हृषीकेश : हृषिकेश. उत्तराखंड राज्याच्या डेहराडून जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र. हे डेहराडूनच्या आग्नेयीस सु. ४२ किमी. व हरद्वारच्या उत्तरेस सु. २५ किमी.वर गंगा नदीच्या किनारी, सस.पासून ३७२ मी. उंचीवर वसलेले आहे. लोकसंख्या १,०२,१३८ (२०११). हे स्थान निसर्गरम्य असून गंगा नदीच्या सान्निध्यामुळे यास पावित्र्य आले आहे. रस्त्यांनी हे महत्त्वाच्या शहरांशी व लोहमार्गाने हरद्वारशी जोडलेले आहे. हृषीकेश रोड हे येथील रेल्वेस्थानक आहे. हृषीकेशला गढवाल हिमालयाचे प्रवेशद्वार मानले जाते. येथून यम्नोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथकडे यात्रेकरू जातात. 

 

हृषीकेश हे श्री विष्णू देवतेचे एक नाव आहे. हृषीक म्हणजे मानव देहाची इंद्रिये होत. त्यांचा ईश म्हणजे स्वामी, तो हृषीकेश होय. याठिकाणी एकेकाळी असंख्य ऋषिमुनी तपश्चर्या करीत होते. त्यांनाराक्षसांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे श्री विष्णूंनी त्यांचा संहार केलाव हे स्थान ऋषिजनांना निर्वेध करून दिले. ऋषींचा ईश म्हणजे रक्षणकर्ता म्हणून यास ऋषिकेश असेही संबोधण्यात येते. दंतकथेनुसार येथील मुनिकी रेती या क्षेत्री रैभ्य ऋषीनी मौन धारण करून तपश्चर्या केली म्हणून यासमुनिकी रेती असे म्हटले जाते. रैभ्य मुनी कुबडे होते व त्यांना श्री विष्णूंनी आम्रवृक्षावर दर्शन दिले, त्यामुळे यास कुब्जाम्रक असेही म्हणतात. रामाने रावणादी राक्षसांचा वध केला. त्या पापपरिहारासाठी राम व लक्ष्मण यांनी येथे तप केले, अशीही आख्यायिका आहे.

 

हृषीकेश गंगा नदीच्या दोन्ही किनारी वसलेले असून त्याचे हृषीकेश नगर, मुनिकी रेती, राम व लक्ष्मण झुला मंदिर परिसर, शिवानंदनगर, स्वर्ग आश्रम असे प्रभाग आहेत. येथे साधूंचे अनेक आश्रम व आखाडे असून गंगा नदीवरील लक्ष्मण झुला पूल प्रसिद्ध आहे. येथील कालीकमलीवाले धर्मशाळा, स्वर्ग आश्रम, गीता भवन, परमार्थ निकेतन आश्रम, श्री भरत मंदिर, श्री शत्रुघ्न मंदिर, चंद्रेश्वर महादेव मंदिर, श्रीराम मंदिर, श्री लक्ष्मण मंदिर, श्री संत सेवाश्रम, महर्षी महेश योगी आश्रम, ओंकारनंद गंगासदन, शिवानंद आश्रम इ. प्रसिद्ध आहेत. 

 

हृषीकेश येथे अनेक योग केंद्रे असून यास जगाची योगाची राजधानी असे संबोधतात. आयुर्वेदिक अभ्यासक्रम व आयुर्वेदिक उपचारांसाठीहे प्रसिद्ध आहे. परंपरागत वैदिक शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले कैलास आश्रम ब्रह्म विद्यापीठ येथे आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातयेथे आंतरराष्ट्रीय योग जत्रा भरते. सायंकाळी गंगा नदीच्या घाटावर होणारीगंगा आरती तीर्थयात्रेकरूंसाठी मोठे आकर्षण असते. 

चौधरी, शंकर रामदास