पिओरिया : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इलिनॉल राज्याच्या पिओरिया परगण्याचे मुख्य ठिकाण व राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या १,२६,९६३ महानगरीय लोकसंख्या ३,४२,००० (१९७०). हे स्प्रिंगफील्डच्या उत्तरेस ९७ किमी. व शिकागोच्या नैऋत्येस २०९ किमी. इलिनॉय नदीकाठी वसले आहे. हवाई, खुष्कीचे मार्ग व जलमार्ग यांचे हे केंद्र आहे. याचे नाव इलिनॉय इंहियन जमातीवरून पडले. १६८० मध्ये ला सालने क्रेव्हेकूर हा किल्ला शहराच्या विरूद‌्ध बाजूस बांधला होता परंतु तो लवकरच उद्ध्वस्त झाला. नंतर फ्रेंच, इंडियन, अमेरिकन यांनी पिओरिया सरोवराकाठी वसाहती करण्यास सुरूवात केली. १८१३ मध्ये हे जॉर्ज रॉजर क्लार्क याच्या नावावरून ‘फोर्ट क्लार्क’ या नावाने ओळखले जाऊ लागले. १८२५ मध्ये या विभागाचे पिओरिया परगण्यात रूपांतर आणि फोर्ट क्लार्कचे ‘पिओरिया’ असे नामांतर करण्यात आले. १८३५ मध्ये यास गावचा, तर १८४५ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. हे सुपिक अशा शेती प्रदेशात वसल्याने धान्य आणि गुरे यांचे व्यापारकेंद्र बनले आहे. येथे अनेक विमाकंपन्यांची प्रधान कार्यालये असून हे एक औद्योगिक शहरही आहे. कृषिअवजारे व दारू गाळणे प्रमूख उद्योगधंद्यांशिवाय येथे अन्न प्रक्रिया, धुलाईची यंत्रे, मृद्वाही यंत्रसामग्री, चाकू, सुर्‍या व कात्र्या, यंत्रे व सुटे भाग, दोरखंडे, कापड, रसायने, रेडिओसाधने, कागद वस्तू, डिझेल एंजिने, तेलशुद‌्धीकरण इ. अनेकविध उद्योग चालतात. जगद्विख्यात कॅटरपिलर ट्रॅक्टर कंपनीचे मुख्यालय येथेच आहे. येथे ब्रॅडली विद्यापीठ, इलिनॉय सेंट्रल कॉलेज इ. शैक्षणिक संस्था आहेत. शहराजवळ कृषिविषयक संशोधन प्रयोगशाळा आहे.लेकव्ह्यू पार्क, लेकव्ह्यू प्लॅनिटेरियम, पिओरिया प्लेअर्स थिएटर, लेकव्ह्यू स्विमिंग पूल, आइस स्केटिंग रिंक ही पिओरियाची सांस्कृतिक आणि क्रिडाविषयक क्रेंद्रे होत. जगातील सर्वांत मोठा समजला जाणारा ‘हिरॅम वॉकर प्लंट’ हा दारू गाळण्याचा कारखाना, अब्राहम लिंकनने केलेल्या गुलामगिरीविरूद‌्ध पहिल्या भाषणाच्या स्मरणार्थ (पिओरिया स्पिच, १६ ऑक्टोंबर १८५४) उभारलेली कोर्ट हाउस चौकामधील ब्राँझ लेखवटिका, फोर्ट क्रेव्हेकूर स्टेट पार्क इ. गोष्टी प्रवाशांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.