तेगूसिगॅल्पा : मध्य अमेरिकेतील हाँडुरस प्रजासत्ताकाची व फ्रान्सीस्क मोरासान प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,७४,८५० (१९७३). हे डोंगराळ प्रदेशात मौंट पीकाचोच्या उतारावर चोलूतेका नदीच्या उजव्या काठावर, फॉन्सेका आखातावरील सान लॉरेन्झोपासून सु. १२८ किमी. अंतरावर ९७५ मी. उंचीवर वसलेले आहे. याच्या सर्व बाजूंस दाट रानांनी आच्छादलेल्या टेकड्या आहेत. मध्य अमेरिकेतील मोठ्या शहरांत धरणीकंपाने विध्वंस न झालेल्या थोड्या शहरांपैकी तेगूसिगॅल्पा असल्याने १५७९ सालापासूनच्या आखणीबांधणीच्या, अरूंद दगडी बोळ, त्यांवर येणारे सज्जे, पायऱ्यांचे रस्ते अशा वसाहतकाळातील खुणा येथे आढळतात. नदीच्या पलीकडील ५६ किमी. वरील शहराच्या आधुनिक भागाला कोमाइयाग्वेला म्हणतात. सोळाव्या शतकांपासून सोन्या–चांदीच्या खाणींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. याच्यापासून जवळच जुन्या ॲझटेक नगरीचे अवशेष आहेत. या शहरास रेलमार्ग नाही परंतु उत्तम राजमार्ग व टोंग्कोंटीन आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे विमान वाहतुकीच्या सोयी आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मोरासानच्या नेतृत्वाखाली येथे उदारमतवाद्यांचा बालेकिल्ला होता. येथील कॅथीड्रल, केंद्रीय विद्यापीठ (१८४७), सैनिक विद्यालय, न्यायालये, राष्ट्रीय संग्रहालय, अध्यक्षाचे निवासस्थान व विधिमंडळाच्या इमारती उल्लेखनीय आहेत. तयार कपडे, सिगारेट, साखर इत्यादींचे कारखाने येथे आहेत.

शहाणे, मो. ज्ञा.