बाँजुल : पूर्वीचे बॅथर्स्ट. प. आफ्रिकेतील गँविया प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील प्रमुख बंदर. लोकसंख्या ४२,४०० (१९७५ अंदाज). हे अटलांटिक महासागरातील सेंट मेरी बेटावर गँविया नदीमुखाशी वसलेले आहे. गँविया राष्ट्रीय महामार्गाशी ते जोडलेले असून शहराच्या नैर्ऋत्येस १६ किमी. वरील युंडुम येथे आंतरराष्ट्रिय विमानतळ आहे. कॅप्टन अलेक्झांडर ग्रँट याने १८१६ मध्ये गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने येथे लष्करी ठाणे उभारले. ब्रिटिश वसाहतींचा सचिव तिसरा अर्ल बॅथर्स्ट याचे नाव या शहरास देण्यात आले होते. गॅबिया संरक्षित विभागाचे प्रमुख ठाणे येथेच होते. त्यानंतर १९६५ साली स्वतंत्र झालेल्या गॅबियाची ही राजधानी करण्यात आली. १९७३ मध्ये शहराचे ‘बांजुल’ असे नामांतर करण्यात आले. बांजुल हे देशाचे प्रमुख व्यापारी व औद्योगिक केंद्र असून आसमंतातील शेतमालाची प्रमुख बाजारपेठ येथेच आहे. भुईमूग व त्यावर आधारित असे विविध उद्योग येथे विकसित झाले आहेत. जहाजबांधणी उद्योगही प्रगत झालेला आहे. येथून भूईमूग, भूईमूग तेल, कातडी इत्यादींची निर्यात होते. बांजुल हे देशाचे प्रमुख शैक्षणिक केंद्र असून शहरात शालेय व महाविद्यालयीन तसेच धंदेशिक्षणाची सोय आहे. पर्यटन उद्योगामुळे लाकडी वस्तू, दागदागिनेइ. हस्तोद्योगांना चालना मिळत आहे.

गाडे, ना. स.