मार्तंडमार्तंड : जम्मू व कश्मीर राज्याच्या अनंतनाग जिल्ह्यातील प्राचीन सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हिंदूंचे पवित्र ठिकाण. हे श्रीनगरच्या आग्नेयीस सु. ६५ किमी. व अनंतनागच्या ईशान्येस ८ किमी. वर आहे. येथील सूर्यमंदिर एका उंच पहाडावर बांधलेले असून ते सध्या भग्नावस्थेत आहे.

हे ठिकाण ‘बवन’ (भवन) या नावानेही ओळखले जाते. राजतरंगिणीमध्ये याचा ‘सिंहरोत्सिका’ असा उल्लेख आढळतो. भाविकांच्या मते हे ठिकाण सूर्यदेवाचे जन्मस्थान असून येथील मंदिर पांडवांनी बांधलेले असावे. जनरल कनिंगहॅमच्या मते हे मंदिर ३७० मध्ये बांधले गेले. काही तज्ञ ते आठव्या शतकात ललितादित्य राजाने बांधल्याचे मानतात. सुलतान सिकंदर बत्‌शिकन (कार. १३९३–१४१६) याने हे मंदिर उद्‌ध्वस्त केले.

मंदिराचे आवार ६७ मी. लांब व ४३ मी. रूंदीचे असून त्याच्याभोवतीच्या तटवजा भिंतीत आतल्या बाजूने ओवऱ्यांच्या जागा दिसून येतात. १८ मी. लांब व १२ मी. रुंदीच्या या मंदिराचे अर्धमंडप, अंतराळ व गर्भगृह असे तीन भाग आहेत. यांपैकी अंतराळभागात एका हातात जलपात्र व दुसऱ्या हातात कमलपुष्प घेतलेली गंगेची मूर्ती असून मूर्तींच्या दोन्ही बाजूंना छत्रचामरधारी परिचारिका आहेत. अंतराळाच्या भिंतींवर अनेक सुंदर कोरीव मूर्ती असून तटाच्या पश्चिम बाजूला त्रिमुखी (वराह, नृसिंह, विष्णू) व अष्टभुजा विष्णूची मूर्ती आहे. येथील सूर्यरथाला सहा घोडे असून त्याचे सारथ्य स्वतः सूर्यनारायणाकडे आहे. मंदिराच्या बाह्य रचनेत ग्रीक व रोमन शिल्पकलेची छाप दिसते. इतर मूर्तिकामात आणि कमानी खांबांच्या बांधकामात काश्मीरी वास्तुकलेचा ठसा दिसून येतो.

मंदिराच्या वायव्येस सु. १·५ किमी. अंतरावर ‘मार्तंड-तीर्थ’ नावाची पाण्याची कुंडे आहेत. त्यांपैकी ‘विमला’ व ‘कमला’ या कुंडांना धार्मिक दृष्ट्या बरेच महत्त्व आहे. येथे सूर्योपासना व श्राद्धादी कर्मे केली जातात.

चौधरी, वसंत