मांडवी नदी : भारतातील गोवा, दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या गोवा भागातील एक प्रमुख पश्चिमवाहिनी नदी. लांबी सु. ६२ किमी. पूर्वीपासूनच या नदीला अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्व आहे. गोवा व कर्नाटक राज्य यांच्या सीमेवरील सह्याद्रीच्या रांगेत ही नदी उगम पावते व मार्गात अनेक ठिकाणी वळणे घेऊन पश्चिमेस अरबी समुद्राला मिळते. वरच्या टप्प्यात मांडवी नदी गोव्याच्या सत्तरी या डोंगराळ व कमी लोकवस्तीच्या प्रदेशातून ईशान्य-नैऋत्य दिशेने वाहत असून फोंडा तालुक्यात ती एकदम वायव्य दिशेने वाहू लागते. पुढे सेंट एस्टाव्हामजवळ ही नदी पुन्हा पश्चिमवाहिनी बनते व पणजी शहराजवळ समुद्राला मिळते. डावीकडून मिळणारी खांडेपार ही तिची महत्त्वाची उपनदी असून उजवीकडून माडी, साखळी, बिचोली, म्हापसा या इतर प्रमुख नद्या मिळतात. या उपनद्यांशिवाय मांडवी नदीच्या मुखाकडील प्रदेशातील कुंभारजुव्याच्या कालव्याद्वारे दक्षिणेकडील जुवारी नदीही तिला जोडण्यात आली आहे. यांशिवाय नानोरो, नानुस, व्होल्व्होटा इ. लहान नद्या मांडवी नदीला येऊन मिळतात.

मुखाकडील प्रदेशातील हिच्या संथ प्रवाहामुळे नदीपात्रात अनेक ठिकाणी गाळ साचून तसेच तिला येऊन मिळणाऱ्या नद्यांचे फाटे, कालवे यांच्यामुळेही लहान-मोठी बेटे तयार झाली आहेत. या बेटांपैकी ‘दिवाडी’ हे प्रमुख असून म्हापसा नदीच्या फाट्यांमुळे बनलेले ‘चोडण’ बेटही उल्लेखनीय आहे. कुंभारजुव्याच्या कालव्यामुळे तिसवाडी किंवा इलहास बेट निर्माण झाले आहे. ही बहुतेक बेटे बेसाल्ट खडकापासून बनलेली असली, तरी त्यांवर साचलेल्या नदीगाळाने हा प्रदेश सुपीक बनला आहे. मांडवी नदीची कमी लांबी, संथ प्रवाह व धरणे बांधून पाणी साठविण्याच्या दृष्टीने कमी क्षेत्र यांमुळे या नदीवर फारसे जलविद्युत् प्रकल्प उभारणे शक्य झालेले नाही. मात्र अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने तिचा खूपच उपयोग करून घेण्यात आला आहे. या नदीच्या मुखापासून अंतर्गत भागात ४१ किमी. वरील उसगावपर्यंत ओहोटीच्या काळातही बऱ्याच ठिकाणी जलवाहतूक केली जाते. याशिवाय तिच्या उपनद्यांतूनही बऱ्याच प्रमाणात वाहतूक चालते. या जलवाहतुकीच्या सुविधेमुळे प्रदेशातील उत्पादित माल व खनिजे सागरगामी मोठ्या बोटींपर्यंत नेणे सहज शक्य होते.

पणजी हे राजधानीचे ठिकाण व बंदर, आग्वादचा किल्ला, बेत्ती, जुने गोवे इ. ऐतिहासिक ठिकाणे मांडवी नदीच्या काठी आहेत. या नदीवरील जवाहरलाल नेहरू पुलामुळे पणजी शहर उत्तर गोव्याशी जोडले गेले आहे.

चौंडे, मा. ल.