस विद्यापीठ स्थापन झाले. आता विद्यापीठांपर्यंतही शिक्षण सर्वांस मोफत असून लायकी आणि गरज याप्रमाणे शिष्यवृत्त्या दिल्या जातात. १९५६ मध्ये प्राथमिक शिक्षण घेणारे ७५,००० मुलींसह २,२५,००० विद्यार्थी होते ते १९७० मध्ये ३,७०,००० मुलींसह ९,३५,००० झाले. माध्यमिक शाळांतील विद्यार्थी ३०,००० चे १,९५,००० आणि उच्च शिक्षणाचे २,००० चे १०,००० झाले. या वाढीचा परिणाम काहीसा शिक्षणाचा दर्जा खालावण्यात झाला व शिक्षणानंतर पोटाचा धंदा मिळेलच याची शाश्वती कमी झाली. यासाठी १९७१ मध्ये शिक्षण सुधारणा मंडळ नेमून तांत्रिक व शेतकी शिक्षणावर भर देण्यात आला आहे. १९५५ मध्ये एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय स्थापिले आहे. तसेच एक विधिविषयक माध्यमिक शाळा, एक आर्थिक अभ्यासाचे केंद्र, एक अभियांत्रिकी शाळा, एक वैद्यकीय शाळा, एक शेतकी शिक्षण शाखा आणि एक व्यापार व्यवस्थापकीय संस्था स्थापन झाल्या आहेत. १९७३–७४ मध्ये प्राथमिक शाळांत ९,४३,००० विद्यार्थी माध्यमिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शाळांतून १,७८,६५० विद्यार्थी व उच्च शिक्षण घेणारे १४,७५० विद्यार्थी होते. शाळेत जाण्याच्या वयाची ७२% मुले शिक्षण घेत आहेत. पाचांपैकी एक माणूस कोणत्या तरी शाळेत जात असतो. प्राथमिक शाळांत अरबी ही प्रमुख भाषा असते. वरच्या वर्गांत त्याऐवजी फ्रेंच भाषा उपयोगात येते. वृत्तपत्रे, शिक्षण आणि शासन यांत फ्रेंच भाषेचा अद्याप मोठाच प्रभाव आहे. दक्षिणकडे जेमतेम एक टक्का लोक मूळ बर्बर भाषा बोलतात.

कला-क्रीडा :फ्रेंच भाषेतून ट्युनिशियन साहित्य लिहिण्याचा प्रयोग यशस्वी झाला नाही. शास्त्रीय स्वरूपाच्या लेखनात फ्रेंचचा उपयोग सर्वत्र होतो, तथापि ललित साहित्यात अरबीचे वर्चस्व हेतुपूर्वक राखले जाते. अल् फ्रिकसारखी साहित्यचर्चा करणारी नियतकालिके तरुण लेखकांना उत्तेजन देतात. ठिकठिकाणची साहित्यमंदिरे  शासनाच्या पाठिंब्याने ट्युनिशियन साहित्याच्या सर्वांगीण वाढीचा प्रयत्न करतात. चित्रकला आणि संगीत यांच्या अभिवृद्धीचेही प्रयत्न होत आहेत. ट्युनिशियन चित्रपटकला अद्याप बाल्यावस्थेत असली, तरी काही छोटे चित्रपट यशस्वी ठरले आहेत. १९७२ मध्ये १०९ चित्रपटगृहांतून ४७,००० प्रेक्षकांची सोय होती. फिरती ग्रंथालये देशात सर्वत्र पुस्तके व चित्रपट पोहोचवितात. ट्युनिसच्या राष्ट्रीय ग्रंथालयात पाच लाखांहून अधिक ग्रंथ असून त्यात पौर्वात्य हस्तलिखितांचा संग्रहही आहे. बार्दो, सूस, मॉनस्तिर, स्फाक्स, कार्थेज इ. ठिकाणी महत्त्वाची वस्तुसंग्रहालये आहेत.

ट्युनिसहून दोन अरबी आणि दोन फ्रेंच दैनिके प्रसिद्ध होतात. त्यांत ॲक्शन हे फ्रेंच व अरबीमधील दस्तुर पक्षाचे मुखपत्र प्रमुख आहे. तसेच तेथून १७ नियतकालिके प्रसिद्ध होतात. त्यांत कामगार संघटना, युवक संघटना, व्यापार, सांख्यिकी, अर्थशास्त्र, समाज आणि संस्कृती, प्रक्षेपण, संरक्षण, स्त्रियांचे विविध प्रश्न, उद्योगधंदे, संदर्भ इ. अनेक विषयांवरील नियतकालिके आहेत. स्फाक्स व सूस येथून व्यापार संघटनांची  नियतकालिके निघतात.


सांस्कृतिक मंत्रालय सर्व राष्ट्रीय सांस्कृतिक गोष्टींची व्यवस्था पाहते. हाम्मामेत येथे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र असून त्याने एक रंगमंडल-ॲम्फिथिएटर बांधले आहे. तेथे नट व विद्यार्थी यांच्यासाठी उन्हाळी नाट्यशिक्षणशाळा चालविली जाते. ट्युनिस व हाम्मामेत येथे चांगली नाट्यगृहे आहेत. कार्थेज येथे दर वर्षी आंतरराष्ट्रीय कला-उत्सव भरतो. मॉनस्तिर येथे अल्जीरिया, मोरोक्को, लिबिया व ट्युनिशिया येथील नाट्यसंघाचे उत्सव होतात.

ट्युनिशियात फुटबॉल, पोहणे आणि मुष्टियुद्ध हे क्रीडाप्रकार फार लोकप्रिय आहेत.

पर्यटन : पर्यटन हा एक मोठाच राष्ट्रीय व्यवसाय झाला आहे. जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, लिबिया, स्वीडन, स्वित्झर्लंड, अल्जीरिया, अमेरिका व मोरोक्को येथून १९७१ मध्ये एकूण ६,७३,१०० प्रवासी आले. १९७४ मध्ये ही संख्या ७,१६,००० झाली. ट्युनिसजवळच्या बार्दो येथील वस्तुसंग्रहालयातील कार्थेजी व रोमन काळांतील अवशेष, रोमन मोझेइकचे संग्रह, सूस वस्तुसंग्रहालयातील इ. स. पू. सहाव्या शतकापासून इ. स. सहाव्या शतकापर्यंतचे वास्तुशिल्पाचे नमुने, एल् जेम (थायसद्रस) येथील आखाडा–कलॉसियम, दूग्गा येथील मंदिरे, कार्थेज्ञ येथील तलाव, ट्युनिसजवळील जलसेतू, गाफ्सा येथील रोमन स्नानगृह, हुजेर व जेरीद येथील मशिदींची सारसांनिक कला, गॅबेसच्या मशिदीतील मूर कला, सीदी बू झीद हे निसर्गरम्य गाव, ट्युनिसाचा सुगंधी द्रव्यांचा बाजार व सुंदर पुळणी ही हौशी प्रवाशांची प्रमुख आकर्षणे आहेत. प्रवाशांसाठी केलेल्या विश्रामगृहे, रस्ते इ. सोयींमुळे पर्यटन व्यवसाय तेजीत आहे. १९७०–७२ मध्ये देशाबाहेरील ट्युनिशियनांनी पाठविलेल्या पैशांप्रमाणेच भांडवलवाढीमुळे व पर्यटनापासून मिळालेल्या उत्पन्नामुळेही देशाचा व्यवहारशेष फायद्याचा होऊ शकला.

आर्थिक विकासाच्या समस्येला शेती उत्पादनातील वाढ, कामगारांचे योजनाबद्ध देशांतर, थोडे भांडवल व अधिक श्रम लागणाऱ्या उद्योगांस उत्तेजन, कुटुंबनियोजन, खनिजांचा योग्य लाभ उठविणे इ. मार्गांनी तोंड देऊन आजचा ट्युनिशिया आधुनिक जगात निश्चयाने पाऊल टाकीत आहे.

संदर्भ :

1. Kittler, Glenn, Mediterranean Africa : Four Muslim Nations, London, 1969.

2. Ling, D. D. Tunisia from Protectorate to Republic, Bloomington, 1967.

3. Moore, C. H. Tunisia Since Independence, Berkeley, 1965.

खांडवे, म. अ. कुमठेकर, ज. ब.


ट्युनिशिया


खुले नाट्यगृह, एल्. जेम.   प्रसिद्ध स्नानगृह, पार्श्वभागी ट्रेजनची विजयी कमान, माक्तार.   जरदाळू : साहेल भागातील प्रमुख उत्पादन, ट्युनिशिया.   उंटाची मोट : ट्युनिशियातील पारंपरिक पाणीपुरवठ्याची पद्धत.   मरूद्यानातील शेती, ट्युनिशिया.      ट्युनिशियाची परंपराप्रसिद्ध मृत्पात्री   कार्थेजियन थडगे : डूग्गा, ट्युनिशिया