मुळा मुठा : महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील सु. १२८ किमी. लांबीची भीमा नदीची उपनदी. जिल्ह्याच्या पश्चिम भागात उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला पुणे शहरापासून मुळा-मुठा अथवा मुळा हे नाव प्रचलित आहे. ही पूर्ववाहिनी नदी दौंडच्या वायव्येस सु. २७ किमी. वर रांजणगाव सांडस येथे भीमा नदीला उजवीकडून मिळते.

उत्तरेकडील मुळा नदी बोर घाटाच्या दक्षिणेस सु. १३ ते ३५ किमी. लांबीच्या प्रदेशातून सह्याद्रीच्या रांगेत उगम पावणाऱ्या सु. सात प्रवाहांपासून बनते. पौड गावाच्या पूर्वेस सु. ८ किमी. वरील लवळे गावापर्यत हे सर्व प्रवाह एकत्र येतात. पौड भागात या नदीमुळे निर्माण झालेली दरी ‘पौड खोरे’ या नावाने प्रसिद्ध आहे. लवळे गावापासून अनेक वळणे घेत ही नदी पुणे शहराच्या उत्तरेस कळस येथे दक्षिणवाहिनी बनते व पुणे शहराच्या मध्यभागी तिला दक्षिणेकडून मुठा नदी मिळाल्यांनतर ती पूर्वेस वहात जाते. पवना ही तिला डावीकडून मिळणारी प्रमुख उपनदी आहे. मुळशी तालुक्यात (उगमाकडील भागात) मुळशी गावाजवळ निळा व मुळा या नद्यांच्या संगमावर टाटा पॉवर कंपनीने धरण बांधले असून त्या धरणातील पाणी, ४·८ किमी. लांबीच्या बोगद्याद्वारे ⇨ भिरा (रायगड जिल्हा) येथील विद्युत् केंद्रात नेण्यात आले आहे. त्यामुळे मुळशी पेट्यातील धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सत्याग्रह करण्यात आला (१९२१–२४). त्याचे नेतृत्व ⇨ सेनापती बापट यांनी केले होते.

मुठा नदी जिल्ह्याच्या नैर्ॠत्य भागात सह्याद्रीच्या रांगेत सस. पासून सु. ९१२ मी. उंचीवर उगम पावून ईशान्य दिशेने वाहत जाते. अंबी व मोसी हे तिचे उगमाकडील प्रमुख प्रवाह आहेत. या नदीच्या उगमप्रवाहावर

पानशेत येथे धरण बांधले आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात या नदीने डोंगराच्या तीव्र उतारावर अरुंद दरी निर्माण केली असून हा भाग ‘मुठा खोरे’ म्हणून ओळखला जातो. नदीचा बराचसा भाग धरणांच्या जलाशयांनी व्यापलेला आहे. खडकवासला येथील धरणानंतर ही नदी पर्वती टेकडीच्या बाजूने पुढे जाऊन शहराच्या मध्यभागी मुळा नदीला मिळते. मुठा नदीवरील ⇨ खडकवासला येथील धरणातून कालव्यांद्वारे पुणे शहरास आणि जिल्ह्यातील शेतीस पाणीपुरवठा केला जातो.

पुणे शहराच्या पुढे पूर्वेस वाहणारी मुळा-मुठा नदी मांजरी बु. ते थेऊर यांदरम्यान एक मोठे वळण घेते व नागमोडी वळणांनी वहात जाऊन दौंड तालुक्याच्या पूर्व सरहद्दीवर रांजणगाव सांडस येथे भीमा नदीस मिळते. नदीकाठावरील पुणे, मांजरी, थेऊर इ. गावे औद्योगिक, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. [⟶ पुणे जिल्हा].

चौंडे, मा. ल.