बिआस : हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्यांतून वाहणारी सतलज नदीची प्रमुख उपनदी आणि पंजाबच्या पाच नद्यांपैकी एक. लांबी ४६६ किमी. ग्रीक भाषेत हिला ‘हायफॅसिस’, संस्कृतमध्ये ‘विपाशा’, तर वेदांत हिचा ‘अर्जिकूजा’ असा उल्लेख आढळतो. बिआस नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील कुलू जिल्ह्यात, रोहतांग या पंजाब हिमालयातील खिंडीच्या दक्षिण उतारावर सु. ४,३६१ मी. उंचीवर झालेला आहे. तेथील गर्द झाडीच्या पहाडी प्रदेशातील खोल दऱ्याखोऱ्यांतून बिआस प्रथम दक्षिणेस वाहते व पुढे मंडी शहराजवळून पश्चिमवाहिनी होते. बिआसचे उगमाकडील खोरे ‘कुलू खोरे’ या नावाने ओळखले जाते. ३२0 अक्षवृत्त दोनदा ओलांडून बिआस कांग्रा खोऱ्यातून बाहेर पडून प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर नैर्ऋत्यवाहिनी होऊन पंजाबच्या सखल प्रदेशात, अमृतसरच्या दक्षिणेस हरीके येथे सतलज नदीला मिळते. ही नदी आपल्या मूळ पात्राच्या पूर्वेस सु. ४८ किमी. सरकली असावी. चिनाब नदी पश्चिमवाहिनी होण्याअगोदर बिआस तिला मुलतानच्या दक्षिणेस शुजाबाद येथे मिळे. अलेक्झांडरच्या इ. स. पू. ३२६ मधील भारतावरील स्वारीत बिआस नदी ही पूर्वेकडील सीमा ठरली. बिआसचा प्रवाह पूर्वेस सरकला असून अठराव्या शतकानंतर तिच्या प्रवाहात विशेष बदल झालेला नाही.

बिआस प्रकल्पाचे तीन भाग आहेत. उगमापासून सु. २३० किमी. वाहत आल्यावर पाँगपासून बिआस मैदानी प्रदेशात प्रवेश करते. या ठिकाणी या नदीवर १३३ मी. उंचीचे मातीचे धरण बांधलेले आहे. १९७४ मध्ये हे धरण पूर्ण झाल्यावर पंजाब व राजस्थान राज्यांतील जमिनीला बारमहा पाणीपुरवठा होऊ लागला असून २,४०,००० किवॉ. जलविद्युत्‌शक्ती निर्माण होते. दुसऱ्या भागात बिआस-सतलज जोड प्रकल्पानुसार हिमाचल प्रदेशात मंडी शहरापासून उगमाकडे २०.८ किमी.वर पंडोहा येथे ६६० मेवॉ. विद्युत्‌निर्मिती करणारे आणखी एक धरण बांधण्यात आले आहे. या धरणातील पाणी २५.५ किमी. लांबीच्या दोन बोगद्यांद्वारे व ११.८१ किमी. लांबीच्या कालव्याने सतलज नदीत येते. यांपैकी सुरुवातीच्या पंडोहब्बगी बोगदा १३.२ किमी. लांबीचा असून त्यातील पाणी सुंदरनगर जलमार्गात सोडले आहे. पुढे ते पाणी १२.३ किमी.च्या सुंदरनगरसतलज बोगद्याद्वारे स्लॅपर (हिमाचल प्रदेश) येथे सतलज नदीत आणून सोडले असून तेथे एक जलविद्युत् प्रकल्प बांधण्यात आला आहे. यांशिवाय मंडी शहरापासूनही एक बोगदा काढून बिआसचे पाणी सतलजमध्ये आणण्यात आले असून त्यापासून ३,२०,००० हे. जमिनीला पाणीपुरवठा व ६,६०,००० किवॉ. वीजनिर्मिती होईल. थरच्या वाळवंटातील ११ लक्ष हे. जमिनीतील गहू व कापूस या पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी या दोन्ही नद्यांचे पाणी राजस्थान कालव्यामध्ये सोडण्यात आले आहे. बिआस-सतलज यांच्या संगमापासून खाली ३.२५ किमी.वरील हरीके येथे १९५८ मध्ये ६३६.१२ मी. लांबीचा व ७८.३ मी. उंचीचा बंधारा बांधण्यात आला असून सरहिंद-फिडर कालव्याची त्यात नव्याने भर घालण्यात आली आहे. ३१ डिसेंबर १९८१ रोजी पंतप्रधान आणि पंजाब, हरयाणा व राजस्थान या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठक होऊन तीत रावी, बिआस यांच्या पाणी-वाटपासंबंधीचा एक करार झाला. त्यानुसार तिन्ही राज्यांच्या कृषि-विकास कार्यक्रमास चालना मिळणार आहे.

कांग्रा आणि कुलू खोऱ्यांचा प्रदेश वनश्रीने नटलेला असल्याने पर्यटकांचे हे आकर्षण बनले आहे. व्यापारी दृष्ट्या फळबागांची लागवड कुलू खोऱ्यात आणि चहाची लागवड कांग्रा खोऱ्यात होते. येथील सफरचंदे प्रसिद्ध आहेत. मेंढ्यांची पैदासही मोठ्या प्रमाणावर होत असते. नदीखोऱ्यांचा पंजाबमधील प्रदेश सखल, सपाट व सुपीक असून त्यात कालव्याच्या पाण्यावर गहू, कापूस, हरभरा, फळे ही कृषी-उत्पादने होतात. बिआसच्या खोऱ्यात मंडी, होशियारपूर, जलंदर, कपूरथळा इ. महत्त्वाची औद्योगिक केंद्रे आहेत.

चौधरी, वसंत