बझांसाँ : पूर्व फ्रान्समधील फ्रांश-काँते विभागातील दू डिपार्टमटची राजधानी. लोकसंख्या १,२०,३१५ (१९७५). हे दीझाँच्या पूर्वेस ७३ किमी. जुरा पर्वतपायथ्याशी ,दू नदीकाठी वसले असून दळणवळणाचे केंद्र आहे. प्रसिध्द फ्रेंच कांदबरीकार व्हिक्टर ह्यूगो आणि थोर समाजवादी फ्रांस्वा मारी फूर्ये यांचे हे जन्मस्थान असून सूक्ष्म जंतुशास्त्रज्ञ लूई पाश्चरचे उच्च शिक्षण येथेच झाले होते. प्राचीन काळी व्हंझांशीओ म्हणून ओळखले जाणारे हे शहर ज्यूलिअस सीझरच्या नेतृत्वाखाली रोमनांनी जिंकले (इ.स.पू.५८). मध्ययुगीन काळात बर्गडी आणि आर्ल या राज्यांचा ते एक भाग होते. ११८४ मध्ये फ्रेड्रिक बार्बारोसा याने हे स्वतंत्र शहर बनविले. त्याची स्वायतत्ता स्पॅनिश अंमल येईपर्यंत कायम होती (१६४८). चौदावा लूई याने १६७४ मध्ये हे शहर जिंकून दोन वर्षानंतर फ्रांश-काँते या विभागाची ही राजधानी केली. पाचव्या शतकापासून ख्रिस्ती धर्मगुरूचे मुख्य पीठ म्हणूनही त्याला महत्त्व होते. दुसऱ्या महायुध्दात बझांसाँची फारच हानी झाली.

बझांसाँ हे मुख्यत्वे घड्याळांच्या निर्मितीउद्योगासाठी प्रसिध्द असून येथील घड्याळशाळा जगद्विख्यात आहे. याशिवाय येथे कापड, विणमाल, लोखंड-पोलाद, कातडी वस्तू, पेये इ. विविध उद्योग चालतात. १४२२ मध्ये दोल येथे स्थापन झालेले विद्यापीठ १६९१ मध्ये येथे आणण्यात आले. तेथील संगीत अकादमी (स्था. १७२६) प्रसिध्द आहे. तेथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात संगीत महोत्सव साजरा केला जातो.

निकॉला पेर्नो दे ग्रांव्हेल या पाचव्या चार्ल्सच्या चान्सलरने बांधलेला ग्रांव्हेल राजप्रसाद (१५३४-४०), नगरभवन आणि सतराव्या शतकात मार्की दे व्होबां या फ्रेंच लष्करी अभियंत्याने येथील टेकडीवर बांधलेला ११८ मी. उंचीचा बालेकिल्ला प्रेक्षणीय आहे. रोमन शैलीतील पॉर्ते नॉइर ही विजयकमान, खुले नाट्यगृह, रोमन व गॉथिक शैलींतूल सँ झाँ कॅथीड्रल (११वे–१३वे शतक) इ. प्राचीन वास्तू उल्लेखनीय आहेत.

ओक, द. ह.