अपरांत : पश्चिम भारतातील एक देश अथवा देशसमूह. या देशाच्या व्याप्तीविषयी प्राचीन साहित्यात एकवाक्यता नसल्यामुळे त्याचे निश्चित स्थान ठरविणे कठीण आहे. ‘अपरांत’ याचा शब्दश: अर्थ ‘पश्चिमेकडील अथवा पश्चिम सरहद्दीवरील देश’ असा होतो. प्राचीन साहित्यक याची अपरांतक, कुट्टापरांत, अपरंध्र, शूर्पारक, अरियके, अपलत अशी भिन्न नावे आढळतात. पौराणिक साहित्यात निर्देशिल्याप्रमाणे पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा आधुनिक कोकणपट्टीचा प्रदेश म्हणजे ‘अपरांत’ देश होय. प्राचीन काळी ‘मरहट्ट’ व ‘अपरांत’ हे देश स्वतंत्र मानले जात असत. महाभारतातील परशुरामाच्या पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याच्या आख्यायिकेवरून ‘कुट्टापरांत’ ‘अपरंध्र’ अशी वैकल्पिक नावे असलेला ‘अपरांत’ देश हाच असावा असे अनुमान निघते. याचे ‘शूर्पारक’ असेही एक वैकल्पिक नाव आढळते. रघवंशाच्या मल्लिनाथकृत टीकेमध्ये देशाची राजधानी शूर्पारक (आधुसोपारा), तर ह्यहुएनत्संगच्या मते ती ‘कोंकणपूर’ व अल्-बीरूनीच्या मते ‘तन’ (आधु. ठाणे) गावी होती. हा प्रदेश दीर्घकालपर्यत सातवाहन राजांच्या ताब्यात होता. महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी नगरांचा संबंध ‘अपरांत’ देशातील शूर्पारक (सोपारा) व चौल बंदरांशी असल्याचा निर्देश नाणेघाट शिलालेखात आढळतो.

शाह, र.रू. जोशी, चंद्रहास