पालिताणा : जैनांच्या पाच पुण्यक्षेत्रांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यात असून जैन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याला ‘देवाची नगरी’ म्हणतात. पालिताणा संस्थानची राजधानी येथेच होती. लोकसंख्या २७,३५५ (१९७१). हे भावनगर व अहमदाबाद यांच्या नैर्ऋत्येस अनुक्रमे सु. ५० व १९५ किमी.वर असून भावनगर-सुरेंद्रनगर लोहमार्गाचा एक फाटा येथपर्यंत गेला आहे. चालुक्य, वाघेल, राजपूत व नंतर मुसलमानांची सत्ता त्यावर होती. इंग्रजी अंमलात ते एक स्वतंत्र मांडलिक संस्थान होते. शहरात मिरची, गूळ, कापूस, तृणधान्ये व कडधान्ये यांची व्यापारपेठ असून येथे तेलगिरण्या व लघुउद्योगही चालतात.

शत्रुंजय टेकडी : जैनांचे तीर्थस्थान, पालिताणा.

शहराच्या दक्षिणेस दोन किमी.वर शत्रुंजय नावाचा ६०३ मी. उंचीचा डोंगर असून त्याच्या पठारावर इ.स. आठच्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत ८६३ जैन मंदिरे बांधली गेली. यांपैकी काही मंदिरे कालोदरात नष्ट झाली. अवशिष्ट मंदिरांपैकी काहींतूनच पूजाअर्चा चालते. हा मंदिरसमूह इंग्रजी ‘एस्’ अक्षराप्रमाणे दिसतो. यामधील बहुसंख्य मंदिरे चालुक्य कुमारपाल, वाघेल राजांचे मंत्री व राजपूत राजे यांनी बांधली असून काहींचा जीर्णोद्धार चितोडचा राजा रत्नसिंह व त्यांचा मंत्री कर्मसिंह यांनी केला. या मंदिरांपैकी चौमुख हे आदिनाथाचे मंदिर, श्रीआदीश्वराचे मंदिर, शत्रुंजय मंदिर इ. प्राचीन आणि कलापूर्ण असून उल्लेखनीय आहेत. यांशिवाय जैनांच्या चोवीस तीर्थंकरांची स्वतंत्र मंदिरे व इतर अनेक जिनालये आहेत. चौमुख मंदिर उत्तर टेकडीच्या माथ्यावर सर्वांत उंचावर बांधले असून येथील मूर्ती प्रेक्षणीय आहे. या मूर्तीला चार स्वतंत्र मुखे असल्यामुळे गर्भगृहाच्या चारी बाजूंस चार प्रवेशद्वारे आढळतात. या समूहातील मूळ नायक श्रीआदीश्वराचे मंदिर दक्षिणेकडील टेकडीवर बांधले आहे. येथील कोरीव लेखावरून या मंदिराचा १५३० मधील सातवा जीर्णोद्वार कर्मसिंह या चितोडच्या मंत्र्याने केला. ते मंदिर ९६० मधील असावे, असा तज्ञांचा कयास आहे. शत्रुंजय मंदिर हेही जुने असून कुमारपालाने त्याचा जीर्णोद्धार केला. जैनांमध्ये ही टेकडी अत्यंत पवित्र मानली जाते. नेमिनाथ या तीर्थंकराव्यतिरिक्त इतर सर्वांना येथे सिद्धी प्राप्त झाली, अशी जैनांत समजूत आहे म्हणून त्यास ‘सिद्धक्षेत्र’ वा ‘सिद्धचल’ असे म्हणतात. येथे मंदिर बांधल्याने पुण्य लाभते, या पारंपरिक श्रद्धेमुळे येथील मंदिराची संख्या वाढतच राहिली. जैन परंपरेप्रमाणे या टेकडीवरील चिरंतन अर्हत चैत्य (मंदिरे) म्हणजे चकाकणारे अलंकृत रत्नजडित मुकुटच होत. टेकडीवर अंगर पीराचेही पवित्र स्थान आहे.

या सर्व मंदिरांची वास्तुशैली वैशिष्ट्यपूर्ण असून ती कोणत्याही विहित वास्तुशैलीशी साम्य दर्शवीत नाही. तिला एक विशिष्ट स्थानिक छटा असून काही मंदिरे दुमजली आहेत. बांधकामासाठी मुख्यत्वे पांढरा संगमरवरी दगड वापरला आहे. मंदिरांना प्राकार असून बहुतेक मंदिरांवर शिल्पकाम आढळते. यांत विशेषत्वाने जैन तीर्थंकर व जैन धर्माशी निगडित मूर्ती आहेत. मूर्तीव्यतिरिक्त वेलबुट्या, भौमितिक रचनाबंध इ. शिल्पकामही आहे. शत्रुंजय टेकडीवर जाण्यासाठी सहा हजार पायऱ्या असून श्रावकांनी अनवाणी जाण्याची प्रथा आहे.

देशपांडे, सु. र.