यूगोस्लाव्हिया : (सोशलिस्ट फेडरल रिपब्लिक ऑफ यूगोस्लाव्हिया). आग्नेय यूरोपमधील एक देश. लोकसंख्या २,२९,६३,००० (१९८४ अंदाज). क्षेत्रफळ २,५५,८०४ चौ. किमी. कमाल लांबी ९७८ किमी. व कमाल रुंदी ५०१ किमी. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४०° ५१’ ते ४६° ५३’ उ. व १३° २३’ ते २३° २’ पू. यांदरम्यान. यूगोस्लाव्हियाच्या उत्तरेस ऑस्ट्रिया व हंगेरी, पूर्वेस रूमानिया व बल्गेरिया, दक्षिणेस ग्रीस व अल्बेनिया आणि पश्चिमेस एड्रिॲटिक समुद्र व इटली आहे. देशाला ७८९ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. देशाची १,०५० बेटे असून त्यांपैकी आठ बेटांचे प्रत्येकी क्षेत्रफळ १०० चौ. किमी. पेक्षा अधिक आहे. तसेच वायव्य भागातील ⇨ ट्रीएस्ट ग्रामीण विभाग (ब विभाग) यूगोस्लाव्हियाच्या ताब्यात आहे. बेलग्रेड (लोकसंख्या १४,७०,०७३ – १९८१) हे देशाच्या राजधानीचे शहर होय.

भूवर्णन : देशाचे तीन चतुर्थांश क्षेत्र पर्वतीय प्रदेशाचे व केवळ एक चतुर्थांश क्षेत्र मैदानी प्रदेशाने व्यापलेले आहे. प्राकृतिक दृष्ट्या देशाचे (१) किनारी प्रदेश, (२) अंतर्गत उच्चभूमी व (३) पॅनोनियन मैदानी प्रदेश असे मुख्य विभाग पाडता येतात.एड्रिॲटिक समुद्रालगतचा अरुंद किनापट्टीचा प्रदेश प्रामुख्याने खडकाळ आहे.किनारपट्टीबरोबरच किनाऱ्यालगतच्या सहाशेवर बेटांचाही यात समावेश होतो. अनेक ठिकाणी समुद्रकिनाऱ्यालगतच्या पर्वतांची उंची एकदम वाढलेली आढळते. त्यामुळे पर्वताचे उतार तीव्र स्वरूपाचे असून, तेथे प्रचंड कड्यांची निर्मिती झालेली आहे. समुद्रकिनारा दंतुर असल्यामुळे तेथे लहानलहान उपसागर, उपखाड्या व उत्तम नैसर्गिक बंदरांची निर्मिती झालेली दिसते. किनाऱ्यावरील सुंदर पुळणी आणि नयनरम्य सृष्टिसौंदर्य यांमुळे दरवर्षी प्रचंड संख्येने पर्यटक या भागात येतात. चुनखडकाचे प्रमाण अधिक असल्याने या भागाला कार्स्ट भूमिरूप प्राप्त झालेले आहे. भूपृष्ठ नापीक मृदेचे असून ठिकठिकाणी सुपीक जमिनीचे पट्टे आढळतात. येथे डाल्मेशियन प्रकारचा किनारा निर्माण झाला असून निमज्जित स्थलरूपाचे हे उत्तम उदाहरण आहे. समुद्रातील पर्वतरांगांचे माथे द्वीपकल्प, बेटे व द्वीपमालिकांच्या स्वरूपात, तर दऱ्या आखातांच्या आणि समुद्र खाड्यांच्या स्वरूपात दिसतात. किनाऱ्यावर लहानलहान उपसागर आहेत.

अंतर्गत उच्चभूमीच्या प्रदेशात वायव्य – आग्नेय दिशेत एकमेकींना तसेच समुद्रकिनाऱ्याला समांतर अशा अनेक पर्वतरांगा पसरलेल्या आढळतात. या रांगा मध्य, वायव्य, पूर्व व आग्नेय भागांत असून त्या किनाऱ्यापासूनच सुरू झालेल्या दिसतात. पर्वतांची उंची मात्र फार आढळत नाही. देशाच्या वायव्य कोपऱ्यात ज्यूल्यन आल्प्स पर्वत असून त्यातील ट्रीग्लाव्ह हे देशातील सर्वोच्च शिखर (उंची २,८६४ मी.) आहे. प्लोक्ना (उंची २,२२८ मी.), बोबोटोव्ह (२,५२२ मी.), डॅरॅव्हिका (२,६५६ मी.), रुजेन (२,२५१ मी.) व पोलिस्टर (२,६०० मी.) ही या भागातील इतर महत्त्वाची शिखरे आहेत. बर्फावरील शर्यतीच्या खेळांसाठी हा भाग विशेष प्रसिद्ध असून यूगोस्लाव्हियाचे हिवाळ्यातील क्रीडा मैदान म्हणून तो ओळखला जातो. उत्तरेस ऑस्ट्रिया – यूगोस्लाव्हिया सरहद्दींदरम्यान कारावांकेन पर्वतरांग आहे. ज्यूल्यन आल्प्सच्या दक्षिणेस एड्रिॲटिक समुद्राशी समांतर व देशातील सर्वांत महत्त्वाची दिनारिक आल्प्स पर्वतरांग आहे. किनारी प्रदेशाप्रमाणेच येथेही कार्स्ट भूमिरूप आढळत असून सुपीक भूमी थोड्याफार प्रमाणात आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण खडकरचनेमुळे त्यांत अनेक गुहांची निर्मिती झालेली आहे. त्यांपैकी ल्यूब् ल्यानाजवळील पोस्टोज्ना येथील गुहा तर जगप्रसिद्ध आहे. पूर्व व आग्नेय विभागांतील पर्वतरांगांचा विस्तार पुढे रुमानिया, बल्गेरिया व ग्रीसमध्ये झालेला आहे. दक्षिणेकडे या विभागाची रुंदी अधिक आहे. पूर्वी परकीय आक्रमणांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने येथील पर्वतीय प्रदेशांचा खूपच उपयोग झालेला आहे. मात्र देशातील वाहतूक व दळणवळण विकासात हे पर्वतीय प्रदेश प्रमुख अडथळा बनलेले आहेत. अलीकडे मात्र या पर्वतीय प्रदेशांतून अनेक रस्ते व लोहमार्ग काढलेले आहेत. या प्रदेशाच्या पूर्व व दक्षिण भागांत विविध प्रकारची खडकरचना आढळून येते. बराचसा भाग कठीण खडकांचा, नद्यांनी खोदलेला व ओबडधोबड पठारांचा आहे. या उच्चभूमीच्या प्रदेशात वारंवार भूकंपाचे हादरे बसत असतात. १९६३ मध्ये झालेल्या भूकंपाचा तीव्र धक्का स्कॉप्ये शहराच्या बहुतांश भागाला बसला होता. १९७९ मध्ये बसलेल्या भूकंपाच्या तीव्र हादऱ्याने अंतर्गत उच्चभूमीच्या दक्षिण भागातील तसेच आग्नेय किनारी प्रदेशातील अनेक गावांची व नगरांची खूप हानी झाली.

पॅनोनियन मैदानी प्रदेश यूगोस्लाव्हियाच्या उत्तर – मध्य भागात आहे. पश्चिमेस स्लोव्हीनियाच्या पूर्व भागापासून ते पूर्वेकडे रूमानियाच्या सरहद्दीपर्यंत हा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. हा बहुतेक सपाट मैदानी  प्रदेश असून अधूनमधून कमी उंचीच्या टेकड्या आहेत. देशातील सर्वांत सुपीक मृदा याच प्रदेशात असून, हा देशातील सर्वांत प्रमुख कृषी विभाग आहे. या मैदानी प्रदेशातून डॅन्यूब व तिच्या साव्हा, द्रावा व टिस या उपनद्या वाहतात. या मैदानाच्या दक्षिण भागात बेलग्रेड हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

हवामान व मूळ खडक यांनुसार वेगवेगळ्या प्रदेशातील मृदांमध्ये भिन्नता आढळत असली, तरी सामान्यपणे इतर यूरोपीय देशांमध्ये आढळणारे मृदा प्रकारच या देशामध्येही आढळतात. दिनारिक प्रदेशात चुनखडकापासून तयार झालेली हलकी मृदा असून, विस्तृत प्रदेशात उघडे खडक विखुरलेले आढळतात. काही चुनखडीच्या प्रदेशात, विशेषत: कार्स्ट (पोल्जा) भूमिरूप प्रदेशात चिकणमाती आढळत असून तिला टेरा रोसा म्हणूनही ओळखले जाते. ही बऱ्यापैकी सुपीक मृदा आहे. काही चुनखडीच्या भागात यापेक्षा सुपीक मृदा आहेत. पर्वतीय प्रदेशातील नद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या सुपीक मृदा आढळतात. जास्त उंचीच्या, विशेषतः जास्त पर्जन्याच्या ज्यूल्यन व कारावांकेन आल्प्स पर्वत प्रदेशात पॉडझॉल प्रकारची मृदा आढळते. सर्वाधिक सुपीक मृदा उत्तरेकडील मैदानी प्रदेशात व नद्यांच्या खोऱ्यांत आढळतात. नदीच्या आणि वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेल्या सुपीक मृदा आहेत. येथील अनुकूल हवामानामुळे मूलतः सुपीक मृदांची उत्पादकता वाढण्यास मदत झालेली आहे.

बॉक्साइट, क्रोमाइट, कोळसा, अँटिमनी, तांबे, लोह, जस्त, शिसे, पारा, खनिज तेल व नैसर्गिक वायू ही देशात सापडणारी प्रमुख खनिजे आहेत.

नद्या : डॅन्यूब ही देशातून वाहणारी मुख्य नदी असून ती पॅनोनियन मैदानातून वाहते. हंगेरीतून यूगोस्लाव्हियात प्रवेश करून द्रावा, द्रीना, मोराव्हा, व्हेलिका, बॉस्ना, साव्हा व टिस या उपनद्यासंह ‘आयर्न गेट’ नावाच्या घळईतून डॅन्यूब रूमानियात प्रवेश करते. डॅन्यूब व तिच्या उपनद्यांवर अनेक प्रमुख शहरे वसली असून, त्या जलवाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष उपयोगी आहेत. डॅन्यूबचा यूगोस्लाव्हियातील प्रवाह ५८८ किमी. लांबीचा आहे. नेरेट्‌व्हा, निसाव्हा व वार्दर या देशातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. देशातून वाहणाऱ्या नद्यांपैकी ७०% नद्या काळ्या समुद्राला जाऊन मिळतात व बाकीच्या नद्या इजीअन व प्रामुख्याने एड्रिॲटिक समुद्राला जाऊन मिळतात. अनेक नद्या अरुंद घळ्यांतून वाहताना आढळतात.

अंतर्गत पर्वतीय प्रदेशात शेकडो लहान व सुंदर सरोवरे असून ती पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. लेक स्कूटारी किंवा श्कोडर (क्षेत्र ३९१ चौ. किमी.) हे सर्वांत मोठे सरोवर अल्बेनिया सरहद्दीदरम्यान आहे. याशिवाय अल्बेनिया सरहद्दीदरम्यान ओहरिद (३४८ चौ. किमी.), ग्रीस सरहद्दीवर डॉयरन आणि अल्बेनिया व ग्रीस सरहद्दीवरील प्रेस्पा सरोवर (क्षेत्र २७४ चौ. किमी.) ही संयुक्त हक्क असलेली यूगोस्लाव्हियाची प्रमुख सरोवरे आहेत.


हवामान : यूगोस्लाव्हियाच्या हवामानावर तेथील अनुप्रस्थ पर्वतरांगांचा परिणाम झालेला आढळतो. पश्चिमेकडील अरुंद किनारपट्टीच्या भागात भूमध्यसागरी प्रकारचे, पर्वतीय प्रदेशांत सौम्य भूखंडीय, तर ईशान्येकडील पॅनोनियन मैदानी प्रदेशात भूखंडीय प्रकारचे हवामान आढळते. मध्य, उत्तर व ईशान्य यूगोस्लाव्हियात हिवाळे थंड व उन्हाळे उबदार असतात. भूखंडीय हवामान प्रदेशात हिवाळ्यातील सरासरी तपमान – १° से. व उन्हाळ्यातील सरासरी तपमान २४° ते २७° से. असते. येथील तपमानकक्षाही जास्त असते. एड्रिॲटिक किनाऱ्यावरील भूमध्य सागरी हवामान प्रदेशात उन्हाळे उबदार व कोरडे, तर हिवाळे सौम्य आणि आर्द्र असतात. येथे हिवाळ्यातील जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान ७° से. आणि उन्हाळ्यातील जुलै महिन्याचे तपमान २४° से. असते. पर्वतीय प्रदेशात सरासरी तपमान सामान्यपणे कमी असते. किनारी भागात हिवाळ्यात थंड बोरा वारे वाहतात, तर पर्वतीय भागात उन्हाळ्यात झंझावात निर्माण झालेले आढळतात. मॅसिडोनियात थंड व्हर्दरॅक वारे तसेच ईशान्य भागात थंड कॉसॉव्हॉ वारे वाहत असून, त्यांच तेथील हवामानावर परिणाम होत असतो. उत्तर भागात भूखंडीय वायुराशींचा प्रभाव अधिक आढळतो. आफ्रिकेतील सहारा प्रदेशाकडून वाहत येणाऱ्या सिरोक्को वाऱ्यांचा किनारपट्टीतील हवामानावर परिणाम होतो. अशा रीतीने यूगोस्लाव्हियाच्या वेगवेगळ्या भागांतील हवामानात भिन्नता आढळते. किनारी प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५ ते ९० सेंमी., ईशान्येकडील मैदानी प्रदेशात ६५ ते १०५ सेंमी., तर अंतर्गत पर्वतीय प्रदेशात ते २५० सेंमी.पेक्षा अधिक असते. पर्वतीय प्रदेशात जोरदार हिमवृष्टी होत असते.

वनस्पती व प्राणी : देशाचे सु. एक तृतीयांश क्षेत्र अरण्यव्याप्त असून सु. पाच हजारांवर वनस्पती प्रकार आढळतात. भूमध्यसागरी हवामानाच्या किनारी प्रदेशात सदाहरित वृक्ष, पर्वतीय प्रदेशातील जास्त उंचीच्या भागात पाइन, फर, व ज्युनिपर वृक्ष, तर बाकीच्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे बीच, ओक, हॉर्नबीम इ. पानझडी वृक्ष आढळतात. पर्वतीय प्रदेशात अधूनमधून गवताची कुरणे असून कार्स्ट प्रदेशात वृक्षरहित उजाड भूमी आढळते. यांशिवाय येथे विविध प्रकारचे नेचे, शैवल व फुलझाडे पहावयास मिळतात.

पर्वतीय व अरण्यमय प्रदेशांत हरिण, उदी रंगाचे अस्वल, आयबेक्स, काळवीट, रानडुक्कर, ससा, कोल्हा, लांडगा, रानमांजर इ. प्राणी आढळतात. पक्ष्यांमध्ये गरुड, तितर, हॉक या जाती महत्त्वाच्या आहेत. नद्या, सरोवरे व एड्रिॲटिक समुद्रात विविध प्रकारचे मासे आहेत. कार्स्ट प्रदेशात अनेक प्रकारचे विषारी साप पहावयास मिळतात.

इतिहास व राजकीय स्थिती : सांप्रतच्या यूगोस्लाव्हिया प्रदेशात सु. एक लाख वर्षांपासून मानवी वस्ती असावी. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी येथे इलिरियन व थ्रेसियन लोक राहत असल्याचे लेखी उल्लेख मिळतात. इ. स. पू. ६०० मध्ये ग्रीकांनी येथील एड्रिॲटिक समुद्रकिनाऱ्यावर वसाहती स्थापल्या. त्यानंतर सु. शंभर वर्षांनी केल्टिक जमातींनी या भागात स्थलांतर केले. इ. स. पू. ३०० च्या दरम्यान रोमनांनी बाल्कन द्वीपकल्पात आक्रमणास सुरुवात केली व ख्रिस्त जन्मकाळाच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण बाल्कन द्वीपकल्प काबीज केले. इ. स. ३९५ मध्ये येथील रोमन साम्राज्याचे दोन भाग पडले. त्यांतूनच पुढे रोमन कॅथलिक व ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन असे दोन गट पडलेले दिसतात.

सांप्रतच्या पोलंड, रशिया इ. भागांतून इ. स. सहाव्या शतकात स्थलांतर करून आलेल्या स्लाव्ह जमातीच्या लोकांनी बाल्कन द्वीपकल्पतील या प्रदेशात वस्ती केली. त्या सर्वांना दक्षिणी स्लाव्ह म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रत्येक गटाने आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. उदा., क्रोएटांनी क्रोएशिया, सर्ब लोकांनी सर्बीया राज्याची स्थापना केली. या प्रदेशाच्या दक्षिण भागातील जमाती बायझंटिन वर्चस्वाखाली, तर उत्तरेकडील जमाती फ्रँक राजवटीखाली आल्या. आठव्या व नवव्या शतकांत येथील स्लाव्ह लोकांमध्ये दोन गट निर्माण होऊन ते सर्व रोमन कॅथलिक किंवा ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन बनले. बाल्कन प्रदेशाच्या वायव्य भागात स्लाव्ह स्थायिक झाले होते. नवव्या शतकात शार्लमेन याने स्लाव्ह लोकांना जिंकून घेतले. १९१८ पर्यंत स्लाव्ह पारतंत्र्यातच होते. एड्रिॲटिक समुद्र ते द्रावा नदी यांदरम्यानच्या प्रदेशात क्रोएट लोकांनी वस्ती करून आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली होती. हंगेरियन राजांनी ११०२ मध्ये ते राज्य आपल्या ताब्यात घेतले. साम्यूलो (कार. ९७६ – १०१४) याच्या नेतृत्वाखाली मॅसिडोनिया राज्याचा एड्रिॲटिक, आयोनियन, इजीअन व काळ्या समुद्रापर्यंत असलेला विस्तार दक्षिणेकडे थेसाली व ईपायरसपर्यंत वाढविण्यात आला. दक्षिण भागातील सर्ब लोकांवरील बायझंटिन साम्राज्याचे वर्चस्व बाराव्या शतकात कमी झाल्यावर सर्ब लोकांनी स्वतंत्र एकसत्ताक राज्याची स्थापना केली. स्टेव्हान दूशान याच्या कारकीर्दीत (१३३१ – ५५) सर्बीयन राज्य विशेष सामर्थ्यवान होते. तसेच त्याने मॅसिडोनिया, थेसाली, ईपायरस व अल्बेनिया जिंकून घेतली. त्यानंतर मात्र तुर्कांचा सर्ब राज्यावरील प्रभाव वाढत गेला व शेवटी १३८९ मध्ये झालेल्या ऐतिहासिक अशा कॉसॉव्हॉच्या लढाईत तुर्कांनी सर्बीयनांचा पराभव केला. सु. ५०० वर्षांपर्यंत येथे तुर्की प्रभाव कायम राहिला. १४०० पर्यंत दक्षिण स्लाव्ह लोकांच्या बहुतेक सर्व प्रदेशावर परकीयांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. ऑस्ट्रियाने स्लोव्हीनीयावर, हंगेरीने क्रोएशियावर, तुर्कांनी सर्बीया, मॅसिडोनिया, माँटनीग्रो, बॉझ्निया व हेर्ट्‌सगोव्हीनावर तसेच व्हेनेशियनांनी सांप्रतच्या क्रोएशियामधील डाल्मेशियाच्या किनारी प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. येथील माँटनीग्रोंना मात्र पूर्णपणे जिंकता आले नाही. माँटनीग्रो (काळा पर्वत) या व्हेनेशियन शब्दावरून येथील लोकांनाही हा शब्द आलेला आहे. मध्ययुगीन कालखंडात ते याच काळा पर्वतप्रदेशात स्थायिक झाले होते. बॉझ्निया व हेर्ट्‌सगोव्हीनामध्ये प्रामुख्याने सर्ब आणि क्रोएट लोकांची वस्ती होती. मॅसिडोनिया हा भिन्न वांशिक गटांच्या लोकांचे वास्तव्य असलेला प्रदेश असून, त्यावर चौदाव्या शतकापासून बाल्कन युद्धापर्यंत (१९१२ – १३) तुर्की साम्राज्य होते. दीर्घकाळ असलेल्या तुर्की साम्राज्याचा ठसा येथील लोकांवर उमटलेला दिसतो. तसेच त्या काळात अनेकांचे इस्लाममध्ये धर्मांतरही करण्यात आले.

दक्षिणेकडील स्लाव्हांचे स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिशेने यशस्वी प्रयत्न एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू झाले. १८०९ ते १८१५ या कालावधीत फ्रान्सचा सम्राट नेपोलियन पहिला याच्या अधिकाराखाली स्लोव्हीनीया व क्रोएशिया राज्ये एकत्र आली. या अल्पशा काळातील एकीनेच दक्षिणेकडील स्लाव्ह लोकांचे मिळून एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची स्फूर्ती स्लोव्हीनीयन व क्रोएट लोकांना मिळाली. १८७८ मध्ये सर्बीयाने तुर्कांकडून स्वातंत्र्य मिळविले. मात्र स्लोव्हीनीया व क्रोएशियाला स्वातंत्र्य देण्याचे ऑस्ट्रिया – हंगेरीने नाकारले. उलट बॉझ्निया व हेर्ट्‌सगोव्हीना ताब्यात घेऊन आपले आधिपत्य अधिक विस्तारित केले. काराजॉर्जे (ब्लॅक जॉर्ज) व मिलॉश ओब्रेनोव्हिच यांच्या नेतृत्वाखाली सर्ब लोकांनी तुर्कांविरुद्ध बंड उभारले. त्यामुळे १८७७ – ७८ च्या रशिया – तुर्कस्तान युद्धानंतर स्वातंत्र्य मिळविता आले. तथापि ऑस्ट्रिया – हंगेरियन राजसत्तेचा अनुसेवी म्हणून सर्बीया राहिला. राष्ट्रवादी लोकांनी बाल्कन प्रदेशात गोंधळ माजविला. त्यातच सर्बीयन क्रांतिकारी गटातील सदस्य गाव्ह्‌रीलो प्रींट्सीप याने ऑस्ट्रियन आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची हत्या केली. या घटनेला सर्बीयाला जबाबदार धरून ऑस्ट्रियाने युद्धाची घोषणा करून सर्बीयावर स्वारी केली. २८ जून १९१४ रोजी सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धाचे एक मुख्य कारण म्हणजे ही घटना होय. १९१५ मध्ये बल्गेरिया या हल्ल्यात सामील झाला. ऑस्ट्रिया – हंगेरीचा १९१८ मध्ये पाडाव झाल्याने दक्षिण स्लाव्ह आपले स्वतंत्र राज्य स्थापण्यास मोकळे झाले.


युद्धाच्या समाप्तीनंतर १ डिसेंबर १९१८ रोजी सर्बीयन राजवंशातील राजा पहिल्या पीटर याच्या नेतृत्वाखाली ‘किंगडम ऑफ दी सर्ब्‌ज, क्रोएट्स ॲन्ड स्लोव्हेनीज’ अशा स्वतंत्र देशाची स्थापना करण्यात आली. राज्यातील अविकसित शेती आणि इतर राष्ट्रीय समस्या सोडविण्याच्या बाबतीत या नवनिर्मित राष्ट्रातील भिन्न वंशीय लोकांचे समाधान शासन करू शकले नाही. राजा पहिला पीटर याच्या मृत्यूनंतर १९२१ मध्ये त्याचा मुलगा राजा पहिला अलेक्झांडर (कार. १९२१ – ३४) अधिकारावर आला. १९२९ मध्ये अलेक्झांडरने १९२१ चे संविधान रद्द करून संसदेचे विर्सजन केले, घटकराज्यांची पूर्वीची विभागणी रद्द केली आणि ‘यूगोस्लाव्हिया’ (दक्षिणी स्लाव्ह लोकांची भूमी) या नवीन नावाने देशाची स्थापना केली. सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालून सत्ता आपल्या हातात घेतली. या घटनेला राष्ट्रवादी लोकांकडून तीव्र विरोध झाला व त्यातूनच १९३४ मध्ये क्रोएशियन क्रांतिकारी गटाकडून फ्रान्समधील मार्से येथे त्याची हत्या करण्यात आली.

अलेक्झांडरच्या हत्येच्या वेळी त्याचा उत्तराधिकारी दुसरा पीटर हा अवघा अकरा वर्षांचा असल्याने त्याचा चुलतभाऊ प्रिन्स पॉल हा अधिकारावर आला. त्यानेही अलेक्झांडरचीच राजनीती अवलंबिली. त्यामुळे मार्च १९४१ मध्ये पॉलला पदच्युत करण्यात आले. त्यानंतर राजा दुसरा पीटर अधिकारावर आला. त्यानंतर काही आठवड्यांतच बल्गेरियन, हंगेरियन व इटालियन सैन्यांच्या मदतीने जर्मनीने आक्रमण करून यूगोस्लाव्हियाला ताब्यात घेतले आणि त्याची फाळणी केली. त्यावेळी पीटर व त्याचे शासनातील इतर नेते लंडनला पळून गेले. १९४१ – ४५ या काळात झालेल्या गनिमी युद्धात १७,००,००० यूगोस्लाव्हियन लोकांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर देशात यादवी युद्धाला सुरुवात झाली. लोकांमध्ये दोन तट पडले. त्यांपैकी सर्बीयन गनिमी सैनिकांचे नेतृत्व जनरल ग्राझा मीहाइलॉव्हिच याच्याकडे, तर कम्युनिस्ट नेतृत्व योसिप ब्रोझ (मार्शल टिटो) याच्याकडे होते. टिटो याने यूगोस्लाव्हियात साम्यवादी शासन आणण्याचा प्रयत्न केला, तर गनिमी पथकाने राजा पीटरचे शासन आणण्यास पाठिंबा दिला. परंतु त्या वादात टिटोवादी प्रभावी ठरले. यूगोस्लाव्हियन लोकांकडूनही याला लगेचच पाठिंबा मिळाला. ऑक्टोबर १९४४ मध्ये सोव्हिएट लष्कराने बेलग्रेड मुक्त केले व मार्च १९४५ मध्ये टिटोच्या नेतृत्वाखालील संपूर्ण यूगोस्लाव्हिया ताब्यात घेऊन तेथे प्रांतीय शासन अधिकारावर आणले. २९ नोव्हेंबर १९४५ रोजी सांप्रतच्या प्रजासत्ताक व प्रांतांचेच मिळून ‘फेडरल पीपल्स रिपब्लिक ऑफ यूगोस्लाव्हिया’ची स्थापना करण्यात आली. तेथील राजसत्ता नष्ट करण्यात आली. राजा पीटर यूगोस्लाव्हियाला परतलाच नाही. साम्यवादी राजवटविरोधी लोकांना तुरुंगात डांबले अथवा हद्दपार केले. १९४६ मध्ये मीहाइलॉव्हिच याला फाशी देण्यात आले.‘कम्युनिस्ट पक्ष’ या एकाच राजकीय पक्षास मान्यता देण्यात आली. ३१ जानेवारी १९४६ च्या संविधानानुसार सहा प्रजासत्ताकांचे मिळून यूगोस्लाव्हिया संघीय प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. यूगोस्लाव्हिया व सोव्हिएट रशिया यांच्यात करार झाला. मात्र परराष्ट्र व आर्थिक धोरणांबाबत रशियाचे धोरण अवलंबिण्याचे टिटोने नाकारले. जून १९४८ मध्ये सोव्हिएट अध्यक्ष जोसेफ स्टालिन यांनी यूगोस्लाव्हियाबरोबरचे संबंध तोडले. त्यामुळे मदतीसाठी यूगोस्लाव्हिया अमेरिका व इतर पश्चिमी राष्ट्रांकडे वळला. १९५१ पासून अमेरिकेने लष्करी आणि आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. रशियाबरोबरचे संबंध तोडल्यानंतर यूगोस्लाव्हियाने आपल्या स्वत:च्या साम्यवादी समाजरचनेच्या विकासास सुरुवात केली. स्थानिक बाबींविषयी प्रजासत्ताक व प्रांतांना अधिकार देण्यात आले. १९५० पासून कामगारांच्या स्वयंव्यवस्थापित कारखान्यांना सुरुवात होऊन यूगोस्लाव्हियाच्या अर्थव्यवस्थेचे तेच मूलतत्त्व बनले. मात्र अनेक नेत्यांकडून येथील शासनाला विरोध झाला. स्टालिनच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी (१९५५) रशियाबरोबरचे संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यात आले. साम्यवादी राष्ट्रे व पश्चिमी लोकशाही राष्ट्रे यांच्यातील शीतयुद्धात कोणाचीही बाजू घेण्याचे टिटोने नाकारले. उलट तटस्थ राष्ट्रांचे नेतृत्व त्याने केले. ७ एप्रिल १९६३ च्या संविधानानुसार सहा प्रजासत्ताके व दोन प्रांत मिळून यूगोस्लाव्हिया समाजवादी संघीय प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. १९७१ व १९७४ मध्ये यूगोस्लाव्हियाच्या संविधानात बदल करून त्यानुसार प्रजासत्ताकांना अधिक स्वायत्तता देण्यात आली. तथापि अनेक क्रोएटांना संपूर्ण स्वातंत्र्य हवे होते. १९६० पासून तर यासाठी क्रोएटांच्या काही गटांनी दहशतवादी मार्गांचा अवलंब केला. तेव्हा १९७० मध्ये अनेक क्रोएशियन साम्यवादी नेत्यांना स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले.

सर्वोच्च वैधानिक अधिकार संघीय सभागृह (फेडरल चेंबर) आणि प्रजासत्ताक व प्रांतांचे सभागृह (चेंबर ऑफ द रिपब्लिक्स अँड प्रॉव्हिन्सेस) अशा द्विसदनी विधिमंडळाचे असतात. देशातील सहा प्रजासत्ताकांतून प्रत्येकी ३० प्रतिनिधी व दोन स्वायत्त प्रांतांतून प्रत्येकी २० प्रतिनिधी असे एकूण २२० प्रतिनिधी संघीय सभागृहात पाठविले जातात. सहा प्रजासत्ताकांच्या विधानसभांमधून प्रत्येकी १२ प्रतिनिधी व दोन्ही प्रांतांच्या विधानसभांतून प्रत्येकी ८ प्रतिनिधी असे एकूण ८८ प्रतिनिधी प्रजासत्ताकांच्या प्रांतांच्या सभागृहांत पाठवितात. १९७४ च्या संविधानानुसार टिटोच्या निवृत्ती अथवा मृत्यूनंतर देशाच्या नेतेपदाची निवड करण्याच्या दृष्टीने नऊ सदस्यांचे सामूहिक अध्यक्ष मंडळ (कलेक्टिव्ह प्रेसिडेन्सी) तयार करण्यात आले. देशाचे सर्वोच्च कार्यकारी अधिकार असलेले हे अध्यक्ष मंडळ आहे. प्रत्येक प्रजासत्ताक व प्रांताच्या विधानसभेतून प्रत्येकी एक प्रतिनिधी व ‘यूगोस्लाव्हिया साम्यवादी संघ’ (लीग ऑफ कम्युनिस्ट्स ऑफ यूगोस्लाव्हिया) या देशातील अधिकृत राजकीय पक्षाचा एक पदसिद्ध प्रतिनिधी असे एकूण नऊ प्रतिनिधी पाच वर्षांच्या मुदतीकरिता या अध्यक्ष मंडळावर पाठविले जातात. अध्यक्ष मंडळामधून एका वर्षासाठी राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष यांची निवड केली जाते. प्रजासत्ताकांच्या व प्रांतांच्या प्रतिनिधींमधून आळीपाळीने व ठराविक क्रमाने या पदांवरील निवड केली जाते. प्रत्येक वर्षी उपराष्ट्राध्यक्ष पदावरील सदस्य राष्ट्राध्यक्षपदावर येत असतो. १९७४ मधील टिटोची राष्ट्राध्यक्षपदावरील निवड मात्र तहहयात करण्यात आली होती. टिटोच्या मृत्यूनंतर (४ मे १९८०) देशाच्या नेत्याची एक वर्षासाठी निवड करण्यात येऊ लागली. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत टिटोचेच अलिप्ततेचे धोरण पुढे चालू ठेवण्यात आले. अठरा वर्षांवरील (नोकरी असल्यास सोळा) सर्वांना मतदानाचा अधिकार असतो.

देशातील सर्व पुरुषांना १२ महिन्यांपर्यंत लष्करी सेवा आवश्यक मानलेली आहे. १९८५ मध्ये देशातील भूसेनेत १,९१,००० नौसेनेत १३,००० वायुसेनेत ३७,००० सीमा सुरक्षादलात १५,००० प्रादेशिक संरक्षण दलात १०,००,००० आणि नागरी संरक्षण दलातील सैनिकांची संख्या २०,००,००० होती. युद्धकाळात १५ ते ६५ वयोगटातील सर्व नागरिकांना संरक्षणसेवा सक्तीची असते.

कम्यूनल न्यायालये, परगणा न्यायालये, प्रजासत्ताक व स्वायत्त प्रांतांची सर्वोच्च न्यायालये, विशेष अधिकारिता न्यायालये व संघ न्यायालय (फेडरल कोर्ट) अशी देशातील न्यायव्यवस्थेची रचना आहे. संघ न्यायालय हे देशाचे सर्वोच्च न्यायालय म्हणून काम पहात असून, त्यात प्रजासत्ताक व प्रांतांच्या सर्वोच्च न्यायालयांतील निकालांविरुद्ध आलेल्या अपीलांवर निर्णय देण्याचे काम चालते.


आर्थिक स्थिती : देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ५६% क्षेत्र शेतीखाली आहे (१९८०). दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात वेगाने झालेल्या औद्योगिक प्रगतीमुळे कृषिव्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण कमी झाले. १९४५ मध्ये ७६% लोक या व्यवसायात गुंतलेले होते, तेच प्रमाण १९८४ मध्ये ३२.७% झाले. एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शेतीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचा वाटा १२.६% आहे (१९८१). अल्प भूधारण व कमी उत्पादकता ह्या शेती व्यवसायापुढील प्रमुख समस्या आहेत. १९४५ च्या जमीन सुधारणा कायद्यानुसार खाजगी जमीनधारणेची कमाल मर्यादा ४५ हेक्टर ठरविण्यात आली. जास्तीची जमीन कसलाही मोबदला न देता काढून घेऊन तिचे सु. २० लाख शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्यात आले. युद्धानंतरच्या सुरुवातीच्या काळात सामूहिक शेतीला अधिक प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर १९५३ – ५४ मध्ये खाजगी शेतीपद्धती स्वीकारावयाची की सामूहिक, याविषयी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यात आले. त्यानुसार बहुसंख्य शेतकऱ्यांनी खाजगी शेतीपद्धती स्वीकारली. एकूण सु. २६ लक्ष खाजगी भूधारक आहेत. त्यांच्याकडे देशातील एकूण कृषियोग्य जमिनीपैकी ८५% जमीन असून त्यामध्ये ९५% पेक्षा अधिक शेतमजूर गुंतलेले आहेत. १९५३ मध्ये खाजगी जमीनधारणेची कमाल मर्यादा १० हेक्टर करण्यात आली. एकूण शेतीखालील जमिनीपैकी तीन चतुर्थांश जमिनीतून अन्नधान्याची, विशेषतः मका आणि गहू, पिके घेतली जातात. १९८४ मध्ये प्रमुख कृषी मालाचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : मका ११,२९३ साखरबीट ६,७९२ गहू ५,५९५ बटाटे २,४५७ द्राक्षे १,४१६ सातू ७४८ अलुबुखार ६३० सफरचंद ५८४ ओट २५६ राय ८१ तंबाखूची पाने ७७ भात ३६.

दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात पशुधन निर्यातीला यूगोस्लाव्हियाचा यूरोपमध्ये चौथा क्रमांक होता. त्यानंतर मात्र युद्ध आणि दुष्काळामुळे या व्यवसायाचे प्रमाण खूपच कमी झाले. १९८५ मध्ये देशातील पशुधन पुढीलप्रमाणे होते (संख्या हजारांमध्ये) : गुरे ५,१९९ डुकरे ८,६७३ मेंढ्या ७,६७८ घोडी ४३८ कोंबड्या ७०,४५३. १९८४ मध्ये पशुधन उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : गुरांचे मांस ३७१, डुकरांचे मांस ५६९, कोंबडीचे मांस ७, अशोधित चरबी ३२७, दूध ४५,७६० लक्ष लिटर, लोकर ९,८०३ मे. टन व अंडी ४६, ४०० लक्ष. देशातून प्राणी, मांस, अंडी व कातडी यांची निर्यात केली जाते.

उद्योग : देशातील ऊर्जेच्या एकूण मागणीपैकी दोन तृतीयांश मागणी स्थानिकरीत्या भागविली जात असून, त्यासाठी बहुतांशी खनिज तेलाच्या आयातीवर अवलंबून रहावे लागते (१९८१). खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे परावलंबित्व कमी करण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू असून, त्या दृष्टीने नवनवीन कोळसा क्षेत्रांचा तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेतला जात आहे. देशातील ऊर्जा साधनांच्या विकासासाठी जागतिक बँकेने ९२५ लक्ष अमेरिकी डॉलरचे नवीन कर्ज दिले आहे (१९८५). देशात कोळशाचे विस्तृत साठे आहेत. त्यामानाने खनिज तेलाचे साठे फारच कमी आहेत. येथील कोळसा मात्र कमी प्रतीचा आहे. रशियाकडील खनिज तेल आयात करण्यासाठी यूगोस्लाव्हियाने हंगेरी व चेकोस्लोव्हाकियातून तेलाचे नळ टाकलेले आहेत. स्कॉप्ये येथे खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आलेला असून ऱ्येका येथेही मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. देशातील सर्व ऊर्जा व शक्तिनिर्मिती प्रकल्पांचे सामाजीकरण करण्यात आलेले असून त्यांचे व्यवस्थापन त्यांतील काम करणारे कामगारच करतात. एकूण ऊर्जा आणि शक्तिनिर्मितीपैकी ५८% वापर उद्योगधंद्यांत व ३०% घरगुती वापर केला जातो. जलविद्युत्‌शक्तिनिर्मितीत हळूहळू वाढ होत आहे. पूर्वेकडे रूमानिया सरहद्दीजवळ डॅन्यूब नदीवर जर्दाप (आयर्न गेट) येथे १,०२५ मेवॉ. क्षमतेचा देशातील सर्वांत मोठा जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. १९७१ मध्ये २९,५०९ द. ल. किवॉ. ता. जलविद्युत्‌निर्मिती झाली, ती १९८२ मध्ये ६२,१८८ द. ल. किवॉ. ता. इतकी झाली. एकूण विद्युत्‌शक्तिनिर्मितीपैकी ४०% जलविद्युत्‌शक्ती असून ४०% स्थानिक लिग्नाइट व तपकिरी कोळशापासून, तर १५% खनिज तेल व नैसर्गिक वायूपासून निर्माण केली जाते. १९८१ मध्ये ६६४ मेवॉ. क्षमतेचा देशातील पहिला अणुशक्ती प्रकल्प स्लोव्हीनीया येथे सुरू झाला असून १९९० पर्यंत आणखी १० अणुशक्ती प्रकल्प उभारण्याची योजना आहे.

दुसऱ्या महायुद्धात देशातील खाणकाम उद्योगाची प्रचंड हानी झाली. त्याच्या पुनर्रचनेचा व विस्ताराचा जोरदार प्रयत्न शासन करीत आहे. शिसे, अँटिमनी, बॉक्साइट, पारा, तांबे, क्रोम, लोहखनिज व जस्त यांच्या उत्पादनात यूगोस्लाव्हिया यूरोपमध्ये अग्रेसर असून, त्याशिवाय चांदी, मॅग्नेसाइट व लिग्नाइटचेही उत्पादन घेतले जाते. देशात अंदाजे ९,००० लक्ष टनांपेक्षा अधिक लोहखनिजाचे साठे आहेत (१९८१). १९८४ मध्ये देशात पुढीलप्रमाणे महत्त्वाची खनिजोत्पादने झाली (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : कोळसा ६५,०७२ अशोधित खनिज तेल ४,०४४ लोहखनिज ५,३२१ तांबे २५,२७९ शिसे व जस्त ४,६३४ बॉक्साइट ३,३४७ आणि नैसर्गिक वायू १,९९८ हजार घ. मी. सर्व खनिजांवर देशातच प्रक्रिया केल्या जात असून, बऱ्याच खनिजांचे निर्यातीसाठी वस्तूंमध्ये रूपांतर केले जाते.

देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३६% क्षेत्र अरण्यांखाली आहे. एक तृतीयांश राखीव जंगले खाजगी मालकीची किंवा सहकारी संस्थांची, तर दोन तृतीयांश सामाजिकीकरण केलेली जंगले आहेत. बीच, ओक व पाइन हे यांतील महत्त्वाचे वृक्षप्रकार आहेत. १९८१ मध्ये सु. ४७,००० हेक्टर क्षेत्रात वनीकरण केले असून त्याच वर्षी २,०४,३८,००० घ. मी. लाकूडतोड करण्यात आली. बहुतेक लाकडाचे कागद किंवा अन्य वस्तूंमध्ये रूपांतर केले जाते. १९५२ ते ७७ या काळात माशांचा खप दुपटीने वाढला असला, तरी मासेमारी व्यवसाय अजूनही अविकसित अवस्थेतच आहे. सार्डीन, स्प्रॅट, तलवार मासा, ट्यूना इ. जातींचे मासे येथे पकडले जातात. १९८४ मध्ये ७६,२०० मे. टन मासे पकडले गेले. त्यांपैकी २५,१०० मे. टन गोड्या पाण्यातील ४८,४०० मे. टन खाऱ्या पाण्यातील मासे होते व उरलेले २,७०० मे. टन कवचमय, कालव आणि शिंपलेयुक्त जलचर होते.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी औद्योगिक दृष्ट्या हा अविकसित देश होता. महायुद्धानंतर शासनाने औद्योगिक प्रकल्पांचे सामाजीकरण केले. उत्पादनाचा वेग वाढविला व जड उद्योगांच्या विकासावर अधिक भर दिला. १९४९ – ७९ या काळात खनिज तेल उत्पादन व प्रक्रिया, विद्युत्‌ यंत्रसामग्री, वाहतुकीची साधने व रसायने या औद्योगिक क्षेत्रांचा वेगाने विकास झाला. त्यामुळे १९८० च्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील ४०% वाटा औद्योगिक उत्पादनांचा होता. १९३९ च्या तुलनेत १९८० मधील औद्योगिक उत्पादन अठरा पटींनी अधिक होते. १९८४ मध्ये काही प्रमुख औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : पोलाद ४,२३६ तांबे १२८ ॲल्युमिनियम ३०२ सिमेंट ९,३१५ रासायनिक खते २,३५० (१९८२) शोधित खनिज तेल १३,२५७ यांशिवाय ६,६७,००० दूरचित्रवाणी संच, १,७३,००० रेडिओ संच, ५५,७२१ ट्रॅक्टर, १५,७७८ ट्रक, २,४४,००० मोटारगाड्या व ३,१८० लक्ष चौ. मी. सुती कापडाचे उत्पादन झाले. १९५० ते ८० या काळात वार्षिक सरासरी ८.६% या दराने औद्योगिक उत्पादनात वाढ झाली.

देशातील काम करू शकणाऱ्या सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक असले, तरी शेती व इतर काही आर्थिक क्षेत्रांत अर्धरोजगाराची परिस्थिती आढळते. १९८१ मध्ये बेकारीचे प्रमाण ८% होते. कामगार संघ हा व्यवस्थापनामधील अत्यंत महत्त्वाचा घटक असून कामगार परिषदेकडून कामगार संघाचे धोरण ठरविले जाते. केंद्र व प्रांतीय शासनांनी कायद्याने किमान वैयक्तिक उत्पन्न निश्चित केलेले आहे. ४२ तासांचा कामाचा आठवडा असून कामगारांनीच कामकाजासंबंधीचे वेळापत्रक निश्चित करून घेतलेले आहे. कामगार – मालक संबंध कायद्याने निश्चित केलेले आहेत. सु. ८०% कामगार सहा कामगार संघटनांचे सभासद असून, त्या संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन ऑफ यूगोस्लाव्हियाशी संलग्न आहेत.


व्यापार, वाणिज्य व अर्थ : देशातील एकूण किरकोळ व्यापारापैकी फक्त २% व्यापार खाजगीरीत्या चालत असून, बहुतेक सर्व क्षेत्रातील ठोक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण केलेले आहे. अन्नधान्याची विक्री शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांकडून केली जाते. १९८२ मध्ये एकूण ८०,८८६ किरकोळ व्यापारी संस्थांची उलाढाल १,२८७·२ महापद्म दिनार (यूगोस्लाव्हियाचे चलन) किंमतीची व ठोक व्यापारातील उलाढाल १,५८८ महापद्म दिनार किंमतीची झाली. १९०९ पासून झाग्रेब येथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ‘इंटरनॅशनल ग्रँड फेअर’ हे प्रसिद्ध व्यापारी प्रदर्शन भरते. देशाचा सर्वांत जास्त आंतरराष्ट्रीय व्यापार सोव्हिएट रशियाशी चालत असून त्याखालोखाल पश्चिम जर्मनी व इटलीशी चालतो. याशिवाय इतर यूरोपीय राष्ट्रे, अमेरिका, इराक, इराण, ईजिप्त इ. देशांशीही व्यापारी संबंध आहेत. एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी ४०% पेक्षा अधिक व्यापार कॉमेकॉनअंतर्गत देशांशी चालतो (१९८४). १९८३ मध्ये सो. रशियाशी व्यापारी करार केला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार व जकातविषयक सर्वसामान्य करार (गॅट), यूरोपीय खुला व्यापार संघटना इत्यादींशीही यूगोस्लाव्हिया संलग्न आहे. यूगोस्लाव्हिया मुख्यतः भांडवली वस्तू, खनिज तेल, औद्योगिक कच्चा माल, धान्य, खते यांची आयात करतो आणि विद्युत्‌ यंत्रसामग्री, वाहतुकीची साधने, अभियांत्रिकी उत्पादने, अन्न पदार्थ, रसायने, पादत्राणे व चामड्याच्या इतर वस्तू, धातू, कापड, जहाजे यांची निर्यात करतो. १९८४ मध्ये यूगोस्लाव्हियाने १,४९,७०,६७० लक्ष दिनार किंमतीची आयात व १,२७,९७,३६० लक्ष दिनार किंमतीची निर्यात केली. यूगोस्लाव्हियाचा आंतरराष्ट्रीय देवघेवींचा ताळेबंद तुटीचा असलेली दिसतो. १९७९ मध्ये ही तूट ३३,६१० लक्ष डॉलरची होती, ती १९८२ मध्ये ४,६४० लक्ष डॉलर इतकी कमी झाली. आयातीत घट झाल्याने हे तुटीचे प्रमाण कमी झाले. आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील हा असमतोल कमी करण्याच्या उद्देशाने यूगोस्लाव्हियाने ऑक्टोबर १९८२ मध्ये दिनारचे १७% अवमूल्यन केले. परदेशातील यूगोस्लाव्हियन कामगार व व्यक्तींकडून मायदेशी पाठविल्या जाणाऱ्या रकमा व पर्यटन व्यवसायापासून मिळणारे परकीय चलन यांमुळेही हा असमतोल कमी होत जाईल अशी शासनाची अपेक्षा होती.

नॅशनल बँक ऑफ यूगोस्लाव्हिया, प्रजासत्ताकांच्या व स्वायत्त प्रांतांच्या राष्ट्रीय बँका या सर्व मिळून मध्यवर्ती बँकेची कार्ये करतात. १९७६ – ७७ मध्ये एकूण बँकिंग यंत्रणेची पुनर्रचना करून अंतर्गत बँका, मूलभूत बँका व सहयोगी बँका अशा तीन गटांत विभागणी करण्यात आली. मूलभूत सहयोगी कामगार संघटनांनी आपले आर्थिक व्यवहार व खाती हाताळण्यासाठी अंतर्गत बँकांची निर्मिती केली. अंतर्गत बँका पतनिर्मिती करीत नाहीत, तर त्या मूलभूत बँकांमध्ये आपल्या ठेवी ठेवतात. मूलभूत बँका इतर बँकांप्रमाणे सर्वसामान्य कार्ये करतात. सहयोगी बँका महत्त्वाच्या गुंतवणुकी व परदेशी देण्या-घेण्यासंबंधीचे व्यवहार सांभाळतात. देशात १६० मूलभूत व ९ सहयोगी बँका आहेत (१९७९). १९८२ मध्ये वेगवेगळ्या बँकांचे भांडवल पुढीलप्रमाणे होते (संख्या महापद्म दिनारमध्ये) : नॅशनल बँक ऑफ यूगोस्लाव्हिया ६९५·७, प्रजासत्ताकांच्या व स्वायत्त प्रांतांच्या राष्ट्रीय बँका ३०३·८, मूलभूत व सहयोगी बँका ३, ६६६·३, अंतर्गत बँका ३१२·६. देशात रोखेबाजार नाही, तथापि १९७१ च्या कर्जरोखे कायद्यानुसार सार्वजनिक मालकीच्या संस्थांना कर्जरोख्यांची प्रत्यक्ष विक्री करून भांडवल उभे करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर खाजगी विमाव्यवसाय बंद करण्यात आला. १९४७ ते १९६१ या काळात सामाजिक विमा वगळता बाकीचा सर्व विमाव्यवसाय ‘राज्य विमा संस्थे’कडून हाताळला गेला. १९६१ मध्ये विमाव्यवसायाची कायद्याने पुनर्रचना करून त्यात सामूहिक पद्धती स्वीकारण्यात आली. देशात ९ विमा संस्था असून त्या मिळून यूगोस्लाव्हियाचा विमा संस्था संघ बनला आहे (१९८०).

दिनार हे यूगोस्लाव्हियाचे अधिकृत चलन आहे. १०० पारांचा एक यूगोस्लाव्हियन दिनार होतो. २५ व ५० पारांची तसेच १, २, ५, १०, ५०, १०० व १,००० दिनारची नाणी व ५, १०, १००, ५००, १,०००, २,००० व ५,००० दिनारच्या नोटा चलनात आहेत. १ स्टर्लिंग = ४५२·१६० दिनार १ डॉलर = ३१२·८०५ दिनार किंवा १,००० यूगोस्लाव्हियन दिनार = २·२१२ स्टर्लिंग = ३·१९७ डॉलर असा विनिमय दर होता (१९८५).

राष्ट्रीय अर्थकारण : संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, आर्थिक विकास ह्या मध्यवर्ती सरकारच्या खर्चांच्या मुख्य बाबी असून विक्रीकर, सीमाशुल्क, प्रजासत्ताक व स्वायत्त प्रांतांकडून मिळणारे उत्पन्न ह्या महसुलाच्या मुख्य बाबी आहेत. १९८४ च्या अर्थसंकल्पातील महसूल व खर्च पुढीलप्रमाणे होता (रक्कम द. ल. दिनारमध्ये) : केंद्रीय अर्थसंकल्पातील महसूल ३, ९०, ९५१·४ व खर्च ३, ९०, ८४२·९ इतर अर्थसंकल्पातील (प्रजासत्ताक, स्वायत्त प्रांत व विविध समूहांचे – कम्यूनचे) महसूल ४, ४०, २५८·१ व खर्च ४, ३०, ८७१·८. १९८६ च्या अर्थसंकल्पातील अंदाजे केंद्रीय खर्च १,१०,३०० कोटी दिनारचा होता. १९८१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील महसुलापैकी ५७·५% महसूल प्रत्यक्ष करांपासून व ३४·२% अप्रत्यक्ष करांपासून मिळाला. वस्तू व सेवा यांवरील केंद्र सरकारचा विक्रीकर हा प्रमुख अप्रत्यक्ष कर आहे. प्रजासत्ताके, स्वायत्त प्रांत व नगरपालिका आपापला वेगळा विक्रीकर आकारतात. आयकर व संपत्तिकर हे मुख्य प्रत्यक्ष कर आहेत. प्रमाणशीर व उद्‌गामी कर प्रकारांचा अवलंब केला जातो. वेगवेगळी प्रजासत्ताके, प्रांत व नगरपालिकांतर्गत करांचे प्रमाण भिन्न असले, तरी करपद्धतीत सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी कर आकारणीचा आधार व करांचे प्रमाण यांविषयी काही मर्यादा निश्चित केलेल्या आहेत.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी यूगोस्लाव्हियात गुंतविलेले परकीय भांडवल प्रामुख्याने फ्रेंच व ब्रिटिशांचे होते. देशात कम्युनिस्ट राजवट आल्यानंतर प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक व व्यापारातील प्रत्यक्ष सहभाग यांवर निर्बंध घालण्यात आले. तथापि परकीय भांडवलाच्या मदतीशिवाय आर्थिक विकास शक्य नसल्याने जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र साहाय्य व पुनर्वसन प्रशासन संस्था तसेच अमेरिका, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन इ. पश्चिमी राष्ट्रे इत्यादींकडून सार्वजनिक किंवा खाजगीरीत्या भांडवल मिळवावे लागले. त्यानंतर मात्र राज्य, अधिकृत व्यापारी बँका व सार्वजनिक मालकीच्या संस्था यांनाच परकीय गुंतवणूकदारांशी प्रत्यक्ष आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचा अधिकार देण्यात आला. यूगोस्लाव्हियाने परकीय भांडवल गुंतवणुकीच्या संदर्भात अमेरिका, फ्रान्स, नेदर्लंड्स, प. जर्मनी, कॅनडा, स्वीडन इ. देशांशी करार केलेले आहेत. १९८० मध्ये उ. अमेरिकन कंपन्यांनी संयुक्त जोखीम तत्त्वावर यूगोस्लाव्हियाशी भांडवल गुंतविण्याविषयी करार केले. त्यांपैकी ७० कोटी डॉलर खर्चाचा खनिज तेल रसायन उद्योग समूह हा सर्वांत मोठा संयुक्त प्रकल्प आहे. संयुक्त जोखीम तत्त्वावरील प्रकल्पांत परकीय भागीदाराचे भाग भांडवल एकूण गुंतवणुकीच्या ४९% पेक्षा अधिक असत नाही.


वाहतूक व संदेशवहन : सार्वजनिक उपयोगाची सर्व वाहतूक साधने सार्वजनिक मालकीची आहेत. लोहमार्ग हे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन आहे. देशात ९,३९३ किमी. लांबीचे लोहमार्ग असून त्यांपैकी ३,३२० किमी. लांबीच्या लोहमार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे (१९८५). देशातील रस्त्यांची एकूण लांबी १,१७,०४१ किमी. असून (१९८३) एड्रिॲटिक समुद्रकिनाऱ्यावरील एड्रिॲटिक महामार्ग हा यूरोपमधील एक प्रसिद्ध महामार्ग आहे. यूगोस्लाव्ह एअरलाइन्सद्वारे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुरविली जाते. याशिवाय हवाई सेवा पुरविणाऱ्या इतर तीन सनदी कंपन्या आहेत. बेलग्रेड येथील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळाशिवाय प्रजासत्ताकांच्या राजधान्या व इतर अनेक महत्त्वाच्या शहरी विमानतळ आहेत. जहाजवाहतूक हे परकीय चलन मिळवून देणारे महत्त्वाचे साधन आहे. ऱ्येका (सर्वांत मोठे), स्प्लिट, क्रालेव्हो, बार, दूब्रॉव्ह्निक व कॉपेर ही एड्रिॲटिक समुद्रकिनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत. डॅन्यूब नदी हा अंतर्गत जलवाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असून नॉव्ही साट व बेलग्रेड ही तिच्यावरील प्रमुख बंदरे आहेत. डॅन्यूबशिवाय साव्हा, टिस, द्रावा, बेचे या नद्या जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. देशात १,५७,७६३ मोटारसायकली, २८,७४,०१० प्रवासी मोटारगाड्या २८,५६२ बसगाड्या २,२३,४४९ ट्रक ३,६१,३८७ ट्रॅक्टर होते (१९८४). संदेशवहनाची साधनेही सार्वजनिक मालकीची असून त्यांच्या विस्ताराचे व अत्याधुनिकतेचे प्रयत्न केले जात आहेत. यूगोस्लाव्ह प्रसारण संस्था ही रेडिओ व दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रसारण करीत असून, तिची १९१ रेडिओ व ८ दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. १९७४ पासून उपग्रह दूरसंचरण केंद्राचा आंतरखंडीय दूरवाणी, दूरचित्रवाणी व तारसंदेशासाठी उपयोग केला जात आहे. देशातील तिसरे उपग्रह केंद्र सर्बीयातील ईव्हान्यित्साजवळच्या प्रीलेप येथे १९८७ पासून कार्यान्वित होणार आहे. देशात ३०,३१,००० दूरध्वनी, ४६,९९,००० रेडिओ व ४०,७५,००० दूरचित्रवाणी संच होते (१९८४). यूगोस्लाव्हियात दर पाच व्यक्तींमागे एक दूरचित्रवाणी संच असे प्रमाण आहे.

लोक व समाजजीवन : देशातील एकूण सहा प्रजासत्ताकांपैकी सर्वांत जास्त लोकसंख्या (देशाच्या ४१·५%) व लोकसंख्येची घनता (दर चौ. किमी.ला १०५) सर्बीया प्रजासत्ताक, तर सर्वांत कमी लोकसंख्या (२·६%) व लोकसंख्येची घनता (दर चौ. किमी.ला ४२) माँटनीग्रो प्रजासत्ताकात होती (१९८१). देशाची लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ. किमी.स ८९·८ आहे (१९८४). १९७१ ते ८१ या काळात वार्षिक सरासरी १% पेक्षाही कमी गतीने लोकसंख्येत वाढ झाली. दर हजारी जन्मप्रमाण १६·४, मृत्युप्रमाण ९·३, स्वाभाविक वाढ ७·१, विवाहाचे प्रमाण ७·३ (१९८४), बालमृत्युप्रमाण ३१·७ व घटस्फोटाचे प्रमाण दर हजार विवाहांमध्ये १६१·८ (१९८३) होते. सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ६७·२ व स्त्रियांच्या ७३·६ बाबतीत आहे. नागरी लोकसंख्येचे प्रमाण ४२% होते (१९८१).

यूगोस्लाव्हियात विविध देशांमधून आलेल्या लोकांची वस्ती झालेली आढळून येते. त्यांपैकी सर्व (लोकसंख्या ८१,४०,५०७), क्रोएट (४४,२८,०४३), मुस्लिम (१९,९९,८९०), स्लोव्हेनियन (१७,५३,५७१), मॅसिडोनियन (१३,४१,५९८), माँटनीग्रोनियन (५,७९,०४३) हे मुख्य सहा गट आहेत. यांशिवाय इतर अल्पसंख्यांकांचे १८ गट असून देशाच्या एकूण लोकसंख्येत त्यांचे प्रमाण १९% आहे. त्यांपैकी अल्बेनियन (१७,३०,८७८), हंगेरियन (४,२६,८६७), रोमन (जिप्सी १,६८,०९९) व तुर्की (१,०१,१९१) हे मुख्य गट आहेत (१९८१). अल्बेनियन अल्पसंख्या प्रामुख्याने कॉसॉव्हॉ प्रांतात असून प्रांताच्या एकूण लोकसंख्येपैकी तीनचतुर्थांश संख्या त्यांची आहे. यूगोस्लाव्हियातील सर्वांत कनिष्ठ राहणीमान असलेले हे लोक आहेत. देशाच्या दक्षिण भागात पूर्वी स्लाव्ह जमातीचे लोक राहत होते. इ. स. आठव्या व नवव्या शतकांत फ्रँक व बायझंटिन या तेथील प्रभावशाली लोकांनी स्लाव्ह जमातीच्या लोकांचे ख्रिस्ती धर्मात रूपांतर केले. १०१५ मध्ये येथील लोकांमध्ये दुफळी पडून वायव्येकडील लोकांनी रोमन कॅथलिक पंथ, तर आग्नेय भागातील लोकांनी ऑर्थोडोक्स पंथ स्वीकारला. युद्धोत्तर काळातील यूगोस्लाव्हियाच्या सर्व संविधानांनी लोकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३५% ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन, २६% रोमन कॅथलिक व १०% मुस्लिम आहे. ज्यू लोकांची संख्या सु. ५,००० होती (१९८०). १९८१ च्या जनगणनेनुसार ८,७४,९६१ यूगोस्लाव्हियन परदेशांत असून त्यांपैकी ६,२५,०६५ लोक परदेशात तात्पुरत्या नोकरीवर आहेत.

दुसऱ्या महायुद्धात झालेल्या २०% लोकांच्या घरांचा नाश, लोकांचे शहरांकडे वाढलेले स्थलांतर, युद्धोत्तर काळात शासनाने औद्योगिक क्षेत्रातच केलेली अधिक गुंतवणूक इत्यादींमुळे राहण्याच्या समस्या निर्माण झाल्या. त्या सोडविण्याच्या दृष्टीने १९५६ पासून सर्व औद्योगिक व इतर संस्थांनी स्वतंत्र गृहनिर्माण निधी निर्माण केले. तसेच १९५८ पासून कामगारांच्या वेतनातून १०% रक्कम त्यासाठी वेगळी काढण्यात आली. अशा रकमेतून घरांचा प्रश्न सोडविण्यात आला. देशातील ७०% लोकसंख्या राष्ट्रीय विमा योजनेखाली येते. स्त्रियांना पगारी सहा महिने ते एक वर्षापर्यंत प्रसूती रजा मिळू शकते. गरोदरपणात, प्रसूतिकाळात आणि प्रसूतीनंतर सहा महिन्यांपर्यंत मोफत आरोग्यसेवा पुरविली जाते. तसेच मूल आठ महिन्यांचे होईपर्यंत नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी कामाचे तासही कमी ठेवले जातात. प्रसूतिमान २·२ आहे (१९७०). प्रजोत्पादनक्षम वयातील ५९% स्त्रिया संततिप्रतिबंधक मार्गांचा अवलंब करीत असल्याचे आढळते. यूगोस्लाव्हियाच्या आरोग्य विमा कार्यक्रमांतर्गत देशातील बहुतेक सर्व लोकसंख्येचा समावेश होत असून विमा उतरविलेल्यांना आजारीपणात, काही दुखापत झाली असल्यास किंवा गरोदरपणात मोफत आरोग्यसेवा व पगारी रजा मिळते. देशात एकूण ४०,६०९ वैद्य व दंतवैद्य असून त्यांचे दर ५५२ लोकांमागे एक वैद्य असे प्रमाण पडते. सार्वजनिक रुग्णालयांत एकूण १,३६,८२० खाटांची सोय आहे (१९८१). क्षयरोग, देवी, घटसर्प व धनुर्वात प्रतिबंधक लस टोचून घेणे सक्तीचे असून त्या मोफत पुरविल्या जातात.

भाषा व साहित्य : सर्बो – क्रोएशियन ही मुख्य भाषा असून ती प्रामुख्याने क्रोएट, माँटनीग्रोनियन, सर्ब व बॉझ्नियन मुस्लिम लोक बोलतात. सर्बो – क्रोएशियन ही एकच बोलीभाषा असली, तरी सर्बीयन (सिरिलिक लिपीनुसार लिहिली जाणारी) व क्रोएशियन (रोमन वर्णमालेत लिहिली जाणारी) अशा दोन प्रकारे लिहिली जाते. मॅसिडोनियन व स्लोव्हीनियन या इतर अधिकृत भाषा आहेत. देशात सत्तावीस दैनिके असून त्यांचा एकूण दैनिक खप २३,२८,००० आहे. त्यांशिवाय ४,५३२ इतर वृत्तपत्रे व नियतकालिके आहेत (१९८२). वैज्ञानिक आणि तांत्रिक मिळून ३,६०६ ग्रंथालये असून त्यांतील ग्रंथसंख्या ४,६२,२३,००० आहे. त्यांशिवाय ८,४५८ शालेय ग्रंथालयांतील ग्रंथसंख्या २,९९,८१,०२० आहे. प्रत्येक प्रजासत्ताकात किमान एक मोठे ग्रंथालय आहे. ईव्हो आन्द्रिच, रँको मारींकोव्हीटी, मीलव्हान जीलास, ईव्हॉन त्सान्कार इ. देशातील प्रसिद्ध साहित्यिक असून त्यांपैकी ईव्हो आन्द्रिच यांना त्यांच्या साहित्याबद्दल १९६१ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.


शिक्षण : देशातील साक्षरतेचे सरासरी प्रमाण ९१·२% असून ते पुरुषांच्या बाबतीत ९६·६% व स्त्रियांच्या बाबतीत ८६·१% आहे. (१९८५ अंदाज). ६ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना आठ वर्षांचे शालेय शिक्षण सक्तीचे व मोफत असते. देशातील १२,३०३ प्राथमिक शाळांत १,३४,७०३ शिक्षक व २८,१६,६९३ विद्यार्थी (१९८३ – ८४), ४४० माध्यमिक शाळांत ६३,८६८ शिक्षक आणि १०,२५,१३९ विद्यार्थी (१९८१ – ८२), ३५७ उच्च शिक्षण संस्थांत २४,९०५ शिक्षक व ३,८६,३५६ विद्यार्थी (१९८२ – ८३) होते. विद्यापीठांची संख्या १९ आहे (१९८१ – ८२). याशिवाय प्रौढ शिक्षणासाठी १७८ प्राथमिक शाळा (१९८२ – ८३) व ५८५ माध्यमिक शाळा (१९८१ – ८२) होत्या. माध्यमिक स्तरावर सर्वसामान्य माध्यमिक शाळा, तांत्रिक, व्यावसायिक, कुशल कामगार विद्यालये, शिक्षक – प्रशिक्षण, कला इ. विशेष सुविधा आहेत. १९८० पासून माध्यमिक शिक्षणाची पुनर्रचना करून सर्वसामान्य शिक्षण व व्यावसायिक शिक्षण एकत्रितपणे देणाऱ्या माध्यमिक शाळांची स्थापना केली जात आहे. बेलग्रेड (स्था. १८६३), झाग्रेब (१८७४) व ल्यूब्ल्याना (१९१९) ही देशातील जुनी विद्यापीठे असून बाकीची दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली आहेत. देशात ३८७ वस्तुसंग्रहालये असून त्यांतील निम्म्यापेक्षा अधिक समाजेतिहासविषयक व बाकीची लोकसाहित्य, कला, विज्ञान व आर्थिक – तांत्रिक विषयांसंबंधीची आहेत (१९८०). त्यांपैकी बेलग्रेड येथे असलेले वेगवेगळ्या कालखंडातील स्थानिक व परदेशी कलाकृतींचे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, मानवजातिवर्णनविषयक संग्रहालय, भित्तिलेपचित्रांचे दालन, आधुनिक कला संग्रहालय (स्था. १९६५) तसेच झाग्रेब येथील पुरातत्त्वीय व मानवजातिवर्णनविषयक वस्तुसंग्रहालये ही सर्वांत मोठी वस्तुसंग्रहालये आहेत.

कला व क्रीडा : बुद्धिबळ हा देशातील सर्वाधिक आवडीचा खेळ आहे. एकूण ५३० बुद्धिबळ क्लब आणि त्यांचे सु. ५०,००० खेळाडू सभासद आहेत. दरवर्षी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सु. ५ लाख यूगोस्लाव्हियन खेळाडू भाग घेतात. खेळांचे क्लब ९,००० पेक्षा अधिक असून त्यांचे सु. १५ लाख सभासद आहेत. सॉकर, जलतरण, शारीरिक कसरती, क्षेत्रपार शर्यती, बास्केटबॉल, हँडबॉल, वॉटरपोलो, टेबल टेनिस हे येथील आवडीने खेळले जाणारे खेळ आहेत. देशात १,२७८ सिनेमागृहे व ६८ नाट्यगृहे होती (१९८२ – ८३). देशातील प्रमुख आठ सिनेमानिर्मिती केंद्रांतून दरवर्षी ५० प्रधानपटांची व १५० लघुपटांची निर्मिती केली जाते. दूसान माकाव्हेजेव्ह यांचा द स्विचबोर्ड ऑपरेटर (१९६७) हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला. ईव्हॉन मेशट्रोव्हीच यांची उत्तम शिल्पकार म्हणून स्वदेशात व परदेशांतही ख्याती आहे. चित्रकार म्हणून पीटर लुबर्ड यांचे कार्य उल्लेखनीय आहे. येथील कापडावर हाताने केले जाणारे भरतकाम विशेष उल्लेखनीय आहे.

महत्त्वाची स्थळे : यूगोस्लाव्हियातील पर्यटन व्यवसायाचा विकास वेगाने होत असून, परकीय चलन मिळवून देणारा तो एक महत्त्वाचा मार्ग आहे. १९६१ मध्ये १०,८०,००० पर्यटक देशात येऊन गेले होते. ती संख्या १९८३ मध्ये ५९,४७,००० झाली. पर्यटन व्यवसायापासून १९७६ मध्ये ७२० द. ल. डॉलरचे उत्पन्न मिळाले होते ते १९८१ मध्ये १,८५३ द. ल. डॉलर झाले. देशाची राजधानी बेलग्रेड, प्रजासत्ताकांच्या राजधान्या, एड्रिॲटिक समुद्रकिनारा, दक्षिणेकडील सरोवरांचे प्रदेश ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. यांशिवाय स्कॉप्ये येथील पुरातन अवशेष, झाग्रेबजवळील औषधी पाण्याचे झरे, एड्रिॲटिक किनाऱ्यावरील तटबंदीयुक्त दूब्रॉव्ह्‌निक नगरी व तेथील उन्हाळ्यात भरणारा सांस्कृतिक उत्सव, शोभिवंत ऑपाटीया ठिकाण व तेथील ऑक्टोबरमध्ये होणारा संगीत उत्सव, स्लोव्हीनीयातील ट्रीएस्टच्या ईशान्येस असलेली पॉस्टोइना लेणी इ. पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध स्थाने आहेत. सर्व परदेशी प्रवाशांना पारपत्र व प्रवेशपत्र मिळविण्याची आवश्यकता असते. देशाची तसेच सर्बीया प्रजासत्ताकाची राजधानी बेलग्रेड, क्रोएशियाची राजधानी झाग्रेब (लो. ७,६८,७०० – १९८१), स्लोव्हीनीयाची ल्यूब्ल्याना (३,०५,२११), बॉझ्निया आणि हेर्ट्‌सगोव्हीनाची सारायेव्ह (४,४८,५००), मॅसिडोनियाची स्कॉप्ये (५,०६,५४७), माँटनीग्रोची टीटोग्राड (१,३२,२९०), व्हॉइव्हॉदिना प्रांताची नॉव्ही साट (२,५७,६८५) आणि कॉसॉव्हॉ प्रांताची राजधानी प्रीष्टिना (२,१०,०४०) तसेच नीस (६,४३,४७०), स्प्लिट (२,३५,९२२), ऑसियेक (८,६७,६४६), मारीबॉर (१,८५,६९९), बान्या लूका (१,८३,६१८), क्रागूयेव्हाट्स (१,६४,८२३) आणि सूबॉतीत्सा (१,५४,६११) ही देशातील मुख्य शहरे आहेत.

संदर्भ : 1. Auty, Phyllis, Yugoslavia, New York, 1965.

    2. Dedijer, V. History of Yugoslavia, New York, 1974.

    3. Horton, J. J. Yugoslavia Bibliography, Oxford and Santa Barbara, 1978.

   4. Rubenstein, Alvin Z. Yugoslavia and the Non – aligned World, Princeton, 1970.

   5. Singleton, F. B. Twentieth Century Yugoslavia, London, 1976.

चौधरी, वसंत


यूगोस्लाव्हिया

झाग्रेब येथील तांत्रिक शिक्षण विद्यालयातील एक दृश्यझाग्रेब : देशातील एक औद्योगिक शहर.मॉस्तार परिसरातील तंबाखूची शेतीदेशातील महत्त्वाचा जलसिंचन प्रकल्प, लिप्कॉव्हॉ.मॅसिडोनियन स्त्रिया.देशातील सहकारी कृषिक्षेत्रातील मेंढपाळीडूब्रॉव्हनिक : बंदर-परिसरातील तटबंदीयुक्त मध्ययुगीन वसाहत.बॅले : देशातील एक लोकप्रिय नृत्यप्रकार.