गोदावरी नदी : दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची नदी. लांबी १,४९८ किमी. जलवाहन क्षेत्र गंगेच्या खालोखाल ३,२३,८०० चौ. किमी. हिचा उगम नासिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्याद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो. प्राचीन काळी या भागात गौतम ऋषींचा आश्रम होता. त्याने गोहत्येच्या पातकाच्या निवारणार्थ शंकराची आराधना करून गंगा आणली, अशी कथा आहे. हल्ली येथे लहानशा कुंडात थोडेसे पाणी असते. नंतर डोंगराच्या पूर्व कुशीत गंगाद्वार येथे लहानशा झऱ्यातून ते बाहेर येते. तेथपर्यंत ६९० पायऱ्या चढून जाता येते. तेथे कुंड व गंगेचे लहानसे देऊळ आहे. पायथ्याशी त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे. गोदावरी म्हणजे पाणी किंवा गाई देणारी — गाईचे पोषण करणारी — असा अर्थ आहे. तेथून गोदावरी पूर्वआग्नेय दिशेने नासिक व अहमदनगर जिल्ह्यांतून वाहत जाते. पुढे ती अहमदनगर व औरंगाबाद आणि बीड व औरंगाबाद जिल्ह्यांची सीमा बनते. नंतर परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतून गेल्यावर ती आंध्र प्रदेश राज्याच्या आदिलाबाद व निजामाबाद जिल्ह्यांच्या, आदिलाबाद व करीमनगर जिल्ह्यांच्या, महाराष्ट्राच्या चंद्रपूर व आंध्रच्या करीमनगर जिल्ह्यांच्या सीमांवरून जाऊन आग्नेयीकडे वळते. मग आंध्रच्या वरंगळ व खम्मम जिल्ह्यांतून जाऊन ती अधिक दक्षिणेकडे वळते व पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्हे विभक्त करून शेवटी बंगालच्या उपसागरास मिळते. महाराष्ट्रात ती ६५० किमी. वाहते. सह्याद्रीपासून नासिकपर्यंत गोदावरी अरुंद, खडकाळ मार्गाने येते. त्या वाटेवर गंगापूर येथे तिला धरण व छोटासा धबधबा आहे. नासिकनंतर २४ किमी.वर तिला उजवीकडून दारणा व आणखी २७ किमी.वर डावीकडून नांदूर येथे काडवा नदी मिळते. तेथे मदमेश्वर धरण आहे. नंतर नेवासे येथे उजवीकडून प्रवरा मिळते. पैठणवरून पुढे गेल्यावर बीड जिल्ह्यातील मंजरथ येथे उजवीकडून सिंदफणा मिळते. पूर्णा स्थानकाच्या दक्षिणेकडे परभणीकडून आलेली पूर्णा नदी डावीकडून तसेच नांदेडवरून गेल्यावर कोंडलवाडीजवळ तिला मांजरा उजवीकडून मिळते. पुढे चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ सिरोंचाच्याखाली तिला डावीकडून पैनगंगा, वर्धा व वैनगंगा यांचे पाणी आणणारी प्राणहिता व चंद्रपूर सरहद्द सोडताना मध्य प्रदेशाच्या बस्तर जिल्ह्यातून आलेली इंद्रावती भद्राचलम्‌च्या समोर मिळते. नंतर धर्मसागर येथे उजवीकडून मानेर, खम्मम जिल्ह्याच्या उत्तर भागातून उजवीकडून किन्नरसानी व डावीकडून शबरी मिळते. विदर्भाच्या सीमेजवळ गोदावरीचे पात्र २ ते ३ किमी. रुंद आणि वालुकामय असून त्यात दोन ठिकाणी प्रत्येकी २४ किमी. लांबीचे खडक आहेत. ते फोडून वर्धा-नागपूरच्या कापूस प्रदेशाला गोदावरीचा जलमार्ग उपलब्ध करून देण्याची १८५४ मधील योजना बराच खर्च झाल्यानंतर १८७१ मध्ये अव्यवहार्य म्हणून सोडून द्यावी लागली. काही अंतर संथ वाहिल्यानंतर गोदावरी पूर्व घाटातून पापिकोंडालू या अरुंद व खोल घळईतून मार्ग काढते. तेथे तिच्या काठावर उभे कडे १,२८० मी.पर्यंत उंच गेलेले आहेत. भोवतीचा प्रदेश साग, बांबू इत्यादींच्या दाट अरण्याचा व नयनरम्य वनश्रीचा आहे. यानंतर नदी पुन्हा रुंद होते. तिच्या पात्रात गाळाने बनलेली लहानलहान बेटे दिसू लागतात. त्यांस लंका म्हणतात. त्यांवर उत्कृष्ट तंबाखू पिकतो. राजमहेंद्री येथे गोदावरीवर २·५ किमी. लांबीचा मोठा रेल्वेपूल आहे. जवळच धवलेश्वरम् येथे या नदीवर १८५७ मध्ये बंधारा घातला आहे. त्याला ॲनिकट म्हणतात. तेथूनच गोदावरीचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्यात पूर्वेस गौतमी गोदावरी आणि पश्चिमेस वसिष्ठ गोदावरी असे दोन मुख्य प्रवाह असून वैनतेय हा आणखी एक प्रवाह आहे. हे अनुक्रमे यनम्, राझोले आणि नरसपूर यांच्याजवळ समुद्रास मिळतात. त्रिभुज प्रदेशाचा पूर्वेकडील भाग १,१६५ चौ. किमी., मधला १,०३६ चौ. किमी. व पश्चिमेकडील २,५८९ चौ. किमी. आहे. त्रिभुज प्रदेशाच्या किनाऱ्यावर पूर्वी डच, इंग्रज व फ्रेंच यांच्या सुरुवातीच्या छोट्या वसाहती होत्या. त्यांपैकी यनम् हा टिकून राहिलेला फ्रेंच भाग पाँडिचेरीबरोबरच भारतात आला. त्रिभुज प्रदेशात सर्वत्र कालव्यांचे जाळे पसरलेले आहे. मुख्य कालवे ७९३ किमी. लांबीचे असून त्यांतून नदीप्रमाणेच नौकांतून रहदारी चालते. वितरण शाखा ३,०८६ किमी.

 लांबीच्या आहेत. गोदावरीचे कालवे एलुरूजवळ कृष्णा कालव्यास जोडले असल्यामुळे रहदारी दक्षिणेकडे वाढली आहे. पुरातन काळापासून आलेल्या गाळामुळे आणि भरपूर पाणीपुरवठ्यामुळे गोदावरीचा त्रिभुज प्रदेश अत्यंत सुपीक झाला असून त्यात तांदूळ, डाळी, कडधान्ये, तेलबिया, भुईमूग, तंबाखू, ऊस, नारळ, केळी, आंबे इत्यादींचे मोठे उत्पन्न येते. फुलबागाही पुष्कळ आहेत. अमलापूर व काकिनाडा ही सागरी मत्स्यकेंद्रे असून बलभद्रपुरम् येथे अंतर्गत मत्स्यकेंद्र आहे. महाराष्ट्रातील गोदाखोरेही सुपीक असून त्यात तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, कापूस, केळी, द्राक्षे, मिरची, ऊस, मोसंबी, पेरू, अंजीर, डाळिंबे इ. उत्पन्ने होतात. सुती व लोकरी कापड विणण्याचे व साखरेचे अनेक कारखाने गोदाखोऱ्यात असून हरतऱ्हेचे नवीन कारखाने निघत आहेत. आरोग्यदृष्ट्याही गोदावरीचे पाणी उपकारक आहे. गोदावरीवर व तिच्या उपनद्यांवर गंगापूर, दारणा, भंडारदरा, भोजापूर, नांदेड, मुळा, जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, मानार, पोचंपाड, इंचंपल्ली इ. अनेक प्रकल्प झाले आहेत व होत आहेत. गोदावरी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांना महत्त्वाची असल्यामुळे तिच्या पाण्याच्या उपयोगाबद्दल वाद उत्पन्न झाला तो १९६८ मध्ये लवादाकडे सोपविण्यात आला. तो ऑक्टोबर १९७५ मध्ये मिटला असून केंद्र सरकारकडे संमतीसाठी पाठविला आहे.

गोदावरी माहात्म्य श्रीरामचंद्रांनी गौतम ऋषीला सांगितले अशी कथा आहे. रामचंद्रांनी स्वतः गोदातीरी निवास केल्यामुळे तिचे पावित्र्य अधिकच वाढले. तिचे गौतमीमुख विशेष पवित्र मानतात. तिला वृद्धगंगा म्हणतात कारण गंगेचा व गोदेचा उगम एकच असून गोदावरी भूगर्भातून दक्षिणेत आली अशी कथा आहे. गोदावरीच्या काठी त्र्यंबकेश्वर, नासिक, नेवासे, पैठण, भद्राचलम्, राजमहेंद्री व कोटिपल्ली ही प्रमुख तीर्थक्षेत्रे असून नासिक व राजमहेंद्री येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थात स्नानसोहळा असतो. अनेक प्रसिद्ध देवस्थाने, संतांची निवासस्थाने यांमुळे महाराष्ट्रातील गोदातटाकीचा, विशेषतः मराठवाड्याचा, प्रदेश संतभूमी म्हणून ओळखला जातो.

कुमठेकर, ज. ब. यार्दी, ह. व्यं.