मंगमरी-१ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ॲलाबॅमा राज्याची राजधानी. लोकसंख्या १,७८,१५७ (१९८०). हे बर्मिंगहॅमच्या दक्षिणेस १६१ किमी. ॲलाबॅमा नदीकाठी वसलेले आहे. हे एक ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध असून दळणवळणाचे केंद्र आहे. तसेच याच्या जवळील गंटर व मॅक्सवेल हे विमानतळ प्रसिद्ध आहेत. या भागात प्रथम १८१४ मध्ये वसाहतकारांचे आगमन झाले व १८१७ मध्ये येथे पूर्व ॲलाबेमा वन्यू फिलाडेल्फिया ही शहरे वसविली गेली. १८१९ मध्ये या दोन्ही शहरांचे एकत्रीकरण करण्यात येऊन, जनरल रिचर्ड मंगमरी (१७३८-७५) याच्या स्मरणार्थ शहरास मंगमरी असे नाव देण्यात आले. कापूस विक्री केंद्र व आसमंतातील प्रमुख व्यापाराचे व वस्तूंचे वितरण केंद्र म्हणून याचा विकास झाला. तसेच लोहमार्गासारख्या दळणवळणाच्या सुविधेमुळे औद्योगिक क्षेत्रातही शहराची भरमराट होऊन येथील लोकसंख्या वाढली. १८४७ मध्ये ही राज्याची राजधानी करण्यात आली. अमेरिकन यादवी युद्धकाळात दक्षिणेच्या ‘कन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिका’  या राज्यसमूहाची राजधानी सुरुवातीला येथेच होती (१८६१), त्यामुळे ‘क्रेडल ऑफ कन्फेडरसी’ म्हणून हे शहर ओळखले जाऊ लागले. १८६५ मध्ये हे राष्ट्रीय सैन्याने काबीज केले. युद्धोत्तर काळात शहराची प्रगती झाल्याचे आढळते. १९५० व १९६० मध्ये निग्रोंच्या मुलकी हक्कांसाठी मार्टिन ल्यूथर किंगने येथे उभारलेले बहिष्कार आंदोलन तसेच येथील बससुविधांतील काळे व गोरे असा भेद दूर करण्यासाठी किंगने बसवाहतुकीवर घातलेला शांततामय बहिष्कार व त्यामुळे नाहीसा झालेला भेदाभेद इ. घटनांमुळे या शहरास अधिकच प्रसिद्धी मिळाली.

औद्योगिक दृष्ट्या मंगमरी भरभराटलेले असून येते मांस डबाबंदीकरण, कापड, रसायने, खते, अन्नप्रक्रिया, काच लोहमार्ग, यंत्रसामग्री, लाकूडकाम इ. उद्योग विकसित झालेले आहेत. आसमंतातील कृषिमालाची, प्रामुख्याने कापसाची, तसेच जनावरांची ही एक भव्य बाजारपेठ आहे.

हे एक शैक्षणिक केंद्र असून येथे ॲलाबेमा राज्य विद्यापीठ, ऑबर्न विद्यापीठ तसेच इतर अनेक शैक्षणिक संस्था आहेत. येथील कन्फेडरेशनचे पहिले व्हाइट हाउस (सु. १८२५), सेंट पीटर रोमन कॅथलिक चर्च (१८५२), ‘स्टेट कॅपिटॉल बिल्डिंग’, ‘पार्कर कॉडी हाउस’ (१८२३), ‘म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्स’, कृत्रिम तारामंडळ इ. उल्लेखनीय आहेत.

गाडे, ना. स.