होदेद : (अल् हूदेद) . येमेनचे आधुनिक सुविधा असलेले प्रमुख बंदर व याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या २६,२१,००० (२०११). देशाच्या पश्चिम भागात तांबडा समुद्र किनाऱ्यावर हे वसले आहे. देशातील प्रमुख व्यापारकेंद्र म्हणून यास महत्त्व आहे. येमेनची राजधानी साना व ताईझ शहरांशी हे जोडलेले आहे 

 

याचा १४५४-५५ मधील इस्लामी इतिवृत्तात उल्लेख आढळतो. ऑटोमन तुर्कांनी १५२०च्या दशकात याचा ताबा घेतल्यानंतर यास महत्त्व प्राप्त झाले. पहिल्या महायुद्ध समाप्तीनंतर होदेद असीरचे राज्यकर्ते इद्रिसी यांच्या ताब्यात आले मात्र येमेनने पुन्हा १९२५ मध्ये हे जिंकले. या वेळी इद्रिसींना सौदी अरेबियाने पाठिंबा दिल्याने सौदी अरेबिया व येमेन यांमध्ये युद्ध होऊन ताइफच्या तहाने युद्ध संपले आणि असीर प्रदेश सौदी अरेबियाकडे व होदेद हे येमेनच्या आधिपत्यात राहिले. तदनंतर यादवी युद्धाच्या अखेरपर्यंत (१९६२–७०) व येमेन प्रजासत्ताक घोषित होईपर्यंत हे शहर झैदी इमाम याच्या अंमलात होते. १९६१ मध्ये आगीमुळे शहराचे मोठे नुकसान झाले होते. तदनंतर याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. 

 

येमेन देशाची बहुसंख्य आयात-निर्यात येथील बंदरातून होते. येथून कच्चा माल, अन्नपदार्थ, यंत्रसामग्री, उपभोग्य व धातूच्या वस्तू यांची आयात व कॉफी, खजूर, कापूस, कातडी यांची निर्यात होते. बंदर म्हणून येथे होत असलेल्या व्यवसायांशिवाय येथे सूतगिरण्या, शीतपेयनिर्मिती उद्योग चालतात. रशियाच्या मदतीने जुन्या शहरानजीक अल्-कथीब उपसागराच्या खाजणात आधुनिक बंदर बांधण्यात आले आहे. त्यामुळे येथून मोठमोठ्या जहाजांची वाहतूक सुलभ झाली आहे. 

गेडाम, संतोष