शैलमंदिरे, तिरुचिरापल्ली.

तिरुचिरापल्ली : (त्रिचनापल्ली–त्रिची). तमिळनाडू राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्याचे ठाणे व धार्मिक, ऐतिहासिक, औद्योगिक व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर. लोकसंख्या ३,०७,४०० (१९७१). हे कावेरीच्या समृद्ध त्रिभुज प्रदेशाच्या शिरोभागी, तंजावरच्या पश्चिमेस सु. ५६ किमी. वरील मोठे लोहमार्ग प्रस्थानक व महामार्ग स्थानक आहे. हे सातव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत चोल, पल्लव, नायक व विजयानगर राज्यांची विभागीय राजधानी व त्यानंतर एकोणिसाव्या शतकापर्यंत मुस्लिम, मराठे, फ्रेंच व इंग्रज यांच्या सत्तासंघर्षाचे एक प्रमुख केंद्र होते. डोळ्यात भरणारे येथील वैशिष्ट्य म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेला सु. ८३ मी. उंचीचा एकसंध प्रचंड खडक, त्यावरील इतिहासप्रसिद्ध किल्ला, उद्ध्वस्त सहस्त्र स्तंभी मंडप, त्यापेक्षा उंचावरील शतस्तंभ आणि शिवाचे मातृभूतेश्वर मंदिर व अगदी माथ्यावरील गणेश मंदिर हे होय. वर जाण्यास खडकातच पायऱ्या खोदलेल्या असून शिवमंदिरातील स्वयंभू लिंगही त्याच खडकाचा भाग आहे. मंदिरावरील घुमटास सोन्याचा मुलामा दिलेला आहे. माथ्यावरील ‘उच्ची पिलैयार कोइल’ या गणेशमंदिरापासून शहराचे हृदयंगम विहंगम दृश्य दिसते. याच खडकात पल्लवकालात कोरलेली दोन गुहा–मंदिरे आहेत. पायथ्याशी तेप्पाकुलम् तलाव व शहरात क्राइस्टचर्च, क्लाइव्ह रहात असलेले घर, सेंट जोसेफ कॉलेज इ. प्रेक्षणीय स्थळे आहेत.

हे आजूबाजूला पिकणाऱ्या तांदूळ, ऊस, विड्याची पाने, तंबाखू, धान्ये इत्यादींची बाजारपेठ असून येथे परंपरागत हातमाग कापड उद्योग, मौल्यवान खडे, चटया व चिरूट उद्योग यांच्या जोडीला आता भारी विद्युत् यंत्रे, बॉयलर, रेल्वे एंजिन कर्मशाळा इ. आधुनिक उद्योग स्थापन झाले आहेत. येथे मद्रास विद्यापीठाला जोडलेली आठ महाविद्यालये असून इतर अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

शहराच्या उत्तरेस सु. ५ किमी. कावेरीच्या दोन प्रवाहांमधील बेटावर श्रीरंगम् येथे रंगनाथाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. हे भारतातील एक प्रमुख वैष्णव मंदिर असून तेथे दर वर्षी वैकुंठ चतुर्दशीस मोठी यात्रा भरते. तेथे जाण्यासाठी कावेरीवर बत्तीस कमानींचा मोठा पूल बांधलेला आहे. येथेही सहस्र स्तंभी मंडप, गोपुरे, सोन्याचा मुलामा दिलेला घुमट इ. दाक्षिणात्य कलावैशिष्ट्ये आहेतच. श्रीरंगमच्या खाली अकराव्या शतकात चोल राजांनी बांधलेला कावेरीवरील भक्कम बंधारा अद्याप उभा आहे. येथून पूर्वेस सु. १·५ किमी. वर जंबुकेश्वर मंदिरात जलमग्न शिवलिंग आहे. तिरुचिरापल्लीस दक्षिण कैलास असेही म्हणतात.

कुमठेकर, ज. ब. डिसूझा, आ. रे.