कादिझ: स्पेनच्या नैर्ऋत्य भागतील कादिझ प्रांताची राजधानी, लोकसंख्या १,३५,७४३ (१९७०)   हे  कादिझ उपसागराच्या एका नयनरम्य भूशिरावर असून यूरोपातील प्रसिद्ध बंदरात त्याची गणना होते. स्पेनचा एक आरमारी तळ येथे असून निर्यातबंदर व यूरोपीय जलमार्गावरील विश्रांतीस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. ख्रि. पू. ११०० च्या सुमारास फिनिशियन लोकांनी स्थापन केलेल्या ह्या शहरावर कार्थेजियन, रोमन, मूर इत्यादींनी सत्ता गाजविली. कोलंबसचे अमेरिकेला प्रयाण, ड्रेकचा आर्माडावरील हल्ला, १८१२ चे संविधान इ. स्पेनच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या घटना येथेच घडल्या. कादिझ अत्यंत स्वच्छ शहर असून शहरातील वृक्षाच्छादित राजपथ, पांढरी टुमदार घरे, उद्याने इत्यादींमुळे ते प्रवाशांचे आकर्षण झाले आहे. येथे अनेक संग्रहालये व कलावीथी असून त्यांत मुरिलो, कानो इत्यादींची प्रसिद्ध चित्रे आहेत. यांशिवाय गॉथिक व प्रबोधनकालीन अनेक वास्तूंमुळे कादिझला महत्त्व आहे.

कादिझ : एक दृश्य

ओक, द. ह.