दीसा : गुजरात राज्याच्या बनासकांठा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण. अहमदाबाद–दिल्ली या मध्य रेल्वेच्या लोहमार्गावरील पालनपूर स्थानकाच्या वायव्येस हे शहर पालनपूरपासून सु. २७ किमी. अंतरावर बनास नदीच्या डाव्या तीरावर वसलेले आहे. लोकसंख्या २८,३२१ (१९७१). मुंबईच्या उत्तरेस दीसा सु. ४८० किमी. वर आहे. शहराच्या ईशान्येस ४.८ किमी. अंतरावर लष्करी छावणी आहे. शहरात दोन जैन मंदिरे आणि एक मशीद आहे. औद्योगिक दृष्ट्या गुजरातचा हा भाग अप्रगत आहे. कमी पाऊस व नापिक जमीन यांमुळे शहराच्या आसपास ज्वारी, बाजरी इ. पिके काढतात.

सावंत, प्र. रा.