रॉचेस्टर : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यूयॉर्क राज्यामधील एक मोठे औद्योगिक, व्यापारी व सांस्कृतिक शहर. लोकसंख्या शहर २,४१,७४१ (१९८०), महानगरीय ९,७१,८७९(१९८२ अंदाज). न्यूयॉर्क राज्यातील न्यूयॉर्क व बफालो या दोन मोठ्या शहरांनंतर रॉचेस्टरचा क्रमांक लागतो. जेनेसी नदीकाठावर वसलेले हे शहर बफालोच्या ईशान्येस सु. ११२ किमी. अंतरावर आहे.

               

जेनेसी नदीच्या धबधब्याशेजारी एबनीझर ॲलन या श्वेतवर्णीय वसाहतकाराने १७८९ मध्ये सेनेका इंडियनांच्या गरजा भागविण्यासाठी त्याला मिळालेल्या ४० हे. जमिनीवर एक पीठगिरणी उभारली. परंतु हा त्याचा उपक्रम अयशस्वी ठरून त्याला ही जमीन कर्नल नाथान्येल रॉचेस्टकरला व मेरिलंडमधील रहिवाशांना विकावी लागली. १८११ मध्ये रॉचेस्टरने या जमिनीचे तुकडे पाडून विक्रीसाठी खुले केले व १८१७ मध्ये ‘रॉचेस्टरव्हिल’ या नावाने गाव वसविण्यात आले. १८२२ मध्ये त्याचा ‘रॉचेस्टर’ असा संक्षेप करण्यात आला. येथील विपुल जलसंपत्ती, सुपीक भूमी, ईअरी कालव्यामधून वाहतुकीस प्रारंभ (१८२०−२५) तसेच रेल्वे वाहतूक (१८३९) या सर्वांमुळे १८४०−४५ च्या सुमारास रॉचेस्टर हे पश्चिमेकडील भरभराटलेल्या नगरांपैकी एक (बूम सिटीज) म्हणून ओळखले जाऊ लागले. जेनेसी नदीकाठी अनेक पीठगिरण्या उभारण्यात आल्या व त्यांयोगे रॉचेस्टर हे ‘पीठनगर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या भागातील पीठगिरणवाले पश्चिमेकडे मिनेसोटा राज्याकडे आपला व्यवसाय स्थलांतरित करू लागले, तेव्हा रोपवाटिका उद्योगाला जोराची चालना मिळाली आणि विविध वनस्पती व बी-बियाणी यांची डाकव्यापाराद्वारे विक्री सुरू करण्यात या शहराने आघाडी मिळविली. अनेक रोपवाटिकांमुळे रॉचेस्टर हे ‘पुष्पनगर’ म्हणूनही प्रसिद्धी पावले. यादवी युद्धामुळे (१८६०−६५) वस्त्रे व पादत्राणे या दोन उद्योगधंद्यांना बरकत आली. १८९०−१९०० च्या दरम्यान जॉर्ज ईस्टमन, जॉन जेकब बाउश, हेन्रीद लॉम यांसारख्या उद्योजकांनी अनुक्रमे छायाचित्रीय, प्रकाशकीय व तसेच अचूक यंत्रे व उपकरणे यांच्या उत्पादनांचे कारखाने उभारले व विकसित केले. कोडॅक कॅमेऱ्यांची विक्री ईस्टमननेच सुरू केली. मार्गारेट व केट फॉक्स या चैतन्यवादी लोकांनी (स्पिरिच्युॲलिस्ट) १८४० पासून रॉचेस्टरमध्ये आपल्या बैठका भरवून सबंध जगाचे आपणाकडे लक्ष वेधून घेतले होते. फ्रेडरिक डग्लस या कृष्णवर्णीय उन्मूलनवाद्याने (ॲब्सोलूसनिस्ट) आपले नॉर्थ स्टार नावाचे गुलामीविरोधी वृत्तपत्र येथच छापले (१८४७). स्त्रीमताधिकाराचा आग्रह धरणारी सूझन बी. अँटनी ह्या पहिल्या महिलेचे १८६६ ते १९०६ असा प्रदीर्घ काळ याच शहरात वास्तव्य होते. १९००−१० या काळात रॉचेस्टरचे बंदर अधिक खोल करण्यात येऊन धक्के आणि अंतिम थांब्याचे ठिकाण यांचा विस्तार करण्यात आला. सेंट लॉरेन्स सी-वे हा जलमार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यावर १९५९ मध्ये रॉचेस्टर हे महासागरी बंदर म्हणून ओळखले जाऊ लागले.

               

शहरात उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांत रॉचेस्टर विद्यापीठ (१८५०), सांप्रत विद्यापीठाचाच एक भाग बनलेले ईस्टमन संगीत विद्यालय, रॉचेस्टर तंत्रविद्यासंस्था (१८२९), रॉबर्टस वेस्लेयान (१८६६), नॅझारेथ (१९२४) सेंट जॉन फिशर (१९५२), मन्रो कम्यूनिटी (१९६१) ही महाविद्यालये आहेत.

               

रॉचेस्टरमधील निर्मितिउद्योग विविधांगी आहेत. फिल्म व छायाचित्रण उपकरणे आणि साधने, छायाचित्रणप्रतिलिपी यंत्रे, तापमापक, प्रकाशीय उपकरणे व साहित्य, शास्त्रीय उपकरणे, व्यवसाय आणि कार्यालय यंत्रे, दंतविषयक साहित्य दंतचक्र-काप यंत्रे, यांत्रिक अवजारे व हत्यारे, काचविलेपित पोलादी टाक्या इ. महत्त्वाच्या वस्तूंच्या उत्पादनाबाबत रॉचेस्टरचा सबंध जगातील आघाडीच्या उद्योगधंद्यांच्या शहरांत समावेशक होतो. संदेशयंत्रणा, स्वयंचलित उपकरणे, माल्ट व सौम्य पेये, रसायने, विधिविषयक प्रकाशने इत्यादींचेही शहरात कारखाने आहेत. आसमंतीय ट्रकशेती व फलशेती उत्पादनांची प्रक्रिया, वितरण तसेच महत्त्वाचे निर्यातकेंद्र म्हणून रॉचेस्टर प्रसिद्ध आहे.

               

रॉचेस्टरमध्ये प्रसिद्ध व्यक्तींची निवासस्थाने संग्रहालये म्हणून जतन करण्यात आली असून त्यांमध्ये ‘जॉ ईस्टमन हाउस’, ‘सूझन बी. अँटनी स्मारक’. रॉचेस्टर ऐतिहासिक संस्थेचे ‘वुडसाइट’, ‘कँपबेल व्हिटलसी हाउस’ इत्यादींचा अंतर्भाव होतो. सांस्कृतिक संस्थांमध्ये फिलहार्मोनिक, सिव्हिक व ईस्टमन हे वाद्यवृंद, कलावीथी, खगोलालय वगैरेंचा समावेश होतो. शहरामधील उपवने (उदा., हायलँड पार्क, जेनेसी व्हॅली पार्क, मन्रो काउंटी पार्क, सेनेका पार्क इ.) उद्यान विज्ञानविषयक देखावे व प्रदर्शने यांकरिता विख्यात आहेत. ‘रॉचेस्टर लाइलॅक टाइम फेस्टिव्हल’ हे मे महिन्यात हायलँड पार्कमध्ये भरविण्यात येणारे वार्षिक पुष्पप्रदर्शन विशेष उल्लेखनीय मानतात. जगातील कोणत्याही शहरापेक्षा अधिक प्रमाणात रॉचेस्टरमध्ये छायाचित्रयंत्रे व फिल्म यांचे उत्पादन होत असल्याने याला ‘फिल्म सिटी’ असेही संबोधिले जाते.

                                                                गद्रे, वि. रा.