चेकोस्लोव्हाकिया: झेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोवेन्स्का सोशॅलिस्टिका रिपब्लिका. मध्य यूरोपातील एक प्रजासत्ताक. क्षेत्रफळ १,२७,८७६ चौ. किमी. पैकी स्लोव्हाकिया ४९,०१४ चौ. किमी. लोकसंख्या १,४४,८१,३०४ (जुलै १९७२), पैकी ४६,०१,८२३ स्लोव्हाकियात. राजधानी प्राग (प्राहा) लोकसंख्या ११,०३,००० (१९७२). ४७ ४४’ उ. ते ५१ ३’  उ. (सु. २६९ किमी.) आणि १२‘ पू. ते २२ ३४‘पू. (सु. ७६७ किमी.) यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाच्या दक्षिणेस हंगेरी (चेकोस्लोव्हाकियाशी ६७५ किमी. सरहद्द) व ऑस्ट्रिया (५६६ किमी.) नैर्ऋत्येस, पश्चिमेस व वायव्येस जर्मनी (८०९ किमी.) उत्तरेस पोलंड (१,३८४ किमी.) आणि पूर्वेस रशिया (९७ किमी.) आहे.

भूवर्णन : पश्चिमेकडचा हर्सिनियन खडकांचा उंच प्रदेश आणि पूर्वेचा तृतीयक कालखंडातील खडकांचा भाग हे यूरोपातील भिन्न भूप्रकार या देशात समोरासमोर येतात त्याचप्रमाणे उत्तर यूरोपचा मैदानी प्रदेश आणि दक्षिण यूरोपचे डॅन्यूबचे मध्य खोरे याच देशात एकमेकांना जोडली जातात त्यामुळे चेकोस्लोव्हाकियाला यूरोपचा चौक किंवा चव्हाटा ही भौगोलिक संज्ञा यथार्थतेने मिळालेली आहे. देशाचे तीन स्पष्ट नैसर्गिक विभाग पडतात : पश्चिमेस प्राचीन कठीण खडकांचा बोहीमिया हा एकसंघ पर्वतपुंज त्याच्या मध्याला पठार व सखल प्रदेश आणि भोवताली पर्वतराजींचे कडे त्याच्या पूर्वेस मोरेव्हियाचा सपाट प्रदेश आणि त्याच्याही पूर्वेस कार्पेथियन पर्वतभागात स्लोव्हाकिया. 

बोहीमियाच्या कडेकडेचे बहुतेक पर्वत एकदम उभ्या चढाचे असून शुमाव्हा आणि कर्कॉनॉशेसारख्या भागांत खूप उंच आहेत दक्षिणेकडे मात्र पठार थोड्या गोल टेकड्यांपुरतेच उंचावलेले व संचारास सोपे आहे. बाकीच्या तीन दिशांना दळणवळणास उत्तुंग पर्वतांचा प्रतिबंध असून विशेषतः  नैर्ऋत्य भागात शुमाव्हा व चेस्कीलेस हे बोहीमियन वनप्रदेश दुर्लंघ्य आहेत. वायव्येस क्रुश्ने हॉरी हा धातुक पर्वत लोहेतर खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. ईशान्येत सुडेटन पर्वतांच्या त्रुटित रांगा आहेत. कर्कॉनॉशे हे या भागातील सर्वांत उंच (१,६०२ मी.) शिखर होय. या भागात कित्येक खोलगट प्रदेश असून कोळशाच्या खाणी व विद्युत्‌निर्मितीस उपयुक्त जलप्रवाह आहेत. बोहीमियाच्या उत्तर भागातील सखल प्रदेशात अनेक डोंगर, उर्मिल भूप्रदेश, टेकड्या, नद्या व सुपीक खोरी आढळतात. धातुक पर्वताला समांतर अशी ज्वालामुखीजन्य डोंगराची चेस्के स्त्रेदोहॉरी ही रांग असून तिच्या दक्षिणेस खोलगट प्रदेशात कोळशाच्या खाणी आणि दुपाउफ्‌स्की हॉरीच्या सलग टेकड्यांचा एक विस्तीर्ण डोंगरभाग आहे. त्याच्या कडांतून कित्येक ठिकाणी नैसर्गिक औषधी पाण्याचे गरम झरे आहेत. दक्षिण बोहीमियाचे पठार उत्तर भागापेक्षा बरेच उंच असून त्यात नद्यांनी खणून काढलेल्या खोल दऱ्या आढळतात. पूर्वी बर्डी टेकड्यांसारख्या भागात सापडणाऱ्या लोहधातुकाचा साठा आता संपलेला आहे तथापि कोळसा आणि लोहधातुकावर आधारलेली बोहीमियाची परंपरागत कारखानदारी पल्झेनसारख्या औद्योगिक केंद्रात आयात लोखंडकोळशावर चालू आहे. मोरेव्हिया-सायलीशिया हा मध्यवर्ती नैसर्गिक विभाग भूपृष्ठरचनेतील दोन वेगळ्या जातींच्या खडकांमधील सीमाप्रदेश आहे. मोरेव्हिया हे डॅन्यूबच्या मोराव्हा उपनदीचे ऊर्मिल क्षेत्र हे दक्षिणेचे डॅन्यूब मैदान व उत्तरेचे सायलीशिया मैदान यांना जोडणारे आहे. पश्चिमेकडून बोहीमियाच्या टेकड्या या बाजूस सावकाश उताराने आलेल्या आहेत. पूर्वेस मात्र कार्पेथियमच्या बेस्किदी पर्वतभागाकडे चढ एकदम सुरू होतो. ईशान्येकडे अरुंद होत गेलेल्या या सपाट प्रदेशात मोराव्हाला मिळणाऱ्या नद्या आहेत. बेच्व्हा नदी आणि मोरेव्हीयाचे महाद्वार, ‘मॉराफ्‌स्का ब्राना’ ही विख्यात खिंड याच भागात आहे. येथून जवळच ओडर (ओड्रा) नदी उत्तरेकडे पोलंडमध्ये प्रवेश करते. डॅन्यूब नदीखोरे व उत्तर यूरोप मैदान यांच्या दरम्यान सोईचा हा एक ऐतिहासिक मार्ग असून आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या याला अनन्यसाधारण महत्व आहे. यावरून रस्ते व लोहमार्ग गेले आहेत आणि डॅन्यूब व ओडर नद्यांना जोडणारा संकल्पित कालवाही याच मार्गाने जाणारा आहे. दक्षिण मोरेव्हियाची भूमी सुपीक आहे. अगदी उत्तरेकडच्या प्रदेशात सायलीशियन कोळसाक्षेत्राचा नैर्ऋत्य भाग येतो तेथील खाणींतील कोळशावर लोखंड-पोलादाचे मोठे कारखाने चालतात. स्लोव्हाकियातील कार्पेथियन पर्वतप्रदेश म्हणजे ऑस्ट्रियातील आल्प्सच्या विस्ताराचा डॅन्यूबच्या पलीकडे ईशान्येकडे गेलेला भाग होय. दक्षिणेत पश्चिम-पूर्व रांगा असलेले छोटे कार्पेथियन (मार्ले कार्पेटी) उत्तरेकडे उंच होत जातात. त्यांच्या रांगांदरम्यान रुंद खोरी आहेत. अगदी उत्तरेकडे बेस्किदी पर्वताचे तुटक कणे असून तो प्रदेश संचार सुलभ आहे. त्याच्या दक्षिणेस उंच तात्रा पर्वत असून त्यातील गेर्लाकॉफ्का (पूर्वीचे स्टालिनो) हे २,६५५ मी. उंचीचे देशातील सर्वोच्च शिखर आहे. त्यांच्या दक्षिणेस लिप्टॉफ्‌स्की खोरे व ठेंगू तात्रा आणि अगदी दक्षिणेस स्लोव्हाकियन धातुकपर्वत असून हेही हालचालींना सोपे आहेत. पूर्वी हा भाग खनिजसंपन्न होता आता उपयुक्त वनांनी आच्छादित आहे.

अनेक जातींच्या खडकांचा परिणाम त्यांच्यावरील जमिनींवर झालेला असून हवामानपरत्वेही मातीच्या रचनेत फरक आढळतो. स्थूलमानाने वायव्य बोहीमियातील पोलाबी व दक्षिण मोरेव्हिया ही दोन केंद्रे वेगवेगळ्या प्रकारांच्या मातींच्या पट्ट्यांनी वेढलेली असून मध्यभागी माती कसदार, मिश्र काळी व वायुवाहित आहे. त्याभोवती मध्य बोहीमियाच्या व दक्षिण मोरेव्हियाच्या वनप्रदेशांची सुपीक तपकिरी रंगाची मृदा आहे. त्याच्याभोवती बोहीमिया, सायलीशिया व उत्तर मोरेव्हियात, कुजलेला पालापाचोळा व खनिजमिश्रित आणि डोंगराळ प्रदेशात उथळ, खडक-दगडांनी भरलेली मृदा आहे. कोठे-कोठे वायुवाहित मृदा आढळते. गाळजमिनी जास्त समृद्ध आहेत. स्लोव्हाकियाच्या नदीखोऱ्यांतून गाळमाती व खोलगट प्रदेशात कुजलेल्या गवताची माती असून दलदलींचा चिखल व कित्येक ठिकाणी खारमातीचे पट्टे आढळतात. सामान्यतः उत्तर मोरेव्हियाची जमीन चुनखडीमिश्रित व दक्षिणेत वायुवाहित मृदांनी संपन्न आहे. बोहीमियाच्या उत्तरेत खालच्या मृदांवर वायुवाहित मृदांचे थर असून दक्षिणेस दाट चिकणमाती आढळते. स्लोव्हाकियाच्या काही डोंगराळ भागात ज्वालामुखीजन्य सुपीक भूमी आणि दक्षिण भागात दलदलींचा निचरा करून बनवलेली गाळजमीन आढळते.

कोळसा, अँटिमनी, पारा, युरेनियम, ग्रॅफाइट, चिनी माती, काचेसाठी रेती, चुनखडक, चांदी आणि पायराइटचे कमीअधिक साठे देशात असून काही खनिजे पुरेशा प्रमाणात मिळतात. बोहीमिया व सायलीशियात लिग्नाइट, बोहीमियात अँथ्रासाइट व देशभर बिट्युमिनस कोळसा सापडतो. स्लोव्हाकियाच्या धातुक पर्वतात बरेचसे लोहधातुक, काही तांबे, शिसे, मीठ व जिप्सम उपलब्ध होते. वायव्य बोहीमियात मर्यादित प्रमाणात शिसे, तांबे, टंगस्टन आणि पिच ब्लेंड सापडते. खनिज तेलाचेही उत्पादन अगदी थोडे आहे. कित्येक शतके चांदीच्या खाणींबद्दल विख्यात असलेल्या याखिमॉफजवळ आता युरेनियम निघते.

देश भूवेष्टित असल्यामुळे समुद्रापर्यंत पोहोचणाऱ्या तीन नद्यांना विशेष महत्त्व आहे. जर्मनीमार्गे उत्तर समुद्राला मिळणाऱ्या लाबे (एल्ब) नदीच्या ऑर्झे (एगर), बेरोंका व व्हल्टाव्हा या महत्त्वाच्या उपनद्या बोहीमियात वाहतात. मोरेव्हियाच्या उत्तर भागात उगम पावणारी ओड्रा (ओडर) पोलंडमधून जाऊन बाल्टिक समुद्राला मिळते. काळ्या समुद्राला मिळणाऱ्या डॅन्यूबची महत्त्वाची उपनदी मोराव्हा देशाच्या मध्यातून वाहते. तिला मोरेव्हियातून डिये, इग्लाव्हा व स्विताव्हा मिळतात व स्लोव्हाकियातून डॅन्यूबला व्हा, न्यित्रा व हरॉन मिळतात. दक्षिण बोहीमियात ट्रेबॉन व बुद्येयॉव्हित्से प्रदेशांत अनेक तळी व डबकी आहेत. स्लोव्हाकियाच्या उंच तात्रा पर्वतभागात हिमगव्हरे व त्यांत पाणी साचून निर्माण झालेली कित्येक लहान निसर्गरम्य सरोवरे आहेत.

प्रदेशाच्या उंचसखल स्वरूपानुसार हवामानात फरक आढळतो. चेक विभागाच्या खोलगट प्रदेशात महाद्वीपीय हवामान तर सभोवारच्या उंच प्रदेशात ते अधिक सौम्य आढळते, त्याचप्रमाणे स्लोव्हाकियाच्या हिमाच्छादित पर्वतभागाहून अगदी भिन्न हवामान डॅन्यूबकाठच्या  मैदानात आढळते. थंड व उष्ण हवामानातील फरक पूर्वेकडे किंचित वाढत जातो. अधिक पाऊस उन्हाळ्यात पडतो. पश्चिमेकडे बोहीमियात प्राग येथे पाऊस कमी (४८३ मिमी.), किमान तापमान –३ से. व कमाल १९·५ से. असते. बोहीमियात व मोरेव्हियात वरचेवर धुके पडते. कार्पेथियन पर्वतभागात दर १०–१५ वर्षांनी जोरदार विध्वंसक वादळे होतात.

देशाचे स्थान नैसर्गिक खंडविभागाच्या पश्चिम-पूर्व व उत्तर-दक्षिण सीमांच्या छेदप्रदेशावर असल्यामुळे चारही विभागांतील वनस्पती चेकोस्लोव्हाकियात आढळतात, त्याचप्रमाणे भूमीचा उंचसखलपणा, मृदांच्या तऱ्हा आणि हवामानांचे फरक वनस्पतींच्या विविधतेत व्यक्त होतात. देशाची तृतीयांशावर भूमी वनाच्छादित असून बोहीमिया–मोरेव्हिया–सायलीशियातील वने अनेक वर्षे काळजीपूर्वक जोपासलेली आणि युद्धविध्वंसातूनही टिकवून ठेवलेली आहेत. स्प्रूस, फर, स्कॉट पाइन अशा सूचिपर्ण वृक्षांचे प्रमाण दोनतृतीयांशाहून अधिक आहे. बोहीमियाच्या सीमेवरील पर्वतांतून बेच्व्हा व लाबे नदीच्या उत्तरेस ओक वृक्षांची उत्तम झाडी आहे. शुमाव्हा पर्वतराजीत मूळ नैसर्गिक स्थितीतील वनप्रदेश आहे. स्लोव्हाकियात पानझडी वृक्षांचे प्रमाण सु. निम्मे व तृतीयांश वनभाग बीच वृक्षांचा असून उंच पर्वतप्रदेशात अल्पाइन व सपाटीवर गवताळ मैदानावरच्या जातीचा वनस्पतिसमूह आढळतो. पूर्व स्लोव्हाकियातील प्रेशॉफ-कॉशित्से हा डोंगरकणा पश्चिम व पूर्व यूरोपदरम्यानची वनस्पतिसीमा असल्याचे आढळून आले आहे. 

थोड्या प्रमाणात अस्वल, लांडगा, लिंक्स व रानमांजर अधिक प्रमाणात ऑटर, बॅजर, पोलकॅट, मार्टेन व मिंक वनांमधून लाल हरिण, तरो व रानडुक्कर काही पर्वतप्रदेशात मुद्दाम आणून सोडलेले शॅमॉय हरिण असे प्राणी येथे आहेत. सोनेरी व शुभ्रपुच्छ गरुड, ऑस्प्री, ग्रिकॉन, ईजिप्शियन गिधाड आणि गरुडघुबड तसेच अनेक प्रकारांचे जलपक्षी व दलदलीतील पक्षी, काळे व पांढरे करकोचे येथे आहेत. माशांपैकी डॅन्यूबमधला प्रचंड कॅटफिश ‘वेल्स’ विशेष उल्लेखनीय असून डबक्यातील कासवे, अनेक जातींचे सर्प, सरडे, पाली व बेडूक हे प्राणीही आहेत. 


इतिहास : बोहीमिया, मोरेव्हिया व सायलीशिया या चेक प्रदेशांव्यतिरिक्त स्लोव्हाकिया याचाही समावेश यात होतो. या इतिहासकालीन प्रांतांच्या संयोगाने आजचा आधुनिक चेकोस्लोव्हाकिया हा देश बनला आहे. त्याच्या प्राचीन इतिहासाविषयी आठव्या शतकापर्यंत सुसंगत माहिती मिळत नाही. चेक व स्लोव्हाक या जमाती त्या  वेळी अस्तित्वात होत्या. त्या स्लाव्हिक समाजाच्याच दोन शाखा होत्या, आठव्या शतकात मॉइमिर या एका जमातप्रमुखाने मोरेव्हियन राज्य स्लोव्हाकियात स्थापना केले, त्या सुमारास सिरिल (कॉस्टंटीन ८२७–६९) व मिथोडियस (८२६–८५) या दोन ग्रीक ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ख्रिस्ती धर्म स्लोव्हाकियात आणला. मग्यार नावाच्या हंगेरीतील लोकांनी हे राज्य जिंकून आपले आधिपत्य स्लोव्हाकियात प्रस्थापिले (९०५). पुढे काही शतके हा प्रदेश मग्यारांच्या ताब्यात होता. मध्ययुगात १०४१ मध्ये बोहीमियातील जमातप्रमुखाला रोमन पवित्र साम्राज्याचे मांडलिकत्व स्वीकारणे भाग पडले. तथापि १२०० मध्ये त्याला रोमन सम्राटपदासाठी निवडणाऱ्या सात निर्वाचकांमध्ये स्थान मिळाले. या सुमारास जर्मन तंत्रज्ञ व व्यापारी यांना बोहीमियाचे तथाकथित राज्यकर्ते पाचारण करीत व बोहिमियात स्थायिक होण्यास उत्तेजन देत. १३४७ मध्ये बोहीमियाचा चार्ल्स हाचविन रोमन साम्राज्याचा चौथा चार्ल्स हे नाव धारण करून सम्राट झाला. चेक लोक हा सुवर्णकाळ मानतात कारण या काळात बोहिमियाकरिता त्याने जमीन मिळविली आणि बोहीमियाचा नावलौकिक सर्वत्र वाढविला. एवढेच नव्हे, तर तो राज्याची सर्व सूत्रे प्रागमधून हलवीत असे. चार्ल्सच्या मृत्यूनंतर बोहीमियात धार्मिक झगडे सुरू झाले.जॉन हस (१३६९–१४१५) याने रोमन कॅथलिक चर्चमध्ये सुधारणा व्हावी, म्हणून चळवळ सुरू केली. जॉन हसला जिवंत जाळण्यात आले. तरीही ही हसची चळवळ पुढे २० वर्षे चालू होती. १४३४ मध्ये दोन्ही पक्षांनी समझोता केला. तो १६२० पर्यंत कसाबसा टिकला. या काळात अनेक  स्लोव्हाक लोक प्रागला शिक्षणानिमित्त आले. पुढे पोलंडच्या राजाने बोहीमियावर सत्ता गाजविली. १५२६ मध्ये बोहीमियाचा राजा दुसरा लुई तुर्कांबरोबर लढताना मॉहाचच्या लढाईत मारला गेला. तेव्हा कॅथलिक पंथाच्या सरदारांनी ऑस्ट्रियाचा पहिला फर्डिनँड याला चेक गादीवर राजा म्हणून निवडले. तेव्हापासून हॅप्सबर्ग वंशाची कारकीर्द सुरू झाली. फर्डनँडने कॅथलिक पंथाचा पुरस्कार केला. त्या वेळी प्रॉटेस्टंटांनी हॅप्सबर्गबरोबर युद्ध सुरू केले (१६१८) परंतु त्यात प्रॉटेस्टंटांचा १६२० मध्ये  पराभव झाला. तथापि हे धार्मिक युद्ध पुढे यूरोपमध्ये पसरले व ते तीस वर्षांचे युद्ध म्हणून इतिहासात प्रसिद्ध पावले. त्यामुळे चेक लोकांचे अतोनात नुकसान झाले. बोहीमिया, मोरेव्हिया आणि स्लोव्हाकिया हे हॅप्सबर्ग राज्याचे प्रांत म्हणून जरी राहिले, तरी पहिल्या पंधरा वर्षांत बोहीमिया, मोरेव्हिया आणि सायलीशिया यांची आर्थिक व राजकीय स्थिती खालावत गेली. स्लाव्ह पुढाऱ्यांनी चेकोस्लोव्हाकियात राष्ट्रीय अस्मिता जागृत केली. १८४८ मध्ये बोहीमिया व स्लोव्हाकिया यांनी हंगेरीतील मग्यार लोकांसह ऑस्ट्रियाविरुद्ध बंड केले. ते मोडण्यात आले. तथापि १८६७ मध्ये मग्यारांनी ऑस्ट्रियाकडून समान हक्क मिळविले. यामुळे ऑस्ट्रिया-हंगेरीची द्विदलीय राजेशाही निर्माण झाली मात्र चेक व स्लोव्हाक यांना कोणताच राजकीय दर्जा प्राप्त झाला नाही.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी हॅप्सबर्ग सरकारने बोहीमियन क्रांतिकारकांविरुद्ध कडक उपाय योजिले. तेव्हा टॉमाश मासारिक, त्याचा शिष्य एदुआर्त बेनेश, स्लोव्हाक ज्योतिर्विद मिलान, श्टेफानिक वगैरे पुढाऱ्यांनी चेकोस्लोव्हाक राष्ट्रीय समिती स्थापन केली. या संधीचा फायदा घेऊन हॅप्सबर्गकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता दोस्त राष्ट्रांची सहानुभूती मिळविण्यासाठी ते देशाबाहेर पडले. अनेक चेक सैनिकांनी हॅप्सबर्ग सैन्यातून बाहेर पडून लहान पथके तयार केली आणि रशिया, फ्रान्स यांच्या म्हणजे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने ते लढू लागले. स्लोव्हाकियात कारेल क्रेमर आणि त्याचे भूमिगत अनुयायी यांची ‘माफिया’ ही संघटना हॅप्सबर्गांना नि:शस्त्र प्रतिकार करीत होतीच. मासारिक आणि इतर सर्व स्लोव्हाक पुढारी अमेरिकेत एकत्र आले आणि पिट्सबर्ग करारावर सह्या झाल्या. त्यानुसार चेक आणि स्लोव्हाक लोकांना नवीन देशात समान प्रतिनिधित्व मिळेल असे ठरले. दोस्त राष्ट्रांनी या तात्पुरत्या सरकारला चेकोस्लोव्हाकियाचे सरकार म्हणून मान्यता दिली. १९१८ मध्ये हॅप्सबर्ग सत्ता दुबळी झाली व त्यामुळे चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक झाल्याचे २८ ऑक्टोबर १९१८ रोजी जाहीर करण्यात आले आणि चेक व स्लोव्हाक अखेर संघटित होऊन राज्यनिर्मिती झाली. मासारिक त्याचा पहिला अध्यक्ष व बेनेश परराष्ट्रमंत्री झाला. १९२१ मध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी हिटलरने चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन करण्याच्या दृष्टीने तेथील जर्मन भाषिकांसाठी स्वतंत्र प्रांताची मागणी केली. त्याचा उद्देश चेकोस्लोव्हाकियाचा काही भाग पादाक्रांत करणे हा होता. या जर्मन भाषिकांना सुडेटन जर्मन म्हणत. त्यांची वस्ती मुख्यत्वे सुडेटन पर्वतरांगांत होती. चेकोस्लोव्हाकियाचे स्वातंत्र्यास जर्मनीचा धोका आहे, असे गृहीत धरून मासारिकने रशिया व फ्रान्स यांबरोबर मैत्रीचे करार केले परंतु १९३८ मध्ये इटली, फ्रान्स, ब्रिटन व जर्मनी यांचे पुढारी जर्मनीच्या मागणीचा विचार करण्याकरिता म्यूनिकमध्ये जमले. ब्रिटन व फ्रान्स यांनी जर्मनीची मागणी रास्त असल्याचे सांगितले. या वेळी बेनेश हा अध्यक्ष होता. तो राजीनामा देऊन इंग्लंडला गेला. १९३९ मध्ये हिटलरने चेकोस्लोव्हाकियावर ताबा मिळविला आणि म्यूनिक करार धुडकावून लावला. बेनेश स्वतंत्र चेकोस्लोव्हाकिया चळवळीचा प्रमुख झाला. त्याचा साहाय्यक अध्यक्ष मासारिकचा मुलगा जॉन मासारिक हा होता. १९४१ मध्ये रशियन सैन्याबरोबर त्यांनी चेकोस्लोव्हाकियात प्रवेश केला. त्यांनी तत्काळ ६० टक्के उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि रशियाला रूथीनीया हा पूर्व स्लोव्हाकियाचा भाग दिला. १९४६ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. राष्ट्रीय सभेच्या २०० जागांपैकी ११४ जागा कम्युनिस्टांना मिळाल्या व उरलेल्या जागा इतर पक्षांमध्ये विभागल्या गेल्या. त्यामुळे कम्युनिस्टांचे वर्चस्व आले आणि पंतप्रधान व इतर काही प्रमुख मंत्री त्याच पक्षाचे बनले. १९४८ मध्ये कम्युनिस्टांनी बंड करून सर्व सत्ता घेतली, संविधान तयार केले व तथाकथित निवडणुका घेतल्या. जॉन मासारिक याने आत्महत्या केली असावी असे म्हणतात, तर बेनेशने या सर्व धोरणास कंटाळून राजीनामा दिला. त्याच्या जागी कम्युनिस्ट पंतप्रधान क्लेमंट गोटव्हाल्ड (१८९६–१९५३) आला. त्याने रशियाच्या धर्तीवर राज्याची उभारणी केली. शैक्षणिक व धार्मिक संस्था कम्युनिस्टांच्या नियंत्रणाखाली आल्या. रोमन कॅथलिक पाद्रींना तुरुंगात टाकण्यात आले. चेकोस्लोव्हाकिया व पोलंड यांनी आर्थिक सहकार्याकरिता एक परिषद बोलावली. चेकोस्लोव्हाकिया रशियाचा मित्र बनला व बहुतेक सर्व धोरणांमध्ये रशियाचा सल्ला घेऊ लागला. गोटव्हाल्डच्या मृत्यूनंतर १९५३ मध्ये काही कम्युनिस्ट नेत्यांना बढती मिळाली. आंटान्यीन झापोटोक्या अध्यक्ष आणि विल्यम शिरोक्या पंतप्रधान झाले. १९५० ते १९६० मध्ये आर्थिक अस्थिरता देशात निर्माण झाली. राष्ट्रीयीकरणातून फारसे काही निर्माण झाले नाही. तेव्हा चलनवाढ थांबविण्याकरिता अन्नधान्यावर नियंत्रण लादले व चलनाचे पुनर्मूल्यन करण्यात आले. झापोटोक्याच्या मृत्यूनंतर १९५७ मध्ये आंटान्यीन नोव्हाट्न्या अध्यक्ष झाला. त्याने रशियातून खनिज तेल आणण्यासाठी १९६२ मध्ये नळयोजना सुरू केली.


सर्वंकष कम्युनिस्ट सत्तेविरुद्ध हळूहळू चेकोस्लोव्हाकियात चळवळी सुरू झाल्या. व्यक्तिस्वातंत्र्य, उच्च जीवनमान व रशिया पुरस्कृत राज्यपद्धतीचा शेवट यांची मागणी वाढू लागली व १९६७ मध्ये विद्यार्थी आणि लेखक या गोष्टींचा पुरस्कार करू लागले. शेवटी १९६८ मध्ये कम्युनिस्ट नेत्यांमधील काहींना याची जाणीव झाली. काही मूलभूत राजकीय बदल करणे आवश्यक आहे, असे वाटू लागले. अलेक्झांडर डुब्‌चेक हा चेकोस्लोव्हाक कम्युनिस्ट पक्षाचा पहिला सचिव झाला. त्याने चेकोस्लोव्हाकियातील कम्युनिस्ट पक्षात उदारमतवाद आणि लोकशाही तत्त्वे आणण्याकरिता तसेच रशियाचे वर्चस्व कमी करण्याकरिता, एक भरीव कार्यक्रम आखला. याला समाजातील सर्व थरांतून साथ मिळाली तथापि रशिया आणि त्याची अंकित राष्ट्रे चेकोस्लोव्हाकियाकडे संशयाने पाहू लागली. चेकोस्लोव्हाकियाने पुनः पुन्हा आपण कम्युनिस्ट राहू असे अभिवचन देऊनही २१ ऑगस्ट १९६८ रोजी वॉर्सा करारानुसार सु. पाच लाख रशियन सैनिकांनी चेकोस्लोव्हाकियात प्रवेश केला. याविरुद्ध कम्युनिस्टेतर देशांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या पण रशियाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १९६९ मध्ये डुब्‌चेकला आपले पद सोडावे लागले आणि गुस्टाव्ह हुसेक हा पहिला सचिव झाला. त्याने सनातनी साम्यवाद (कम्युनिझम) व नवीन उदारमतवाद यांमध्ये शक्य तितका समतोल साधण्याचा प्रयत्न केला.

चेकोस्लोव्हाकियातील हंगामी मंत्रिमंडळात १४ डिसेंबर १९७३ रोजी अनेक फेरबदल करण्यात आले. चेकोस्लोव्हाकिया अद्यापि एक पूर्ण कम्युनिस्ट राष्ट्र असून त्याच्या अंतर्गत आणि परराष्ट्रीय धोरणांवर रशियाचे पूर्ण वर्चस्व दिसते.

 देशपांडे, सु. र.

 

राजकीय स्थिती : १९४८ साली रक्तहीन क्रांतीने कम्युनिस्टांनी सत्ता काबीज केल्यानंतर चेकोस्लोव्हाकियात विरोधी पक्ष उरला नाही. चेक नॅशनल सोशॅलिस्ट, पॉप्युलिस्ट, स्लोव्हाक डेमोक्रॅट्स व सोशल डेमोक्रॅट्स असे एकून ११ अल्पमतांत असलेले पक्ष राष्ट्रीय आघाडीत सामील झाले त्यांच्या संघटना व वृत्तपत्रे वेगळी, पण पाठिंबा कम्युनिस्ट धोरणालाच होता. चेकोस्लोव्हकियाचे परराष्ट्रीय धोरण सोव्हिएट कक्षेतील एक राष्ट्र या नात्याने रशियाच्या तंत्रानेच बव्हंशी चालते. कारण १९४५ च्या कॉशित्से करारापासून त्या देशाशी एक प्रकारची सक्तीची मैत्री असून शिवाय १९४२ मध्ये स्थापन झालेल्या कॉमेकॉन वा परस्पर आर्थिक साहाय्य मंडळाचा सदस्य म्हणून आर्थिक व्यवहारांबाबत व वॉर्सा करार किंवा पूर्व यूरोपीय परस्पर मदत तहनाम्यानुसार राजकीय संबंधात हा देश रशिया आदी कम्युनिस्ट राष्ट्रांच्या संघटनेत पक्का बांधला गेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर मार्शल योजनेनुसार अमेरिका देण्यास तयार असलेली आर्थिक मदत रशियाच्या सल्ल्याने चेकोस्लोव्हाकियास नाकारावी लागली. १९५६ साली विद्यार्थ्यांनी व तरुणांनी मतस्वातंत्र्याची केलेली चळवळ लवकरच दडपून टाकण्यात आली. १९६८ मध्ये रशियाच्या वर्चस्वातून मुक्त होऊन स्वतंत्र, उदारमतवादी धोरण आखण्याचा चेकोस्लोव्हाक राष्ट्राचा आणखी एक प्रयत्नही रशियाने लष्करी हस्तक्षेप करून निष्फळ केला. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पूर्व यूरोपीय देशांशी संबंध, तर रशियाच्या देखरेखीखाली राहतातच पण इतर देशांशी संपर्क देखील रशियाच्या तंत्रानेच ठेवावे लागतात. आंतरराष्ट्रीय मजूर संघटना (आय्‌. एल्. ओ.), संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (युनेस्को), जागतिक आरोग्य संघटना (हू) अशा संस्थांच्या कार्यात चेकोस्लोव्हाकिया सहभागी झाला आहे. शिवाय विशेष उद्दिष्टांच्या, आंतरराष्ट्रीय रबरसंशोधनसंस्था, यांसारख्यांचे सदस्यत्वही चेकोस्लोव्हाकियाने स्वीकारले आहे.

सतराव्या शतकात यूरोपातील तीस वर्षांच्या युद्धाअखेर बोहीमिया व मोरेव्हिया ही राज्ये नष्ट होऊन चेक प्रदेश ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग घराण्याच्या अधिसत्तेखाली जो आला तो तीनशे वर्षे पारतंत्र्यातच होता. पहिल्या महायुद्धोत्तर १९१८ मध्ये चेक व स्लोव्हाक प्रदेशांचे मिळून एक स्वतंत्र प्रजासत्ताक स्थापना झाले. त्याच्या संविधानात सर्व सत्तेचा अंतिम उगम जनतेपासून, प्रातिनिधिक लोकशाही व विधानसभेचे कार्यकारी शासनावर नियंत्रण ही तत्त्वे अंतर्भूत होती. वीस वर्षेपर्यंत ते एक उद्योगी, प्रगत, संपन्न व सुसंस्कृत राष्ट्र होते. त्याची समस्या होती फक्त अल्पसंख्यांकांची. स्लोव्हाक हे महत्त्वाचे घटक नागरिक असंतुष्ट होते, आग्नेयीतील हंगेरियन व उत्तरेतील पोलिश अल्पसंख्य हे त्रासदायक होते तथापि वायव्येतील बऱ्याच मोठ्या संख्येचे सुडेटन जर्मन हे सर्वांत त्रासदायक होते. त्यांचेच निमित्त करून हिटलरने १९३८ मध्ये सुडेटन प्रदेश व्यापला, त्याच वेळी हंगेरीने व पोलंडने आपापल्या शेजारच्या चेक प्रदेशांचे लचके तोडले. उरलेल्या देशावर दुसऱ्या चेक प्रजासत्ताकाने जेमतेम चार महिने राज्य केल्यावर १९३९ मध्ये म्यूनिक करारानंतर हिटलरने बोहीमिया व मोरेव्हिया प्रांत पादाक्रांत करून जर्मनीला जोडले व स्लोव्हाकियाचे वेगळे संरक्षित राज्य बनवले. १९३९ ते १९४५ पर्यंत लंडनमध्ये चेकोस्लोव्हाकियाचे निर्वासित शासन जुन्या प्रजासत्ताक संविधानानुसार मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यक्षाच्या वटहुकुमांनुसार चालू राहिले. १९४५ मध्ये नाझी हुकूमशाही संपल्यावर १९४६ मध्ये घटनापरिषदेने नवे शासन निवडून पुनर्वसनाचा कार्यक्रम म्हणून एक द्विवार्षिक योजना संमत केली पण त्या वर्षी अवर्षणामुळे देशास बिकट स्थिती आली व तशात रशियाच्या विरोधाखातर मार्शल योजनेनुसार यूरोपीय भरपाई कार्यक्रमाची अमेरिकन मदत नाकारावी लागल्यामुळे, चेकोस्लोव्हाकियाच्या जनतेत असंतोष धुमसू लागला. त्याच वेळी कम्युनिस्टांनी पोलिस खाते काबीज केल्यामुळे मंत्रिमंडळात मतभेद होऊन कम्युनिस्टेतर मंत्री बाहेर पडले. तेव्हा कम्युनिस्टांनी जनतेतील असंतोष धाकदपटशाने दाबून टाकला व संपूर्ण सत्ता हाती घेतली. त्यांनी बोलावलेल्या कम्युनिस्ट नियंत्रित घटनापरिषदेने १९४८ साली नवे संविधान एकमताने संमत केले. त्यात लोकशाहीला नाममात्रच वाव होता. राज्यकारभाराचे सर्वाधिकार कम्युनिस्ट पक्षाला असून शासकीय सत्ता अनियंत्रित आहे. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायसंस्था ही क्षेत्रे वेगवेगळी असावी, राज्ययंत्र विधानानुसार चालावे, अशी पाश्चिमात्य लोकशाहीची तत्त्वे कम्युनिस्टांनी फेटाळून लावली. त्यांचे संविधान कायदे आणि वटहुकुमांचा संग्रह या स्वरूपात होते. घोषणा, मूलभूत तत्त्वे आणि निर्दिष्ट तरतुदी असे त्याचे तीन भाग आहेत. देशवासीयांची समाजवादाकडे शांततापूर्वक प्रगती, ही घोषणा हेच चेकोस्लोव्हाक राष्ट्राचे राजकीय तत्त्वज्ञान व हीच मूलभूत तत्त्वे होत. सार्वत्रिक, समान, प्रत्यक्ष आणि गुप्त मतदानाने १८ वर्षांवरील वयाचे मतदार किमान २१ वर्षे वयाचा प्रतिनिधी निवडतात. मतदारांना उमेदवार ‘निवडण्याचे’ स्वातंत्र्य  नसते, कारण शासक पक्षाने ठरविलेल्या एकेका उमदवाराचीच यादी मतदारांपुढे असते. संसदेची वर्षातून निदान दोन अधिवेशने भरतात. जरी संविधानात विधिमंडळाला वैधानिक सत्तेचे सर्वश्रेष्ठ अंग म्हटले असले, तरी ३५० सदस्यांच्या राष्ट्रीय संसदेत १२ सदस्यांच्या ‘प्रेसीडियम’ कडेच विधानविषयक कार्य सोपविलेले असते. प्रत्यक्ष  विधाने मंत्रिमंडळच तयार करते. महत्त्वाचे धोरणविषयक ठराव कम्युनिस्ट पक्ष, समिती आणि मंत्रिमंडळ यांच्या संयुक्त प्रकाशनात अधिकृतपणे जाहीर होतात. त्यांच्यावर संसदेचे हुकमी शिक्कामोर्तब यथाक्रम होतेच. कम्युनिस्ट मध्यवर्ती समिती राज्ययंत्रणेमार्फत कारभार चालवते. १ जानेवारी १९६९ पासून बोहीमिया, मोरेव्हिया व सायलीशियाचा काही भाग मिळून झालेले चेक सोशॅलिस्ट प्रजासत्ताक व स्लोव्हाकियाचे स्लोव्हाक सोशॅलिस्ट प्रजासत्ताक या समान अधिकार असलेल्या दोन राष्ट्रांचे मिळून चेकोस्लोव्हाकियाचे सोशॅलिस्ट प्रजासत्ताक संघराज्य अस्तित्वात आले. प्रत्येक प्रजासत्ताकाचे राष्ट्रीय मंडळ असून घटनाविषयक व परराष्ट्रसंबंधविषयक बाबी, संरक्षण, परदेशाशी व्यापार, दळणवळण आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय यांबाबतची जबाबदारी संघराज्याकडे सोपविलेली आहे. डिसेंबर १९७० मध्ये संसदेची जबाबदारी वाढविण्यात आली. संघराज्याचे राष्ट्रमंडळ (चेंबर ऑफ नेशन्स) आणि लोकमंडळ (चेंबर ऑफ द पीपल) अशी दोन गृहे असून पहिल्यात ७५ चेक व ७५ स्लोव्हाक प्रतिनिधी त्या त्या राष्ट्रीय मंडळांनी निवडलेले असतात. लोकमंडळावर १३७ चेक व ६३ स्लोव्हाक असे पाच वर्षांसाठी लोकांकडून निवडले जातात. निवडलेली संसद राष्ट्राध्यक्षाची निवड करते व तो मध्यवर्ती मंत्रिमंडळाची नेमणूक करतो. त्यात एक प्रधानमंत्री, दहा उपप्रधान मंत्री व ५६ मंत्री असतात. चेक राष्ट्रीय मंडळाचे २०० प्रतिनिधी ५ वर्षांसाठी निवडलेले असतात व स्लोव्हाक राष्ट्रीय मंडळाचे १५० प्रतिनिधीही पाच वर्षांसाठी निवडलेले असतात. चेक व स्लोव्हाक मंत्रिमंडळे वेगवेगळी असून प्रत्येकात एक मुख्यमंत्री, तीन उपमंत्री व पंधरा इतर मंत्री असतात. दुय्यम शासनासाठी विभागीय जिल्हावार व स्थानिक राष्ट्रीय समित्या आहेत. त्यांच्यापूर्वी त्यांचे कारभार गृहखाते पाही. १९५४ साली त्यांच्या पहिल्या निवडणुका झाल्या. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी ५ वर्षांसाठी निवडून दिले जातात. ते बहुधा कामगार संघटना, युवासंघटना वा पक्ष यांनी सुचवलेले कम्युनिस्टमान्य उमेदवार असतात. राष्ट्रीय समित्यांची अंदाजपत्रके राष्ट्रीय अंदाजपत्रकाचाच एक भाग असतात. स्थानिक समित्या जिल्हा समित्यांना, त्या प्रदेश समित्यांना व सर्वच केंद्र शासनाला उत्तरदायी असतात. समित्यांतील मंडळांना कार्यकारी अधिकार असून त्यांची कामे खात्यांमार्फत चालतात. अंतर्गत सुरक्षा, योजना, अर्थकारण, सार्वजनिक बांधकामे, अंतर्गत व्यापार, अन्न, आरोग्य, शेती, कामगार व समाजकल्याण ही समित्यांची खाती होत. समिती-सदस्यांना परत बोलावण्याचा मतदारांचा अधिकार क्वचित वापरण्यात येतो.


न्याय :घटनेप्रमाणे सर्वोच्च, प्रादेशिक, जिल्हावार, जनतेची, त्याचप्रमाणे सैनिक, लवाद आणि अन्य विशेष न्यायालयांची तरतूद आहे. व्यावसायिक आणि जनतेतील असे दोन प्रकारचे न्यायाधीश असतात. जनतेतील न्यायाधीश वर्षांतून जास्तीत जास्त १५ दिवस न्यायदानाला बसतात. प्रादेशिक आणि जनता न्यायालयांचे न्यायाधीश २३ इतक्या कमी वयाचे व विधिशिक्षण न घेतलेलेही असू शकतात. प्रादेशिक व जिल्हावार राष्ट्रीय समित्या त्यांच्या कार्यकारी मंडळांच्या शिफारशीने जनता न्यायाधीशांची निवडणूक ३ वर्षांच्या मुदतीसाठी करतात. सर्वोच्च संघराज्यीय, चेक सर्वोच्च, स्लोव्हाक सर्वोच्च, प्रादेशिक व जिल्हा न्यायाधीशांच्या आणि लवाद व सैनिकी न्यायालयावरील न्यायाधीशांच्या निवडणुका त्यांच्या श्रेणीनुसार संसद, राष्ट्रीय मंडळे, मंत्रिमंडळ, न्यायमंत्री व संरक्षणमंत्री करतात. खात्याची शासनव्यवस्था प्रोक्युरेटर-जनरल हा अध्यक्षनियुक्त अधिकारी पाहतो आणि त्याच्यावर राज्याच्या शत्रूंविरुद्ध उपाययोजना तसेच समाजवादी वैधता सांभाळण्याचे उत्तरदायित्व सोपविलेले असते.

संरक्षण :२० ते ५० वयापर्यंतच्या सर्व नागरिकांना कमीत कमी २ वर्षांची सैनिकी सेवा व राखीव दलात प्रशिक्षण अनिवार्य आहे. १९४५ च्या कॉशित्से करारान्वये सैनिकी संघटना, सामग्री व प्रशिक्षण रशियन शस्त्रसज्ज दलाच्या धर्तीवर व त्याच्याशी निकट सहकार्याने ठेवावी लागतात. चेकोस्लोव्हाकियाच्या भूसेनेत १,५०,००० वायुसेनेत ४०,००० सीमादलात ३५,००० व सुरक्षादलात सु. १,२०,००० सैनिक आहेत, ते २,५०,००० पर्यंत वाढविण्याची योजना आहे. भूसेनेची ५ टँकपथके व ५ मोटारपथके आहेत. वायुदलाची ३०० लढाऊ विमाने आहेत. १९५५ च्या वॉर्सा संरक्षण करारानुसार चेकोस्लोव्हाकियाने रशियाशी संयुक्त शस्त्रसज्जदल व मॉस्कोला मुख्य ठाणे असलेले संयुक्त सेनाधिपत्य ठेवावे लागते. वॉर्सा कराराप्रमाणे १९६८ च्या मोहिमेनंतर चेकोस्लोव्हाकियात ५ लक्ष व्याप्तिसैन्य (रशियन, पोलिश व हंगेरियन) ठेवण्यात आले. १९७० मध्ये ते ८०,००० इतके कमी करण्यात  आले. ऑक्टोबर १९६८ च्या चेक-सोव्हिएट कराराप्रमाणे त्याचे अस्तित्व कायदेशीर ठरले आहे.

आर्थिक स्थिती : यूरोपच्या सर्व स्लाव्होनिक वंशीयांपैकी औद्योगिक उत्पादनात विशेष वाकबगार अशी चेक लोकांची पूर्वीपासून कीर्ती आहे. चौदाव्या शतकात मध्ययुगीन बोहीमियात आणि पुन्हा एकोणिसाव्या शतकानंतर मध्य यूरोपात या देशीयांच्या कुशल कारखानदारीचे आणि व्यापाराचे कसब ठळकपणे दिसून येत होते. कच्चा माल, कौशल्य व भांडवल यांच्या पायावर विविध प्रकारांचे धातुकाम आणि काच व चिनी मातीची उत्कृष्ट कामगिरी यांबद्दल या देशाचे लोक प्रसिद्ध होते. ऑस्ट्रीयन साम्राज्यात असतानाच बोहीमिया-मोरेव्हियात अनेक उद्योगधंदे प्रगत अवस्थेत होते, पण स्लोव्हाकियात औद्योगिक विकास काहीच नव्हता. दोन महायुद्धांच्या दरम्यान चेकोस्लोव्हाकियाने विशेष कसब दाखविणारा विविध प्रकारांचा माल निर्यात करण्यात बरेच यश मिळविले. जर्मनांनी हा देश व्यापला तेव्हा याची अर्थव्यवस्था ढासळून साधनसंपत्तीही शत्रूने ओरबडून नेली. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाच्या नियंत्रणाखाली कारखान्यांचे राष्ट्रीयीकरण, स्लोव्हाकियाचे औद्योगिकीकरण व कारखानदारीत भारी उद्योगांवर भर ही धोरणे अंमलात आली. १९४७ च्या द्वैवार्षिक पुनर्रचना योजनेनंतर दोन पंचवार्षिक योजना झाल्या. त्यांत भारी उद्योग व अभियांत्रिकी यांना प्राधान्य होते. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत हलक्या उद्योगावर भर होता. ती योजना १९६५ मध्ये थांबवण्यात आली व अर्थव्यवस्थेत निर्मितीला गुणवत्तेनुसार अधिक शुल्क-प्रलोभन, व्यापारात स्पर्धा असे प्रयोग सुरू झाले कारण औद्योगिक उत्पादनात वाढ झाली, तरी कृषी व वन उद्योगांची प्रगती समाधानकारक नव्हती. देशाला लोहधातुक, इंधनतेल व कोळसा फॉस्फेट्स, पोटॅशियमसारखी रसायने, उद्योगासाठी कच्ची द्रव्ये, कापूस, लोकर आणि अन्नपदार्थ,आयात करावे लागतात. यंत्रे, यांत्रिक अवजारे, रसायनपदार्थ, कपडा, पादत्राणे, काच आणि चिनी मातीचा माल यांची निर्यात मुख्यतः रशिया, इतर पूर्व यूरोपीय देश आणि अन्य खंडांतील विकसनशील देश यांच्याकडे होते. १९७२ मध्ये राष्ट्रीय उत्पन्नापैकी ६१% कारखानदारीतून, ११·३ % कृषीतून, १२% बांधकामातून, ११·५% व्यापारातून व ३·३ % मालवाहतूक व इतर पुरवठा मिळून झाले. चौथ्या पंचवार्षिक योजनेत शक्तिनिर्मिती व रासायनिक उद्योग यांवर भर होता. इतरही अनेक सुधारणांच्या  योजना होत्या. त्यांत उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण व संयुक्त उद्योगांसाठी पाश्चात्त्य भांडवल घेणे यांचाही समावेश होता परंतु रशियाच्या दडपणाखाली या योजना बाजूस ठेवून १९६९ मध्ये केंद्रसत्तेच्या सक्त देखीरेखीखालीच अर्थव्यवस्था ठेवण्यात आली. कारखानदारी उत्पादन वीस वर्षांत सु. तिपटीने वाढले, कामगारसंख्या सव्वापट झाली. कृषी उत्पादन तृतीयांशाने वाढले, पण कृषीकामगारांची संख्या पंचमांशाने घटली. लागवडीखालच्या जमिनी हळूहळू वाढत गेल्या, पण त्या प्रमाणात त्यांतून उत्पन्न वाढले नाही. पाचव्या (१९७१–७५) पंचवार्षिक योजनेत औद्योगिक उत्पादन ३५%, शेती उत्पादन १४% व राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी ५% वाढावे अशी अपेक्षा आहे.

कृषी : शेतीखालील ५५ % जमिनीपैकी ३९% मध्ये लागवड होते व १६ % मध्ये चराई होते. १९७३ मध्ये एक हे. पर्यंत क्षेत्राच्या खासगी जमिनी ६,३६,००० होत्या. जमिनी सामान्यतः सुपीक, अन्नपदार्थ व कारखान्यांसाठी कच्चा माल पिकवण्यास उपयुक्त आहेत. १९४८ साली समाईक कृषिपद्धती चालू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. १९७३ मध्ये ५,२५१ सामुदायिक शेतीखाली ४०,२७,२३७ हे. म्हणजे शेतीखालील जमिनीपैकी ५७% हून अधिक जमीन होती. तसेच ३१७ शासकीय व ३९,२८५ इतर मिळून २१,०१,९७९ हे. म्हणजे २९·७% जमीन होती. सपाटीवरच्या सुपीक जमिनीतून गहू, बार्ली तसेच डुकरांच्या खुराकासाठी मका, साखरेसाठी बीट व बीअरसाठी हॉप्स आणि डोंगराळ जमिनीतून राय, ओट्स आणि बटाटे ही पिके काढण्यात येतात. मांसासाठी गुरेढोरे व डुकरे आणि दूधदुभत्यासाठी गाई पोसण्यात येतात. स्लोव्हाकियाच्या डोंगरी कुरणात मेंढ्या पाळण्यात येतात. देशाचे पशुधन वीस वर्षांत सु. दिडीने वाढले आहे, पण दूधदुभत्याचा पुरवठा युद्धपूर्वकालापेक्षा कमीच प्रमाणात आहे. जानेवारी १९७३ मध्ये १९ लक्ष दुभत्या गाई, २५·७ लक्ष इतर गुरेढोरे, १ लक्ष घोडे, ६० लक्ष डुकरे, ८·९ लक्ष मेंढ्या आणि ३९२ लक्ष कोंबडीबदके होती. १९७२ मध्ये १३·७ लक्ष टन मांस, ४९६·७ कोटी लिटर दूध व ४१२ कोटी अंडी असे उत्पादन झाले. शेतीवरचे तरुण लोक कारखान्यांत कामाला जाऊ लागल्यामुळे शेतीची कामे वयस्क लोकांकडे आहेत. कमी किंमतीत सक्तीच्या धान्यवसुलीमुळे खाजगी जमीनमालकांना शेतीबद्दल उत्साह नाही आणि सामुदायिक शेतीच्या प्रयत्नांनाही अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे शेती उत्पादन अंदाजाप्रमाणे वाढले नाही.

उद्योग :शक्तीची साधने : देशात निघणाऱ्या कोळशापैकी सु. १५% कोळशावर एकूण विद्युत्‌शक्तीपैकी ८५% औष्णिक विजेची निर्मिती होते. दुसरे महायुद्ध संपल्याच्या काळापेक्षा ही वाढ तिप्पट आहे. आता औष्णिक विजेपेक्षा दोनतृतीयांश अधिक प्रमाणात जलशक्तीवर वीज उत्पादन होत आहे आणि जवळजवळ तेवढीच आणखी वीज निर्माण करण्याची क्षमता उपलब्ध आहे. व्हल्टाव्हा नदीवरच्या ऑर्लिक धरणात ७२ कोटी घ. मी. म्हणजे युद्धपूर्व ३१ धरणांतल्याइतके पाणी राहील. सहा धरणांत पिण्याजोगे व कारखान्यांच्या उपयोगी शुद्ध पाणी आहे व बाकीच्यांचे पाणी वीजनिर्मितीखेरीज पूरनियंत्रण व पाटबंधाऱ्यांसाठी कामी येते. १९७२ मध्ये ५,१४०·२ कोटी किवॉ. ता. विजेचे  उत्पादन झाले. रशियातून ब्रात्यिस्लाव्हा व झालुझी येथे तेलनळ आणले आहेत. तसेच रशियातून नैसर्गिक वायू पुरवठा करणारा नळ १९७३ पासून या देशातही आला आहे. चेकोस्लोव्हाक अणुशक्ती मंडळाकडे अणुशक्तिविषयक जबाबदारी सोपविलेली आहे.


दुसऱ्या महायुद्धकाळात खाणींवर फार ताण पडून त्यांची यंत्रसामग्री निकामी झाली होती. नंतर माणसांच्या मेहनतीने खनिजे काढण्याचे काम चालू ठेवण्यात आले. तथापि भारी अभियांत्रिकी उद्योगधंद्यांना कोळसा व लोहधातुके अपुरी पडू लागल्याने खनिजांची आयात मोठ्या प्रमाणावर करणे प्राप्त झाले. १९५४ पर्यंत आयात धातुकांपैकी रशियाकडून ७४% लोह, ९०% मँगॅनिज, ७२% तांबे, ९४% ॲल्युमिनियम व ७२% खनिज तेल चेकोस्लोव्हाकियात येत होते. भारी उद्योगधंद्यांतील धातू, रसायने व बांधकामे यांसाठी देशातील सर्व खनिजे त्यांची प्रत कमी आणि उत्खननाचा खर्च जास्त पडला, तरी शक्य तेवढी उपयोगात आणली जात आहेत. उलटपक्षी नित्योपयोगी वस्तूंच्या निर्मितीस उपयुक्त अशा भारी दर्जाच्या खनिजांची उपेक्षा होत आहे. सोव्हिएट कक्षेतील देशांच्या गरजा भागविण्यासाठी तांब्यासारख्या लोहेतर धातुकांचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न चालूच आहेत. पहिल्या पंचवार्षिक योजनेतील खाणउत्पादनाची उद्दिष्टे साध्य झाली नाहीत, यंत्रसामग्री आणि कसबी कामगार कमी पडले, तेव्हा उत्पादन वाढण्याचे अन्य मार्ग, कामाचे तास वाढवणे, ‘आघात-तंत्रा’ने काम, कामगारांची तात्पुरती संख्यावाढ, सक्तीचे अधिक काम इ. अंमलात आणले गेले. व्यवस्थापनाच्या रचनेत फेरफार करून, नवे शिकाऊ उमेदवार तयार करून, वेगवेगळ्या खनिजांनुसार विकेंद्रीकरण करून, उत्पादन वाढवण्याचे हरप्रयत्न चालू आहेत.

दुसऱ्या महायुद्धात बराच वनप्रदेश उद्ध्वस्त झाला होता. तरी लाकूडतोडीवर कडक नियंत्रण, वृक्षांचे पुनरारोपण संरक्षण अशा मार्गांनी देश लाकूडमालाचे बाबतीत आता स्वयंपूर्ण करण्यात आला आहे. योग्य प्रमाणात (३५%) वनभूमी असलेल्या यूरोपच्या निवडक देशांपैकी चेकोस्लोव्हाकिया एक आहे. सर्व वने शासकीय सत्तेखाली असून वनविभागात सु. एक लाख लोक काम करतात. १९७२ मध्ये जंगलक्षेत्र ४४ लक्ष ६८ हजार हे. होते. त्यात ५०% स्प्रूस, १६% बीच व पाइन आणि ७% ओक वृक्ष होते. १९७२ मध्ये १५४ लक्ष घ. मी. इमारती लाकडाचे उत्पादन झाले.

देशाच्या अन्नपुरवठ्यात मत्स्योत्पादन हे विशेष महत्त्वाचे नाही. तळ्याडबक्यांतून मुद्दाम पैदास केलेले बरेच आणि नद्यांत व स्लोव्हाकियाच्या पर्वतप्रदेशातील जलप्रवाहांत मिळून थोडेबहुत मासे मिळतात. देशात एकूण ५०० चौ. किमी. क्षेत्रफळाचे सु. १२,००० मत्स्योत्पादक जलाशय असून त्यांतील चारपंचमांश शासकीय नियंत्रणाखाली आहेत. १९७२ मध्ये १५, ०७७ मे. टन मासे मिळाले. त्यांतील बहुसंख्य कार्प जातीचे आणि इतर टेंब पाइक, पर्च व ट्राउट होते.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेल्या या राष्ट्राने युद्धातील जबर हानी सोसल्यानंतरही नंतरच्या काळात आपले औद्योगिक उत्पादन बरेच वाढवले आहे. कारखाने दोनतृतीयांश राष्ट्रीय उत्पन्न मिळवून देतात. १९४५ व १९४८ च्या वटहुकुमांनी उद्योगधंद्यांचे संपूर्ण राष्ट्रीयीकरण झाले. १९४८–५३ आणि १९५५–६० या दोन पंचवार्षिक योजनांनी भारी उद्योगधंद्यांवर भर दिल्याने यंत्रकारी व धातुकामाच्या कारखान्यांची ठळकपणे प्रगती झाली व त्यांचे उत्पादन अधिकाधिक निर्यात होऊ लागले. स्लोव्हाकियाचे औद्योगिकीकरण हेही युद्धोत्तर कार्यक्रमाचे एक लक्षवेधक अंग आहे. पूर्वी नित्योपयोगी वस्तू निर्यात करणाऱ्या या देशाने आता कारखान्यांची यंत्रसामग्री उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे लोहपोलादादी धातुसंबंधित कारखानदारी मालानंतर काचमाल, लाकूडमाल, कापड, कागद, कपडे, पादत्राणे व कातडी वस्तू अशा नित्योपयोगी मालाची कमी निर्मिती होते. चेक बनावटीच्या काही नमुनेदार वस्तू किंवा जगप्रसिद्ध ‘पिल्सनर बीअर’ युद्धापूर्वी जशा निर्यात होत तशा होईनाशा झाल्या. आता प्रामुख्याने यंत्र सामग्रीची निर्यात होते. चेकोस्लोव्हाकियाच्या मालाचा दर्जा चांगला आणि जगातील इतर देशांच्या मालाशी तुलनेत टिकणारा आहे.

१९७२ मध्ये एकूण ७१,७९,००० कामगारांपैकी ४७·४ % स्त्रिया होत्या. खाणी व कारखान्यांत ३९ %, कृषी व वनविभागात १६·६ %, बांधकाम ८ %, वाहतुकीत ७ % व बाकीचे इतर सेवा असे कामगारांचे प्रमाण होते. देशात बेकारी नाही, उलट काही उद्योगांत कामगारांची टंचाईच आहे असे चेक शासनाचे म्हणणे आहे. देशात एक मध्यवर्ती कामगार संघटना असून तिच्यात प्रत्येक उद्योगाचा एक असे ३० घटक संघ आहेत. देशातील या सर्वांत मोठ्या संघटनेची सदस्य संख्या सु. ५८ लाख असून प्रत्येक सदस्याकडून कमाईचा फक्त १ % वर्गणी घेण्यात येते. केलेल्या कामाला वाजवी मोबदल्याची हमी संविधानाने दिली आहे. कामाची प्रत आणि प्रमाण यांनुसार वेतन ठरते. आजारीपणाच्या रजेत ९० % पर्यंत भत्ता मिळतो. आरोग्यविमा, कुटुंबभत्ता इ. कामगार कल्याणविषयक व्यवस्था कामगार संघटनाच पाहतात. शासनाचे विमाखाते निवृत्तिवेतनाची तरतूद करते. आरोग्यविमा योजनेखाली स्वतंत्र व्यावसायिकांखेरीज सर्वांचा विमा उतरविलेला असतो. जरूर तेव्हा मोफत वैद्यकीय उपचार, दातांची निगा, प्रसूतिकालीन सुखसोयी असे फायदे विमेदारांना हक्काने मिळतात. किमान २० वर्षांच्या सेवेनंतर पुरुषांना ६० व्या वर्षी व स्त्रियांना ५५ व्या वर्षी निवृत्तिवेतन मिळते. निवृत्तांना मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध होतात. ते एकटे असल्यास स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यासाठी उपहारगृहे वगैरे सुखसोयी मिळतात. सामान्यतः  ५ दिवसांचा व ४२ तासांचा कामाचा आठवडा आणि दरवर्षी ४ आठवडे सुट्टी हे प्रमाण आहे. १९७२ मध्ये सरासरी मासिक वेतन २,०४८ कोरूना होते.


यंत्रकारी किंवा कारखानदारीस लागणाऱ्या मालाच्या निर्यातीवर भर देऊन नित्योपयोगी वस्तूंच्या निर्मितीला गौण स्थान दिल्यामुळे इंधन व कच्ची धातुके आयात करावी लागतात आणि यंत्रकारीव्यतिरिक्त इतर धंद्यांना आणि शेतीलाही मनुष्यबळ कमी पडते. सोव्हिएट कक्षेतील पूर्व यूरोपीय देशांच्या आर्थिक धोरणाशी सर्वस्वी बांधले गेल्यामुळे चेकोस्लोव्हाकियाला स्वतंत्र आर्थिक धोरण नसल्यासारखेच आहे. रशिया ठरवील त्या मालाचे उत्पादन करून तो देश सांगेल तिकडे माल पाठविणे इतकेच या देशाला शक्य दिसते. चेकोस्लोव्हाक कारखानदारी पूर्वाभिमुख आहे. पश्चिम यूरोप, अमेरिका किंवा स्वत:च्या निवडीचे अन्य देश यांच्यासाठी कारखानदारी माल काढण्याचे स्वातंत्र्य या देशाला आलेले दिसत नाही.

व्यापार, वाणिज्य इ. :अंतर्गत व्यापार संपूर्णपणे शासननियंत्रित आहे. अंतर्गत व्यापारमंत्रालय आणि ग्राहक सहकार मध्यवर्ती संघ यांच्या दुकानांतून उपभोग्य मालाचे वाटप होते. किंमती मंत्रालय ठरवते. दुकाने राष्ट्रीय समित्यांमार्फत चालतात. बहुविध आणि विशिष्ट मालाची दुकाने वेगवेगळी असतात. स्वतंत्र शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत सक्तीने ठराविक माल शासनाने वसूल केल्यानंतर उरलेला खुल्या बाजारात अधिक किंमतीला मिळू शकतो. सामुदायिक व शासकीय शेतीचे उत्पादन परस्परच शासनाकडे जमा होते. मोटारीसारख्या दुर्मिळ, टिकाऊ व किंमती वस्तूंसाठी हप्तेबंदीने किंमतफेडीची व राज्यबचत बँकेकडून अल्प दराने कर्जपुरवठ्याची सोय होते. बाकी सर्व किरकोळ विक्री रोखीने होते. परराष्ट्रीय व्यापार १९७२ मध्ये ६९% सोव्हिएट कक्षेतील देशांशी झाला. त्यापैकी ३४% रशियाशी झाला. तो संबंधित मंत्रालयाच्या देखरेखीखाली १८ महामंडळे करतात. १९७२ साली निर्यात सु. ३,२५९ कोटी व आयात सु. ३,०९१ कोटी कोरूनाची होती. व्यापार मुख्यतः रशिया, पूर्व जर्मनी, पोलंड यांच्याशी व त्या खालोखाल पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया व ब्रिटन यांच्याशी होतो. १९७२ मध्ये प्रमुख निर्यात यंत्रसामग्री ४९·४% औद्योगिक माल १८·७% कच्चा माल व इंधने १७·२% अशी होती, तर आयात यंत्रे ३३·८ % कच्चामाल व इंधने ४५·२ % रासायनिक उत्पादने ८·७ % अशी होती.

१९५७ मध्ये २१ कोटींची तूट होती, तरी आधीच्या चार वर्षांत आणि १९५८ मध्येही कम्युनिस्ट पक्षाच्या आज्ञेनुसार निर्यात वाढवल्याने देण्यापेक्षा येणे अधिक होते. नित्योपयोगी मालाची देशात टंचाई ठेवून आणि निर्यात मालाचे परिमाण व दर्जा वाढवून परकीय चलनाबाबत स्थिती थोडी सुधारली असली, तरी जरूर तितका राखीव परदेशी चलननिधी या देशाजवळ अजून साचला नाही.

१९५२ पर्यंत बँकांचे संपूर्ण केंद्रीकरण होऊन त्या शासनसत्तेखाली आल्या. बँकव्यवहाराचे प्राग हे मुख्य शहर असून शासकीय, गुंतवणूक आणि बचत अशा तीन प्रकारांच्या बँका सर्वत्र आहेत. शासकीय बँक चलनी नोटा काढते व उद्योगांना अल्प मुदतीची कर्जे पुरवते रोखीचे व वित्तविषयक संबंध, त्याचप्रमाणे परदेशांकडे रक्कम-भरणा ही कामे या बँकेमार्फत होतात. शासकीय बँकेच्या नियंत्रणाखाली लंडनला शाखा असलेली एक व्यापारी बँक आहे. तिच्या मार्फतही परदेशी व्यापाराचे व्यवहार होतात. गुंतवणूक बँक बांधकामांना, योजनांना, शासकीय व पालिकांच्या उपक्रमांना आणि उत्पादक सहकारी संस्थांना दीर्घ मुदतीची कर्जे पुरवते. व्यक्तिगत कर्जे शासकीय बचत बँकेकडून देण्यात येतात. कोरूना (चेकोस्लोव्हाक क्राउन) हे मुख्य चलन असून एका कोरूनाचे १०० हेलर असतात. ५,१०,२० व ५० हेलरची आणि १, २, ५ कोरूनाची नाणी व १०, २०, ५०, १००, ५०० कोरूनाच्या नोटा असतात. मार्च १९७४ मध्ये  १ रशियन रूबल = ८ कोरूना १ स्टर्लिंग पौंड = १४·००५ कोरूना व १ अमे. डॉलर = ६·०३ कोरूना किंवा १०० कोरूना = ७·१४ पौंड = १६·५९ डॉ. असा विनिमय दर होता.

१९४५ नंतर विमा कंपन्या एकत्र करण्यात येऊन त्या शासकीय सत्तेखाली केंद्रीत झाल्या. १९५२ पासून अर्थमंत्रालयाची विमा कचेरी काम पाहते. आयू, अपघात, मालमत्ता व जोखीम, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, नद्या-सागरांवरील देशी व परदेशी नौका यांबाबत विमे उतरले जातात. चेकोस्लोव्हाकिया समाजवादी राष्ट्र झाल्यापासून त्यात शेअरबाजार अथवा वायदेबाजार अशा संस्था नाहीत.

१९७२ च्या राष्ट्राच्या अंदाजपत्रकात समाजवादी विभागातून १८,४१९ कोटी, कर २,६५१·९ कोटी व अन्य १,२७९·४ कोटी मिळून एकूण आवक २२, ३५०·३ कोटी कोरूना होती. खर्चाच्या बाजूस राष्ट्रीय अर्थकारणावर ९,७१८ कोटी, सांस्कृतिक आणि समाजकल्याणकार्यार्थ ९,७९५·५ कोटी, संरक्षण १,६७७ कोटी व शासनव्यवस्थेला ४१९·१ कोटी आणि इतर ४०·१ अशा एकूण २१,६५६·९ कोटी कोरूनाच्या रकमा होत्या.

उलाढालीवर म्हणजे अन्नासकट सर्व उपभोग्य मालाच्या खरेदीविक्रीवरचा कर हा सर्वांत महत्त्वाचा उत्पन्नाचा भाग. त्यापासून निम्मी करवसुली होते. जे उद्योग मालाचे उत्पादन करीत नाहीत त्यांच्यावर सेवा कर असतो. वेतनकर चढत्या प्रमाणात असून तो वेतनातून आणि निवृत्तिवेतनातून कापून घेण्यात येतो. स्वतंत्र व्यावसायिकांना प्राप्तिकराखेरीज व्यवसायकरही द्यावा लागतो. शासकीय इमारतींत व राहत्या घरांवरही कर आहेत. सामाजिक शेतीसंस्था आणि स्वतंत्र शेतकरी शेतीकर भरतात. सांस्कृतिक क्षेत्रात कलानिर्मिती करणारांवर कर माफक असून विशेष प्राप्ती असणारांनादेखील ३ ते १० टक्क्यांच्या वर करभार नाही.

१९४९ साली देशाच्या राष्ट्रीय कर्जाचा आकडा ३,१०० कोटी होता ते कर्ज शासनाने १९५३ मध्ये नाकारले, त्याचप्रमाणे १९४५ पर्यंत साठलेल्या बँकांतल्या ठेवीही जप्त केल्या. इतर कम्युनिस्ट देशांचे खुशीच्या रोखे खरेदीचे धोरण चेकोस्लोव्हाकियाने स्वीकारले नाही.

१९४८ पर्यंत उद्योगांचे राष्ट्रीयीकरण झाल्याने परदेशी भांडवल या देशात गुंतवलेले नाही. स्वतः चेकोस्लोव्हाकिया मात्र आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडांतील अविकसित देशांच्या औद्योगिक विकासाचा भार भाग उचलीत आहे. भारताला कित्येक संपूर्ण कारखाने, ईजिप्तमध्ये सबंध पूल, पादत्राणे व चिनी माती माल बनविण्याचे कारखाने आणि पंपिंग सामग्री, अफगाणिस्तानात सिमेंट कारखाना, तुर्कस्तानात कापडगिरणी, इराणात साखर कारखाने इ. उद्योग चालू करून देऊन चेकोस्लोव्हाकियाने ब्राझील व अर्जेंटिना या देशांतही विकासास साह्य केले आहे.

दळणवळण : सर्व वाहतूक साधने वाहतूक मंत्रालयामार्फत शासकीय स्वामित्वाखाली असून १९७२ मध्ये एकूण ७३,३६३ किमी. रस्ते राष्ट्रीय महत्त्वाचे होते. लोहमार्ग १९७२ मध्ये १३,२९९ किमी. पैकी २,७९८ किमी. दुहेरी व २,६३१ किमी. विजेवरच्या वाहतुकीचे होते. १९७० मध्ये ५६·६ % आगगाड्या विजेवर, २५·८ % डीझेलवर व १७·६ % वाफेवर चालणाऱ्या होत्या. चेक लोहमार्ग शेजारच्या देशांतील लोहमार्गांशी जोडलेले आहेत. देशात उत्तर-दक्षिण मार्ग जास्त असून पूर्व-पश्चिम मार्ग नुकतेच पुरे झाले आहेत. अंतर्गत वायुमार्ग २,४८० किमी. असून विमानवाहतुकीचे परदेशांशी संबंध आहेत. देशातील महत्त्वाच्या शहरी नागरी विमानतळ असून प्राग व ब्रात्यिस्लाव्हा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. देशात ५१० किमी. जलमार्ग असून व्हल्टाव्हामधून स्थानिक, एल्बमधून हँबर्गमार्गे आणि डॅन्यूबमार्गे पूर्व यूरोपीय देशांशी जलवाहतूक चालते. चेकोस्लोव्ह नभोवाणी शासनाधीन असून देशात ३२ केंद्रे आहेत. परदेशांसाठी ७ भाषांत प्रक्षेपणे होतात. प्रागहून चेक व स्लोव्हाक भाषांमध्ये ३ कार्यक्रम आणि ब्रात्यिस्लाव्हाहून २ कार्यक्रम परदेशांसाठी होतात. स्लोव्हाकशिवाय हंगेरियन व युक्रेनियनमध्येही प्रक्षेपणे होतात. देशात १० दूरचित्रवाणी केंद्रे असून १९७२ मध्ये ३१·३ लाख रेडिओ, ३३·१ लाख दूरचित्रवाणी संच, २२·३ लाख दूरध्वनियंत्रे होती. १९७२ मध्ये ६·६ हजारांवर ग्रंथ प्रकाशित झाले. २८ दैनिकांपैकी १२ स्लोव्हाक व १३ इतर नियतकालिके होती. ३,४६९ चित्रपटगृहे आणि ६३ नाट्यगृहे होती.


लोक व समाजजीवन :१९३८ पासूनच्या तीस वर्षांत चेकोस्लोव्हाकियाच्या नागरिकांतील विविध वंशीयांचे प्रमाण पार बदलून गेले आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी या देशात चेक व स्लोव्हाक या स्लाव्ह वंशीयांखेरीज सु. चतुर्थांश प्रजा जर्मन, ८ लाख रूथीनीयन, दोन लाख यहुदी, हजारो हंगेरियन आणि भटक्या जिप्सी जमातीचे लोक होते. १९४५ मध्ये तीस लाखांवर सुडेटन जर्मन जर्मनीत पाठविण्यात आले वा निघून गेले, २४,००० हंगेरियन हंगेरीत गेले, रूथीनीयातले आठ लाख तद्देशीय त्या भूभागासह रशियन युक्रेनमध्ये समाविष्ट झाले. युद्धातून आणि जर्मन राजवटीतून शिल्लक राहिलेले बरेच यहुदी इझ्राएलला गेले. दीड लाख चेकोस्लोव्हाक नागरिकांचा युद्धानंतर हिशेब लागला नाही. ५०,००० राजकीय निर्वासित कम्युनिस्ट सत्तेवर येताच देशत्याग करून गेले. एकूण १९३९–४५ या वर्षात नवी जनसंख्या जमेस धरूनही देशाचे ३४ लाख लोक कमी झाले. १९७३ मध्ये चेकोस्लोव्हाकियाची लोकसंख्या १,४६,३४,७४७ होती. त्यापैकी ९९,६४,३३८ चेक प्रदेशात व ४६,७०,४०९ स्लोव्हाकियात असून चेक ९४·३४ लक्ष स्लोव्हाक ४३·६५ लक्ष मग्यार (हंगेरियन) ५·८ लक्ष जर्मन ७८,००० पोलिश ६९,००० व बाकी युक्रेनियन-रशियन वगैरे मिळून ६०,००० होते. १९६८ मध्ये देशात २,२०,००० जिप्सी होते. देशातल्या देशात लोकांचे स्थलांतर जर्मनांना घालवल्यावर वायव्येकडे व स्लोव्हाकियाच्या औद्योगिक सायलीशियाकडे खाणकामासाठी झाले. लोकवस्ती ६२ % शहरी असून १ लाखावर वस्तीची शहरे ६ ५०,००० वर वस्तीची १६ ३०,००० वर वस्तीची १२ आहेत. चेक प्रदेशात दर चौ. किमी.ला १२६ लोक व स्लोव्हाक प्रदेशात ९४ आहेत.

१९७३ मध्ये सु. तीन चतुर्थांश लोक रोमन कॅथलिक पंथाचे होते, इतर ख्रिस्ती पंथांचे सु. १९ लाख आणि १५,००० यहुदी होते. धर्मस्वातंत्र्य देशात नाममात्र आहे. धर्मखाते शासननियंत्रित असून धर्मगुरूचा दर्जा मुलकी कर्मचाऱ्याप्रमाणे असतो.

परंपरागत सण, उत्सव, चालीरीती व राहणी ग्रामीण भागात, विशेषतः  स्वतंत्र शेतकऱ्यांच्या जीवनात अजून टिकून आहे. अन्न, पोषाख व घरेदेखील देशविशिष्ट अशी खेड्यापाड्यांतूनच आढळतात. शहरी जीवन मात्र एकाच साच्याचे आहे. आईबाप दोघेही बहुधा कामावर जाणारे असल्याने मुले शासनाच्या ताब्यात असतात. अगदी लहानपणापासून त्यांचे शिक्षण, खाणेपिणे, कपडे आणि करमणूक शासकीय देखरेखीखाली चालते. मुलांना आईबापांपेक्षा राज्यावर प्रेम करण्याची शिकवणूक मिळते. मुलांचे भवितव्य शासनाच्या आधीन असून कोणी काय शिकावे ते शासन ठरवते. खाणकामगारांसारख्या अधिक कष्टकरी श्रमिकांच्या मुलांना उच्च शिक्षणात अग्रक्रम मिळतो. काहीसे मुक्त जीवन अजून ग्रामीण भागात आहे. स्वतंत्र चेक शेतकरी कष्टाळू पण राहणीमान चांगले ठेवणारा असतो. त्याचे लहानसे घर रंगीत असते. त्याच्या लहानशा शेतावर वाहते पाणी, धान्याखेरीज फळझाडे लावलेली, ४-५ गुरे-डुकरे व थोड्या कोंबड्या-बदके असतात. त्या मानाचे  स्लोव्हाकियातला शेतकरी थोडा मागासलेला व पशुपालनावर जास्त अवलंबून असे. आता मात्र तो कारखान्यांकडे वळत आहे. पूर्व यूरोपमधील इतर देशांपेक्षा चेकोस्लोव्हाकियाचे लोक अधिक सुस्थितीत आहेत आणि त्यांची मुलेही अन्न, वस्त्र व आरोग्य या बाबतींत इतर यूरोपीय देशांतल्या मुलांच्या बरोबरीची आहेत. कौटुंबिक जीवन उद्योगप्रधान असून साम्यवादी देशांतून असते, तसे या देशाच्या शहरांतून होऊ लागले आहे. समाजात स्त्रियांचे स्थान पुरुषांच्या बरोबरीचे आहे. समाजकल्याण व आरोग्य या जबाबदाऱ्या शासनाने घेतल्या आहेत. १९७२ मध्ये १९२ कोटी कोरूना औषधांवर व १,६१९ कोटी कोरूना आरोग्यविमा लाभावर खर्च झाले. १९७२ मध्ये २४७ रुग्णालयांत १,१५,३३२ खाटा आणि ३५,८३२ डॉक्टर व दंतवैद्य होते. कुटुंबभत्ता २ मुले असल्यास दरमहा ४३० कोरूना, ३ मुले  ८८० कोरूना व ४ मुले १,२८० कोरूना असा मिळतो. साठाव्या वर्षी पगाराच्या ६० % इतके निवृत्तिवेतन मिळू लागते.

भाषा व साहित्य : चेक ही इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील स्लाव्हिक गटाच्या पश्चिमेकडे बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक महत्त्वाची भाषा होय. ती बोलणाऱ्यांची संख्या एक कोटीच्या घरात आहे. उपलब्ध चेक साहित्य तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे आहे. स्तोत्रे, महाकाव्य, भावकाव्य, नाटक असे विविध साहित्यप्रकार आरंभीच्या चेक साहित्यात हाताळलेले दिसतात. हुसाइट चळवळींच्या वादळी पार्श्वभूमीवर निर्माण झालेले साहित्य अपरिहार्यपणे चर्चात्मक, वादप्रवण स्वरूपाचे आहे. सोळाव्या शतकात बायबलचे चेक भाषांतर तयार करण्यात आले आणि त्याने अभिजात गद्यलेखनशैलीचा एक आदर्शच निर्माण केला. विद्वत्ताप्रचुर असे काही ग्रंथही त्या शतकात लिहिले गेले. पुढे सतराव्या-अठराव्या शतकांत, हॅप्सबर्ग राजसत्तेखाली चेक भाषा-साहित्याची उपेक्षा झाली. ह्याही परिस्थितीत जॉन एमस कोमीनिअस ह्याने चेक भाषेत लक्षणीय ग्रंथरचना केली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या चळवळीत, बोहीमियन देशभक्तीच्या प्रेरणांतून चेक विद्वान आपला वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याचे प्रयत्न करू लागले. यॉसेफ डॉब्रॉव्हस्की हा अशा विद्वानांत अग्रगण्य होय. उपर्युक्त चळवळीतील इतर उल्लेखनीय नावांत यॉसेफ युंगमान, पाव्हेल यॉसेफ शाफारझीक आणि फ्रांस्यिशेक पालाट्स्की ह्यांचा समावेश होतो. श्रेष्ठ स्वच्छंदतावादी चेक कवी कारेल मारवा हा एकोणिसाव्या शतकातला. यान नेरुदा, हालेक व्हीस्वेस्लाव्ह, यारोस्लाव्ह व्हर्खलिट्स्की आणि स्व्हाटॉप्लुक चेख हे ह्या शतकातील अन्य उल्लेखनीय कवी. एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ कादंबरीकारांत बोझेना नेम्कोव्हा, कारोलीना स्व्हेट्ला आणि आलॉइस यिरासेक ही विशेष नावे उल्लेखनीय होत. विसाव्या शतकाच्या आरंभी (१९१८) चेकोस्लोव्हाकियाचे स्वतंत्र प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यामुळे स्वातंत्र्याच्या चैतन्यदायी वातावरणाचा प्रभाव वाङ्‌मयीन सर्जनशीलतेवरही अपरिहार्यपणे पडला आणि विविध साहित्यप्रकारांतील लेखनाला नवा जोम प्राप्त झाला. स्वातंत्र्योत्तर काळातील काही कवी साम्यवादाच्या सोव्हिएट प्रयोगाने भारावून गेले. यॉसेफ होरा, यिर्‌झी वोल्कर हे असे काही कवी होत. पहिल्या महायुद्धानंतर चेक नाट्यलेखनाने प्रगतीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. कारेल चापेक, फ्रांट्यिशेक लँगर ह्या नाटककारांची नावे ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहेत. कारेल मातेज चापेक-चॉड, इग्नाट हर्मन, इव्हान ओलब्राक्‌ट, व्हूलाड्यिस्लाव्ह व्हांचुरा, मारी माजेरोव्हा, मारी पुज्मानोव्हा आणि यान ओट्सेनासेक हे विसाव्या शतकातील काही उल्लेखनीय कादंबरीकार [→ चेक भाषा चेक साहित्य].

नावापुरतेच मुद्रणस्वातंत्र्य असलेल्या या देशात चेकोस्लोव्हाक कम्युनिस्ट पक्षाचे रुद्रे प्रावो  व स्लोव्हाक कम्युनिस्ट पक्षाचे प्रावदा  ही दोन दैनिके प्रमुख आहेत. अन्य पत्रे विविध पक्ष, युवक चळवळ, कामगार संघटना, शेती व संरक्षण मंत्रालये इत्यादींची  आहेत. राष्ट्रीय ग्रंथालय प्रागमध्ये १९४८ साली स्थापन झाले १३४८ पासून अस्तित्वात असलेल्या विख्यात प्राग विद्यापीठ ग्रंथालयासह सहा ग्रंथालये त्यात एकत्रित आहेत. स्लोव्हाकियन राष्ट्रीय ग्रंथालय मार्टिन येथे १८६३ मध्ये स्थापन झालेले आहे. बर्‌नॉ, ऑलॉमोत्स व ब्रात्यिस्लाव्हा येथील विद्यापीठांची ग्रंथालये उल्लेखनीय आहेत. 


शिक्षण : सर्व शिक्षणाचा हेतू जगाभिमुख व पश्चिमाभिमुख विचारसरणी बदलून ती पूर्वाभिमुख व रशियाप्रेमी बनवण्याचा आहे. शासकीय नियंत्रणाखाली मोफत शिक्षणाची सर्वसाधारण एकसारखी पद्धत ८ ते ११ वर्षांच्या अभ्यासक्रमाची असून ६ ते १५ वर्षे वयाच्या मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. ३ ते ६ वर्षे वयाच्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणक्रम आहे. १९७२-७३ मध्ये ८,४१२ पूर्व प्राथमिक शाळांतून २९,९४१ शिक्षक व ३,९५,३४१ मुले होती. १०,५५१ प्राथमिक शाळांतून ९६,७३३ शिक्षक व १९,१२,२२५ विद्यार्थी होते. ३४३ माध्यमिक शाळांतून ७,५९९ शिक्षक व १,२९,०६३ विद्यार्थी तसेच तांत्रिक, व्यावसायिक आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या ६७० शाळांतून २,७२,९०९ विद्यार्थी होते. पूर्ण वेळ उच्च शिक्षण घेणारे  १,०६,८०० व अर्धवेळ आणि टपालद्वारे उच्च शिक्षण घेणारे २१,१५७ विद्यार्थी होते. शिक्षकवर्ग १६,५९५ होता. उच्च शिक्षणासाठी ६ विद्यापीठे व ३७ इतर संस्था आहेत. १९७३ मध्ये एका वर्षाचे निवासी प्रौढ शिक्षणाचे आभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

१३४८ साली स्थापन झालेले प्रागचे जगप्रसिद्ध चार्ल्स, बर्‌नॉचे (पूर्वीचे मासारिक १९१९), ब्रात्यिस्लाव्हाचे कोमेनिअस (१९१९) व ऑलॉमोत्सचे १४७३ मध्ये स्थापन आणि १९४६ मध्ये पुनरुज्जीवित झालेले पॅलॅस्की, पुर्कीने कोसिलेचे सफारिक (१९५९) व प्रागचे ‘१७ नोव्हेंबर’ विद्यापीठ या सहा विद्यापीठांखेरीज विद्यापीठ दर्जाच्या बारा तांत्रिक संस्था आहेत. प्राग व ब्रात्यिस्लाव्हा येथे प्रगत अर्थशास्त्रविद्यालये आणि प्राग येथे रशियन भाषा व साहित्याचे प्रगत विद्यालय आहे. कामगारवर्गाच्या मुलांना  विद्यापीठे व उच्च शिक्षणसंस्थांत प्रवेशास अग्रक्रम मिळतो. हजारे कामगार व शेतकरी संध्याकाळी माध्यमिक, व्यावसायिक किंवा उच्च शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी सर्व सोयी असतात. नभोवाणी व दूरचित्रवाणीवरूनही ‘रेडिओ विद्यापीठ’ द्वारा व्याख्याने व प्रात्यक्षिके होतात. मोठ्या ग्रंथालयांखेरीज सार्वजनिक ग्रंथालये राष्ट्रीय, जिल्हावार व स्थानिक समित्या चालवितात. राष्ट्राच्या मालकीच्या सर्व ऐतिहासिक वास्तूंखेरीज वस्तुसंग्रहालये, मोठ्या शहरांत कलावीथी, प्राग येथील राष्ट्रीय व वनस्पती उद्यान अशा संस्था जनतेच्या सांस्कृतिक विकासाला साह्य करतात. देशात निरक्षरता जवळजवळ नाहीच.

कला व क्रीडा : चेकोस्लोव्हाकिया ही कलेच्या दृष्टीने मध्य यूरोपची अतिसंपन्न भूमी आहे प्राचीन, त्याचप्रमाणे गॉथिक व बरोक कालखंडांची परंपरा धक्का न लागू देता येथे कायम ठेवलेली आहे. देशभर अनेक शहरांतून जुनी प्रार्थनामंदिरे, प्रासाद, किल्ले, सभागृह असे वास्तुशिल्पांचे नमुने सुरक्षित जतन केलेले आहेत. चौदाव्या शतकात चौथ्या चार्ल्सच्या कारकीर्दीत पवित्र रोमन साम्राज्याची राजधानी झालेल्या प्रागचे वास्तुवैभव ४१ ऐतिहासिक इमारतींत अजून टिकून आहे. अकराव्या शतकापासूनचे अल्पाकृती चित्रकलेचे नमुने विशेषतः पवित्र ग्रंथांची वेष्टने आणि सुट्या अल्पाकृती वस्तुसंग्रहालयातून पाहण्यास मिळतात. संगीताला प्रागमध्ये एकोणिसाव्या शतकात विशेष बहर आला. शहरातील तीन संगीतालयांत आणि अनेक संगीतशाळांत रोज रात्रीचे कार्यक्रम चालू असत. बोहीमियातील संगीत, वाद्ये, वाद्यवृंद व वादनकार कित्येक शतके आणि अजूनही विख्यात व लोकप्रिय आहेत. स्मेताना व द्वोराक हे श्रेष्ठ संगीतनिर्माते होऊन गेले. आजही प्राग येथील वार्षिक वसंत संगीतोत्सव पश्चिमी संगीतसृष्टीत विख्यात आहे. बोहीमियन नृत्याचा प्रभावही यूरोपीय नृत्यावर पूर्वीपासून पडलेला आहे. ‘पोल्का’ नृत्यप्रकार हा जगभर लोकप्रिय असून विविध चेक प्रदेशांतील लोकनृत्येही मनोवेधक असतात. पहिले चेक नाटक १७८५ मध्ये झाले. १८६२ मध्ये तात्पुरते नाट्यगृह व १८८३ मध्ये राष्ट्रीय रंगमंदीर उभे राहिले. वास्तवदर्शी, भावनाप्रधान, ऐतिहासिक, नवविचारवादी, विनोदी अशा सर्व प्रकारांची नाटके रंगभूमीवर आली. कारेल चापेकचे महान अभिव्यक्तिप्रचुर नाटयप्रयोग आणि हॅचेकचा व्यंगविनोद चेक नाट्यसृष्टीवर ठसा ठेवून गेले. आता कम्युनिस्ट शासनाखाली रंगभूमीलाही समाजवादी वास्तववादाची कवायत करावी लागते. चित्रपटही तशाच नियंत्रणाने निघतात, तथापि कळसूत्री बाहुल्यांच्या व संचलित रेखाचित्रांच्या लघुपटांचे एक नवे तंत्र प्रभावीपणे वापरणारा विख्यात चित्रनिर्माता यिरी अंका याच्या कलाकृती शासनपुरस्कृत असूनही आकर्षक ठरल्या आहेत. कित्येक चेक चित्रपट जागतिक कीर्ती मिळविणारे ठरले आहेत.

हिवाळ्यातले बर्फावरचे खेळ चेकोस्लोव्हाकियात लोकप्रिय आहेत बर्फावरची हॉकी या सांघिक खेळाच्या स्पर्धा होतात. राष्ट्रीय पातळीवरील आपापसांतील संघांच्या सामन्यांखेरीज चेक राष्ट्राचा संघ अमेरिकन आणि कॅनडियन संघांशी आंतरराष्ट्रीय सामनेही देतो, त्यावेळी पाहणारांची गर्दी लोटून खेळाला उत्सवाचे स्वरूप येते. स्लोव्हाकियाच्या कार्पेथियन पर्वतप्रदेशातील ‘उंच तात्रा’ भागात ‘स्किंडून’ सारख्या हिमगिरीक्रीडा, सृष्टिसौंदर्याच्या परिसरात भ्रमण व विहार अशा अमीरी खेळांची संधी कारखान्यातील, शासनातील आणि पक्षातील निवडक लोकांना वेळोवेळी देण्यात येते. बहुसंख्य जनतेला ती सुलभ नाही. फुटबॉल, व्हॉलीबॉल, धावणे, उड्या, अनेकविध वैयक्तिक क्रीडानैपुण्य इ. लोकप्रिय आहेत.

महत्त्वाची स्थळे : मध्य यूरोपमधील अगदी पूर्वेकडचा हा देश, त्यातील ऐतिहासिक व औद्योगिक महत्वाची शहरे व निसर्गसौंदर्याची स्थळे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाला पारपत्र जवळ ठेवणे आवश्यक असते. १९७२ मध्ये १,१४,९८,९६८ प्रवासी चेकोस्लोव्हाकियात येऊन गेले. त्यातले ८,९५,००० पश्चिम यूरोपिय व सागरपार देशांतील होते. बोहीमियाचे पर्वत, वनप्रदेशाची शोभा व औषधी पाण्याचे झरे, डॅन्यूब नदीवरचा संचार आणि स्लोव्हाकियाच्या कार्पेथियन पर्वताचे भव्य दर्शन ही प्रवाशांना आकर्षणे आहेत.

प्राग ही देशाची व बोहीमियाची राजधानी असून ते पूर्व यूरोपचे अद्यापही सांस्कृतिक केंद्र आहे. त्याखालोखाल बर्‌नॉ ही नवव्या शतकात स्थापन झालेली मोरेव्हियाची राजधानी आणि ब्रात्यिस्लाव्हा ही नवव्या शतकात प्रेसबर्ग या नावाने स्थापन झालेली प्रथम हंगेरीची आणि नंतर स्लोव्हाकियाची राजधानी प्रसिद्ध आहे. कॉशित्से हे विविध उद्योगधंद्यांमुळे आधुनिक झालेले जुने स्लोव्हाक शहर मद्यनिर्मितीसाठी उल्लेखनीय आहे.

उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गाच्या मोरेव्हियन खिंडीजवळ कोळसा क्षेत्रात ओस्ट्रावा येथे लोहभट्ट्यांचे कारखाने असून युद्धोत्तर काळात वाढलेले हे नवे शहर आहे. पल्झेन हे बोहीमियातील मोठे औद्योगिक केंद्र असून ‘स्कोडा’ लोखंडी माल आणि पिल्सनर बीअरबद्दल हे जगप्रसिद्ध आहे. ऑलॉमोत्स हे औद्योगिक केंद्र असून लीबेरेत्स हे लोकरी व सुती कापडासाठी सोळाव्या शतकापासून प्रसिद्ध आहे. 

                                                                                                    ओक, शा. नि. 

संदर्भ :

1. Ello, Paul, Dubcek’s Blueprint for Freedom, London, 1969.

2. Hoffman, G. W. Ed. A Geography of Europe, New York, 1961.

3. Karnik, D. B. The Czechoslovak Crisis, Events and Statements, Bombay, 1968.

4. Pounds, Norman J. G. Europe and the Soviet Union, New York. 1966.

 

 

चित्रपत्र १४

चेकोस्लोव्हाकिया
चेक-रशिया मैत्रीचे स्मारक, कारलॉवी व्हारी

 

स्लोव्हाकमधील मेंढपाळी
आधुनिक जत्रास्थान, बर्नॉ

 

 

 

 

 

 

 


चित्रपत्र ५६

ग्रामीण स्लोव्हाक स्त्रिया स्लोव्हाक खेड्यातील शेतीसारखर कारखान्याकडे बीटची वाहतूक कापडगिरणीतील स्त्री-कामगार आधुनिक कृषिविद्यालय, न्यित्रा. चेक हस्तकला : मक्याच्या कणसाच्या खोळीची बाहुली. डूक्ला खिंडीतील सैनिकी स्मारक व्हल्टाव्हा नदीवरील धरण व्हल्टाव्हा नदीवरील प्राचीन किल्ला, प्राग.