तेनसिंग, शेरपा : (१९१४– ) पहिला एव्हरेस्ट विजेता. नेपाळच्या सोला खुंबू जिल्ह्यातील थामी खेड्यातील ‘घांग ला’ या शेरपा कुटुंबात ते त्सा–चू च्या यात्रेला जात असता १९१४ मध्ये तेनसिंगचा जन्म झाला. प्रथम त्याचे नाव नामग्याल वांगडी असे ठेवले होते. परंतु हा मुलगा पुढे कीर्ती मिळविणारे आहे असे भविष्य एका लामाने वर्तविले आणि त्याचे नाव तेनसिंग नोर्के ठेवावे असे त्याच्या आईवडिलांस सांगितले. नेपाळी भाषेत याचा अर्थ ‘धर्माचा श्रीमंत, सुदैवी अनुयायी’ असा होतो.

तेनसिंग नोर्केथामी येथे इतर मुलांप्रमाणेच शेतकाम करीत व याक चारीत तेनसिंगचे बालपण गेले पण त्याच्या मनात सारखी हुरहुर होती. वयाच्या तेराव्या वर्षीच घरातून पळून जाऊन तो काठमांडूस जाणाऱ्या प्रवाशांच्या एका जथ्यात सामील झाला. काही दिवसांनी तो परत आला. इतर शेरपांप्रमाणे आपणही गिर्यारोहणात नाव कमवावे असे त्याला नेहमी वाटे. शेवटी तो दार्जिलिंगला जाऊन स्थायिक झाला. त्याने विवाह केला पण ते कुटुंब कसेबसे दिवस काढीत होते. १९३३ च्या एव्हरेस्ट मोहिमेत जाता न आल्यामुळे तेनसिंग फार खट्टू झाला होता परंतु १९३५ मध्ये एरिक शिप्टनच्या एव्हरेस्ट मोहिमेत ओझी वाहू म्हणून त्याला संधी मिळाली. ‘नॉर्थ कॉल’ पर्यंत तो सहज गेला आणि एक अत्यंत उत्साही तरुण शेरपा म्हणून त्याचे नाव झाले. लगेच पुढच्या वर्षी रटलजच्या व १९३८ मध्ये टिलमनच्या एव्हरेस्ट मोहिमेतही त्याचा समावेश झाला. त्याच वर्षी त्याला धैर्य, निष्ठा, आनंदी स्वभाव व कमालीचा काटकपणा यांसाठी हिमालयन क्लबतर्फे देण्यात येणारा ‘टायगर’ हा बहुमानाचा किताब मिळाला प्रत्यक्ष पदक पुढे १९४५ मध्ये मिळाले. नंतर तो चित्रळमध्ये तिरिचमिरच्या मोहिमेवर गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तो तेथे अधिकाऱ्यांच्या भोजनगृहात काम करी. तेथे तो बर्फावरून घसरण्याचे–स्कीइंगचे कसब शिकला. १९४० मध्ये मुलगा व १९४४ मध्ये पत्नी निवर्तल्यामुळे तो घरच्या ओढीने युद्धकाळानंतर दार्जिलिंगला परत आला. त्याने आंग लाहमूशी दुसरा विवाह केला. त्याला निमा आणि पेमपेम या दोन हुशार, चलाख, चुणचुणीत मुली आहेत.

तेनसिंगची गरिबी कायम होती आणि त्याचे कुटुंब कष्टामध्ये जीवन जगत होते. १९४६ मध्ये तेनसिंगने बंदरपूंछ आणि सिक्कीममधील झेमू हिमनदी या मोहिमा केल्या. १९४७ मध्ये अर्ल डेनमनन तिबेटात चोरून प्रवेश करून तेनसिंग व आणखी एक शेरपा यांच्यासह एकट्यानेच एव्हरेस्ट स्वारी करण्याचा धाडशी प्रयत्न केला. तथापि नॉर्थ कोलपासून त्यांना परतावे लागले. परंतु त्याच वर्षी तेनसिंगने आंद्रे रॉकच्या ‘स्विस गढवाल’ मोहिमेत भाग घेऊन ६,९४० मी. उंचीचे केदारनाथ शिखर सर केले. स्विस लोकांचे मोकळे व मैत्रीचे वागणे त्याला फार आवडले. तो कट्टर बौद्ध असल्यामुळे १९४८ मध्ये इटालियन प्राच्यविद्यापंडित प्रा. तूची यांजबरोबर ल्हासाला जाऊन आला. तेनसिंग आता शेरपांचा सरदार झाला होता. त्याने कांचनजंघा, नेपाळ हिमालय, बंदरपूंछ, काराकोरम व नंदादेवी यांच्या मोहिमांत भाग  घेतला. १९५१ च्या नंदादेवी फ्रेंच मोहिमेत त्याने नंदादेवीचे पूर्व शिखर सर केले.

तेनसिंगने १९५२ मध्ये पुन्हा एव्हरेस्टच्या वसंतातल्या आणि शरदातल्या स्विस मोहिमांत भाग घेतला. दुसऱ्या मोहिमेत तर तो केवळ शेरपा किंवा सरदार नव्हे, तर मोहिमेच्या सदस्यांपैकीच एक होता. रेमंड लँबर्ट या स्विस मार्गदर्शकाबरोबर त्याने एव्हरेस्टच्या माथ्यापासून केवळ सु. २५० मी.पर्यंत मजल मारली होती. या मोहिमेनंतर तो बराच आजारी पडला. रुग्णालयात असताना त्याचे वजनही बरेच घटले. तो आता एक उत्तम गिर्यारोहक, अनेक भाषा जाणणारा, बर्फावरून घसरण्याच्या बाबतीत तरबेज आणि मोहिमेत उत्तम स्वयंपाक करणारा म्हणून प्रसिद्ध होता आणि शेरपांचा सरदार म्हणून त्याला नेहमीच मागणी असे त्यामुळे १९५३ च्या ब्रिटिश मोहिमेत त्याला आमंत्रण आले तेव्हा तो आजारातून पूर्ण बरा झाला नव्हता. त्याच्या जाण्याला त्याच्या पत्नीचा मोठाच विरोध होता परंतु ब्रिटिश मोहिमेत नामवंत गिर्यारोहक होते. त्याचे वय आता एकूणचाळीस असल्यामुळे ही संधी दवडणे योग्य नव्हते आणि एव्हरेस्टवर चढाई करण्याची त्याची आता ही सातवी खेप होती. नेपाळात व शेरपा लोकांत सात हा आकडा शुभ समजला जातो. यामुळे अखेर त्याने होकार दिला. मोहीम प्रमुख सर जॉन हंट याला तेनसिंगसारखा अनुभवी व नामवंत एव्हरेस्ट गिर्यारोहक सरदार मिळाल्यामुळे फार आनंद वाटला.

२९ मे १९५३ या दिवशी न्यूझीलंडचा मधुमक्षिकापालक गिर्यारोहक एडमंड हिलरी याचे समवेत सकाळ ११·३० वाजता तेनसिंगने एव्हरेस्ट शिखरावर प्रथमच मानवी पाऊल ठेवण्याचा अपूर्व मान मिळविला. त्याची आयुष्यातली एकमेव महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. दीर्घकाळ उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले. तेनसिंगने संयुक्त राष्ट्रे, ग्रेट ब्रिटन, नेपाळ व भारत यांचे ध्वज एव्हरेस्टवर फडकावले. ‘चोमोलुंगमा’ (जगन्मातादेवी) ला बिस्किटे, चॉकोलेट वगैरेंचा नैवेद्य दिला, छायाचित्रे घेतली आणि पंधरा मिनिटांतच ते दोघे तेथून परत निघाले. तेनसिंग व हिलरी यांच्या एव्हरेस्ट विजयाची संपूर्ण कथा अत्यंत रोमहर्षक व चित्तवेधक आहे. नेपाळी आणि भारतीय लोक तेनसिंगला पूज्य मानू लागले. ब्रिटनने ‘जॉर्ज पदक’, नेपाळने ‘नेपाळतारा’ व भारताने ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्याचा गौरव केला.

तेनसिंग आता दार्जिलिंगच्या हिमालय गिर्यारोहण संस्थेत क्षेत्र प्रशिक्षण संचालक आहे. जेम्स रॅम्सी उलमान याच्या सहकार्याने १९५५ मध्ये तेनसिंगने ‘टायगर ऑफ द स्नो’ हे आत्मचरित्र लिहीले आहे.

तेनसिंग अत्यंत साधा, धर्मभीरू, निगर्वी असून त्याचे आपल्या कुटुंबावर व शेरपा जमातीवर मोठे प्रेम आहे. त्यांचेसाठी तो नेहमी झटत असतो. त्याच्या चेहेऱ्यावर त्याचे सुप्रसिद्ध विलोभनीय निर्व्याज हास्य विलसत असते. त्यामुळे त्याच्याकडे सल्ला मागण्यास जाणाऱ्या तरुण स्त्रीपुरुषास मोठा आधार मिळतो. त्याच्या पराक्रमामुळे व मार्गदर्शनामुळे भारतीय तरुण–तरुणींची एक जोमदार गिर्यारोहक पिढीच निर्माण झाली आहे.

संदर्भ : 1. Hunt, John, The Ascent of Everest, London, 1956.

   2. Verghese, B. G. Ed. Himalayan Endeavour, Bombay, 1962.

कांबळे, य. रा.